वटपौर्णिमा जसजशी जवळ येऊ लागली तसतशी आमची गिरनार दर्शनाची ओढ वाढू लागली. आणि यावेळी ही ओढ आणि उत्साह जरा जास्तच होता. त्याला कारणही तसंच होतं.
यावेळी पौर्णिमा सकाळी उशीरा सुरू होणार होती म्हणून आम्ही पौर्णिमेच्या दिवशीच प्रस्थान केलं. दुसऱ्या दिवशी पहाटे जूनागढला पोहोचून लगेच तलेटीला मुक्काम स्थानी गेलो.
सारी आन्हिकं आवरुन लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोप वे जवळ गेलो. गर्दी खूपच जास्त असल्याने रोप वे ने वर जायला खूप मोठी रांग लागली होती. आम्ही ट्राॅलीमध्ये बसल्यावर पहिली ३-४ मिनिटं वातावरण अगदी छान स्वच्छ होतं. मग अचानक धुकं वाढू लागलं आणि अगदी मिनीटाभरात सगळीकडे दाट शुभ्र धुकं पसरलं. ट्राॅलीचा वेगही नेहमीपेक्षा कमी होता. त्या पूर्ण धुक्यातूनच ट्राॅली अंबाजी टुकवर पोहोचली. उतरुन बाहेर आलो आणि भन्नाट वाऱ्याने आमचं स्वागत केलं.
अंबामातेचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर धुक्यानं वेढला होता. अंबामातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. दाट धुक्यातून चालताना खूप छान वाटत होतं. थोडंसं पुढे आलो आणि अक्षरशः खिळून उभं राहिलो. अतिशय अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारा नजारा समोर पसरला होता. शुम्र मेघ अगदी इतक्या खाली अवतरले होते की थोड्या प्रयत्नाने सहज स्पर्श करता यावा.
अगदी गुरुशिखरावर पोहोचेपर्यंत सारा गिरनार शुभ्र मेघांची दाट दुलई पांघरून बसला होता. सहस्त्ररश्मीचं दर्शन दूरच राहिलं पण कोवळी किरणंही मेघांमधून हळूच डोकावत नव्हती. अतिशय नयनरम्य अशा वातावरणातच आम्ही गुरुशिखरी पोहोचलो. पौर्णिमा संपायच्या खूप आधीच आम्ही मंदिरात पोहोचलो. श्री दत्तात्रेयांसमोर नतमस्तक झाले आणि इच्छापूर्तीच्या आनंदाने डोळ्यात अश्रू आले. आमचं हे एकवीसावं पौर्णिमा दर्शन होतं. मन अगदी प्रसन्न, तृप्त झालं होतं.
अगदी पहिल्यांदा गिरनार दर्शनाला जाताना मनात अत्यंत साशंकता होती. दहा हजार पायऱ्या चढून उतरणं आपल्याला जमेल का ही काळजी मनात दाटली होती. कारण तेव्हा तर रोप वे नव्हताच. पण तेव्हा श्री दत्तात्रेयांच्या कृपेने आमचं शिखर दर्शन आणि परिक्रमा पूर्ण झाली. आणि मग परत नक्की जायचंच असं मनापासून वाटू लागलं. पण त्याआधी मात्र कुणी भविष्य सांगितलं असतं तरी आम्ही विश्वास ठेवणं अशक्य होतं. आणि म्हणूनच कल्पनेच्या पलीकडे असलेली ही गिरनार वारी वटपौर्णिमेला एकवीसाव्या दर्शनावर येऊन पोहोचली ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट होती. कधी रोप वे ने तर कधी दहा हजार पायऱ्या चढून असं श्री दत्तगुरुंच्या इच्छेनुसार आम्हाला गिरनार दर्शन घडतं हे भाग्यच.
आम्ही दर्शन घेऊन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिधे नेहमीप्रमाणे वाचन करुन धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत निघालो. सारा वेळ धुकं दाटलेलच होतं. पण रोप वे सुरु होता. रोप वे ने खाली पायथ्याशी येऊन मुक्कामी पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे गिर सफारीला गेलो. अतिशय छान सफारी आहे ही. मुक्त विहार करत असलेले वाघ, सिंह, हरीण हे आपल्याला सहज पहाता येतात. सुमारे १४१२ चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे. त्यातला काही भाग राष्ट्रीय उद्यान आणि उरलेला बराच मोठा भाग वन्यजीवांसाठी संरक्षित आहे. जूनागढ पासून ६५ किमी अंतरावर असलेलं हे जंगल सिंहांचं एकमेव मुख्य निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलाला १९९५ साली अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.
तिथून दुपारी परत आलो. आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सारा प्रवास, दर्शन अगदी मनासारखं घडलं होतं. श्री दत्तगुरु सारं काही मनासारखं घडवत असले तरीही माझ्या मनात मात्र आपली सेवा श्री दत्तगुरुंच्या चरणी रुजू होतेय की नाही असा विचार येत होता. मग नामस्मरण करत मी तो विचार करणं सोडून दिलं.
सकाळी लवकरच घरी पोहोचलो. ताजंतवानं होऊन नित्याप्रमाणे काही क्षण देवासमोर उभी राहिले. त्याचवेळी देवासमोर एक ज्वेलर्स ची पिशवी ठेवलेली दिसली. मनात विचार आला लेकीची काहीतरी खरेदी झालेली दिसतेय. तेवढ्यात लेकीने वाफाळत्या चहाचा कप हातात दिला. चहा घेत असतानाच तिने त्या पिशवीतून एक खोका काढून आमच्या हातात दिला. उघडून पाहिला आणि आम्ही दोघंही भान हरपून पहात राहिलो. त्यात आमच्या दोन्ही लाडक्या लेकींनी दिलेली अतिशय रेखीव सुंदर अशी श्री दत्तात्रेयांची मूर्ती होती. श्री दत्तगुरुंनी फारच मोठी अनुभूती देऊन माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याची जाणीव करुन देऊन आश्वस्त केलं होतं. डोळ्यांत दाटलेले अश्रू निग्रहाने परतवत निःशब्द झाले होते मी. आमच्याकडून अशीच सेवा अखंडपणे घडावी आणि श्री दत्तात्रेयांचा आशिष सदैव आम्हा सर्वांना लाभावा हिच प्रार्थना.
दत्त माझा अन मी दत्ताची
लागली गोडी दत्तनामाची
कुणी केले मजकडे दुर्लक्ष
असेल त्याचे मजवरी लक्ष
टोचता मज दुःखाचे कंकर
घालेल तोच अलवार फुंकर
नयनात माझिया अश्रू दाटता
होईन शांत त्याचे दर्शन घडता
एकाकी नसेन एकाही क्षणी
वसे तोच नित्य मम मनोमनी
नसता कुणी मज आप्तसखा
असेल दत्तच माझा मनसखा
कधी होता मजला हर्षोल्हास
दिसे दत्तमूर्ती तेजोमय खास
श्वासासंगे दत्तनाम मी स्मरावे
षडरिपुमुक्त तयाने मज करावे
कधी मागता दत्तदर्शन भाग्य
देई तो अनुभूतीचे मज सौख्य
दत्त माझा अन मी दत्ताची
लागली गोडी दत्तनामाची
- स्नेहल मोडक






No comments:
Post a Comment