Pages

Thursday, January 4, 2024

स्वागत

            अव्याहत फिरणाऱ्या कालचक्रानुसार अजून एक वर्ष संपलं आणि नवीन वर्ष सुरु झालं. सारं जग सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचं स्वागत करत ३१ डिसेंबरची रात्र जल्लोषात साजरं करतं. आपलं हिंदू नववर्ष जरी चैत्र पाडव्याला सुरु होत असलं तरीही व्यवहारात १ जानेवारी पासून सुरु होणारं वर्षच नववर्ष गृहित धरलं जातं. त्यामुळे आपणही थोड्याफार प्रमाणात हे नववर्ष साजरं करतोच.

             या निमित्ताने आम्हीही गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोकणात गेलो होतो. ३१ डिसेंबरची रात्र नात्यातीलच एका घरी साजरी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या गावाला घरी निघालो. घरी पोहोचल्यावर दुपारचं भोजन झालं आणि मला वेध लागले सागरतीरी जाऊन सुंदर सूर्यास्त पहाण्याचे. उन्हं कलली, सायंकाळ झाली आणि आम्ही समुद्र किनारी गेलो. उबदार ओल्या वाळूचा स्पर्श पावलांना झाला आणि तनमनावर सुखद शिरशिरी उमटली. तो स्पर्श अनुभवतच थोडं पुढे गेले आणि शुभ्र फेसाळती लाट मला भिजवून गेली. परत एकदा तनमन मोहोरलं. ढगाळ हवेमुळे अस्ताचलास जाणारा कनकगोल मात्र दिसत नव्हता. तरीही पश्चिमा मात्र केशररंगात सजली होती. केशररंगी पश्चिमा आणि तिचं सागरजळात पडणारं प्रतिबिंब, अतिशय सुंदर दृश्य होतं ते. लाटांशी खेळण्यात आणि छायाचित्रं काढण्यात आम्ही तल्लीन झालो होतो. अशातच गडद सांजावलं आणि अखेर आम्ही तिथून निघालो. 

                  घरी येऊन जेवणाची थोडी तयारी करुन घेऊन नववर्षाची रात्र साजरी करण्यासाठी आम्ही सगळे निघालो आम्हा सर्वांच्या खास आवडत्या मनकुपीत. आता लहान वाहनानं अगदी मनकुपी कॅम्प साईटपर्यंत जाता येतं. त्यामुळे आम्ही सगळे गाडीनेच तिथे पोहोचलो. 

                  गाडीतून उतरलो आणि समोर आला मनकुपीचा सुंदर नजारा. चंद्रोदय व्हायला अजून अवकाश होता तरीही चांदण्यांच्या हलक्याशा उजेडात नीरव शांत मनकुपीची साईट सुरेख दिसत होती. तिथे असलेल्या खोलीत जाऊन सौरदिवे लावले आणि साईट  एकदम उजळलीच. बरोबर नेलेलं जेवणाचं सारं साहित्य ठेवून, दिवे कमी करुन, मंद प्रकाशात त्या परिसरात फिरायला निघालो. निरव शांतता, वाऱ्याच्या झुळुकीने होणारी पानांची  किंचीतशी सळसळ, मध्येच कानी येणारा टिटवीचा स्वर आणि साईटला बिलगून वहाणारी शांत सरिता, अगदी मंत्रमुग्ध व्हावं असं वातावरण होतं. हवेतही छान गारवा आला होता. थोडं फिरणं आणि  गप्पा झाल्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. आणि परत किनाऱ्यावर जाऊन बसलो. रात्री उशिरापर्यंत मनसोक्त गप्पा मारुन आणि मग त्या शांत सुंदर वातावरणाशी एकरुप होत थोडा वेळ निःशब्द बसून राहिलो. हळूहळू सर्वांच्या डोळ्यावर निद्रादेवीचा अंमल होऊ लागला. मग लगेच टेन्ट लावून सारेजणं आपापल्या टेन्टमध्ये निद्राधीन झालो.

                   पहाटे लवकरच सारे उठलो. पहाट अलवारपणे उमलायला लागली आणि वाफाळत्या चहाचा कप हातात आला. चांदणप्रकाश फिकट होत हलकसं उजाडायला लागलं होतं. हवेतला गारवा थोडा वाढला होता. अशा सुंदर वातावरणात वाफाळता चहा पिण्यात एक वेगळंच सुख होतं. हळूहळू थोडं अजून उजाडलं आणि मनकुपीचा सारा नूरच पालटला. नाटकात असलेल्या फिरत्या रंगमंचावर कसं काही क्षणात दृश्य बदलतं अगदी तसं झालं. रात्रीची शांत, चांदणं ल्यायलेली मनकुपी उषेच्या हळूहळू प्रकाशमान होत जाणाऱ्या सोनवर्खाने चमकदार दिसू लागली. एका बाजूला असलेली केळी आणि सुपारीची बाग आणि दुसऱ्या बाजूला संथ शांत वाहणारी नदी, मध्ये असलेलं थोडं लाल मातीचं आणि बाकी सगळं सारवलेलं अंगण सारंच दृश्य नितांतसुंदर. बागेतील सारी झाडं भल्या पहाटे पडलेल्या दवात न्हाऊन चमचमत होती. रवीराजाच्या आगमनाआधीच पक्ष्यांचं मधुर कुजन सुरु झालं होतं. अतिशय रमणीय अशा त्या परिसरातून परत घरी जावंसं वाटतच नव्हतं. पण परतीच्या प्रवासाला निघायचं असल्यानं अखेर घरी परतलोच. 

               शहरातील गजबजाट, कृत्रिम दिव्यांचा लखलखाट, असुरक्षितता आणि सतत असणारं कामाचं टेन्शन या सगळ्यांपासून कोसो दूर असलेलं हे ठिकाण एकदा तरी अनुभवावं असंच आहे. साऱ्या चिंता, थकवा क्षणात नाहीसा होईल असाच हा निसर्गरम्य परिसर आहे. सायकलवरुन विविध देशांमध्ये भ्रमण करणारे काही परदेशी पर्यटकही या मनकुपीत येऊन मुक्काम करुन गेले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहून अगदी जवळून निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी मनकुपी कॅम्पिंग हा एक सुंदर पर्याय आहे. 

मनकुपी कॅम्पिंगसाठी संपर्क - मयुरेश - ७४९९५१०६८१


- स्नेहल मोडक





   


No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...