Pages

Wednesday, April 16, 2025

उत्तर वाहिनी

             'चैत्र महिना' आणि 'उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा' हे एक वेगळंच अध्यात्मिक समीकरण आहे. 'पश्चिम वाहिनी नर्मदा मैया' काही ठिकाणी 'उत्तर वाहिनी' होते. आणि त्या भागात तिची चैत्र महिन्यात केलेली परिक्रमा ही संपूर्ण पायी परिक्रमेइतकीच पुण्यदायी असते. त्यामुळे नर्मदा मैयाचे सारे भाविक चैत्र महिन्याची आतुरतेनं वाट पहात असतात. कारण सर्वच भक्तांना मैयाची ३२०० किमीची परिक्रमा पायी करणं शक्य होत नाही. 'तिलकवाडा' ते 'रामपुरा' या भागात ही 'नर्मदा मैया' उत्तर वाहिनी होते. म्हणून या भागात तिची परिक्रमा केली जाते. 

               आम्हीही दरवर्षी प्रमाणे ९ तारखेला रात्री परिक्रमेसाठी प्रस्थान केलं. भल्या पहाटे वडोदरा इथं पोहोचलो. तिथं आमच्या दोन्ही मोठ्या गाड्या तयारच होत्या. त्या गाडीमधून आम्ही दिड तासातच आमच्या मुक्काम स्थानी पोहोचलो. मुक्कामी पोहोचून थोडं ताजतवानं होऊन लगेचच जवळच असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलो. हे स्नानासाठीचं आमचं आवडतं स्थान. इथं 'नर्मदा मैया', छोटा उदयपूर येथून येणारी 'ओरसंग नदी' आणि 'गुप्त सरस्वती' असा त्रिवेणी संगम आहे. इथं आम्ही संगमजलात उतरलो, जळात थोडी मजा मस्ती करत मस्त स्नान केलं. नर्मदा मैयाच्या कुशीत शिरल्यावर येणारी अनुभूती ही वेगळीच असते. अगदी आपल्या आईच्या कुशीत शिरल्यावर ज्या भावना आपल्या मनात येतात त्याच भावना नर्मदा जळात उतरल्यावर असतात. त्यामुळं पाण्यातून बाहेर यायची इच्छा नसतानाही स्नान करुन मुक्कामी आलो. सारी तयारी करुन उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण व्हावी यासाठी स्नान करुन येतानाच कुपीत भरुन आणलेल्या नर्मदा जलाची विधीवत संकल्प पूजा केली. पूजा करुन नाश्ता केला आणि परत दोन्ही गाड्यांनी मंदिर दर्शनासाठी निघालो.

                 सर्वात आधी आम्ही  बडोदा - राजपिपला मार्गावर नंदोड तालुक्यातील एका मंदिरात गेलो. 'श्री क्षेत्र गरुडेश्वर' हे वासुदेवानंद सरस्वती यांचं समाधी स्थान. या मंदिरात त्यांच्या पादुका आहेत तसंच श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी असलेल्या या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो. तिथून आम्ही 'शुलपाणी' इथं पोहोचलो. इथल्या प्राचीन 'शुलपाणेश्वर' मंदिराची निर्मिती पांडवांनी केली असल्याचे उल्लेख महाभारतासह स्कंदपुराणात आढळतात. मात्र १९९४ मध्ये सरदार सरोवर प्रकल्पामध्ये हे मंदिर पाण्याखाली गेलं. त्यामुळं नंतर सध्या अस्तित्वात असलेलं नूतन मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिरात श्री महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो.

