Pages

Friday, December 29, 2023

दत्तजयंती

                 मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती, साऱ्या दत्तभक्तांसाठी पर्वणी.  या जन्मसोहळ्याची आतुरतेनं वाट पहात असतात सारे दत्तभक्त. यावर्षी आलेल्या अधिक महिन्यामुळे आम्हाला दोन वेळा दत्तजयंतीला दर्शन घडलं. आमच्या गावाला टिळक पंचांग वापरत असल्यानं तिथला दत्तजन्मसोहळा एक महिना आधीच नोव्हेंबरमध्ये संपन्न  झाला होता. आणि निर्णयसागर पंचांगानुसार दत्तजयंती डिसेंबर महिन्यात नुकतीच संपन्न झाली. त्यामुळे आम्हाला यावर्षी आधी गावाला आणि आता गिरनारला दत्तजयंतीला जाण्याचं भाग्य लाभलं. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये गिरनार गुरुशिखर दर्शन, परिक्रमा, दत्तजयंती आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन एवढं एकत्र मोठं भाग्य आम्हाला लाभलं होतं. 

                  गिरनारसाठी ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी आम्ही रेल्वेने जुनागढला निघालो. यावेळी आम्हा सर्वांचीही तिकीटं RAC होती. त्यामुळे पूर्ण प्रवास थोडासा त्रासदायकच झाला. पहाटे नेहमीच्या वेळेत जुनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला मुक्कामी गेलो. 

                  नित्याप्रमाणे पहिली पायरी आणि लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे रोपवे साठी प्रचंड मोठी रांग लागली होती. रोपवे च्या प्रवेशद्वाराच्या बाहेर रस्त्यावर एक मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यात दिडशे-दोनशे लोकांना रांगेत बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तो मंडप पूर्ण भरुन बाहेर भलीमोठी रांग होती. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही बरंच फिरुन मग ती रांग ट्राॅलीजवळ पोहोचत होती. हे सारं पाहून आम्हाला रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचायला किती वाजणार अशी काळजी वाटत असतानाच आमचे काही परिचित रांगेत खूप पुढे उभे होते त्यांच्याबरोबर जायची परवानगी आम्हाला मिळाली आणि आम्ही लवकरच अंबाजी टुकवर पोहोचलो.

                  नेहमीप्रमाणेच यावेळीही गिरनार अप्रतिम सौंदर्याने सजला होता.  उदयाचली आदित्यराजाचं नुकतच आगमन झालं होतं. सारी पर्वतशिखरं सोनकिरणानी चमचमत होती. क्षितिजरेखा आणि पर्वतांच्या मध्ये एक दाट पांढराशुभ्र पट्टा तयार झाला होता. अतिशय वेगळं दृश्य होतं ते. हा अद्भुत नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात साठवतच 

अंबामातेचं दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात केली.

                   गेल्या महिन्यातील परिक्रमेनंतर याची तब्येत तितकीशी ठिक नव्हती. वाढलेल्या रक्तदाबामुळे सरळ रस्त्याने चालतानाही अधुनमधून झोक जात होता. इथे तर पायऱ्या चढा-उतरायच्या होत्या. त्यामुळे पायऱ्यांच्या बाजूचा कठडा आणि माझा आधार घेत सावकाश पायऱ्या चढायला सुरुवात केली. अगदीच झेपत नाही असं वाटलं तर डोली करायची असही ठरवलं. पण हळूहळू चढत गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. तिथे दर्शन घेऊन पुढे पायऱ्या उतरायला लागलो. थोड्या पायऱ्या उतरल्यानंतर उतरताना त्रास कमी होतोय असं त्याच्या लक्षात आलं आणि मग नेहमीसारखं सहज पायऱ्या उतरु लागलो. अंबामाता मंदिरापासून गोरक्षनाथ मंदिरापर्यंत पायऱ्या चढताना जो त्रास होत होता त्यामुळे माझ्या मनात मात्र त्रास असाच सुरु असेल तर पुढल्या पौर्णिमेला यावं की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. या विचारातच मी चालले होते. आणि अचानक समोरच्या दृश्याने माझं मन क्षणात भानावर आलं. माझ्या पुढेच एक नेत्रविहिन भाविक एका हातात त्यांची विशेष ओळख असलेली धातूची काठी आणि दुसरा हात सहचराच्या हाती धरुन अगदी सहजतेने पायऱ्या उतरत होती. मी अक्षरशः खिळून पायरीवरच थांबले. मी किती व्यर्थ चिंता करत होते याची क्षणात जाणीव झाली आणि माझी मलाच लाज वाटली. स्वयं श्री दत्तात्रेय काळजी घेत असताना आपण चिंता करायची बिलकुल गरज नाही याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी मी त्या भक्तांशी बोलून आदर व्यक्त करुन आणि मनोमन नमस्कार करुन पुढे गेले. केवळ कल्पनेनेच आणि थोडंसं स्पर्शाने सारं जग पहात असणारी ती गिरनारला एवढ्या पायऱ्या चढून केवळ मन:चक्षूंसमोर दिसणाऱ्या श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आली होती. आपल्याला पादुका आणि त्रिमूर्तीचं दर्शन तर प्रत्यक्ष घडतं. पण मला वाटतं अशा व्यक्तींना घडणारं निर्गुण निराकार दर्शन हे जास्त सुंदर असतं कारण ते त्यांच्या अंतर्चक्षुंना दिसत असतं. केवळ अपार श्रद्धा, भक्ती आणि आनंद याच भावना त्यात असतात. आजवर गिरनारला अनेक वयोवृद्ध, अधू, अपंग भक्त दर्शनासाठी येताना पाहिले होते. पण नेत्रहिन भक्त याचवेळी पाहिला आणि खरंच आपण किती अकारण चिंता करतो, श्री दत्तगुरु सारी काळजी घेत असतानाही, या जाणीवेने क्षणभर अपराधीच वाटून गेलं. अध्यात्म आणि भक्तीच्या महासागरातील एक थेंब तरी आपण आहोत का हा प्रश्नच मनात आला.

