Pages

Tuesday, July 25, 2023

सांजवेळ

                एखाद्या सांजवेळी गडद होत चाललेल्या अंधारसावल्या पहाताना आपलं मनही तसंच हळवं कातर होतं. भावनांचं काहूर दाटतं मनात. क्षणात कुठून कुठे पोहोचतं मन. आठवांच्या झुल्यावर स्वार होतं मन. अन सोसलेले घावच पुन्हा आठवत रहतात. अन सारं विसरण्याचा प्रयत्न करत रहातं मन.

       

कधी हळव्या कातर सांजवेळी 

दाटते हुरहूर एकाकीच सावळी 

मनात भावनांचा कल्लोळ उठतो

संध्यासमय काजळकाळा भासतो

शब्द मात्र सारे मौन स्वीकारतात

अन क्षणातच अधर घट्ट मिटतात

असंख्य आठवणी मग फेर धरतात

जणू शांत डोहावरीच तरंग उठतात

गडद सांज आठवांचे वण उसवते

सावरलेले मनही क्षणात विध्द होते 

जीव जणू कासावीस व्याकूळ होतो 

अन झुगारुन बंध आसवांचा पूर येतो 

मोजताना घाव मन अजूनही चुकते

आठवतच नाही क्षण कुठले गाळते

व्रण जुने मन कधीतरी विसरु म्हणते

नियती मात्र नित्य नवे घाव देत रहाते 

तिमिरातच मग एकले बसावे वाटते

घनव्याकूळ मन माझे कुणी न जाणते

घनव्याकूळ मन माझे कुणी न जाणते


- स्नेहल मोडक

Friday, July 14, 2023

पीठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम - २

                 काकिनाड्याहून रेल्वेने रात्रभर प्रवास करुन सकाळी सिकंदराबादला पोहोचलो. पूर्ण प्रवासात मला त्रास होतच होता. सिकंदराबादला उतरुन किमान सहा तासांचा प्रवास जीपने करुन आम्हाला श्रीशैल्यमला पोहोचायचं होतं. आणि त्या प्रवासाचीच मला जास्त काळजी वाटत होती. तो सारा प्रवास जीपने करायचा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही जीपने श्रीशैल्यमकडे निघालो. वाटेत नाश्त्यासाठी थांबलो पण तिथेही मी जेमतेम दोन घास खाऊन काॅफी प्यायले. श्रीशैल्यमला पोहोचायला दुपार होऊन गेली. मात्र मधल्या वेळेत मला बिलकुल त्रास झाला नाही. रुमवर पोहोचलो आणि माझा त्रास पूर्णपणे थांबल्याचं लक्षात आलं आणि मी निवांत झाले. 

           जेवून, थोडा आराम करुन, आवरुन आम्ही पुन्हा जीपनेच दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी आम्ही पोहोचलो ते साक्षी गणपती मंदिरात.

           साक्षी गणपती मंदिर - हिरव्या वनराई मधलं हे छोटंसं गणपती मंदिर आहे. अशी मान्यता आहे की श्रीशैल्यमला दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची नोंद श्री गणेश ठेवतात. त्यामुळे श्रीशैल्यम मधील कुठल्याही दर्शनाआधी या साक्षी गणपतीचं‌ दर्शन घेतलं जातं. छान रेखीव अशी काळ्या पाषाणातील श्री गणेशाची मूर्ती इथे आहे. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. 

           मल्लिकार्जुन मंदिर - भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे हे मल्लिकार्जुन मंदिर. या मंदिरात शिव- अर्जुन आणि पार्वती - मलिका या रुपात प्रतिष्ठित आहेत. अशी कथा आहे की शिव- पार्वतीचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना विवाहाची घाई झाली होती. यावर उपाय म्हणून शिव-पार्वतीने जो कुणी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन सर्वात आधी परत येईल त्याचा विवाह आधी करण्यात येईल अशी अट घातली. दोघंही पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. पण श्री गणेशाने चतुराईने शिव पार्वतीलाच प्रदक्षिणा घातली आणि ते दोघं पृथ्वीसमानच असल्याचं सांगत आपली प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचं सांगितलं. कार्तिकेयाला हे कळताच तो संतापला आणि उंच डोंगरावर गेला. त्याला समजावण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर स्वयं शिव-पार्वती त्याची समजूत घालण्यासाठी निघाले. पण ते येत असल्याचं कळताच कार्तिकेय तिथूनही दूर निघून गेला. यामुळे निराश होऊन माता पार्वती तिथेच बसल्या आणि भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरुपात तिथे प्रकट झाले. हे स्थान मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या नावानं प्रसिद्ध झालं. हे मंदिर दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे शिलालेख आहेत. मंदिराभोवती तटबंदी असून चार गोपुरं आहेत. मंदिरात इतर अनेक मंदिरं बांधण्यात आली आहेत. पण मल्लिकार्जुन आणि भ्रामरांबा हे शक्तीपीठ हि मुख्य देवालयं आहेत. 

           आम्ही या सुंदर आणि भव्य मंदिरात पोहोचलो. इथं गर्दी थोडी जास्त होती. पण तरीही अतिशय सुंदर असं श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन आम्हाला घडलं आणि मन प्रसन्न झालं. श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचं दर्शनासाठीचं पुढचं मंदिर होतं ते म्हणजे शिवाजी महाराज मंदिर.

           श्री शिवाजी महाराज मंदिर/ स्फूर्ती केंद्र - शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण भारतात गेले होते तेव्हा १६७७ मध्ये ते या परिसरात आले होते. आपली प्रजा आणि आपला धर्म यांसाठी काम करण्याकरीता त्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला होता. श्री शिवाजी महाराजांनी इथे एक गोपुर बांधलं आणि  भक्तांसाठी अणि गरिबांसाठी अन्नछत्र सुरु केलं. याची आठवण  म्हणून भ्रामरांबा शक्तीपीठाच्या मागेच  श्री शिवाजी महाराजांचं मंदिर किंवा स्फूर्तीस्थान उभारण्यात आलं आहे. या मंदिरात श्री शिवाजी महाराजांचा ब्राॅन्झचा भव्य पुतळा आहे आणि अष्टप्रधान मंडळाचेही पुतळे आहेत. बाजूच्या भिंतीवर अनेक प्रसंग म्युरल्स स्वरुपात चितारलेले आहेत. अतिशय सुंदर असं हे मंदिर पाहून आम्ही परत रुमवर आलो. दुपारपासून माझा त्रास जरी थांबला असला तरी मला अतिशय अशक्तपणा आला होता. मंदिरात जाण्यासाठी सगळीकडेच थोडंफार चालावं लागत होतं. हे चालणं, मंदिर परिसर फिरणं, हे सारं मी अतिशय कष्टाने करत होते. खूपच दमायला झालं होतं मला. रुमवर येऊन‌ निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला. पण झोप येणं अशक्य होतं. पहाटे उठून आवरुन परत पुढील प्रवासासाठी निघायचं होतं. 

           ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून नाश्ता करुन आम्ही पुढील प्रवास सुरु केला. आमचा यात्रेचा पुढचा टप्पा होता कुरवपूर. पून्हा एकदा जीपने सहा तासांचा प्रवास करुन कुरवपूरला पोहोचायचं होतं. कुरवपूरला जाण्याआधी आम्ही मंथनगुडीला दर्शन घेण्यासाठी गेलो.

           मंथनगुडी - हैदराबादमधील रायचूर जिल्ह्यातील मतकल गावापासून १० किमी अंतरावर असलेलं हे मंदिर. वल्लभेश नावाचा एक विप्र श्रीपाद श्रीवल्लभांचा एकनिष्ठ भक्त होता. तो वारंवार कुरवपूर ला येत असे. श्री पादुकांची सेवा, पूजाअर्चा करत असे. आणि मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करत असे. एकदा त्याने श्री चरणी नवस केला की जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मी श्री चरणी खूप मोठी सेवा करेन आणि सहस्त्र ब्राह्मण भोजन अर्पण करेन. भक्त काम कल्पद्रुम श्रीपादांच्या कृपेने त्याल व्यवसायात शतपटीने फायदा झाला. तो अत्यानंदाने कुरवपूरला ब्राह्मण भोजन देण्यासाठी द्रव्य आणि धान्य घेऊन निघाला. काही शर्विलकांना हे कळताच ते आपणही दत्तभक्त असल्याचा बहाणा करत त्याच्याबरोबर चालू लागले. आणि संधी साधून त्यांनी वल्लभेष विप्राला झोपेतच ठार मारलं. श्रीपाद श्रीवल्लभ हे जाणून एकनिष्ठ सेवकासाठी त्यास्थानी प्रकट झाले. तिघांचा वध त्यांनी केला पण चौथा शर्विलक त्यांना शरण गेला. मग त्यांनी त्याला विभुती देऊन ती  मृत वल्लभेशाच्या शिर आणि धडावर लावण्यास सांगितली. आणि ते अंतर्धान पावले. विभुती लावताच वल्लभेश‌ परत जिवंत झाला. त्याला सारा वृत्तांत कळताच श्रीपाद श्रीवल्लभच तिथे आले असल्याचं त्याला जाणवलं. त्याने आनंदानं कुरवपूरला जाऊन दानधर्म,अन्नदान अतिशय थाटामाटात पार पाडलं. श्रीपाद श्रीवल्लभ ज्यास्थानी प्रकट झाले त्याच स्थानी गुरुमंदिराची निर्मिती करण्यात आली. आणि हे स्थान मंथनगुडी या नावानं प्रसिद्ध झालं. 

           आम्ही या मंदिरात गेलो असता तिथल्या पंडितजीनी ही कथा, स्थानमहात्म्य सांगितलं. नंतर आरती केली. दर्शन आणि प्रसाद घेतला. मंदिराजवळच मोठमोठे पाषाण आहेत. हे पाषाण हत्ती, घोडा मगर अशा आकारात असल्याचे आपल्या दृष्टीला सहज दिसतात. हे सारं पाहून आम्ही पुढे कुरवपूरला निघालो. मला सकाळपासूनच अशक्तपणाबरोबरच थोडीशी घसादुखीही जाणवत होती. माझा प्रवास असाच त्रासातच सुरु होता. कुरवपूरला पोहोचल्यावर थोडा आराम मिळेल आणि मग जरा बरं वाटेल याच विचारात मी होते.

           कुरवपूरला मंदिर दर्शनासाठी नावेतून कृष्णा नदी पार करुन जावं लागतं. तिथे वास्तव्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे अलिकडल्या तीरावर पंचदेवपहाड इथे एका आश्रमात आमची रहाण्याची व्यवस्था होती. दुपारनंतर आम्ही इथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कुठेच जायचं नव्हतं. त्यामुळे आश्रमात पोहोचल्यावर फक्त आराम करायचा असं ठरवलं होतं. पण ते अशक्य होतं.

           त्या आश्रमाचा परिसर प्रचंड मोठा आहे. अतिशय साध्या, नीटनेटक्या आश्रमात पाऊल टाकताच मन अगदी प्रसन्न झालं. रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन थोडाच वेळ आराम करुन परत बाहेर आलो. इतकं सुंदर वातावरण होतं की रुममध्ये नुसतं बसणं शक्यच नव्हतं. 

           आश्रमात मध्यभागी श्री दत्तात्रेयांचं एक सुंदर छोटसं देवालय आहे. आणि सभामंडपात अखंड नामजप आणि अखंड अग्नियज्ञ सुरु आहे. हा नामजपही स्पिकरवर सुरु असतो. त्यामुळे संपूर्ण आश्रमात एक पवित्र वातावरण निर्माण झालं आहे. अग्नियज्ञातही सतत मंत्रोच्चारात आहुती देणं सुरु आहे. 

           आम्ही दर्शन घेऊन आसपासचा परिसर फिरुन आलो. सभामंडपासमोरच एक स्वतंत्र चौथरा आहे आणि तिथे छोटसं श्री गणेश मंदिरही आहे. आम्ही सभामंडपाच्या बाहेर मोकळ्या हवेत बसून मनोमनी नामजप करत होतो. तिन्हीसांज झाली आणि मंदिरातील पालखीची वेळ झाली. आम्ही सभामंडपात आलो आणि काही क्षणातच पालखीला सुरुवात झाली. सुंदर सजवलेल्या पालखीतून श्रीपाद श्रीवल्लभांची चांदीची मूर्ती,पादुका आणण्यात आल्या. तिथले  काही स्थानिक लोकंही पालखीसाठी मंदिरात आले होते. आम्ही सारे पालखीच्या पुढे नामघोष करत चालू लागलो. पालखी गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मुख्य मंदिरात येते. तिथे रिंगण करुन भक्तगण नामघोष करत थोडावेळ नाचतात. मग परत पालखी प्रदक्षिणा करुन येते. अशा तीन प्रदक्षिणा घालतात. मग मुख्य मंदिरात आरती होते. आरती, प्रसाद देऊन सोहळा संपन्न होतो. अतिशय सुंदर जोषपूर्ण असा हा पालखीसोहळा आम्हाला अनुभवायला मिळाला हेही भाग्यच. 

           माझी तब्येत खरंतर खूपच बिघडली होती. पण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता की मी स्वताला थांबवूच शकले नाही. जवळपास तासभर चाललेल्या या सोहळ्यात आम्ही सारेच भान हरपून फेर धरत, नाचत होतो. श्री दत्तगुरुंच्या कृपेनेच मी एवढावेळ सामील होऊ शकले होते. 

           रात्रीपर्यंत माझी घसादुखी अजूनच वाढली. औषध घेऊन निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला पण त्रास खूपच होत असल्याने झोप आलीच नाही. बरं नसतानाही मी करत असलेल्या दगदगीचा परिणाम व्हायचा तोच झाला. पहाटे मी तापाने फणफणले. आवरुन कुरवपूरला दर्शनासाठी निघायचं होतं. त्यामुळे आवरुन तापाची गोळी घेऊन निघालो. कुरवपूरला पोहोचेपर्यंत ताप उतरला पण चार पावलंही चालायला अंगात त्राण राहिलं नाही. अक्षरशः जीवाच्या कराराने हळूहळू चालत होते ती फक्त दर्शनाच्या ओढीनेच.

           कुरवपूर - श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर - श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं कुरवपूर हे अक्षय निवासस्थान. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' या मंत्राचा उगम जिथे झाला तेच हे प्राचीन स्थान.

           अप्पलराज आणि सुमतीदेवी या विप्रदांपत्याचा पुत्र श्रीपाद श्रीवल्लभ हे पीठापूरला आपल्या जन्मस्थानी सोळा वर्षं राहून तीर्थाटनासाठी बाहे पडून आधी गोकर्ण महाबळेश्वरला गेले. तिथून श्रीशैल्यमला गेले तिथे काही काळ वास्तव्य केलं.  आणि अंती कुरवपूरला वास्तव्य केलं. कुरवपूरला बावीस वर्षं तपश्चर्या करुन इथूनच ते अंतर्धान पावले.

           कुरवपूर कर्नाटकात रायचुर जिल्ह्यातलं गांव. कुरगुड्डी या ठिकाणी कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग होतात व पुढे परत एकत्र येतात. जिथे दोन भाग झाले आहेत त्या भागाला कुरगुड्डी बेट म्हणतात.तेच हे श्रीपाद श्रीवल्लभांचं निवासस्थान. इथेच ते तपश्चर्येला बसत असत. हे मंदिर आणि हिरव्या वनश्रीने नटलेला आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारा आहे. हे स्थान बराच काळ अज्ञात होतं. श्रीगुरुंच्या शोधात आलेल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या स्थानाचा शोध लावला. या मंदिरात येण्यासाठी आपल्याला कृष्णा नदी नावेने पार करावी लागते. नावेतून उतरुन थोडंसं पायवाटेनं चालत आपण थेट मंदिरापर्यंत पोहोचतो. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक गुहा आहे. याच गुहेत टेंबेस्वामींनी चातुर्मास केला होता. या स्थानीच त्यांनी घोरकष्टोधरण स्त्रोत्राची निर्मिती केली आहे.

           आम्ही नावेने नदी पार करुन मंदिरात पोहोचलो. बरोबर नेलेल्या वस्तू अर्पण करुन नतमस्तक झालो. इथेही पीठापूरप्रमाणेच रुद्राभिषेक केला जातो. देणगी देणाऱ्या सर्वांना सभामंडपात बसता येतं. मात्र इथे गाभाऱ्यातील मूर्ती थोडी आतल्या बाजूला असल्यानं हा अभिषेक सोहळा आपल्याला बाजूला लावलेल्या स्क्रीन वर पहावा लागतो. अगदी पीठापूर सारखाच इथेही अप्रतिम असा रुद्राभिषेक सोहळा होतो. या सोहळ्यानंतर पुष्प, अलंकार सोहळा होऊन आपल्याला परत सुंदर दर्शनाचा लाभ मिळतो. 

           हा सर्व सोहळा पाहून आम्ही परत एकदा दर्शन घेऊन तीर्थ प्रसाद घेतला. आणि मंदिराच्या जवळच असलेली वासुदेवानंद सरस्वती यांची गुहा पहायला गेलो. या छोट्याशा गुहेत अगदी रांगतच आत जावं लागतं. तसं जाऊन दर्शन घेऊन बाहेर आलो. परत किनाऱ्यावर येऊन नावेने अलिकडल्या तीरावर येऊन पून्हा रुमवर आलो. मी सकाळी निघताना ताप आला म्हणून जी गोळी घेतली होती तिचा परिणाम संपल्यावर मला परत ताप आला होता. आधीपासूनचा अशक्तपणा आणि त्यात आलेला ताप यामुळे माझी अवस्था खूपच वाईट होती. रुमवर पोहोचल्यावर परत एक गोळी घेतली.

           सायंकाळी आम्हाला परत निघायचं होतं. आमचं यात्रेमधलं अखेरचं दर्शन स्थान अजून बाकी होतं. तिथलं दर्शन घेण्यासाठी सायंकाळी आम्ही पुन्हा जीपने निघालो. जवळपास दोन तासांचा प्रवास करुन आम्ही मंदिरात पोहोचलो.

           मंत्रालयम - राघवेंद्र स्वामी मठ

           आंध्र प्रदेशातील मंत्रालयम म्हणजेच राघवेंद्र स्वामी यांचं समाधीस्थळ. राघवेंद्र स्वामींचा जन्म तामिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक मध्व ब्राह्मण कुटुंबात झाला.  पुढे त्यांना ज्ञानार्जनासाठी कुंभकोणम इथं पाठवण्यात आलं. इथे असतानाच त्यांनी संन्यास घेतला आणि राघवेंद्र तीर्थ हे नांव धारण केलं. राघवेंद्र स्वामींना भगवान विष्णूंचा लाडका भक्त प्रल्हाद याचा अवतार समजलं जातं. मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांनी संपूर्ण दक्षिण भारतात भ्रमंती केली. १६७१ साली त्यांनी मंत्रालयम येथे जिवंत समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना पुढील ८०० वर्षं आत्मारुपाने शाश्वत रहाण्याचं वचन दिलं. या ठिकाणी भव्य असा मठ बांधण्यात आला आहे. आणि समोरच भव्य स्वरुपात रामायणातील प्रसंग म्युरल्स रुपात चित्रीत करण्यात आले आहेत.

           आम्ही हे सारं पाहून, दर्शन घेऊन परत निघालो. मंत्रालयमहून आम्ही रायचूरला आलो. आणि रात्री उशिरा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

           आम्ही ज्या यात्रा कंपनीबरोबर ही यात्रा केली ते स्वतः त्यांच्या टिमसह आमच्याबरोबरच होते. त्यांचं किचनही बरोबर होतं. त्यामुळे संपूर्ण यात्रा निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पडली होती. त्यामुळे आमची आणि इतरांचीही पीठापूर कुरवपूर दर्शनाची इच्छा उत्तम रितीने पूर्ण झाली. 

           आम्ही पीठापूर, कुरवपूर यात्रा केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच पूर्ण करु शकलो होतो. माझी अतिशय अवघड अशी परिक्षा त्यांनी घेतली होती पण त्याचबरोबर सगळीकडे अतिशय उत्तम असं दर्शनही घडवलं होतं. मात्र मला घरी पोहोचल्यावरही ताप येतच होता. आम्ही ही यात्रा करुन आलो आणि लगेच गुरुपौर्णिमा होती. पण मी खूपच आजारी असल्याने ऐनवेळी गुरुपौर्णिमेला गिरनारला जाणं रहित करावं लागलं. आम्हा दोघांनाही खूपच वाईट वाटत होतं. पण मग गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरच गेल्या महिन्यात लेकींनी दिलेल्या श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. साग्रसंगीत पूजा केली आणि त्यातच समाधान मानलं.

     || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||


- स्नेहल मोडक





Wednesday, July 12, 2023

पीठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम - १

            खूप दिवसांपासून आम्ही पीठापूर, कुरवपूर च्या दर्शनाची आतुरतेने वाट पहात होतो. आधी एखाद्या यात्रा कंपनीतर्फेच या ठिकाणी जायचं असं आम्ही ठरवलं होतं. पण बरेचदा ही यात्रा पौर्णिमेलाच असते. आणि पौर्णिमेला आमची गिरनारवारी ठरलेली असल्याने आम्हाला पीठापूर दर्शनाचा योग येत नव्हता. अशातच पौर्णिमेच्या आधी जाणाऱ्या एका यात्रेबद्दल कळलं आणि आम्ही पीठापूरला जायचं नक्की केलं. चारधामच्या मोठ्या यात्रेनंतर ५-६ दिवसांत लगेचच पीठापूर यात्रेला जावं लागणार होतं. 

           ठरल्याप्रमाणे आम्ही रेल्वेने काकिनाडाला निघालो. २४ तासाचा हा प्रवास रेल्वेला झालेल्या विलंबामुळे जवळपास २६ तासांचा होऊन एकदाचं आम्ही काकिनाडा स्टेशनवर उतरलो. स्टेशनपासून बसने १५-२० मिनीटांवरील आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

           सायंकाळी आम्ही बसने दर्शनासाठी निघालो. साधारण पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो. अनघालक्ष्मी मंदिर हे आमचं दर्शनासाठीचं पहिलं मंदिर होतं. 

           अनघालक्ष्मी मंदिर - पीठापूर पासून ३ किमी अंतरावर असलेलं हे सुंदर आणि भव्य मंदिर. श्री दत्तात्रेयांच्या अवधूत स्वरुपासह इतरही अनेक स्वरुपतत्वं आहेत. अशा या लीलामूर्तीचं एक गृहस्थस्वरुपही आहे. हे स्वरुप अनघस्वामी किंवा अनघदत्त या नावानं ओळखलं जातं. या अनघस्वामींच्या अर्धांगीनी म्हणजेच अनघालक्ष्मी. श्री दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहेत. त्यांच्या ठायी ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर हे तिनही देव आणि त्यांच्या शक्ती एकवटल्या आहेत. तसंच महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तीन तत्वांचं एकत्रित दिव्यस्वरुप म्हणजे अनघालक्ष्मी.

           अतिशय सुंदर रेखीव अशी श्री दत्तात्रेयांसह अनघालक्ष्मीची मूर्ती या मंदिरात प्राणप्रतिष्ठीत आहे. आम्ही गेलो तेव्हा मंदिरात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला मातेची ओटी भरुन शांतपणे अतिशय सुंदर असं दर्शन घेता आलं. 

           आमचं दर्शनासाठीचं दुसरं मंदिर होतं श्री क्षेत्र अन्नावरम.

           श्री क्षेत्र अन्नावरम - पीठापूरपासून ३२ किमी वर पंपा नदीकिनारी रत्नागिरी पर्वतावर वसलेलं हे मंदिर म्हणजेच सत्यनारायण मंदिर. भगवान श्रीविष्णु इथे श्री वेंकट सत्यनारायण स्वरुपात प्रकट झाले आहेत. या मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एका बाजूने ३०० पायऱ्या चढून जावं लागतं. तर दुसरीकडे अगदी मंदिरापर्यंत वाहनानं जाता येतं. अतिशय भव्य असं हे मंदिर दुमजली आहे. तळभागात ' त्रिपाद विभुती नारायण ' यंत्र असून वरच्या भागात श्री सत्यनारायण मूर्ती आहे. १८९१ मध्ये या टेकडीवर श्री सत्यनारायणाची मूर्ती सापडली. तेव्हा लहानशी शेड बांधून हे मंदिर लोकार्पण करण्यात आलं. नंतर २०१२ मध्ये याचं नुतनीकरण करण्यात आलं. जवळच श्रीराम मंदिर आणि वनदुर्गा आणि कनकदुर्गा यांची तीर्थं आहेत.

           एका बाजूला बंगालचा उपसागर,मोहक निसर्ग, आणि दुसऱ्या बाजूला पूर्वघाटांची रांग, टेकड्यांवरची हिरवीगार शेतं, रत्नागिरी पर्वताला वेढलेली पंपा नदी आणि यामध्ये असलेलं हे सत्यनारायण मंदिर. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे.

           आम्ही या मंदिरात जाऊन पोहोचलो. इथेही फारशी गर्दी नव्हती त्यामुळे सुंदर दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही परत मुक्कामी पोहोचलो.

           दुपारी काकिनाडाला रुमवर पोहोचायला आम्हाला उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही भोजन केलं होतं. प्रवासातलं आमच्या बरोबरचं पाणी संपलं होतं. त्यामुळे नाईलाजास्तव तिथलं पाणी आम्ही प्यायलो होतो. सायंकाळी दर्शनाला जाताना बाटलीबंद पाणी विकत घेतलं होतं. 

           रात्री दर्शन करुन जेवून रुमवर परत आलो. आणि काही वेळातच मला माझ्या पोटात किंचित दुखत असल्याची जाणीव झाली. त्रास वाढू नये म्हणून ओवाअर्क घेतला आणि निद्रादेवीची आराधना सुरु केली. पण निद्रा देवी प्रसन्न होण्याचं चिन्ह नव्हतं. पोटात दुखायचही थांबत नव्हतं. दुपारी प्यायलेलं तिथलं पाणी लगेचच बाधलं होतं. अखेर रात्री उशिरा माझ्या पोटदुखीने आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात केली. ३-४ वेळा जाऊन आल्यावर खूपच थकवा आला. गोळी घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण अजून एक धक्का बसायचा होता. मी नेमक्या त्याच औषध गोळ्यांच पाकिट घरी विसरले होते.आता माझी काळजी वाढलीच. कारण सकाळी ६ वाजताच पीठापूरला दर्शनासाठी निघायचं होतं. आणि इतक्या लवकर कुठलंही औषधाचं दुकान तिथं सुरु असणं अशक्य होतं. आता आपण दर्शनाला जायचं की रुमवरच थांबायचं हे कळेनासं झालं. अखेर श्री दत्तगुरुंचं नामस्मरण करतच सारं आवरुन दर्शनाला जायचं ठरवलं आणि काॅफी पिऊन बसने पीठापूरला निघालो.

           पीठापूर - श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर 

           आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर या गावात अप्पलराज आणि सुमतीदेवी हे विप्र दांपत्य नित्य अतिथी-पूजन करत असे. एकदा त्यांच्याकडे श्राद्धदिनी स्वयं श्री दत्तगुरु अतिथी स्वरुपात भिक्षा मागण्यासाठी आले. सुमतीदेवीने ब्राह्मण भोजन झालं नसतांनांही महाराजांना भिक्षा अर्पण केली. श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी सुमतीच्या मनातली इच्छा विचारली. तेव्हा ती म्हणाली प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले, जे जगले ते अक्षहिन आणि अपंग आहेत. मला तुमच्यासारख्या विश्वोध्दारक पुत्र व्हावा अशी  इच्छा आहे. श्री दत्तात्रेयांनी कीर्तीवंत, तपस्वी असा पुत्र होईल असा आशीर्वच दिला आणि ते अंतर्धान पावले.

           या प्रसंगानंतर सुमतीदेवी प्रसुत होऊन तिला पुत्ररत्न झालं. श्रीपाद श्रीवल्लभ असं त्याचं नामकरण करण्यात आलं. हा श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह करायचा मातापित्यानी योजिलं. मात्र श्रीपादांनी त्यास ठाम नकार देत तीर्थाचरणाला जाणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी सुमतीदेवीना श्री दत्तगुरुंचे बोल आठवले आणि आपण पुत्रास अडवू शकत नाही हे जाणवलं. श्रीपादांनी मातेच्या इच्छा पूर्ण होतील असं सांगून आपल्या अक्षहिन आणि अपंग बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिलं. क्षणात ते बंधू निरोगी व ज्ञानी झाले. त्यांना आशीर्वाद दिला. मातेला श्री दत्तात्रेय स्वरुपात दर्शन देऊन श्रीपादांनी पीठापूर सोडलं. 

           सध्याचं प्रशस्त, सुंदर असं हे मंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानीच बांधलंय. मध्यभागी श्री दत्तात्रेय त्यांच्या उजव्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ आणि डाव्या बाजूला नृसिंह सरस्वती अशा मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

           आम्ही पीठापूरला मंदिरात पोहोचलो. सकाळी लवकरच गेल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर नेलेल्या वस्तू अर्पण करुन आम्ही नतमस्तक झालो. तब्येत बिघडली असतानाही इतकं सुंदर दर्शन केवळ त्यांच्याच कृपेनं घडल्याची जाणीव झाली आणि नेत्र किंचित ओलावलेच. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि जवळच्या कार्यालयात रुद्राभिषेक करण्यासाठी देणगी दिली. मात्र अजून रुद्राभिषेकाची वेळ झाली नसल्यानं मंदिरातच बसून पोथीवाचन करायचं ठरवलं. पण तेवढ्यात परत माझ्या पोटाने गडबड केलीच. मग धावपळ करुन टाॅयलेट शोधून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. नंतर तिथल्या दुकानात मेडिकल स्टोअरची चौकशी केली असता थोड्या अंतरावर दुकान आहे पण ते दहा वाजता सुरु होतं असं कळलं. तोपर्यंत थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. 

           परत एकदा काॅफी पिऊन मंदिरात बसून पोथीवाचन केलं. तोपर्यंत रुद्राभिषेकाची वेळ झाली. सगळ्यांनाच सभामंपाबाहेर थांबवून ज्यांनी देणगी दिली होती त्यांना सभामंडपात बसवलं. आम्हा दोघांना अगदी श्री दत्तात्रेयांच्या सन्मुख बसायला मिळालं. 

