Pages

Monday, July 26, 2021

गुरुपौर्णिमा

नर्मदा मैय्या आणि गिरनार

            गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचं दर्शन आपल्याला व्हावं, गुरुपूजन करता यावं, गुरुसेवा घडावी हीच इच्छा असते. आणि गुरुपौर्णिमेला गिरनार शिखरी साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडणं म्हणजे सुवर्ण योगच.

            यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं असं ठरवलं आणि नेमकं मुंबई, ठाणे, कोकणात पावसाचं थैमान सुरु झालं. मनात किंचित संभ्रम निर्माण झाला पण श्री दत्तगुरुंना प्रार्थना केली आणि गिरनारला जायचं नक्की केलं.

            गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी आम्ही गिरनारला निघालो. सकाळी निघायच्या आधीपासूनच पाऊस कोसळत होता. त्या पावसातूनच प्रवासाला सुरुवात केली. महाराष्ट्राची हद्द ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश केला आणि पंधरा वीस मिनिटांतच अक्षरशः जादू घडावी तसा पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर पूर्ण प्रवासात पावसाचं विघ्न आलंच नाही.

             आम्ही अंकलेश्वरच्या पुढे पोहोचलो आणि मग सुरु झाली आमची मार्गशोध मोहीम. आम्हाला नर्मदा मैय्याचं किनाऱ्यावरुन प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं होतं. 

             नर्मदा नदी भारतातल्या प्रमुख नद्यांपैकी एक नदी. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहणारी ही सर्वात मोठी पश्र्चिम वाहिनी नदी.  नर्मदा रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या या नावानींही ओळखली जाते.नर्मदेच्या काठावर मार्कंडेय, भृगु, व्यास, अगस्ती, जमदग्नी, दुर्वास, वशिष्ठ आणि अजून अनेक ऋषींनी तपोसाधना केल्याचं सांगितलं जातं. यापैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली. नर्मदेच्या उगमापासून ते मुखापर्यंत अनेक तीर्थस्थानं वसलेली आहेत. म्हणूनच नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारतातील अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा करण्यात येते. हि नदी उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधली सीमारेषा आहे. 

             अशा या पवित्र नदीचं दर्शन आम्हाला गिरनारला जातायेताना घडतंच पण ते फक्त पुलावरुन. म्हणूनच यावेळी गिरनारला जाताना नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर जाऊन प्रत्क्ष दर्शन घ्यायचं ठरवलं. 

              आंतरजालावरुन सारी माहिती आधीच घेतली होती. पण तरी मैय्याच्या किनारी पोहोचण्याचा मार्ग प्रत्यक्षात थोडा बदललेला होता. मात्र त्यामुळे आम्हाला नर्मदा नदीवरील गोल्डन ब्रिजवरुन जाता आलं. अंकलेश्वरहून भरुचला जाण्यासाठी नर्मदा नदीवर १८८१ साली बांधलेला अतिशय सुंदर असा हा गोल्डन ब्रिज. या पुलाच्या बाजूलाच नंतर दुसरा मोठा पुल बांधलाय. गोल्डन ब्रिज ओलांडून आम्ही  तिथे असलेल्या सुरक्षा चौकीत जाऊन मार्गाची चौकशी करुन पुढे निघालो. गावात शिरुन गल्लीबोळातून थोडं फिरुन पोहोचलो ते भृगु ऋषींच्या आश्रमासमोरच. आश्रमात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबून तिथून बाजूच्याच गल्लीत असलेल्या नर्मदा माता मंदिरात गेलो. या मंदिरात नर्मदामातेची रेखीव मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या खाली तळघरात श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊन बाहेर आलो. या मंदिराच्या बाजूनेच नर्मदेच्या किनारी जायला वाट आहे. त्या रस्त्याने गाडीनेच किनाऱ्यावर पोहोचलो. काठाशी गेलो आणि नर्मदा मैय्याचं विशाल रुप भान हरपून पहात राहिलो. काही क्षणांनतर मैय्याची पूजा करुन जलस्पर्श केला. आणि काही क्षणांपुरतं का होईना मन शांत झालं. 

                 थोडा वेळ नर्मदा किनारी थांबून पुढील प्रवासाला लागलो. त्यादिवशी वाटेतच एका ठिकाणी मुक्काम केला. 

                   दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनारला निघालो. नर्मदा दर्शन झालं होतं, आता वेध लागले होते गिरनार शिखर दर्शनाचे. त्या विचारात दंग असतानाच भ्रमणध्वनी वाजला आणि बातमी कळली ती चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याची. क्षणात चिंतेचं काहुर माजलं मनात. आमच्या जुन्या घरात पूर्ण पाणी भरलं होतं. पण बाजूलाच बांधलेल्या नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर आमचे कुटुंबीय सुरक्षित होते. जुन्या घरात रहाणाऱ्या लोकांनाही त्यांनी नवीन घरात आणलं होतं. इतर नातेवाईकही सुरक्षित असल्याचं कळलं आणि चिंतेची एक रेघ कमी झाली. कोकणात पावसाने हाहाकार माजवला होता त्यामुळे सारखं मुंबई, ठाण्यात किती पाऊस आहे याचाही अंदाज घेणं सुरु होतं. 

                   या सगळ्या काळजीत गिरनारला उडन खटोलाच्या ( रोप वे ) कार्यालयात भ्रमणध्वनी वरुन चौकशी केली आणि कळलं गेले तीन दिवस उडन खटोला तुफान वारा, पाऊस, धुकं या कारणांमुळे बंद आहे. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वीच उडन खटोलाचं आरक्षण केलं होतं. आम्हाला गुजरातमध्ये पूर्ण प्रवासात अजिबात पाऊस लागला नाही. पण गिरनारवर मात्र तुफान वारा पाऊस सुरु होता. रोप वे बंद असला तरी दहा हजार पायऱ्या चढून जायचं आम्ही ठरवलंच होतं. आम्ही संध्याकाळी गिरनारला ( तलेटी ) पोहोचायच्या आधी परत उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्ही गिरनारला नंतर यावं नाही तर मग आरक्षणाचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं आणि मग मात्र पहाटेच पायऱ्या चढायला सुरुवात करायची असं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी गुरुपौर्णिमेला रोप वे सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मग रोप वे सुरु होतोय का बघायचं ठरवलं.

                   गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर निघून रिवाजाप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन, पूजा करुन उडन खटोलाच्या कार्यालयात गेलो. तिथे पाहिलं तर रोप वे हळूहळू सुरु करुन वारा पाऊस धुकं याच्या परिणामाचा अंदाज घेणं सुरु होतं. थोड्या वेळाने लोकांसाठी रोप वे सुरु करायचा निर्णय झाला. आणि पहिल्याच ट्रॉलीमधून आम्हाला जायला मिळालं. सुरुवातीला ढगाळ वातावरण होतं पण जेमतेम ७-८ मिनिटांतच वाऱ्याचा जोर वाढलेला जाणवू लागला. आणि काही क्षणातच आमची ट्रॉली धुक्याने वेढली. शुभ्र धुक्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. नेहमी दहा मिनिटांत पोहोचणारी ट्रॉली त्यावेळी पंचवीस मिनीटांनी अंबाजी टुक वर पोहोचली. रोप वे सुरु करुन खूपच जोखीम घेतली होती. निघताना त्यांनी काळजी करु नका काही अडचण येणार नाही आणि आलीच तर ट्रॉलीत लावलेल्या क्रमांकावर संपर्क करायला सांगितलं होतं. रोप वे मधून उतरल्यावरही रोप वे कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.

                    रोप वे मधून उतरुन पायऱ्या चढून वर आलो आणि थक्क झालो. पहाटेच जोरदार पाऊस पडून गेला होता.त्यामुळे संपूर्ण गिरनार सुस्नात होऊन धुक्याची दाट दुलई लपेटून आमच्या स्वागताला उभा होता. शुभ्र दाट धुकं, भन्नाट वारा आणि पावसामुळे ओलावलेला सारा परिसर अतिशय रमणीय दृश्य होतं.  जेमतेम सात-आठ फुटांपर्यंत दिसत होतं तेही किंचित धुसरच. वर्षाऋतूमध्ये खरंतर सगळ्याच पर्वतरांगा धुक्याने वेढलेल्या असतात. पण गिरनारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तुफान वाऱ्यातही इथं खूप दाट धुकं असतं. अंबाजी मातेचं मंदिरही धुसरच दिसत होतं. प्रथम मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला पोहोचून गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि कमानीपर्यंत आलो. पौर्णिमा सुरु व्हायला खूपच वेळ होता म्हणून कमानीजवळच बराच वेळ थांबून मग परत चढायला सुरुवात केली. थोडयाच वेळात शिखरावर पोहोचलो. 

                    मंदिरात प्रवेश केला आणि श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाने साऱ्या जगाचा विसर पडला. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं.

                     दर्शन घेऊन परत  काही पायऱ्या उतरुन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिथे नुकतीच श्री दत्तात्रेयांच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तिथलं दर्शन, प्रसाद घेऊन परत अंबाजी टुक कडे निघालो. रोप वे सुरु होता पण वाईट हवामानामुळे बंद करणार असल्याचं सांगितलं. पण आम्हाला रोप वे ने गिरनारच्या पायथ्याशी परत यायला मिळालं. बहुधा त्यानंतर काही वेळातच रोप वे बंद झाला असावा. 

                     श्री दत्तगुरुंना मी केलेली प्रार्थना पोहोचली असावी. कारण श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा शब्दशः पूर्ण केली. आपण प्रार्थना करावी आणि अगदी लगेच ती शब्दशः पूर्ण व्हावी, गुरुदर्शन घडावं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य आम्हाला कायम लाभावं आणि गिरनार दर्शनाचा योग वारंवार यावा हिच श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

- स्नेहल मोडक

 


  

 


No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...