वैष्णोदेवी हे पूर्व भारतातील सर्वात मोठं श्रध्दास्थान. वैष्णोदेवीचं नुसतं स्मरण जरी झालं तरी 'चलो बुलावा आया है माताने बुलाया है' या गीताच्या ओळी आठवल्या शिवाय रहात नाहीत. अशी श्रद्धा आहे कि स्वयं वैष्णोदेवी मातेने दर्शनाला बोलावल्याशिवाय आपण कितीही ठरवलं तरी तिच्या दर्शनाचा योग येत नाही.
वैष्णोदेवी मंदिर दर्शनासाठी कायम सुरु असतं. पण इतर वेळेपेक्षा नवरात्रात देवीचं दर्शन घेणं विशेष मानलं जातं. आणि त्यामुळेच इतर वेळेपेक्षा नवरात्रात करोडो लोकं दर्शनासाठी येतात.
आम्हीही यावर्षी नवरात्रात वैष्णोदेवी दर्शनाला जायचं ठरवून चार महिने आधीच विमानाची तिकिटं काढली. याआधी पायी जाणं झालं असल्याने यावेळी एक महिना आधी हेलिकॉप्टरचीही तिकिटं काढली. नवरात्रात दर्शन घडणार म्हणून सगळेच आनंदात होतो.
प्रवासाची फार काही तयारीही करायची नव्हती त्यामुळे निवांत होतो. अनंत चतुर्दशी संपून पूढचे ५-६ दिवस नेहमीसारखे गेले. हळूहळू जायचा दिवस जवळ येत होता. आणि अचानक माझ्या सहचराची तब्येत थोडी बिघडली. औषधं घेऊन आणि ३-४ दिवस ऑफिस मध्ये न जाता घरीच आराम करुन थोडं बरं वाटलं. मग नेहमीच्या सवयीप्रमाणे थोड्या अट्टाहासानेच ऑफिसला गेला. आणि जेमतेम ऑफिस पर्यंत पोहोचला आणि जोरदार चक्कर येऊन खाली बसला. सहकारी मित्रांनी तातडीने रुग्णालयामध्ये नेलं. साऱ्या तपासण्या झाल्या. फार चिंता करण्यासारखं काही नाही हे कळलं आणि सारेच थोडे शांत झालो. आम्ही मधल्या वेळात त्याच्याजवळ पोहोचलोच होतो. मग सगळे घरी परत आलो. घरातच औषधोपचार सुरु केले. अतिशय थकवा, अशक्तपणा आला होता. हे सगळं वैष्णोदेवीला जायला जेमतेम ३-४ दिवस असताना घडलं होतं. त्यामुळे मनात थोडी काळजी दाटली होती.
जम्मूला विमानाने जायचं होतं आणि पुढे वैष्णोदेवीच्या दर्शनालाही हेलिकॉप्टरने जायचं यायचं होतं म्हणूनच केवळ जायचं ठरवलं. आणि आम्ही एकूण सात जणं जाणार होतो. आम्ही जाणं रहित केलं असतं तर सगळ्यांचाच हिरमोड झाला असता. म्हणून वैष्णोदेवीलाच प्रार्थना करुन जायचं ठरवलं.
ठरल्याप्रमाणे घटस्थापनेदिवशी पहाटे सारं आवरुन कुलस्वामिनी समोर अखंड नंदादीप आणि माळ लावून आम्ही निघालो. विमानतळावर जाण्यासाठी गाडीने निघालो. सकाळी लवकर निघूनही वाहतूक कोंडीत अडकलो. वेळेत पोहोचणार की नाही याची चिंता वाटत असतानाच अखेर वेळेत पोहोचलो. ठरल्या वेळेत निघालो आणि वेळेत जम्मूला पोहोचलो. आधी ठरवल्यानुसार विमानतळावरुन गाडीने पुढे निघालो.
सुरुवातीला आम्ही थोडं स्थलदर्शन करायचं ठरवलं होतं. त्यानुसार गाडीने डलहौसी ला पोहोचलो. तिथे पोहोचायला थोडा उशीर झाला होता. मार्गात थांबत थांबत प्रवास करत होतो. आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत, छायाचित्रं काढत डलहौसी ला पोहोचलो. रात्री गरमागरम चविष्ट दालखिचडीचा आस्वाद घेऊन मुक्काम केला.
डलहौसी हे भारताच्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील अतिशय सुंदर असं थंड हवेचं ठिकाण. पाच टेकड्यांवर वसलेलं हे शहर समुद्र सपाटी पासून ६००० फूट उंचावर आहे. धौलाधर पर्वत रांगेत असलेलं हे सुंदर पर्यटन स्थळ चंबा जिल्ह्यातील काथलाॅंग, पोट्रेन, तेहरा, बाक्रोटा आणि बाळु या पाच टेकड्यांवर वसलेलं आहे. १८५४ मध्ये ब्रिटिशांनी हे बांधून विकसित केलं आणि तत्कालीन व्हाॅईसराॅय लाॅर्ड डलहौसी यांचं नांव या जागेला देण्यात आलं.
मनमोहक अशा सृष्टी सौंदर्याबरोबरच सुंदर मैदानं, पर्वत, प्राचीन मंदिरं, चंबा आणि पंगी खोरं याचा समावेश डलहौसी मध्ये आहे.
आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्थलदर्शनासाठी निघालो. सारा रस्ता घाटमार्गाने जाणारा होता. सारे रस्ते खूप छान आहेतच पण सगळीकडे स्वच्छताही आहे. अतिशय सुंदर असं सृष्टी सौंदर्य पहात वळणदार रस्त्याने आम्ही चाललो होतो. बरोबरीने अर्थातच छायाचित्रं आणि चित्रण करणं सुरुच होतं. सारं डलहौसी आणि आजूबाजूची गावं अतिशय दाट हिरवाईने बहरलेली आहेत. तिथली सारी बांधकामं ती हिरवाई जपून केलेली आहेत. साधारण डिसेंबर महिन्यात तिथे बर्फ पडायला सुरुवात होते. त्यामुळे तिथे देवदार वृक्षांची दाटी आहे.
तासाभराने आम्ही डलहौसी पासून २४ किलोमीटरवर असलेल्या खज्जियार ला पोहोचलो. मखमालीचा गर्द हिरवा शालू ल्यायलेलं हे खज्जियार मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. पोपटी हिरव्या रंगाची लांबवर पसरलेली दाट हिरवळ आणि तिला देवदार वृक्षांची गर्द किनार अप्रतिम असं दृश्य. कितीही पाहिलं, छायाचित्रात, चित्रणात बद्ध केलं तरीही समाधानच होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुंदर हिरवळीवर आपण मनमुराद फिरुन आनंद घेऊ शकतो. आणि आपल्या फिरण्यात, आनंदात अडथळा होईल असे कुठलेही खेळ किंवा इतर काहीही इथे नाही.
अगदी ३-४ च छोटी उपहारगृहं आहेत पण ती पूर्णपणे बाजूला आहेत. प्रवेशद्वाराच्या समोर रस्त्यापलिकडे खाऊच्या छोट्या हातगाड्या आहेत. सगळीकडे साधारणपणे आलू पराठा, पनीर पराठा, मूली पराठा, छोले भटुरे, मॅगी, चहा, काॅफी हे सहज उपलब्ध असतं.
हे सारं सृष्टी सौंदर्य पाहून आम्ही परत निघालो. मग पोहोचलो दै कुंड टेकडीवर. इथे थोडं वर चढून गेल्यावर देवीचं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जास्त फिरता येत नाही. इथे वायु सेनेचा तळ आहे. हे पाहून आम्ही परत निघालो.
आमचं पुढचं ठिकाण होतं पंचपुला. या ठिकाणी एक सुंदर नैसर्गिक तलाव आणि जवळपास असलेले पाच पुल यामुळे हे ठिकाण पंचपुला या नावाने ओळखलं जातं. तलावातून पुढे जाणारं पाणी अगदी छोट्या धबधब्याच्या स्वरुपात खळखळत वहातं. आता आजूबाजूला इथे काही दुकानं सुरु झाली आहेत. इथे जाताना वाटेत अजून एक स्थान आहे ते म्हणजे सतधारा. सात स्वतंत्र जलधारा इथे एकाच ठिकाणी पहायला मिळतात. हे पाणी औषधी आहे. या पाण्याने स्नान केल्याने काही रोग बरे होतात अशी मान्यता आहे. मात्र आता इथे पर्यटकांना जायला बंदी घातली आहे.
हे सारं स्थलदर्शन करुन आम्ही कटरा ला निघालो. वाटेत थांबत थांबत निसर्ग सौंदर्य पहात छायाचित्रं काढत रात्री कटरा मुक्कामी पोहोचलो. सारं कटरा शहर नवरात्रात २४ तास गजबजलेलं असतं. सारं वातावरण वैष्णोदेवीच्या भक्तीने भारलेलं असतं. त्या वातावरणात येताच सारं स्थलदर्शन बाजूला पडलं आणि आम्हालाही वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाची आस लागली. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी जायचं होतं.
भारतातील हिमालय पर्वतरांगेतील वैष्णोदेवी हे अतिशय पवित्र आणि लोकप्रिय असं श्रध्दास्थान. जम्मूमधल्या कटरा शहरातील त्रिकुट पर्वतावर हे वैष्णोदेवीचं स्थान आहे. दुर्गादेवीचा एक अवतार म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ४५ किलोमीटरवर असलेल्या कटरा शहरापासून १४ किलोमीटरची चढाई करुन वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावं लागतं. ज्यांना हे संपूर्ण अंतर पायी चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी घोडा, पालखी, पिठ्ठू असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कटरा ते सांजीछत अशी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे. जाता - येता दोन्ही वेळा किंवा एकच वेळ अशी हेलिकॉप्टरची सेवा आहे.
त्रिकुट पर्वतावर असलेलं हे वैष्णोदेवी मंदिर एका गुहेमध्ये स्थित आहे. भैरवनाथाने वैष्णोदेवीचा आदिशक्तीला वश करण्यासाठी पाठलाग केला. माता वैष्णोदेवी या त्रिकुट पर्वतावर आली आणि एका ठिकाणी थांबून तिने भैरवनाथ मागोमाग येत असल्याची खात्री करुन घेतली. त्या स्थानाला चरणपादुका दर्शन असं नांव आहे.
माता ज्या गुहेत जवळपास ९ महिने राहिली त्या गुहेला 'गर्भजून' किंवा अर्धकुमारी गुंफा म्हणून ओळखतात. वैष्णोदेवी मातेबरोबरच हनुमानजी तिच्या रक्षणासाठी उपस्थित होते अशी मान्यता आहे. हनुमानजीना तहान लागली म्हणून वैष्णोदेवीने बाण मारुन पर्वतामध्ये जलधारा उत्पन्न केली आणि या धारेत मातेनं आपले केस धुतले. आता ही जलधारा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. या जळात स्नान केल्याने किंवा हे जल प्राशन केल्याने श्रध्दावानांचा सारा थकवा आणि अडचणी दुर होतात असं म्हणतात.
ज्याठिकाणी वैष्णोदेवी मातेने भैरवनाथांचा वध केला होता त्या ठिकाणाला भवन म्हणून ओळखलं जातं. भैरवनाथांचा वध केल्यावर त्याचं शिर दूरवर जाऊन पडलं. तिथं भैरवनाथ मंदिर बांधण्यात आलं आहे. त्यालाच भैरोघाटी असंही म्हणतात.
