Pages

Thursday, June 20, 2024

फुलपाखरु

        ' फुलपाखरु ' असा शब्द जरी कधी ऐकू आला तरी तत्क्षणीच नाजूक, देखणी फुलपाखरं आपल्या मन:चक्षुंसमोर‌ भिरभिरायला लागतात. खरंच अतिशय नाजूक, रंगबिरंगी, अप्रतिम देखणं असं अनेकविध फुलांवर भिरभिरणारं फुलपाखरु म्हणजे निसर्गाचा एक सुंदर आविष्कारच. 

         खूप वर्षांपूर्वी मी फुलपाखरांवरचा एक लेख वाचून लगेच प्रयोग करायला सुरुवात केली. घरातल्या वापरलेल्या लिंबांच्या बिया मातीभरल्या कुंडीत रुजत घातल्या. त्याच दरम्यान प्रवासात एका धाब्यावर चहा नाश्ता करायला थांबलो असताना तिथं पानफुटीची मोठी रोपं दिसली. त्यातली दोन पानं त्यांच्याकडून आणली आणि तीही कुंडीत रुजत घातली. यथावकाश लिंबू आणि पानफुटीची रोपं छान तरारुन आली. रोपं थोडीशी मोठी झाली आणि मग आम्ही आतुरतेनं फुलपाखरांची वाट बघू लागलो. सोसायटीमध्ये भरपूर फुलझाडं आणि इतर हिरवाई असल्यानं खूप फुलपाखरं भिरभिरत असायचीच. ही फुलपाखरं लिंबू आणि पानफुटीच्या झाडांकडे कशी आणि कधी आकर्षित होतात हे पहाणं सुरु झालं. एरवी आमच्या बाल्कनीतल्या अधुनमधून फुलणाऱ्या फुलांवर फुलपाखरं यायचीच. त्यामुळे या झाडांवरही ती नक्की येतील याची खात्री होती. 

               बाल्कनीच्या ग्रीलला लावलेल्या जाळीतून लिंबांच्या झाडांच्या काही फांद्या बाहेर गेल्या होत्या. त्या फांद्यांवर एक दिवस अचानक लेकीला काही छोट्या अळ्या दिसल्या. आधी आम्हाला लिंबाला किड लागली असंच वाटलं. एका अर्थी खरंही होतं ते. पण मग नीट पाहिलं आणि आंतरजालावर थोडं शोधल्यावर आम्ही ज्याची आतुरतेनं वाट पहात होतो त्याच या फुलपाखरांच्या अळ्या असल्याचं कळलं आणि आम्हाला खूपच आनंद झाला. त्या दिवसापासून आमचं काळजीपूर्वक निरीक्षण करणं सुरु झालं. 

                 त्या अगदी इवल्याशा अळ्या हळूहळू मोठ्या झाल्या. लिंबाची पानं हेच त्यांचं अन्न होतं. ८-१० दिवसांत त्या मोठ्या झालेल्या अळ्यांचं अचानक हिरव्या रंगात रुपांतर झालं. या अळ्या अन्नासाठी लिंबाच्या झाडावर सगळीकडे फिरत होत्या. पण नंतर त्यातल्या काही अळ्या दिसेनाश्याच झाल्या. मात्र २-३ अळ्यांनी साधारण १०-१२ दिवसांनी स्वतः भोवती कोष विणायला सुरुवात केली. दिवसभरातच त्या अळ्यांचं रुपांतर फांदीला लटकलेल्या कोषात झालं. पुढच्या ८-१० दिवसांनी त्या कोषांचा रंग बदलला. आणि त्यातून अत्यंत नाजूक सुंदर अशी फुलपाखरं कोषातून बाहेर आली. मात्र ती कधी आणि कशी बाहेर आली हे आम्हाला कळलंच नाही. फक्त ती फुलपाखरंच पहायला मिळाली. तसंच बाकीच्या अळ्या कुठे गेल्या तेही कळलं नाही.

               लिंबाच्या झाडांवर जेव्हा आम्हाला फुलपाखरांच्या अळ्या दिसल्या तेव्हाच  पानफुटीच्या झाडांवरही असाच काहीसा वेगळा प्रकार दिसला. पानफुटीच्या पानांचा काही भाग पारदर्शी झाला होता. आणि त्यात अळीसदृश्य काही तरी काळं दिसत होतं. 

काही दिवसांनी त्यातून अगदी गव्हाच्या दाण्याएवढ्या पांढऱ्या अळ्या बाहेर आल्या. त्यांनी झाडावर फांद्यांवर, पानांवर कोष केले जे सहजासहजी दिसत नव्हते. पण आम्ही त्या कोषांचं निरिक्षण करत होतो. याही कोषांचे रंग आठवडाभरात बदलले. पांढरे कोष पूर्ण काळे झाले आणि त्यातूनही इवलीशी फुलपाखरं बाहेर आली. अर्थातच ती फुलपाखरं कोषातून बाहेर येताना आम्हाला बघायला मिळालीच नाहीत. पण ती तिथे आजूबाजूला बराचवेळ उडत असल्यानं कोषातून नुकतीच बाहेर आल्याचं कळलं. मग मात्र आम्ही फुलपाखरांची अधिक सविस्तर माहिती मिळवली. आणि पुन्हा नव्याने निरिक्षण सुरु केलं. 

           काही दिवसांनी पुन्हा जेव्हा लिंबाच्या आणि पानफुटीच्या झाडांवर फुलपाखरं भिरभिरताना दिसली तेव्हा मी थोड्या वेळानं लगेच त्याठिकाणी पाहिलं आणि मला अतिशय आनंद झाला. कारण मला ती फुलपाखरं जिथं जिथं बसून गेली होती तिथं तिथं अगदी इवलीशी मोहरीच्या दाण्याएवढी पांढरी अंडी पानांवर‌ चिकटलेली दिसली. यावेळी मात्र मी फारच बारकाईने बघत होते. त्यामुळे त्या अंड्यांमधून इवल्या अळ्या बाहेर पडल्यापासून त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. जशा त्या अळ्या मोठ्या होऊन हिरव्या रंगाच्या झाल्या तशा त्यांना प्लास्टिकच्या पारदर्शक डब्यात ठेवल्या. कारण आधी ज्या हिरव्या अळ्या गायब झाल्या होत्या त्यांचं कारण कळलं होतं. बाल्कनीतल्या झाडांवर नित्यनेमाने येणारे माझे सखे सोबती चिमण्या, शिंपी,बुलबुल यांच्या भक्ष्यस्थानी त्या अळ्या पडल्या होत्या. हे सगळे पक्षी मी रोज घालत असलेले दाणे खायला आणि तुळशीच्या मंजिऱ्यामंधल्या बिया खायला नेहमीच येतात. याचवेळी त्यांच्या दृष्टीस फुलपाखरांच्या अळ्या पडतात आणि ते लगेच गट्टम् करतात. म्हणून यावेळी त्या अळ्यांना वाचवण्यासाठी डब्यात ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे त्या अळ्यांना डब्यात ठेवलं आणि मग सुरु झालं त्यांची काळजी घेणं. सतत त्यांना त्यांचं अन्न असलेली लिंबाची पानं घालणं. जसं त्या अळ्या कोषात गेल्या तसं पानं घालणं बंद केलं. आणि कोषांवर लक्ष ठेवलं. साधारण १०-१२ दिवसांनी कोषांचा रंग बदलला आणि आता त्यातून फुलपाखरु बाहेर येणार हे आमच्या लक्षात आलं. झालं, मी आणि लेक त्या डब्यासमोर ठाण मांडून बसलो. काही तासांची आमची प्रतिक्षा फळाला आली आणि आम्हाला फुलपाखरु कोषातून बाहेर येताना प्रत्यक्ष पहायला आणि त्याचं चित्रण करायला मिळालं. ते इवलंसं रंगबिरंगी फुलपाखरु बघून आम्हाला अत्यानंद झाला होता, जणू आपल्या घरी बाळाचा जन्म झाला असंच वाटत होतं. कारण फुलपाखराचा तो जन्मसोहळा आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता. फुलपाखरु बाहेर आलं आणि हळूहळू इकडे तिकडे फिरु लागलं. काही क्षणांनी मी माझं बोट अलगद त्याच्यासमोर नेलं आणि तत्क्षणीच ते अलवारपणे माझ्या बोटावर आलं. त्याला बोटावर घेतलं आणि मन सुखावलं, याचसाठी केला होता अट्टाहास हे जाणवलं. आपल्याला फुलपाखरं पहायला आवडतात पण मला ते हातावर घेण्याची खूप इच्छा होती. यावेळी ती पहिल्यांदा पूर्ण झाली होती. फुलपाखरु कोषातून बाहेर आल्यावर लगेच उडू शकत नाही. त्याचे इवले पंख पूर्ण वाळेपर्यंत ते कोषाच्या आजुबाजूलाच बसून रहातं. त्यामुळे आपण त्यावेळी त्याला सहज बोटावर घेऊ शकतो. असंच पानफुटीवरचे कोषही डब्यात ठेवून त्याचंही निरिक्षण करुन ते फुलपाखरुही कोषातून बाहेर येताना पाहिलं आणि चित्रणही केलं. यानंतर अशी अनेक फुलपाखरं कोषातून बाहेर येताना पहायचं आणि त्यांना अलगद बोटावर घ्यायचं भाग्य आम्हाला मिळतय. 

        आपल्या सर्वांनाच माहितेय फुलपाखरांचं आयुष्य जेमतेम १४ दिवसांचं असतं. त्या १४ दिवसांत त्याची पूर्ण वाढ होऊन मादी फुलपाखरं अंडी घालतात. २-३ दिवस ही अंडी घालण्याची प्रक्रिया सुरु असते. आणि त्यांनतर बहुधा लगेचच त्यांचं आयुष्य संपतं. पण अंडी, अळी, कोष आणि त्यातून येणारं फुलपाखरु हा सारा प्रवासही खूप कठीण असतो. दिडदोन इंच लांबीची अळी जेव्हा कोषात जाते तेव्हा तो कोष लहानच असतो आणि प्रत्यक्ष जेव्हा त्यातून फुलपाखरु बाहेर येतं ते कोषापेक्षा मोठं असतं. म्हणजे कोषात त्या अळीचं रुपांतर फुलपाखरात होणं किती कष्टमय असेल याची कल्पना येते. 

             फुलपाखरं परागीकरणात अतिशय महत्त्वाची भुमिका बजावतात. फुलांमधला मधुरस ग्रहण करताना परागकण त्यांच्या पायांना चिकटतात आणि ते दुसऱ्या वनस्पतींवर बसल्यावर होणारं क्राॅस परागीकरण वनस्पतींना पुनरुत्पादन करण्यासं मदत करतं. तसंच ही फुलपाखरं पक्षी, वटवाघूळ, कोळी आणि इतर किटकांचा अन्नस्त्रोत आहेत. फुलपाखरांच्या अळ्या  पक्षी, वटवाघळं खातात. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे  फुलपाखरांचा सुचक प्रजाती म्हणून वापर केला जातो. म्हणजे शास्त्रज्ञ फुलपाखरांच्या संख्येचा अभ्यास करुन परिसंस्थेचं आरोग्य मोजतात. फुलपाखरं पर्यावरण बदलांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या संख्येत होणारी घट प्रदूषण, हवामान बदल किंवा जैवविविधता नष्ट होण्याचे संकेत असतात. याचमुळे फुलपाखरांचं संवर्धन करणं हे गरजेचंच आहे. 

             वेगवेगळ्या जातींची फुलपाखरं वेगवेगळ्या झाडांवर अंडी घालतात. लिंबाच्या झाडावर Papilio Polytes जातीची फुलपाखरं अंडी घालतात. तर पानफुटीच्या झाडांवर Red Pariot या जातीची फुलपाखरं अंडी घालतात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्या याच झाडांची पानं खाऊन जगतात. अर्थातच त्यामुळे त्या झाडांची वाढही खूप जोमानं होत नाही. पण आम्ही केवळ फुलपाखरांसाठीच ही झाडं लावली आहेत. त्यामुळे आजपर्यंत Red Pariot जातीची असंख्य फुलपाखरं आमच्या पानफुटीच्या झाडांवर जन्माला आलीत. आणि Papilio Polytes या जातीतलीच पण विविध प्रकारची, रंगाची अनेक फुलपाखरं जन्माला आली आहेत. जेव्हा जेव्हा फुलपाखरं अंडी घालतात तेव्हा तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेतो. चिमण्या पाखरापासून त्यांना वाचवतो जर नेमकं त्या काळात आम्ही बाहेरगावी जाणार असू तर झाडांवर बारीक प्लास्टिकची जाळी घालतो जेणेकरुन अळ्या सुरक्षित रहातात. 

        आसमंतात, बागेत भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरं आपल्या बाल्कनीतल्या झाडांवर यावीत, त्यांना अतिशय जवळून पहायला मिळावं, त्यांचा अंडी, अळी, कोष, फुलपाखरु हा सारा जीवनप्रवास जवळून पहाता यावा ही माझी इच्छा कुंडीत लावलेल्या लिंबू आणि पानफुटीच्या झाडांमुळे सहज पूर्ण होतेय ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. निसर्ग जपत, फुलपाखरु संवर्धनाची (खारीचा वाटा) महत्वाची गोष्ट आमच्या हातून घडतेय आणि त्याबरोबरच त्यांचा जीवनप्रवास बघत, नुकत्याच जन्मलेल्या फुलपाखरांना अलवार हातावर घेण्याचही सुख मिळतय. 

          मात्र गेली दोन वर्षं का कुणास ठाऊक पण आम्ही या आनंदाला पारखे झालो होतो. पण आता पुन्हा हा आनंद आम्हाला मिळायला लागलाय. नुकत्याच एका सुंदर नाजूक Papilio Polyte जातीच्या फुलपाखराचा जन्म झालाय. आता पुन्हा हे सोहळे आम्हाला पहाता येतील याची खात्री पटलीय आणि त्यानिमित्तानंच मला व्यक्त व्हावसं वाटलंय. खरंतर फुलपाखरांचा हा प्रवास शब्दबद्ध करण्यापेक्षा प्रत्यक्ष पहाण्याचा अनुभव फारच वेगळा आणि सुंदर आहे हे नक्की.

           या फुलपाखरांबरोबरच दुर्मिळ असं Oak Leaf Butterfly  ही आम्हाला काही वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीत आणि आता अगदी नुकतंच आमच्या घराच्या बाहेरच्या भिंतीवर पहायला आणि चित्रणही करायला मिळालं. त्यावेळचा आनंदही वेगळाच होता. ऋतू बदलण्याच्या काळात अनेक जातींची फुलपाखरं हजारो मैलांचं स्थलांतर करतात. इवलंसं फुलपाखरु एवढ्या मोठ्या अंतरापर्यंत उडत स्थलांतर करतं हे विशेष.

             इवलंसं अंडं ते फुलपाखरु हा अतिशय कष्टदायी प्रवास आणि त्यानंतर मिळाणारं अवघ्या १४ दिवसांचं आयुष्य पण या काळातही आपल्या अप्रतिम सौंदर्यानं सगळ्यांना मोहविणारं, आनंद देणारं फुलपाखरु म्हणजे निसर्गाच्या खजिन्यातला एक अलंकारच. 

- स्नेहल मोडक

















No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...