आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. महाभारत, पुराणं लिहिणाऱ्या महर्षी व्यासांनां नमन करण्याचा, पूजन करण्याचा हा मंगलदिन. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. हा ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या गुरुंचे पूजन करायचा, कृतज्ञता व्यक्त करायचा हा शुभ दिवस. दत्तभक्तांसाठी तर ही मोठी पर्वणीच. अनेकविध मार्गानं प्रत्येक भक्त ही गुरुपौर्णिमा साजरी करतात. तसंच आम्हीही नेहमीप्रमाणं गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं होतं.
नेमकं निघायच्या २-३ दिवस आधीपासूनच सर्वत्र अतोनात पाऊस बरसत होता. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी निघायचं होतं. पण निघायच्या दिवशी लोकल ट्रेन तरी सुरु असतील का अशी शंका होती. पण उशीराने का होईना ट्रेन सुरु होत्या. त्यामुळे सारे सायास करत, पावसात भिजतच आम्ही गंतव्य स्थानकावर पोहोचलो. जुनागढला जाणारी ट्रेन वेळेत सुटली आणि पहाटे नेहमीच्या वेळेत पोहोचली. रात्रभर सुरु असलेल्या पावसानं थोडी विश्रांती घेतली होती त्यामुळे आम्हाला तलेटीला रिक्षाने पोहोचायला काही अडचण आली नाही.
रुमवर पोहोचून सारी आन्हिकं आवरुन लगेच दर्शनासाठी निघालो. लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे कडे निघालो. गुरुशिखर दाट धुक्यात हरवलं होतं. तरीही आम्ही जिथं राहिलो होतो तिथून रोपवे सुरु असलेला दिसत होता. पण तिथं पोहोचलो आणि प्रचंड गर्दी पाहिल्यावरच काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर कळलं की ट्रायल सुरु होती पण गुरुशिखरावर प्रचंड वारा आणि विजा चमकत असल्यानं रोपवे बंद आहे. सकाळचे पावणेसात वाजले होते आणि १० वाजल्यानंतर जर वातावरण शांत झालं तर रोपवेची ट्रायल घेऊन मग सुरु करायचा की नाही ते ठरवू अशी माहिती मिळाली. मला रोपवे ने च दर्शनासाठी जायचं होतं आणि रोपवे सुरु होण्याचा संकेत माझं मन मला देत होतं. त्यामुळे मी पायऱ्या चढून जायला तयार नव्हते. आम्ही तिथून परत फिरलो. मी रुमवर थांबते तुम्ही तिघं चढून जा असं मी सांगितलं पण मी चालत जायला अजिबात तयार नाही म्हणून माझ्या सहचरानं पण चालत जायचं रद्द केलं आणि आम्ही दोघंही रुमवर परत आलो. आमचे दोन्ही सहमित्र चालत निघाले. आम्ही रुममध्ये आराम करत असतानाच पाऊण तासातच रोपवे सुरु झाल्याचा फोन मित्रांनी केला. आम्ही लगेच निघून रोपवे जवळ आलो तर परत प्रचंड गर्दी होती. अखेर ९ वाजता आम्ही रोपवे ने वरती अंबाजी मंदिराजवळ पोहोचलो.
रोपवे थोडा हळूहळूच सुरु होता. थोडं वर गेल्यावर आमची ट्राॅलीही गुरुशिखरावरच्या धुक्यात शिरली. आजूबाजूला फक्त शुभ्र दाट धुकं आणि ट्राॅलीत आम्हा दोघांसह अजून एकजण असे तिघंच होतो. त्या धुक्यातूनच ट्रॉली हळूहळू वर पोहोचली. उतरुन आम्ही वर अंबामाता मंदिराजवळ आलो. धुक्यामुळं १०-१२ फुटांपलिकडं काही दिसत नव्हतं. अप्रतिम नजारा होता. साऱ्या गिरनारनं धुक्याची दाट दुलई लपेटली होती. जोराचा वारा सुटला होता. सारं दृश्य नयनात साठवतच जरासं पुढं गेलो आणि लक्षात आलं की दर्शनासाठी इथूनच रांग सुरु झालीय. सुरुवातीला रांग नीट पुढं सरकत होती. रांगेतूनच गोरक्षनाथ मंदिराच्या जरासं पुढे आलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. मग बाजूला थांबून रेनकोट घालून परत रांगेत उभं राहिलो. थोडं पुढे गेलो आणि रांग तिथेच थांबली. किमान पाऊण तास एकाच जागी सगळे उभे होतो. अखेर हळूहळू रांगेतून पुढं सरकत साधारण अकरा वाजता आम्ही मुख्य मंदिरापर्यंत पोहोचलो. पुढल्या काही क्षणातच डोळ्यातलं पाणी पापणीआड थांबवत मंदिरात प्रवेश केला. श्री दत्तात्रेयांचं दर्शन झालं आणि नतमस्तक होताना आसू ओघळलेच. बरोबर नेलेलं वस्त्र आणि रुद्राक्ष माला अर्पण केली आणि अत्यंत समाधानानं, आनंदानं मन भरुन आलं. श्री दत्तगुरुंना हवी असलेली वस्तू प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. याच कारणामुळं माझं मन तृप्त झालं होतं.
गेल्या महिन्यात वटपौर्णिमेला जेव्हा आम्ही दोघंच गिरनारला गेलो होतो तेव्हाच मला श्री दत्तात्रेयांनी एका गोष्टीची जाणीव करुन दिली होती. आम्ही वटपौर्णिमेला दर्शनासाठी गेलो तेव्हा आमची ट्रेन कधी नव्हे ती अडिच तास उशिरा जुनागढला पोहोचली होती. त्यामुळे रुमवर पोहोचून सारं आवरुन दर्शनासाठी निघायला साहजिकच उशिर झाला होता. आणि नेमकं तेव्हाही वाईट हवामानामुळे रोपवे बंद होता. दर्शनासाठी चालत जाऊन येणं वेळेअभावी शक्य नव्हतं. कारण आमचं त्याचदिवशीचं रात्रीचं राजकोटहून ट्रेनचं परतीचं तिकीट होतं. आणि त्यासाठी जुनागढहून सायंकाळी ५ वाजता सुटणाऱ्या बसचं राजकोटपर्यंतचं तिकीट होतं.
त्यामुळे मग आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन ५०-६० पायऱ्या चढून गेलो. तिथूनच परत उतरुन खाली येत असताना एका भगव्या वस्त्रधारी वृध्द साधू बाबांनी आम्हाला थांबवलं. ते तिथंच असलेल्या एका दुकानासमोर तिथं विक्रीसाठी ठेवलेल्या रुद्राक्ष माळांमधली एक माळ हातात धरुन उभे होते. मी त्यांना काय झालं असं विचारताच ते मला ' ताईजी मुझे ये माला चाहिए ' एवढंच म्हणाले. कसं कुणास ठाऊक पण क्षणातच मला काही जाणवलं आणि मी त्यांना म्हटलं 'ठिक है, आपको जो माला चाहिए वो लिजिये' आणि त्या दुकानात असलेल्या आजीबाईना त्या माळेचे किती पैसे द्यायचे ते विचारलं. एवढ्या वेळात माझा सहचर मात्र जरा पुढे जाऊन बसला होता. त्याला ते बाबाजी काय म्हणतायत ते काही कळलंच नव्हतं. मी त्याच्याकडून पैसे घेऊन आजीबाईंना दिले. अगदी क्षणभरासाठी का होईना पण मनात विचार आलाच ही माळ घेऊन ते बाबाजी स्वतः घालणार की काय करणार पण तत्क्षणीच दुसऱ्या मनानं फटकारलं 'आपलं काम माळ देणं एवढंच आहे '.तोपर्यंत त्या आजीनी ती माळ काढून त्या साधू बाबांना दिली. माळ हातात मिळताच बाबाजी अतिशय खुष झाले आणि अगदी लहान मुलासारखं निरागस हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमललं. मी त्यांना नमस्कार करताच क्षणातच ते तिथून निघून गेले. मीही आजींना नमस्कार करुन परत याच्याजवळ आले. त्यानं मला माळ कुठंय असं विचारलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की याला यातलं काहीच नीट कळलं नव्हतं. मग त्याला हे सगळं सांगतच आम्ही पायऱ्या उतरत खाली आलो. तिथून लगेचच नाश्ता करायला गेलो. पण नाश्ता करताना मला घडलेली घटनाच दिसत होती आणि डोळ्यातलं पाणी थांबवणं अशक्य झालं होतं. कारण स्वयं श्री दत्तात्रेयच त्या रुपात येऊन दर्शन देऊन आणि त्यांना हवं ते घेऊन गेल्याच्या जाणिवेनं सारं तनमन सुक्ष्मपणे थरथरत होतं. हे असं का घडलं याचा विचार करत असताना अचानक लक्षात आलं आम्ही नेपाळ यात्रेहून येताना खूप रुद्राक्ष माळा आणल्या होत्या. पण त्यातली माळ श्री दत्तगुरु ना अर्पण करायचं सुचलं नव्हतं. अखेर या मार्गानं स्वयं दत्तगुरुंनीच ही आठवण करुन दिली होती. रोपवे बंद असल्यानं प्रत्यक्ष गुरुशिखरावर जाता येणार नाही म्हणून आम्हाला वाईट वाटत होतं पण या विशेष अशा दर्शनाने आमचं मन सुखावलं होतं.
नाश्ता करुन रुमवर परत निघताना एका दुकानात थांबलो आणि अचानक तिथे एकजण आला आणि रोपवे ११ वाजल्यानंतर सुरु होणार असं कळल्याचं सांगून गेला. आम्ही लगेच रोपवे जवळ गेलो. तेव्हा ट्रायल सुरु आहे, थोड्याच वेळानं लोकांना सोडणार असं कळलं. मग तिथंच थांबलो. अखेर १२ वाजता रोपवेने वर जायला मिळालं. वारा खूप होता पण पाऊस नव्हता आणि त्यामुळे भराभर वर जाता आलं अर्थात गर्दीमुळे थोडा वेळ लागलाच. मंदिरात जाऊन नतमस्तक झाले आणि आधीच्या घटनेच्या आठवणीनं मन भरुन आलंच. अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि आम्ही परत निघालो. वेळेअभावी अखंड धुनीचं दर्शन न घेता अंबाजी मंदिराजवळ आलो. आणि अचानक मला सकाळचे साधूबाबा मंदिराजवळ अगदी क्षणभरच दिसले आणि त्यांनी ती रुद्राक्ष माला धारण केलेली दिसली. त्या क्षणीच सकाळी माझ्या मनात आलेल्या विचारांनी मलाच अपराधी वाटलं आणि मी मनोमन श्री दत्तगुरुंची क्षमा मागितली. तिथून आम्ही रोपवे जवळ आलो. गर्दीमुळे परत खाली पोहोचायला वेळ लागलाच. ४ वाजता रुमवर पोहोचलो लगेच आवरुन निघालो. जुनागढ हून राजकोटला जायला ज्या बसचं तिकीट काढलं होतं ती बस ही एक तास उशिरा आली. पुढच्या ट्रेनच्या वेळेआधी जेमतेम राजकोट स्टेशन वर पोहोचलो.
