नुकतंच घरी एक शुभ कार्य संपन्न झालं होतं. खरंतर तयारीला खूप कमी वेळ मिळाला होता. त्यामुळे खूपच धावपळ सुरु होती. त्यातच आमच्या आधीच ठरलेल्या कार्यक्रमांमध्येही वेळ जात होता. अशातच तब्येतीच्या आणि इतर काही अडचणी उद्भवल्या. आणि कार्यक्रम पार पडेपर्यंत मनात एक चिंतेचं सावट दाटून राहिलं. मात्र केवळ श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादानेच त्या साऱ्या अडचणींतून आम्ही सुखरुप बाहेर पडलो आणि कार्य अतिशय उत्तम रितीनं संपन्न झालं.
कार्यक्रमानंतर २-३ दिवसातच दैनंदिन व्यवहार सुरु झाले. याचं ऑफिसला जाणं सुरु झालं. पण आधी बिघडलेल्या तब्येतीमुळे अशक्तपणा खूपच होता. पण हळूहळू बरं वाटेल याच विचाराने रुटिन सुरु केलं होतं. घरच्या सगळ्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने खूपच दगदग झालीय आता पूर्ण विश्रांती घ्या. कुठेही प्रवासाला जाऊ नका अशी प्रेमळ दटावणीही केली होती. त्याप्रमाणे काही दिवस सुरळीत सुरु होतं.
पौष पौर्णिमा चार दिवसांवर आली आणि मला गिरनारचे वेध लागले. एवढं मोठं कार्य संपन्न झालं, साऱ्या अडचणीतून बाहेर काढत आम्हाला आश्वस्त केलं ते श्री दत्तगुरुंनीच. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी माझं मन आसुसलं होतं. पण याची तब्येत अजून तितकी ठिक नसल्याने तो नंतर जाऊया असं म्हणत होता. पण मला लगेच आलेल्या पौष पौर्णिमेलाच दर्शनाला जायचं होतं. गिरनारला निघायच्या आदल्या दिवसापर्यंत याचा नकार होता. माझं मन मात्र दर्शनासाठी कासावीस झालं होतं.
अखेर मी दत्तगुरुंनाच प्रार्थना केली काहीही करा पण मला गिरनार दर्शन घडवा. माझी गिरनारला कशीही यायची तयारी आहे. मी एकटीने, कुठल्याही गाडीने, कसाही प्रवास करुन यायला तयार आहे. पण मला दर्शन घडवाच. दत्तगरुंना माझी तळमळ कळली आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण करायचं ठरवलं असावं. मी याला सांगितलं माझं एकटीचं रेल्वेचं तिकीट काढं. ऐनवेळी एकही तिकीट उपलब्ध नव्हतं हे कळल्यावर मी जनरल डब्यातून प्रवास करेन पण गिरनारला जाईन असंही सांगितलं. पण मला एकटीला पाठवणं त्याला अशक्य होतं अखेर रात्री इथून अहमदाबाद पर्यंतची दोन तिकिटं मिळाली. तिथून पुढे दुसऱ्या गाडीने जुनागढची तिकीटं मिळाली. आणि गिरनारला जायचं नक्की झालं. मात्र परतीचं फक्त अहमदाबाद पर्यंत तिकिट मिळालं. पुढचं दुसऱ्या गाडीचं तात्काळ मध्ये तिकीट काढायचं ठरवलं.
रेल्वेची तिकीटं मिळाल्यावर उडन खटोलाची तिकीटं काढली. पण उडन खटोलाच्या च्या साईटची काहीतरी गडबड झाली होती. आम्ही तिकीटं काढली आमचे पैसे तिथे जमा झाले पण आम्हाला तिकीट मिळालच नाही. बराच प्रयत्न करुनही काही होईना म्हणून ते पैसे वाया गेले असं समजून पुन्हा तिकीट काढायचा प्रयत्न केला तर तेही येईना. मग मात्र सकाळी बघू असा विचार करुन तो नाद सोडून दिला.
सकाळी अचानक उडन खटोलाच्या सईटवरुन आमची तिकीटं आली असल्याचा मेसेज आला. आदल्या दिवशीची काळजी मिटली होती. आधी भरलेले पैसे वाया न जाता तिकीटं मिळाली होती. मग सारं आवरुन प्रवासाला निघालो. अहमदाबाद पर्यंत सारा प्रवास सुरळीत झाला. अहमदाबादला वेळेत पोहोचलो. पुढे जुनागढला जाणाऱ्या गाडीला दिड तासाचा अवधी होता. म्हणून आम्ही ज्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर उतरलो होतो तिथेच बसलो. तिथून मुख्य इंडिकेटर सहज दिसत असल्याने आम्हाला आमची गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार ते कळणार होतं. त्यानुसार थोड्या वेळाने आमची गाडी दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार हे कळलं आणि आम्ही तिकडे गेलो. मात्र तिथे , प्लॅटफॉर्म नंबर 2A असा बोर्ड होता. हा 2A आहे म्हणजे बाजूचा दोन नंबर आहे असं साधा समज करुन घेत आम्ही तिथेच थांबलो. गाडीची वेळ जवळ आली आणि माझ्या मनाची चलबिचल सुरु झाली. का कुणास ठाऊक पण काही तरी चुकतंय असं मला वाटू लागलं. आणि मी इथे बाजूलाच असलेल्या स्टाॅलवरच्या माणसाला विचारुन हाच दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ना याची खात्री करुया असं याला सारखं म्हणू लागले. पण त्याचं एकच उत्तर साधं सरळ आहे, इथेच गाडी येणार विचारायची काही गरज नाही. आणि मग मीही गप्प बसले. पण त्याचवेळी मीच विचारुन घेतलं असतं तर पुढचा सगळा गोंधळ टळला असता अर्थात ही पश्चातबुध्दी होती.
गाडीची वेळ होत आली आणि आम्ही जिथे थांबलो होतो तिथे दुसरीच गाडी आली, जी आमच्या गाडीच्या नंतर सुटणारी होती. आणि त्याच गाडीचं तिकीट आम्हाला मिळालं नव्हतं. असं कसं झालं असा आम्ही विचार करत असतानाच प्लॅटफॉर्म क्रमांक 2A वर आमची गाडी येताना दिसली. आणि आम्ही आमच्या डब्याकडे जाण्यासाठी चटकन पुढे गेलो पण त्या गाडीचा इंडिकेटरच लागला नसल्याने डबा नक्की कुठे येईल हे आम्हाला कळलं नव्हतं. त्यामुळे आम्ही डबा बघत असतानाच गाडी मात्र आमच्या नजरेसमोरुन न थांबता जणूकाही आम्हाला वाकुल्या दाखवत पुढे निघून गेली. आणि काही क्षण आम्ही थिजूनच गेलो. मग भानावर येत स्टॉलवरच्या माणसाला गाडी बद्दल विचारलं तर तो सहजपणे आताच तर गेली गाडी असं म्हणाला. पण गाडी थांबलीच नाही असं सांगितल्यावर म्हणाला गाडी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरच थांबली होती. तेव्हा कळलं तो प्लॅटफॉर्म आम्ही जो समजत होतो तो नव्हताच. तर 2A आणि 2 नंबर असा एकच लांबलचक प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे गाडी खूप मागे येऊन थांबलेली आम्हाला कळलीच नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाडीची सुचनाही दिली गेली नव्हती.
गाडी नजरेसमोरुन निघून गेली आणि मग आमच्या समोर एकच पर्याय उरला होता तो म्हणजे बाजूचा उभ्या असलेल्या गाडीत विनातिकीट चढणे. ती गाडी सुटायची वेळ झाल्याने आम्ही लगेच त्या गाडीत चढून दारातच तिकिट तपासनीसाची वाट बघत उभं राहिलो. गाडी सुटली आणि काही वेळातच तिकीट तपासनीस आला. आम्ही त्याला सारं सांगितलं आमचं त्या गाडीचं तिकीट दाखवलं अर्थात त्या तिकीटाचा इथे काहीच उपयोग नव्हता. पुन्हा दंडासहित तिकिट घेणं भाग होतं त्याला आम्ही तयार होतोच. कुठल्याही परिस्थितीत जुनागढला पोचायचं होतं आम्हाला. तपासनीसानी आम्हाला पुढच्या स्थानकावर बसायला मिळेल अशी व्यवस्था केली. तोपर्यंत आम्ही दोघंही दारातच उभं राहीलो होतो. साधारण तासाभरानंतर आलेल्या स्थानकावर २-३ जणं उतरली आणि आम्हाला बसायला जागा मिळाली. आणि श्री दत्तगुरुंना मनोमन नमस्कार केला.
पहाटे वेळेत जुनागढला उतरलो. आधी ठरवलेल्या संस्थेत रहाण्यासाठी गेलो. पण आम्हाला हवी ती खोली उपलब्ध नव्हती. मग जी साधी खोली मिळाली ती घेऊन खोलीच्या बाहेर असलेल्या स्नानगृहात सारं आवरुन दर्शनाला निघालो. मला इथेही चांगलीच तडजोड करावी लागली होती. पण कुठल्याही परिस्थितीत दर्शन तर हवंच होतं. म्हणूनच ते स्विकारणं भाग होतं. दर्शनासाठी बाहेर पडलो आणि नेहमीप्रमाणे पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे साठी तिथे पोहोचलो. खरंतर खूपच मोठी रांग होती. पण आमचं तिकीट आधीच काढलेलं असल्याने आम्हाला अगदी लगेच जायला मिळालं.
