Pages

Wednesday, July 12, 2023

पीठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम - १

            खूप दिवसांपासून आम्ही पीठापूर, कुरवपूर च्या दर्शनाची आतुरतेने वाट पहात होतो. आधी एखाद्या यात्रा कंपनीतर्फेच या ठिकाणी जायचं असं आम्ही ठरवलं होतं. पण बरेचदा ही यात्रा पौर्णिमेलाच असते. आणि पौर्णिमेला आमची गिरनारवारी ठरलेली असल्याने आम्हाला पीठापूर दर्शनाचा योग येत नव्हता. अशातच पौर्णिमेच्या आधी जाणाऱ्या एका यात्रेबद्दल कळलं आणि आम्ही पीठापूरला जायचं नक्की केलं. चारधामच्या मोठ्या यात्रेनंतर ५-६ दिवसांत लगेचच पीठापूर यात्रेला जावं लागणार होतं. 

           ठरल्याप्रमाणे आम्ही रेल्वेने काकिनाडाला निघालो. २४ तासाचा हा प्रवास रेल्वेला झालेल्या विलंबामुळे जवळपास २६ तासांचा होऊन एकदाचं आम्ही काकिनाडा स्टेशनवर उतरलो. स्टेशनपासून बसने १५-२० मिनीटांवरील आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

           सायंकाळी आम्ही बसने दर्शनासाठी निघालो. साधारण पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो. अनघालक्ष्मी मंदिर हे आमचं दर्शनासाठीचं पहिलं मंदिर होतं. 

           अनघालक्ष्मी मंदिर - पीठापूर पासून ३ किमी अंतरावर असलेलं हे सुंदर आणि भव्य मंदिर. श्री दत्तात्रेयांच्या अवधूत स्वरुपासह इतरही अनेक स्वरुपतत्वं आहेत. अशा या लीलामूर्तीचं एक गृहस्थस्वरुपही आहे. हे स्वरुप अनघस्वामी किंवा अनघदत्त या नावानं ओळखलं जातं. या अनघस्वामींच्या अर्धांगीनी म्हणजेच अनघालक्ष्मी. श्री दत्तात्रेय हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहेत. त्यांच्या ठायी ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर हे तिनही देव आणि त्यांच्या शक्ती एकवटल्या आहेत. तसंच महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तीन तत्वांचं एकत्रित दिव्यस्वरुप म्हणजे अनघालक्ष्मी.

           अतिशय सुंदर रेखीव अशी श्री दत्तात्रेयांसह अनघालक्ष्मीची मूर्ती या मंदिरात प्राणप्रतिष्ठीत आहे. आम्ही गेलो तेव्हा मंदिरात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला मातेची ओटी भरुन शांतपणे अतिशय सुंदर असं दर्शन घेता आलं. 

           आमचं दर्शनासाठीचं दुसरं मंदिर होतं श्री क्षेत्र अन्नावरम.

           श्री क्षेत्र अन्नावरम - पीठापूरपासून ३२ किमी वर पंपा नदीकिनारी रत्नागिरी पर्वतावर वसलेलं हे मंदिर म्हणजेच सत्यनारायण मंदिर. भगवान श्रीविष्णु इथे श्री वेंकट सत्यनारायण स्वरुपात प्रकट झाले आहेत. या मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एका बाजूने ३०० पायऱ्या चढून जावं लागतं. तर दुसरीकडे अगदी मंदिरापर्यंत वाहनानं जाता येतं. अतिशय भव्य असं हे मंदिर दुमजली आहे. तळभागात ' त्रिपाद विभुती नारायण ' यंत्र असून वरच्या भागात श्री सत्यनारायण मूर्ती आहे. १८९१ मध्ये या टेकडीवर श्री सत्यनारायणाची मूर्ती सापडली. तेव्हा लहानशी शेड बांधून हे मंदिर लोकार्पण करण्यात आलं. नंतर २०१२ मध्ये याचं नुतनीकरण करण्यात आलं. जवळच श्रीराम मंदिर आणि वनदुर्गा आणि कनकदुर्गा यांची तीर्थं आहेत.

           एका बाजूला बंगालचा उपसागर,मोहक निसर्ग, आणि दुसऱ्या बाजूला पूर्वघाटांची रांग, टेकड्यांवरची हिरवीगार शेतं, रत्नागिरी पर्वताला वेढलेली पंपा नदी आणि यामध्ये असलेलं हे सत्यनारायण मंदिर. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे.

           आम्ही या मंदिरात जाऊन पोहोचलो. इथेही फारशी गर्दी नव्हती त्यामुळे सुंदर दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही परत मुक्कामी पोहोचलो.

           दुपारी काकिनाडाला रुमवर पोहोचायला आम्हाला उशीर झाला होता. त्यानंतर आम्ही भोजन केलं होतं. प्रवासातलं आमच्या बरोबरचं पाणी संपलं होतं. त्यामुळे नाईलाजास्तव तिथलं पाणी आम्ही प्यायलो होतो. सायंकाळी दर्शनाला जाताना बाटलीबंद पाणी विकत घेतलं होतं. 

           रात्री दर्शन करुन जेवून रुमवर परत आलो. आणि काही वेळातच मला माझ्या पोटात किंचित दुखत असल्याची जाणीव झाली. त्रास वाढू नये म्हणून ओवाअर्क घेतला आणि निद्रादेवीची आराधना सुरु केली. पण निद्रा देवी प्रसन्न होण्याचं चिन्ह नव्हतं. पोटात दुखायचही थांबत नव्हतं. दुपारी प्यायलेलं तिथलं पाणी लगेचच बाधलं होतं. अखेर रात्री उशिरा माझ्या पोटदुखीने आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात केली. ३-४ वेळा जाऊन आल्यावर खूपच थकवा आला. गोळी घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण अजून एक धक्का बसायचा होता. मी नेमक्या त्याच औषध गोळ्यांच पाकिट घरी विसरले होते.आता माझी काळजी वाढलीच. कारण सकाळी ६ वाजताच पीठापूरला दर्शनासाठी निघायचं होतं. आणि इतक्या लवकर कुठलंही औषधाचं दुकान तिथं सुरु असणं अशक्य होतं. आता आपण दर्शनाला जायचं की रुमवरच थांबायचं हे कळेनासं झालं. अखेर श्री दत्तगुरुंचं नामस्मरण करतच सारं आवरुन दर्शनाला जायचं ठरवलं आणि काॅफी पिऊन बसने पीठापूरला निघालो.

           पीठापूर - श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर 

           आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर या गावात अप्पलराज आणि सुमतीदेवी हे विप्र दांपत्य नित्य अतिथी-पूजन करत असे. एकदा त्यांच्याकडे श्राद्धदिनी स्वयं श्री दत्तगुरु अतिथी स्वरुपात भिक्षा मागण्यासाठी आले. सुमतीदेवीने ब्राह्मण भोजन झालं नसतांनांही महाराजांना भिक्षा अर्पण केली. श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी सुमतीच्या मनातली इच्छा विचारली. तेव्हा ती म्हणाली प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले, जे जगले ते अक्षहिन आणि अपंग आहेत. मला तुमच्यासारख्या विश्वोध्दारक पुत्र व्हावा अशी  इच्छा आहे. श्री दत्तात्रेयांनी कीर्तीवंत, तपस्वी असा पुत्र होईल असा आशीर्वच दिला आणि ते अंतर्धान पावले.

           या प्रसंगानंतर सुमतीदेवी प्रसुत होऊन तिला पुत्ररत्न झालं. श्रीपाद श्रीवल्लभ असं त्याचं नामकरण करण्यात आलं. हा श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार. त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह करायचा मातापित्यानी योजिलं. मात्र श्रीपादांनी त्यास ठाम नकार देत तीर्थाचरणाला जाणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी सुमतीदेवीना श्री दत्तगुरुंचे बोल आठवले आणि आपण पुत्रास अडवू शकत नाही हे जाणवलं. श्रीपादांनी मातेच्या इच्छा पूर्ण होतील असं सांगून आपल्या अक्षहिन आणि अपंग बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिलं. क्षणात ते बंधू निरोगी व ज्ञानी झाले. त्यांना आशीर्वाद दिला. मातेला श्री दत्तात्रेय स्वरुपात दर्शन देऊन श्रीपादांनी पीठापूर सोडलं. 

           सध्याचं प्रशस्त, सुंदर असं हे मंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानीच बांधलंय. मध्यभागी श्री दत्तात्रेय त्यांच्या उजव्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ आणि डाव्या बाजूला नृसिंह सरस्वती अशा मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

           आम्ही पीठापूरला मंदिरात पोहोचलो. सकाळी लवकरच गेल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर नेलेल्या वस्तू अर्पण करुन आम्ही नतमस्तक झालो. तब्येत बिघडली असतानाही इतकं सुंदर दर्शन केवळ त्यांच्याच कृपेनं घडल्याची जाणीव झाली आणि नेत्र किंचित ओलावलेच. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि जवळच्या कार्यालयात रुद्राभिषेक करण्यासाठी देणगी दिली. मात्र अजून रुद्राभिषेकाची वेळ झाली नसल्यानं मंदिरातच बसून पोथीवाचन करायचं ठरवलं. पण तेवढ्यात परत माझ्या पोटाने गडबड केलीच. मग धावपळ करुन टाॅयलेट शोधून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. नंतर तिथल्या दुकानात मेडिकल स्टोअरची चौकशी केली असता थोड्या अंतरावर दुकान आहे पण ते दहा वाजता सुरु होतं असं कळलं. तोपर्यंत थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. 