                  'भालोद' एकमुखी श्री दत्तात्रेयाचं मंदिर आणि श्री प्रतापे महाराजांचा आश्रम. आमचं हे अतिशय आवडतं स्थान. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आम्ही भालोदला जातोच. इथं श्री दत्तात्रेयांच्या दर्शनानं जसं अतीव समाधान मिळतं तसंच श्री प्रतापे महाराजांना भेटल्यावरही छान सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळं इथं जाणं आमच्यासाठी खासच असतं. आम्ही इथं गेल्यावर आधी श्री दत्तगुरुंचं दर्शन घेतलं, तिथच समोरच्या औदुंबर वृक्षाच्या खोडात उमटलेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणपादुका असलेल्या मोठ्या हाॅलमध्ये येऊन बसलो. ज्यांच्यांसाठी आम्ही तिथं थांबलो होतो ते श्री प्रतापे महाराज पाचच मिनिटांत तिथं येऊन स्थानापन्न झाले. त्यांना नमस्कार करुन आमचा संवाद सुरु झाला. आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ तारखेला पहाटे उत्तर वाहिनी परिक्रमा करणार असल्याचं त्यांना सांगितलं. १९४३ साली श्री जयराम दासजी ( तपस्वी बाबा) यांनी उत्तर वाहिनी परिक्रमा सुरु केली होती पण ही दासजी यांनी सुरु केलेली उत्तर वाहिनी परिक्रमा काही कारणवश बंद झाली होती. नंतर श्री प्रतापे महाराजांनी ती परत सुरु केली. त्यामुळं त्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधायला आम्हाला नेहमीच आवडतं. दरवेळी नवीन अध्यात्मिक माहिती त्यांच्याकडून मिळते. त्यांच्याशी बोलत असतानाच अजून एका छानशी घटना घडली. सायंकाळ झाली होती आणि त्याच्या आगमनाचीही वेळ झाली होती. अचानक बाहेर पायरीशी मयुराचा केकारव ऐकू आला. आणि आमच्याशी  बोलता बोलता महाराज उठले आणि त्या मयुराला बोलवू लागले. आम्ही सगळे थोडं लांब होताच त्या मयुराने अतिशय डौलाने आश्रमात प्रवेश केला. त्याला पादुकांच्या थोडं जवळच महाराजांनी खायला घातलं ते तो अगदी तल्लीन होऊन खाऊ लागला. रोज सकाळ संध्याकाळ न चुकता हा मयुर त्या आश्रमात येतो. हे आम्हाला माहित होतंच. पहिल्यांदा आश्रमात गेलो तेव्हा आम्हाला त्या मयुराचं दर्शन बाहेरच घडलं होतं. पण यावेळी मात्र प्रत्यक्ष आश्रमात अगदी जवळून त्याला पहाता आलं. अतिशय सुंदर असा अनुभव होता तो. कदाचित आम्ही बरेच जणं तिथं असल्यानं तो फार आतपर्यंत न येता खाणं खाऊन निघून गेला. पण अगदी जवळून आम्हाला हे सुंदर दृश्य पहायला मिळालं आणि खूपच आनंद झाला. नंतर महाराजांना त्यांच्या सुरु असलेल्या कार्यासाठी नेहमीप्रमाणं आमच्या कडून खारीचा वाटा अर्पण केला. मी त्यांच्या आश्रमात वारंवार होणाऱ्या कन्या पूजनात कन्यकांना देण्यासाठी काही वस्तू नेल्या होत्या. त्या महाराजांना देताच त्यांनी दोनच दिवसांनी कन्या पूजन होणार आहे तेव्हा त्या वस्तू कुमारिकांना देईन असं सांगितलं आणि मला खूपच समाधान वाटलं. कारण त्यामुळं मैयाच्या चरणी माझी सेवा रुजू होणार होती. परत एकदा दर्शन घेऊन महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो. रात्री मुक्कामाच्या ठिकाणीच भोजन करुन लगेच निद्रादेवीच्या आराधनेसाठी गेलो. 

                    रात्री २ वाजता उठून आन्हिकं आवरुन बरोबर ३ वाजता गाडीने जिथून परिक्रमा सुरु करणार तिथं म्हणजे 'वासुदेव कुटिर' इथं निघालो. अर्ध्या तासात तिथं पोहोचलो. श्री मारुतीराया आणि श्री वासुदेवानंद सरस्वती यांच दर्शन घेऊन ४.१५ वाजता प्रत्यक्ष परिक्रमेला सुरुवात केली. 'तिलकेश्वर महादेवाचं' आणि पुढे नर्मदा मैयाचं  दर्शन घेऊन पुढं निघालो आणि हळूहळू परिक्रमा मार्गातले बदल जाणवायला लागले. गतवर्षी थोड्या सुधारणा झाल्याच होत्या. परिक्रमेचा सुरुवातीचा थोडा मार्ग म्हणजे डांबरी सडक आणि दोन्ही बाजूनी दाट हिरव्यागार केळीच्या बागा असा आहे. पण पुढं जेव्हा तो मार्ग नदीकाठी उतरतो तेव्हा सुरुवातीची काही वर्षं उंचसखल मार्ग होता. म्हणजे अक्षरशः एक पाऊल उंचावर एक पाऊल खाली असं कसरत करत चालावं लागायचं. पण गतवर्षी हा मार्ग थोडा सपाट केला होता आणि यावर्षी तिथं नीट रस्ताच तयार केलाय. त्यामुळं आता पूर्ण उत्तरतटावरची परिक्रमा सहज सोपी झालीय. मैयाच्या किनाऱ्याजवळून मैयांचं सुंदर रुप पहात, नामस्मरण करत, मधेमधे मैयाशी मनोमन संवाद करत, पहाटेची नीरव शांतता अनुभवत मी सगळ्यांबरोबर चालत होते. नर्मदा मैयाचं 'मगर' हे वाहन आहे. या मगरीचंही छान दर्शन आम्हाला नदीपात्रात घडलं. उत्तरतटावरची परिक्रमा पूर्ण करत आम्ही 'नंदी घाटा'वर पोहोचलो आणि खूप छान दृश्य पहायला मिळालं. 'नंदीघाटा' वर आधी भव्य अशी नंदीची मूर्ती होती ती २०२३ साली आलेल्या पूरात वाहून भंगून गेली होती. आता यावर्षी तिथं बारा मोठ्ठी ज्योतिर्लिंग ठेवण्यात आली आहेत. 

               यावर्षी गुजरात सरकारनं परिक्रमा मार्गावर खूप छान सुविधा निर्माण केल्या आहेत. मार्ग / रस्ता तर नीट केलाच आहे. पण जिथं तट परिवर्तन केलं जातं तिथं दोन्ही बाजूला खूपच भव्य तंबू उभारले आहेत. आतमध्ये खूप साऱ्या खुर्च्या, पंखे, प्यायचं पाणी अशी सुंदर व्यवस्था भाविकांसाठी केली आहे. तसंच छोट्या तंबूमध्ये नर्मदा स्नानाची व्यवस्था केलीय. नदीपात्रात बऱ्याच मगरी असल्यानं आता सुरक्षेच्या कारणास्तव नर्मदेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांना उतरु देत नाहीत. आम्ही ११ तारखेला परिक्रमेत होतो. त्याच्या आदल्याच सायंकाळी एका स्थानिक मच्छीमाराला पात्रातल्या मगरीनं गिळंकृत केलं होतं. त्यामुळं दुसऱ्या दिवशी पोलिस तिथं फारच लक्ष ठेवून होते. त्यामुळं नदीपात्रात उतरुन स्नान करण्याची संधी कुणालाच मिळाली नाही. तट परिवर्तन करण्यासाठी नावेतून पलिकडल्या तीरावर जावं लागतं. आम्हीही दोन नावांमधून पलिकडे पोहोचलो. त्यासाठी आम्हाला बिलकुल थांबावं लागलं नाही. यावेळी खूप गर्दी नव्हती. आम्ही नावेतून जात असताना सहस्त्ररश्मीचं आगमन झालं आणि मैयाचं जल केशररंगात चमकू लागलं. जेमतेम १० मिनिटांचा प्रवास पण  खूप छान वाटत होता. परिक्रमेला जातान आम्ही आदल्या दिवशी संकल्प पूजन केलेल्या नर्मदा जलाच्या कुपी बरोबर घेतल्या होत्या. त्यातलं थोडं जल नदीपात्रात अर्पून परत त्यात थोडं 'नर्मदा जल' भरुन घेतलं. याला 'तीर्थमिलन' असं म्हणतात. नावेतून पलिकडे आम्ही दक्षिण तटावर पोहोचलो. 

                   दक्षिण तटावरचा परिक्रमेचा बराचसा मार्ग डांबरी रस्त्यावरुनच आहे. इथं पोहोचेपर्यंत  दिवस छान उजळला होता. त्यामुळं या मार्गावर ठिकठिकाणी सेवा म्हणून साऱ्या भाविकांना लोकं आपापल्या परीनं चहा, नाश्ता, सरबत, ताक, पाणी, फळं हे सारं देत होते. अधमधे थांबत प्रसाद म्हणून घोटभर चहा किंवा भांडपर ताक पीत आम्ही पुढं चालत होतो. अखेरच्या सिताराम बाबांच्या आश्रमात पोहोचून तिथं जरासा प्रसाद घेऊन आम्ही परत पायऱ्या उतरुन नर्मदा मैयाच्या किनारी गेलो.‌ इथं उतरल्यावर जवळपास दोन किमीचा मार्ग पूर्णपणे नदीपात्रातील दगडगोट्यांमधून पार करावा लागतो. पण यावेळी इथंही छान रस्ता तयार करण्यात आलाय. त्या रस्त्यावरुन चालत आम्ही पुलाजवळ पोहोचलो. पूर्वी इथूनही तट परिवर्तनासाठी नावेतूनच जावं लागायचं. पण गतवर्षीपासून इथं पूल तयार करण्यात आलाय. इथही दोन्ही बाजूला गुजरात सरकारनं भव्य तंबू उभारले आहेत आणि त्यात भाविकांना आराम करण्यासाठी खुर्च्या, पंखे उपलब्ध करुन दिलेत. तसच इथंही छोट्या छोट्या तंबूमध्ये नर्मदा स्नानाची व्यवस्था केली आहे. आम्ही या तंबूमध्ये एकत्र बसून थोडावेळ विश्रांती घेतली गप्पा मारल्या आणि पूल पार करुन वासुदेव कुटिर कडे निघालो. इथंही नदीपात्रातल्या दगडगोट्यांमधून जावं लागायचं तिथंही छान मार्ग केलाय. वासुदेव कुटिर किनाऱ्यापासून थोडं उंचावर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. पण त्यापुढं मात्र घसरणाऱ्या मातीची उंच चढण चढावी लागते. आणि तिथं मला भीती वाटतेच. अक्षरशः भीतभीत, याचा आधार घेत ती चढण मी एकदाची पार करते आणि सुटकेचा निःश्वास सोडते. एकदाचा हा रस्ता पार करुन अखेर आम्ही वासुदेव कुटिरच्या प्रांगणात पोहोचलो. मंदिरात जाऊन तिथल्या महादेवाला बरोबरचं थोडं नर्मदा जल अर्पण करुन परिक्रमा पूर्ण केली. त्यानंतर वासुदेव कुटिरच्या समोरील मंडपातच कन्या पूजन केलं. सर्वजण परिक्रमा पूर्ण करुन आल्यावर परत गाडीने मुक्कामी पोहोचलो. लगेच तयारी करून परिक्रमा पूर्तीची म्हणजेच संकल्प पूर्तीची पूजा केली. यावेळी गर्दी कमी असल्यानं आणि लवकर सुरुवात केल्यानं आमची परिक्रमा अतिशय उत्तम रीतीनं पूर्ण झाली होती.

                      नर्मदा मैयानं आम्हा सर्वांना अतिशय सहज सुंदर परिक्रमा घडवली होती. मैयाया आशीर्वादानं आमच्या बरोबर असलेल्या काही ज्येष्ठ भाविकांनाही अगदी सहज, आनंदात ही परिक्रमा पूर्ण करता आली. अशा परिक्रमेच्या निमित्तानं एक सुंदर अध्यात्मिक तृप्ती आपल्याला मिळते एवढं मात्र खरं. 

                      संकल्प पूर्ती ची पूजा करुन, भोजन करुन आवरुन मुक्कामाचं ठिकाण सोडून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. गांधीनगर रेल्वे स्टेशन वर आम्ही पोहोचलो. स्टेशनपासून हाॅटेल लांब असल्यानं रात्रीचं भोजन तिथूनच घेऊन येऊन ट्रेनमध्ये च खाल्लं. भोजन करुन निद्राधीन झालो. अर्थात मला निद्रादेवी प्रसन्न होणं अशक्यचं होतं. कारण आता मला वेगळीच ओढ लागली होती. 

                      भल्या पहाटे आम्ही जूनागढ स्टेशन वर उतरलो. तिथून रिक्षानं तलेटीला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. वाटेत कळलं रोप वे आदल्या दिवसापासून बंद आहे. आजही सुरु होण्याची शक्यता कमी आहे. झालं, सगळ्यांच्या मनात चलबिचल सुरु झाली. पण माझं मन एकदम शांत होतं. सारी आन्हिकं आवरुन आम्ही दर्शनासाठी निघालो. 'हनुमान जयंती' असल्यानं 'लंबे हनुमानजी'च्या मंदिरात खूप गर्दी होती. नुकताच जन्मसोहळा झाला होता. पण आम्हाला सगळ्यांनाच अतिशय छान दर्शन मिळालं. नित्याप्रमाणे मारुतीरायाचं दर्शन घेऊन, प्रार्थना करून आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायला गेलो. पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोप वे जवळ गेलो. तिथं रोप वे ची ट्रायल सुरू होती. वारा नसेल तर तात्पुरता रोप वे सुरू करण्यात येईल असं आम्हाला सांगण्यात आलं. दहा पंधरा मिनिटांतच रोप वे सुरू होणार आहे असं सांगून ज्यांनी आधी तिकिटं काढली होती त्यांनाच रोप वे साठी प्रवेश देण्यात आला. पुढच्या दहा मिनिटातच आम्ही ट्रॉलीत बसलो. पायथ्याशी वातावरण जरी अगदी साधं असलं तरी वर गिरनार वर मात्र परिस्थिती वेगळीच होती. सन्नाट वारा वाहत होता आणि आमची ट्रॉली अतिशय हळूहळू वर जात होती. ट्रॉलीतून जाताना पायथ्याशी असलेल्या जंगलात बरेचदा अनेक मोर दिसतात तसे आम्हाला चार-पाच मोर पाहायला मिळाले. ट्रॉली थोडीशी वर गेली आणि एकदम धुकं दाटलं. सन्नाट वारा आणि आजुबाजुला पसरत चाललेलं दाट धुकं, छानच वातावरण होतं. ट्रॉलीतून उतरून अंबामातेच्या मंदिराशी पोहोचलो आणि मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलो. सगळीकडे 'नभ उतरु आलं' अशी शुभ्र नभाची दुलई पसरली होती. अगदी जुलै, ऑगस्ट मध्ये असतं तसं दृश्य होतं. या परिस्थितीत रोपवे मात्र कुठल्याही क्षणी बंद होऊ शकत होता. पण मनात कुठलीही आशंका न येता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. गोरक्षनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन परत पुढे श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाला निघालो. इथंही कशी कुणास ठाऊक पण फार गर्दी नव्हती. आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि इतकावेळ पापण्यांआड अडवलेलं पाणी ओघळलंच. कारण तब्बल तीन महिन्यांनी श्री दत्तगुरुंचं दर्शन घडलं होतं.‌ बरोबर नेलेलं सारं अर्पण केलं आणि नतमस्तक झाले. यावेळचं हे दर्शन आमच्यासाठी जरा जास्तच महत्वाचं होतं. कारण दत्तगुरुंनी माझी एक इच्छा अनपेक्षितपणे जशीच्या तशी पूर्ण केली होती. साहजिकच त्यांच्या दर्शनासाठी मन आसुसलं होतं. दर्शन घेऊन तृप्त, शांत मनानं आम्ही मंदिरातून बाहेर येऊन थोडं खाली उतरुन तिथल्याच एका ठिकाणी बसून नेहमीप्रमाणं थोडं गुरुचरित्राचं वाचन केलं. नंतर अखंड धुनीचं दर्शन, प्रसाद घेऊन परत निघालो. गोरक्षनाथांचं परत दर्शन घेऊन अंबामातेचही दर्शन घेतलं. रोप वे जवळ आलो तर तिथले कर्मचारी घाईने निघायला सांगत होते. वारा फारच वाढल्यानं रोप वे बंद करावा लागणार होता.आम्ही ट्राॅलीत बसलो पण ती हळूहळू च जात होती. थोडं पुढे जाऊन दोन - तीन मिनिटं थांबलीच. वारा फारच जोरदार होता. पण अखेर संथगतीने ट्राॅल पायथ्याशी पोहोचली. नेहमी सारखं  दर्शन घेऊन ११ वाजता पायथ्याशी आलो होतो. श्री दत्तगुरुंच्या कृपेनं रोप वे जाऊन येऊन बिलकुल त्रास न होता अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. 