           काही क्षणातच प्रत्यक्ष रुद्राभिषेक सोहळा सुरु झाला. श्री दत्तात्रेयांच्या पादुकांवर हा अभिषेक केला जातो.देणगी देणारांचं नांव, गोत्र यासह संकल्प केला गेला. षोडशोपचारे पूजा करण्यात आली. आणि सुरुवातीला भस्म विलेपन, चंदन विलेपन करुन शुध्दोदक स्नान घालण्यात आलं. आपण मंदिरात फक्त पंचामृतापैकी काहिहि किंवा सुकामेवा एवढंच अर्पण करु शकतो. हे अर्पण केलेलं सारं काही रुद्राभिषेकसमयी प्रत्यक्ष पादुकांवर अभिषेक स्वरुपात अर्पिलं जातं. शुध्दोदक स्नानानंतर पंचामृत अभिषेक सुरु झाला. दूध, दही, घृत, मधु, शर्करा या साऱ्यांचा अभिषेक करुन मग सुकामेव्याचा अभिषेक करण्यात आला. अतिशय सुंदर असा अभिषेक पूर्ण झाला. आणि मग उष्णोदक स्नान घालून परत एकदा पूजा करुन विविध पुष्पं, हार, गजरे अतिशय कलात्मक रीतीने वाहून सुंदर अशी पूजा बांधण्यात आली. अतिशय पवित्र वातावरणात रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा हा सुंदर सोहळा आम्हाला अगदी जवळून अनुभवायला मिळाला ही खूप मोठी भाग्याची घटना. 

           सोहळा संपन्न झाल्यावर परत एकदा दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालायला गेलो. त्याच मार्गात बाजूला लगेच तीर्थ दिलं जातं. रुद्राभिषेकसमयी अर्पिलेलं पंचामृत आणि सुकामेवा आपल्याला तीर्थस्वरुपात प्राशन करायला मिळतो. बाहेर आल्यावर भस्म आणि चंदनही आपल्याला धारण करण्यासाठी दिलं जातं. याचाच अर्थ अभिषेकासाठी वाहिलेला कुठलाही पदार्थ तिथे वाया जात नाही.

           अन्नदानासाठी देणगी देऊन बाहेर आलो आणि लगेच मेडिकल स्टोअर शोधायला गेलो. दुकान मिळालं, गोळ्या विकत घेतल्या आणि माझा जीव शांत झाला. गोळी घेतल्यानंतर काळजी थोडी कमी झाली. 

           तिथून आम्ही निघालो पुढल्या मंदिरात दर्शनासाठी.

           कुकुटेश्वर मंदिर - भगवान शिव यांचं हे कुकुटेश्वर रुपातील मंदीर. पीठापूर हे पूर्वकाळापासूनच सिध्दक्षेत्र आहे. गयासुराच्या देहावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचं मस्तक गया येथे आणि पाद पीठापूर येथे होते. म्हणून या क्षेत्राला पादगया या नावानं ओळखलं जातं. गयासुरास देवतांनी सूर्योदय होईपर्यंत उठायचं नाही असं सांगितलं होतं. मध्यरात्रीच भगवान शंकरांनी कुक्कुटाचं रुप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली असं समजून उठला. भगवंतानी त्याचा उध्दार केला. तेच हे स्थान म्हणजेच कुकुटेश्वर मंदिर. मंदिराच्या मागील बाजूस आवारात आश्चर्यकारक असं चार हात आणि तिन शिरे असलेलं स्वयंभु श्री दत्तमंदिर आहे. तसंच जवळच एक महाशक्ती पीठ आहे. हे शक्तीपीठ पुरुहृतिका या नावानं ओळखलं जातं. याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील अतिशय तेजस्वी आणि जागृत अशी ही दत्तमूर्ती आहे. कुकुटेश्वर मंदिराच्या समोरच अतिशय प्रशस्त असा पक्का तलाव आहे. इथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते.

            हे सारं पाहून दर्शन घेऊन आम्ही परत रुमवर आलो. मधल्या वेळेत गोळी घेऊनही माझा त्रास कमी झालाच नव्हता. सकाळी मी नाश्ता केलाच नव्हता तरीही काही खायची इच्छा नव्हती. कसेबसे दोन घास जेवून आम्ही रुमवर परत आलो. आजची आमची रात्र रेल्वे प्रवासाची होती. माझा त्रास बिलकुल कमी न झाल्याने काळजी वाढलीच होती. थोडा आराम करुन परत एक गोळी घेतलीच. सारं आवरुन आम्ही पुढील प्रवासासाठी स्टेशनवर गेलो. 

- स्नेहल मोडक








कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...