या गेल्या महिन्यातील खूपच वेगळ्या अनुभवामुळे या गुरुपौर्णिमेला गुरु शिखरावर जाऊन रुद्राक्ष माला श्री दत्तगुरुंना अर्पण करणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे रोपवे सुरु झाला आणि आम्हाला दर्शनाला जायला मिळून माळ अर्पण करता आली याचा आनंद खूपच मोठा होता. माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट होती ती. दर्शन घेऊन आम्ही परत निघालो तेही रांगेतूनच. जशी रांग दर्शनासाठी होती तशीच परत जाण्यासाठीही होती. रांगेतूनच पायऱ्या उतरुन नेहमीच्या जागी थांबून थोडं वाचन केलं आणि परत रांगेतून अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. तिथं दर्शन, प्रसाद घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच होता. गोरक्षनाथ मंदिराजवळ पोहोचायच्या आधीच सन्नाटा वारा आणि तुफान पाऊस सुरु झाला. आता रोपवे सुरु होणं कठिण असल्याचं लक्षात आलं. त्या सन्नाटा वाऱ्यात कसाबसा तोल सावरत रोपवे जवळ गेलो. सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. खूप लोकं रोपवे साठी थांबले होते. पण प्रत्यक्षात रोपवे कधी सुरु होईल काहीच सांगता येत नव्हतं. मला मनोमन रोपवे सुरु होईल असं वाटत होतं. पण दुपारचा दिड वाजला होता. रोपवे सुरु होण्याची वाट पाहून जर सुरु झालाच नाही तर उशिरा पायऱ्या उतरायला लागल्या असत्या. या कारणांमुळं अखेर मला थांबायचं असूनही नाईलाजानं चालायला सुरुवात करायचं ठरवलं. मग मात्र तिथली काठी आधारासाठी घेतली कारण एवढ्या तुफान वाऱ्या पावसात तोल सावरत उतरणं अवघड होतं. काठीच्या आधारानं भराभर जाता येणार होतं. काठी घेऊन निघालो पण वारा पाऊस उरात धडकी भरवणाराच होता. मी परत इथंच थांबूया म्हणत होते. पण 'पावसामुळं पायऱ्यांवरुन वाहणारं पाणी वाढेल आणि पूर्वीसारखी परिस्थिती होईल' असं सांगत यानं मला निघायलाच लावलं.
२०२२ सालच्या गुरुपौर्णिमेलाही रोपवे बंदच होता आणि सकाळी ७ वाजल्यापासूनच तुफान वारा पाऊस होता. पायऱ्यांवरुन खूप पाणी वाहत होतं आणि त्या परिस्थितीत आम्ही ४-५ जणंच गुरु शिखरावर दर्शन घेऊन आलो होतो. आमच्या व्यतिरिक्त कुणी दर्शनाला तर गेलं नव्हतंच पण सारी दुकानं बंद होती. एकही डोलीवाला नव्हता. या साऱ्या आठवणीने आम्ही अखेर चालायला सुरुवात केली. बघता बघता पायऱ्यांवरुन शुभ्र पाणी खळाळत व्हायला लागलं. मग त्या पाण्यातून, वाऱ्या पावसातून आमची अक्षरशः कसरत सुरु झाली. गर्दीही खूपच होती. यावर्षी गुरुपौर्णिमेला भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. रोपवे सुरु नसल्यानं बहुतेक सर्वजणं चालतच परत निघाले होते. पायऱ्यांवरुन धो धो वाहणारं पाणी वाढतच होतं. दर्शनाला जाण्यापूर्वीच रेनकोट असूनही चिंब भिजलोच होतो. आणि अजूनही पाऊसवारा कमी होण्याचं चिन्ह नव्हतं. काही क्षणांपेक्षा जास्त वेळ कुठंही न थांबता आम्ही पायऱ्या उतरत होतो. आमच्या बरोबरच शुभ्र पाणीही पायऱ्यांवरुन खळाळत वाहत होतं. मध्येच कुठेतरी पाण्यात माती मिसळून गढुळ पाणीही वाहत होतं. बाजूच्या उंच कडे कपारीतून फेसाळ चमचमते शुभ्र धबधबेही भाविकांची मनं उल्हसित करत कोसळत होते. खरंतर अप्रतिम असं वातावरण होतं. पण अंधार पडण्यापूर्वी पायथ्याशी पोहोचायचं असल्यानं आम्ही कुठंही थांबलो नाही. अखेर जेमतेम तीन तासांच्या आतच आम्ही पायथ्याशी पोहोचलो आणि निःश्वास सोडला.
श्री दत्तात्रेयांनी माझ्या त्यांच्यावरील श्रध्देला किंचितही धक्का लागू न देता परत एकदा अवघड परिक्षा घेतली आणि यशही दिलं. वेळोवेळी ते आपल्याला वेगवेगळ्या मार्गानं संकेत देत असतात. मात्र आपल्याला ते ओळखता येणंही महत्वाचं असतं. ते नेहमीच आपल्या प्रत्येक भक्तांची इच्छा अतिशय सुंदर रितीने पूर्ण करतात. मनापासून साद घालताच कुठल्या ना कुठल्या रुपात अवतरतात. अर्थात म्हणूनच त्यांना 'स्मर्तृगामी' म्हणूनच ओळखतात.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment