Pages

Saturday, March 13, 2021

कुणकेश्वर

           महाशिवरात्र आणि कुणकेश्वर हे साऱ्या कोकणकरांसाठी एक सुंदर समीकरण.

           देवभुमी कोकणातल्या देवगड मधलं एक गांव कुणकेश्वर. इथे असलेलं हे शंभू महादेवाचं प्राचीन आणि भव्य देवालय. आणि या देवालयाच्या बाजूलाच असलेला विस्तिर्ण, स्वच्छ आणि नितांतसुंदर असा सागरकिनारा. महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते. ४-५ दिवस चालणारी ही यात्रा म्हणजे जणू पर्वणीच असते. या ४-५ दिवसांच्या यात्रेत व्यापाराची मोठी उलाढाल होतेच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळे चाकरमानी शंभू महादेवाच्या दर्शनाच्या आणि यात्रेच्या ओढीने आपल्या घरी येतात. त्यामुळे साऱ्या कोकणात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं.

               खरंतर खूप वर्ष मनात येईल तितक्या असंख्य वेळा श्री कुणकेश्वराच्या दर्शनाचं भाग्य लाभलं पण अजूनही कुणकेश्वर असं नुसतं नांव जरी कानावर आलं तरी मन क्षणात महादेवांच्या चरणी पोहोचतं. नतमस्तक होऊन लगेच शुभ्र लाटांशी खेळायला समुद्र किनारी धावतं. 

            अकराव्या शतकात बांधलेलं, मूळ काळ्या पाषाणातलं, अप्रतिम शिल्पसौदर्याने नटलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे शंभू महादेवाचं देवालय म्हणजे देवभूमी कोकणचा जणू मुकुटमणीच. हे मंदिर  दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय सध्या कोकण पर्यटन वाढल्यामुळे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ही प्रसिद्ध झालंय.

               या मंदिराबद्दल पूर्वापार एक आख्यायिका सांगितली जाते. एक अरब व्यापारी जहाजातून प्रवास करत असताना या भागात त्याचं जहाज आलं आणि अचानक वादळ सुरु झालं. त्या व्यापाऱ्याला आपण आणि आपलं जहाज वाचणार नाही अशी भीती वाटू लागली. त्याचवेळी त्याचं लक्ष दूरवर भूभागावर लुकलुकणाऱ्या एका दिव्याकडे गेलं. तिथे काही देवस्थान असावं असा विचार करुन त्याने प्रार्थना केली की जर हे वादळ शमलं आणि मी त्यातून वाचलो तर तिथल्या देवाचं मोठं मंदिर बांधेन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वादळं शमलं आणि तोही सुखरूप राहिला. किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याने प्रार्थना केल्याप्रमाणे तिथे शोध घेतला असता शिवलिंग सापडलं. तिथेच मोठं मंदिर बांधून त्यात त्या शिवलिंगाची स्थापना केली. आणि नंतर त्याच मंदिराच्या कळसावरुन उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं. जिथे त्याची उडी पडली तिथे नंतर एक समाधी बांधली गेली.

                 नंतर या मंदिराची प्रसिध्दी वाढत गेली आणि इतिहास अभ्यासकांचं लक्ष या मंदिराकडे वळलं. मुसलमानी सत्ता हिंदू साम्राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना एका मुस्लिम व्यक्तीने हे मंदिर कसे बांधले असा प्रश्न अभ्यासकांना पडला आणि मंदिराचा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. १९६० सालच्या सुमारास माननीय बाबासाहेब पुरंदरे यांनी या मंदिराला भेट दिली. आणि अभ्यासाअंती निष्कर्ष काढले आणि पुराव्यानीशी सिध्दही केले. त्यानुसार हे मंदिर कुठल्याही अरब माणसाने बांधलेलं नसून हिंदू साम्राज्य काळात हिंदूनीच बांधलेलं मंदिर असल्याचं स्पष्ट झालं. त्या अरबी व्यापाऱ्याची म्हणून जी समाधी सांगितली जात होती ती प्रत्यक्षात एक मंदिरच असल्याचं सिध्द झालं.

                  मुस्लिम साम्राज्यकाळात सर्वच हिंदू मंदिराचा कमी अधिक प्रमाणात विध्वंस केला गेला. जेव्हा मुसलमान कोकणात येऊन साम्राज्य विस्तार करु लागले तेव्हा हे शिवमंदिर प्रसिद्ध झालं होतं. या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करुन विध्वंस करु नये यासाठी प्रयत्न केले गेले.

                   छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा भाग होता. त्यांची श्री कुणकेश्वरावर अपार श्रध्दा होती. मुस्लिम जेव्हा आक्रमण करीत जवळ येऊ लागले तेव्हा त्यांना मंदिराच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. आणि त्यातूनच वरिल आख्यायिका पसरवण्यात आली. सध्या समाधी म्हणून जी वास्तू सांगितली जाते ते तेव्हा मंदिरच होते. त्याच्या कळसावरील कोरीवकाम काढून त्याला चुमटाचा आकार दिला. बाहेरुन ती त्या व्यापाऱ्याची समाधी असल्याचं भासावं म्हणून हा प्रयत्न केला होता. जेणेकरून हे मंदिर आक्रमणापासून सुरक्षित राहील. तरीही ते स्वत: आपल्या तुटपुंज्या सैन्यासह मंदिरात रक्षणासाठी सिध्द राहिले. एवढे प्रयत्न करुनही मुस्लिमांनी मंदिरावर आक्रमण केलंच. तुटपुंज्या बळावर मराठ्यांनी जोरदार प्रतिकार केला.पण मुसलमानी सैन्य जास्त असल्याने मराठ्यांचा प्रतिकार कमी पडू लागला. मग स्वत: अमात्यानी मंदिराच्या कळसावरुन हल्ल्यात उडी घेतली. त्यांच्या येण्याने सैन्यात बळ संचारलं आणि त्यांनी अजून जोरदार प्रतिहल्ला केला. अखेर मुस्लिम सैन्याने माघार घेतली. पण या हल्ल्यात मंदिराचा थोडा विध्वंस झालाच. अमात्यांवर या घटनेचा मोठा मानसिक आघात झाला. त्यातून ते सावरलेच नाहीत आणि त्यातच कुणकेश्वर येथेच त्यानी अंतिम श्वास घेतला. त्यांनी युद्धासाठी जिथे उडी घेतली तिथे त्यांची समाधी म्हणून तुळशी वृंदावन बांधण्यात आलं आहे.

                   यानंतर जीर्णोद्धाराचं काम काही काळाने सुरु झालं मात्र प्रत्क्षात १७०० साली हा जीर्णोद्धार पूर्ण झाला. पण जीर्णोद्धार करताना काळ्या पाषाणाऐवजी तिथे सापडणाऱ्या चिऱ्याच्या दगडांचा उपयोग केला गेला. त्यामुळे मंदिराचे मुळ कोरीवकाम थोड्या प्रमाणातच शिल्लक राहिले आहे. यानतर परत काही काळानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

                     या मंदिराचे हे सारे ऐतिहासिक संदर्भ आंतरजालाचा थोडा धांडोळा घेतल्यावरही सहज उपलब्ध होतात.

                     इथल्या समुद्रातल्या खडकांवर लाटांच्या विशिष्ट दिशेमुळे अनेक शिवलिंग नैसर्गिकरीत्या तयार झाली आहेत. हे कुणकेश्वरचं अजून एक खास वैशिष्ट्य आहे.

                    असं हे अगदी देखणं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे कुणकेश्वराचं देवालय आणि बाजूलाच असलेला नितांत सुंदर सागरकिनारा प्रत्यक्ष पहायलाच हवा.

                                             - स्नेहल मोडक

 

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...