Pages

Monday, October 21, 2024

कोजागिरी - माउंट अबू

                   या कोजागिरी पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं नव्हतं. पण पौर्णिमा जवळ आली आणि माझं मन श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आसुसलं. पण यावेळी गिरनारला न जाता दुसऱ्या गुरुशिखराचं दर्शन घडावं अशी इच्छा होती. त्यानुसार माउंट अबूमधल्या गुरुशिखराचं दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. पण कोजागिरी जेमतेम १०-१२ दिवसांवर आली होती. त्यामुळे रेल्वेचं थेट माउंट अबूचं तिकीट मिळत नव्हतं. विमानानं जायचं तर उदयपूर ला जावं लागणार होतं. तिथून गाडीची व्यवस्था करावी लागणार होती. मग त्यातून मार्ग काढत अहमदाबाद पर्यंत रेल्वेने जायचं आणि तिथून पुढं गाडीनं फिरायचं ठरवलं आणि तशी तिकीटं काढली. 

                   ठरल्याप्रमाणं रात्रीच्या ट्रेनने आम्ही लेकीसह अहमदाबादला निघालो. सकाळी लवकर अहमदाबादला पोहोचलो. तिथं गाडी आधीच तयार होती. त्या गाडीने लगेच पुढल्या प्रवासाला सुरुवात केली. एवढ्या लवकर मार्गात कुठेच चहा नाश्त्यासाठी हाॅटेल किंवा ढाबे सुरु नसल्यानं उशिराच चहा नाश्ता मिळाला. तो करुन माउंट अबूमधल्या हाॅटेलच्या रुमवर पोहोचलो. थोडं आरामात आन्हिकं आवरलीजेवण केलं आणि माउंट अबू फिरायला निघालो.

                   सर्वात आधी आम्ही इथल्या अतिशय प्राचीन अशा मंदिरात दर्शनासाठी गेलो. ' सर्वेश्वर रघुनाथ मंदिरमाउंट अबूमधलं ५५०० वर्षं प्राचीन मंदिर. या मंदिरात एकट्या श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. तसंच श्री रामराय इथं तपस्व्याच्या वेषात विराजमान आहेत. त्यामुळं रामानंद संप्रदायाच्या सांधूंकडून इथली पूजा केली जाते. या मंदिराची रचना एखाद्या महालासारखी आहे. य मंदिराच्या प्रांगणात एक जलकुंड आहे. श्री रामरायानी इथं स्नान केलं होतं त्यामुळं हे जल औषधी आहे अशी मान्यता आहे. आम्ही इथं दर्शनासाठी आलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती त्यामुळं शांत वातावरणात अतिशय सुंदर असं श्रीरामरायाचं दर्शन घडलं. 

                   रघुनाथ मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढं मंदिराजवळच असलेला 'नक्की लेकबघायला गेलो. पण तापत्या उन्हामुळं तलावाजवळ पर्यटकांची वर्दळ तर नव्हतीच पण आजूबाजूची बरीचशी दुकानंही बंदच होती. त्यामुळं तिथं एक फेरी मारुन आम्ही पुढं निघालो. माउंट अबूमधल्या एका शक्तीपीठाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. पण तिथंही खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागणार होतं. त्यामुळं पायथ्याशी थोडं थांबून पुढं निघालो. इथून आम्ही वन्यजीव अभयारण्य बघायला गेलो. 

                   'वन्यजीव अभयारण्यआणि ' ट्रेव्हर्स टॅंक' - माउंट अबूमधलं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण. 'सिरोहीचे तत्कालीन महाराज 'महाराव केसरी सिंहजी बहादुरयांनी ही भूमी आपला ब्रिटिश इंजिनिअर मित्र ' ट्रेव्हर ' याला भेट दिली होती. त्याच ट्रेव्हर यांनी त्या भूमीत वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली आणि त्यातच एक विशाल जलाशय १८९७ साला मध्ये बांधला. त्यांच्या नावावरुनच या जलाशयाला 'ट्रेव्हर्स टॅंकहे नांव देण्यात आलं. हा जलाशय मगरींसाठी संरक्षित आहे. या अभयारण्यात बिबट्यास्लाॅथबियरजंगली अस्वलंचिंकाराकाळ्या रंगाचे कोल्हे असे विविध प्राणी पहायला मिळतात. तसंच अनेकविध पक्षी आणि वृक्ष वनस्पती बघायला मिळतात. इथं प्रवेशफी भरुन प्रवेश मिळतो. तसंच वेगळी प्रवेशफी भरुन आपली गाडी घेऊनही अभयारण्यात फिरता येतं. त्याप्रमाणं आम्ही आमच्या गाडीनंच अभयारण्यात फिरलो. आतमध्ये असलेल्या 'ट्रेव्हर्स टॅंकजवळ पोहोचलो. त्या जलाशयाजवळ आमच्याशिवाय कुणीही नव्हतं. साहजिकच आम्हाला तिथली असीम शांतता अनुभवायला मिळाली. त्या शांततेत मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट अगदी ऐकत रहावा असाच. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा एक सुंदर अनुभव. विस्तिर्ण जलाशय आणि त्यात असलेले रंगबिरंगी कोई मासे आणि त्या जलाशयात काठावरच्या वृक्षराजींचं पडलेलं सुंदर प्रतिबिंब अगदी मंत्रमुग्ध होऊन बघत होतो आम्ही. कितीही वेळ बघितलं तरी समाधान होतच नव्हतं. अखेर अभयारण्य बंद होण्याची वेळ होत आली आणि आम्ही तिथून परत आलो. 

                   यानंतर आम्ही परत 'नक्की झीलइथं गेलो. या नक्की तलावाच्या निर्मिती बद्दल काही आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार देवांनी आपला शत्रू बश्कली राक्षसापासून वाचण्यासाठी या तलावाची निर्मिती केली. तर दुसरी आणि सुरस अशी आख्यायिका सांगितली जाते. ५,००० वर्षांपूर्वी राजाने आपल्या राजकुमारीच्या विवाहासाठी अशी अट ठेवली होती की जो कुणी एका रात्रीत आपल्या नखांनी खोदून तलाव निर्माण करेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल. 'रसिया बालमयाने ही अट पूर्ण केली आणि तलावाची निर्मिती केली. म्हणून या तलावाला 'नक्की तलावहे नाव मिळालं. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सायंकाळ झाली होती आणि त्यामुळं पर्यटकांची गर्दी झाली होती. मग अगदी थोडावेळ तिथं थांबून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो.

