गेल्या महिन्यातील गुरुपौर्णिमेला मी आजारी असल्याने आम्ही गिरनारला गुरुशिखर दर्शनासाठी जाऊ शकलो नव्हतो. आजारपणानंतर मला आलेला अशक्तपणा अजूनही पूर्णपणे गेला नाहीय. त्यामुळे आताच्या अधिक मासातील पौर्णिमेलाही गिरनारवारी करायची नाही अशी मीच माझ्या मनाची समजूत घालत होते. पण गुरुपौर्णिमेला जाता आलं नाहीय तर अधिक पौर्णिमेला जायचच असं याचं म्हणणं होतं. अखेर रेल्वेचं आरक्षण आधीच केलेलं असल्यानं ऐनवेळी ठरवून आम्ही गिरनारला निघालोच.
प्रवासाला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात गिरनारचा रोप वे ४-५ दिवसांपासून बंद असल्याची बातमी कळली. पण पूर्वानुभवामुळे त्या बातमीचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. उन पावसाच्या खेळात आणि जोरदार वाऱ्यात प्रवास निर्विघ्न पूर्ण झाला. पहाटे जूनागढला पोहोचलो. तिथून तलेटीला रुमवर आलो. भराभर आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो.
नित्याप्रमाणे लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना करुन रोप वे साठी निघालो. रोप वे चा मार्ग जिथे सुरु होतो तिथेच पोलिस उभे होते. आम्ही तिथे पोहोचताच त्यांनी रोप वे बंद असल्याचं सांगितलं. पहिल्या पायरीशी जाताना आम्हाला याचा अंदाज आलाच होता. कारण पायथ्याशी सुध्दा सन्नाट वारा अणि धुकं होतं. गिरनार तर धुक्यातच लपला होता. पण एका आशेने रोप वे साठी गेलो होतो. आमचं ऑनलाईन तिकीट असल्याने पोलिसांनी आमचा मोबाईल नंबर घेऊन रोप वे सुरु झाला तर लगेचच तुम्हाला कळवू असं सांगितलं. पण रोप वे सुरु होण्याची शक्यता फारच कमी होती. आता मात्र आपल्याला आज गुरुशिखरावर जाता येणार नाही याची जाणीव झाली. दहा हजार पायऱ्या चढून दर्शनासाठी जाणं मला तब्येतीमुळे खूप कठीण होतं. अट्टाहास करुन जायचंच ठरवलं असतं तर श्री दत्तगुरुंच्या कृपेने मी जाऊ शकलेच असते. पण नंतर होणाऱ्या त्रासाची मला पूर्ण कल्पना होती. आणि नुकतीच आजारपणातून उठल्याने परत त्रास व्हायला नको होता. आणि डोली करुन दर्शनासाठी जायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. अखेर नाईलाजाने मी रुमवर परतले. माझा सहचर आणि त्याचा मित्र पायऱ्या चढून दर्शनासाठी जायचं म्हणून पुढे निघाले.
मी रुमवर येईपर्यंत स्वतःला कसंबसं सावरलं होतं. रुममध्ये पाऊल टाकलं मात्र पापण्यांचे बंध तोडून अश्रू ओघळलेच. बराचवेळ माझ्या डोळ्यांतून पाणी येतच होतं. मनाची खूप तडफड होत होती. मग मनात आलं आपल्या कुठल्यातरी अक्षम्य प्रमादाची ही शिक्षा दिलीय श्री दत्तगुरुंनी. पहिल्या पायरीशी जाऊनही शिखरदर्शन घडलं नव्हतं. या विचारानेही माझं मन शांत होत नव्हतं. दर्शनाची आस लागली असूनही ती पूर्ण होत नसल्याने तडफड होत होती. डोळ्यातलं पाणी थांबवलं तरी मन शांत होत नव्हतं.
