मनकुपी - अतिशय वेगळा अपरिचित पण सुंदर असा हा शब्द. आणि या सुंदर शब्दाइतकाच सुंदर असा हा प्रकल्प म्हणजेच मनकुपी कॅम्पींग.
अपार सृष्टी सौंदर्याने नटलेल्या कोकणभूमीतील दापोली हे एक शहर. दाट हिरवीगार वनराई आणि स्वच्छ सुंदर सागरकिनारे अशी या दापोलीची ओळख. आता दापोली शहरात आणि आसपास मोठमोठी हाॅटेल्स, रिसाॅर्टस् सुरु झाली आहेत. त्यामुळे सगळ्या सुट्ट्यांच्या दिवशी इथे पर्यटकांची खूपच गर्दी असते. मात्र या गजबजाटापासून लांब शांत, रमणीय ठिकाण म्हणून मनकुपी हा उत्तम पर्याय आहे.
दापोलीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचनदी गावात मयुरेश मोडक या इंजिनिअर तरुणाने साकारलेला हा प्रकल्प, म्हणजेच मनकुपी कॅम्पींग. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग मनसोक्त अनुभवायचा असेल तर हा पर्याय नक्कीच सुंदर.
पंचनदी हे अगदी छोटंसं, जेमतेम दिड दोन हजार लोकवस्ती असलेलं, अतिशय शांत आणि रमणीय असं गांव. गावातून वहाणारी लहानशी नदी आणि तिच्यावर बांधलेलं धरण, बाजूला असलेला कोळथरे गावचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, आणि सुपारीच्या घनदाट बागा हे या गावाचं वैशिष्ट्य.
याच गावातल्या एका निसर्गरम्य ठिकाणी साकारलेलं मनकुपी कॅम्पींग. लाल मातीतून नागमोडी वळणं घेत जाणारी वाट, दोन्ही बाजूंनी असणारी गर्द वनराई यातून थोडंसं अंतर चालत गेल्यावर आपल्या दृष्टीस पडतो अप्रतिम नजारा. लाल मातीत छान वाढणारी सुपारी आणि केळीची बाग, आणि त्यापुढे असलेला धरणाचा विस्तीर्ण जलाशय. इतकं सुंदर दृश्य पाहून काही क्षण का होईना आपली पावलं खिळून रहातातच.
निसर्गाला जपतच मुळच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न इथे केलाय. अतिशय शांत अशा या ठिकाणी सुंदर जलाशय, त्यावर आणि आजूबाजूच्या वनराईत येणारे विविध पक्षी, त्यांचं मधुर कुजन, सायंकाळी दिसणारा सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा अनुभवण्यामधलं सुख काही वेगळंच.
अस्सल कोकणी पद्धतीचं शाकाहारी आणि मांसाहारी सुग्रास भोजन, डोगरांमधून जंगलवाटानी फिरणं, पक्षी निरीक्षण, कानी येणारा त्यांचा मधुर किलबिलाट, निसर्ग सौंदर्य टिपत करता येणारं सुरेख छायाचित्रण ही या कॅम्पींगची खासियत.
इधल्या शांत चांदणरात्रीचा अनुभव अतिशय वेगळाच. शुभ्र चांदणं, कलेकलेनं वाढता चंद्रमा, चोहीकडे नीरव शांतता अधूनमधून ऐकू येणारी रातकिड्यांची किरकिर, मधेच दूरवरुन ऐकू येणारा टिटवीचा आवाज सारंच अप्रतिम.
रोजच्या धावपळीतून आणि गजबजलेल्या वातावरणातून शांत निवांत क्षण अनुभवायला या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.
सरली सांज रात आली
अन टिपूरचांदणं ल्याली
जलदर्पणी चांदवा खुले
अन तरुपर्ण मोहक डुले
नाजूक रातराणी उमले
अन गर्द रात ही गंधाळे
तरुवरी काजवे चमचमती
अन भूवरी आरास मांडती
चांदण्यात नदीतीर नाहती
अन जळावरी तरंग उठती
नीरव रातही अलवार खुले
अन मनी चांदणझुला झुले
सरली सांज रात आली
अन टिपूरचांदणं ल्याली
- स्नेहल मोडक
मनकुपी कॅम्पींग - संपर्क : +91 7499510681






No comments:
Post a Comment