नवीन वर्षाचा प्रारंभ 'श्री दत्तगुरुं'च्या दर्शनानं करायचा असं यावर्षीही मनात होतं. अर्थातच त्यासाठी 'गिरनार'ला जायचा विचार होता. मात्र यावेळी पौर्णिमेला 'माउंट अबू'च्या गुरु शिखरावर दर्शनाला येण्याचा आदेश मिळाला आणि मग 'माउंट अबू'ला जायचं नक्की केलं. गतवर्षी प्रमाणं अहमदाबाद पर्यंत रेल्वे आणि तिथून पुढे गाडी असंच जायचं ठरवलं.
ठरवल्या प्रमाणं एक जानेवारीला सायंकाळी 'अहमदाबाद' ला पोहोचण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली. दोन तारखेला भल्या पहाटे आम्ही अहमदाबादला पोहोचलो. गाडी यायला थोडा वेळ होता. मग तिथल्या कडाक्याच्या थंडीत वाफाळत्या चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत बसलो. काही वेळानं गाडी आली आणि आमचा पुढला प्रवास सुरु झाला.
आमच्या बरोबर असलेल्या याच्या एका मित्राला प्रवासाच्या मार्गावरच्या त्यांच्या कुलस्वामिनीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. यापूर्वीही आम्ही या मंदिरात जाऊन आलो होतो. यावेळीही परत जायच असल्यानं त्या दर्शनाबरोबरच अजून एका स्थानी जायची मला संधीच मिळाली. अर्थात इथंही आम्ही अधेमधे जात असतोच. पण यावेळी आम्ही अगदी योग्य वेळी तिथं पोहोचणार होतो. त्यामुळं वाटेत कुठंही न थांबता आम्ही थेट तिथेच गेलो.
'सूर्य मंदीर - मोढेरा' 'अहमदाबाद' पासून १०० किमी. अंतरावर असलेलं अतिशय पुरातन म्हणजे ११ व्या शतकातलं सूर्य मंदीर. 'मेहसाणा' 'जिल्ह्यात पुष्पावती' नदी तीरावर वसलेलं अतिशय प्राचीन आणि स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेलं हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. 'चालुक्य राजा भीम पहिला' यांनी इसवी सन १०२६-२७ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 'स्कंद' पुराणात 'मोढेरा' गावाजवळच्या भागाला रामायण काळात 'धर्मारण्य' असं संबोधलं जायचं. 'रावणाचा' वध केल्यावर ब्रम्हहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी काय करावं असं 'प्रभू श्रीरामां'नी 'गुरु वसिष्ठ' यांना विचारलं. त्यावेळी 'गुरु वसिष्ठ' यांनी धर्मारण्यात जाऊन यज्ञ करण्यास सांगितलं. त्याप्रमाणं प्रभू श्रीराम आणि सीता यांनी तिथं यज्ञ करुन 'मोढेरक' गावाची स्थापना केली. तेच नंतर मोढेरा म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
इथं प्रवेश करताच प्रथम समोर येतो तो जलाशय. अतिशय प्रशस्त आणि अप्रतिम असं हे कुंड पायऱ्यांनी बांधलेल्या विहिरीसारखं असल्यानं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. याला 'रामकुंड' किंवा 'सूर्यकुंड' म्हणून ओळखलं जातं. याच्या चारही बाजूंनी पायऱ्यांवर विविध देवतांची १०८ छोटी छोटी मंदिरं आहेत.
त्यापुढे दिसतो तो 'सभामंडप'. ५२ खांबावर उभ्या आणि अप्रतिम शिल्पकलेनं नटलेल्या या सभामंडपाला चारही बाजूंनी प्रवेशद्वारं आहेत. सभागृहाला आधार देणारे ५२ खांब म्हणजे ५२ आठवड्यांचं प्रतिक आहेत.
यानंतर आपण प्रवेश करतो तो 'गूढ मंडप'. गूढ मंडपाच्या बाहेरील भिंतींवर सूर्य देवाच्या १२ प्रतिमा, विश्वकर्मा, गणेश, सरस्वती,अग्नी आणि अष्ट दिक्पाल कोरलेले आहेत. गूढ मंडपाला तीन खिडक्या असून त्यातून विशिष्ट दिवशी सूर्यकिरणं आत असलेल्या सूर्य देवाच्या मूर्तीवर पडतात. मात्र आता इथं मूर्ती नाही.
आम्ही इथं पोहोचलो तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. सारं मंदिर, रामकुंड आणि बाजूला असलेली प्रशस्त बाग सारंच सुंदर अशा सोनकिरणात उजळलं होतं. अत्यंत नयनरम्य दृश्य दिसत होतं. सोनकिरणांमधे सारं मंदिर सुवर्णमंदिर असल्यासारखं भासत होतं. अगदी योग्य वेळी आम्ही तिथं पोहोचलो होतो. यापूर्वीही तिथं जाऊन आलो असल्यानं सारा परिसर माहित होता. पण सूर्योदयाच्या वेळचा नजारा अप्रतिम, मंत्रमुग्ध करणाराच होता. २०२६ हे वर्ष ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देवाचं वर्ष आहे. नियमित सूर्योपासना, पूजा, मंत्रजप हे या वर्षी अधिक फलदायी ठरणार आहे. त्यामुळं वर्षारंभीच सूर्य मंदीरात जाण्याचा आलेला योग आमच्यासाठी महत्वाचा होता.
सूर्य मंदीर बघून आम्ही पुढं 'देलमाल' गावातील 'लिंबजा देवी'चं दर्शन घ्यायला गेलो. हे मंदिर ही पुरातन म्हणजे सूर्य मंदीराच्या आसपासच्या काळातलं आहे. इथंही मंदिरावर अप्रतिम शिल्पकला पहायला मिळते. इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला त्या मंदिरातच्या पंडितजीनी जवळच असलेल्या त्यांच्या घरी नेलं. आणि इथं एक वेगळाच वृक्ष आम्हाला पहायला मिळाला. 'मिसवाक ट्री' किंवा 'पिलू' या नावानं हा वृक्ष ओळखला जातो. खूप मोठ्या, रुंद घेराचं खोड असलेल्या या वृक्षाच्या फांद्या मात्र वेलीसारख्या जमिनीकडे झेपावणाऱ्या असतात. याला अतिशय नाजूक अगदी छोटीशी फिकट पारदर्शी गुलाबी रंगाची फळं येतात. हे पक्ष्यांचं अतिशय आवडतं खाद्य आहे. आणि या झाडाच्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करतात. या झाडात नैसर्गिकरीत्या ॲण्टी बॅक्टेरिअल आणि ॲण्टी सेप्टिक गुणधर्म असतात. जे दातांना चमक देतात, किड आणि हिरड्यांचे आजार टाळतात. याचमुळं याला 'टुथब्रश ट्री' म्हणूनही ओळखतात. या वृक्षाची माहिती घेऊन, पंडितजींबरोबर थोड्या गप्पा मारुन आम्ही पुढे निघालो. वाटेत नाश्ता करुन दुपारी सव्वा तीन वाजता 'माउंट अबू'ला आमच्या मुक्कामी पोहोचलो.
रुमवर पोहोचून सारं आवरुन जेवून फिरायला निघालो. सर्वांत आधी आम्ही गेलो देवीच्या दर्शनासाठी. 'अर्बुदा देवी' - देवीच्या ५१ शक्तीपीठांमधलं एक शक्तीपीठ. 'सती माते'चे या स्थानी अधर (ओठ) पडल्यानं हे स्थान 'अधर देवी' किंवा 'अर्बुदा देवी' म्हणून ओळखलं जातं. साधारण ४०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिरात प्रवेश करतो. इथं दर्शन घेऊन थोडावेळ थांबून आम्ही परत खाली उतरलो. तोपर्यंत सांजसावल्या वाढू लागल्या होत्या . मग लगेच तिथून 'अचलेश्वर महादेवा'च्या मंदिरात गेलो. इथं शिवलिंग नसून 'भगवान शिवा'च्या पायाचा अंगठा आहे त्याचीच पूजा केली जाते. याच अंगठ्यावर 'माउंट अबू' पर्वत ' भगवान महादेवांनी' तोलून धरला आहे अशी मान्यता आहे. 'भगवान परशुराम' यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. या अंगठ्याचा रंग दिवसातून तीनदा बदलतो अशी आख्यायिका आहे. मंदिरात फारशी गर्दी नसल्यानं आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे 'नक्की तलाव' बघायला गेलो. तोपर्यंत गडद अंधारलं होतं. वीज दिव्यांच्या प्रकाशात 'नक्की तलावा'चं पाणी चमचमत होतं. 'राजस्थान'मधला सर्वात उंचावरचा हा गोड्या पाण्याचा तलाव आहे. राजकन्येशी विवाह करण्यासाठी 'रसिया बालम' नावाच्या एका तरुणानं हा तलाव नखांनी एका रात्रीत खोदला होता अशी कथा आहे. सुंदर निसर्ग आणि नौकानयन यासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. इथं थोडं फिरुन जेवून रात्री मुक्कामी परतलो. कडाक्याची थंडी होती तिथं. रात्री तर तापमानाचा पारा फारच खाली घसरला होता. अतिशय सुंदर वातावरण होतं.
दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला म्हणजेच तीन तारखेला भल्या पहाटे सारी आन्हिकं आवरुन गाडीनं आम्ही गुरु शिखरावर निघालो. हा संपूर्ण मार्ग अतिशय चढावाचा आणि घाटदार वळणांचा आहे. शिखराच्या पायथ्यपर्यंत गाडीनं जाता येतं. पायथ्याशी उतरुन साधारण ५०-६० पायऱ्या चढल्यावर आधी 'श्री दत्तात्रेयांचं' मंदिर आहे. इथं छोट्याशा गुहेत 'श्री दत्तात्रेयांची' मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. आणि थोडं बाजूलाच अखंड धुनी आहे. तिथूनच पुढं जवळपास अडिचशे पायऱ्या चढून वर चरण पादुका आहेत. हे अगदी छोटंसं मंदिर आहे. मात्र एकूण मंदिर परिसर मोठा आहे.
आम्ही शिखरावर पोहोचत असतानाच कनकगोल अवतरला. आणि क्षितीजावर एक अत्यंत नयनरम्य, विहंगम असं दृश्य निर्माण झालं. चालत्या गाडीतून वृक्षवल्लींच्या आडून आम्हाला हे दृश्य मधेमधे दिसत होतं. शिखराच्या पायथ्याशी गाडी पोचली आणि आम्ही गाडीतून उतरुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. जसजसं आम्ही वर जात होतो तसतसं क्षितीजावर दिसणारं दृश्य अधिकच मोहवत होतं. आम्ही आधी शिखरावर चरण पादुकांचं दर्शन घ्यायला पोहोचलो आणि अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिलो. अद्भुत, अवर्णनीय असं दृश्य होतं. 'रवीराजा'ची लखलखती सोनकिरणं क्षितीज रेषेवर पसरुन केशरजळासारखा एक वेगळाच आभास निर्माण झाला होता. गिरनारलाही नेहमी सूर्योदयाला केशर पिवळी क्षितीज रेषा दिसते. पण इथलं दृश्य अतिशय वेगळं, शब्दात व्यक्त न करता येणारं असं होतं. काही क्षणांनी भानावर येऊन चरण पादुकांचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिराजवळ गेले आणि पून्हा एकवार थक्क झाले. स्वयं 'सूर्य नारायण' आपल्या किरणांनी 'श्री दत्तात्रेयांच्या' चरण पादुकांवर अभिषेक करत होते. पून्हा एकदा मी नि:शब्द. प्राचीन काळातील स्थापत्यकार किती ज्ञानी होते हे पून्हा जाणवलं. कुठलीही विशेष साधनं नसताना अभ्यास करुन त्यांनी अशी मंदिर रचना केली आहे की ठराविक काळात सूर्य किरणं तिथल्या मूर्तीवर पोहोचतात. बरीच मंदिरं अशा पध्दतीनं बांधण्यात आली आहेत. चरण पादुकांसमोर नतमस्तक होताना साहजिकच डोळे पाणावलेच. दर्शन प्रसाद घेऊन मंदिराच्या आवारात थांबून त्या नयनरम्य दृश्याचं छायाचित्रण केलं. खरंतर तिथून निघायची बिलकुल इच्छा नव्हती. पण वेळेचं बंधन असल्यानं नाइलाज होता. तिथून खाली उतरुन श्री दत्तात्रेयांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन तिथंच बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. आणि अखंड धुनीचं दर्शन घेऊन पायथ्याशी पोहोचलो. गाडीने लगेच मुक्कामी जाऊन सामान घेऊन मुक्काम सोडून निघालो.
परत एकदा 'नक्की तलावा' जवळ गेलो. थोडं फिरुन नाश्ता करुन निघालो. परतीच्या प्रवासात अजून एक मंदिर दर्शन घ्यायला जायचं होतं. त्यामुळं आधी तिथंच गेलो.
'अंबाजी माता मंदिर' - 'राजस्थान' आणि 'गुजरात' राज्याच्या सीमेवर बनासकांठा या तालुक्यात अरावली पर्वत रांगेतील एका डोंगरावर हे 'अंबा माते'चं शक्तीपीठ आहे. माउंट अबू पासून ४५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथं 'सती मातेचं' हृदय पडलं होतं. इथं मूर्तीची नाही तर 'श्रीयंत्रा'ची पूजा केली जाते. गर्भगृहात एक ज्योत अखंड तेवत असते. त्याचीही पूजा केली जाते. मंदिरात जाण्यासाठी ९९९ पायऱ्या चढायला लागतात. मात्र रोप वे ची सुविधा उपलब्ध आहे. आम्ही इथं पोहोचण्याआधी रोप वे ची ऑनलाईन तिकिटं काढायचा प्रयत्न केला पण ती सुविधा बंद होती. त्यामुळं मंदिराच्या पायथ्याशी पोहोचून तिकीटं काढायचं ठरवलं. प्रत्यक्षात तिथं तिकिटासाठी आणि वर दर्शनासाठी अफाट गर्दी होती. पण आम्ही गुजरात दर्शन ची तिकिटं काढणार असल्यानं ती लगेच मिळाली. आणि प्रचंड मोठी रांग असूनही १० मिनिटांतच रोपवेनं वरतीही जायला मिळालं. दर्शनासाठीही भलीमोठी रांग होती त्या रांगेत उभं राहून अखेर प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश केला. 'अंबा मातेचं' ज्योती स्वरुपातलं अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. त्याच रांगेतून बाजूच्या 'श्रीयंत्रा'चं दर्शन घेतलं. थोडावेळ थांबून रोपवेनं परत पायथ्याशी पोहोचलो. तोपर्यंत फक्त पौर्णिमा म्हणून एवढी अफाट गर्दी आहे असंच आम्हाला वाटत होतं मात्र पायथ्याशी आल्यावर कळलं त्याचदिवशी 'अंबा मातेचा' जन्मसोहळा होता. त्याच दिवशी आम्हाला तिच्या दर्शनाचा योग आला म्हणून खूपच आनंद झाला. पायथ्याशी मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच देवीची खूप मोठी मिरवणूक सुरु होती. किमान तासभर आम्ही त्या वाहतूक कोंडींत अडकलो होतो. नंतर वाहतूक सुरळीत झाली आणि आम्ही पुढे निघालो. रात्री जेवून अहमदाबाद स्टेशन वर जाऊन बसलो. रात्री उशिराची ट्रेन असल्यानं बराच वेळ थांबणं भाग होतं. अखेर ट्रेन वेळेत आली आणि आम्ही घरी परत निघालो.
वर्षारंभीच आम्हाला सूर्य मंदीर, लिंबजा देवी',श्री दत्तात्रेय गुरु शिखर, अचलेश्वर महादेव आणि दोन शक्तीपीठं एवढी सारी दर्शनं घडली आणि अगदी प्रसन्न चित्तानं आम्ही परतलो. याचबरोबर निसर्गाचा एक अद्भुत आविष्कारही पहायला मिळाला.






No comments:
Post a Comment