हे दोघंजणं दर्शनासाठी गेले होते त्यांना दर्शन घेऊन परत यायला वारा आणि पावसामुळे बराच उशीर होणार होता. मग दिवसभर रुमवर एकटं थांबण्यापेक्षा दुपारच्या ट्रेनने परत घरी जावं असं मी ठरवलं आणि तसं याला फोन करुन सांगितलं. रिझर्व्हेशन सुरु व्हायची वेळ झाली की ऑनलाईन तिकीट काढायचं ठरवलं. तरीही मन अजूनही तळमळतच होतं. याच विचारात असतानाच काही वेळ गेला आणि अचानक माझा सहचर परत आला. मला कळेचना दर्शनासाठी म्हणून दोघं गेले आणि हा अचानक परत कसा आला. त्यालाच काय वाटलं कळेना,दिडदोनशे पायऱ्या चढूनही तो रुमवर परत आला. मग ठरवलं दुपारपर्यंत रोप वे सुरु होतोय का बघू नाहीतर आधी ठरल्याप्रमाणे सोमनाथच्या दर्शनाला जाऊ.
बाहेर पाऊस सुरु झाला होता म्हणून नाश्ता करायला बाहेर जायच्या ऐवजी बरोबर नेलेला खाऊच रुममध्ये खाल्ला. मन शांत नव्हतंच पण परत एकदा दर्शनाची आशा निर्माण झाली होती. वारा कमी होऊन रोप वे सुरु व्हावा आणि आम्हाला शिखर दर्शन घडावं ही प्रार्थना सुरुच होती. आणि वातावरण बदललं नाहीच तर निदान सोमनाथचं तरी दर्शन घडेल हा विचार करतच आम्ही थोडावेळ आडवं पडलो. झोप येणं अशक्यच होतं.
विचारांत तळमळत असतानाच अचानक माझा डोळा कधी लागला मलाच कळलं नाही. खरंतर अवघ्या काही मिनीटांची डुलकी लागली होती. त्या झोपेतच अचानक मला जाणवलं की बेडजवळ माझ्या पावलांशी एक अत्यंत तेजस्वी, पितांबरधारी असं कुणीतरी उभं आहे. त्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी झोपेतच उठले. माझं मस्तक मी झुकवलं आणि तत्क्षणी मला जाग आली आणि ते स्वप्न असल्याचं क्षणात लक्षात आलं. पण अजूनही दृष्टीसमोर ती तेजस्वी आकृती होती. ते स्वप्नच होतं हे स्विकारणं कठिण होतं, कारण माझ्या इतक्या निकट ती आकृती सगुण साकार झाली होती. मी चटकन वेळ बघितली आणि मग मात्र माझी पूर्ण खात्री पटली. आम्ही जेव्हा रोप वे ने दर्शनासाठी जातो तेव्हा साधारण ज्या वेळी आम्ही गुरुशिखरावर मंदिरात असतो नेमक्या त्याच वेळी मला हा दृष्टांत झाला होता. मला गुरुशिखरावर जाता आलं नाही म्हणून स्वयं श्री दत्तात्रेयांनी स्वप्नदृष्टांत दिला होता,असं माझ्या मनात आलं. हे सारं मी याच्याशी बोलत असताना मला परत एकदा अश्रू अनावर झाले होते. कितीतरी वेळ आतल्या आत हलकीशी थरथरत होते मी. हे लिहित असतानाही अगदी जशीच्या तशी ती तेजस्वी आकृती माझ्या नजरेसमोर येतेय. प्रत्येक वेळी एक अनामिक हुरहुर दाटते.
दुपारपर्यंतही रोप वे सुरु झाला नाहीच म्हणून आम्ही रिक्षाने सोमनाथ ला निघालो. जोरदार पाऊस सुरु होता. पण जूनागढच्या पुढे पाऊस नाही असं त्या रिक्षावाल्यानी सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निघालो. सर्वात आधी भालका तीर्थ येथे पोहोचलो. तिथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत पण आम्हाला छान दर्शन घडलं. रिमझिम पाऊस आणि गर्दी यामुळे तिथे जास्त वेळ थांबणं अवघड होतौ. म्हणून दर्शन घेऊन आम्ही लगेच पुढे निघालो. सोमनाथ ला पोहोचलो. तिथे मात्र बिलकुल गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी शांतपणे जरावेळ श्री शंभू महादेवासमोर उभं राहून सुंदर दर्शन घेता आलं. अधिक महिन्यातील पौर्णिमेला भालका तीर्थ येथील श्रीकृष्णाच्या आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशा सोमनाथ महादेवाच्या दर्शनाचं उत्तम भाग्य श्री दत्तगुरुंच्या कृपेनं लाभलं होतं. दर्शन घेऊन तलेटीला मुक्कामी परत आलो. रात्री निजताना दुसऱ्या दिवशी पहाटेच सारं आवरुन रोप वे सुरु झालाच तर दर्शनाला जायचं ठरवलं. तरीही रात्रभर निद्रादेवी काही प्रसन्न झाली नाही.
