भाद्रपद पौर्णिमा - ज्या दिवसाची आम्ही दोघं आसुसून वाट पहात होतो ती ही पौर्णिमा. या आधीच्या सलग तीन पौर्णिमांना केवळ माझ्या बिघडलेल्या तब्येतीमुळे आम्हाला गिरनार गुरुशिखर दर्शन घडलं नव्हतं. त्यामुळे ही पौर्णिमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. यावेळीही तब्येतीचा थोडा त्रास होणार हे माहित असूनही जायचंच असं ठरवलं होतं.
रेल्वेचं आरक्षण आधीच केलं असल्याने ती चिंता नव्हती. नेहमीसारखं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 'यावेळी निर्विघ्न आणि सहजसुंदर दर्शन घडवा' अशी श्री दत्तगुरुंना प्रार्थना करुन निघालो. जूनागढला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढून स्थानापन्न झालो. प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ट्रेनमध्ये गिरनारला जाणारे दत्तभक्तच मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे रेल्वेच्या बहुतेक सर्वच डब्यांमध्ये अतिशय छान वातावरण असतं. यावेळीही आमच्या बाजूच्या लोकांशी आमचा संवाद सुरु झाला आणि कळलं ते सगळेजण याच्याच ऑफिसमधील एका सहकारी मित्राबरोबर गिरनारला निघाले आहेत. मात्र ते सहकारी मित्र त्यावेळी इतर लोकांची व्यवस्था बघण्यासाठी दुसरीकडे फिरत होते.
साधारण १५-२० मिनिटांनी आमच्या गप्पा सुरु असतानाच सदैव आमच्या समवेत असणारे याचे मित्र आणि ते सहकारी मित्र असे दोघंही अचानक आमच्या समोर आले आणि 'तुम्हाला काहीतरी द्यायचंय' असं म्हणत त्या सहकारी मित्रांनी आमच्या दोघांच्याही हातात एक-एक माळ दिली. आणि या माळा गिरनारचे पीठाधिपती महंत श्री महेश गिरी बापूंनी पूजा करुन, गुरुपादुकांना स्पर्श करुन दिल्या आहेत असं सांगितलं. मला बोलायला शब्दच सुचत नव्हते. डोळ्यांत येणारं पाणी अडवत माळ भाळी लावली.
हा दिवस होता अनंत चतुर्दशीचा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचं म्हणजेच श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने चौदा विश्वं निर्माण केली होती. या विश्वाच्या देखभाल आणि संरक्षणासाठी तो चौदा रुपात प्रकट झाला म्हणजे अनंत रुपात प्रकट झाला म्हणून अनंत चतुर्दशीला श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. म्हणूनच अनंत चतुर्दशी हा दिवस जसा गणेशोत्सवाचा अखेरचा, बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस तसंच श्री विष्णूंच्या पूजनाचा दिवस.
भगवान श्री विष्णू -देवी श्री लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांना अतिशय प्रिय असलेली एक वस्तू म्हणजे वैजयंती माळ. भगवान श्रीकृष्ण नेहमीच ही माळ धारण करीत. वैजयंती म्हणजे विजय मिळवून देणारी, यश संपादन करुन देणारी माळ. वैजयंती ही एक वनस्पती आहे. यावर लाल आणि पिवळ्या रंगाची सुंदर आणि सुंगधी फुलं येतात. याच्या बियांपासून ही माळ तयार करण्यात येते. चकचकीत अशा या बिया कधीही सडत किंवा तुटत नाहीत. काही विद्वानांच्या मते या माळेत पाच प्रकारचे मणी गुंफले जातात, जे पंचमहाभूतांचे प्रतिक असतात. ही माळ धारण करणं अतिशय शुभ फलदायी असतं. आणि आम्हाला प्रसाद म्हणून अशी वैजयंती माळच मिळाली होती. भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली ही वैजयंती माला अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी आम्हाला प्रसाद स्वरूपात मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे .स्वप्नातही न येता, न मागता स्वयं श्री दत्तात्रेयांनी आम्हाला एवढी मोठी प्रसाद भेट दिली होती. गिरनार प्रवासाची सुरुवातच शुभ संकेताने झाली होती.
पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला गेलो. मुक्काम स्थानी जाऊन सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. पहिल्या पायरीचं, लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोप वे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. तिथून पुढे पायऱ्या चढून गुरुशिखरावर गेलो. मंदिरात प्रवेश करुन गुरुपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि डोळ्यात पाणी आलंच. सलग तीन पौर्णिमेनंतर श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे दर्शन घडल्यावरही मन शांत व्हायला काही क्षण लागलेच. दर्शन घेऊन परत खाली कमंडलू कुंडाजवळ गेलो. पोथीचं वाचन, दर्शन, प्रसाद घेऊन परत खाली निघालो. गोरक्षनाथ, अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोप वे जवळ पोहोचलो. आमच्या बरोबर असलेले काही जणं थोडं मागे राहिले होते. त्यामुळे त्यांची वाट पहात थांबलो. कारण रोप वे ने एकत्रच जायचं होतं.
१५-२० मिनिटं झाली आणि रोपवे चे अधिकारी येऊन सांगू लागले की ज्यांना रोपवेने पायथ्याशी जायचं आहे त्यांनी लगेच चला. वातावरण बिघडलं आहे , त्यामुळे रोपवे कुठल्याही क्षणी बंद करावा लागेल. झालं, आमची काळजी वाढली. मागे राहिलेल्यांना लवकर बोलावण्यासाठी सतत फोन करु लागलो. अखेर ते रोप वे जवळ आले आणि आम्ही निघालो. ट्राॅलीमध्ये बसलो आणि जेमतेम २-३ मिनिटं ट्राॅली नेहमीच्या वेगाने पुढे गेली आणि अचानक वेग एकदम कमी झाला. इतका की नक्की आपली ट्रॉली पुढे जातेय कि नाही असं वाटत होतं. ट्राॅली ५-७ मिनिटं अशीच हळूहळू सुरु असतानाच एका क्षणी पूर्ण थांबली. आणि बाहेरच्या वाऱ्यामुळे हेलकावे घेऊ लागली. आम्हाला याचा पूर्वानुभव असल्याने फारशी काळजी वाटली नाही. काही मिनिटांतच ट्राॅली पून्हा हळूहळू सुरु झाली. आणि परत एकदा पूर्णपणे थांबली. परत आधीसारखे हेलकावे घेऊ लागली. आता मात्र आमच्या बरोबर असलेल्यांना किंचित काळजी वाटली. काही मिनिटांतच पून्हा ट्राॅली सुरु झाली. आणि आता मात्र नेहमीच्या वेगाने पायथ्याशी निघाली. जेमतेम १० मिनिटांत पायथ्याशी पोहोचणारी ट्राॅली यावेळी २५-३० मिनिटांनी पोहोचली होती.
मुक्कामी येऊन थोडी विश्रांती घेऊन सोमनाथला निघालो. नेहमीसारखंच आधी भालका तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. यावेळीही मंदिराच्या आवारात खूपच गर्दी होती. नुकताच कुठलातरी कार्यक्रम संपला तरी होता किंवा पावसामुळे थांबवावा लागला होता. त्यामुळे गर्दी होती पण मंदिरात दर्शनासाठी मात्र फार लोकं नव्हती. त्यामुळे सुंदर दर्शन घडलं. या मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे. खूप सुंदर दर्शन झालं पण माझं मन तृप्त झालं नव्हतं. इथून पुढे आम्ही गीता मंदिरात दर्शनासाठी गेलो.
हिरण्या नदीतीरी वसलेलं हे गीता मंदिर. इथे काही मंदिरांचं संकुल आहे. मुख्य मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि भिंतींवर गीतेतील अध्याय श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगासह चितारले आहेत. बाजूला श्रीराम -सीता , लक्ष्मी- नारायण अशी मंदिरं आहेत. मुख्य मंदिरात दर्शन घेऊन लक्ष्मी - नारायण मंदिरात प्रवेश केला आणि काही क्षण भान हरपून उभीच राहिले. काही क्षणांनी नतमस्तक झाले आणि मन एकदम तृप्त, शांत झालं. गिरनारला येण्याआधी काही दिवसांपूर्वी मला राधाकृष्णाचं सुंदर असं स्वप्नदर्शन घडलं होतं. तेव्हापासून प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि ती माझी इच्छा इथे पूर्ण झाली होती. गिरनारला गेल्यावर भालका तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोमनाथ या साऱ्या स्थानी दर्शनासाठी आम्ही जातोच. पण तरीही स्वप्नदर्शन झाल्यापासून प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली होती ती अखेर पूर्ण झाली. तिथून पुढे सोमनाथांचं दर्शन घेऊन परत मुक्कामी आलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सारं आवरुन भवनाथ मंदिरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. लवकर गेल्यामुळे मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. शांतपणे अतिशय सुंदर असं दर्शन घेता आलं. तरी इथेही मन थोडं बेचैन होतं. दर्शन घेऊन मृगी कुंडाजवळ गेलो. गर्दी नसल्याने मृगी कुंडाभोवती प्रदक्षिणा घालता आली. आणि त्या मार्गात असलेल्या मोठ्या शिवपिंडीचं दर्शन स्पर्श करुन घेता आलं. त्यावेळी मात्र अर्पण करण्यासाठी बिल्वदल नसल्याची मला फारच रुखरुख लागली. शिवपिंडीवर जल चढवून नमस्कार करुन मंदिराबाहेर आलो. बाहेर आलो आणि मी अक्षरशः थक्क झाले. मंदिराबाहेर फुलवाला नुकताच येऊन फुलं विक्रीसाठी लावत होता. बिल्वदलंही अजून पिशवीतच होती. मी लगेच खूपशी बिल्वदलं विकत घेतली आणि आम्ही पून्हा मंदिरात गेलो. मृगी कुंडाच्या बाजूला असलेल्या शिवपिंडीवर बिल्वदलं अर्पण करुन नतमस्तक झाले आणि पुन्हा माझे डोळे ओलावले. तिथून परत मुख्य मंदिरात आलो तोपर्यंत तिथे आरती सुरु झाली होती. हाही सुंदर योग होता. इतक्या सुंदर रितीने माझी दुसरी इच्छाही पूर्ण झाली होती.
राधाकृष्णाचं स्वप्नदर्शन होण्याआधी दोन दिवस २४ तासांच्या आत मला शंभू महादेवांनी तीन वेळा अतिशय सुंदर स्वप्नदर्शन दिलं होतं. त्यातील एका स्वप्नात मी खूप सारी बिल्वदलं अर्पण केल्याचं मला दिसलं होतं. म्हणूनच प्रत्यक्षात जेव्हा मला बिल्वदलं अर्पण करता आली तेव्हा डोळे पाणावलेच. त्या स्वप्नांमुळेच शंभू महादेवांनाही प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि इथे माझी तीही इच्छा पूर्ण झाली होती. खरंतर स्वप्नात घडलेल्या दर्शनानेच मन खूप सुखावलं होतं आणि नंतर प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडलं हे फारच भाग्याचं, मन अगदी प्रसन्न झालं होतं.
भवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन नाश्ता करुन आम्ही, गेली ४ वर्षं ज्याची प्रतिक्षा केली होती तो जुनागढचा उपरकोट किल्ला बघायला गेलो. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच या किल्ल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि त्या दिवसापासून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेली ४ वर्ष हा किल्ला दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आला होता.
मौर्य साम्राज्याच्या काळात गिरनार पर्वताच्या पायथ्याशी एक किल्ला आणि शहर वसवले गेले. गुप्त काळापर्यंत याचा वापर केला जात होता. नंतर जूनागढहून राजधानी वल्लभी येथे हलविण्यात आल्यावर या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. नंतर १० व्या शतकातील चुडासामा राजा ग्रहरिपु यानी हा किल्ला जंगलापासून मुक्त केला. त्यानंतर १८९३-९४ मध्ये जुनागढ राज्याचे दिवाण हरिदास विहिरीदास यांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.
उपरकोट किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. शहराच्या पलीकडे पूर्वेकडील भिंतींमध्ये या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. एकात एक असे तीन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या भिंती ६०-७० फुट उंचीच्या आहेत. याच्या आतील बाजूस खोल खंदक सुरक्षेसाठी खणलेले होते. तर या उंच भिंतीवर टेहळणी बुरूज आहेत. या किल्ल्यात 'अडी वाव' आणि 'कडी वाव' अशा दोन मोठ्या आयताकृती विहिरी आहेत. जवळपास ७०-७५ पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर या विहिरी पहाता येतात. तसंच गोलाकार पायऱ्या उतरुन खाली एक 'नवघन कुवा' आहे. दुसऱ्या - तिसऱ्या शतकातील बौद्ध लेणीही या किल्ल्यात आहेत. ही दुमजली गुंफा आहे, प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंनी या गुंफांचा उपयोग केला होता. या गुंफा पहाण्यासाठी नाममात्र प्रवेशफी आहे.
राणी राणक देवीचा प्रशस्त महालही सुंदर आहे. खूप मोठा बगीचाही इथे आहे. नवाबी तलावही मोठा आणि पहाण्यासारखा आहे. खूप जून्या काळातील काही तोफा इथे ठेवल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या तोफा नीलम आणि माणेक या नावाने ओळखल्या जातात. किल्ल्यात लेझर शो आणि वस्तुसंग्रहालयही सुरु करण्यात येणार आहे. तसंच हा भव्य किल्ला पहाण्यासाठी बॅटरी कार ही सुरु करण्यात येणार आहे.
४ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेल्या या किल्ल्यात आता जागोजागी पिण्याचे पाणी, उपहारगृह, स्वच्छतागृहं, या साऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण किल्ला पायी फिरून पहाण्यासाठी किमान ३ तासांचा अवधी आवश्यक आहे.
जुनागढ आणि आसपासच्या इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये आता या उपरकोट किल्ल्याचा समावेश नक्कीच करावा लागेल. आवर्जून एकदा तरी पहावा असा हा किल्ला आहे. इथे पूर्ण एक दिवसही थांबता फिरता येईल एवढा हा किल्ला भव्य आणि प्रेक्षणीय आहे. जागोजागी सविस्तर माहिती फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे सारा किल्ल्याचा इतिहास आपल्याला सहज जाणून घेता येतो.
किल्ला बघून रुमवर परत येऊन आवरुन पुन्हा ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागलो.
- स्नेहल मोडक












No comments:
Post a Comment