                   पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १७ तारखेला सकाळी लवकरच आम्ही गुरुशिखराच्या दर्शनासाठी निघालो. 'गुरुशिखर' - 'राजस्थानमधल्या 'अरवलीपर्वतरांगेमधलं 'माउंट अबूहे सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण. इथून १५ किमी.अंतरावर 'सिरोहीगावात ५६५० फूट ऊंचावर असलेलं हे 'गुरुशिखर'. अशी मान्यता आहे की श्री दत्तात्रेयांनी आपलं पहिलं पाऊल इथं ठेवलं होतं आणि काही काळ इथं तपस्या केली होती. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरणस्पर्शानं पावन पवित्र असं हे स्थान सर्व दत्त भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पायथ्यापासून अगदी शिखरापर्यंत हिरवीगार वृक्षराजी इथं आहे. अतिशय उंचावर असल्यानंच राजस्थानमधल्या तप्त वातावरणातही हे एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. गुरु शिखराच्या पायथ्यापर्यंत वाहनानं जाता येतं. तिथून वरती शिखरावर ३०० पायऱ्या चढून जावं लागतं. आम्ही आमच्या गाडीने पायथ्याशी पोहोचलो. साधारण पन्नास एक पायऱ्या चढून गेलो आणि मंदिराच्या समोरच पोहोचलो. इथं श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर लक्षात आलं की हे मंदिर गुहेतच आहे. अतिशय भव्य अशा पाषाणातल्या या मंदिरात जाण्यासाठी कपारीतच १०-१२ पायऱ्या तयार केल्यात. त्या चढून गेल्यावर छोटासा गाभारा आणि त्यात विराजमान असलेली श्री दत्तात्रेयांची रेखीव मूर्ती. असं या मंदिराचं वेगळंच स्वरुप आहे. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि श्री दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झालो. मन अपार शांत झालं. श्री दत्तात्रेयांच्या मूर्ती बरोबरच तिथं भगवान महादेवही विराजमान आहेत. समोर नंदीही आहे. अतिशय शांत पवित्र अशा स्थानाचं दर्शन घडल्यानं मन अगदी प्रसन्न झालं. डाव्या बाजूला श्री दत्तात्रेय विराजमान आहेत आणि खाली उतरुन उजव्या बाजूला अखंड धुनी आहे. दोन्ही दर्शन घेऊन पुढे उरलेल्या अडिचशे पायऱ्या चढून प्रत्यक्ष गुरुशिखरावर पोहोचलो. इथं एका पाषाणातच लहानसं घुमटाकार मंदिर आहे. या मंदिरात श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुका आहेत. श्री दत्तात्रेयांची चांदीची मूर्ती आणि मूर्तीपुढे कुंकुम विलेपित चरणपादुका आहेत. मंदिर अगदी छोटंसं असल्यानं आतमध्ये जाता येत नाही दारातूनच दर्शन घ्यावं लागतं. प्रत्येक दत्तभक्तासाठी हे चरणपादुकांचं दर्शन अतिशय महत्त्वाचं असतं. आम्ही सकाळी लवकरच गेल्यानं तिथं फारसे भाविक नव्हते. त्यामुळं आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं. मी चरणपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि दत्तगुरुंनी सुंदर दर्शन घडवल्याच्या जाणीवेनं मन तृप्त झालं. माउंट अबूमधल्या गुरुशिखराच्या दर्शनाची आस कोजागिरी पौर्णिमेला स्वयं श्री दत्तगुरुंनी पूर्ण केली होती. या मंदिराच्या थोडं पुढे अत्रिऋशी आणि अनुसया माता यांची मंदिरं आहेत. पण तिथपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग सध्या चांगला नसल्याचं पंडितजीनी सांगितलं. त्यामुळं त्या मंदिरात न जाता शिखरावरुनच नमस्कार केला. मंदिराबाहेरचा परिसर मोठा आहे. इथं असलेल्या भव्य घंटेचा तीनदा नाद केल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. घुमटीबाहेर आम्ही नेहमीप्रमाणं थोडं गुरुचरित्राचं वाचन केलं. त्या शांत पावन पवित्र मंदिरातून परत निघावसंच वाटत नव्हतं. बराचवेळ तिथं थांबून अखेर परत निघालो.

                   गुरुशिखर दर्शन घेऊन आम्ही तिथून ७ किमी. अंतरावर असलेल्या एका 'पार्कमध्ये गेलो. 'ब्रमहकुमारी पीस पार्क' - गुरुशिखर आणि अचलगड या दोन पर्वतांच्या मध्ये वसलेलं हे पार्क ब्रम्हकुमारी मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर आहे. शहरी गजबजाटापासून दूर शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी याची निर्मिती केली आहे. इथं प्रवेश करताच एक राॅक गार्डन समोर येतं. इथं राज योग ध्यानाची माहिती लघु चित्रणाद्वारे तसंच ब्रम्हकुमारींद्वारे दिली जाते. आम्ही इथं गेलो आणि थोडी माहिती ऐकून पुढे निघालो. इथं बाबा अमरनाथ गुंफा आणि शिवलिंग तयार केलंय ते पाहून पुढं बागेत फिरायला गेलो. बागेत फिरायला छान पायवाट आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला उंच उंच वाढलेल्या जास्वंदीचं दाट कुंपण आहे. गुलाब वाटिकाही सुंदर आहे. शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. एका भागात मुलांसाठी खेळण्याची साधनं आहेत. अतिशय सुंदर स्वच्छ आणि रंगबिरंगी फुलांनी सजलेली ही बाग पहाण्यासारखीच आहे.

                   यानंतर आम्ही माउंट अबू मधला एक प्राचीन किल्ला बघायला गेलो. 'अचलगड किल्ला' - परमार वंशाच्या राजानी ९०० ई. मध्ये हा किल्ला बांधला. त्यानंतर १५ व्या शतकात मेवाडचे प्रसिद्ध राजा महाराणा कुंभा यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. मात्र आता किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार सोडल्यास आतमध्ये किल्ल्याचा कुठलाच भाग शिल्लक नाही. प्रवेशद्वार मात्र अजूनही सुस्थितीत आहे. इथूनच आत जाऊन दो किमी.वर साधारण ४०० पायऱ्या चढून 'चामुंडा मातामंदिर आहे. हे जवळपास ५,००० वर्षं पुरातन मंदिर आहे. इथून जवळच डोंगरात 'कालीमातेचही मंदिर आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तिथल्या स्थानिक लोकांच्या जीपने किंवा चालत जाता येतं. मात्र रस्ता खडी चढण आणि अरुंद आहे. आम्ही जीपने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेलो. किल्ल्याचं प्रवेशद्वार बघून पुढे चामुंडा माता मंदिरात ४०० पायऱ्या चढून दर्शनासाठी गेलो. इथही गर्दी नसल्यानं चामुंडा मातेचं खूप छान दर्शन झालं. दर्शन घेऊन पायऱ्या उतरुन प्रवेशद्वाराजवळ आलो आणि जीपने परत खाली आलो. 

