दिवस दहावा - बद्रीनाथ हून सकाळी लवकर आम्ही माणा गाववाकडे प्रयाण केलं. बद्रीनाथ पासून अगदी जवळ म्हणजे ५-६ किमी अंतरावर असलेलं हे माणा गांव म्हणजे भारत - चीन सीमेवरचं पहिलं गांव.
माणा गावात शिरल्यावर प्रथम श्री गणेशजी ने ज्या गुंफेत बसून महाभारताचं अथकपणे लिखाण केलं ती गुंफा पहायला मिळते. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर महर्षी व्यासांनी ज्या गुंफेत बसून महाभारत कथन केलं ती गुंफा आहे. फक्त इथेच आपल्याला सरस्वती नदी पहाता येते. इथून पुढे सरस्वती नदी गुप्त होते. जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली आणि श्री गणेश ते लिहू लागले तेव्हा सरस्वतीला राग आला, आपण विद्येची देवता असताना गणेशाला का सांगितलं म्हणून चिडून ती जोराने खळखळाट करु लागली. त्या आवाजाने गणेशाला व्यासांचे शब्द ऐकू येईनासे झाले. व्यासांनी सरस्वतीला शांत होण्यास सांगितलं. पण ती अधिकच चिडली. तेव्हा व्यासांनी क्रोधित होऊन तिला शाप दिला की तू याच जागी गुप्त होशील. तेव्हा सरस्वतीला आपली चूक समजली आणि तिने उःशाप मागितला तेव्हा व्यासांनी जिथे जिथे दोन नद्यांचा संगम होईल तिथे तिथे तूही गुप्त स्वरुपात असशील असं सांगितलं. त्यामुळे फक्त याठिकाणीच आपल्याला सरस्वती नदीचं दर्शन घडतं.
पांडव जेव्हा पापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी तपश्चर्या करुन स्वर्गारोहण करण्यासाठी इथे आले तेव्हा खळाळती सरस्वती नदी ओलांडून पुढे जाण्यासाठी भीमाने या नदीवर दोन मोठे पाषाण टाकून पूल तयार केला आणि त्यावरुन पुढे जाऊन पांडवांनी स्वर्गारोहण केलं. या पूलाला भीमपूल नांवानं ओळखलं जातं.
हे सारं पाहून, तिथल्या भारत - चीन सीमेवरच्या पहिल्या चहाच्या दुकानात चहा पिऊन आम्ही ऋषिकेश येथे निघालो. खरंतरं आम्हाला ऋषिकेशला गंगा आरतीसाठी पोहोचायचं होतं. पण मार्गातील वाहन कोंडीमुळे ऋषिकेशला पोहोचायला रात्र झाली.
दिवस अकरावा - हा आमच्या चारधाम यात्रेचा अंतिम दिवस. सारं पॅकिंग करुन सकाळी लवकरच निघालो.
लक्ष्मण झुला पहायला जायचं होतं. पण वाहन कोंडी आणि आम्हाला असलेलं वेळेचं बंधन यामुळे गाडी अर्ध्यावरुनच परत फिरवली आणि रामझुला हा गंगा नदीवरचा झुलता पुल पहायला गेलो. साधारण एकदिड किमी अंतर चालून गेल्यावर गंगा नदीच्या घाटावर पोहोचलो. तिथून रामझुलापर्यंत परत चालत गेलो. रामझुल्यावरुन चालत पलिकडच्या तीरावर पोहोचलो. त्या अगदी अरुंद अशा पुलावरही दुचाकीस्वारांना जा - ये करण्यास परवानगी आहे. त्यांच्यामुळे पायी जाणाऱ्यांना खूपच त्रास होतो. पण तिथेही असाच बेशिस्त कारभार आहे. आम्ही पलिकडच्या तीरावर उतरुन नावेने परत अलिकडच्या तीरावर आलो. गंगास्नान करण्यासाठी इथेही भाविकांची खूप गर्दी असते.
रामझुला पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्हाला डेहराडूनला पोहोचायचं होतं. त्या मार्गावर मात्र सुरुवातीला जरा वाहन कोंडी होती. पण नंतर रस्ता मोकळा होता. त्यामुळे आम्ही वेळेतच डेहराडून विमानतळावर पोहोचलो.
आमची चारधाम यात्रा संपूर्ण झाली होती. मात्र तिथल्या रहिवासी लोकांच्या उद्दामपणाच्या वागण्याचा मनस्ताप झाला होताच त्याचबरोबर आम्ही ज्या मिथिला ट्रॅव्हल्स कडून ही कस्टमाईज टूर प्लॅन केली होती त्या ट्रॅव्हल्सनेही आम्हाला प्रचंड मनःस्ताप दिला. सारे पैसे आधीच भरलेले असूनही प्रत्येक ठिकाणी रुमसाठी भांडावं लागत होतं. चार रुमचे पैसे भरलेले असताना दोनच रुम मिळत होत्या. त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊनच यापुढे प्रत्येकाने ट्रॅव्हल्सचं बुकिंग करावं हे उत्तम. कारण आपण ज्यांच्याकडून हे बुकिंग करतो ते स्वतः आपल्या बरोबर नसतील तर असा मनस्ताप सहन करायची वेळ येऊ शकते.अर्थात प्रत्येक यात्रेत थोडंफार कमीजास्त होतंच पण असा त्रास होऊ नये एवढं नक्की.
असा त्रास सोडल्यास आमची चारधाम यात्रा उत्तम रितीने पार पडली. आम्हा सर्वांच्या तब्येतीही नीट राहिल्या. एवढा मोठा प्रवास, प्रचंड दगदग, रोजचं जागरण हे सारं असूनही कुणालाही त्रास झाला नाही. आणि चारही धामांचं उत्तम दर्शन घडलं ही श्री दत्तात्रेयांची कृपा.
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment