गतवर्षी नवरात्रातही माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा सुंदर योग आला होता आणि माता वैष्णोदेवीचं छान दर्शन घडलं होतं. परत यावर्षीही नवरात्रात असा योग यावा आणि मातेचं दर्शन घडावं अशी तीव्र इच्छा होती. पण काही कारणास्तव हे आधीपासून ठरवता आलं नाही. पण मनापासून असलेली इच्छा आणि प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेची कृपा यामुळे उशिरा का होईना आम्ही तिच्या दर्शनाला जायचं ठरवलंच.
ठरल्याप्रमाणे नवरात्र सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनंतर विमानाने जम्मूला पोहोचलो. तिथून पुढे जाण्यासाठी आधीच गाडी ठरवली होती, त्या गाडीने निघालो.
जम्मूला आम्ही पोहचण्याआधीच पाऊस सुरु झाला होता. जोरदार पाऊस पडत होता आणि त्यामुळे थंडीही खूप होती पण एकूण वातावरण मात्र छान आल्हाददायक होतं. घटस्थापनेपासून तिथे रोज पाऊस पडतच होता. वैष्णोदेवीलाही २-३ दिवस जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे सगळीकडेच कडाक्याची थंडी पडली होती. पण एवढ्या थंडी पावसातही भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती.
आम्ही त्या पावसातच पोहोचलो ते रघुनाथ मंदिरात. जम्मू विमानतळापासून ६-७ किलोमीटरवर असलेलं हे प्राचीन रघुनाथ मंदिर. जम्मू शहराच्या जून्या भागात आणि तावी नदीच्या उत्तरेला वसलेलं हे श्रीराम मंदिरांमधील एक प्रमुख मंदिर. अतिशय भव्य आणि अप्रतिम असं हे मंदिर डोगरा समाजात फार महत्त्वाचं मानलं जातं. हे विशाल मंदिर पूर्ण होण्यास २५ वर्षं लागली. १८३५ मध्ये महाराजा गुलाब सिंह यांनी समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रेरणेने या मंदिराची निर्मिती सुरु केली आणि १८६० मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण झालं. समर्थ श्री रामदास स्वामी अयोध्येहून जम्मूला भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले होते. त्यांनी महाराजा गुलाब सिंह हे राजा होतील अशी केलेली भविष्यवाणीही सत्य झाली होती. वास्तूकलेचा अतिशय सुंदर नमुना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींना सुवर्णाचा मुलामा देण्यात आला आहे. गर्भगृहात श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या रेखीव मूर्ती आहेत. तसंच या मंदिरात सात धार्मिक स्थळं आहेतच त्याशिवाय अनेक देवदेवतांच्या रेखीव मूर्तींनी प्राणप्रतिष्ठित छोटी मंदिरं आहेत. त्याचबरोबर ३३ कोटी देव हे लिंग स्वरूपात इथे प्रतिष्ठित आहेत. मुख्य मंदिराच्या चार बाजूंनी चारधाम म्हणजेच रामेश्वर, द्वारकाधीश, बद्रीनाथ आणि केदारनाथ हेही दर्शन आपल्याला घडतं. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी असतेच. श्रीरामनवमीला इथे खूप मोठा सोहळा होतो. अशा या ऐतिहासिक मंदिरावर २००२ सालच्या मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात आतंकी हल्ला झाला होता. त्यानंतर हे मंदिर बराच काळ भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. २०१३ साली पून्हा हे मंदिर पूर्ण सुरक्षेत भाविकांसाठी उघडण्यात आलं. आम्ही या मंदिरात गेलो तेव्हा दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे लगेच दर्शन घेता आलं. श्रीरामरायासमोर नतमस्तक झालो आणि अतिशय सुंदर दर्शन घडलं. नंतर इतर साऱ्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढे निघालो.
महाराजा हरि सिंह यांचा राजवाडा म्हणजेच अमर महाल पहाण्यासाठी आम्ही थांबलो होतो. हा राजवाडा जम्मू काश्मीर चे अखेरचे राजा महाराजा हरि सिंह यांच्यासाठी विसाव्या शतकात बांधण्यात आला होता. फ्रेंच वास्तुविशारदाच्या योजनेनुसार फ्रेंच शैलीत याचं बांधकाम करण्यात आलंय. १९९० साली या अमर महालात संग्रहालय आणि ग्रंथालय सुरु करण्यात आलंय. या संग्रहालयात महाराजा हरि सिंह यांच १२० किलो वजनाचं सुवर्ण सिंहासन आजही आपल्याला पहायला मिळतं.
राजवाडा बघून आम्ही निघालो देवीच्या मंदिरात. कोल कंडोली माता मंदिर. वैष्णोदेवीच्या यात्रेत ५ मुख्य स्थानं आहेत. बाणगंगा, चरणपादुका, अर्धकुमारी, भवन आणि भैरवनाथ. पण या यात्रेच्या आधी पहिलं दर्शन कोल कंडोली मातेचं घ्यावं अशी मान्यता आहे. जशी भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय वैष्णोदेवीची यात्रा अपूर्ण मानली जाते तशीच सुरुवातही कोल कंडोली मातेच्या दर्शनानेच केली जाते. हे मंदिर जम्मू पासून १५ किमी. अंतरावर नगरोटा या गावात आहे. कोल म्हणजे कटोरा आणि कंडोली म्हणजे कवड्या. कोल कंडोली मातेने एकूण चार वेळा या स्थानी चांदीचे कटोरे उत्पन्न केले होते. तसंच माता इथल्या स्थानिक कुमारिकांबरोबर कवड्या आणि इतर खेळ खेळत असे. यावरुनच या देवीला कोल कंडोली माता हे नाव रुढ झालं. पौराणिक कथेनुसार माता वैष्णोदेवी द्वापारयुगात पाच वर्षीय कन्येच्या स्वरुपात इथे प्रकट झाली होती. याच स्थानी माता वैष्णोदेवीने १२ वर्षं तपस्या केली आणि त्याच स्थानी पिंडी स्वरुपही धारण केलं. आणि त्याच काळात माता कोल कंडोलीने विश्वशांतीसाठी होमहवन केलं होतं. आणि चांदीचा कटोरा निर्माण करुन त्यात विविध पदार्थ निर्माण करुन ३३ कोटी देवांना भोजन दिलं होतं. आम्ही या मंदिरात दर्शनासाठी गेलो तेव्हा तिथेही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे शांतपणे मातेचं दर्शन घेता आलं सुंदर दर्शन घडलं, पंडीतजींनी सगळ्यांना प्रसादही दिला. हे मंदिरही प्रशस्त आहे आणि परिसरही छान आहे. म्हणूनच जम्मूला गेल्यावर रघुनाथ मंदिर, पॅलेस, कोल कंडोली माता मंदिर या ठिकाणी आम्ही जातोच.
कोल कंडोली मातेचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या मुक्कामी कटरा ला पोहोचलो. जम्मूला विमानतळावर उतरल्यानंतर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आवश्यक अशा RFID card बद्दल चौकशी केली असता ते रात्री ९ नंतर मिळेल असं सांगितलं होतं. कटराला पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही परत ते कार्ड घेण्यासाठी बाहेर पडलो. RFID card counter वर गेल्यावर मात्र लगेच ते कार्ड मिळालं.
दुसऱ्या दिवशी पहाटे आन्हिकं आवरुन माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालो.
भारतातील हिमालय पर्वतरांगेतील वैष्णोदेवी हे अतिशय पवित्र आणि लोकप्रिय असं श्रध्दास्थान. जम्मूमधल्या कटरा शहरातील त्रिकुट पर्वतावर हे वैष्णोदेवीचं स्थान आहे. दुर्गादेवीचा एक अवतार म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ४५ किलोमीटरवर असलेल्या कटरा शहरापासून १४ किलोमीटरची चढाई करुन वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावं लागतं. ज्यांना हे संपूर्ण अंतर पायी चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी घोडा, पालखी, पिठ्ठू असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कटरा ते सांजीछत अशी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे. जाता - येता दोन्ही वेळा किंवा एकच वेळ अशी हेलिकॉप्टरची सेवा आहे.
त्रिकुट पर्वतावर असलेलं हे वैष्णोदेवी मंदिर एका गुहेमध्ये स्थित आहे. भैरवनाथाने वैष्णोदेवीचा आदिशक्तीला वश करण्यासाठी पाठलाग केला. माता वैष्णोदेवी या त्रिकुट पर्वतावर आली आणि एका ठिकाणी थांबून तिने भैरवनाथ मागोमाग येत असल्याची खात्री करुन घेतली. त्या स्थानाला चरणपादुका दर्शन असं नांव आहे.
माता ज्या गुहेत जवळपास ९ महिने राहिली त्या गुहेला 'गर्भजून' किंवा अर्धकुमारी गुंफा म्हणून ओळखतात. वैष्णोदेवी मातेबरोबरच हनुमानजी तिच्या रक्षणासाठी उपस्थित होते अशी मान्यता आहे. हनुमानजीना तहान लागली म्हणून वैष्णोदेवीने बाण मारुन पर्वतामध्ये जलधारा उत्पन्न केली आणि या धारेत मातेनं आपले केस धुतले. आता ही जलधारा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. या जळात स्नान केल्याने किंवा हे जल प्राशन केल्याने श्रध्दावानांचा सारा थकवा आणि अडचणी दुर होतात असं म्हणतात.
