वडोदरा - बडोदा संस्थानचा मानबिंदू आणि अतिशय देखणी वास्तू म्हणजे लक्ष्मी विलास महाल.
सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या वास्तव्यासाठी १८९० साली बांधलेला हा अप्रतिम महाल.
आमच्या माघी पौर्णिमेच्या गिरनार यात्रेनंतर लक्ष्मी विलास महालाला धावती भेट देण्याचा योग आला. वेळेअभावी फक्त मुख्य महालाच्याच वास्तुसौंदर्याचा आस्वाद घेता आला.
चार्ल्स माॅंट या ब्रिटिश वास्तुतज्ञाच्या आराखड्यानुसार या महालाची निर्मिती केली गेली. संपूर्ण महाल हा भारतीय, इस्लामिक आणि व्हिक्टोरियन वास्तुशैलीचा एक अनोखा मिलाफ आहे.
महालाच्या प्रवेशद्वारासमोरच अतिशय आकर्षक असं कारंज आहे. जे अजूनही व्यवस्थित सुरु आहे. मुख्य महालात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला सयाजीराव महाराजांच्या माता जमनाबाई गायकवाड आणि पिता खंडेराव गायकवाड महाराज यांची तैलचित्रे पहायला मिळतात.
त्यानंतर आहे महालामधील मुख्य शाही दरबार (गादी हॉल). आत प्रवेश करताच रेखीव घडवंचीवरची शुभ्र धवल वस्त्राने आच्छादित प्रशस्त गादी आणि तक्के, धातूच्या मयुरावर तोललेली नक्षीदार छत्री आपलं लक्ष वेधून घेते. याबरोबरच इथे आहे आपल्या दृष्टीला मोहवणारी अजून एक खास गोष्ट म्हणजे राजा रविवर्मा यांची तैलचित्रं. ही चित्रं काढण्यासाठी राजा रविवर्मा यांनी संपूर्ण देशभ्रमण केलं होतं. अगदी नजर खिळवून ठेवणारी चित्रं आहेत ही.
यापुढे आहे राजदरबार. अतिशय प्रशस्त अशा या दरबारहॉलमधे खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा बसवलेल्या आहेत. या दिवाणखान्याच्या कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलिची यांनी बनवलेले संगमरवरी पुतळे आहेत. राजदरबारातील कारभार आणि इतर कार्यक्रम पहाण्यासाठी राजस्त्रियांना बसण्यासाठी पहिल्या मजल्यावरील दालनाबाहेर खुला कक्ष (गॅलरी) आहे. दालनाच्या समोरच्या बाजूला बेल्जियम काचेची अप्रतिम अशी रंगीत चित्रं आहेत. तर कक्षाच्या बाहेरच्या बाजूला वादन करणाऱ्या अप्सरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.
राजदरबारानंतर आपल्यासमोर येतं ते शस्त्रागार. युद्धकाळात वापरलेल्या विविध तलवारी आणि इतर काही शस्त्रं इथं पहायला मिळतात. त्यात काही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तलवारी आणि शस्त्रंही इथे आहेत.
७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेल्या या राजवाड्यात बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं निवासस्थान आणि राजदरबार होता. या संपूर्ण महालात १७० खोल्या आहेत. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद अशा राजवाड्याच्या मनोऱ्याची ऊंची २०४ फूट आहे. बंकिगहॅम पॅलेसच्या चौपट मोठा हा राजवाडा आहे.
महालाच्या आजूबाजूला उद्याने, तरणतलाव, गोल्फचे मैदान आहे.हि सारी उद्याने, हिरवळ, कारंजी ब्रिटिश उद्यानतज्ञ विल्यम गोल्डरिग यांनी तयार केली आहेत. या महालात अजून मोतीबाग पॅलेस, माकरपुरा पॅलेस, प्रताप विलास पॅलेस आणि महाराजा फतेह सिंह संग्रहालय या काही ईमारती आहेत.
लक्ष्मी विलास पॅलेस पर्यटकांना सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पहाता येतो. २५० रुपये प्रवेश शुल्क आहे. संस्थानने या संपूर्ण महालाची माहिती देण्यासाठी एक उत्तम व्यवस्था केली आहे. कार्यालयातून माहिती ऐकण्यासाठी कानाला लावण्याचं एक छोटंसं यंत्र ( device) दिलं जातं. याद्वारे आपल्याला हव्या असलेल्या भाषेतून ( मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती ) महालाबद्दलचं निवेदन ऐकायला मिळतं. त्यामुळे आपल्याला संपूर्ण मुख्य महाल सविस्तर माहितीसह पहाता येतो. एकूण सव्वातासाचं हे निवेदन आहे. त्यानंतर किंवा आधी आपण इतर सर्व भाग पाहू शकतो.
राजवाड्याच्या बाहेरील भागाची छायाचित्रं / चित्रण करता येतं. मात्र अंतर्भागात छायाचित्रं किंवा चित्रण करण्यास मनाई आहे. त्यामुळे बडोदा संस्थानची ही अतिशय देखणी ऐतिहासिक वारसा असलेली वास्तु एकदा तरी प्रत्यक्षच पहायला हवी.
- स्नेहल मोडक