Pages

Tuesday, April 30, 2024

प्रसाद

              चैत्र पौर्णिमा - हनुमान जन्मोत्सव. नेहमीप्रमाणे या पौर्णिमेला आम्ही गिरनारला निघालो. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी प्रवास सुरु केला. आमच्यासह सारे प्रवासी स्थानापन्न झाले आणि थोड्याच वेळात गप्पा सुरु झाल्या. काही वेळातच त्या दिवशी रोपवे बंद असल्याची बातमी कळली. वाईट हवामानामुळे रोपवे बंद ठेवण्यात आला आहे, उद्या पौर्णिमा आहे पण रोपवे सुरु राहिल की नाही अशी साशंकता भाविकांमध्ये निर्माण झाली. कारण हवामान खात्यानं वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यावेळी आमच्या बरोबर २१ जणं होते. मग रोपवे बंद असल्यास पूर्ण चढून उतरावं लागेल आणि रात्रीच्या पुढील ट्रेनच्या वेळेआधी परत यावं लागेल, अशी आमची चर्चा सुरु झाली. सगळ्यांच्या मनात किंचित काळजी निर्माण झाली पण मी मात्र एकदम शांत होते. 

                दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही जुनागढला उतरुन रिक्षाने तलेटीला मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. भरभर सारी आन्हिकं आवरुन दर्शनासाठी निघालो. हनुमान जन्मोत्सव असल्यानं लंबे हनुमानजीच्या मंदिरात गडबड सुरु होती. मारुतीरायाचं दर्शन घेऊन, प्रार्थना करुन पहिल्या पायरीशी गेलो. तिथं दर्शन घेऊन प्रार्थना करुन रोपवे जवळ गेलो. रोपवे नुकताच सुरु झाला होता. मात्र तो कधीही बंद होऊ शकतो त्यामुळे शक्य तितक्या लवकर दर्शन घेऊन परत या अशी सूचना तिथले अधिकारी देतच होते. वारा थोडा जास्तच असल्यानं रोपवे थोडा हळू सुरु होता. अंबाजी टुकवरही खूप जोराचा वारा होता. यावेळी दर्शनासाठी फार गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही लवकरच गुरुशिखरावर पोहोचलो. मंदिरात प्रवेश करुन नतमस्तक झालो. अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. मन प्रसन्न तृप्त झालं. अखंड धुनीचं दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि पुन्हा रोपवे जवळ आलो. मधल्या वेळेत वाऱ्याचं प्रमाण कमी झालं होतं. छान उन्हं यायला सुरुवात झाली होती. साहजिकच त्यामुळे रोपवे व्यवस्थित सुरु होता. कुठलाही त्रास न होता सर्वांना अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. खूपच लवकर आम्ही पायथ्याशी परतलो होतो. 

                 थोडा आराम करुन आम्ही २५ सीटर बसने सोमनाथला दर्शनासाठी निघालो. तासभर छान प्रवास झाला. अचानक बसच्या इंजिन मधून विचित्र आवाज यायला लागला. ड्रायव्हरने बस बाजूला थांबवली. नक्की काय झालंय याचा शोध सुरु झाला. थोडा अंदाज बांधत, काहीतरी करुन गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तर ती सुरुच होईना. मग फोनाफोनी सुरु झाली. जवळपास गॅरेजही नव्हतं. तलेटीहून दुसरी गाडी किंवा मेकॅनिक मागवण्याशिवाय पर्याय नव्हता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी हळूहळू आमची काळजी वाढली. सोमनाथ दर्शन घेऊन रात्रीच्या ट्रेनने आम्हाला निघायचं होतं. या परिस्थितीत ते अशक्य होणार होतं अखेर सोमनाथ ला जाऊन परत जुनागढला न येता वेरावळ ते जुनागढ तिकिटं काढून वेरावळलाच ट्रेनमध्ये चढायचं असं ठरवलं. 

                  गाडी सुरु होईपर्यंत आम्ही साऱ्याजणी रस्ता दुभाजकामध्ये फिरु लागलो. छान गडद गुलाबी, केशरी अशा बोगनवेली फुलल्या होत्या. मधेमधे मोठी झाडंही होती. तळपत्या उन्हात तिथे सुखद गारवा आणि सावली होती. साहजिकच आम्ही सगळेच तिथेच फिरत, छायाचित्रं काढत होतो. असंच फिरत फिरत आम्ही चौघीजणी थोडं पुढे गेलो. तिथं एका झाडाचं खोड आडवं पसरत वर गेलं होतं. तिथं छान फोटो काढले आणि अचानक मला खजिना सापडला. एक नाजूकसं छोटंसं मोरपिस मला मिळालं. मी मोरपिस उचललं आणि माझ्या मुखातून 'दत्तगुरु' असे शब्द उमटले. अक्षरशः शब्दांपलिकडला आनंद झाला मला.

                   जानेवारी महिन्यात पौर्णिमेला गिरनारला जाण्याच्या ३-४ दिवस आधी मला 'मोरपिस घेऊन ये' असा संकेत मिळाला होता. माझं एक मन लगेच हो म्हणालं पण दुसरं मन म्हणत होतं भास झालाय तुला दत्तगुरुंना मोरपीस कशासाठी? माझी द्विधा मनस्थिती मी माझ्या सहचराला सांगितली तर तोही तसंच म्हणाला. मग आम्ही मोरपिस न घेताच गिरनारला गेलो. दर्शनासाठी मंदिरात पाऊल टाकलं आणि मी तिथंच खिळून उभी राहिले. श्री दत्तात्रेयांच्या दोन्ही बाजूला खूप सारी मोरपिसं ठेवली होतीच आणि अतिशय सुंदर असा भलामोठा मोरपिसांचा हार त्यांच्या गळ्यात घातलेला होता. काही क्षणांनी भानावर आल्यावर मला मोरपिस आणण्याचा संकेत का मिळाला होता त्याचं उत्तर मिळाल्याची जाणीव झाली. मी मोरपिस नेलं नाही म्हणून क्षमा मागून आणि पुढल्या पौर्णिमेला नक्की ते अर्पण करण्याची प्रार्थना करुन, दर्शन घेऊन मी मंदिरातून बाहेर आले.

                  फेब्रुवारी महिन्यातील पौर्णिमेलाच आम्ही नेपाळ यात्रेसाठी प्रस्थान केल्यानं गिरनार ला जाता आलं नाही. मग मार्च महिन्यात होळी पौर्णिमेला आम्ही गिरनार ला गेलो. तेव्हा मी आठवणीनौ मोरपिसं घेऊन गेले. मंदिरात गेल्यावर ती मोरपिसं तिथल्या पंडितजींच्या हातात दिली. त्यांनी किंचितसं स्मित करत त्या मोरपिसांनी पादुकांना स्पर्श केला, नंतर श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीला स्पर्श करुन अलवारपणे श्री दत्तात्रेयांच्या उजव्या बाजूला उभी करुन ठेवली. हे सारं पाहून मी श्री दत्तगुरुंकडे पाहिलं तर त्यांच्या मुखावरही स्मितहास्य विलसत असल्याचं मला जाणवलं आणि माझी सेवा रुजू झाल्यानं मला अतिशय आनंद तृप्तता वाटली. म्हणूनच हनुमान जन्मोत्सवादिवशी गिरनार दर्शन करुन सोमनाथला जाताना मला अवचित मिळालेलं हे छोटंसं मोरपिस म्हणजे माझ्यासाठी श्री दत्तगुरुंनी दिलेला विशेष प्रसाद होता. 

                  आम्ही नंतर जवळचंच एक पांढऱ्या तीळाचं सुंदर शेत बघून आलो. तिथे रहाणाऱ्या कुटुंबानं राखणीसाठी सांभाळलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाशीही खेळायला मिळालं. तासाभराने मेकॅनिक आला, गाडी दुरुस्त करुन आम्ही पुढे भालका तीर्थ, सोमनाथ दर्शन करुन वेरावळला पोहोचलो. तिथून ट्रेन ने पुढील प्रवासाला सुरुवात केली. 

                 सकाळी लवकर आम्ही गांधीनगरला पोहोचलो. १५-२० मिनिटांतच आमच्या बसेस आल्या आणि आम्ही अडिच तीन तासात आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी कर्नाळीला पोहोचलो. रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन जवळच असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नानाला गेलो. नर्मदा , गुप्त सरस्वती आणि ओरसंग अशा या तीन नद्यांचा इथे संगम आहे. आम्ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणार होतो. त्याआधी त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आलो होतो. स्नान करुन परत येऊन पूजेची सारी तयारी करुन परिक्रमेची संकल्प पूजा केली. नंतर जेवून परत दर्शनासाठी निघालो.‌ गरुडेश्वर, शुलपाणी दर्शन घेऊन भालोदला गेलो. तिथे पोहोचेपर्यंत तिथल्या सायंआरतीची वेळ झाली होती. मग प्रतापे महाहाजांशी थोडा संवाद साधून, आरती करुन, चहा पिऊन आम्ही परत मुक्कामी आलो. मुक्कामी पोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. 

                  जेमतेम २ तास झोपून परत आवरुन पहाटे ३ वाजता बसने तिलकवाडा इथं निघालो. अर्ध्या तासात तिलकवडा मधल्या वासुदेव कुटीर जवळ पोहोचलो. आम्ही इथून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सुरु करणार होतो. तिथल्या मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, कुटीरामध्ये जाऊन वासुदेवानंद सरस्वती यांचं दर्शन घेतलं. त्याचवेळी तिथल्या एका अधिकाऱ्यानी आम्हाला चहा पिऊन जायला सांगितलं. पण नेमका चहा संपला होता आणि परत तयार व्हायला थोडा वेळ लागणार होता म्हणून आम्ही 'राहुदे, चहा पुढे घेऊ' असं सांगून परिक्रमा सुरु केली. पुढं नर्मदा माता मंदिर आणि तिलकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन निघालो. आणि समोरच्या भल्या पहाटे सुरु असलेल्या एकमेव दुकानात माझा सहचर गेला. तिथं माझ्यासाठी अत्यंत गरजेची वस्तू फेविक्विक मिळालं आणि मनोमन मी नर्मदा मैयाला शतशः नमन केलं. आदल्या दिवशी रात्री भोजनासाठी थांबलो असताना माझ्या पायातल्या सॅंडलचा अर्धा तळभाग उकलला असल्याचं लक्षात आलं. मुक्कामी येईपर्यंत मी वाटेत कुठे फेविक्विक मिळत का पहायला याला सांगितलं. पण त्यानं दुर्लक्ष करत कुठही बस थांबवली नव्हती. त्यावेळी मी मैयाला प्रार्थना करुन शांत बसले होते. पण माझी मैयाला किती काळजी होती याची एवढ्या पहाटे मिळालेल्या फेविक्विकमुळे जाणिव झाली. अन्यथा वाटेत केव्हाही सॅंडल तुटल्यावर अनवाणी चालावं लागलं असतं हे नक्की. 

                     परिक्रमा सुरु झाली आणि लगेच एका ठिकाणी चहा मिळाला तो पिऊन आम्ही चालायला सुरुवात केली. थोड्या अंतरापर्यंत विद्युत दिव्यांची यावेळी व्यवस्था केलेली होती. दोन्ही बाजूने दाट केळीच्या बागा आणि मधून रस्त्यावरुन आम्ही चालत होतो. हवेतही छान गारवा होता. अतिशय शांत, प्रसन्न वातावरण होतं. पहाटे सव्वापाच वाजले आणि झुंजुमुंजू झालं. त्याआधीच आम्ही रस्त्यावरुन खाली उतरुन नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरुन चालायला सुरुवात केली होती. त्यामुळे हलक्या प्रकाशात मैयाचं रुप सुंदरच दिसत होतं. हळूहळू मावळतीला निघालेला चांदवा आणि त्याचं जळात दिसणारं प्रतिबिंब मन मोहवत होतं. बघता बघता अजून छान उजाडलं  आणि आमचीही उत्तर तटावरची परिक्रमा पूर्ण होत आली. पलिकडे दक्षिण तटावर जाण्यासाठी जिथून नावा सुटतात त्या ठिकाणाच्या जवळ आलो आणि थबकलोच. गतवर्षी पाहिलेली नंदीची भव्य मूर्ती, आशीर्वादाचा हात सारं तिथून गायब होतं. किनाऱ्यावर उंचावर हे सारं उभारण्यात आलं होतं. पण सप्टेंबर २०२३ मध्ये नर्मदा मैयाला आलेल्या प्रचंड पूरात हे सारं क्षतिग्रस्त होऊन नष्ट झालं होतं. पूराच्या पातळीचा अंदाज आला आणि  मन हळहळलं. 

