Pages

Friday, June 23, 2023

चारधाम यात्रानुभव... भाग -२

            दिवस सहावा - खरंतर पहाटेच आम्हाला गुप्तकाशी ला मुक्काम करण्यासाठी निघायचं होतं. पण काही कारणानं निघायला थोडा उशीर झाला. अखेर सकाळी प्रवासाला सुरुवात केली. नेहमी सारखंच वाहनकोंडीत अडकत, थांबत रात्री गुप्तकाशीला पोहोचलो. सारा दिवस फक्त प्रवास झाला होता. चारधाम मधलं तिसरं अवघड तरीही तितकंच आकर्षण असलेलं धाम म्हणजे केदारनाथ. गुप्तकाशीहून आम्हाला याच केदारनाथच्या दर्शनासाठी जायचं होतं. 

            केदारनाथचा पायी चालण्याचा मार्ग गौरीकुंडपासून सुरु होतो. गौरीकुंड येथे मुक्कामाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने भाविकांना गुप्तकाशी किंवा सोनप्रयाग येथेच मुक्काम करावा लागतो. सोनप्रयाग पर्यंत आपल्या वाहनाने जाता येतं. तिथून पुढे गौरीकुंड पर्यंतचा ५-६ किमी चा प्रवास जीपने, घोड्यावरुन अथवा पायी करावा लागतो. जीपने प्रवास करण्यासाठी किमान १ ते ४ तास रांगेत थांबावं लागतं. 

            हे सगळं माहित असल्याने आम्ही रात्री दोन वाजताच गुप्तकाशीहून निघालो. तासाभरातच गाडी सोनप्रयाग जवळ वाहन कोंडीत अडकली. अखेर आम्ही तिथेच उतरुन चालायला सुरुवात केली. एक दिड किमी चालून गौरीकुंडला जाणाऱ्या रांगेत पोहोचलो. तिथे तासभर रांगेत उभं राहिलो. इतकावेळ शिस्तीत असलेली रांग गेटजवळ मात्र एकदम सोडतात. आणि जीप मिळवण्यासाठी एकच गडबड गोंधळ सुरु होतो. तिथले लोक अतिशय बेशिस्त आणि उर्मट आहेत. त्रस्त मनाने आम्ही अखेर एका जीपमध्ये चढलो. पूढेही तीच परिस्थिती. वाहनकोंडीमुळे गौरीकुंडपर्यंत  परत एकदिड किमी चालावं लागलंच. अखेर एकदाचं गौरीकुंडला पोहोचलो.

            केदारनाथला हेलिकॉप्टरमधूनच जायचं असं आधी ठरवलं होतं. पण ज्यादिवशी हेलिकॉप्टरची ऑनलाईन तिकीटं मिळणार होती त्यादिवशी शर्थीचे प्रयत्न करुनही तिकीटं मिळाली नव्हती. ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये ही काहीतरी गडबड असल्याचं सहज लक्षात आलं. खरतंर तेव्हाच माझा थोडा मूड गेला होता. पण नाईलाज होता. चारधामचं बाकी सगळंच बुकिंग तोपर्यंत झालेलं होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर ऐवजी डोली करुन जायचं ठरवलं होतं.

           दिवस सातवा -   गौरीकुंडला पोहोचल्यावर डोलीची चौकशी केली असता बुकिंग फुल झाल्याचं कळलं. मग पायी चढून जाणं किंवा घोड्यावरुन जाणं हे दोनच पर्याय उरले होते. मंदिरात पोहोचण्यासाठी १६ ते १८ किमीची  चढाई पार करावी लागते. आणि जसजसं चढून वर जातो तसतशी ऑक्सिजन ची पातळीही कमी होत जाते.  त्यामुळे केदारनाथ ही अतिशय अवघड अगदी आपल्या शारिरीक क्षमतेचा कस पहाणारी अशी चढाई आहे. 