                   किल्ल्याच्या पायथ्याशी जवळच असलेल्या अजून एका प्राचीन आणि अबूमधल्या अतिशय महत्त्वाच्या मंदिरात गेलो. 'अचलेश्वर महादेव मंदिर'- पौराणिक कथेनुसार माउंट अबूच्या सिरोही गावातील अचलगढ हे ऋषी वसिष्ठ यांचं तपस्थान. असं सांगतात कि त्या पौराणिक काळात अचलगड इथं मोठी ब्रह्मखाई होती. आणि ऋषी वसिष्ठ यांच्याकडची गाय या खाईत पडली. म्हणून ऋषींनी देवांना ही खाई बुजविण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा देवांच्या आज्ञेनुसार अर्बुद नावाच्या नागानं ती खाई बुजविण्यासाठी अख्खा पर्वत आपल्या पाठीवरून नेला. पण त्याला त्या गोष्टीचा गर्व झाला आणि त्यामुळं तो पर्वत हलू लागला. ऋषीगणांनी तो पर्वत स्थिर रहाण्यासाठी पुन्हा देवांना प्रार्थना केली. तेव्हा महादेवांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं तो पर्वत तोलून स्थिर केला. या मंदिरातही एक नैसर्गिक खड्डा आहे आणि त्यात महादेवांच्या पायाच्या अंगठ्याचा पाषाणाचा आकार आहे जो अंगठा महादेवांनी काशीमध्ये बसून पर्वताला लावला होता. आणि यावरुन या स्थानाला 'अचलगडहे नाव मिळालं. मंदिरात प्रवेश करण्याआधी प्रांगणात पंचधातूचा चार टन वजनाचा भव्य नंदी आहे. आम्हाला इथंही महादेवाचं खूप छान दर्शन झालं. 

                   इथून जवळच एक तलाव आहे. कथेनुसार हा शुध्द तुपाचा तलाव होता. त्यावेळी केल्या जाणाऱ्या यज्ञात या तलावातील तुपाची आहुती दिली जात असे. पण तीन राक्षस महिषी रुप धारण करुन रोज रात्री या तलावातील तुप प्राशन करत असत. जेव्हा राजा आदिपाल याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने एका रात्री एकाच बाणात त्या तिन्ही राक्षसांना मारलं. आता तो तलाव पाण्यानं भरलेला असून एका काठावर तीन महिषींच्या मूर्ती ठेवल्या आहेत. आम्ही हे सगळं बघून आम्ही हाॅटेलमध्ये परत गेलो. 

                   परत सायंकाळी अर्बुदा देवीच्या दर्शनासाठी निघालो. आदल्या दिवशी पायथ्याशी जाऊन परत आलो होतो. आता मात्र मंदिरात निघालो. मंदिरात पोहोचायला ४०० पायऱ्या चढून जावं लागतं. हे मातेचं शक्तीपीठ आहे. सतीचे अधर इथं पडल्यानं या मंदिराला 'अधरदेवीमंदिर असं म्हणतात. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात 'कात्यायनीदेवीची गुप्त पूजा केली जाते. कारण अधरदेवीला कात्यायनीचं शक्तीपीठ असंही म्हणतात. या मंदिराची कहाणी दोन बहिणींशी जोडलेली आहे. अधरदेवी देवीचं सहावं रुप कात्यायनी आणि अबूच्या पुढे गुजरातच्या सीमेजवळची अंबाजी माता हेही शक्तीपीठ आणि देवीचं आठवं रुप महागौरी म्हणून ही दोन्ही स्थानं एकमेकांशी संबंधित आहेत. इथही फारशी गर्दी नव्हती. देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. 

                   यानंतर आम्ही 'दिलवाडा जैन मंदिर' बघायला गेलो. हे मंदिर बघून या मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यानं जवळजवळ दोन किमी. आत चालत जाऊन अजून मंदिरं बघितली. इथं नक्की तलावाची निर्मिती करणाऱ्या रसिया बालम आणि राजकन्या सिध्देश्वरी यांची समोरासमोर मंदिरं आहेत. तसंच भगवान विष्णूंचं ५००० वर्षं प्राचीन लहानसं मंदिर आहे. आम्ही या मंदिरात पोहोचलो तेव्हा बाहेर हलका संधीप्रकाश होता आणि मंदिरात एक कमी उजेडाचा दिवा. यामुळं हे प्राचीन मंदिर पहाताना काही वेगळीच जाणीव होत होती. मंदिरात आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. इथं दर्शन घेऊनरसिया बालम चं दर्शन घेऊन सिध्देश्वरी मंदिरात गेलो. राजानं राजकन्येच्या विवाहासाठी एका रात्रीत नखांनी तलाव खोदायचा आणि सुर्योदयापूर्वी विवाहासाठी उपस्थित रहायचं अशी अट घातली होती ती पूर्ण करुन रसिया बालम राजाकडे येत असतानाच राणीला हा विवाह मान्य नसल्यानं तिनं विघ्न आणण्यासाठी कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला आणि सूर्योदय झाला अस समजून हा विवाह झालाच नाही. हे दोघं शिव पार्वती किंवा विष्णुचा अंश मानले जातात. त्यामुळं इथं विवाहेच्छुक युवक युवती आवर्जून दर्शनासाठी येतात. 

                   तिसऱ्या दिवशी १८ तारखेला सकाळी आम्ही हाॅटेल सोडून निघालो. तिथून दिड तासावर राजस्थान गुजरात सीमेवर असणाऱ्या अजून एका मोठ्या शक्तीपीठाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो : 'अंबाजी मातामंदिर - इथं सतीदेवीचं हृदय पडलं असं मानतात. त्यामुळं या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर श्रीयंत्र आहे. या देवीचं मूळपीठ स्थान गब्बर पर्वतावर आहे. या पर्वतावरील मंदिरात जाण्यासाठी एक हजार पायऱ्या चढून जावं लागतं. किंवा रोपवेनं जाता येतं. आम्ही रोपवेनंच या मंदिरात गेलो. इथं भाविकांची थोडी गर्दी होती पण तरीही शांतपणे खूप छान दर्शन झालं. इथं दर्शन घेऊन आम्ही अहमदाबादला निघालो. इथूनच आमची परतीची ट्रेन होती. 

                   माउंट अबूला गुरुशिखर दर्शनासाठी जायची इच्छा तर दत्तगुरुंनी पूर्ण केली होतीच पण त्याचबरोबर देवीच्या दोन शक्तीपीठांचंही दर्शन घडवलं होतं. आणि माउंट अबूमधल्या स्थलदर्शनाचाही आनंद मिळाला होता.

- स्नेहल मोडक



  

  

  

  


  


  


Tuesday, October 15, 2024

जय माता दी

                   नवरात्र सुरु झालं अन पहिले तीन दिवस छान पार पडले. नवरात्राच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी मात्र माझ्या सहचराच्या मनाची चलबिचल सुरु झाली. कारण काय तर चौथ्या दिवशी म्हणजे ६ तारखेला सकाळीच त्याच्या ऑफिसमधल्या सहकारी मित्रांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं. आणि आम्ही मात्र यावर्षी घरीच होतो. खरंतर खूप आधी वैष्णोदेवीच्या दर्शनला जाण्याबद्दल आमची चर्चा झाली होती. पण सारखं सारखं काय जायचं असं म्हणत लेकींनी आमचा बेत उधळून लावला होता. आम्हा दोघांनाही दर्शनाला जायची तीव्र इच्छा होती पण मुलींचं म्हणणंही पटत होतं त्यामुळं मी शांत होते. पण जसं त्याच्या सहकाऱ्यांनी दर्शन घेतल्याचं कळलं तसं याला चैन पडेना. 'आपल्याला माता दर्शनाला बोलवतेय तर तूच ठरव काय करायचं ते' असं मला म्हणाला. मग माझंही मन दर्शनासाठी आसुसलं. अखेर ६ तारखेला रात्री तिघांचीही विमानाची तिकिटं काढलीच. 

            ‌ ‌       ८ तारखेला भल्या पहाटेचं विमान होतं. ७ तारखेला पूर्वनियोजित असलेलं एक काम करुन आम्ही रात्री प्रवासाला सुरुवात केली. आम्ही अक्षरशः ऐनवेळी वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं. त्यामुळं प्रवासाची तयारी आणि पुढली सगळी व्यवस्था खूप गडबडीत करावी लागली. अर्थात हे सगळं आमच्यासाठी सवयीचं असल्यानं कसलीही अडचण आली नाही. 

                      ८ तारखेला सकाळीच जम्मू विमानतळावर उतरलो. आमची गाडी तिथे आधीच येऊन थांबली होती. आम्ही त्या गाडीने लगेच पुढील प्रवासाला निघालो. त्यादिवशी आम्ही 'पहलगाम' ला जाणार होतो. ४-५ तासांचा प्रवास होता. आधी वाटेत वैष्णो ढाब्यावर नाश्ता केला आणि पुढे निघालो. सारा प्रवासमार्ग अतिशय रमणीय आहे. एका बाजूला उंच पर्वतराजी आणि त्यांच्या पायथ्याशी डौलदार वळणं घेत वाहणारी कधी चिनाब नदी, कधी झेलम नदी तर कधी लिद्दर नदी आणि यातूनच जाणारा रस्ता. ७,२०० फूट उंचीवर असलेलं 'अनंतनाग' जिल्ह्यातील 'पहलगाम' हे अगदी नितांतसुंदर असं शहर. लिद्दर नदी पहलगाम मधली प्रमुख नदी. ७३ किमी. लांबीची ही नदी ४,६५३ मीटर उंचीवरच्या कोलाहोई ग्लेशियर मधून उगम पावते. 'पुहेअल' या शब्दाचा काश्मीरी भाषेत ला अर्थ 'चरवाहा' असा आहे . 'चरवाहोंका गाम' म्हणून पहलगाम हे नाव पडलं. ग्रीष्म ऋतूत पशूंना चरण्यासाठी हे उत्तम स्थान आहे. 

                    आमचा बनिहाल पर्यंतचा प्रवास वेळेत आणि छान झाला. बनिहाल सोडलं आणि पुढे सगळी गडबड झाली. जम्मू कश्मीर च्या निवडणुकीचा निकाल ८ तारखेलाच होता. आणि आम्ही अगदी ऐनवेळी आमचा बेत ठरवल्यानं आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही बनिहाल ला पोहोचेपर्यंत निकाल यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे जिंकलेल्या उमेदवारांच्या मिरवणुका ठिकठिकाणी सुरु झाल्या. आणि प्रचंड वाहनकोंडी सुरु झाली. शांतपणेच त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कसबसं अखेर अपेक्षित वेळेपेक्षा खूप उशीरा आम्ही पहलगाम ला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. 

                         पहलगामला रुमवर पोहोचून थोडं ताजंतवानं होऊन फिरायला निघालो. सायंकाळ झाल्यानं फार फिरणं शक्य नव्हतं. म्हणून सर्वात तिथल्या मंदिरात आणि मग मार्केटमध्ये फिरायचं ठरवलं. 

                         ममलेश्वर मंदिर - पहलगाम मधलं हे अतिशय पुरातन मंदिर. 'पार्वती मातेनं' इथं स्नान करण्यापूर्वी आपला पुत्र 'गणेश' याला द्वारपाल म्हणून उभं केलं आणि आपल्या अनुमतीविना कुणासही प्रवेश न देण्यास सांगितलं. मात्र 'भगवान शिवांनाही' पुत्र गणेशाने अडवलं तेव्हा त्यांनी संतप्त होऊन गणेशाचा शिरच्छेद केला. आणि नंतर पार्वतीमातेनं पुत्रास जिवंत करण्यास सांगितलं असता गजराजाचं शिर गणेशाच्या देहास लावून पुत्र जिवीत केला. ही घटना जिथे घडली तेच हे स्थान. 'मम माल' याचा अर्थ 'जाऊ नको' यावरुनच या स्थानाला ममलेश्वर हे नाव प्राप्त झालं. इथं भगवान शिवाचं मंदिर आहे. मंदिरात शिव पिंडी आणि द्विमुखी नंदी विराजित आहेत. ४ थ्या शतकात बांधलेल्या या मंदिराची १२ व्या शतकात राजा जयसिंह यांनी पुनर्निर्मिती केली आणि भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं. अतिशय प्राचीन आणि सुंदर असं हे छोटंसं मंदिर त्यासमोर असलेली पुष्करणी आणि आजूबाजूला केलेला बगीचा सारंच नयनरम्य. भाविकांची बिलकुल गर्दी नसल्यानं अतिशय शांत प्रसन्न वातावरण. आम्ही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. थोडावेळ थांबून पुढं निघालो.

                  मंदिरातून बाहेर येऊन जवळच असलेल्या मार्केट मध्ये गेलो. इथं काही दुकानं फिरलो पण फारशी खरेदी केली नाही थोडीशी लहानसहान खरेदी करुन तिथल्याच वैष्णो हाॅटेलमध्ये जेवून परत रुमवर आलो. तिथल्या व्यवस्थापकाशी दुसऱ्या दिवशी आम्हाला करायच्या स्थलदर्शनाबद्दल‌ माहिती घेतली आणि रुममध्ये येऊन निद्राधीन झालो. 