                  नावेतून मैया पार करुन दक्षिण तटावर पोहोचलो. नावेतून जाताना आमच्या बरोबर असलेलं मैयाजल थोडं त्या जळात ओतून तिथलं जल भरुन घेतलं याला तीर्थमिलन असं म्हणतात.‌ पलिकडे पोहोचल्यावर इथं तीर्थेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात आपली अर्धी परिक्रमा पूर्ण झाली म्हणून आपल्या बरोबरचं मैयाजल तीर्थेश्वराला चढवायचं असतं. मंदिरात जाण्यासाठी १५-२० च पण खड्या पायऱ्या आहेत. त्या चढताना मला जोरदार ठेच लागली. पायाच्या अंगठ्याचं नख पिंजून रक्त आलं. कळ सहन करत मी कशीबशी वर गेले. लगेच सोफ्रामायसिन, बॅण्ड एड मिळालं ते लावून मी दर्शन घ्यायला गेले आणि कळलं की हे तीर्थेश्वराचं मंदिरही पूरात वाहून गेलंय.  तिथे रहाणाऱ्या लोकांनी त्यातली शिवपिंडी वाचवून नुसतीच उघड्या जागी दर्शनासाठी ठेवलीय. मंदिरही पूरात गेल्याचं ऐकून खूप वाईट वाटलं. पण तो पूरच एवढा मोठा होता की त्यात अनेक गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं. पै पै जमवून उभे केलेले अनेक संसार उध्वस्त झाले होते. ज्या नर्मदा मैयाची तिथले लोकं पूजा, सेवा करतात त्याच मैयाच्या पूरात त्यांचे संसार उध्वस्त झाले होते. नंतर असंख्य ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरु झाले आणि सर्वांना सावरण्याचा प्रयत्न केला गेला. सारा संसार क्षणात वाहून गेल्यावर खरंतर सर्वसामान्य व्यक्ती खचून गेली असती, प्रचंड चिडचिड केली असती. मात्र सोशल मीडियावर नर्मदालयाची याबद्दलची एक पोस्ट मी वाचली आणि अक्षरशः निःशब्द झाले. त्यांनी पूरग्रस्तांना मदत करत असताना सहज एका महिलेला विचारलं ज्या मैयाची तुम्ही एवढी पूजा, सेवा करता तिने तुमचं सर्वस्व नष्ट केलं तर त्यावर तिनं अतिशय सुंदर उत्तर दिलं, ' नाही, मैयानं तर आमचा तुटकाफुटका संसार नेला आणि आम्हाला संपूर्ण नवीन संसार दिला '. आपल्यासारख्या अत्यंत सुरक्षित, सुखासीन आयुष्य जगणाऱ्या कुणाच्या तरी मनात एवढा उदात्त विचार आला असता का? यातूनच नर्मदा किनाऱ्यावर पिढ्यानुपिढ्या रहाणाऱ्या लोकांची मैयावरची अपार श्रद्धा, प्रेम सहज जाणवतं. 

                      तीर्थेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही परत चालायला सुरुवात केली. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत मार्गात कुठेही कुणालाही विश्रांतीसाठी किंचितही थांबावं लागलं नाही. खरंतर यावेळी आमच्या बरोबर काही ज्येष्ठ मंडळीही होती. पण सर्वांची मैयावरची श्रध्दा, उत्साह आणि क्षमता कौतुकास्पद होती. मार्गात ठिकठिकाणी सेवा म्हणून देण्यात येणारा प्रसाद थोडासा घेत आम्ही चालतच होतो. चहा, सरबत, ताक, शेव गाठी, पुरी भाजी, खिचडी असे अनेक पदार्थ सेवा म्हणून परिक्रमावासींना इथले रहिवासी आवर्जून देतात. तिलकवाडा ते रामपुरा हा परिक्रमा मार्ग थोडा रस्त्याने आणि थोडा किनाऱ्याने आहे. पण  पुढचा रामपुरा ते तिलकवाडा हा मार्ग रस्त्यानेच आहे. मार्ग संपताना अखेरच्या सीताराम बापूंच्या आश्रमातून खाली उतरुन किनारी जावं लागतं. त्या आश्रमात पोहोचल्यावर ५-१० मिनिटं बसून आम्ही पुढे निघालो. खाली उतरुन मैयाच्या कोरड्या पात्रातून दगडगोट्यांमधून चालायला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर अचानक तिथल्या शांततेची जाणिव झाली. आणि लक्षात आलं की पलिकडल्या तीरावर जाणाऱ्या नावांचा बिलकुल आवाज येत नाहीय , कुठे दिसतही नाहीयेत. मग दिसला तो पुलसदृश्य भाग. जसजसे पुढे गेलो तसं दिसलं की खरच तिथं तात्पुरता पुल बांधलाय. गतवर्षी होडीतून पलिकडे जाताना पुलाचं काम सुरु असल्याचं दिसलच होतं. पण अजून हा पुल पक्का नाहीय. पुलावरुन चालत मैया पार करुन परत तिलकवाड्याला पोहोचलो. 

                स्नानासाठी थोडं बाजूला मैयाच्या पात्रात उतरणार इतक्यात तिथे असलेल्या पोलिसांनी अडवलं आणि स्नानासाठी नर्मदेत उतरायला प्रतिबंध केला. मग फक्त प्रोक्षण करुन  बाटलीत जल भरुन घेतो असं पोलिसांना सांगून आम्ही पाण्याजवळ गेलो. प्रोक्षण करुन जल भरुन घेऊन परत वरती वासुदेव कुटीरजवळ पोहोचलो. मारुती मंदिरात दर्शन घेऊन बाजूच्या महादेव मंदिरात जल चढवलं आणि परिक्रमा पूर्ण करुन बाहेर आलो. लगेच तिथेच कन्यापूजन केलं. पुन्हा बसने मुक्कामी आलो संकल्प पूर्तीची पूजा केली आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची सांगता केली. नंतर कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन भोजन प्रसाद घेतला. थोडा आराम करुन परत फिरायला निघालो. नाग मंदिर, नानी मोटी पनौती आणि शनैश्वर मंदिर पाहून स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेलो. स्टॅच्यू आणि सारा परिसर, बागा आणि नंतर थोडा लेझर शो पाहून रात्री मुक्कामी गेलो. 

                       चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून चंपानेरला पोहोचलो. तिथून पावगडच्या पायथ्याशी गेलो. इथंही देवी सतीमातेचं शक्तीपीठ आहे.गतवर्षी प्रमाणेच यावेळीही खराब हवामानामुळे रोपवे सुरु रहाण्याची शक्यता कमी होती. मंदिरात जाताना रोपवे ने वर पोहोचलो. थोड्या पायऱ्या चढल्या आणि पावसाला सुरुवात झाली. बऱ्यापैकी मोठा पाऊस होता त्यामुळे थोडं  भिजलोच. वारा आणि पाऊस यामुळे आता आपण परत जाईपर्यंत रोपवे बंद होणार असं सगळ्यांना वाटत होतं. का कुणास ठाऊक पण इथंही मी शांत होते रोपवे सुरु रहाणार याची मला अगदी खात्री वाटत होती. महाकाली मातेचं आम्ही दर्शन घेऊन पावसातच थोडं फिरुन पायऱ्या उतरायला सुरुवात केली. पायऱ्या उतरुन येईपर्यंत पाऊस थांबून उन्ह पडायला सुरुवात झाली. साहजिकच रोपवे व्यवस्थित सुरु होता. या गडबडीत यावेळीही आम्हाला दुपारच्या ट्रेन साठी अहमदाबाद ला जायला जमणार नसल्यानं आमचा बोर्डिंग पाॅईंट आम्ही बदलला होता. त्यानुसार वडोदराला पोहोचून आम्ही वंदे भारत ने आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

             'श्री दत्तात्रेय' आणि 'नर्मदा मैया' यांच्या कृपेने आमचं गिरनार दर्शन आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अतिशय सुरेख रित्या पूर्ण झाली होती. 

|| जय गिरनारी ||         || नमामि देवी नर्मदे ||


- स्नेहल मोडक


  





Saturday, April 20, 2024

साकुरा - ३

                     जपानमधल्या दहाव्या दिवशी आम्हाला स्थलदर्शनासाठी कारने जायचं होतं. त्यामुळे पहाटे उठून आवरुन आम्ही लवकरच प्रवासाला सुरुवात केली. वाटेत थोडं थांबून नाश्ता करुन पुढे निघालो. आम्हाला जिथं जायचं होतं तिथं पोहोचायच्या आधीच पावसाला सुरुवात झाली. पावसात कसं आणि किती फिरणार या विचारातच आम्ही 'Hakone' इथं पोहोचलो. 'Hakone' हे 'Kanagawa' प्रांतातलं एक शहर. हे शहर निसर्ग सौंदर्य, उष्ण पाण्याचे झरे, आणि सर्वात महत्वाचं 'Mount Fuji' पासून जवळ असलेला 'Lake Ashinoko' यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. Tokyo ची गर्दी टाळण्यासाठी पर्यटक आवर्जून 'Hakone' इथं येतात. 

