९ तारखेला सकाळी 'बालताल' चा बेस कॅम्प सोडून आम्ही निघालो. बेस कॅम्प पासून साधारण दोन किमी. अंतरावर पार्किंग लॉट होता. तिथपर्यंत जाऊन आम्ही आमच्या गाडीनं पुढं 'श्रीनगर'ला निघालो. श्रीनगरला जाण्याआधी 'बालताल' पासून ७८ किमी. अंतरावर असलेल्या 'खीर भवानी माता' मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. मात्र जे जे रस्ते त्या मंदिराकडे जात होते ते सारे रस्ते बंद करण्यात आले होते. कुठल्याही मार्गानं मंदिरात जाता येणार नव्हतं. सगळ्याच रस्त्यांवर सैनिक उभे होते. काहीतरी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यानं मंदिरात जाता येणार नसल्याची माहिती मिळाली. अखेर आम्ही दुपारी सरळ श्रीनगरला पोहोचलो. मुक्कामी जाऊन थोडा आराम करुन सायंकाळी श्रीनगर फिरायला निघालो. सर्वांत आधी 'लाल चौक' पहायला गेलो. लाल चौकात थोडं फिरुन नंतर 'दल लेक' बघायला गेलो. तोपर्यंत पूर्ण अंधार झाल्यानं शिकाऱ्यातून न फिरता फक्त तिथंच आजूबाजूला फिरुन जवळच्याच हाॅटेलमध्ये जेवून मुक्कामी परत आलो.
दुसऱ्या दिवशी म्हणजे १० तारखेला सकाळी परत आम्ही फिरायला निघालो. आधी आम्ही 'गुलमर्ग' ला फिरायला गेलो. 'अमरनाथ' व्यतिरिक्त बाकी सारंच आम्हा काही जणांचं पाहून झालं असल्यानं खरं तर सगळी ठिकाणं परत पहाण्याची हौस नव्हती. म्हणून आम्ही काही जणांनी गुलमर्ग ला असलेल्या प्राचीन शंभू महादेवाचं दर्शन घेऊन तिथंच थोडावेळ बसायचं असं ठरवलं. सारं काश्मीर आणि गुलमर्ग एका वेगळ्याच आणि अप्रतिम सौंदर्यानं सजलं होतं.थंडीच्या दिवसांत जसं सारं काश्मीर सुंदर बर्फमय होतं तसंच वर्षा ऋतू मध्ये नाजूक शुभ्र पांढऱ्या फुलांची मखमली दाट दुलई लपेटून सजतं. सारं गुलमर्ग अशा शुभ्र फुलांनी नटलं होतं. आम्ही हा अप्रतिम नजारा अनुभवतच मंदिरात गेलो. मंदिरात बिलकुल गर्दी नसल्यानं छान दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही तिथेच बसलो आणि अर्थातच तिथल्या सवयीनुसार घोडेवाले गाडीवाले आमच्या मागे काही पॉईंट फिरण्यासाठी घोड्यावरुन किंवा गाडीमधून यावं म्हणून मागं लागलेच. घोड्यावरुन अमरनाथला भरपूर फिरावं लागल्यानं परत घोड्यावरुन जायची इच्छा नव्हती. अखेर हो-नाही करत आम्ही ६-७ जणं जीपने काही ठिकाणं फिरायला गेलो. बाकीचे आधीच घोड्यावरुन फिरायला गेले होते. जीपने आम्ही 'महाराजा हरि सिंह' महाल, गोल्फ कोर्स आणि इतर काही ठिकाण पाहायला गेलो. हे सारं पाहून, मनसोक्त निसर्गसौंदर्य अनुभवून, छायाचित्रं काढून आम्ही परत निघालो.
'गुलमर्ग' फिरुन नंतर आम्हाला खरंतर 'श्रीनगर' मधल्या 'श्री शंकराचार्य' मंदिरात जायचं होतं. पण ते मंदिर सायंकाळी ४.३० वाजताच बंद होत असल्यानं आणि आम्ही त्या आधी न पोहोचल्यानं त्या मंदिरात जाता आलं नाही. मग परत 'दल लेक' ला गेलो. आदल्या दिवशी अंधार पडल्यानं राहिलेली शिकारा फेरी करायची ठरवली. आणि शिकारे ठरवून दिड तासाची दल लेक मध्ये छान फेरी मारुन आलो. शांत जळावर संथ तरगणाऱ्या शिकाऱ्यातून फिरायला नेहमीच खूप छान वाटतं. दल लेक मध्ये फिरत असतानाचं अंधार झाला होता. मग शिकारा फेरी मारुन आल्यावर तिथंच थोडं फिरुन मुक्कामी आलो.
श्रीनगरचा मुक्काम ११ तारखेला सकाळी सोडून आम्ही आधी 'श्री शंकराचार्य' मंदिरात गेलो. सकाळी लवकर मंदिरात गेल्यामुळं गर्दी थोडी कमी होती . छान दर्शन घडलं. इथंही मंदिरापासून २-३ किमी. आधीच आमची गाडी थांबली होती. त्यामुळं तेवढं अंतर चालून थोड्या पायऱ्या चढून मंदिरात जावं लागलं होतं. परत येताना तर गाडी अजूनच लांब उभी होती. त्यामुळं पुन्हा ३-४ किमी अंतर चालत गेलो. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे 'पटणी टाॅप'ला निघालो. दुपारनंतर आम्ही पटणी टाॅपला मुक्कामी पोहोचलो.
'पटणी टाॅप'ला मुक्कामी पोहोचल्यावर थोडा आराम करुन सायंकाळी आम्ही फिरायला निघालो. आम्ही जिथं राहिलो होतो तिथून सारंच लांब होतं. मग असंच फिरायला निघालो. अतिशय सुंदर वातावरण होतं. सारा गाव धुक्याची दुलई पांघरून बसला होता. चांगलाच गारवा होता. अशा छान वातावरणात फिरायलाही मस्त वाटत होतं. रस्त्याच्या कडेला भरगच्च केशरपिवळे तुरे लगडलेली गवती झाडं खूप छान दिसत होती. थोडं पुढं गेलो अन एक बाग दिसली. सुंदर सुबक नीटनेटकी बाग बघताच आम्ही लगेच बागेत प्रवेश केलाच. मऊ लुसलुशीत हिरव्या गवतातून जाणाऱ्या दगडी पायवाटा आणि आजूबाजूला असलेली सुंदर फुलांनी बहरलेली झाडं अगदी सुरेख दृश्य. फिकट निळ्या रगांच्या नाजूक फुलांच्या गुच्छानी डवरलेली झाडं अप्रतिम दिसत होती. अर्थातच छायाचित्रणाचा मोह आवरणं अशक्यच होतं. तिथं बराच वेळ घालवून आम्ही मुक्कामी परत आलो.
'पटणी टाॅप'हून १२ तारखेला आम्ही पुढे निघालो. सर्वांत आधी तिथून थोड्या अंतरावर असलेल्या 'नाग मंदिरात' दर्शनासाठी गेलो. नंतर 'गौरी कुंड' इथं जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर 'शुध्द महादेव' अर्थात 'शुलपाणेश्वर' मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हे सारं करुन 'शिव-पार्वती विवाह स्थान' पहायला गेलो. इथं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या मुक्कामी म्हणजे 'कटरा' ला सायंकाळी पोहोचलो.
'कटरा' हून १३ तारखेला सकाळी आम्ही 'शिवखोरी' इथं शंभू महादेवाच्या दर्शनाला निघालो. इथंही खूपच लांब अंतरावर आपली गाडी थांबते. तिथून स्थानिक जीपने २-३ किमी अंतर जावं लागतं. त्यानंतर पुढे साधारण ४ किमी अंतर चालत किंवा घोड्यावरुन जाता येतं. दर्शनासाठी जाताना अर्थातच थोडा चढावाचा रस्ता आहे. आणि त्यापुढे २५० पायऱ्या आहेत. इथं मात्र आम्ही जीपनं थोडं अंतर जाऊन पुढं पुर्ण चालत गेलो आणि चालतच आलो. दर्शनासाठी पण दोन मार्ग आहेत. एक पूर्वापार जरा कठीण असा अगदी अरुंद गुहेतून आणि दुसरा सोपा पण प्रशस्त गुहेतूनच. आम्ही तिथूनच दर्शनाला गेलो. आतमध्ये गुहा खूप मोठी प्रशस्त आहे. अतिशय सुंदर असं 'महदेवाचं' दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही परत सायंकाळी 'कटरा' ला मुक्कामी आलो.
१३ तारखेलाच रात्री आमच्या यात्रेतलं अजून एक महत्त्वाचं दर्शन घ्यायला जायचं होतं. त्यासाठी RFID Card काढणं गरजेचं होतं. त्यामुळं 'शिवखोरी' चं दर्शन घेऊन परतल्यावर RFID Card काढून आलो. आणि मग रात्री उशिरा आम्ही दर्शनासाठी निघालो. 'वैष्णोदेवी' मातेच्या दर्शनाला आम्ही नेहमीच सकाळी लवकर जातो. यावेळी पहिल्यांदाच रात्री जाणार होतो. इथंही घोड्यावरुनच जायचं होतं. रात्रीची वेळ असल्यानं घोडे बरेच कमी होते. दर्शनाला खरंतर चालतही जाऊ शकलो असतो पण 'शिवखोरी' ला बरंच चालणं झालं होतं आणि वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन नेहमीसारखं चालतच पायथ्याशी जायचं होतं. त्यामुळं मंदिरात जाताना घोडे ठरवलेच. घोड्यावरुन निघालो आणि थोड्याच वेळात एक धुंद गंध जाणवायला लागला. तो रातराणीचा गंध होता हे लगेच लक्षात आलं पण इथं रातराणी कुठं असणार असं वाटत होतं. पण अखंड दरवळ येतच होता. आणि अचानक एका ठिकाणी जाळी पलिकडे मला बहरलेली रातराणी दिसली. मुळात इथला रस्ता चढावाचा असला तरी छान बांधलेला, डोक्यावर छत असलेला, असा असल्यानं चालताना किंवा घोड्यावरुन जाताना बिलकुल त्रास होत नाही. त्यात यावेळी तर रातराणीचा धुंद गंध सर्वत्र दरवळत होता. वर्दळ कमी असल्यानं बऱ्यापैकी शांतता होती. खूप छान वाटत होतं. अशातच पावसाची भुरभुर सुरु झाली. पण छत असल्यानं भिजायचा प्रश्न नव्हता. घोड्यावरुन जात असताना मध्येच एका ठिकाणी मुख्य रस्ता सोडून घोडे आतल्या रस्त्याला वळले. या अरुंद रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार होता आणि बाजूला दाट झाडी. कशी कुणास ठाऊक पण तिळमात्रही भिती न वाटता मी ती नीरव शांतता अनुभवत होते. तिथून फक्त आमचे घोडे चालले होते मधेच समोरुन परतीचे २-३ घोडे येत होते. काही वेगळीच अनुभूती येत होती. जेमतेम १५ मी. त्या रस्त्यावरुन घोडे चालले आणि परत मुख्य मार्गाला लागले. पण तेवढा काळ माझ्यासाठी खास होता. भल्या पहाटे आम्ही मंदिरात पोहोचलो.
यावेळी पहिल्यांदाच दर्शनासाठी गर्दी कमी होती. त्यामुळं चेकिंग झाल्यावर पुढच्या अवघ्या १० मीनिटांत आम्ही गुहेत प्रवेश केला होता. रांगेतून मातेसमोर पोहोचलो आणि नतमस्तक झालो. पहिल्यांदाच आम्हाला काही क्षण माते समोर थांबायला अन निवांत दर्शन घ्यायला मिळालं होतं. गर्दी नसल्यानं तिथल्या सुरक्षारक्षकांनी किंवा पंडितजीनी कुणीच 'चलो चलो' अशी घाई केली नाही. नतमस्तक होऊन, डोळे भरुन मातेचं दर्शन घेऊन तृप्त मनानं आम्ही गुहेबाहेर आलो. भल्या पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर 'वैष्णोदेवी' मातेचं दर्शन घडल्यानं मन अन डोळे भरुन आले होते.
दर्शन घेऊन थोडावेळ थांबून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आता हा मार्ग उताराचा, सोपा आणि सवयीचा असल्यानं आम्ही निवांतपणे चालायला सुरुवात केली. वाटेत थांबत थांबत सकाळच्या शांत अन प्रसन्न वातावरणातून आम्ही चालत होतो. अखेर पायथ्याशी पोहोचून RFID Card जमा केली आणि आमच्या वैष्णोदेवी यात्रेची सांगता झाली. मुक्कामी पोहोचून आराम केला. 'कटरा' ला वारंवार जाणं होत असल्यानं तिथं परत फिरायची इच्छा नव्हती. त्यामुळं एकदम रात्रीच जेवणासाठी बाहेर जाऊन आलो. परत येऊन सगळं सामान आवरून निद्राधीन झालो.
१५ तारखेला घरी परततानाही आम्हा दोघांचीच विमानाची तिकिटं होती. म्हणून आम्ही सकाळी लवकरच आधीच ठरवलेल्या गाडीने जम्मूला निघालो. जाताना वाटेत नेहमीप्रमाणं 'नाभा माता' मंदिरात दर्शनासाठी गेलो. छोट्या गुहेतील या शक्तीपीठात आम्ही गेलो तेव्हा आम्ही दोघंच होतो. बाकीचे भाविक दर्शन घेऊन परत निघाले होते. इथं नेहमीच मातेचं अतिशय शांत आणि सुंदर दर्शन घडतं. हे दर्शन घेऊन पुढं 'कोल कंडोली' मातेच्या दर्शनाला गेलो. दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन आम्ही जम्मूला विमानतळावर पोहोचलो. यात्रा पूर्ण करुन, विमान प्रवास करुन रात्री उशिरा घरी पोहोचलो.
अवघड अशा अमरनाथ यात्रेचं स्वप्न साकार झालं ते केवळ श्री दत्तगुरुंच्या कृपेनेच. खरंतर माझ्या इच्छेविरुद्ध मला यात्रेला जावं लागलं होतं. दत्तगुरुंनी अत्यंत कठीण परिक्षा घेतली आमची पण अतिशय सुंदर अशी फलप्राप्तीही करुन दिली. गेल्या वर्षी पासून 'बाबा अमरनाथ' फारच लवकर अंतर्धान पावत आहेत. त्यामुळं असंख्य भाविकांना पुर्ण स्वरुपाचं दर्शन घडतच नाहीय. यावर्षीही असचं झाल्यानं मला अमरनाथांचं दर्शन घडेल की नाही याची काळजी वाटत होती पण त्यांच्याच कृपेनं लहान आकारात का होईना प्रत्रक्ष दर्शन घडलं आणि सारे सायास सार्थकी लागले.
यात्रेचे आयोजक आणि त्यांचे मित्रमंडळ यांचं सहकार्य आम्हाला पूर्ण यात्रेत मिळालं. निर्विघ्नपणे यात्रा पूर्ण झाली मात्र आमच्या ग्रुपमधल्या काही जणांच्या वर्तनामुळे थोडा त्रास बाकीच्या आम्हा सगळ्यांना सोसावा लागला. ग्रुपबरोबर यात्रा/सहलीला जाताना वेळेचं आणि इतर गोष्टींचं बंधन पाळलं, भान ठेवलं तर यात्रा / सहल छान आनंददायी आणि यशस्वी होते. आमच्या बरोबरच्या त्या काही जणांनी हे वेळेचं बंधन आणि इतर गोष्टींच भान अजिबात ठेवलं नाही त्यामुळं सगळीकडेच आम्हाला उशीर होत गेला. तेवढी गोष्ट सोडल्यास एक अवघड यात्रा निर्विघ्नपणे पूर्ण झाली हे महत्वाचं. मी हे सारं लिहित असतानाच बालताल मार्गावर भूस्खलन झालं एका भाविकेचा मृत्यू आणि काही जखमी झाले. यात्रा मार्ग बंद झाला. असं लहान मोठं कुठलंही विघ्न येऊ न देता दत्तगुरुंनी अवघड परिक्षा घेतानाही ही काळजी घेत सुंदर दर्शन घडवलं. माझी अजूनही अशी परिस्थिती आहे की देहानं जरी मी घरी परतले असले तरी मन मात्र अमरनाथलाच रमलंय.
|| जय बाबा बर्फानी|
- स्नेहल मोडक













No comments:
Post a Comment