२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. या दिवसाचं औचित्य साधून ऐनवेळी एक दिवसीय भ्रमंती करायचं ठरवलं. पण त्यादिवशी सुट्टी नसल्यानं दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं.
जवळच आहे कधीही जाता येईल या एकाच कारणामुळं जायचं राहिलेल्या ' जव्हार' ला सकाळी लवकरच निघालो.
प्रवासाला सुरुवात केल्यावर काही वेळ प्रवास व्यवस्थित झाला. आणि मग मात्र रस्त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. रस्त्याची इतकी दुर्दशा झाली होती की मोठमोठ्या खड्ड्यातून रस्ता अक्षरशः शोधावा लागत होता. साहजिकच त्यामुळे पुढं प्रचंड वाहनकोंडी झाली होती. या साऱ्यातून मार्ग काढत आमचा प्रवास सुरु होता. आम्ही केवळ फिरण्यासाठीच निघालो होतो आणि दोन्ही लेकीही एकत्र बरोबर होत्या त्यामुळं हे सगळं आम्ही सहजतेनं घेत होतो.
खराब रस्ते आणि वाहनकोंडीमुळं आम्हाला वाटेत कुठंच नाश्ता करायला मिळाला नाही. बरोबर नेलेल्या कोरड्या खाऊवरच समाधान मानावं लागलं. अखेर नेहमीच्या वेळेपेक्षा दुप्पट वेळाने आम्ही जव्हार ला पोहोचलो. आमच्या ओळखीच्या एका घरीच आधी आम्ही पोहोचलो. तिथंच आम्ही जेवणाची व्यवस्था केली होती. बरीच वर्षं त्यांचं तिथं मोठं पण घरगुती भोजनालयच होतं. आता नुकतंच त्यांनी हे प्रमाण कमी करुन अगदी थोड्या प्रमाणात सुरु ठेवलंय. आम्ही प्रवासात असताना त्यांच्या संपर्कात होतोच. त्यामुळं त्या काकू आमची वाटच पहात होत्या.
आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो, ताजतवानं झालो आणि फार वेळ न दवडता त्यांनी आम्हाला जेवायलाच वाढलं. आम्हाला वाटेत नाश्ता मिळाला नसल्याचं त्याना कळलंच होतं. अतिशय सुग्रास आणि वाफाळतं भोजन समोर आलं आणि सकाळपासून धगधगत असलेल्या यज्ञकुंडात सुग्रास भोजनाची आहुती दिली आणि जठराग्नी तृप्त झाला. आम्हीच आधी सांगितल्याप्रमाणं त्यांनी साधाच पण अत्यंत चवदार आणि वाफाळता स्वयंपाक केला होता. आमचं जेवण झाल्यावर मग गप्पा सुरु झाल्या. घरगुती असलं तरीही त्यांचं भोजनालय अतिशय प्रसिद्ध आहे. बऱ्याच मोठमोठ्या व्यक्ती त्यांच्याकडे आवर्जून जेवायला येत असतात. थोडावेळ गप्पा मारुन कुठे कसं फिरावं याची माहिती घेऊन फिरायला निघालो.
सर्वात आधी आम्ही निघालो जव्हारचा अतिशय प्रसिद्ध असा धबधबा बघायला. इथे जाताना जव्हारचा खरा निसर्ग अनुभवायला मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर अशी हिरवाई पसरलीय. ही हिरवाई पहातच आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचलो. दुरुनही धबधब्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही तिथं पोहोचलो आणि भान हरपून पहातच राहिलो.
