Pages

Tuesday, October 15, 2024

जय माता दी

                   नवरात्र सुरु झालं अन पहिले तीन दिवस छान पार पडले. नवरात्राच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी मात्र माझ्या सहचराच्या मनाची चलबिचल सुरु झाली. कारण काय तर चौथ्या दिवशी म्हणजे ६ तारखेला सकाळीच त्याच्या ऑफिसमधल्या सहकारी मित्रांनी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं. आणि आम्ही मात्र यावर्षी घरीच होतो. खरंतर खूप आधी वैष्णोदेवीच्या दर्शनला जाण्याबद्दल आमची चर्चा झाली होती. पण सारखं सारखं काय जायचं असं म्हणत लेकींनी आमचा बेत उधळून लावला होता. आम्हा दोघांनाही दर्शनाला जायची तीव्र इच्छा होती पण मुलींचं म्हणणंही पटत होतं त्यामुळं मी शांत होते. पण जसं त्याच्या सहकाऱ्यांनी दर्शन घेतल्याचं कळलं तसं याला चैन पडेना. 'आपल्याला माता दर्शनाला बोलवतेय तर तूच ठरव काय करायचं ते' असं मला म्हणाला. मग माझंही मन दर्शनासाठी आसुसलं. अखेर ६ तारखेला रात्री तिघांचीही विमानाची तिकिटं काढलीच. 

            ‌ ‌       ८ तारखेला भल्या पहाटेचं विमान होतं. ७ तारखेला पूर्वनियोजित असलेलं एक काम करुन आम्ही रात्री प्रवासाला सुरुवात केली. आम्ही अक्षरशः ऐनवेळी वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं. त्यामुळं प्रवासाची तयारी आणि पुढली सगळी व्यवस्था खूप गडबडीत करावी लागली. अर्थात हे सगळं आमच्यासाठी सवयीचं असल्यानं कसलीही अडचण आली नाही. 

                      ८ तारखेला सकाळीच जम्मू विमानतळावर उतरलो. आमची गाडी तिथे आधीच येऊन थांबली होती. आम्ही त्या गाडीने लगेच पुढील प्रवासाला निघालो. त्यादिवशी आम्ही 'पहलगाम' ला जाणार होतो. ४-५ तासांचा प्रवास होता. आधी वाटेत वैष्णो ढाब्यावर नाश्ता केला आणि पुढे निघालो. सारा प्रवासमार्ग अतिशय रमणीय आहे. एका बाजूला उंच पर्वतराजी आणि त्यांच्या पायथ्याशी डौलदार वळणं घेत वाहणारी कधी चिनाब नदी, कधी झेलम नदी तर कधी लिद्दर नदी आणि यातूनच जाणारा रस्ता. ७,२०० फूट उंचीवर असलेलं 'अनंतनाग' जिल्ह्यातील 'पहलगाम' हे अगदी नितांतसुंदर असं शहर. लिद्दर नदी पहलगाम मधली प्रमुख नदी. ७३ किमी. लांबीची ही नदी ४,६५३ मीटर उंचीवरच्या कोलाहोई ग्लेशियर मधून उगम पावते. 'पुहेअल' या शब्दाचा काश्मीरी भाषेत ला अर्थ 'चरवाहा' असा आहे . 'चरवाहोंका गाम' म्हणून पहलगाम हे नाव पडलं. ग्रीष्म ऋतूत पशूंना चरण्यासाठी हे उत्तम स्थान आहे. 

                    आमचा बनिहाल पर्यंतचा प्रवास वेळेत आणि छान झाला. बनिहाल सोडलं आणि पुढे सगळी गडबड झाली. जम्मू कश्मीर च्या निवडणुकीचा निकाल ८ तारखेलाच होता. आणि आम्ही अगदी ऐनवेळी आमचा बेत ठरवल्यानं आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही बनिहाल ला पोहोचेपर्यंत निकाल यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे जिंकलेल्या उमेदवारांच्या मिरवणुका ठिकठिकाणी सुरु झाल्या. आणि प्रचंड वाहनकोंडी सुरु झाली. शांतपणेच त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कसबसं अखेर अपेक्षित वेळेपेक्षा खूप उशीरा आम्ही पहलगाम ला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. 

                         पहलगामला रुमवर पोहोचून थोडं ताजंतवानं होऊन फिरायला निघालो. सायंकाळ झाल्यानं फार फिरणं शक्य नव्हतं. म्हणून सर्वात तिथल्या मंदिरात आणि मग मार्केटमध्ये फिरायचं ठरवलं. 

                         ममलेश्वर मंदिर - पहलगाम मधलं हे अतिशय पुरातन मंदिर. 'पार्वती मातेनं' इथं स्नान करण्यापूर्वी आपला पुत्र 'गणेश' याला द्वारपाल म्हणून उभं केलं आणि आपल्या अनुमतीविना कुणासही प्रवेश न देण्यास सांगितलं. मात्र 'भगवान शिवांनाही' पुत्र गणेशाने अडवलं तेव्हा त्यांनी संतप्त होऊन गणेशाचा शिरच्छेद केला. आणि नंतर पार्वतीमातेनं पुत्रास जिवंत करण्यास सांगितलं असता गजराजाचं शिर गणेशाच्या देहास लावून पुत्र जिवीत केला. ही घटना जिथे घडली तेच हे स्थान. 'मम माल' याचा अर्थ 'जाऊ नको' यावरुनच या स्थानाला ममलेश्वर हे नाव प्राप्त झालं. इथं भगवान शिवाचं मंदिर आहे. मंदिरात शिव पिंडी आणि द्विमुखी नंदी विराजित आहेत. ४ थ्या शतकात बांधलेल्या या मंदिराची १२ व्या शतकात राजा जयसिंह यांनी पुनर्निर्मिती केली आणि भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं. अतिशय प्राचीन आणि सुंदर असं हे छोटंसं मंदिर त्यासमोर असलेली पुष्करणी आणि आजूबाजूला केलेला बगीचा सारंच नयनरम्य. भाविकांची बिलकुल गर्दी नसल्यानं अतिशय शांत प्रसन्न वातावरण. आम्ही या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. थोडावेळ थांबून पुढं निघालो.

                  मंदिरातून बाहेर येऊन जवळच असलेल्या मार्केट मध्ये गेलो. इथं काही दुकानं फिरलो पण फारशी खरेदी केली नाही थोडीशी लहानसहान खरेदी करुन तिथल्याच वैष्णो हाॅटेलमध्ये जेवून परत रुमवर आलो. तिथल्या व्यवस्थापकाशी दुसऱ्या दिवशी आम्हाला करायच्या स्थलदर्शनाबद्दल‌ माहिती घेतली आणि रुममध्ये येऊन निद्राधीन झालो. 

                    ९ तारखेला सकाळी लवकरच आम्ही पहलगाम मधलं स्थलदर्शन करायला निघालो. पहलगामला स्थलदर्शनासाठी आपल्या वाहनानं फिरायला परवानगी नाही. तिथल्या स्थानिक लोकांच्या वाहनांनीच फिरावं लागतं. त्यानुसार आम्ही गाडी ठरवली आणि स्थलदर्शन करायला निघालो. सर्वात आधी आम्ही पहलगाम पासून १६ किमी अंतरावर असलेलं एक ठिकाण बघायला गेलो. एका बाजूला घनदाट देवदार वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला लिद्दर नदी असा हा सुंदर घाटरस्ता जुन्या पहलगाम शहरातून या ठिकाणी जातो. 'चंदनवारी' - पहलगाम मधलं हे अतिशय शांत, पवित्र आणि महत्त्वाचं स्थान. इथून अमरनाथ यात्रा सुरु होते. त्यामुळे इथं जुलै ऑगस्ट महिन्यात भाविकांची सतत प्रचंड गर्दी असते. इथूनच अमरनाथ यात्रेच्या पायऱ्या सुरु होतात. पायऱ्यांच्या बाजूने लिद्दर नदी यात्रेकरुंना साथ देते. या यात्रेव्यतिरिक्तच्या काळात हे अतिशय शांत स्थान. पहलगामला आधीच खूप थंडी होती. त्यात आम्ही इथं आल्यावर थंडीचा कडाका वाढला. गाडीतून उतरल्यावर लगेच त्याचं कारणही कळलं. चंदनवारीला आदल्या रात्रीच बर्फवृष्टी झाली होती. समोर डोंगरावर ताजं शुभ्र बर्फ दिसत होतं. अतिशय सुंदर दृश्य होतं. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा आमच्या व्यतिरिक्त इथं कुणीच नव्हतं. इथली दुकानही उघडली नव्हती . त्या शांत वातावरणात नदीच्या संथ जळाचा अनाहत नाद स्पष्ट ऐकू येत होता. शुभ्र जल छान चमकत होतं. माझं मन त्या शांततेशी एकरुप झालं आणि एक वेगळीच अनुभूती आली. तिथल्या पहिल्या पायरीला स्पर्श करुन 'श्री बाबा अमरनाथ' ना नमस्कार केला, काही पायऱ्या चढून गेलो. आणि मग तिथली शांतता अनुभवून परत निघालो.