ठरल्याप्रमाणे पहाटे उठून आवरलं पण एकंदर वातावरण बघता रोप वे आजही सुरु होणार नाही याची खात्री पटली. मन परत खट्टू झालं. श्री दत्तात्रेयांनी स्वप्नदर्शन दिलं होतं तरी शिखरावर जायची ओढ होतीच. मला दत्तगुरुंचं एवढं तरी दर्शन झालं होतं. पण याला बिलकुल दर्शन मिळालं नव्हतं. त्यामुळे मन तळमळतच होतं. अखेर श्री दत्तगुरुंना ' कृपा करुन पुन्हा असं विन्मुख पाठवू नका, गिरनार शिखरदर्शन घडवत रहा ' अशी प्रार्थना करुन दुपारी परतीच्या प्रवासाला निघालो.
गिरनारहून आलो आणि पुढले ३-४ दिवस घरगुती कार्यक्रमात गुंतलो होतो. पण गिरनारला जाण्याआधी अधिक महिन्याच्या सोमवारी लेकीसह भिमाशंकरला जयचं ठरवलं होतं. त्यानुसार सोमवारी पहाटे भिमाशंकरला निघालो.
प्रवासाला सुरुवात केली तेव्हा पाऊस नव्हता. अतिशय छान वातावरण होतं. मस्त प्रवास सुरु होता. माळशेज घाट जसजसा जवळ येऊ लागला तसतसं वातावरण बदलू लागलं. सुरुवातीला दिसणारा धुक्याचा विरळ पडदा हळूहळू दाट होऊ लागला. घाट सुरु झाला आणि साऱ्या सृष्टीने जणु धुक्याची दाट दुलई लपेटून घेतलीय असं वाटू लागलं. पूर्ण घाट रस्त्यावर इतकं दाट धुकं होतं की २-३ फुटांच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे गाडी खूपच हळूहळू चालवावी लागत होती. पण अतिशय अप्रतिम असा नजारा होता तो. घाट संपल्यावर मात्र हळूहळू पुन्हा वातावरण बदललं.
भिमाशंकरला आम्ही पोहोचलो पण गाडी मात्र मंदिराच्या आधी ६-७ किमी अंतरावर असलेल्या वाहनतळावरच थांबवावी लागली. गाडीतून उतरुन आता मंदिरापर्यंत ६-७ किमी चालायच या विचारातच रस्त्यावर आलो आणि समोर एसटी बसच्या कंडक्टर मोठ्या आवाजात 'मंदिर मंदिर' ओरडत असलेला दिसला. लगेच आम्ही त्या बसमध्ये चढलो. एसटी महामंडळाने केलेल्या या व्यवस्थेमुळे सर्व भाविकांची खूप छान सोय झाली होती. बसने आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. मात्र साऱ्या भिमाशंकरने दाट धुक्याची दुलई पांघरली होती. सन्नाट वारा आणि तरीही अतिशय दाट धुकं, अत्यंत सुंदर असं दृश्य होतं. त्या धुक्यातून अगदी थोडसं चालत मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो. तिथूनच दर्शनासाठी रांग होती.
चार तास रांगेत उभं राहिल्यानंतर प्रत्यक्ष मंदिरात पोहोचलो आणि छान दर्शन झालं. खरंतर तिथल्या सेवेकऱ्याने 'चला चला पुढे चला' असा घोषच चालवला होता. पण आम्हाला खूप सुंदर दर्शन घेता आलं. अगदी शिवपिंडीला स्पर्श करुन, गंगाजल, बेलपत्र वाहून आम्ही पुढे निघालो. दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि जोरदार पाऊस सुरु झाला. मंदिराबाहेर जाणं अशक्य होतं. सगळेच तिथेच थांबलो. पण काही मिनीटांतच पाऊस जवळजवळ थांबला आणि आम्ही तिथून निघालो. आम्ही दर्शन घेऊन बाहेर येताच पावसाची आलेली जोराची सर बघून आमची सेवा श्री शंभू महादेवाच्या चरणी रुजू झाली असं काहीसं माझ्या मनात आलं.
मंदिराच्या थोडंसं पुढे आलो आणि एका ठिकाणी 'निवासव्यवस्था उपलब्ध' अशी पाटी बघितली. जरा माहिती घ्यावी म्हणून त्या इमारतीत शिरलो. इमारतीच्या तळमजल्यावर प्रशस्त गाभारा वजा हाॅल होता आणि काही देवदेवतांच्या मूर्ती होत्या. त्या हाॅलच्या बाजूला असलेला जीना चढून आम्ही वर गेलो. तिथे माहिती विचारावी तर कुणी व्यक्ती दिसेना म्हणून आजुबाजुला बघितलं तर तळमजल्यासारखाच हाॅल पहिल्या मजल्यावरही होता. मी तिथे कुणी आहे का बघायला डोकावले आणि मला समोरच श्री दत्तात्रेय दिसले. त्या एवढ्या मोठ्या हाॅलमध्ये फक्त श्री दत्तात्रेयांची अतिशय सुंदर मूर्ती होती. कुणी व्यक्ती दिसतेय का पहात असताना अचानक समोर दत्तगुरु दिसले आणि अतिशय आनंद झाला. मी लगेच दोघांनाही दर्शनासाठी बोलावलं. तीळमात्रही कल्पना नसताना दत्तगुरुंचं सुंदर दर्शन घडलं होतं. गिरनारला मला स्वप्नात तरी श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं होतं. माझ्या सहचराला मात्र काही पायऱ्या चढूनही दर्शनाविना परत यावं लागलं होतं. ही रुखरुख आमच्या मनात होतीच. आणि म्हणूनच बहुधा आम्हाला भिमाशंकरला दत्तगुरुंनी असं अचानक दर्शन दिलं होतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या हाॅलमध्ये कुणीच नव्हतं. त्यामुळे अगदी मनासारखं दर्शन घेता आलं. आणि मनाला लागलेली रुखरुखही क्षणात नाहीशी झाली.
दर्शन घेऊन आम्ही परत एसटी बसने आमच्या गाडीजवळ आलो. लगेच परत निघालो. परत येताना माळशेज घाटात पोहोचपर्यंत रात्र झाली होती. घाटात सकाळसारखंच दाट धुकं होतं. आता मात्र गाडी फारच सावकाश, अंदाज घेत चालवावी लागत होती. दाट धुक्यात मागेपुढे असलेल्या गाड्याचे लाईटही दिसत नव्हते. घाट संपेपर्यंत खूपच जपून यावं लागलं. नंतर मात्र काही अडचण न येता प्रवास झाला.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
दत्तगुरु काय आहे तुमच्या मनात
सांगाल का हळूच माझ्या कानात
कसं जाणार पुढलं सारं आयुष्य
कळत नाही मला काही भविष्य
खूप आनंदात गेलं सारं बालपण
सौख्यसमृध्दीने सजलंय तरुणपण
नंतर मात्र हळूहळू येईल वार्धक्य
राहिल ना देही आरोग्य अन ऐक्य
जरतारी वस्त्र हे साऱ्या आयुष्याचं
सुखदुःखाच्या नाजुक किनारीचं
याच वस्त्रात घेईन ना अंतिम श्वास
दर्शन तुमचे नित्य घडो हिच आस
मम मस्तकी वरदहस्त तुवा ठेवूनी
पूर्ण व्हावी मम कामना तुम्हा प्रार्थुनी
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment