Pages

Sunday, December 8, 2024

खम्मा घणी - २

               दिवस पाचवा - सकाळीच मुक्कामाचं ठिकाण सोडून जैसलमेर मधलं स्थलदर्शन करायला निघालो. जैसलमेर हे ' गोल्डन सिटी ' म्हणून ओळखलं जातं. पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेले पॅलेस आणि किल्ले सूर्यप्रकाशात सोनेरी रंगात चमकतात म्हणून या शहराला ' गोल्डन सिटी ' - ' सुवर्ण शहर ' म्हणतात. 

              ' गड़ीसर लेक ' - ११५६ मध्ये जैसलमेरचे संस्थापक 'राजा रावल जैसल' यांनी या तलावाची निर्मिती केली. त्याकाळी संपूर्ण जैसलमेर शहरासाठी पाणी पुरवठा करणारा हा एकमेव विस्तीर्ण जलाशय होता. त्यावेळी हा तलाव जैसलसर तलाव या नावानं ओळखला जात होता. नंतर १३६७ च्या दरम्यान राजा गड़सीसिंह यांनी या तलावाची पुनर्निर्मिती केली. तेव्हापासून हा तलाव ' गड़ीसर लेक ' म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण अशा या जलाशयाच्या काठावर शानदार स्मारकं, तीर्थस्थळं, लहानलहान मंडप आणि मंदिरंही आहेत. हा तलाव म्हणजे जैसलमेरचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारं संग्रहालयच आहे. इथं सातत्यानं पारंपरिक उत्सव, कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळच्या सोनकिरणांनी चमकणारा हा सुंदर तलाव पाहून आम्ही पुढं गेलो.

              गोल्डन फोर्ट ' - युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट असणारा हा ' सुवर्ण दुर्ग ' ११५६ मध्ये 'महाराज रावल जैसर सिंह' यांनी बांधलाय. सद्यस्थितीतही जैसलमेरच्या एकूण लोकसंख्येच्या १/४ लोकसंख्या या किल्ल्यात वास्तव्यास आहे. पिवळ्या रंगाच्या वाळूच्या दगडांनी बांधलेल्या विशाल भिंती सूर्योदयाच्या वेळी गहिऱ्या पिवळ्या रंगांनी चमकतात. आणि सायंकाळी सुर्यास्तसमयी सोनसळी रंगानी चमकत इथल्या सोनेरी वाळूत मिसळून जातात. म्हणून याला ' सुवर्ण दुर्ग ' हे नाव मिळालय. हा किल्ला त्रिकुटा टेकडीवर थार वाळवंटात स्थित आहे. १५०० फुट लांब आणि ७५० फुट रुंदीचा हा किल्ला टेकडीवर २५० फुट उंचावर वसलाय. याच्या सुरक्षेसाठी ३० मीटर उंचीची भिंत बाहेरच्या बाजूला आहे. तसंच संपूर्ण किल्ल्यात ९९ बुरुज आहेत. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ४ विशाल प्रवेशद्वारं आहेत जी मुख्य प्रवेशद्वाराला जोडतात. या किल्ल्यात ' राज महल पॅलेस -' जैसलमेरच्या महारावल यांचा पूर्वनिवास, ' बारी हवेली' - ब्राह्मण पुजाऱ्यांची हवेली, जैन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, नाथ हवेली, आणि अनेक व्यापाऱ्यांच्या हवेली हे सारं‌ पहाता येतं. संग्रहालयात पारंपरिक राजस्थानी पोषाख, आभुषणं, चांदीची, काचेची भांडी, शस्त्रास्त्रं हे सारं आहे. किल्ल्याच्या साऱ्या भिंती आणि महाल अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहेत. संपूर्ण राजस्थान मध्ये प्रत्येक हवेली, महाल आणि इतर वास्तू या सर्व ठिकाणी अतिशय नाजूक आणि अप्रतिम कोरीवकाम केलेलं आपल्याला पहायला मिळतं. यानंतर आम्ही अजून एक हवेली बघायला गेलो.

                ' पटवा हवेली ' -  सोन्या चांदीच्या व्यापारातील एका प्रमुख जैन पटवा परिवाराने बांधलेली ही ५ मजली 'पटवा हवेली'. ही हवेली पटवा परिवाराच्या समृद्धीचं आणि यशाचं प्रतिक आहे. याची निर्मिती जवळपास पाच दशकांत करण्यात आली आणि पाचही भावंडांनी आपापल्या हिश्शयाची निर्मिती केली. राजपूत आणि मुघल शैलीचं मिश्रण असलेली ही हवेली  पिवळ्या वाळूच्या दगडांचं नाजूक नक्षीकाम, कोरीव काम याने सजलेली आहे. यातल्या काही भागात अजूनही पटवा परिवार वास्तव्यास आहे. पिवळ्या रंगाच्या दगडांमुळे सूर्यकिरणात ही हवेली सुंदर दिसते. हवेलीच्या एका भागात संग्रहालय आहे. 'पटवा हवेली' बघून आम्ही पुढं एक जैन मंदिर बघितलं आणि मग गेलो एक विशेष स्थान बघायला. 

               ' कुलधरा गांव ' - एक झपाटलेलं गांव. जैसलमेर पासून १८ किमी. वर असलेलं हे कुलधरा गांव १२९१ मध्ये पाली भागातून आलेल्या कधान नावाच्या व्यक्तीनं वसवलं. मोठा तलाव खणला. हळूहळू ८४ गावं इथं वसली. पाली भागातून आलेले ब्राह्मण म्हणून यांना पालीवाल ब्राह्मण म्हणलं गेलं. कष्ट आणि तंत्रज्ञान विकासीत केल्यानं या लोकांनी कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जलसिंचनाचा उपयोग केला. हळूहळू प्रगती होत होती. गायी म्हशी पालन, मातीची भांडी बनवणं, इतर विविध व्यापार यांमुळे इथले लोक राजाला सर्वात जास्त कर देत होते. कुलधरामधल्या लोकांना लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेला होता. साधारण २०० वर्षांपूर्वी गावाचा दिवाण सलीम सिंह याची वाईट नजर कुलधरा गावातील पुजाऱ्याच्या सुंदर मुलीवर पडते. आणि तिला पौर्णिमेच्या आत आपणासमोर हजर करावं असा आदेश तो देतो. कुलधराच्या आजूबाजूची ८४ गावं विभागलेली असली तरी एकी होती. सगळ्या गावाची पंचायत बसली. संकट एका गावावर असलं तरी सगळ्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला. जिथं आपल्या मुली सुरक्षित नाहीत त्या गावाचा त्याग करायचा. शेती, व्यापार सारं सोडून, बरोबर नेता येईल तेवढंच सामान, गायीगुरं बरोबर घेऊन ८४ गावातील सगळ्या लोकांनी एका रात्रीत गाव सोडलं. एका रात्रीत गाव रिकामं करताना तडफडलेल्या गावकऱ्यांनी 'पुन्हा या गावात कुणीही वसू शकणार नाही' असा शाप दिला. आता इथली ओस पडलेली, अर्धवट कोसळलेली घरंदारं पहायला जगभरातून पर्यटक येतात पण सायंकाळी ६ वाजल्यानंतर मात्र इथं कुणीही राहू शकत नाही. ती ओसाड घरं रात्री तिथं थांबणाऱ्यांना भितीदायक अनुभव देतात. कुणीतरी कुजबुज करताना जाणवणं, अचानक आपल्या जवळून कुणी गेल्याचा भास होणं, घुंगरांचा, भांड्यांचा आवाज येणं असे भितीदायक अनुभव रात्री इथं येतात. त्यामुळं सायंकाळी ६ नंतर इथं कुणालाही थांबायची परवानगी नाही. गावातली ओस पडलेली घरं पहाताना त्या काळाची जाणीव होते. काही घरं अजूनही सुस्थितीत आहेत. पण बऱ्याचशा घरांची मात्र आता पडझड झाली आहे. अतिशय कष्टानं उभी केलेली आणि सुखसमृद्धीत नांदणारी घरं एका रात्रीत कायमची सोडून जाताना गावकऱ्यांना किती कठीण गेलं असेल याची त्या ओसाड गावात फिरताना सहज कल्पना येते. अशा परिस्थितीत हे गाव ' झपाटलेलं ' म्हणून ओळखलं जाणं साहजिकच आहे. हा एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही पुढं एक छान अनुभव घेण्यासाठी निघालो.

           'डेझर्ट कॅम्पिंग' - थरच्या वाळवंटामधल्या जैसलमेरमधलं डेझर्ट कॅम्पिंग अतिशय प्रसिद्ध आहे. या वाळवंटात कापडी तंबूमध्ये रहाण्यासाठी अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणापासून दूर या सॅन ड्युन्स मध्ये कॅम्प मध्ये रहाणं हा एक अतिशय वेगळा आणि सुंदर अनुभव आहे. दूरवर पसरलेल्या या सोनेरी वाळवंटात साहसी खेळ, उंट सफारी, जीप सफारी यांचा मनमुराद आनंद घेता येतो. आम्ही इथं पोहोचलो आणि आपापल्या तंबूमध्ये सामान ठेवून ताजतवानं होऊन उंट सफारीला गेलो. उंटावर बसण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. काश्मीर, वैष्णोदेवी, केदारनाथ आणि अशाच काही ठिकाणी जाऊन आल्यानं घोड्यावर बसायची थोडीफार सवय झाली आहे. पण उंटावर बसणं हा वेगळाच भाग आहे. आम्ही उंटावरुन  वाळवंटातच लांबवर गेलो. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा पहाता येतो. पण सूर्यास्ताला खूप वेळ असल्यानं आम्ही लगेच जीप सफारीला जायचं ठरवलं. जीपनेही खूपच लांबपर्यंत फिरवून आणतात. तिथे दुरवर ' बजरंगी भाईजान ' या चित्रपटाचं थोडं चित्रीकरण झालं होतं ते ठिकाण जीपने जाऊन पहाता येतं. मात्र हा प्रवास अतिशय चित्तथरारक असतो. मार्गातल्या वाळुच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवरुन या जीप सुसाट नेतात. खूप वेगळा आणि खास अनुभव असतो हा. ही जीप सफारी करुन परत आम्हाला उंटांनी जिथं सोडलं होतं तिथं आलो. इथल सूर्यास्त पहाणं हाही एक विशेष अनुभव असतो. साधारणपणे आपण सूर्यास्त सागरकिनारी, किंवा डोगराआड होतानाच पहातो. पण दूरवर पसरलेल्या सोनेरी वाळवंटातल्या सूर्यास्ताचं दृश्य वेगळच, भान हरपवणारं असतं. जसजसा तो कनकगोल अस्ताचलास जातो. तसतसं सारं वाळवंट सोनकिरणात चमकतं. सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून आम्ही तंबूत परत गेलो. 

              ' डेझर्ट कॅम्पिंग ' मध्ये रात्री पर्यटकांसाठी गायन वादन आणि नृत्याचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. आम्ही तिथं होतो त्या रात्रीही असाच कार्यक्रम आयोजित केलेला होता. यात आधी खास राजस्थानी संगीताचा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर नृत्याचा कार्यक्रम होता. या नृत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका वेगळ्या व्यक्तीमत्वाला जवळून पहायची बोलायची संधी मिळाली. नृत्य सुरु झालं आणि कलाकाराला पाहून हे काही वेगळंच आहे याची जाणीव झाली. सुरवातीला राजस्थानी नृत्याचं ' एकावर एक ठेवलेल्या मातीच्या घटांची उतरंड ' घेऊन सादरीकरण केलं. अतिशय बहारदार अशा नृत्यानंतर त्या व्यक्तीनं आपली ओळख दिली ती ऐकून आम्ही अक्षरशः थक्क झालो. नृत्य करणारा कलाकार हे आर्मी काॅलेज मध्ये हिंदी भाषा हा विषय शिकवतात. नृत्यासंदर्भात जपानसह अजून ४-५ देश ते फिरुन आले आहेत. स्वतः विविध शैलीच्या आणि शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देतात. याचबरोबर अनेक समारंभ, कॅम्पिंग साईटस् अशा ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करतात. हिंदी भाषेचे प्राध्यापक असूनही स्वानंदासाठी हा वेगळा छंद ते जोपासतात ही खरच अत्यंत कौतुकाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे हे नक्की. त्यांनी केलेली मशाल नृत्य आणि विविध साधनांह केलेली इतर नृत्य सारीच अप्रतिम. सायंकाळपासूनची उबदार थंडी एव्हाना वाढलीच होती त्यामुळं त्या थंडीत मोकळ्या प्रांगणात चमचमत्या ताऱ्यांसह ही नृत्य पहाणं हा खूप छान अनुभव होता. आजूबाजूचं सारं वातावरण सुंदरच होतं. या कार्यक्रमानंतर गरमागरम राजस्थानी भोजनाचा आस्वाद घेऊन आजूबाजूला थोडं फिरुन आम्ही टेन्टमध्ये गेलो. 

               सहाव्या दिवशी सकाळी तिथंच गरमागरम नाश्ता करुन टेन्ट सोडून निघालो. आमचं पुढचं शहर होतं जोधपूर'. वाळवंटाच्या मधोमध जोधपूर शहर वसलंय. त्यामुळं इथल्या अति उष्णतेपासून सुरक्षित रहाण्यासाठी आणि थंडाव्यासाठी इथल्या वास्तू, घरं निळ्या रंगात रंगवतात. आणि म्हणून या शहराला ' ब्लू सिटी ' म्हणतात. जैसलमेर हून जोधपूरला पोहोचल्यावर आम्ही एक पॅलेस बघायला गेलो. ' उमेद भवन पॅलेस ' - जोधपूरचे महाराज ' उमेद सिंह ' यांनी १९४३ मध्ये हा राजवाडा बांधलाय. या राजवाड्याच्या निर्मितीचा इतिहास एका संतांने त्याकाळी दिलेल्या शापाशी निगडित आहे. एका संत महात्म्याने राठोड काळात जोधपूर मध्ये दुष्काळ पडेल असा शाप दिला होता. त्याप्रमाणे महाराज प्रतापसिंह यांचा ५० वर्षांचा शासनकाळ संपल्यावर जोधपूर मध्ये लगेच पुढची ३ वर्षं सलग भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तिथल्या जनतेनं तत्कालीन महाराज उमेद सिंह यांच्याकडे रोजगार देण्याची मागणी केली होती. तेव्हा महाराजांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून या राजवाड्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. वर्तमान स्थितीत या राजवाड्यात ३४७ खोल्या आहेत. हा राजवाडा ताज हॉटेल चाच एक भाग आहे. या वाड्यात ३ भाग आहेत. एका भागात ताज हॉटेल आहे, एकात संग्रहालय आहे आणि एका भागात शाही परिवार वास्तव्यास आहे. सद्यस्थितीत या राजवाड्याचे मालक  ' गज सिंह ' आहेत.  इथल्या संग्रहालयात काचेची, चिनी मातीची भांडी, कलात्मक वस्तू, अतिशय सुंदर अशी मोठमोठी भित्तीचित्रं, जभरातून जमवलेली कलात्मक अशी वेगवेगळी जुनी घड्याळं, शस्त्रास्त्र यांचा समावेश आहे. याशिवाय इथं पूर्वीच्या काळातल्या गाड्यांचं ' व्हिंटेज कार्स ' चं स्वतंत्र संग्रहालय आहे. ज्यात रोल्स राईस, मर्सिडीज-बेंज, ऑस्टिन मार्टिन सारख्या गाड्या पहाता येतात. अतिशय सुंदर असा राजवाडा पाहून आम्ही मुक्कामी गेलो.

              सातव्या दिवशी सकाळी मुक्काम सोडून जोधपूरमधलंच स्थलदर्शन करायला निघालो. ' जसवंतसिंह समाधी ' - महाराज सरदार सिंह यानी १८९९ मध्ये आपले पिता ' जसवंतसिंह ' यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलं. समाधीचा मुख्य हाॅल हा मंदिरासारखा बांधलाय. इथं नित्यनेमानं पूजा केली जाते. आवारात राजपरिवारीतल इतर काही व्यक्तींच्याही समाधी आहेत. 'जसवंतसिंह' यांच्या चितेत एका मयुराने उडी घेऊन अग्नीर्पण केलं होतं. त्या मयुराची समाधधीही सुरुवातीलाच आहे.  या स्मारकाच्या आधी एक तलाव आहे. आणि त्याच्यासमोरच ' महाराज जसवंतसिंह ' यांचा अश्वारूढ पुतळा आहे. हे समाधीस्थळ बघून आम्ही पुढं गेलो.

             ' मेहरानगढ किल्ला ' - १४५९ मध्ये राठोड राजा ' राव जोधा ' यांनी हा किल्ला बांधला. किल्ला ज्या टेकडीवर बांधला तिथं आधी एक ' चिडियानाथ बाबा ' नावाचे साधू वास्तव्यास होते. राजाला त्याच जागी किल्ला बांधायचा असल्यानं त्यानं साधूला ती जागा सोडून जायला सांगितलं. साधूनं नकार देताच त्याला तिथून जबरदस्तीनं निघून जायला लावलं आणि तिथं किल्ल्याचं बांधकाम सुरु केलं. मात्र साधूच्या तपश्चर्येत विघ्न आल्यानं त्यांनं राजाला कधी सौख्य लाभणार नाही कारण त्याला जोधपूर मध्ये पाणीच मिळणार नाही असा शाप दिला. अखेर राजानं त्या साधूच्या कुटीजवळ एक कुंड आणि शिवमंदिर बांधलं. जवळपास ११ मजल्यांएवढ्या उंचीचा हा किल्ला अप्रतिमच आहे. या किल्ल्यात वेगवेगळे महाल बांधलेत. ' फुल महल ' - अतिशय नाजूक अशा कलाकुसरीने सजलेला हा एक प्रशस्त हाॅल आहे. ' शीश महल ' - या महालात संपूर्ण छत आणि भिंतींवर आरसे लावलेत . इथही एक दिवा लावला की त्याची अनेक प्रतिबिंब आरशात दिसतात आणि पूर्ण महाल लख्ख उजळतो. ' झांकी महल ' - राजघराण्यातील स्त्रिया या महालात रहात. आणि या महालाच्या झरोक्यांमधून बाहेर होणारे कार्यक्रम पहात असत. याचबरोबर मोती महल, दौलत खाना, जनाना देवडी, चामुंडा माता मंदिर या किल्ल्यात आहे. एका भागात मोठं संग्रहालय आहे. किल्ल्याच्या बाहेरचा भाग स्थानिक कलाकारांना दुकानांसाठी दिलाय. खूप उंच असणारा हा किल्ला पहायला पायी चढून जाता येतं तसंच आता तिथं लिफ्टची व्यवस्था केली आहे. संपूर्ण राजस्थानमधले अत्यंत नाजूक अशा कोरीव कामानं आणि कलाकुसरीनं सजलेले अवाढव्य राजवाडे, महल, किल्ले पाहून या साऱ्यांच्या निर्मितीसाठी तिथल्या कलाकारांनी किती प्रचंड मेहनत घेतली असेल याचाच विचार मनात येतो. अतिशय सुंदर असा हा किल्ला बघून आम्ही जयपूरला निघालो. रात्री जयपूरला पोहोचलो. भोजन करुन परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर गेलो. 

               पिंक सिटी जयपूर, गोल्डन सिटी जैसलमेर आणि ब्लू सिटी जोधपूर याबरोबरच पुष्करसह बिकानेर अशी राजस्थानची अतिशय सुंदर, अविस्मरणीय सहल मनात आणि छायाचित्रात साठवून आठव्या दिवशी सकाळी विमानानं आम्ही परतीचा प्रवास केला.

- स्नेहल मोडक






   









   


No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...