भैरवनाथांचा वध केल्यानंतर त्याना आपली चूक कळली आणि त्यांनी वैष्णोदेवी मातेची क्षमायाचना केली. तेव्हा मातेने त्यांना क्षमा करुन सांगितलं की माझं दर्शन घेतल्यानंतर तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. भैरवनाथ मंदिर दर्शनासाठी ३ किलोमीटर अंतर चढून जावं लागतं. त्यासाठी पायऱ्या, आणि साधा रस्ता अशी दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे. त्याशिवाय घोडा, पालखीचीही सोय आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून भवन ते भैरवनाथ अशी रोपवे ची ही व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर्षीपासून वैष्णोदेवी यात्रेसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. यात्रा पर्ची असली तरी ओळखपत्र अनिवार्य आहे.
त्यामुळे ते घेण्यासाठी आम्ही सकाळी ६.३० वाजताच श्राईन बोर्डाच्या कार्यालयात पोहोचलो. ओळखपत्र घेऊन तिकीट तपासणी, स्वतः चं वजन करुन बोर्डिंग पास घेण्यासाठी गेलो. या मधल्या वेळात पावसाचे टपोरे थेंब अधुनमधून शिंपडायला सुरुवात झाली होती. आमच्या मनात किंचित आशंका निर्माण होऊ लागली आणि तेवढ्यातच तिथल्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असं सांगितलं. आमच्यासह तिथे असलेल्या इतर लोकांनाही थोडी काळजी वाटू लागली. पण अगदी १५-२० मिनीटातच सेवा सुरु होतेय असं सांगून आम्हाला बोर्डिंग पास दिला. आणि आम्ही तिथल्या गाडीने हेलिपॅड कडे रवाना झालो. परिस्थिती अनुकूल नव्हतीच. ढगाळ हवामानामुळे काय होणार ही काळजी मनात होतीच.
श्राईन बोर्डाच्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आम्हा सात जणांपैकी दोघांचं तिकिट दुसऱ्या कंपनीचं होतं. ते दोघं त्या कंपनीच्या तिसऱ्या हेलिकॉप्टरने पुढे गेले. त्यानंतर त्या कंपनीचं अजून एक हेलिकॉप्टर सांजीछतला गेलं आणि त्या कंपनीने त्यांची सेवा खराब हवामानामुळे बंद केली. आम्हा चौघांचा पास सहा नंबरच्या हेलिकॉप्टर साठी होता. आणि एकाचा सात नंबरच्या हेलिकॉप्टरसाठी. आम्हाला हेलिपॅड वर जाऊन थांबवलं. सांजीछतहून आलेल्या हेलिकॉप्टर मध्ये फक्त आम्ही चौघं बसलो. आणि दोन पायलटसह आमचं हेलिकॉप्टर निघालं. उड्डाण झालं खरं पण मी नेमकी पायलटच्या मागेच बसल्याने मला त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेच सावट स्पष्ट कळत होतं. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती.
आकाश काळ्यापांढऱ्या ढगांनी व्यापलं होतं. त्यातून मार्ग काढत हेलिकॉप्टर योग्य दिशेने नेणं कठिण होतं. दाट ढगांमधून पलिकडचं काहीच दिसत नव्हतं. जेमतेम ८ मिनीटांचं हे अंतर पार करुन सांजीछतला पोहोचेपर्यंत खरोखरच सगळ्यांनाच काळजी वाटत होती. पण मनात वैष्णोदेवीचं अखंड नामस्मरण सुरु होतं. तिच्या कृपेनेच आमचं हेलिकॉप्टर सुखरुप सांजीछतला उतरवण्यात पायलटला यश आलं. आम्ही हेलिकॉप्टरमधून उतरुन कार्यालयात जाऊन पोहोचलो. मात्र ते हेलिकॉप्टर तिथेच थांबवलं होतं. अतिशय वाईट हवामानामुळे त्यांना कटराला परत जाणं अशक्य होतं.
