आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन. संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून कालिदासांना व्यापकपणे ओळखलं जातं. त्यांचं साहित्य प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत यांवर आधारित आहे. हे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरलंय. या साहित्याचा अभ्यास सर्वत्र सातत्याने सुरु आहे. त्यांची सात महाकाव्यं प्रसिद्ध आहेत. त्यातील कुमारसंभवम, रघुवंशम, ऋतुसंहार आणि मेघदूत ही महाकाव्यं आणि शाकुंतल सारखी नाटकं यांमुळे त्यांना विद्वान संस्कृत लेखक, कवी म्हणून मान्यता मिळाली.
आषाढ म्हटलं कि यातलंच एक महाकाव्य लगेच आठवतं ते म्हणजे मेघदूत.
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लीष्ट सानुम् ,
वप्रक्रिडापरिणतगज प्रेक्षणियं ददर्श...
कुठल्यातरी प्रमादाची शिक्षा म्हणून नगराबाहेर काढलेला यक्ष सुरवातीचा काही काळ कसातरी व्यतीत करतो. पण आषाढ सुरु होतो आणि पहिल्याच दिवशी त्याचा संयम संपतो. रामगिरी पर्वतावर मदमस्त गजाप्रमाणे झुकलेल्या त्या कृष्णमेघालाच विरहव्याकुळ यक्ष आपलं कुशल पत्नीपर्यंत पोहोचविण्याची विनंती करतो. या मेघाची दूत बनण्याची अनुमतीही न घेता यक्ष मेघाला अलकापुरीपर्यंतच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या श्लोकांमधून निसर्गातील रंगचित्रांचं अप्रतिम वर्णन करतो.
म्हणूनच आषाढ म्हटलं कि महाकवी कालिदास आणि त्यांचं मेघदूत हे महाकाव्य मनात रुंजी घालू लागतं
आषाढ हा वर्षाऋतूमधला महत्वाचा महिना. ज्येष्ठ महिन्यातल्या कमी अधिक पावसाची उणिव आषाढ भरुन काढतो. धुवांधार आषाढसरींनी आपण आणि वसुंधरा दोघंही तृप्त होतो. पेरलेल्या बियाण्याची रुजवात जरी ज्येष्ठात झाली तरी त्या नाजुक हिरव्या पात्यांना सुफलता देण्याचं काम आषाढच करतो. चिखलभऱ्या भुईत लावणीचं काम जोशात सुरु होतं ते आषाढातच. कडेकपारीतून फेसाळ धबधबे कोसळू लागतात तेही आषाढातच. आषाढसरींनी धरतीही हिरव्या मखमालीने सजते.
आषाढवारी आणि गुरुपौर्णिमा है आषाढ महिन्यातील अजून दोन महत्वाचे दिवस.
याच आषाढाला थोडंसं श्ब्दकाव्यात गुंफून महाकवी कालिदासांना ही काव्यांजली अर्पण…
दिवस खास आषाढाचा पहिला आज
हिरवाईच्या मखमालीचा ल्यायला साज
निळ्या आभाळी सारे कृष्णमेघ दाटले
तेच दूत यक्षाने मग अलकेस धाडले
मेघमृदुंगासह बरसल्या रेशीमधारा
अमृत पिऊनी तृप्त झाली अवघी धरा
थेंबांच्या साजशृंगारे नटल्या तरुवेली
रानीवनी विविधरंगी फुले उमलली
झऱ्यातूनी येई ऐकू अनाहत नाद
फेसाळ जळात खेळाया घाली साद
आषाढदिन जन्म महाकवी कालिदासांचा
गुंफूनी शब्दफुलांना प्रयत्न आदरांजलीचा
-स्नेहल मोडक


No comments:
Post a Comment