Pages

Thursday, June 19, 2025

नक्षी

पाऊस रेशीमधारेत बरसून जातो

रेजांवरती सुंदर खूणा ठेवून जातो

     मला भिजवाया तो खिडकीत येतो

     लोलक थेंबांचे खूपसे देऊन जातो 

जणू सुरेख मोत्याची माळ भासते

मंत्रमुग्ध होऊन मी ती पहात राहते

     मौक्तिकमाला छायाचित्रात साठवते

     काही क्षणांत थेंबांची नक्षी ओघळते

- स्नेहल मोडक



Monday, June 16, 2025

मृग

पाऊस मृगाचा बेधुंद बरसतो

मृदगंधाने सारा आसमंत भरतो

चंचल सौदामिनी नभी लखलखते

मेघमृदुंगासह मग आकाश गर्जते

छतावरी अवखळ पागोळी धावते

अन भुईवरी मग सुंदर तळे साचते

बेभान वाऱ्यात तरुवेल सळसळते

भिरभिरते पर्ण त्या जळात तरंगते

कुठे वळचणीस एक पाखरु थांबते

इवले काळीज मात्र त्याचे थरथरते

मृगधारेत तृषार्त अवनी तृप्त होते

कुशीत तिच्या अलवार बीज रुजते

खेळ हा सारा मी मुग्धपणे पाहते

तुषार झेलत तनुवरी मी मोहरते

ऋतू पावसाळा जरी नेमेची येतो

प्रत्यही नवाच अन हवासा वाटतो 

एकाचवेळी सर्वत्र सारखाच बरसतो

तरी प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो

- स्नेहल मोडक

Wednesday, June 11, 2025

साथ

केशर रंगात पश्चिमा नाहते

सांज अलवार नभी उतरते

सांजसावल्या गडद होती

पाखरे घरट्यात परतती

कोलाहल सारा शांत होतो

एक अनामिक हुरहुर लावतो

मन हळवे कातर कातर होते 

अन त्या राघूसम एकले उरते

थकला रावा जरा विसावतो

एकाकी मनास अबोल साथ देतो

- स्नेहल मोडक

कविता

नक्षी

पाऊस रेशीमधारेत बरसून जातो रेजांवरती सुंदर खूणा ठेवून जातो      मला भिजवाया तो खिडकीत येतो      लोलक थेंबांचे खूपसे देऊन जातो  जणू सुरेख मोत...