           परत एकदा काॅफी पिऊन मंदिरात बसून पोथीवाचन केलं. तोपर्यंत रुद्राभिषेकाची वेळ झाली. सगळ्यांनाच सभामंपाबाहेर थांबवून ज्यांनी देणगी दिली होती त्यांना सभामंडपात बसवलं. आम्हा दोघांना अगदी श्री दत्तात्रेयांच्या सन्मुख बसायला मिळालं. 

           काही क्षणातच प्रत्यक्ष रुद्राभिषेक सोहळा सुरु झाला. श्री दत्तात्रेयांच्या पादुकांवर हा अभिषेक केला जातो.देणगी देणारांचं नांव, गोत्र यासह संकल्प केला गेला. षोडशोपचारे पूजा करण्यात आली. आणि सुरुवातीला भस्म विलेपन, चंदन विलेपन करुन शुध्दोदक स्नान घालण्यात आलं. आपण मंदिरात फक्त पंचामृतापैकी काहिहि किंवा सुकामेवा एवढंच अर्पण करु शकतो. हे अर्पण केलेलं सारं काही रुद्राभिषेकसमयी प्रत्यक्ष पादुकांवर अभिषेक स्वरुपात अर्पिलं जातं. शुध्दोदक स्नानानंतर पंचामृत अभिषेक सुरु झाला. दूध, दही, घृत, मधु, शर्करा या साऱ्यांचा अभिषेक करुन मग सुकामेव्याचा अभिषेक करण्यात आला. अतिशय सुंदर असा अभिषेक पूर्ण झाला. आणि मग उष्णोदक स्नान घालून परत एकदा पूजा करुन विविध पुष्पं, हार, गजरे अतिशय कलात्मक रीतीने वाहून सुंदर अशी पूजा बांधण्यात आली. अतिशय पवित्र वातावरणात रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा हा सुंदर सोहळा आम्हाला अगदी जवळून अनुभवायला मिळाला ही खूप मोठी भाग्याची घटना. 

           सोहळा संपन्न झाल्यावर परत एकदा दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालायला गेलो. त्याच मार्गात बाजूला लगेच तीर्थ दिलं जातं. रुद्राभिषेकसमयी अर्पिलेलं पंचामृत आणि सुकामेवा आपल्याला तीर्थस्वरुपात प्राशन करायला मिळतो. बाहेर आल्यावर भस्म आणि चंदनही आपल्याला धारण करण्यासाठी दिलं जातं. याचाच अर्थ अभिषेकासाठी वाहिलेला कुठलाही पदार्थ तिथे वाया जात नाही.

           अन्नदानासाठी देणगी देऊन बाहेर आलो आणि लगेच मेडिकल स्टोअर शोधायला गेलो. दुकान मिळालं, गोळ्या विकत घेतल्या आणि माझा जीव शांत झाला. गोळी घेतल्यानंतर काळजी थोडी कमी झाली. 

           तिथून आम्ही निघालो पुढल्या मंदिरात दर्शनासाठी.

           कुकुटेश्वर मंदिर - भगवान शिव यांचं हे कुकुटेश्वर रुपातील मंदीर. पीठापूर हे पूर्वकाळापासूनच सिध्दक्षेत्र आहे. गयासुराच्या देहावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचं मस्तक गया येथे आणि पाद पीठापूर येथे होते. म्हणून या क्षेत्राला पादगया या नावानं ओळखलं जातं. गयासुरास देवतांनी सूर्योदय होईपर्यंत उठायचं नाही असं सांगितलं होतं. मध्यरात्रीच भगवान शंकरांनी कुक्कुटाचं रुप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली असं समजून उठला. भगवंतानी त्याचा उध्दार केला. तेच हे स्थान म्हणजेच कुकुटेश्वर मंदिर. मंदिराच्या मागील बाजूस आवारात आश्चर्यकारक असं चार हात आणि तिन शिरे असलेलं स्वयंभु श्री दत्तमंदिर आहे. तसंच जवळच एक महाशक्ती पीठ आहे. हे शक्तीपीठ पुरुहृतिका या नावानं ओळखलं जातं. याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील अतिशय तेजस्वी आणि जागृत अशी ही दत्तमूर्ती आहे. कुकुटेश्वर मंदिराच्या समोरच अतिशय प्रशस्त असा पक्का तलाव आहे. इथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते.

            हे सारं पाहून दर्शन घेऊन आम्ही परत रुमवर आलो. मधल्या वेळेत गोळी घेऊनही माझा त्रास कमी झालाच नव्हता. सकाळी मी नाश्ता केलाच नव्हता तरीही काही खायची इच्छा नव्हती. कसेबसे दोन घास जेवून आम्ही रुमवर परत आलो. आजची आमची रात्र रेल्वे प्रवासाची होती. माझा त्रास बिलकुल कमी न झाल्याने काळजी वाढलीच होती. थोडा आराम करुन परत एक गोळी घेतलीच. सारं आवरुन आम्ही पुढील प्रवासासाठी स्टेशनवर गेलो. 

- स्नेहल मोडक








No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...