आम्ही चौघांनी लगेच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चालायला सुरुवात केली. सांजीछत पासून साधारण २.५० किलोमीटर चालत जावं लागतं. तेव्हा आपण भवनच्या दर्शन मार्गावर पोहोचतो. हेलिकॉप्टर ने ये-जा करणाऱ्या भाविकांची दर्शन रांग वेगळी असते. साहजिकच ती रांग बरीच कमी असते. मात्र नंतर साधी रांग आणि विशेष रांग दोन्ही एकत्रच होते.
आम्ही सावकाश चालत होतो. कारण माझ्या सहचराची तब्येत अजूनही तितकीशी ठिक नव्हती. खूप अशक्तपणा होता.
सुरुवातीचं ३-४ किलोमीटर अंतर संपलं आणि आमच्या समोर आला अप्रतिम नजारा. इतर वेळी घेतलेल्या दर्शनापेक्षा नवरात्रातील दर्शन हे खरोखरच अवर्णनीय असतं. नवरात्रात संपूर्ण भवनच्या मार्गावर ताज्या फुलांची अतिशय अप्रतिम अशी सजावट केलेली असते. इतकी प्रचंड सजावट असते की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. जेव्हा आमच्यासमोर हे दृश्य आलं तेव्हा मी काही क्षण जागीच खिळून उभी राहिले. आजूबाजूच्या गर्दीचंही भान राहिलं नाही. काय आणि किती नजरेत आणि छायाचित्रात साठवू हेच कळेनासं झालं. माझा सहचर आधीपासूनच नवरात्रात दर्शनाला येत असल्याने त्याला हे काही नवीन नव्हतं. पण बाकी आम्ही तिघंही अक्षरशः अचंबित झालो होतो. मनात एकच विचार येत होता .या ताज्या फुलांची सजावट करण्यासाठी किती कलाकार एकत्र आले असतील, ऐनवेळी ही सजावट करताना किती कष्ट त्यांनी घेतले असतील. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी हा पुष्पसजावटीचा खजिनाच जणू या कलाकारांनी उघडा केला होता.
या साऱ्या सजावटीचा आनंद घेत छायाचित्रं काढत आम्ही दर्शनासाठी रांगेतून पुढे सरकत होतो. आम्हाला काही वेळातच दर्शन घडणार होतं. पण कान मात्र हेलिकॉप्टर च्या आवाजाकडे लागले होते. आम्ही सांजीछतला उतरल्यापासून हेलिकॉप्टरची ये-जा पूर्णपणे बंद झाली होती. आम्हाला दर्शन मार्गावरुन पर्वतावर पसरलेलं दाट धुकं सतत दिसत होतं. जोपर्यंत धुकं जाऊन हवामान स्वच्छ होतं नाही तोपर्यंत हेलिकॉप्टर सेवा पूर्ववत सुरु होणं अशक्य होतं.
साधारण तासाभरातच मातेच्या दर्शनासाठी आम्ही मुख्य गुहेत पोहोचलो. आणि पुढच्या काही मिनीटातच प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेसमोर मी नतमस्तक झाले. मातेचं सुंदर, लोभस रुप नजरेत साठवत शांत तृप्त मनाने बाहेर पडले. 'याचसाठी केला होता अट्टाहास' या जाणिवेने डोळ्यात पाणी आलंच. मनही क्षणात हळवं कातर झालं.
दर्शन आणि प्रसाद घेऊन अतिशय तृप्त मनाने परत निघालो. भवनच्या बाहेर आल्यावर सकाळपासून असलेलं धुक्याचं वातावरण अजूनच गडद झाल्याचं दिसलं. आणि परत मनात काळजी दाटली. हेलिकॉप्टर सेवा अजूनही सुरु झाली नाही हे कळलंच. त्यामुळे आता कटरा ला परत कसं जायचं हा प्रश्न होताच. पण त्याला निदान इतर पर्याय उपलब्ध होते. मात्र आमची चिंता वेगळीच होती.