' दाभोसा धबधबा ' जव्हारचं एक प्रमुख आकर्षण. उंच उंच हिरव्यागार डोगरांमधून खळाळत वाहणारा लेंढी नदीचा जलप्रपात रोरावत दरीत कोसळतो आणि एक अनाहत ध्वनी निर्माण होतो. ३०० फुट उंचावरुन कोसळणारा हा शुभ्र फेसाळ प्रपात आणि त्याचे ५०-६० फुटांपर्यंत उंच उडणारे शुभ्र तुषार म्हणजे जणू नजरबंदीच. अप्रतिम असं हे दृश्य नजरेत आणि छायाचित्रात साठवत आम्ही थांबलो होतो. सगळ्या बाजूंनी दाट हिरवंगार जंगल आणि मध्ये कोसळणारा जलप्रपात, निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कार कितीही पाहिलं तरी समाधान होत नव्हतं. पण पुढंही फिरायचं असल्यानं आम्ही तिथून निघालो.
धबधबा पहायला जाताना मार्गातलं एक स्थान पाहून ठेवलं होतं. धबधबा बघून परतताना तिथं थांबलो. अगदी ' मिनी स्वित्झर्लंड ' म्हणावं इतका नितांतसुंदर असा तो भाग होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत मखमली हिरवळ आणि त्यापुढे दाट हिरवीगार वृक्षसंपदा. आम्हाला त्या मऊ लुसलुशीत हिरवळीवर खरंतरं बसावंसं वाटत होतं पण पावसाची भुरभुर सुरु असल्यानं माती खूप ओली होती. आम्ही जिथं उभे होतो तिथून दूरवर त्या हिरव्या रानात चरणारी काही गायीगुरं आणि त्यांच्या बरोबर असलेले दोन गुराखी दिसत होते. फिक्या आणि गडद रंगछटा ल्यायलेलं हिरवं रान, दूरवर असलेली वृक्षराजी, त्या रानात चरणारी गुरं, गुराखी, आकाशात दाटलेले कृष्णमेघ, पावसाची हलकी भुरभूर आणि तरीही साऱ्या आसमंतात भरुन राहिलेली असीम शांतता. निसर्गाचं एक शांत पण तितकंच प्रसन्न रुप. अतिशय रमणीय असं निसर्गानंच रेखलेलं एक सुंदर चित्र. अगदी निसर्गाच्या कुशीत शिरण्याची तृप्त अनुभूती. तिथून परत निघायला पाऊलच उचलवत नव्हतं.
तिथून पुढे निघून आम्ही एका धरणावर पोहोचलो. ' जय सागर ' धरण हे १९६१ साली बांधून पूर्ण झालं. जव्हार संस्थानचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे यांनी जव्हार मधील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण बांधायचं स्वप्न पाहिलं होतं. १९४८ साली जेव्हा हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन झालं त्यानंतर महाराष्ट्र शासनानं हे धरण बांधलं आणि १९६१ साली श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं. जव्हार ला लागूनच असलेल्या ' झरिपा ' नावाच्या अनेक जिवंत झरे असलेल्या जलाशयावर हे धरण बांधलंय. या धरणावर जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत. खाली उतरुन पुढे धरणाच्या भिंतीवरुन पलिकडेही जाता येतं. धरणाची भिंत रुंद आणि कठडा असलेली आहे. भिंतीच्या एका बाजूला विस्तिर्ण जलाशय आणि दुसऱ्या बाजूला पायऱ्या आहेत. पाणी कमी असतांना त्या पायऱ्यांवर जाऊन धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेता येतो. इथलं दृश्यही अप्रतिम आहे. विस्तिर्ण जलाशय, किनारी असलेली दाट हिरवी झाडी, नितळ जळात दिसणारं नभमेघांचं आणि वृक्षांचं प्रतिबिंब आणि जोडीला असणारी नीरव शांतता. हे ठिकाणही सुंदरच होतं.
इथून पुढे आम्ही ' शिरपामाळ ' बघायला गेलो. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करण्यास गेले होते तेव्हा १६६४ साली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन महाराज तेव्हाचे जव्हार संस्थानचे राजे विक्रमशहा यांना भेटावयास आले होते. तेव्हा या माळरानावर मोठा शामियाना उभारण्यात आला होता. तेव्हा राजे पहिले विक्रमादित्य यांनी शिवरायांना मानाचा शिरपेच देऊन यथोचित सन्मान केला होता. या घटनेची आठवण म्हणून इथं एक चौथरा बांधलाय. त्यावर एका उंच स्तंभावर भगवा झेंडा फडकतोय. आम्ही इथं गेलो तेव्हा एक मोठा ग्रुप तिथं आधीच आलेला होता. तिथल्या शांत पवित्र वातावरणात त्यांचा दंगा सुरु होता. काहीजणं तर तिथं खो-खो खेळत होते. मग आम्ही फारवेळ तिथं न थांबता पुढे निघालो.
इथूनच पुढे आम्ही किल्ला बघायला गेलो. पण इथं मात्र निराशाच झाली. किल्ल्याच्या तटबंदी व्यतिरिक्त इथं बघण्यासारखं काहीच शिल्लक नाही.
यानंतर खरंतर ' जय विलास राजवाडा ' बघायला जायचं होतं. पण आम्ही ज्यांच्या घरी जेवायला गेलो होतो त्यांनीच राजवाडा आज बघायला मिळणार नाही असं सांगितलं होतं. जेव्हा संस्थानच्या राजांचे सध्याचे वंशज राजवाड्यात येतात तेव्हा पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. ही खाजगी मालमत्ता असल्यानं ते तिथे असताना राजवाडा पहाता येत नाही. त्या राजवाड्यात काकूंच्या घरुनच जेवणाचा डबा जात असल्यानं त्यांनी आधीच आम्हाला कल्पना दिली होती. माझी थोडी निराशा झाली होती पण नाईलाज होता.
एव्हाना सायंकाळ होत आल्यानं आम्ही इतरत्र कुठं न जाता परत फिरायचं ठरवलं. सकाळी येतानाच्या अनुभवावरुन परतीचा प्रवास दुसऱ्या मार्गानं करायचं ठरवलं. पण तिथंही अक्षरशः तशीच परिस्थिती होती. अत्यंत खराब रस्ता आणि वाहनकोंडीमुळं पून्हा घरी पोहोचायलाही दुप्पट वेळच लागला.
जव्हार संस्थान इसवी सन १३१६ पासून १९४८ पर्यंत अस्तित्वात होतं. त्यानंतर ते मुंबई इलाख्यात विलिन झालं. आताच्या पालघर जिल्ह्यातला हा जव्हार तालुका. इथल्या बहुतांश भागात आदिवासी वस्ती आहे. तसंच या तालुक्याचा बराचसा भूभाग डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांनी व्यापलाय. ठाणे शहरापासून १०० किमी. वर असलेलं जव्हार ठाणे जिल्ह्याचं ' महाबळेश्वर ' म्हणूनही ओळखलं जातं. इथं प्रामुख्यानं नागली, भात आणि वरई ही पिकं घेतली जातात. पूरक म्हणून इतरही पिकं आणि फुलं, भाज्या पिकवतात. इथला मोगरा दररोज मुंबईच्या मंडईत पाठवला जातो. इथल्या आदिवासींची वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. जय विलास राजवाडा, दाभोसा धबधबा, हनुमान पाॅईंट, जय सागर धरण, शिरपामाळ, भूपतगड किल्ला, बाणगंगा महादेव मंदिर इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळांनी नटलेला नितातसुंदर जव्हार पहाण्यासारखाच आहे. इथला निसर्ग एकदा तरी अनुभवावा असाच आहे.
गणेश चतुर्थीला कोकणातल्या घरी जाणं आणि त्यानंतर लगेचच वर्षासहलीच्या निमित्तानं कणकवलीला सावडावच्या धबधब्यावर मनसोक्त भिजणं झालं होतं तरीही पुन्हा निसर्गात रममाण व्हायला आमची पावलं जव्हारकडे वळली होती. आणि पुन्हा एकदा निसर्गाकडून खूप सारी उर्जा आम्ही घेऊन आलो.
- स्नेहल मोडक









No comments:
Post a Comment