वारी दोन अक्षरी छोटासा शब्द पण अतिशय ऊर्जेने भरलेला. नुसत्या उल्लेखानेही क्षणात आपल्या नजरेसमोर पंढरीची वारी तरळते आणि दुसऱ्याच क्षणी साकार होतो तो पंढरीचा पांडुरंग.
शके ११११ मध्ये बांधलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुरवातीला छोटंसंच होतं. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र यादव आणि हेमाद्री पंडित यांनी हे मंदिर थोडं वाढवलं. आणि शके १९२५ मध्ये या मंदिराचा बराच विसतार झाला.
पुंडलिकाच्या काळात पुर्वाभिमुख विठ्ठल मूर्ती आणि समोर भिमेच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरिमूर्ती होती असं मानलं जातं. ते मंदिर आता वाहून गेलंय पण त्याचा चौथरा शिल्लक आहे. म्हणूनच वारकऱी संप्रदायाच्या घोषवाक्यात 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो.
वारीची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असत. तसंच संत तुकाराम महाराज ही वारीला जात असत. नंतर हैबतराव बाबा हे संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीला घेऊन जात असत. त्यानंतर १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत श्री नारायण महाराजांनी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर आणि देहु येथून संत तुकाराम यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. या दोन दिंड्याप्रमाणेच इतर अनेक संतांच्या दिंड्या पंढरीस येतात. या सगळ्या दिंड्या वाखरी येथे एकत्र होतात. आणि आषाढ शुद्ध दशमीला सकाळी एकत्र पंढरपूरला निघतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही वेळा वारी निघते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये आषाढ वारीचे महत्व जास्त आहे.
वर्षभर सारे व्यवहार नियमित सुरु असतात. विठ्ठलाचे नामस्मरण सुरुच असते. वर्षाऋतू सुरु होताच मात्र साऱ्या वारकरी संप्रदायाला पंढरीचे वेध लागतात. आणि मग सुरु होते आषाढवारीची तयारी. मुखाने विठ्ठलाचा नामजप आणि कानी टाळमृदुंगाची धून वाजू लागते.
पंढरीचा वास घंद्रभागे स्नान
आणिक दर्शन विठोबाचे
याच अपार इच्छेने वारकरी वारीची आसुसून वाट पहात असतात. आणि तो दिवस उजाडतो पालखी प्रस्धानाचा. पालखीचे प्रस्थान म्हणजेही एक सोहळाच. टाळमृदुंगाच्या गजरात आणि पांडुरंगाच्या जयघोषात सोहळा संपन्न होतो. दिंडी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होते. दिवसभर नामस्मरण, भजन यात वारकरी तल्लिनन होतात. अंधार पडल्यावर विश्राम करतात. किर्तन, प्रवचन, एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करीत निद्रेच्या अधिन होतात. पहाटे उठून आवरुन पुन्हा मार्गस्थ होतात. या वारीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रिंगण. हे रिंगण ही श्रध्देय आणि पवित्र संकल्पना आहे. वारी मार्गात कडुसफाटा,वेळापूर आणि वाखरी इथं रिंगण केलं जातं. मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात, मधल्या मोकळ्या जागेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व धावतो. स्वत: संत ज्ञानेश्वर महाराज अश्वारुढ असतात अशी धारणा आहे. त्यामुळे त्याला 'माऊलींचा अश्व ' असं म्हणतात.
मी तूपण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया
नाही भेदाचे ते काम
पळोनि गेले क्रोधकाम
अवघा रंग एक झाला
या आषाढवारीसाठी कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. जातपात, उच्च नीच, क्रोध मोह सारं विसरुन लोकं वारीसाठी एकत्र येतात. युगानुयुगे भक्तासाठी वीटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचं डोळेभरून दर्शन घेणं या एकाच भक्तिभावाने सारे वारकरी एकत्र येतात. आषाढी एकादशी दिवशी वारी पूर्ण करुन चंद्रभागेत स्नान करुन त्या सावळ्याच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे आयुष्याचं सार्थकच.
पूर्वापार चालत आलेली वारीची ही अतिशय सुंदर परंपरा कोरोना महामारीमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या वर्षीपासून खंडित झालीय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह इतर पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात पण अगदीच थोड्या वारकऱ्यांच्या उपस्थितित आणि त्याही वाहनातून. पण यामुळे सारे वारकरी मनोमनी अतिशय दुखावले आहेत. पण पांडुरंगावरच्या अपार श्रद्धेने नामस्मरणात दंग आहेत.
बोलावा विठ्ठल
पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभावे
साऱ्या जगावरील महामारीचे हे संकट पुर्णतः नष्ट व्हावं हिच विठ्ठल चरणी मनःपुर्वक प्रार्थना.
खिळ बसली परंपरेला नाही घडली आषाढवारी
पापण्या ओलावल्या अंतर्यामी दुखावला वारकरी
किती केली प्रार्थना अन आळवणी विठुरायाची
नाही झाली कामना पूर्ण विठ्ठलाच्या दर्शनाची
नाही झाला गजर टाळमृदुंगाचा चंद्रभागेतीरी
नाही नाचले कुणी घेऊनी तुळशीस डोईवरी
नाही नाहली पंढरी घोषात विठुमाऊलींच्या
नाही भिडल्या आसमंती ध्वजा वैष्णवांच्या
घेऊ आता दर्शन देवघरातल्या पंढरीरायाचे
करुया मानसपुजन त्या विठ्ठल रखुमाईचे
अर्पूनी तुलसीपत्र करु पूजन सावळ्याचे
कार्तिकवारीस घडावे दर्शन विठुचरणांचे
- स्नेहल मोडक


No comments:
Post a Comment