आम्हा सात जणांपैकी दोघं आधीच दर्शनासाठी हेलिकॉप्टरने पोहोचले होते. आम्ही चौघंही हेलिकॉप्टरने पोहोचलो होतो. पण एक सहकारी मित्र एकटेच आमच्या नंतरच्या हेलिकॉप्टरने येणार होते. हेलिकॉप्टरमधून प्रत्येकाच्या वजनानुसार नेलं जातं. त्यामुळे एकाच कुटुंबातील किंवा ग्रुपमधील सगळे एकत्र जाऊ शकतातच असं नाही. त्यामुळे आम्ही फक्त चौघंच एकत्र जाऊ शकलो. आणि त्यांना पुढच्या हेलिकॉप्टर साठी थांबवलं होतं. पण अतिशय खराब हवामानामुळे ही सेवा बंद करावी लागली होती. त्यामुळे आता त्यांना दर्शन कधी कसं होणार ही काळजी आमच्या मनात होती. मात्र २-३ तास वाट पाहून सेवा सुरु होऊ शकणार नाही याची खात्री झाल्याने ते घोड्यावरुन दर्शनाला निघाले आणि आमची ती काळजी मिटली.
आम्ही दर्शन घेऊन परत सांजीछतला पोहोचलो. तिथे तिकिटं रद्द करुन कटराला जाण्यासाठी चालत निघालो. खरंतर चालत जाण्याएवढी तब्येत ठिक नव्हती. पण तरीही अतिशय सावकाशपणे थांबत थांबत अर्धकुमारी गुंफेपर्यत आलो. मात्र तोपर्यंत त्याची खूपच दमछाक झाली होती. अर्धकुमारी पासून कटरा सहा किलोमीटर अंतरावर आहे. एवढं चालणं त्याला फारच कठीण होतं. मग मात्र चौघंही घोड्यावरुन कटराला जायला निघालो. पुढच्या एका तासातच आम्ही कटराला सुखरुपपणे पोहोचलो. तिथून रिक्षाने मुक्कामाच्या ठिकाणी गेलो.
थोडा आराम करुन कटराच्या बाजारपेठेत फिरुन पोटपूजा करुन परत मुक्कामी आलो.
चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून आणि जम्मूला गेलो. तिथल्या रघुनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाजारपेठेत थोडीफार सुकामेव्याची खरेदी केली. आणि परत जम्मूच्या विमानतळवर पोहोचलो. परतीचा प्रवास करुन घरी आलो.
वैष्णोदेवीला जायचं चार महिने आधीच ठरवलं होतं. पण माझ्या सहचराची ऐनवेळी बिघडलेली तब्येत, त्यातून त्याला आलेला खूपच अशक्तपणा यामुळे दर्शन होणार की नाही याची चिंता वाटत असतानाच मातेने बोलंवलंय तेव्हा आपण जायचंच या श्रध्देने गेलो. त्यातही तिथल्या वाईट हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद झाली, ती आदल्या दिवशीही पूर्णपणे बंद होती. पण असं असूनही केवळ आमच्यासाठीच जणू ती हेलिकॉप्टरची त्यादिवशीची अखेरची फेरी झाली आणि आम्ही त्या वाईट परिस्थितीतही मातेच्या कृपेने सांजीछतला सुखरुप पोहोचलो. मातेचं अतिशय उत्तम असं दर्शन घडलं. परतीचा प्रवासही नीट झाला. हे सारं घडलं ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. वैष्णोदेवी मातेने बोलावल्याशिवाय आपण कितीही ठरवलं तरी दर्शन घडत नाही हे जितकं खरं आहे तितकंच तिने दर्शन द्यायचं ठरवलं असेल तर अनंत अडचणीतूनही आपल्याला तिच्या दर्शनाचं भाग्य लाभतं हेही खरंच आहे.
|| जय माता वैष्णोदेवी ||
- स्नेहल मोडक








No comments:
Post a Comment