            केदारनाथ मंदिर निर्मितीची कथा पांडवाशी निगडीत आहे. कुरुक्षेत्रावरील युध्दात पांडवांनी कौरवांचा पराभव करुन वध केला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी ते भगवान शिवांच्या शोधात काशी वाराणसीला गेले. पण भगवान शिव कुरुक्षेत्रातील मृत्यूंमुळे संतापले होते. त्यामुळे पांडवापासून लपण्यासाठी त्यांनी नंदीचं ( बैलाचं) रुप धारण केलं आणि गढवाल प्रदेशात लपून बसले. पांडवाना काशीला शिवदर्शन न झाल्यानं ते फिरत फिरत गढवाल प्रांतात आले. तिथे भीमाला कुरणात चरणारा बैल दिसला. भीमाने तो बैल म्हणजेच भगवान शिव असल्याचं ओळखलं. आणि त्याची शेपटी  आणि मागचे पाय धरले पण भगवान शिव मस्तकाच्या बाजूने जमिनीत अदृश्य झाले आणि भीमाने पकडलेला भागच दृश्य स्वरूपात राहिला. पांडवांनी इथेच भगवान शिवाचं मंदिर बांधलं. त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी त्याची पुनर्बांधणी केली.  नंतर पांडवांनी मोक्षप्राप्ती साठी येथेच तपस्या केली आणि स्वर्गारोहिणी द्वारे त्यांना मोक्षप्राप्ती झाली. या कथेनुसारच केदारनाथ मंदिरात निराकार पाषाण स्वरुपात भगवान शिवाचं दर्शन आपल्याला घडतं. या पहाडाच्या पायथ्याला बिलगून गंगेची उपनदी मंदाकिनी वाहते. ११,७०० फूट उंचावर वसलेले हे मंदिर आणि आसपासचा परिसर अक्षरशः स्वर्ग भासावं इतकं नितांतसुंदर आहे

           २०१३ साली  उत्तराखंड मध्ये आलेल्या महापूरात हे मंदिर वगळता सारं काही वाहून गेलं होतं. या मंदिराच्या मागे अवघ्या काही मीटर अंतरावर एक महाकाय शिला पहाडातून सुटून गडगडत येऊन थांबली आणि त्या शिळेच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा प्रवाह पसरुन  सारा परिसर वाहून गेला. मात्र या मंदिराचं तीळमात्रही नुकसान झालं नाही. आता ही शिळा भीमशिला या नावानं ओळखली जाते.

           डोलीची सोय उपलब्ध न झाल्याने अखेर आम्ही घोड्यावरुन जायचं ठरवलं. घोडेही पाय घसरुन पडतात हे प्रत्यक्ष अनुभवलं असल्याने खरंतर माझी घोड्यावरुन जायची तयारी नव्हती. पण याची तब्येत सततच्या जागरणाने थोडी अस्वस्थ असल्याने पायी चालून जायला जमणं कठीण होतं. अखेर  आम्ही घोड्यावरुन निघालो. अवघ्या दिड तासांत अर्धं अंतर आमच्या घोड्यांनी पार केलं आणि विश्रांती साठी थांबलो. आम्हीही तेव्हाच नाश्ता केला. अर्ध्या पाऊण तासाच्या विश्रांती नंतर पुढे निघालो. पुढच्या दिड तासातच बेस कॅम्प ला पोहोचलो. पायथ्यापासून बेस कॅम्प पर्यंतचं १६ किमीचं अंतर घोड्यांनी आणि बरोबर असलेल्या मुलांनी अक्षरशः तीन तासात पार केलं होतं . अतिशय अवघड अशी ही चढाई लिलया पार करणाऱ्यांना नमस्कारच केला. बेस कॅम्प ला उतरल्यावर पुढे ४ किमीची चढाई बाकी होती. तेवढं अंतरही पायी चालताना आमची पूर्ण दमछाक झाली. कारण आम्ही जरी घोड्यावर बसून आलो असलो तरी सतत हाताची घट्ट पकड ठेवावी लागत होतीच. शिवाय सतत चढावाचा रस्ता असल्याने घोड्याला चढताना त्रास कमी व्हावा म्हणून पुढे झुकून बसावं लागत होतं. थांबत थांबत चालून अखेर आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. आमची मंदिराच्या जवळच मुक्कामाची व्यवस्था होती. त्यामुळे ते हॉटेल शोधून रुममध्ये शिरलो लगेचच विश्रांतीसाठी बेडवर  अगदी आडवे झालो. 

           जेमतेम १० मिनिटं झाली आणि त्या हॉटेलाच्या मालकाने दार वाजवलं. आणि अभिषेक पूजा करायची आहे का याची चौकशी केली. आम्ही इतके दमलो होतो की कसलाही विचार न करता त्यांनी सांगितलेली रक्कम त्वरित त्यांना दिली.आणि निद्राधीन होण्याचा प्रयत्न करु लागलो. एवढ्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली.आणि माझ्या मनात काळजी दाटली. आम्हा ८ जणांपैकी आम्ही तिघंच घोड्यावरुन आलो होतो. बाकीचे चालत येत होते. पावसामुळे आधीच अवघड असलेली चढाई त्यांना आणखीनच थकवणार होती. तसंच झालं. मंदिरापर्यंत पोहोचायला त्यांना अकरा तास लागले. अर्थात तेही मधेमधे थांबतच आले होते. 

