Pages

Wednesday, February 4, 2026

माघ पौर्णिमा

             माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म्हणजेच १ फेब्रुवारीला 'गिरनार' दर्शनासाठी जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं ३१ जानेवारीला दुपारी आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

            १ फेब्रुवारीला भल्या पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षानं तलेटीला मुक्कामी पोहोचलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. आदल्या दिवशी प्रवासातच १ तारखेलाच गिरनारला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असल्याचं कळलं होतं. त्यासाठी ३१ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून ते १ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत गिरनारच्या पायऱ्या चढून दर्शनाला जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. ही स्पर्धा पहिल्या पायरीपासून अंबाजी मंदिर ते परत पहिली पायरी अशी असल्यानं भाविकांना या काळात पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश नव्हता. त्यामुळं साहजिकच रोप वे साठी प्रचंड गर्दी झाली होती. खरंतर दर पौर्णिमेला उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढतच आहे. आणि याच दिवशी मॅरेथॉन आयोजित करुन भाविकांना पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश बंदी करणं हे अगदी त्रासदायक आहे. यापूर्वीही पौर्णिमेलाच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशा गोष्टींचा भाविकांना नक्कीच त्रास होतो. आम्ही त्या गर्दीतून रांगेतूनच साधारण पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर रोपवे नं अंबाजी मंदिरापर्यंत पोहचलो. अंबा मातेचं दर्शन घेऊन पुढे गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन गुरु शिखरावर निघालो. गर्दी प्रचंड होती तरी भाविक एकत्र समुहानं वर चढत असल्यानं दर्शनाला रांग नव्हती. 

            मंदिरातले भाविक दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. सुदैवानं त्यावेळी मंदिरात आमच्यासह आणि २-३ भाविकच होते. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकांसमोर नतमस्तक होऊन आम्हाला पादुकांसमोरच दिड दोन मिनिटं शांत बसायला मिळालं. लगेचच भाविक दर्शनासाठी आल्यानं लगेच उठलोच. पण ती दिड दोन मिनिटं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच होती. वाढत्या गर्दीमुळं पौर्णिमेला दर्शन जरी छान होत असलं तरी तिथं बसायला मिळणं अवघड असतं. दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन वाचन करुन अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवेनं पायथ्याशी पोहोचलो. 

            यावेळी नेहमीप्रमाणं सोरटी सोमनाथच्या दर्शनाला न जाता दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं लगेच दुपारी एक वाजता कारने निघालो. मला जिथं जायचं होतं तिथं आधी बाकी तिघंही आधी जाऊन आले होते. मात्र माझा योग आता आला होता.

             'जांबुवंत गुहा' - जूनागढ पासून १०५ किमी अंतरावर आणि पोरबंदर पासून १७ किमी अंतरावर असलेली ही गुहा पौराणिक, धार्मिक आणि पुरातत्वीयऋ दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. 'पोरबंदर' मधील 'राणावाव' तालुक्यातील 'आदित्याणा' गावाजवळ प्रसिद्ध 'बरडा टेकड्यां'च्या पायथ्याशी ही गुहा आहे. ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. जमिनीवरुन पाहताना एखादी छोटी विहिर असल्यासारखं भासतं. आत उतरण्यासाठी एका खांबाभोवती गोल फिरणाऱ्या अगदी अरुंद दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरताना आधारासाठी मजबूत दोर बांधला आहे. या गुहेत छतामधून सतत टपकणाऱ्या पाण्यामुळं नैसर्गिक रितीनं शिवलिंग तयार झाली आहेत. अजूननही ही निर्मिती सुरुच आहे. यातलं 'पाताळेश्र्वर' हे नैसर्गिक रितीनं तयार झालेलं एकमेव असं 'रुद्राक्ष शिवलिंग' आहे. 'अमरनाथ' ला जसं 'बर्फाचं स्वयंभु शिवलिंग' तयार होतं तसंच हे 'स्वयंभू रुद्राक्ष शिवलिंग' इथं तयार झालं आहे. जांबुवंतानं भगवान शिवांसाठी इथं तपश्चर्या केली होती. त्यामुळं इथं स्वयंभू शिवलिंग तयार होतात. या सर्व शिवलिंगावर गुहेच्या छतातून नैसर्गिकपणे सतत जलाभिषेक होत असतो. अतिशय भव्य आणि लांबलचक अशा या गुहेत दोन बोगदे आहेत. त्यातला एक बोगदा जूनागढला पोहोचतो आणि दुसरा द्वारकेला पोहोचतो. मात्र आता काही अंतरावर ते बुजले आहेत. नैसर्गिक हवा आणि प्रकाशासाठी गुहेत दोन मोठे झरोके आहेत. जमिनीवरुन खाली एवढी मोठी गुहा असेल याची तिळमात्रही कल्पना येत नाही. 

            'भगवान श्रीकृष्ण' आणि वानरांचा 'राजा जांबुवंत' यांच्यात 'स्यमंतक मण्या'साठी २८ दिवस युद्ध चाललं होतं ते स्थान म्हणजे ही गुहा. अर्थातच 'जांबुवंतां'चा या युद्धात पराजय झाला होता. पण जेव्हा त्यांना कळलं की प्रत्यक्ष 'भगवान श्रीकृष्ण' आपल्या बरोबर युद्ध करत होते तेव्हा त्यांनी ते 'रत्न' म्हणजे 'स्यमंतक मणी' तर 'श्रीकृष्णांना' दिलाच पण त्याचबरोबर आपली कन्या 'जांबुवंती' हिचा विवाहही श्रीकृष्णाबरोबर केला. जांबुवंत हे 'प्रभू श्रीरामां' च्या वानरसेनेचे सेनापती होते पण त्यांना युद्धात सहभागी होता आलं नव्हतं आणि त्याची खंत त्यांना होती म्हणून 'प्रभू श्रीरामां'नी त्यांना 'मी पुढील 'श्रीकृष्ण' अवतारात तुझ्याशी युद्ध करेन' असा आशीर्वाद दिला होता. 'राजा सत्यजिता'नं 'सूर्यदेवा'ची आराधना आणि तपश्चर्या केली होती तेव्हा 'सूर्या'नं त्यांना 'स्यमंतक मणी' प्रसाद म्हणून दिला होता. तो त्याच्या भावाने पळवला पण सिंहाच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी सिंहाला हरवून जांबुवंतानं तो मणी हस्तगत केला होता. आणि या मण्यासाठीच इथं हे युद्ध झालं होतं. 

          या गुहेतील खडक आणि पायाखालची माती मध्ये मध्ये सोन्यासारखी चमकते. याच कारण पुरातत्व विभागाच्या दृष्टीनं इथं नैसर्गिक खनिजं आणि 'बाॅक्साईट' चं प्रमाण जास्त आहे. ही गुहा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळं इथून माती किंवा इतर कुठलीही वस्तू नेण्यासाठी परवानगी नाही. 

            आम्ही गुहेत उतरण्याआधीच किमान २०-२५ जणं गुहेत उतरले होते. पण गुहा अतिशय प्रशस्त आणि लांबलचक असल्यानं गर्दीचा त्रास नव्हता. १०-१५ मिनीटातच ते सारे गुहेतून बाहेर पडले. आम्ही गुहेत उतरलो तेव्हाच गुहा पहायला गुजरातचे एक मोठे वन अधिकारी आणि त्यांच्या बरोबर एक माहितगार पोलीस असे दोघं आले होते. त्यांच्याशी गुहेच्या पौराणिक कथेबद्दल, गुहेत तयार होणाऱ्या शिवलिंगांबद्दल आणि इतर संबंधित गोष्टींबद्दल बोलणं झालं. ते दोघं सारं पाहून बाहेर गेले आणि आम्ही चौघंच तिथं राहिलो. मग परत नीटपणे सारी गुहा पाहून, परत 'पाषाणेश्वरा'चं दर्शन घेऊन, तिथली अपार शांतता अनुभवून, सारी शिवलिंग पाहून एक वेगळीच अनुभूती घेऊन आम्ही गुहेतून बाहेर आलो.  ही गुहा वर्षभरात सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत कधीही पहाता येते. 

            'श्रीहरी मंदिर' - 'पोरबंदर' मधलं हे अजून एक सुंदर स्थान. जांबुवंत गुहेपासून १८ किमी अंतरावर आणि पोरबंदर विमानतळापासून ४-५ किमी. अंतरावर हे मंदिर आहे. 'श्रीहरी मंदिर' हे 'सांदिपनी विद्यानिकेतन' म्हणूनही ओळखले जाते. सुप्रसिद्ध भागवताचार्य 'रमेशभाई ओझा' यांच्या प्रेरणेतून  मंदिर उभारण्यात आलं आहे. २००६ साली याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अतिशय अवाढव्य परिसरात भव्य मंदिर आणि बगिचा तयार केला आहे. भगवान श्रीकृष्णांना हे मंदिर समर्पित आहे. मंदिरात राधा कृष्ण, शिव पार्वती, लक्ष्मी नारायण, गणपती, हनुमान, सूर्य नारायण, माता करुणामयी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापीत आहेत. अतिशय भव्य असं हे मंदिर संकुल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या बाजूलाच सांदिपनी संस्कृत विद्यापीठ आहे. एकूण सारा परिसर आणि मंदिर दर्शन चित्तवृत्ती प्रसन्न करणारं आहे. 

            'जांबुवंत गुहा' आणि 'श्रीहरी मंदिर' पाहून आम्ही परत तलेटीला मुक्कामी गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळीच 'भवनाथ महादेवा'च्या मंदिरात गेलो. सुंदर दर्शन घडलं. येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी मंदिराच्या आवारात जोरदार तयारी सुरु होती. या मंदिराच्या आवारात असलेलं मृगी कुंड अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं आहे. याच कुंडात महाशिवरात्रीला अनेक नागा साधू, संत स्नानासाठी उतरतात मात्र त्यातील एक साधू परत कुंडाबाहेर येत नाही. ते स्वयं भगवान शिव असतात अशी मान्यता आहे. 

            भवनाथाचं दर्शन घेऊन मुक्काम सोडून दुपारच्या ट्रेन ने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

- स्नेहल मोडक




    





Friday, January 30, 2026

स्पर्श

स्पर्श होताच पावलांस जळाचा

शिरशिरी हलकेच तनुवरी उठते 

स्पर्श होताच वीणेस अंगुलीचा

सप्तसूरात सुमधुर ती झंकारते

स्पर्श होताच कलिकेस वाऱ्याचा

अलवार मधुगंधी सुमन उमलते

स्पर्श होताच रंगास कुंचल्याचा

सुरेख सप्तरंगी रचना साकारते

स्पर्श होताच शब्दांस भावनांचा

तरल मनभावन कविता उमलते

स्पर्श होताच मनास ईशभक्तीचा

आयुष्याचे सहजच सार्थक होते

- स्नेहल मोडक

Wednesday, January 7, 2026

प्रारंभ

            नवीन वर्षाचा प्रारंभ 'श्री दत्तगुरुं'च्या दर्शनानं करायचा असं यावर्षीही मनात होतं. अर्थातच त्यासाठी 'गिरनार'ला जायचा विचार होता. मात्र यावेळी पौर्णिमेला 'माउंट अबू'च्या गुरु शिखरावर दर्शनाला येण्याचा आदेश मिळाला आणि मग 'माउंट अबू'ला जायचं नक्की केलं. गतवर्षी प्रमाणं अहमदाबाद पर्यंत रेल्वे आणि तिथून पुढे गाडी असंच जायचं ठरवलं.

          ठरवल्या प्रमाणं एक जानेवारीला सायंकाळी 'अहमदाबाद' ला पोहोचण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली. दोन तारखेला भल्या पहाटे आम्ही अहमदाबादला पोहोचलो. गाडी यायला थोडा वेळ होता. मग तिथल्या कडाक्याच्या थंडीत वाफाळत्या चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत बसलो. काही वेळानं गाडी आली आणि आमचा पुढला प्रवास सुरु झाला. 

          आमच्या बरोबर असलेल्या याच्या एका मित्राला प्रवासाच्या मार्गावरच्या त्यांच्या कुलस्वामिनीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. यापूर्वीही आम्ही या मंदिरात जाऊन आलो होतो. यावेळीही परत जायच असल्यानं त्या दर्शनाबरोबरच अजून एका स्थानी जायची मला संधीच मिळाली. अर्थात इथंही आम्ही अधेमधे जात असतोच. पण यावेळी आम्ही अगदी योग्य वेळी तिथं पोहोचणार होतो. त्यामुळं वाटेत कुठंही न थांबता आम्ही थेट तिथेच गेलो.

             'सूर्य मंदीर - मोढेरा' 'अहमदाबाद' पासून १०० किमी. अंतरावर असलेलं अतिशय पुरातन म्हणजे ११ व्या शतकातलं सूर्य मंदीर. 'मेहसाणा' 'जिल्ह्यात पुष्पावती' नदी तीरावर वसलेलं अतिशय प्राचीन आणि स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेलं हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. 'चालुक्य राजा भीम पहिला' यांनी इसवी सन १०२६-२७ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 'स्कंद' पुराणात 'मोढेरा' गावाजवळच्या भागाला रामायण काळात 'धर्मारण्य' असं संबोधलं जायचं. 'रावणाचा' वध केल्यावर ब्रम्हहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी काय करावं असं 'प्रभू श्रीरामां'नी 'गुरु वसिष्ठ' यांना विचारलं. त्यावेळी 'गुरु वसिष्ठ' यांनी धर्मारण्यात जाऊन यज्ञ करण्यास सांगितलं. त्याप्रमाणं प्रभू श्रीराम आणि सीता यांनी तिथं यज्ञ करुन 'मोढेरक' गावाची स्थापना केली. तेच नंतर मोढेरा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

            इथं प्रवेश करताच प्रथम समोर येतो तो जलाशय. अतिशय प्रशस्त आणि अप्रतिम असं हे कुंड पायऱ्यांनी बांधलेल्या विहिरीसारखं असल्यानं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. याला 'रामकुंड' किंवा 'सूर्यकुंड' म्हणून ओळखलं जातं. याच्या चारही बाजूंनी पायऱ्यांवर विविध देवतांची १०८ छोटी छोटी मंदिरं आहेत. 

          त्यापुढे दिसतो तो 'सभामंडप'. ५२ खांबावर उभ्या आणि अप्रतिम शिल्पकलेनं नटलेल्या या सभामंडपाला चारही बाजूंनी प्रवेशद्वारं आहेत. सभागृहाला आधार देणारे ५२ खांब म्हणजे ५२ आठवड्यांचं प्रतिक आहेत. 

          यानंतर आपण प्रवेश करतो तो 'गूढ मंडप'. गूढ मंडपाच्या बाहेरील भिंतींवर सूर्य देवाच्या १२ प्रतिमा, विश्वकर्मा, गणेश, सरस्वती,अग्नी आणि अष्ट दिक्पाल  कोरलेले आहेत. गूढ मंडपाला तीन खिडक्या असून त्यातून विशिष्ट दिवशी सूर्यकिरणं आत असलेल्या सूर्य देवाच्या मूर्तीवर पडतात. मात्र आता इथं मूर्ती नाही. 

             आम्ही इथं पोहोचलो तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. सारं मंदिर, रामकुंड आणि बाजूला असलेली प्रशस्त बाग सारंच  सुंदर अशा सोनकिरणात उजळलं होतं. अत्यंत नयनरम्य दृश्य दिसत होतं. सोनकिरणांमधे सारं मंदिर सुवर्णमंदिर असल्यासारखं भासत होतं. अगदी योग्य वेळी आम्ही तिथं पोहोचलो होतो. यापूर्वीही तिथं जाऊन आलो असल्यानं सारा परिसर माहित होता. पण सूर्योदयाच्या वेळचा नजारा अप्रतिम, मंत्रमुग्ध करणाराच होता. २०२६ हे वर्ष ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देवाचं वर्ष आहे. नियमित सूर्योपासना, पूजा, मंत्रजप हे या वर्षी अधिक फलदायी ठरणार आहे. त्यामुळं वर्षारंभीच सूर्य मंदीरात जाण्याचा आलेला योग आमच्यासाठी महत्वाचा होता.

               सूर्य मंदीर बघून आम्ही पुढं 'देलमाल' गावातील 'लिंबजा देवी'चं दर्शन घ्यायला गेलो. हे मंदिर ही पुरातन म्हणजे सूर्य मंदीराच्या आसपासच्या काळातलं आहे. इथंही मंदिरावर अप्रतिम शिल्पकला पहायला मिळते. इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला त्या मंदिरातच्या पंडितजीनी जवळच असलेल्या त्यांच्या घरी नेलं. आणि इथं एक वेगळाच वृक्ष आम्हाला पहायला मिळाला. 'मिसवाक ट्री' किंवा 'पिलू' या नावानं हा वृक्ष ओळखला जातो. खूप मोठ्या, रुंद घेराचं खोड असलेल्या या वृक्षाच्या फांद्या मात्र वेलीसारख्या जमिनीकडे झेपावणाऱ्या असतात. याला अतिशय नाजूक अगदी छोटीशी फिकट पारदर्शी गुलाबी रंगाची फळं येतात. हे पक्ष्यांचं अतिशय आवडतं खाद्य आहे. आणि या झाडाच्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करतात. या झाडात नैसर्गिकरीत्या ॲण्टी बॅक्टेरिअल आणि ॲण्टी सेप्टिक गुणधर्म असतात. जे दातांना चमक देतात, किड आणि हिरड्यांचे आजार टाळतात. याचमुळं याला 'टुथब्रश ट्री' म्हणूनही ओळखतात. या वृक्षाची माहिती घेऊन, पंडितजींबरोबर थोड्या गप्पा मारुन आम्ही पुढे निघालो. वाटेत नाश्ता करुन दुपारी सव्वा तीन वाजता 'माउंट अबू'ला आमच्या मुक्कामी पोहोचलो.

                रुमवर पोहोचून सारं आवरुन जेवून फिरायला निघालो. सर्वांत आधी आम्ही गेलो देवीच्या दर्शनासाठी. 'अर्बुदा देवी' -  देवीच्या ५१ शक्तीपीठांमधलं एक शक्तीपीठ. 'सती माते'चे या स्थानी अधर (ओठ) पडल्यानं हे स्थान 'अधर देवी' किंवा 'अर्बुदा देवी' म्हणून ओळखलं जातं. साधारण ४०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिरात प्रवेश करतो. इथं दर्शन घेऊन थोडावेळ थांबून आम्ही परत खाली उतरलो. तोपर्यंत सांजसावल्या वाढू लागल्या होत्या . मग लगेच तिथून 'अचलेश्वर महादेवा'च्या मंदिरात गेलो. इथं शिवलिंग नसून 'भगवान शिवा'च्या पायाचा अंगठा आहे त्याचीच पूजा केली जाते. याच अंगठ्यावर 'माउंट अबू' पर्वत ' भगवान महादेवांनी' तोलून धरला आहे अशी मान्यता आहे. 'भगवान परशुराम' यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. या अंगठ्याचा रंग दिवसातून तीनदा बदलतो अशी आख्यायिका आहे. मंदिरात फारशी गर्दी नसल्यानं आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे 'नक्की तलाव' बघायला गेलो. तोपर्यंत गडद अंधारलं होतं. वीज दिव्यांच्या प्रकाशात 'नक्की तलावा'चं पाणी चमचमत होतं. 'राजस्थान'मधला सर्वात उंचावरचा हा गोड्या पाण्याचा तलाव आहे. राजकन्येशी विवाह करण्यासाठी 'रसिया बालम' नावाच्या एका तरुणानं हा तलाव नखांनी एका रात्रीत खोदला होता अशी कथा आहे. सुंदर निसर्ग आणि नौकानयन यासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. इथं थोडं फिरुन जेवून रात्री मुक्कामी परतलो. कडाक्याची थंडी होती तिथं. रात्री तर तापमानाचा पारा फारच खाली घसरला होता. अतिशय सुंदर वातावरण होतं. 

    ‌             दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला म्हणजेच तीन तारखेला भल्या पहाटे सारी आन्हिकं आवरुन गाडीनं आम्ही गुरु शिखरावर निघालो. हा संपूर्ण मार्ग अतिशय चढावाचा आणि घाटदार वळणांचा आहे. शिखराच्या पायथ्यपर्यंत गाडीनं जाता येतं. पायथ्याशी उतरुन साधारण ५०-६० पायऱ्या चढल्यावर आधी 'श्री दत्तात्रेयांचं' मंदिर आहे. इथं छोट्याशा गुहेत 'श्री दत्तात्रेयांची' मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. आणि थोडं बाजूलाच अखंड धुनी आहे. तिथूनच पुढं जवळपास अडिचशे पायऱ्या चढून वर चरण पादुका आहेत. हे अगदी छोटंसं मंदिर आहे. मात्र एकूण मंदिर परिसर मोठा आहे. 

              आम्ही शिखरावर पोहोचत असतानाच  कनकगोल‌ अवतरला. आणि क्षितीजावर एक अत्यंत नयनरम्य, विहंगम असं दृश्य निर्माण झालं. चालत्या गाडीतून वृक्षवल्लींच्या आडून आम्हाला हे दृश्य मधेमधे दिसत होतं. शिखराच्या पायथ्याशी गाडी पोचली आणि आम्ही गाडीतून उतरुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. जसजसं आम्ही वर जात होतो तसतसं क्षितीजावर दिसणारं दृश्य अधिकच मोहवत होतं. आम्ही आधी शिखरावर चरण पादुकांचं दर्शन घ्यायला पोहोचलो आणि अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिलो. अद्भुत, अवर्णनीय असं दृश्य होतं. 'रवीराजा'ची लखलखती सोनकिरणं क्षितीज रेषेवर पसरुन केशरजळासारखा एक वेगळाच आभास निर्माण झाला होता. गिरनारलाही नेहमी सूर्योदयाला केशर पिवळी क्षितीज रेषा दिसते. पण इथलं दृश्य अतिशय वेगळं, शब्दात व्यक्त न करता येणारं असं होतं. काही क्षणांनी भानावर येऊन चरण पादुकांचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिराजवळ गेले आणि पून्हा एकवार थक्क झाले. स्वयं 'सूर्य नारायण' आपल्या किरणांनी 'श्री दत्तात्रेयांच्या' चरण पादुकांवर अभिषेक करत होते. पून्हा एकदा मी नि:शब्द. प्राचीन काळातील स्थापत्यकार किती ज्ञानी होते हे पून्हा जाणवलं. कुठलीही विशेष साधनं नसताना अभ्यास करुन त्यांनी अशी मंदिर रचना केली आहे की ठराविक काळात सूर्य किरणं तिथल्या मूर्तीवर पोहोचतात. बरीच मंदिरं अशा पध्दतीनं बांधण्यात आली आहेत. चरण पादुकांसमोर नतमस्तक होताना साहजिकच डोळे पाणावलेच. दर्शन प्रसाद घेऊन मंदिराच्या आवारात थांबून त्या नयनरम्य दृश्याचं छायाचित्रण केलं. खरंतर तिथून निघायची बिलकुल इच्छा नव्हती. पण वेळेचं बंधन असल्यानं नाइलाज होता. तिथून खाली उतरुन श्री दत्तात्रेयांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन तिथंच बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. आणि अखंड धुनीचं दर्शन घेऊन पायथ्याशी पोहोचलो. गाडीने लगेच मुक्कामी जाऊन सामान घेऊन मुक्काम सोडून निघालो. 

                परत एकदा 'नक्की तलावा' जवळ गेलो. थोडं फिरुन नाश्ता करुन निघालो. परतीच्या प्रवासात अजून एक मंदिर दर्शन घ्यायला जायचं होतं. त्यामुळं आधी तिथंच गेलो. 

                 'अंबाजी माता मंदिर' - 'राजस्थान' आणि 'गुजरात' राज्याच्या सीमेवर बनासकांठा या तालुक्यात अरावली पर्वत रांगेतील एका डोंगरावर हे 'अंबा माते'चं शक्तीपीठ आहे. माउंट अबू पासून ४५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथं 'सती मातेचं' हृदय पडलं होतं. इथं मूर्तीची नाही तर 'श्रीयंत्रा'ची पूजा केली जाते. गर्भगृहात एक ज्योत अखंड तेवत असते. त्याचीही पूजा केली जाते. मंदिरात जाण्यासाठी ९९९ पायऱ्या चढायला लागतात. मात्र रोप वे ची सुविधा उपलब्ध आहे. आम्ही इथं पोहोचण्याआधी रोप वे ची ऑनलाईन तिकिटं काढायचा प्रयत्न केला पण ती सुविधा बंद होती. त्यामुळं मंदिराच्या पायथ्याशी पोहोचून तिकीटं काढायचं ठरवलं. प्रत्यक्षात तिथं तिकिटासाठी आणि वर दर्शनासाठी अफाट गर्दी होती. पण आम्ही गुजरात दर्शन ची तिकिटं काढणार असल्यानं ती लगेच मिळाली. आणि प्रचंड मोठी रांग असूनही १० मिनिटांतच रोपवेनं वरतीही जायला मिळालं. दर्शनासाठीही भलीमोठी रांग होती त्या रांगेत उभं राहून अखेर प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश केला. 'अंबा मातेचं' ज्योती स्वरुपातलं अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. त्याच रांगेतून बाजूच्या 'श्रीयंत्रा'चं दर्शन घेतलं. थोडावेळ थांबून रोपवेनं परत पायथ्याशी पोहोचलो. तोपर्यंत फक्त पौर्णिमा म्हणून एवढी अफाट गर्दी आहे असंच आम्हाला वाटत होतं मात्र पायथ्याशी आल्यावर कळलं त्याचदिवशी 'अंबा मातेचा' जन्मसोहळा होता. त्याच दिवशी आम्हाला तिच्या दर्शनाचा योग आला म्हणून खूपच आनंद झाला. पायथ्याशी मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच देवीची खूप मोठी मिरवणूक सुरु होती. किमान तासभर आम्ही त्या वाहतूक कोंडींत अडकलो होतो. नंतर वाहतूक सुरळीत झाली आणि आम्ही पुढे निघालो. रात्री जेवून अहमदाबाद स्टेशन वर जाऊन बसलो. रात्री उशिराची ट्रेन असल्यानं बराच वेळ थांबणं भाग होतं. अखेर ट्रेन वेळेत आली आणि आम्ही घरी परत निघालो.  

            वर्षारंभीच आम्हाला सूर्य मंदीर, लिंबजा देवी',श्री दत्तात्रेय गुरु शिखर, अचलेश्वर महादेव आणि दोन शक्तीपीठं एवढी सारी दर्शनं घडली आणि अगदी प्रसन्न चित्तानं आम्ही परतलो. याचबरोबर निसर्गाचा एक अद्भुत आविष्कारही पहायला मिळाला.





    



- स्नेहल मोडक

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...