त्यादिवशीची तिन्हिसांज खरंतर नेहमीसारखीच पण आम्हाला मात्र एक वेगळाच नाट्यानुभव देऊन गेली.
तिन्हिसांज सरुन अंधारायलाच लागलं होतं. मी लेकीबरोबर घराच्या गॅलरीत सहज गप्पा मारत उभी होते. समोरच्या झाडावर बुलबुल पक्ष्यांच्या जोडीचा किलबिलाट सुरु होता. आणि अचानक एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात झाली.
बुलबुलच्या जोडीच्या जवळ आलेल्या एका कावळ्याला ती जोडी जोरात कलकलाट करत हुसकावून लावत होती. बुलबुलच्या जोडीच्या रोजच्या किलबिलाटामुळे आम्हाला त्यांचे घरटे जवळच कुठेतरी असल्याचा अंदाज होताच. पण त्यांच्या या कृतीने मात्र खात्रीच पटली.
बुलबुल कावळ्याला हुसकावून लावत असतानाच अचानक आमच्या दिशेने एक छोटंसं पाखरु फडफडत येऊन कुंडीतल्या झाडावर विसावलं. आणि क्षणात सारा खेळ आमच्या लक्षात आला. कारण ते बुलबुलच्या जोडीचं अगदी छोटं पिल्लू होतं आणि कावळा त्याच पिल्लाच्या मागे लागला होता. पण अजून त्या पिल्लाच्या पंखात पुरेसं बळ नसल्याने त्या जोडीला त्याची काळजी वाटत होती.
थोड्या वेळाने कावळा निघून गेला. पण ते पिल्लू मात्र कुंडीतल्या झाडावरुन उडायला तयार होईना. मग सुरु झाले त्या जोडीचे पिल्लाला आपल्या घरट्यात परत नेण्यासाठीचे प्रयत्न. दर १०-१५ मिनीटांनी ते पिल्लाला खाणं आणून भरवू लागले. आणि उडून दुसऱ्या झाडावर बसून पिल्लाला बोलावू लागले. पण ते मात्र तिथल्या तिथेच उडत शेवटी गॅलरीच्या ग्रीलच्या एका अॅंगलवर जाऊन सुरक्षित बसून राहिले.

पहाटे परत बुलबुलच्या जोडीचा किलबिलाट सुरु झाला. त्यांच्या किलबिलाटाने पिल्लू जागं झालं आणि तेही अगदी नाजूक आवाजात ओरडू लागलं. लगेचच बुलबुलची जोडी येऊन त्याला खाणं भरवू लागली आणि त्याला घरट्यात परत नेण्यासाठी प्रयत्न करु लागली.
थोड्यावेळाने अचानक माझ्यासमोरुन ते पिल्लू उडून बाहेरच्या दुसऱ्या एका झाडावर जाऊन बसलं. आणि एक वेगळंच नाट्य आमच्यापुरतं संपलं असं वाटत असतानाच बराच वेळ झाला तरी अजून ते पिल्लू त्याच झाडावर बसलेलं आणि ती जोडी त्याला खाणं भरवत असलेली दिसली. काहीवेळानंतर मात्र ते पिल्लू सुरक्षित घरट्यात परतलेलं कळलं आणि मन शांत झालं.
खरंच जीवनमृत्यूचा संघर्ष माणूस आणि पशूपक्षी साऱ्यांसाठी सारखाच , नाही का...
- स्नेहल मोडक