                याच विचारात आम्ही कमानीच्या थोडं पुढे गेलो आणि दर्शनासाठी रांग लागली. रांगेतून हळूहळू पुढे चढून जात होतो. साधारण पाऊण तासातच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आत प्रवेश केला आणि मी पाणावलेल्या डोळ्यांनींच नतमस्तक झाले. बरोबर नेलेला नैवेद्य, पितांबर आणि अष्टगंध अर्पण केलं प्रसाद घेतला आणि क्षणार्धात आम्हाला एक गोष्ट जाणवली. श्री दत्तात्रेयांच्या पादुका नेहमीच अष्टगंध विलेपित असतात. यावेळी मात्र पादुकांना अष्टगंध विलेपन केलेलं नव्हतं. मी जेव्हा दत्तगुरुंना अर्पण करण्यासाठी पितांबर घेतला तेव्हा मला अष्टगंधही घ्यावं अशी मनात जाणीव झाली आणि मी तेही अर्पण करण्यासाठी घेतलं होतं. त्यादिवशी असलेल्या अष्टगंध विरहित पादुका आणि मी अर्पण केलेलं अष्टगंध याचा परस्परसंबंध आम्हा दोघांनाही जाणवला आणि अक्षरशः डोळ्यात पाणीच आलं. अशीच सेवा सदैव आमच्याकडून करुन घ्या अशी दत्तगुरुंना प्रार्थना करतच आम्ही बाहेर आलो. खरंतर अष्टगंध विलेपन करायचं राहून गेलं होतं. कारण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एक छोटीशी शिला आहे त्यासमोरच एक प्लास्टिक बाटली कापून त्यात थोडं अष्टगंध ठेवलेलं होतं. आणि अखंड धुनीजवळही भक्तांसाठी अष्टगंध आणि भस्म नेहमीप्रमाणे ठेवलेलं होतंच. पण मला जेव्हा ते घेऊन जायची आतून जाणीव झाली तेव्हा असं काही असेल अशी तीळमात्रही कल्पना नव्हती. 

                    दर्शन घेऊन थोड्या पायऱ्या उतरुन मध्ये एका ठिकाणी थोडीशी बसण्यासाठी जागा आहे तिथे गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. नंतर अखंड धुनीजवळ पोहोचलो. दत्तजयंतीच्या निमित्ताने इथली श्री दत्तात्रेयांची मूर्ती  भव्य आणि अप्रतिम अशा रजतसिंहासनी आसनस्थ झाली आहे. इथे दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही परत गोरक्षनाथ मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. कमानीपर्यंत चढून आल्यावर याला पायऱ्या चढताना होणारा त्रास खूप कमी झाल्याचं जाणवलं. मग जरा भरभरच पायऱ्या चढून गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. दर्शन घेऊन अंबाजी टुकवर आलो. पायथ्याशी जाण्यासाठी रोपवे ला गर्दी कमी होती त्यामुळे फार वेळ थांबावं न लागता लवकरच पायथ्याशी पोहोचलो. मात्र आम्ही दर्शन घेऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली तेव्हा दर्शन रांग कमानीच्या आधीच सुरु झाली होती आणि नंतर ती अंबामातेच्या मंदिरापासूनच सुरु झाली होती. 

                      पायथ्याशी पोहोचल्यावर भोजन करुन, रुमवर जाऊन थोडा आराम करुन सायंकाळीच परतीच्या प्रवासाला लागलो.

                       वर्षानुवर्षं दर पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी असंख्य दत्तभक्त जात असतात. श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच आमचंही जाणं होत आहे. तब्येतीच्या किंवा इतर कुठल्याही कारणाने यात खंड न पडता गिरनार दर्शन असंच घडत रहावं, नित्य सेवा घडावी हीच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...