                   मुक्कामी थोडा आराम करुन दुपारी २ वाजता परत दोन मोठ्या गाड्यांनी निघून नाग मंदिर, भालका तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोरटी सोमनाथचं दर्शन घेऊन वाटेतच ठरलेल्या हाॅटेलमध्ये जेवून मुक्कामी परत आलो. 

                   दुसऱ्या दिवशी दुपारी परतीच्या प्रवासाला लागलो.

                   खरंतर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, गिरनार हे आमच्यासाठी नेहमीचंच आहे. पण तरीही प्रत्येक वेळी सुंदर अनुभव येतात आणि मग लेखणीतून व्यक्त व्हावंसं वाटतंच. यावेळी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेत भाविकांसाठी महाकुंभाच्या धर्तीवर खूपच छान व्यवस्था करण्यात आली होती. परिक्रमेचं हे बदलतं रुप पाहून खरंच खूप छान वाटलं. असही ही परिक्रमा गिरनारच्या तुलनेनं सोपी होतीच पण यावेळी ती अधिकच सहज सुलभ झाली. मैयानं आम्हाला  खरंच खूप छान परिक्रमा घडवली. पण त्यानंतर गेलेल्या आमच्या दुसऱ्या मोठ्या ग्रुप ला मात्र प्रचंड गर्दीचा त्रास झाला. त्यांनी १३ तारखेला परिक्रमा केली. त्यादिवशी तट परिवर्तनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे नावेतून पलिकडे जाण्यासाठी किमान तीन तास वाट पहावी लागत होती. म्हणून तटपरिवर्तनासाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसंच यावर्षी संपूर्ण परिक्रमा मार्गावर पूर्वीपेक्षा जास्त विद्युत दिवे, व्यवस्थित रस्ता यामुळे रात्रीही भाविक परिक्रमा करत आहेत. उत्तरोत्तर भाविकांची वाढत जाणारी संख्या आणि त्या दृष्टीने गुजरात सरकारनं त्यांच्यासाठी केलेली व्यवस्था कौतुकास्पद. आता ही २१ किमी. अंतराची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा खरंच सहज सुलभ झाली असल्यानं प्रत्येकानं एकदा तरी हा अनुभव घ्यावाच. अर्थात परिक्रमेत नुसतं चालणं हा उद्देश नसावा. त्या परिक्रमेत मैयाच्या जास्तीत जास्त सहवासात रहावं, मनानं तिच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करावा तरच ती खरी परिक्रमा ठरेल हे नक्की.

|| त्वदिय पादपंकजम् नमामि देवी नर्मदे ||

- स्नेहल मोडक

  








No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...