                    ९ तारखेला सकाळी लवकरच आम्ही पहलगाम मधलं स्थलदर्शन करायला निघालो. पहलगामला स्थलदर्शनासाठी आपल्या वाहनानं फिरायला परवानगी नाही. तिथल्या स्थानिक लोकांच्या वाहनांनीच फिरावं लागतं. त्यानुसार आम्ही गाडी ठरवली आणि स्थलदर्शन करायला निघालो. सर्वात आधी आम्ही पहलगाम पासून १६ किमी अंतरावर असलेलं एक ठिकाण बघायला गेलो. एका बाजूला घनदाट देवदार वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला लिद्दर नदी असा हा सुंदर घाटरस्ता जुन्या पहलगाम शहरातून या ठिकाणी जातो. 'चंदनवारी' - पहलगाम मधलं हे अतिशय शांत, पवित्र आणि महत्त्वाचं स्थान. इथून अमरनाथ यात्रा सुरु होते. त्यामुळे इथं जुलै ऑगस्ट महिन्यात भाविकांची सतत प्रचंड गर्दी असते. इथूनच अमरनाथ यात्रेच्या पायऱ्या सुरु होतात. पायऱ्यांच्या बाजूने लिद्दर नदी यात्रेकरुंना साथ देते. या यात्रेव्यतिरिक्तच्या काळात हे अतिशय शांत स्थान. पहलगामला आधीच खूप थंडी होती. त्यात आम्ही इथं आल्यावर थंडीचा कडाका वाढला. गाडीतून उतरल्यावर लगेच त्याचं कारणही कळलं. चंदनवारीला आदल्या रात्रीच बर्फवृष्टी झाली होती. समोर डोंगरावर ताजं शुभ्र बर्फ दिसत होतं. अतिशय सुंदर दृश्य होतं. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा आमच्या व्यतिरिक्त इथं कुणीच नव्हतं. इथली दुकानही उघडली नव्हती . त्या शांत वातावरणात नदीच्या संथ जळाचा अनाहत नाद स्पष्ट ऐकू येत होता. शुभ्र जल छान चमकत होतं. माझं मन त्या शांततेशी एकरुप झालं आणि एक वेगळीच अनुभूती आली. तिथल्या पहिल्या पायरीला स्पर्श करुन 'श्री बाबा अमरनाथ' ना नमस्कार केला, काही पायऱ्या चढून गेलो. आणि मग तिथली शांतता अनुभवून परत निघालो.

                    चंदनवारी बघून आम्ही पोहोचलो एका अप्रतिम, नयनरम्य अशा खोऱ्यात. 'बेताब व्हॅली' - लिद्दर नदीपासून जवळपास ८,००० फूट उंचावरलं हे खोरं पहाणं म्हणजे एक अप्रतिम अनुभव. आम्ही इथं पोहोचलो आणि तिथं असलेल्या ढाब्यावर नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता करुन फिरायला गेलो. घनदाट अशी जर्दाळू आणि देवदारची वृक्षराजी, मखमली हिरवळ आणि त्यातून जाणाऱ्या वळणवाटा अगदी नेत्रसुखद असं दृश्य. व्हॅलीमधून वाहणारी नदी दोन प्रवाहात विभागते आणि परत एकत्र होते. त्या मधलं बेट अतिशय नितळ आहे. इथं सर्वत्र घोड्यावरुन फिरता येतं. बेटातल्या पाण्यातूनही  घोडे आपल्याला फिरवतात. खूप मोठी अशी ही व्हॅली पहाण्याचा हा अनुभव छानच. थंडीच्या दिवसांत इथं भरपूर बर्फ पडतं. त्यावेळी या खोऱ्याचं सौंदर्य अजूनच वाढतं. इथला बर्फ अनुभवण्यासाठी, त्यात खेळण्यासाठी डिसेंबर जानेवारी हे महिने उत्तम आहेत. या व्हॉलीचं मूळ नांव 'हजन/ हगन व्हॅली' असं होतं. 'सनी देओल' आणि 'अमृता सिंग' यांच्या प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट 'बेताब' याचं चित्रिकरण इथं झालं आणि तो चित्रपट खूप गाजला म्हणून या व्हॅलीचं नाव ' बेताब व्हॅली ' करण्यात आलं. 

                      बेताब व्हॅली बघून आम्ही तिथून १८ किमी.वर असलेलं दुसरं एक प्रसिद्ध खोरं बघायला गेलो. 'अरु व्हॅली' - पहलगाम मधलं पर्यटकांना आकर्षित करणारं एक प्रसिद्ध खोरं. 'कोलाहोई ग्लेशियर' आणि 'तारसर तलाव' इथं चढाई करण्यासाठीचा अरु व्हॅली हा प्रारंभबिंदू आहे. हे संपूर्ण खोरं दाट हिरवळ, तलाव आणि पर्वतानी नटलंय. अतिशय सुंदर, शांत अशी ही व्हॅली वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र आहे. इथं तपकिरी रंगाचे कोल्हे, काळ्या रंगाचे कोल्हे, हरणं, बिबट्या अशा प्राण्यांचं वास्तव्य आहे. इथंही खूप बर्फ पडतो आणि त्यानंतर इथं बर्फातले खेळ खेळण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. या व्हॅलीतून वाहणारी छोटी अरु नदी लिडर नदीला मिळते. या नदीचं नितळ निळं जल पहातच रहावं असं. अतिशय मंत्रमुग्ध करणारी ही व्हॅली, इथं कितीही वेळ थांबलं तरी समाधान होणं अशक्यच. पण आम्हाला वेळेचं बंधन असल्यानं अखेर तिथून निघावच लागलं. तिथून परत आम्ही आमच्या हाॅटेलजवळ आलो.  स्थलदर्शनासाठी ज्या गाडीने फिरलो ती गाडी सोडून परत आमच्या गाडीने परत प्रवास सुरु केला. आता आम्हाला 'कटरा' ला पोहोचायचं होतं. 

                          आमचा प्रवास परत एकदा घाटरस्त्याने, नदीकाठाने सारं निसर्ग सौंदर्य बघत सुरु झाला.  प्रवास सुरु केला आणि साधारण तासाभरात आम्ही एक apple valley नावाची बाग बघायला गेलो. सफरचंदाची खूप मोठी बाग होती इथं. सध्या सफरचंदांचा मोसम सुरु असल्यानं सगळी झाडं सफरचंदानी जणू ओथंबली होती. खूप सारी  रसरशीत मोठमोठी सफरचंद लगडलेली पाहून आपल्याकडच्या हापूस आंब्यानी लगडलेल्या झाडांची आठवण आली. इथं बागेत फिरुन, सफरचंदाचा रस पिऊन, सफरचंद खरेदी करुन निघालो. 