रोप वे ने उतरुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. तब्येत ठीक नसल्याने सावकाश जायचं असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे नामस्मरण करत चढत होतो. पण अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्येत साथ देत नसूनही सर्वात कमी वेळेत आम्ही गुरुशिखरावर पोहोचलो. मंदिरात प्रवेश करुन दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन क्षणात शांत झालं. याचसाठी केला होता अट्टाहास याची जाणीव झाली अन मन तृप्त झालं. कसंही न्या पण मला दर्शन घडवाच ही माझी इच्छा दत्तगरुंनी पुर्ण केली होती. घरात निर्विघ्नपणे शुभ कार्य श्री दत्तात्रेयांच्या कृपेने पार पडलं होतं त्यामुळे त्यांचं दर्शन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं.
दर्शन घेऊन गुरुशिखरावरुन खाली येऊन अखंड धुनीचं दर्शन प्रसाद घेऊन परत खाली निघालो. रोपवेने पायथ्याशी परत आलो. रहाण्याच्या ठिकाणी जाऊन परत एकदा खोलीची चौकशी केली असता आम्हाला हवी असलेली खोली रिकामी झाली होती. त्यामुळे आम्ही लगेच त्या खोलीत आमचं सामान घेऊन गेलो.
दुसऱ्या दिवशी परतीचं अहमदाबाद पर्यंतचं तिकीट होतं. पुढचं तिकीट काढायचा प्रयत्न केला तर एकाही गाडीचं तिकीट उपलब्ध नव्हतं. पुन्हा मनात काळजी निर्माण झाली. जुनगढहुन सुटणाऱ्या रेल्वेचं तिकीट मिळतंय का पहात असताना २-३ अशी वेटिंग लिस्ट दिसत होती. एक प्रयत्न म्हणून त्या गाडीची तिकीटं काढली. सायंकाळी थोडं फिरुन भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन रुमवर परत आलो. रात्री आमची तिकीटं रद्द झाल्याचा मेसेज आला आणि आमची काळजी वाढली. मधल्या वेळेत अहमदाबाद पर्यंतचंं तिकीटही आम्ही रद्द केलं होतं. आता परतीसाठी रेल्वेचा पर्याय उरला नव्हता. मग तिथूनच सुटणाऱ्या दुसऱ्या दिवशीच्या बसची चौकशी केली असता तिथे मात्र चटकन तिकीट मिळालं आणि आम्ही निवांत झालो.
मी श्री दत्तगुरुंना कसंही करुन दर्शन घडवा अशीच प्रार्थना केली होती. एका क्षणी तर माझ्या मनात साशंकता निर्माण झाली होती की माझ्या एखाद्या प्रमादाची शिक्षा म्हणून मला गुरुदर्शन घडणार नाहीय. मात्र त्याचवेळी मी दत्तगुरुंना मनोमन प्रार्थना केली होती की दुसरी कुठलीही शिक्षा द्या पण गिरनार दर्शन घडवा आणि वस्तूरुप प्रचिती द्या. श्री दत्तात्रेयांनी माझी ही इच्छाही पुर्ण केली ती म्हणजे अखंड धुनीजवळ मिळालेल्या प्रसाराबरोबर पहिल्यांदाच मिळालेलं गिरनारस्थित गुरुमुर्तीचं अप्रतिम छायाचित्र. खरंच माझ्यासाठी ही खूपच भाग्याची गोष्ट आहे.
खरंतर रेल्वे किंवा बसचा प्रवास करायला मी मनापासून कधीच तयार नसते. पण दोघांसाठीच घरच्या गाडीने एवढा लांबचा प्रवास कंटाळवाणा होईल म्हणून रेल्वेने जायचं ठरवलं होतं. त्यामुळे मी कसाही प्रवास करुन यायला तयार आहे पण मला गिरनार दर्शन हवंच आहे, असा माझा अट्टाहास होता. म्हणूनच बहुधा श्री दत्तात्रेयांनी थोडीशी परिक्षा घेतली असावी. पण परिक्षा घेणारे आणि त्यात यश देणारे स्वयं दत्तगुरुच यावर पुर्ण विश्वास असल्याने याही परिस्थितीत त्यांनी आम्हाला दर्शन घडवून माझी आत्यंतिक इच्छा पूर्ण केली.
आपण आत्यंतिक तळमळीने केलेली प्रत्येक प्रार्थना श्री दत्तात्रेय ऐकतातच आणि आपली इच्छाही पुर्ण करतातच.
|| जय गिरनारी ||
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment