Pages

Wednesday, June 21, 2023

चारधाम यात्रानुभव... भाग १

            उत्तराखंड मधील चारधाम यात्रा हे अनेक लोकांप्रमाणेच आमचंही स्वप्न. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चारधाम दर्शन आणि त्यातही केदारनाथ चं विशेष आकर्षण आम्हाला होतं. आमचं एकवीसावं गिरनार दर्शन झालं आणि लगेच चारधाम यात्रेचा योग आला.

            आम्ही चारधाम यात्रा करायचं ठरवलं‌ पण मोठ्या ग्रुपबरोबर जायचं की स्वतंत्रपणे हा प्रश्न होता. मला शक्यतो स्वतंत्रपणे जायची इच्छा होती. मग आंतरजालावरून माहिती घेतली आणि तसच ठरवलं. वेगवेगळ्या यात्रा कंपन्यांशी बोलून एका कंपनीतर्फे जायचं नक्की केलं. आम्ही दोघं आणि याचे ऑफिस मधील तीन सहकारी मित्र आणि त्यांच्या सौ. असे एकूण आठजणं मिळून जायचं ठरलं. 

            वटपौर्णिमेला गिरनार दर्शन करुन आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी चारधाम यात्रेसाठी प्रस्थान केलं. पहाटेच्या विमानाने निघून सकाळी डेहराडूनला पोहोचलो. आम्ही डेहराडून ते डेहराडून असं पॅकेज घेतलं होतं त्याप्रमाणे डेहराडून ला आम्ही पोहोचलो तेव्हा आमच्यासाठी गाडी येऊन थांबली होती. आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या चारधाम यात्रेला प्रारंभ झाला. 

            आमचं मुक्कामाचं पहिलं ठिकाण होतं हरिद्वार. साधारण तासाभरात आम्ही हरिद्वारला पोहोचलो. पण आमच्या हॉटेलपासून जवळपास एक किमी अंतरावरच गाडी थांबवावी लागली. तिथून पुढे काही कारणास्तव गाड्या सोडत नव्हते. मग सगळं सामान घेऊन आमची वरात हॉटेलपर्यंत पोहोचली. रुम रिकाम्या नसल्याने आधी थोडावेळ एकाच रुममध्ये सगळे थांबलो. फ्रेश होऊन नाश्त्याची ऑर्डर दिली. नाश्ता तयार होईपर्यंत रुम मिळाल्या. मग आपापल्या रूममध्ये सामान ठेवून नाश्ता केला. आवरुन स्थलदर्शन करण्यासाठी निघालो.

            दिवस पहिला - हरिद्वारला आम्ही जिथे मुक्कामाला थांबलो होतो तिथून जवळच मनसा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग होता. त्यामुळे सर्वात आधी आम्ही मनसा देवीच्या दर्शनासाठी निघालो.

            मनसा देवी ही भगवान शिव आणि मातापार्वतीची मानसकन्या. मस्तकापासून उत्पन्न झाली म्हणून मनसा या नावाने ओळखली जाते. तसंच ती कश्यप मुनींच्या मनातून उत्पन्न झाली अशीही एक मान्यता आहे. हरिद्वार मधील शिवालिक पर्वतावर मनसा देवीचं मंदिर आहे. ती नागसर्पांची देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी खड्या पायऱ्या आहेत. ८०० पायऱ्या चढून जावं लागतं. तसंच उडन खटोलाचीही व्यवस्था आहे. आम्ही मंदिरात जाताना उडन खटोलाने जायचं ठरवलं. मात्र त्यासाठी खूपच गर्दी होती. दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर आमचा नंबर लागला. रोपवे ने आम्ही वर मंदिराजवळ पोहोचलो. दर्शनासाठीही मोठी रांग होती. रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आणि परत निघालो. येताना पायऱ्या उतरुन खाली आलो. हे मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुलं असतं. अतिशय सुंदर अशा या मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही सुंदर आहे.  उंचीवर असल्याने इथून साऱ्या हरिद्वारचा नजारा पहाता येतो.

            हर की पौडी हे हरिद्वार मधील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ. मनसा देवीचं दर्शन घेऊन आम्ही हर की पौडीला गैलो. समुद्र मंथनातून निर्माण झालेलं अमृत मिळवण्यासाठी साठी देव आणि दानवांमध्ये भांडण सुरु झालं. त्यावेळी दानवांना अमृत मिळू नये म्हणून भगवान विश्वकर्मा हे अमृत घेऊन निघाले असताना त्यातले काही थेंब या स्थानी पडले. तसंच इथे एका पाषाणावर भगवान श्री विप्ष्णूंचं पदचिन्ह उमटलेलं आहे. यामुळे पहाडातून येणाऱ्या गंगा नदीचं हे स्थान हर की पौडी या नावानं प्रसिद्ध आहे. हा घाट राजा विक्रमादित्य यांनी त्याचे बंधू भर्तृहरी यांच्या स्मरणार्थ बांधला आहे. भर्तृहरी या स्थानी ब्रम्हदेवाचं ध्यान करत असत. म्हणून या कुंडाला ब्रम्हकुंड म्हणून ओळखलं जातं. इथल्या ब्रम्हकुंडावर मा गंगेची नित्यनेमाने अतिशय सुंदर अशी सायंआरती केली जाते. ही आरती आणि एकूणच इथला अतिशय सुंदर नजारा पाहण्यासाठी देशविदेशातील भाविक इथे येत असतात. दर बारा वर्षांनी भारतातील सर्वात मोठा असा कुंभमेळा इथं भरतो. लाखों भाविक या कुंभमेळ्याला उपस्थित असतात.

            आम्ही घाटावर पोहोचून मंदिर दर्शन करुन गंगा आरतीसाठी थांबलो. मधल्या वेळेत हलका पाऊस पडून गेला होता. साऱ्या वातावरणात गारवा आला होता. ठरलेल्या वेळेत म्हणजे सायंकाळी सात वाजता गंगा आरती सुरु झाली. आणि सारा परिसर दीपज्योतींनी उजळून निघाला. उपस्थित सारे भाविक आरतीत रममाण झाले. आरतीचं सुंदर दृश्य नजरेत आणि छायाचित्रात साठवून आम्ही मुक्कामी परतलो.

            दिवस दुसरा - सकाळी लवकरच पुढील मुक्कामी म्हणजे बारकोटला निघालो. थोडा प्रवास सुरळीत झाला आणि मग वाहनकोंडीमध्ये अडकलो. हळूहळू पुढे जात अखेर मसूरीला पोहोचलो. मसूरी हे उत्तराखंड मधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ. 'पहाडोंकी रानी' या नावानंही हे शहर ओळखलं जातं.  मार्गावरच एका ठिकाणी झिप लाईन, पॅराग्लायडिंग असे साहसी खेळ खेळायची सुविधा होती. मग मात्र तिथे थांबलोच. खेळ खेळून पुढे निघालो. पण वाहनकोंडी सुरुच होती. त्यामुळे सरळ केम्टी वाॅटरफाॅल बघायला गेलो. केम्टी फाॅल मुख्य रस्त्यापासून थोडा आत आहे. फाॅल बघण्यासाठी सुरवातीला थोडंसं  चालून खाली उतरुन जावं लागतं. अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे. मार्गावर दोन्ही बाजूला थोडी दुकानंही आहेत. त्यामुळे इथे खानपान आणि खरेदी याचाही आनंद लुटता येतो. 

            सुंदर असं हे ठिकाण पाहून आम्ही पुढे निघालो. वाहनकोंडीत बराच वेळ वाया गेल्यामुळे खरेदीसाठी प्रसिद्ध अशा मसूरीमधल्या मालरोड वर आम्हाला जाता आलं नाही. अखेर सायंकाळी आम्ही आमच्या मुक्कामी बारकोटला पोहोचलो. एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असा सततचा वळणावळणचा प्रवास खूप छान झाला होता. 

            दिवस तिसरा - यमुनोत्री दर्शन. चारधाम मधील पहिल्या धामाचं दर्शन आम्ही घेणार होतो. बारकोटहून जानकचट्टीपर्यंत आमचा गाडीचा प्रवास होता. तिथून पुढे यमुनोत्रीला चालत जायचं होतं. भल्या पहाटे आम्ही जानकीचट्टीला निघालो.

            यमुनोत्री हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील ठिकाण आहे. १०,८०४ फुट उंचीवरील हे यमुना नदीचं उगमस्थान आणि चारधाम मधील पहिलं धाम आहे. १९१९ साली टिहरी, गढवालचे महाराजा प्रतापशाहा यांनी देवी यमुनेचं हे मंदिर बांधलंय. त्यांतर आलेल्या एका मोठ्या भूकंपात हे मंदिर उध्वस्त झालं होतं. नंतर याची पुनर्निर्मिती जयपूरच्या महाराणी गुलेरिया यांनी केली. मंदिरात काळ्या संगमरवरात घडवलेली देवी यमुनेची मूर्ती आहे. यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि यमदेवाची भगिनी आहे. अशी मान्यता आहे की भाऊबीजेच्या दिवशी इथं यमुना नदीत स्नान केल्यास मृत्यू भय रहात नाही. याठिकाणी असितमुनींचा आश्रमही होता. पांडव जेव्हा उत्तराखंड मधील चारधाम यात्रेला आले तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा यमुनोत्री, गंगोत्री मग केदारनाथ आणि मग बद्रीनाथ अशी यात्रा केली. त्यामुळे त्यानंतर चारधाम यात्रेला सुरुवात झाली. यमुनोत्री मंदिराच्या थोडं खाली जवळच सूर्यकुंड आहे. हे गरम पाण्याचं कुंड असून यात भाविक स्नान करतात. या स्नानाने त्वचारोग बरे होतात असाही एक समज आहे.

            जानकीचट्टी पर्यंतच वाहनं जाऊ शकतात. त्यापुढे यमुनोत्री मंदिरापर्यंत जाण्यासाठी ६ किमीची अवघड चढाई पार करावी लागते. पहाडाला विळखा घालत जाणारा वळणदार आणि अरुंद असा हा मार्ग आहे. एका बाजूला पहाड तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्यातून शुभ्र खळखळाट करत वहाणारी यमुना नदी असा सुंदर पण थोडासा भीतीदायक रस्ता आहे. त्यामुळे चढता-उतरताना अतिशय सांभाळून चालावं लागतं. ज्यांना पूर्ण चढून जाणं शक्य नसतं त्यांच्या साठी घोडा, डोली किंवा पिठ्ठूची सोय उपलब्ध आहे. 

            आम्ही चालतच जायचं ठरवलं. सुरुवातीला सहज सोपी वाटणारी चढाई थोड्या वेळातच आपलं खरं स्वरूप दाखवते. पण तोपर्यंत आपण चालायला सुरुवात केलेली असते. त्या अरुंद रस्त्यावरुन एकाच वेळी पायी चालणारे, डोलीवाले, घोडे, पिट्ठू हे चालत असतात. त्यातून मार्ग काढत चालणं त्रासदायकच असतं. अतिशय खडी अशी चढाई चढताना हळूहळू ऑक्सिजनची पातळी कमी होत असते. त्यामुळे जास्तच दमछाक होते. आम्ही सकाळी लवकरच चालायला सुरुवात केली होती. तेव्हा वातावरण आल्हाददायक होतं. कोवळं उन, धुकं असा खेळ सुरु होता. नंतर मात्र आम्हाला चढाई दमवू लागली. थांबत थांबतच आमचं चालणं सुरु होतं. इथे रस्ता सतत चढावाचा आणि उंचसखल पायऱ्यांचा आहे. आम्हाला गिरनार पर्वत चढण्या- उतरण्याचा सराव असूनही यमुनोत्रीची चढाई अतिशय थकवणारी होती. 

            एका क्षणी माझ्यापुढे चालत असलेला एक घोडा चढताना घसरला आणि तो स्वताला सावरु न शकल्याने त्यावर बसलेल्या मुलीसह माझ्या पायाशी कोसळला. मी कसाबसा माझा तोल सावरला अन्यथा त्या घोड्याबरोबरच मी आणि माझ्या मागे चालणारी १-२ लोकं असे सगळेच जोरदार धडपडलो असतो. सुदैवाने घोडा लगेच उठला आणि त्यावरुन पडलेल्या मुलीलाही फारशी दुखापत झाली नाही. यानंतर आम्ही फारच काळजी घेत चालायला सुरुवात केली. थोडंस चालून पुढे गेलो आणि पुन्हा एकदा काळजी वाटावी अशी घटना घडली. चढावाचा रस्ता जिथे वळतो तिथे कोनात रेलिंग नाहीय. चालणाऱा माणूस तोल जाऊन वरुन खालच्या रस्त्यावर सहज पडू शकतो. नेमकं तसंच झालं. वरच्या रस्त्यावर चालणाऱ्या एका महिलेला घोड्याचा जोरदार धक्का लागला आणि तिला तोल सावरता न आल्याने ती वरुन खाली अगदी माझ्या मागे जोरात पाठीवर पडली. ती स्वता उठूच शकली नाही. लोकांनी तिला उचलून बाजूला घेतलं. तिला तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज होती. ती महिला पडली आणि तिच्या थोडं मागे चालत असलेला हा पण धडपडला. मी खालूनच त्याला आधार द्यायचा प्रयत्न केला आणि तो कसाबसा सावरला. खूपच सांभाळून चालत असूनही अशा घटना घडत असतात. 

            हे असे अनुभव घेत , थांबत थांबत अखेर एकदाचे आम्ही मंदिरात पोहोचलो. सारी चढाई पूर्ण करुन मंदिरात पोहोचायला आम्हाला जवळपास ५ तास लागले होते. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झालं. क्षणात सारा थकवा नाहीसा झाला. यमुनेचं, सूर्यकुंडाचं दर्शन घेतलं. यमुनेचा खळाळता जलप्रपात पाहिला. यमुना जल बाटलीत भरुन घेतलं आणि सारे परतीच्या मार्गाला लागलो.

            परतीचा मार्ग उताराचा असल्याने थोडा सोपा होता. मात्र आम्ही चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मार्गावर चिखल निर्माण झाला आणि आमची चाल आपसूकच मंदावली. कारण त्या चिखलात घसरुन पडण्याची भीती होती. साधारण दिड तासानंतर पाऊस थांबला आणि चालणं थोडं सुकर झालं. एकूण साडेतीन तासात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. जानकीचट्टी ला पोहोचून पून्हा गाडीने बारकोटला मुक्कामी परत आलो. यमुनोत्री ची अवघड चढाई पायी पूर्ण करुन आल्याने सारे अतिशय थकलो होतो. जेमतेम जेवून लगेचच निद्राधीन झालो.

            दिवस चौथा - आदल्या दिवशी सगळेच अतिशय दमल्याने सकाळी जरा आरामात आवरुन उत्तरकाशीकडे प्रयाण केलं. वाहनकोंडी हा तिथला नित्याचाच भाग असल्याने उत्तरकाशीला पोहोचायलाही दुपार उलटून गेली. रुमवर पोहोचलो आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यावर सायंकाळी उशिरा थोडं जवळपास फिरुन आलो. रात्री जेवून लगेचच निद्राधीन झालो. कारण दुसऱ्या दिवशी परत लवकरच प्रवासाला सुरुवात करायची होती. 

            दिवस पाचवा - पहाटे लवकरच आवरुन आम्ही गंगोत्री या दुसऱ्या धामाच्या दर्शनासाठी प्रस्थान केलं. आमचा मार्ग हर्शिल या उत्तराखंड मधील अजून एका प्रसिद्ध पर्यटनस्थळावरुन जात होता. पण आधी गंगोत्री दर्शन करायचं असल्याने जाताना कुठेही स्थळदर्शनसाठी थांबलो नाही.

            गंगोत्री हे चारधाम मधील दुसरं धाम. राजा भगिरथाने या स्थानी आपल्या पूर्वजांना पापमुक्ती मिळावी म्हणून कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. आणि त्यांनी मा गंगेला पृथ्वी वर त्या स्थानी अवतीर्ण होण्यास सांगितलं. गंगेच्या तीव्र आणि प्रचंड धारांना नियंत्रित करण्यासाठी भगवान शिवांनी तिला आपल्या मस्तकावरील जटेत धारण केलं आणि मग गंगा भागीरथी या नावानं गंगोत्री ला प्रकट झाली. इथल्या मंदिराची निर्मिती १८ व्या शतकात नेपाळचे महाराजा अमरसिंह थापा यांनी केलीय. त्यानंतर देवी गंगेची मूर्ती शंकराचार्य यांनी स्थापन केली. या मूर्ती बरोबरच इथे सरस्वती , यमुना, भगीरथ आणि शंकराचार्य यांच्याही मूर्त्या इथे स्थापित केल्या आहेत. गंगा नदीचं उगमस्थान म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे. पूर्वाभिमुख असं हे मंदिर शुभ्र संगमरवरी दगडातून घडवण्यात आलं आहे .

           या मंदिरापर्यंत वाहनानं जाता येतं. अगदी थोडंसं सरळ साध्या रस्त्याने चालावं लागतं. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि तिथे  उपस्थित असलेल्यांपैकी एका पंडितजीना भेटलो. त्यांच्या कडून गंगापूजन करायचं ठरवलं आणि आम्ही घाटावर आलो. यमुनोत्री प्रमाणेच गंगोत्रीलाही बर्फाचं अत्यंत थंडगार पाणी असल्याने इथंही स्नान करणं अशक्य होतं. म्हणून मग पाण्यात उतरुन हातपाय धुवून मार्जन करायचं ठरवलं. त्याप्रमाणे पाण्यात पाऊल टाकलं आणि बर्फाच्या पाण्याच्या स्पर्शाने पावलं सुन्नबधीर झाली. जेमतेम ५-१० मिनीटं पाण्यात थांबून हातपाय धुवून मार्जन करुन गंगाजल बाटलीत भरुन घेऊन वर आलो. तोपर्यंत पंडितजीनी पूजेची तयारी केली होती. घाटावर येऊन सारे पुजेला बसलो. बाटलीत भरुन घेतलेल्या गंगाजलाचं पूजन आणि पितृतर्पण केलं. साग्रसंगीत पूजा करुन प्रसन्न मनाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी साठी रांगेत उभं राहिलो. थोड्याच वेळात रांगेतून मंदिरात पोहोचलो. मी गंगामैयासमोर नतमस्तक झाले. अन लगेच तिथल्या पंडितजीनी मला प्रसाद म्हणून चार बांगड्या दिल्या आणि माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. माझी सेवा प्रार्थना गंगामैयापर्यंत पोहोचल्याची प्रत्यक्ष अनूभूती मला मिळाली होती. कारण क्वचितच असा प्रसाद तिथे दिला जातो. 

           दर्शन घेऊन आम्ही परत उत्तरकाशीला आमच्या मुक्कामी परत निघालो. वाटेत हर्शिल या पर्यटनस्थळी थांबून स्थलदर्शन करत, दाट हिरव्यागार जंगलाचं नेत्रसुख घेत उत्तरकाशीला पोहोचलो. पोहोचायला नेहमीप्रमाणे रात्र झालीच होती. दुसऱ्या दिवशी परत पहाटे निघायचं होतंच.

            एकूणच आमचा सारा प्रवास धावपळीचाच होता. रात्री उशिरा मुक्कामी पोहोचायचं आणि पहाटे लवकर प्रवास सुरु करायचा असंच सारखं सुरु होतं. मात्र कुठेही प्रवास कंटाळवाणा झाला नाही. याला कारण उत्तराखंडचं अतिशय सुंदर, असं निसर्ग सौंदर्य. जणू आभाळाशी स्पर्धा करणारे उंचच उंच बेलाग पर्वत आणि त्यांच्या पायथ्याला बिलगलेली शुभ्र खळखळाट करणारी सरिता आणि मधून जाणारा अतिशय नागमोडी वळणदार असा रस्ता. इतकं अप्रतिम निसर्गसौंदर्य असल्याने प्रवासही अगदी हवाहवासा वाटत होता. चारधामच्या संपूर्ण प्रवासात कधी यमुना, कधी गंगा ,कधी मंदाकिनी तर कधी अलकनंदा या सुंदर सरितांची साथ आपल्याला मिळत असते. 

क्रमशः

- स्नेहल मोडक








No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...