पहलगाम ते कटरा हा प्रवासही खरंतर अवघ्या ४-५ तासांचा होता. पण प्रत्यक्षात मात्र पोहोचायला दुप्पट वेळ लागला. यावेळीही प्रचंड वाहनकोंडीमध्ये आम्ही अडकलो होतो. पण या वाहनकोंडीचं कारण मात्र वेगळंच होतं. शेळ्या मेंढ्यांमुळे ठिकठिकाणी ही वाहनकोंडी होत होती. उन्हाळ्यात जम्मूच्या आसपासच्या गावातून या शेळ्या मेंढ्यांना घेऊन राखणदार काश्मीर मध्ये जातात. काश्मीर मध्ये तेव्हा त्यांना चरण्यासाठी हिरवा चारा विपुल प्रमाणात उपलब्ध होतो. जेव्हा काश्मीर मध्ये बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा ते राखणदार आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन परत आपापल्या गावी जातात. असे हे कळपच्या कळप परत निघाले होते आणि साहजिकच त्यामुळे वाहनकोंडी होत होती. एकेका कळपात ४००-५०० ते अगदी २-३ हजार इतक्या शेळ्या मेंढ्या होत्या. याचमुळे आम्हाला 'कटरा' ला पोहोचायला रात्रीचे १० वाजून गेले. उशीर झाल्यानं RFID CARD मिळणारे काऊंटर बंद झाले होते. त्यामुळे आम्हाला हाॅटेलच्या रुमवरच जावं लागलं. रुममध्ये पोहोचून जेवून आम्ही निद्राधीन झालो. 

                      १० तारखेला पहाटे सारी आन्हिकं आवरुन आम्ही RFID CARD घ्यायला गेलो. १०-१५ मीनीटांतच कार्ड मिळालं आणि आम्ही वैष्णोदेवीच्या पायथ्याशी जिथून चढाईला सुरुवात होते तिथे गेलो. खरंतर दर्शनासाठी रात्री चालत जाऊन चालत यायचं अशी आमची इच्छा होती. पण आदल्या दिवशी 'कटरा' ला पोहोचायला खूप उशीर झाला होता. त्यामुळं चालत जाऊन येणं शक्य नव्हतं. मग दर्शनाला जाताना कटरा ते भवन पर्यंत घोड्यावरुन जायचं आणि परत येताना पूर्ण चालत यायचं असं ठरवलं. त्यानुसार आम्ही तिघंही घोड्यावरुन निघालो. 'अर्धकुमारी माता' मंदिराच्या थोडं पुढे घोड्यांना विश्रांती आणि खायला देऊन पुढे निघालो. साधारण पावणेदोन तासातच आम्ही भवनच्या जवळ पोहोचलो. तिथून घोड्यावरुन उतरुन चालायला सुरुवात केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अतिशय नयनरम्य अशी खऱ्या फुलांची सजावट केली होती. आम्ही इथं पोहोचलो आणि डोळे भरुन अप्रतिम पुष्प सजावट पहात, कलेला आणि कलाकारांना मनोमन दाद देत पुढे निघालो. तिथल्या लाॅकरमध्ये सामान, शूज, मोबाईल सारं ठेवून दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. दिड तासातच आम्ही प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेच्या समोर पोहोचलो. डोळे भरुन दर्शन घेत नतमस्तक झालो आणि मन शांत तृप्त झालं. अलोट गर्दीमुळं तिथं प्रत्येकाला क्षणभरातच बाजूला करतात. पण तो एक क्षणही प्रत्येक भक्तासाठी अतिशय भाग्याचा असतो. किती दुरुन, कष्ट सोसून भाविक दर्शनासाठी येतात पण मातेसमोर काही क्षणही उभं राहू देत नाहीत. पण तरीही असंख्य भाविक दर्शनासाठी येतातच. आणि मातेच्या त्या क्षणभराच्या  दर्शनानं सारे कष्ट विसरुन तृप्त होतात. अगदी तसंच आम्हीही प्रसन्न मनानं बाहेर आलो. 

                   वैष्णोदेवी मातेच्या दर्शनानंतर 'भैरोबाबाचं' दर्शन घेण्यासाठी निघालो. इथं घोड्यावरुन,चालत किंवा रोपवेनं जाता येतं. आम्ही रोपवेचं तिकीट आधीच काढलं असल्यानं लगेच तिथं रांगेत उभं राहिलो. तासाभरानं आम्हाला रोपवेनं जायला मिळालं. मंदिरात पोहोचून रांगेतून 'भैरवनाथाचं' दर्शन घेतलं आणि रोपवेनंच परत आलो. वैष्णोदेवी देवीच्या दर्शनमार्गावर ठिकठिकाणी खानपान व्यवस्था आहे. तिथल्याच एका Nescafe च्या स्टाॅलवर पोटपूजा केली. आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. आरामात चालत, मधेमधे क्षणभर विश्रांती घेत आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आणि तिथून लगेच हाॅटेलच्या रुमवर गेलो. दमलो होतो पण अगदी ऐनवेळी ठरवूनही केवळ मातेच्या कृपेनं अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं त्यामुळं खूप समाधान वाटलं. 

                        ११ तारखेला सकाळीच आम्ही हाॅटेल सोडून निघालो. सर्वात आधी आम्ही देवीच्या शक्तीपीठाचं दर्शन घ्यायला गेलो. जम्मू पासून साधारण ५० किमी. अंतरावर हे शक्तीपीठ आहे. आर्मीच्या अखत्यारीत असलेलं हे 'नाभा माता मंदिर'. अतिशय रमणीय शांत असं हे मंदिर. इथं सतीदेवीच्या कलेवराचा नाभीचा भाग पडला होता. त्यामुळं हे 'नाभा माता मंदिर' म्हणून ओळखलं जातं. छोट्या गुंफेत हे स्थान आहे. इथं मंदिरात बाराही महिने नैसर्गिक जलधारा पडत असतात. हे जल अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे भाविक हे जल आवर्जून घरी नेतात. याचं गुंफेत भगवान शिवही विराजमान आहेत. गतवर्षीही आम्ही इथं दर्शनाला गेलो होतो. यावेळीही अतिशय सुंदर असं मातेचं दर्शन घडलं. दर्शन घेऊन बाहेर आलो तीर्थ प्रसाद घेतला आणि तिथल्या पंडितजीनी मला परत बोलवलं. कुणा भाविकानं मातेला अर्पण केलेला शृंगार मला आणि लेकीला प्रसाद म्हणून दिला. बांगड्या, कुंकू, काजळ, मेहंदी असा सारा शृंगार मला प्रसाद रुपात मिळाला आणि डोळ्यात पाणी आलंच. आमची सेवा मातेच्या चरणी रुजू झाल्याची जाणीव झाली आणि मन असीम तृप्त झालं. 

                यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात पोहोचलो. जम्मू पासून १४ किमी. अंतरावर असलेलं हे 'कौल कंडोली' माता मंदिर. भगवान श्री रामरायांच्या आज्ञेनुसार माता वैष्णोदेवी ५ वर्षीय कन्येचं रुप धारण करुन त्रिकुटा पर्वतावर निघाली. बराच प्रवास केल्यावर 'नगरोटा' या गावात या स्थानी माता विश्रांतीसाठी थांबली. तिला हे स्थान आवडलं आणि तिनं तिथंच १२ वर्षं तपस्या केली.  त्यानंतर ती त्रिकुटा पर्वतावर गेली. तेव्हापासून या मंदिरात मातेचं पहिलं दर्शन घेऊन मग त्रिकुट पर्वतावर जाऊन तिथलं दर्शन घेण्याची प्रथा आहे. इथे मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

         ‌         इथून पुढे आम्ही नवीनच बांधलेल्या एका बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे. इथं व्यंकटेशाची भव्य मूर्ती स्थापित केली आहे. आजुबाजुला इतरही मंदिर आहेत. 

                   जम्मू मधलं एक प्रमुख मंदिर रघुनाथ मंदिर. इथं श्री रामरायाचं मुख्य मंदिर असून सभोवती अनेक मंदिरं असलेलं हे मंदिर संकुल आहे. इथं श्री रामरायाचं दर्शन घेतलं. तिथून निघून जम्मूचं मार्केट फिरुन खरेदी केली. आणि जम्मू विमानतळावर निघालो. सायंकाळच्या विमानानं परतीचा प्रवास केला. 

                 दर्शनाची तीव्र इच्छा असतानाही दर्शन होणार नाही अशी आपण आपल्या मनाची तयारी केली असेल तरीही जर आपली पूर्ण श्रद्धा असेल तर देवी माताही आपल्या भक्तांना दर्शन घडवतेच. आणि अशा अनपेक्षितपणे घडलेल्या दर्शनाचा आनंद काही वेगळाच असतो. आम्हाला आलेला हा दुसरा अनुभव. सारं काही श्री दत्तात्रेयांच्या इच्छेनं आणि कृपेनंच घडतं हेच खरं. अचानकच आपल्याला त्या स्थानी जायची बुध्दी होते आणि आपल्या दैवताचं सुंदर दर्शन घडतंच.

||  जय माता दी  ||

- स्नेहल मोडक

  


  

  

  

Tuesday, October 1, 2024

भटकंती

               २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. या दिवसाचं औचित्य साधून ऐनवेळी एक दिवसीय भ्रमंती करायचं ठरवलं. पण त्यादिवशी सुट्टी नसल्यानं दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. 

            जवळच आहे कधीही जाता येईल या एकाच कारणामुळं जायचं राहिलेल्या ' जव्हार' ला सकाळी लवकरच निघालो. 

              प्रवासाला सुरुवात केल्यावर काही वेळ प्रवास व्यवस्थित झाला. आणि मग मात्र रस्त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. रस्त्याची इतकी दुर्दशा झाली होती की मोठमोठ्या खड्ड्यातून रस्ता अक्षरशः शोधावा लागत होता. साहजिकच त्यामुळे पुढं प्रचंड वाहनकोंडी झाली होती. या साऱ्यातून मार्ग काढत आमचा प्रवास सुरु होता. आम्ही केवळ फिरण्यासाठीच निघालो होतो आणि दोन्ही लेकीही एकत्र बरोबर होत्या त्यामुळं हे सगळं आम्ही सहजतेनं घेत होतो. 

                खराब रस्ते आणि वाहनकोंडीमुळं आम्हाला वाटेत कुठंच नाश्ता करायला मिळाला नाही. बरोबर नेलेल्या कोरड्या खाऊवरच समाधान मानावं लागलं. अखेर नेहमीच्या वेळेपेक्षा दुप्पट वेळाने आम्ही जव्हार ला पोहोचलो. आमच्या ओळखीच्या एका घरीच आधी आम्ही पोहोचलो. तिथंच आम्ही जेवणाची व्यवस्था केली होती. बरीच वर्षं त्यांचं तिथं मोठं पण घरगुती भोजनालयच होतं. आता नुकतंच त्यांनी हे प्रमाण कमी करुन अगदी थोड्या प्रमाणात सुरु ठेवलंय. आम्ही प्रवासात असताना त्यांच्या संपर्कात होतोच. त्यामुळं त्या काकू आमची वाटच पहात होत्या. 

              आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो, ताजतवानं झालो आणि  फार वेळ न दवडता त्यांनी आम्हाला जेवायलाच वाढलं. आम्हाला वाटेत नाश्ता मिळाला नसल्याचं त्याना कळलंच होतं. अतिशय सुग्रास आणि वाफाळतं भोजन समोर आलं आणि सकाळपासून धगधगत असलेल्या यज्ञकुंडात सुग्रास भोजनाची आहुती दिली आणि जठराग्नी तृप्त झाला. आम्हीच आधी सांगितल्याप्रमाणं त्यांनी साधाच पण अत्यंत चवदार आणि वाफाळता स्वयंपाक केला होता. आमचं जेवण झाल्यावर मग गप्पा सुरु झाल्या. घरगुती असलं तरीही त्यांचं भोजनालय अतिशय प्रसिद्ध आहे. बऱ्याच मोठमोठ्या व्यक्ती त्यांच्याकडे आवर्जून जेवायला येत असतात. थोडावेळ गप्पा मारुन कुठे कसं फिरावं याची माहिती घेऊन फिरायला निघालो.

                 सर्वात आधी आम्ही निघालो जव्हारचा अतिशय प्रसिद्ध असा धबधबा बघायला. इथे जाताना जव्हारचा खरा निसर्ग अनुभवायला मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर अशी हिरवाई पसरलीय. ही हिरवाई पहातच आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचलो. दुरुनही धबधब्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही तिथं पोहोचलो आणि भान हरपून पहातच राहिलो. 

                  ' दाभोसा धबधबा ' जव्हारचं एक प्रमुख आकर्षण.  उंच उंच हिरव्यागार डोगरांमधून खळाळत वाहणारा लेंढी नदीचा जलप्रपात रोरावत दरीत कोसळतो आणि एक अनाहत ध्वनी निर्माण होतो. ३०० फुट उंचावरुन कोसळणारा हा शुभ्र फेसाळ प्रपात आणि त्याचे ५०-६० फुटांपर्यंत उंच उडणारे शुभ्र तुषार म्हणजे जणू नजरबंदीच. अप्रतिम असं हे दृश्य नजरेत आणि छायाचित्रात साठवत आम्ही थांबलो होतो. सगळ्या बाजूंनी दाट हिरवंगार जंगल आणि मध्ये कोसळणारा जलप्रपात, निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार कितीही पाहिलं तरी समाधान होत नव्हतं. पण पुढंही फिरायचं असल्यानं आम्ही तिथून निघालो.

                      धबधबा पहायला जाताना मार्गातलं एक स्थान पाहून ठेवलं होतं. धबधबा बघून परतताना तिथं थांबलो. अगदी ' मिनी स्वित्झर्लंड ' म्हणावं इतका नितांतसुंदर असा तो भाग होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत मखमली हिरवळ आणि त्यापुढे दाट हिरवीगार वृक्षसंपदा. आम्हाला त्या मऊ लुसलुशीत हिरवळीवर खरंतरं बसावंसं वाटत होतं पण पावसाची भुरभुर सुरु असल्यानं माती खूप ओली होती. आम्ही जिथं उभे होतो तिथून दूरवर त्या हिरव्या रानात चरणारी काही गायीगुरं आणि त्यांच्या बरोबर असलेले दोन गुराखी दिसत होते. फिक्या आणि गडद रंगछटा ल्यायलेलं हिरवं रान, दूरवर असलेली वृक्षराजी, त्या रानात चरणारी गुरं, गुराखी, आकाशात दाटलेले कृष्णमेघ, पावसाची हलकी भुरभूर आणि तरीही साऱ्या आसमंतात भरुन राहिलेली असीम शांतता. निसर्गाचं एक शांत पण तितकंच प्रसन्न रुप. अतिशय रमणीय असं निसर्गानंच रेखलेलं एक सुंदर चित्र. अगदी निसर्गाच्या कुशीत शिरण्याची तृप्त अनुभूती. तिथून परत निघायला पाऊलच उचलवत नव्हतं. 

                       तिथून पुढे निघून आम्ही एका धरणावर पोहोचलो. ' जय सागर ' धरण हे १९६१ साली बांधून पूर्ण झालं. जव्हार संस्थानचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे यांनी जव्हार मधील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण बांधायचं स्वप्न पाहिलं होतं. १९४८ साली जेव्हा हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन झालं त्यानंतर महाराष्ट्र शासनानं हे धरण बांधलं आणि १९६१ साली श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं. जव्हार ला लागूनच असलेल्या ' झरिपा ' नावाच्या अनेक जिवंत झरे असलेल्या जलाशयावर हे धरण बांधलंय. या धरणावर जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत. खाली उतरुन पुढे धरणाच्या भिंतीवरुन पलिकडेही जाता येतं. धरणाची भिंत रुंद आणि कठडा असलेली आहे. भिंतीच्या एका बाजूला विस्तिर्ण जलाशय आणि दुसऱ्या बाजूला पायऱ्या आहेत. पाणी कमी असतांना त्या पायऱ्यांवर जाऊन धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेता येतो. इथलं दृश्यही अप्रतिम आहे. विस्तिर्ण जलाशय, किनारी असलेली दाट हिरवी झाडी, नितळ जळात दिसणारं नभमेघांचं आणि वृक्षांचं प्रतिबिंब आणि जोडीला असणारी नीरव शांतता. हे ठिकाणही सुंदरच होतं. 

                   इथून पुढे आम्ही ' शिरपामाळ ' बघायला गेलो. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करण्यास गेले होते तेव्हा १६६४ साली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन महाराज तेव्हाचे जव्हार संस्थानचे राजे विक्रमशहा यांना भेटावयास आले होते. तेव्हा या माळरानावर मोठा शामियाना उभारण्यात आला होता. तेव्हा राजे पहिले विक्रमादित्य यांनी शिवरायांना मानाचा शिरपेच देऊन यथोचित सन्मान केला होता. या घटनेची आठवण म्हणून इथं एक चौथरा बांधलाय. त्यावर एका उंच स्तंभावर भगवा झेंडा फडकतोय. आम्ही इथं गेलो तेव्हा एक मोठा ग्रुप तिथं आधीच आलेला होता. तिथल्या शांत पवित्र वातावरणात त्यांचा दंगा सुरु होता. काहीजणं तर तिथं खो-खो खेळत होते. मग आम्ही फारवेळ तिथं न थांबता पुढे निघालो. 

                   इथूनच पुढे आम्ही किल्ला बघायला गेलो. पण इथं मात्र निराशाच झाली. किल्ल्याच्या तटबंदी व्यतिरिक्त इथं बघण्यासारखं काहीच शिल्लक नाही. 

                    यानंतर खरंतर ' जय विलास राजवाडा ' बघायला जायचं होतं. पण आम्ही ज्यांच्या घरी जेवायला गेलो होतो त्यांनीच राजवाडा आज बघायला मिळणार नाही असं सांगितलं होतं. जेव्हा संस्थानच्या राजांचे सध्याचे वंशज राजवाड्यात येतात तेव्हा पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. ही खाजगी मालमत्ता असल्यानं ते तिथे असताना राजवाडा पहाता येत नाही. त्या राजवाड्यात काकूंच्या घरुनच जेवणाचा डबा जात असल्यानं त्यांनी आधीच आम्हाला कल्पना दिली होती. माझी थोडी निराशा झाली होती पण नाईलाज होता. 

                    एव्हाना सायंकाळ होत आल्यानं आम्ही इतरत्र कुठं न जाता परत फिरायचं ठरवलं. सकाळी येतानाच्या अनुभवावरुन परतीचा प्रवास दुसऱ्या मार्गानं करायचं ठरवलं. पण तिथंही अक्षरशः तशीच परिस्थिती होती. अत्यंत खराब रस्ता आणि वाहनकोंडीमुळं पून्हा घरी पोहोचायलाही दुप्पट वेळच लागला. 

                    जव्हार संस्थान इसवी सन १३१६ पासून १९४८ पर्यंत अस्तित्वात होतं. त्यानंतर ते मुंबई इलाख्यात विलिन झालं. आताच्या पालघर जिल्ह्यातला हा जव्हार तालुका. इथल्या बहुतांश भागात आदिवासी वस्ती आहे. तसंच या तालुक्याचा बराचसा भूभाग डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांनी व्यापलाय. ठाणे शहरापासून १०० किमी. वर असलेलं जव्हार ठाणे जिल्ह्याचं  ' महाबळेश्वर ' म्हणूनही ओळखलं जातं. इथं प्रामुख्यानं नागली, भात आणि वरई ही पिकं घेतली जातात. पूरक म्हणून इतरही पिकं आणि फुलं, भाज्या पिकवतात. इथला मोगरा दररोज मुंबईच्या मंडईत पाठवला जातो.  इथल्या आदिवासींची वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. जय विलास राजवाडा, दाभोसा धबधबा, हनुमान पाॅईंट, जय सागर धरण, शिरपामाळ, भूपतगड किल्ला, बाणगंगा महादेव मंदिर इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळांनी नटलेला  नितातसुंदर जव्हार पहाण्यासारखाच आहे. इथला निसर्ग एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

                       गणेश चतुर्थीला कोकणातल्या घरी जाणं आणि त्यानंतर लगेचच वर्षासहलीच्या निमित्तानं कणकवलीला सावडावच्या धबधब्यावर मनसोक्त भिजणं झालं होतं तरीही पुन्हा निसर्गात रममाण व्हायला आमची पावलं जव्हारकडे वळली होती. आणि पुन्हा एकदा निसर्गाकडून खूप सारी उर्जा आम्ही घेऊन आलो.

- स्नेहल मोडक




 




कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...