                    चंदनवारी बघून आम्ही पोहोचलो एका अप्रतिम, नयनरम्य अशा खोऱ्यात. 'बेताब व्हॅली' - लिद्दर नदीपासून जवळपास ८,००० फूट उंचावरलं हे खोरं पहाणं म्हणजे एक अप्रतिम अनुभव. आम्ही इथं पोहोचलो आणि तिथं असलेल्या ढाब्यावर नाश्ता करण्यासाठी थांबलो. नाश्ता करुन फिरायला गेलो. घनदाट अशी जर्दाळू आणि देवदारची वृक्षराजी, मखमली हिरवळ आणि त्यातून जाणाऱ्या वळणवाटा अगदी नेत्रसुखद असं दृश्य. व्हॅलीमधून वाहणारी नदी दोन प्रवाहात विभागते आणि परत एकत्र होते. त्या मधलं बेट अतिशय नितळ आहे. इथं सर्वत्र घोड्यावरुन फिरता येतं. बेटातल्या पाण्यातूनही  घोडे आपल्याला फिरवतात. खूप मोठी अशी ही व्हॅली पहाण्याचा हा अनुभव छानच. थंडीच्या दिवसांत इथं भरपूर बर्फ पडतं. त्यावेळी या खोऱ्याचं सौंदर्य अजूनच वाढतं. इथला बर्फ अनुभवण्यासाठी, त्यात खेळण्यासाठी डिसेंबर जानेवारी हे महिने उत्तम आहेत. या व्हॉलीचं मूळ नांव 'हजन/ हगन व्हॅली' असं होतं. 'सनी देओल' आणि 'अमृता सिंग' यांच्या प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट 'बेताब' याचं चित्रिकरण इथं झालं आणि तो चित्रपट खूप गाजला म्हणून या व्हॅलीचं नाव ' बेताब व्हॅली ' करण्यात आलं. 

                      बेताब व्हॅली बघून आम्ही तिथून १८ किमी.वर असलेलं दुसरं एक प्रसिद्ध खोरं बघायला गेलो. 'अरु व्हॅली' - पहलगाम मधलं पर्यटकांना आकर्षित करणारं एक प्रसिद्ध खोरं. 'कोलाहोई ग्लेशियर' आणि 'तारसर तलाव' इथं चढाई करण्यासाठीचा अरु व्हॅली हा प्रारंभबिंदू आहे. हे संपूर्ण खोरं दाट हिरवळ, तलाव आणि पर्वतानी नटलंय. अतिशय सुंदर, शांत अशी ही व्हॅली वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र आहे. इथं तपकिरी रंगाचे कोल्हे, काळ्या रंगाचे कोल्हे, हरणं, बिबट्या अशा प्राण्यांचं वास्तव्य आहे. इथंही खूप बर्फ पडतो आणि त्यानंतर इथं बर्फातले खेळ खेळण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. या व्हॅलीतून वाहणारी छोटी अरु नदी लिडर नदीला मिळते. या नदीचं नितळ निळं जल पहातच रहावं असं. अतिशय मंत्रमुग्ध करणारी ही व्हॅली, इथं कितीही वेळ थांबलं तरी समाधान होणं अशक्यच. पण आम्हाला वेळेचं बंधन असल्यानं अखेर तिथून निघावच लागलं. तिथून परत आम्ही आमच्या हाॅटेलजवळ आलो.  स्थलदर्शनासाठी ज्या गाडीने फिरलो ती गाडी सोडून परत आमच्या गाडीने परत प्रवास सुरु केला. आता आम्हाला 'कटरा' ला पोहोचायचं होतं. 

                          आमचा प्रवास परत एकदा घाटरस्त्याने, नदीकाठाने सारं निसर्ग सौंदर्य बघत सुरु झाला.  प्रवास सुरु केला आणि साधारण तासाभरात आम्ही एक apple valley नावाची बाग बघायला गेलो. सफरचंदाची खूप मोठी बाग होती इथं. सध्या सफरचंदांचा मोसम सुरु असल्यानं सगळी झाडं सफरचंदानी जणू ओथंबली होती. खूप सारी  रसरशीत मोठमोठी सफरचंद लगडलेली पाहून आपल्याकडच्या हापूस आंब्यानी लगडलेल्या झाडांची आठवण आली. इथं बागेत फिरुन, सफरचंदाचा रस पिऊन, सफरचंद खरेदी करुन निघालो. 

पहलगाम ते कटरा हा प्रवासही खरंतर अवघ्या ४-५ तासांचा होता. पण प्रत्यक्षात मात्र पोहोचायला दुप्पट वेळ लागला. यावेळीही प्रचंड वाहनकोंडीमध्ये आम्ही अडकलो होतो. पण या वाहनकोंडीचं कारण मात्र वेगळंच होतं. शेळ्या मेंढ्यांमुळे ठिकठिकाणी ही वाहनकोंडी होत होती. उन्हाळ्यात जम्मूच्या आसपासच्या गावातून या शेळ्या मेंढ्यांना घेऊन राखणदार काश्मीर मध्ये जातात. काश्मीर मध्ये तेव्हा त्यांना चरण्यासाठी हिरवा चारा विपुल प्रमाणात उपलब्ध होतो. जेव्हा काश्मीर मध्ये बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा ते राखणदार आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन परत आपापल्या गावी जातात. असे हे कळपच्या कळप परत निघाले होते आणि साहजिकच त्यामुळे वाहनकोंडी होत होती. एकेका कळपात ४००-५०० ते अगदी २-३ हजार इतक्या शेळ्या मेंढ्या होत्या. याचमुळे आम्हाला 'कटरा' ला पोहोचायला रात्रीचे १० वाजून गेले. उशीर झाल्यानं RFID CARD मिळणारे काऊंटर बंद झाले होते. त्यामुळे आम्हाला हाॅटेलच्या रुमवरच जावं लागलं. रुममध्ये पोहोचून जेवून आम्ही निद्राधीन झालो. 

                      १० तारखेला पहाटे सारी आन्हिकं आवरुन आम्ही RFID CARD घ्यायला गेलो. १०-१५ मीनीटांतच कार्ड मिळालं आणि आम्ही वैष्णोदेवीच्या पायथ्याशी जिथून चढाईला सुरुवात होते तिथे गेलो. खरंतर दर्शनासाठी रात्री चालत जाऊन चालत यायचं अशी आमची इच्छा होती. पण आदल्या दिवशी 'कटरा' ला पोहोचायला खूप उशीर झाला होता. त्यामुळं चालत जाऊन येणं शक्य नव्हतं. मग दर्शनाला जाताना कटरा ते भवन पर्यंत घोड्यावरुन जायचं आणि परत येताना पूर्ण चालत यायचं असं ठरवलं. त्यानुसार आम्ही तिघंही घोड्यावरुन निघालो. 'अर्धकुमारी माता' मंदिराच्या थोडं पुढे घोड्यांना विश्रांती आणि खायला देऊन पुढे निघालो. साधारण पावणेदोन तासातच आम्ही भवनच्या जवळ पोहोचलो. तिथून घोड्यावरुन उतरुन चालायला सुरुवात केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अतिशय नयनरम्य अशी खऱ्या फुलांची सजावट केली होती. आम्ही इथं पोहोचलो आणि डोळे भरुन अप्रतिम पुष्प सजावट पहात, कलेला आणि कलाकारांना मनोमन दाद देत पुढे निघालो. तिथल्या लाॅकरमध्ये सामान, शूज, मोबाईल सारं ठेवून दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो. दिड तासातच आम्ही प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेच्या समोर पोहोचलो. डोळे भरुन दर्शन घेत नतमस्तक झालो आणि मन शांत तृप्त झालं. अलोट गर्दीमुळं तिथं प्रत्येकाला क्षणभरातच बाजूला करतात. पण तो एक क्षणही प्रत्येक भक्तासाठी अतिशय भाग्याचा असतो. किती दुरुन, कष्ट सोसून भाविक दर्शनासाठी येतात पण मातेसमोर काही क्षणही उभं राहू देत नाहीत. पण तरीही असंख्य भाविक दर्शनासाठी येतातच. आणि मातेच्या त्या क्षणभराच्या  दर्शनानं सारे कष्ट विसरुन तृप्त होतात. अगदी तसंच आम्हीही प्रसन्न मनानं बाहेर आलो. 

                   वैष्णोदेवी मातेच्या दर्शनानंतर 'भैरोबाबाचं' दर्शन घेण्यासाठी निघालो. इथं घोड्यावरुन,चालत किंवा रोपवेनं जाता येतं. आम्ही रोपवेचं तिकीट आधीच काढलं असल्यानं लगेच तिथं रांगेत उभं राहिलो. तासाभरानं आम्हाला रोपवेनं जायला मिळालं. मंदिरात पोहोचून रांगेतून 'भैरवनाथाचं' दर्शन घेतलं आणि रोपवेनंच परत आलो. वैष्णोदेवी देवीच्या दर्शनमार्गावर ठिकठिकाणी खानपान व्यवस्था आहे. तिथल्याच एका Nescafe च्या स्टाॅलवर पोटपूजा केली. आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. आरामात चालत, मधेमधे क्षणभर विश्रांती घेत आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आणि तिथून लगेच हाॅटेलच्या रुमवर गेलो. दमलो होतो पण अगदी ऐनवेळी ठरवूनही केवळ मातेच्या कृपेनं अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं त्यामुळं खूप समाधान वाटलं. 

                        ११ तारखेला सकाळीच आम्ही हाॅटेल सोडून निघालो. सर्वात आधी आम्ही देवीच्या शक्तीपीठाचं दर्शन घ्यायला गेलो. जम्मू पासून साधारण ५० किमी. अंतरावर हे शक्तीपीठ आहे. आर्मीच्या अखत्यारीत असलेलं हे 'नाभा माता मंदिर'. अतिशय रमणीय शांत असं हे मंदिर. इथं सतीदेवीच्या कलेवराचा नाभीचा भाग पडला होता. त्यामुळं हे 'नाभा माता मंदिर' म्हणून ओळखलं जातं. छोट्या गुंफेत हे स्थान आहे. इथं मंदिरात बाराही महिने नैसर्गिक जलधारा पडत असतात. हे जल अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. त्यामुळे भाविक हे जल आवर्जून घरी नेतात. याचं गुंफेत भगवान शिवही विराजमान आहेत. गतवर्षीही आम्ही इथं दर्शनाला गेलो होतो. यावेळीही अतिशय सुंदर असं मातेचं दर्शन घडलं. दर्शन घेऊन बाहेर आलो तीर्थ प्रसाद घेतला आणि तिथल्या पंडितजीनी मला परत बोलवलं. कुणा भाविकानं मातेला अर्पण केलेला शृंगार मला आणि लेकीला प्रसाद म्हणून दिला. बांगड्या, कुंकू, काजळ, मेहंदी असा सारा शृंगार मला प्रसाद रुपात मिळाला आणि डोळ्यात पाणी आलंच. आमची सेवा मातेच्या चरणी रुजू झाल्याची जाणीव झाली आणि मन असीम तृप्त झालं. 

                यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरात पोहोचलो. जम्मू पासून १४ किमी. अंतरावर असलेलं हे 'कौल कंडोली' माता मंदिर. भगवान श्री रामरायांच्या आज्ञेनुसार माता वैष्णोदेवी ५ वर्षीय कन्येचं रुप धारण करुन त्रिकुटा पर्वतावर निघाली. बराच प्रवास केल्यावर 'नगरोटा' या गावात या स्थानी माता विश्रांतीसाठी थांबली. तिला हे स्थान आवडलं आणि तिनं तिथंच १२ वर्षं तपस्या केली.  त्यानंतर ती त्रिकुटा पर्वतावर गेली. तेव्हापासून या मंदिरात मातेचं पहिलं दर्शन घेऊन मग त्रिकुट पर्वतावर जाऊन तिथलं दर्शन घेण्याची प्रथा आहे. इथे मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

         ‌         इथून पुढे आम्ही नवीनच बांधलेल्या एका बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे. इथं व्यंकटेशाची भव्य मूर्ती स्थापित केली आहे. आजुबाजुला इतरही मंदिर आहेत. 

                   जम्मू मधलं एक प्रमुख मंदिर रघुनाथ मंदिर. इथं श्री रामरायाचं मुख्य मंदिर असून सभोवती अनेक मंदिरं असलेलं हे मंदिर संकुल आहे. इथं श्री रामरायाचं दर्शन घेतलं. तिथून निघून जम्मूचं मार्केट फिरुन खरेदी केली. आणि जम्मू विमानतळावर निघालो. सायंकाळच्या विमानानं परतीचा प्रवास केला. 

                 दर्शनाची तीव्र इच्छा असतानाही दर्शन होणार नाही अशी आपण आपल्या मनाची तयारी केली असेल तरीही जर आपली पूर्ण श्रद्धा असेल तर देवी माताही आपल्या भक्तांना दर्शन घडवतेच. आणि अशा अनपेक्षितपणे घडलेल्या दर्शनाचा आनंद काही वेगळाच असतो. आम्हाला आलेला हा दुसरा अनुभव. सारं काही श्री दत्तात्रेयांच्या इच्छेनं आणि कृपेनंच घडतं हेच खरं. अचानकच आपल्याला त्या स्थानी जायची बुध्दी होते आणि आपल्या दैवताचं सुंदर दर्शन घडतंच.

||  जय माता दी  ||

- स्नेहल मोडक

  


  

  

  

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...