ज्याठिकाणी वैष्णोदेवी मातेने भैरवनाथांचा वध केला होता त्या ठिकाणाला भवन म्हणून ओळखलं जातं. भैरवनाथांचा वध केल्यावर त्याचं शिर दूरवर जाऊन पडलं. तिथं भैरवनाथ मंदिर बांधण्यात आलं आहे. त्यालाच भैरोघाटी असंही म्हणतात.
भैरवनाथांचा वध केल्यानंतर त्याना आपली चूक कळली आणि त्यांनी वैष्णोदेवी मातेची क्षमायाचना केली. तेव्हा मातेने त्यांना क्षमा करुन सांगितलं की माझं दर्शन घेतल्यानंतर तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. भैरवनाथ मंदिर दर्शनासाठी ३ किलोमीटर अंतर चढून जावं लागतं. त्यासाठी पायऱ्या, आणि साधा रस्ता अशी दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे. त्याशिवाय घोडा, पालखीचीही सोय आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून भवन ते भैरवनाथ अशी रोपवे ची ही व्यवस्था करण्यात आली आहे.
वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायचं खूपच उशिरा ठरल्यामुळे आम्हाला विमानाची तिकिटं मिळाली तरी कटरा ते सांजिछत ही हेलिकॉप्टरची तिकीटं मिळाली नव्हती. त्यामुळे दर्शनासाठी एक तर पायी चढून जाणं किंवा घोड्यावरुन जाणं हेच पर्याय होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी बघता दर्शनाला लागणाऱ्या वेळेचा विचार करुन आम्ही घोड्यावरुन जायचं ठरवलं. २-३ दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घोड्यावरुन जाणं थोडं त्रासदायक वाटत होतं. कारण पावसाने मार्ग निसरडा होतो आणि घोड्यावरुन जाणं किंवा चालणंही त्रासाचं होतं. पण आम्ही वेळेअभावी घोड्यावरुनच जायचं ठरवलं. पहाटे निघालो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हता. असाच दिवस पूर्ण कोरडा असावा आणि मातेचं छान दर्शन घडावं अशी प्रार्थना करुन प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात केली. थोडं थांबत थांबत साधारण ३ तासांनी आम्ही वरती घोडेतळावर पोहोचलो. तिथून चालायला सुरुवात केली आणि एका क्षणी खिळून थांबलोच. कारण आमच्यासमोर होता विविधरंगी ताज्या फुलांच्या सजावटीचा अप्रतिम नजारा. दरवर्षी नवरात्रात भवनच्या दर्शनमार्गावर ही सजावट केली जाते. जागोजागी देवदेवतांच्या मूर्ती आणि ही अप्रतिम पुष्परचना केली जाते. अगदी खरं सांगायचं तर ही देखणी आरास पाहून आपले नेत्र थकतात पण मन काही भरत नाही. ही आरास पहाताना ती करणाऱ्या कलाकारांचं आपण मनोमन कौतुकच करत असतो.
अशी ही अप्रतिम सजावट पहात, छायाचित्रं काढतच आम्ही दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. जेमतेम दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर आम्ही प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेच्या दरबारात पोहोचलो. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे मातेसमोर जेमतेम २ क्षणच उभं रहाता येतं तेवढ्या वेळेतच डोळे भरुन दर्शन घ्यावं लागतं अर्थातच मन काही भरत नाही. पण त्या २ क्षणांच्या दर्शनाने मन प्रसन्न होतंच आणि जाणवतं याचसाठी केला होता अट्टाहास. मनोमन असाच वारंवार दर्शनाचा योग यावा अशी प्रार्थना करत मातेचं दर्शन घेऊन परत फिरलो आणि देणगी अर्पण करुन प्रसाद घेतला. थोडंसं चालत जिथे आमचे घोडे थांबले होते तिथे पोहोचलो. परत घोड्यावर बसून भैरवनाथाच्या दर्शनासाठी निघालो. भवनपासून ३ किमी. अंतरावर भैरवनाथ मंदिर आहे. मंदिरात दर्शनासाठी खडी चढाई चढून जावं लागतं. त्यामुळे आम्ही परत घोड्यावर बसूनच दर्शनाला गेलो. तिथेही २०-२५ मिनिटं रांगेत उभं राहिल्यानंतर भैरवनाथाचं छान दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही घोड्यावरुनच पुन्हा कटरा इथे जायला निघालो. परतीचा मार्ग उताराचा असल्याने यावेळी वाटेत कुठेही न थांबता २.३० तासात कटरा ला पोहोचलो. तिथून पुढं एक दिड किमी. अंतरावर असलेल्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी चालत गेलो. जाता - येता दोन्ही वेळा घोड्यावरुन जाऊनही खूप थकवा आला होता. एवढा वेळ घोड्यावर बसायची बिलकुल सवय नसल्याने त्रास होत होता पण वैष्णोदेवी मातेचं सुंदर दर्शन घडल्यामुळे मन मात्र प्रसन्न होतं.
- स्नेहल मोडक










No comments:
Post a Comment