           आम्ही अभिषेक पूजेसाठी पैसे भरल्याने आम्हाला दर्शनासाठी रांगेत उभं रहायची गरज नव्हती. रात्री जेवून आरामात रांगेत उभं राहीलो. पुढच्या अर्ध्या तासातच आमचा नंबर आला. आणि मंदिरात शिवलिंगासमोर बसून अभिषेक पूजा करायला मिळाली. स्वहस्ते जलाभिषेक आणि घी लेपन करायला मिळालं, आणि मन प्रसन्न तृप्त झालं. पूजा करुन मंदिराच्या मागे असलेल्या भीमशिलेचं दर्शन घेऊन रुमवर परत आलो. रोजच पडत असलेल्या पावसामुळे केदारनाथ आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान खूपच कमी म्हणजे जवळजवळ उणे अंशाईतकं खाली घसरलं होतं. आदल्या दिवशी रात्री निघताना घातलेलं जॅकेट क्षणभरासाठीही काढलं नव्हतं. 

          दिवस आठवा -  पहाटे उठून आवरुन परत निघायचं होतं. स्नानासाठी रुममध्ये गरम पाणी उपलब्ध नव्हतं. दिडशे रुपये देऊन छोटी बादली भरुन गरम पाणी उपलब्ध होतं. ते आणून सारं आवरलं. आणि पून्हा मंदिराजवळ गेलो. प्रचंड मोठी रांग असल्याने बाहेरुनच दर्शन घेतलं. थोडं थांबून, खरेदी करुन परत निघालो. पायीच परत जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे चालायला सुरुवात केली. वाटेत असलेल्या ग्लेशियर जवळ थांबून बर्फात खेळत छायाचित्रं घेत पूढे निघालो. काही वेळातच धुकं पसरायला सुरुवात झाली. धुक्यातून  तासभर चाललो आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु झाला आणि आमची चिंता वाढली. मुळातच रस्ता नीट नाही. त्यात पाऊस सुरु झाला. त्यामुळे रस्त्यावरची माती आणि घोड्यांची लीद यामुळे अतिशय घाण चिखल सगळीकडे तयार झाला होता. त्या चिखलात पाय रुतू न देता किंवा त्यावरुन न घसरता चालणं ही मोठी कसरतच होती. त्याचवेळी घोडे, पिठ्ठू, डोलीवाले यांच्यापासूनही स्वताला सावरत चालावं लागत होतं.  

           हे असं सांभाळून चालत असतानाच पून्हा एकदा माझ्यासमोर एक घोडा घसरुन पडला. थोडं पुढे आलो आणि बाजूने चालाणाऱ्या ४-५ घोड्यांमधला एक घोडा धडपडला आणि बाकीचे घोडे उधळून उलट फिरले. अगदी आमच्या अंगावर येता येता राहिले. मग मात्र माझी भीती अजूनच वाढली. पाऊस बराच वेळ पडून थांबला पण माझी भीती मात्र कमी होत नव्हती. असच चालताना अचानक जाणवलं एक काळा केसाळ असा श्वान आमच्या पलिकडच्या बाजूने पण सतत आमच्या बरोबर चालतोय. पण मला घसरुन पडण्याची एवढी भीती वाटत होती की त्या श्वानाचं असणं जाणवलं तरीही मन शांत होत नव्हतं. बराचसा वेळ असाच गेला आणि हळूहळू माझी भीती थोडी कमी झाली. मग माझ्या चालण्याचा वेग थोडा वाढला. अखेर आम्ही गौरीकुंडला पोहोचलो आणि सोनप्रयागला जाण्यासाठी रांगेत उभं राहिलो. 

           इथेही आदल्या दिवशीचीच परिस्थिती होती. आधी तासभर रांगेत उभं रहायचं आणि मग एकदम लोकांना सोडायचं. जीपमध्ये बसण्यासाठी उरीपोटी धावायचं. सगळा बेशिस्त कारभार. एकदाची जीप मिळाली आणि आम्ही सोनप्रयागला पोहोचलो. मात्र तिथूनही आमच्या गाडीपाशी पोहोचायला एकदिड किमी चालावं लागलं. गाडीजवळ पोहोचून गुप्तकाशीला मुक्कामासाठी परत गेलो. मंदिरापासून पायथ्याशी पोहोचायला आम्हाला जवळपास दहा तास लागले होते. अशा वाईट परिस्थितीत मी केवळ सगळ्यांच्या सहकार्यानेच चालू शकले होते. रात्री उशिरा मुक्कामी पोहोचलो तेव्हा सगळेच प्रचंड दमलो होतो. पण त्याचवेळी एवढी अवघड चढाई करुन श्री केदारनाथांचं अतिशय सुंदर असं दर्शन घडलं असल्यानं मन मात्र तृप्त होतं. 

           दिवस नववा - सकाळी लवकरच आवरुन चारधाममधील अंतिम धाम बद्रीनाथला निघालो. वाटेत आधी उखीमठला गेलो. 

           उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ हे गांव आहे. बाणासुरांची कन्या उषा आणि भगवान श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध यांचा विवाह इथे संपन्न झाला होता. कन्या उषेच्या नांवावरुनच या स्थानाला उखीमठ हे नांव मिळालंय. केदारनाथाची शीतकालीन पूजा सहा महिने या उखीमठमध्ये केली जाते. कपाट बंद करताना बाबा केदारनाथांना उखीमठ इथे पालखीतून आणलं जातं. या उखीमठचं दर्शन घेऊन पुढे निघालो. वाहन कोंडी आणि जास्त अंतरामुळे प्रत्यक्ष बद्रीनाथ ला पोहोचायला उशीर झाला. 

           चारधाम मधलं अंतिम धाम म्हणजे बद्रीनाथ धाम. चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीतीरावर वसलंय हे बद्रीनाथ धाम. या मंदिराची निर्मिती सातव्या ते नवव्या शतकात शंकराचार्यांनी केली होती. हे मंदिर श्री विष्णूंना समर्पित आहे. बद्रीनाथ स्वरुपात इथे श्री विष्णूची पूजा केली जाते. बद्रीनाथाची शाळिग्रामची मूर्ती मंदिरात आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात चक्र आहे. दोन हात योगमुद्रेत मांडीवर ठेवले आहेत. मूर्तीच्या वर सोन्याचा कळस आहे. हे मंदिर बद्रीनाथ नांवाने प्रसिद्ध असण्यामागची एक आख्यायिका सांगितली जाते. भगवान विष्णू इथे तपश्चर्येला बसले असताना त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून लक्ष्मीदेवीने बदरीवृक्षाचं रुप धारण करुन श्री विष्णूंना छाया दिली. त्यावरुनच हे ठिकाण बद्रीनाथ म्हणून प्रसिद्ध झालं. केदारनाथाच्या दर्शनानंतर बद्रिनाथाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे . यानंतरच यात्रा सफल होते अशी मान्यता आहे.

           आम्ही बद्रीनाथला पोहोचलो आणि आधी मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. फ्रेश होऊन लगेच दर्शनासाठी निघालो. मंदिरात पोहोचेपर्यंत दर्शनाची वेळ संपत आली होती. त्यामुळे खूपच गडबड गोंधळ उडाला होता. भाविकांची दर्शनासाठी धक्काबुक्की सुरु झाली. त्याच गोंधळात आम्हालाहु मंदिरात जेमतेम प्रवेश मिळाला आणि लगेच प्रवेशद्वार बंद केलं गेलं. गर्भगृहात प्रवेश मिळाल्याने आम्हाला बद्रीनाथांचं सुंदर दर्शन घडलं आणि त्या गर्दीबरोबरच आम्ही बाहेर पडलो. 

           चारधाम हे भाविकांचं खूप मोठं श्रध्दास्थान आहे. पण इथे कुठेही भाविकांच्या सुरक्षेचा, सोयीसुविधांचा विचार केला जात नाही. इथले लोकं भाविकांशी अतिशय उद्दामपणे, मुजोरपणाने वागतात. सारा कारभार अत्यंत बेशिस्तीचा आहे. भाविकांच्या पैशावरच सहा महिने त्यांचा चरितार्थ चालतो पण तरीही ते अतिशय उर्मटपणाने बोलतात, वागतात. यमुनोत्री आणि केदारनाथ या दोन्ही ठिकाणी भाविकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो तोही केवळ तिथल्या लोकांच्या अरेरावीच्या वागण्यामुळेच. 

            खरंतर यमुनोत्री आणि केदारनाथ या दोन्ही ठिकाणी रोप वे ची सुविधा होणं अत्यंत गरजेचं आहे. केदारनाथ साठी हेलिकॉप्टरची सुविधा असूनही तिथे तिकीटांसाठी प्रचंड काळाबाजार चालतो तेही बंद होणं अत्यावश्यक आहे. रस्ते सुस्थितीत आणून शक्यतो त्यावर दुभाजक बसवून पायी चालणाऱ्यांसाठी एक भाग आणि घोडे, डोली, पिठ्ठू यांच्यासाठी एक भाग अशी व्यवस्था करणंही अत्यावश्यकच आहे. इथे घोडेवाले पायी चालणाऱ्यांशी नेहमीच उद्दामपणे वागतात. त्यामुळे नेहमीच इथे भांडणं, बाचाबाची सुरु असते. कित्येकदा ही भांडणं मारामारी पर्यंत पोहोचतात. हे सगळं बंद होणं होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा हळूहळू पण निश्चितपणे भाविक चारधाम यात्रेला जाणं कमी करतील. सातत्याने अशा वाईट, तापदायक अनुभवांना सामोरं जावं लागत असेल तर भाविक चारधाम यात्रेला जाणं टाळतीलच. 

क्रमशः

- स्नेहल मोडक









No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...