या कोजागिरी पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं नव्हतं. पण पौर्णिमा जवळ आली
आणि माझं मन श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आसुसलं. पण यावेळी गिरनारला न जाता दुसऱ्या गुरुशिखराचं दर्शन घडावं अशी
इच्छा होती. त्यानुसार माउंट अबूमधल्या
गुरुशिखराचं दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. पण कोजागिरी जेमतेम १०-१२ दिवसांवर आली
होती. त्यामुळे रेल्वेचं थेट माउंट अबूचं तिकीट मिळत नव्हतं. विमानानं जायचं तर उदयपूर ला जावं लागणार होतं.
तिथून गाडीची व्यवस्था करावी लागणार होती. मग त्यातून मार्ग काढत अहमदाबाद पर्यंत
रेल्वेने जायचं आणि तिथून पुढं गाडीनं फिरायचं ठरवलं आणि तशी तिकीटं काढली.
ठरल्याप्रमाणं रात्रीच्या ट्रेनने आम्ही लेकीसह अहमदाबादला निघालो. सकाळी
लवकर अहमदाबादला पोहोचलो. तिथं गाडी आधीच तयार होती. त्या गाडीने लगेच पुढल्या
प्रवासाला सुरुवात केली. एवढ्या लवकर मार्गात कुठेच चहा नाश्त्यासाठी हाॅटेल किंवा
ढाबे सुरु नसल्यानं उशिराच चहा नाश्ता मिळाला. तो करुन माउंट अबूमधल्या हाॅटेलच्या रुमवर पोहोचलो. थोडं
आरामात आन्हिकं आवरली, जेवण केलं आणि माउंट अबू फिरायला निघालो.
सर्वात आधी आम्ही इथल्या अतिशय प्राचीन अशा मंदिरात दर्शनासाठी गेलो. ' सर्वेश्वर रघुनाथ मंदिर' माउंट अबूमधलं ५५०० वर्षं प्राचीन
मंदिर. या मंदिरात एकट्या श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. तसंच श्री रामराय
इथं तपस्व्याच्या वेषात विराजमान आहेत. त्यामुळं रामानंद संप्रदायाच्या सांधूंकडून
इथली पूजा केली जाते. या मंदिराची रचना एखाद्या महालासारखी आहे. य मंदिराच्या
प्रांगणात एक जलकुंड आहे. श्री रामरायानी इथं स्नान केलं होतं त्यामुळं हे जल औषधी
आहे अशी मान्यता आहे. आम्ही इथं दर्शनासाठी आलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती
त्यामुळं शांत वातावरणात अतिशय सुंदर असं श्रीरामरायाचं दर्शन घडलं.
रघुनाथ मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढं मंदिराजवळच असलेला 'नक्की लेक' बघायला गेलो. पण तापत्या उन्हामुळं
तलावाजवळ पर्यटकांची वर्दळ तर नव्हतीच पण आजूबाजूची बरीचशी दुकानंही बंदच होती.
त्यामुळं तिथं एक फेरी मारुन आम्ही पुढं निघालो. माउंट अबूमधल्या एका शक्तीपीठाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. पण तिथंही
खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागणार होतं. त्यामुळं पायथ्याशी थोडं थांबून पुढं
निघालो. इथून आम्ही वन्यजीव अभयारण्य बघायला गेलो.
'वन्यजीव अभयारण्य' आणि ' ट्रेव्हर्स टॅंक' - माउंट अबूमधलं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण. 'सिरोही' चे तत्कालीन महाराज 'महाराव केसरी सिंहजी बहादुर' यांनी ही भूमी
आपला ब्रिटिश इंजिनिअर मित्र ' ट्रेव्हर ' याला भेट दिली होती. त्याच ट्रेव्हर यांनी त्या भूमीत वन्यजीव अभयारण्याची
निर्मिती केली आणि त्यातच एक विशाल जलाशय १८९७ साला मध्ये बांधला. त्यांच्या
नावावरुनच या जलाशयाला 'ट्रेव्हर्स टॅंक' हे नांव देण्यात आलं. हा जलाशय मगरींसाठी संरक्षित आहे. या अभयारण्यात बिबट्या, स्लाॅथबियर, जंगली अस्वलं, चिंकारा, काळ्या रंगाचे कोल्हे असे विविध
प्राणी पहायला मिळतात. तसंच अनेकविध पक्षी आणि वृक्ष वनस्पती बघायला मिळतात. इथं
प्रवेशफी भरुन प्रवेश मिळतो. तसंच वेगळी प्रवेशफी भरुन आपली गाडी घेऊनही
अभयारण्यात फिरता येतं. त्याप्रमाणं आम्ही आमच्या गाडीनंच अभयारण्यात फिरलो.
आतमध्ये असलेल्या 'ट्रेव्हर्स टॅंक' जवळ पोहोचलो. त्या जलाशयाजवळ आमच्याशिवाय कुणीही नव्हतं. साहजिकच आम्हाला
तिथली असीम शांतता अनुभवायला मिळाली. त्या शांततेत मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा
किलबिलाट अगदी ऐकत रहावा असाच. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा एक सुंदर
अनुभव. विस्तिर्ण जलाशय आणि त्यात असलेले रंगबिरंगी कोई मासे आणि त्या जलाशयात
काठावरच्या वृक्षराजींचं पडलेलं सुंदर प्रतिबिंब अगदी मंत्रमुग्ध होऊन बघत होतो
आम्ही. कितीही वेळ बघितलं तरी समाधान होतच नव्हतं. अखेर अभयारण्य बंद होण्याची वेळ
होत आली आणि आम्ही तिथून परत आलो.
यानंतर आम्ही परत 'नक्की झील' इथं गेलो. या नक्की तलावाच्या निर्मिती बद्दल काही आख्यायिका सांगितल्या
जातात. एका आख्यायिकेनुसार देवांनी आपला शत्रू बश्कली राक्षसापासून वाचण्यासाठी या
तलावाची निर्मिती केली. तर दुसरी आणि सुरस अशी आख्यायिका सांगितली जाते. ५,०००
वर्षांपूर्वी राजाने आपल्या राजकुमारीच्या विवाहासाठी अशी अट ठेवली होती की जो
कुणी एका रात्रीत आपल्या नखांनी खोदून तलाव निर्माण करेल त्याच्याशी राजकन्येचा
विवाह होईल. 'रसिया बालम' याने
ही अट पूर्ण केली आणि तलावाची निर्मिती केली. म्हणून या तलावाला 'नक्की तलाव' हे नाव मिळालं. आम्ही इथं पोहोचलो
तेव्हा सायंकाळ झाली होती आणि त्यामुळं पर्यटकांची गर्दी झाली होती. मग अगदी
थोडावेळ तिथं थांबून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो.
पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १७ तारखेला सकाळी लवकरच आम्ही गुरुशिखराच्या
दर्शनासाठी निघालो. 'गुरुशिखर' - 'राजस्थान' मधल्या 'अरवली' पर्वतरांगेमधलं 'माउंट अबू' हे सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण. इथून १५ किमी.अंतरावर 'सिरोही' गावात ५६५० फूट ऊंचावर असलेलं हे 'गुरुशिखर'. अशी मान्यता आहे की श्री दत्तात्रेयांनी आपलं पहिलं पाऊल इथं ठेवलं होतं
आणि काही काळ इथं तपस्या केली होती. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरणस्पर्शानं
पावन पवित्र असं हे स्थान सर्व दत्त भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
पायथ्यापासून अगदी शिखरापर्यंत हिरवीगार वृक्षराजी इथं आहे. अतिशय उंचावर
असल्यानंच राजस्थानमधल्या तप्त वातावरणातही हे एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. गुरु
शिखराच्या पायथ्यापर्यंत वाहनानं जाता येतं. तिथून वरती शिखरावर ३०० पायऱ्या चढून
जावं लागतं. आम्ही आमच्या गाडीने पायथ्याशी पोहोचलो. साधारण पन्नास एक पायऱ्या
चढून गेलो आणि मंदिराच्या समोरच पोहोचलो. इथं श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर लक्षात आलं की हे मंदिर गुहेतच आहे. अतिशय भव्य अशा
पाषाणातल्या या मंदिरात जाण्यासाठी कपारीतच १०-१२ पायऱ्या तयार केल्यात. त्या चढून
गेल्यावर छोटासा गाभारा आणि त्यात विराजमान असलेली श्री दत्तात्रेयांची रेखीव
मूर्ती. असं या मंदिराचं वेगळंच स्वरुप आहे. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि श्री
दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झालो. मन अपार शांत झालं. श्री दत्तात्रेयांच्या
मूर्ती बरोबरच तिथं भगवान महादेवही विराजमान आहेत. समोर नंदीही आहे. अतिशय शांत पवित्र अशा स्थानाचं दर्शन घडल्यानं मन अगदी प्रसन्न झालं. डाव्या बाजूला
श्री दत्तात्रेय विराजमान आहेत आणि खाली उतरुन उजव्या बाजूला अखंड धुनी आहे.
दोन्ही दर्शन घेऊन पुढे उरलेल्या अडिचशे पायऱ्या चढून
प्रत्यक्ष गुरुशिखरावर पोहोचलो. इथं एका पाषाणातच लहानसं घुमटाकार मंदिर आहे. या
मंदिरात श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुका आहेत. श्री दत्तात्रेयांची चांदीची
मूर्ती आणि मूर्तीपुढे कुंकुम विलेपित चरणपादुका आहेत. मंदिर अगदी छोटंसं असल्यानं
आतमध्ये जाता येत नाही दारातूनच दर्शन घ्यावं लागतं. प्रत्येक दत्तभक्तासाठी हे
चरणपादुकांचं दर्शन अतिशय महत्त्वाचं असतं. आम्ही सकाळी लवकरच गेल्यानं तिथं फारसे
भाविक नव्हते. त्यामुळं आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं. मी चरणपादुकांसमोर
नतमस्तक झाले आणि दत्तगुरुंनी सुंदर दर्शन घडवल्याच्या जाणीवेनं मन तृप्त झालं. माउंट अबूमधल्या गुरुशिखराच्या दर्शनाची
आस कोजागिरी पौर्णिमेला स्वयं श्री दत्तगुरुंनी पूर्ण केली होती. या मंदिराच्या
थोडं पुढे अत्रिऋशी आणि अनुसया माता यांची मंदिरं आहेत. पण तिथपर्यंत जाण्यासाठीचा
मार्ग सध्या चांगला नसल्याचं पंडितजीनी सांगितलं. त्यामुळं त्या मंदिरात न जाता
शिखरावरुनच नमस्कार केला. मंदिराबाहेरचा परिसर मोठा आहे. इथं असलेल्या भव्य घंटेचा
तीनदा नाद केल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. घुमटीबाहेर
आम्ही नेहमीप्रमाणं थोडं गुरुचरित्राचं वाचन केलं. त्या शांत पावन पवित्र
मंदिरातून परत निघावसंच वाटत नव्हतं. बराचवेळ तिथं थांबून अखेर परत निघालो.
गुरुशिखर दर्शन घेऊन आम्ही तिथून ७ किमी. अंतरावर असलेल्या एका 'पार्क' मध्ये गेलो. 'ब्रमहकुमारी पीस पार्क' - गुरुशिखर आणि अचलगड
या दोन पर्वतांच्या मध्ये वसलेलं हे पार्क ब्रम्हकुमारी मुख्यालयापासून ८ किमी
अंतरावर आहे. शहरी गजबजाटापासून दूर शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी याची
निर्मिती केली आहे. इथं प्रवेश करताच एक राॅक गार्डन समोर येतं. इथं राज योग ध्यानाची माहिती लघु चित्रणाद्वारे तसंच ब्रम्हकुमारींद्वारे
दिली जाते. आम्ही इथं गेलो आणि थोडी माहिती ऐकून पुढे निघालो. इथं बाबा अमरनाथ
गुंफा आणि शिवलिंग तयार केलंय ते पाहून पुढं बागेत फिरायला गेलो. बागेत फिरायला
छान पायवाट आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला उंच उंच वाढलेल्या जास्वंदीचं दाट कुंपण
आहे. गुलाब वाटिकाही सुंदर आहे. शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. एका भागात
मुलांसाठी खेळण्याची साधनं आहेत. अतिशय सुंदर स्वच्छ आणि रंगबिरंगी फुलांनी सजलेली
ही बाग पहाण्यासारखीच आहे.
यानंतर आम्ही माउंट अबू मधला
एक प्राचीन किल्ला बघायला गेलो. 'अचलगड किल्ला'
- परमार वंशाच्या राजानी ९०० ई. मध्ये हा किल्ला बांधला. त्यानंतर १५ व्या शतकात मेवाडचे प्रसिद्ध राजा महाराणा
कुंभा यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. मात्र आता किल्ल्याचं मुख्य
प्रवेशद्वार सोडल्यास आतमध्ये किल्ल्याचा कुठलाच भाग शिल्लक नाही. प्रवेशद्वार
मात्र अजूनही सुस्थितीत आहे. इथूनच आत जाऊन दो किमी.वर
साधारण ४०० पायऱ्या चढून 'चामुंडा माता' मंदिर आहे. हे जवळपास ५,००० वर्षं पुरातन मंदिर आहे.
इथून जवळच डोंगरात 'काली' मातेचही
मंदिर आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तिथल्या स्थानिक लोकांच्या
जीपने किंवा चालत जाता येतं. मात्र रस्ता खडी चढण आणि अरुंद आहे. आम्ही जीपने
मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेलो. किल्ल्याचं प्रवेशद्वार बघून पुढे चामुंडा माता
मंदिरात ४०० पायऱ्या चढून दर्शनासाठी गेलो. इथही गर्दी
नसल्यानं चामुंडा मातेचं खूप छान दर्शन झालं. दर्शन घेऊन पायऱ्या उतरुन
प्रवेशद्वाराजवळ आलो आणि जीपने परत खाली आलो.
किल्ल्याच्या पायथ्याशी जवळच असलेल्या अजून एका प्राचीन आणि अबूमधल्या
अतिशय महत्त्वाच्या मंदिरात गेलो. 'अचलेश्वर महादेव
मंदिर'- पौराणिक कथेनुसार माउंट अबूच्या सिरोही गावातील अचलगढ हे ऋषी वसिष्ठ यांचं तपस्थान. असं
सांगतात कि त्या पौराणिक काळात अचलगड इथं मोठी ब्रह्मखाई होती. आणि ऋषी वसिष्ठ
यांच्याकडची गाय या खाईत पडली. म्हणून ऋषींनी देवांना ही खाई बुजविण्यासाठी
प्रार्थना केली. तेव्हा देवांच्या आज्ञेनुसार अर्बुद नावाच्या नागानं ती खाई
बुजविण्यासाठी अख्खा पर्वत आपल्या पाठीवरून नेला. पण त्याला त्या गोष्टीचा गर्व
झाला आणि त्यामुळं तो पर्वत हलू लागला. ऋषीगणांनी तो पर्वत स्थिर रहाण्यासाठी पुन्हा देवांना प्रार्थना केली. तेव्हा महादेवांनी
आपल्या पायाच्या अंगठ्यानं तो पर्वत तोलून स्थिर केला. या मंदिरातही एक नैसर्गिक
खड्डा आहे आणि त्यात महादेवांच्या पायाच्या अंगठ्याचा पाषाणाचा आकार आहे जो अंगठा
महादेवांनी काशीमध्ये बसून पर्वताला लावला होता. आणि यावरुन या स्थानाला 'अचलगड' हे नाव मिळालं. मंदिरात प्रवेश
करण्याआधी प्रांगणात पंचधातूचा चार टन वजनाचा भव्य नंदी आहे. आम्हाला इथंही
महादेवाचं खूप छान दर्शन झालं.
इथून जवळच एक तलाव आहे. कथेनुसार हा शुध्द तुपाचा तलाव होता. त्यावेळी
केल्या जाणाऱ्या यज्ञात या तलावातील तुपाची आहुती दिली जात असे. पण तीन राक्षस
महिषी रुप धारण करुन रोज रात्री या तलावातील तुप प्राशन करत असत. जेव्हा राजा
आदिपाल याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने एका रात्री एकाच बाणात त्या तिन्ही
राक्षसांना मारलं. आता तो तलाव पाण्यानं भरलेला असून एका काठावर तीन महिषींच्या
मूर्ती ठेवल्या आहेत. आम्ही हे सगळं बघून आम्ही हाॅटेलमध्ये परत गेलो.
परत सायंकाळी अर्बुदा देवीच्या दर्शनासाठी निघालो. आदल्या दिवशी पायथ्याशी
जाऊन परत आलो होतो. आता मात्र मंदिरात निघालो. मंदिरात
पोहोचायला ४०० पायऱ्या चढून जावं लागतं. हे मातेचं शक्तीपीठ आहे. सतीचे अधर इथं
पडल्यानं या मंदिराला 'अधरदेवी' मंदिर असं म्हणतात. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या
मंदिरात 'कात्यायनी' देवीची
गुप्त पूजा केली जाते. कारण अधरदेवीला कात्यायनीचं शक्तीपीठ असंही म्हणतात. या
मंदिराची कहाणी दोन बहिणींशी जोडलेली आहे. अधरदेवी देवीचं सहावं रुप कात्यायनी आणि
अबूच्या पुढे गुजरातच्या सीमेजवळची अंबाजी माता हेही शक्तीपीठ आणि देवीचं आठवं रुप
महागौरी म्हणून ही दोन्ही स्थानं एकमेकांशी संबंधित
आहेत. इथही फारशी गर्दी नव्हती. देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं.
यानंतर आम्ही 'दिलवाडा जैन मंदिर' बघायला गेलो. हे मंदिर बघून या मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यानं जवळजवळ दोन किमी. आत चालत जाऊन अजून मंदिरं बघितली. इथं नक्की तलावाची निर्मिती करणाऱ्या रसिया बालम आणि राजकन्या सिध्देश्वरी यांची समोरासमोर मंदिरं आहेत. तसंच भगवान विष्णूंचं ५००० वर्षं प्राचीन लहानसं मंदिर आहे. आम्ही या मंदिरात पोहोचलो तेव्हा बाहेर हलका संधीप्रकाश होता आणि मंदिरात एक कमी उजेडाचा दिवा. यामुळं हे प्राचीन मंदिर पहाताना काही वेगळीच जाणीव होत होती. मंदिरात आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. इथं दर्शन घेऊन, रसिया बालम चं दर्शन घेऊन सिध्देश्वरी मंदिरात गेलो. राजानं राजकन्येच्या विवाहासाठी एका रात्रीत नखांनी तलाव खोदायचा आणि सुर्योदयापूर्वी विवाहासाठी उपस्थित रहायचं अशी अट घातली होती ती पूर्ण करुन रसिया बालम राजाकडे येत असतानाच राणीला हा विवाह मान्य नसल्यानं तिनं विघ्न आणण्यासाठी कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला आणि सूर्योदय झाला अस समजून हा विवाह झालाच नाही. हे दोघं शिव पार्वती किंवा विष्णुचा अंश मानले जातात. त्यामुळं इथं विवाहेच्छुक युवक युवती आवर्जून दर्शनासाठी येतात.
तिसऱ्या दिवशी १८ तारखेला सकाळी आम्ही हाॅटेल सोडून निघालो. तिथून दिड तासावर राजस्थान गुजरात सीमेवर असणाऱ्या अजून एका मोठ्या शक्तीपीठाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो : 'अंबाजी माता' मंदिर - इथं सतीदेवीचं हृदय पडलं असं मानतात. त्यामुळं या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर श्रीयंत्र आहे. या देवीचं मूळपीठ स्थान गब्बर पर्वतावर आहे. या पर्वतावरील मंदिरात जाण्यासाठी एक हजार पायऱ्या चढून जावं लागतं. किंवा रोपवेनं जाता येतं. आम्ही रोपवेनंच या मंदिरात गेलो. इथं भाविकांची थोडी गर्दी होती पण तरीही शांतपणे खूप छान दर्शन झालं. इथं दर्शन घेऊन आम्ही अहमदाबादला निघालो. इथूनच आमची परतीची ट्रेन होती.
माउंट अबूला गुरुशिखर दर्शनासाठी जायची इच्छा तर दत्तगुरुंनी पूर्ण केली होतीच पण
त्याचबरोबर देवीच्या दोन शक्तीपीठांचंही दर्शन घडवलं होतं. आणि माउंट अबूमधल्या स्थलदर्शनाचाही आनंद मिळाला
होता.
- स्नेहल मोडक
















No comments:
Post a Comment