                  आमची गाडी पार्क केली आणि समोर पाहिलं तर खूपच सुंदर नजारा दिसत होता. पाऊस पडत असूनही छत्री न घेताच आम्ही चटकन तो नजारा पहायला आणि छायाचित्रात बध्द करायला गेलो. 

                    'Ashi Lake' हाकोनेमधला एक अतिशय लोकप्रिय जलाशय. ११७० मध्ये 'Owakudani' इथं उसळलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा Lake तयार झालाय. ऐतिहासिक स्थानं, उष्ण पाण्याचे झरे, माऊंट फुजीचं दिसणारं अप्रतिम दृश्य यासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. या तलावातून pirate ships मधून हा सुंदर नजारा पहात सफर करता येते. 'Hakone Machi Port' ते 'Togendai' आणि तिथून परत अशी फेरी करता येते. आम्ही इथं फिरत होतो तेव्हा पाऊस सुरुच होता पण आम्हालाही cruise ने sightseeing करायचं होतं म्हणून आम्ही तिथेच थांबलो. आमची तिकीटं काढून होईपर्यंत तिथे उभं असलेलं ship निघालं. मग पुढच्या फेरीपर्यंत अर्धा तास आम्हाला थांबावं लागलं. त्यावेळेत आम्ही जेवून घेतलं. ठरलेल्या वेळी आम्हाला घेऊन पुढचं pirate ship निघालं. खूपच गर्दी होती. पण दुमजली cruise असल्यानं सगळ्यांना आरामात फिरता, बसता येत होतं. आजूबाजूचं सुरेख दृश्य पहात आम्ही निघालो. तासभर सगळा नजारा पहात पलिकडे 'Togendai' ला  पोहोचलो. 

                 इथून आम्ही cable car ने पुढचं ठिकाण पहाण्यासाठी निघालो. Togandai ते Owakudani' असा हा गोंडोला चा प्रवास होता. 'Owakudani' हे उष्ण पाण्याचे झरे आणि सक्रिय सल्फर वायू यांचं ज्वालामुखीचं खोरं आहे. ३००० वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या विस्फोटातून हे खोरं तयार झालंय. आणि अजूनही इथून सल्फरचा धूर सातत्यानं बाहेर पडतोय. त्यासाठी जागोजागी vent करण्यात आली आहेत. हे सारं पहाण्यासाठी Owakudani' station वर गॅलरी तयार करण्यात आलीय. इथल्या गरम पाण्यात खूप जास्त प्रमाणात सल्फर असतं आणि त्या पाण्यात शिजवलेल्या अंड्यांना इथं 'kuro tamaro' म्हणतात. ही अंडी खाणं लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे यामुळं आयुर्मान वाढतं असा समज आहे. सातत्यानं बाहेर पडणारा सल्फरचा धूर आणि तो सारा परिसर पहाणं हा एक अत्यंत वेगळा अनुभव होता. इथं कुठल्याही क्षणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो त्यामुळे अशी किंचितही हालचाल जाणवली तर काय काय काळजी घ्यायची याच्या सूचना तिथं देण्यात येतात. अर्थात संपूर्ण जपानी जनतेला शालेय जीवनातच भूकंप, ज्वालामुखी उसळल्यास करावयाच्या उपाययोजना, काळजी याचं शिक्षण दिलं जातं. पण इथं जगभरातील पर्यटक येत असल्यानं या सूचना सातत्यानं दिल्या जातात. 

                  हे सारं पाहून आम्ही परत दुसऱ्या गोंडोलानं पुढं 'Sounzan' इथं पोहोचलो. या प्रवासात माऊंट फुजीचं सुंदर दर्शन घेता येतं. आकाश निरभ्र असेल तर माऊंट फुजी अतिशय स्पष्टपणे पहाता येतो. पण जवळजवळ रोपवे ला येईपर्यंत बारीक पाऊस पडतच होता. त्यामुळे आकाश ढगाळच होतं. अर्थातच 'माऊंट फुजी'चं सुस्पष्ट दर्शन झालं नाही. 'Sounzan' ला पोहोचून आम्ही लगेच दुसऱ्या गोंडोलाने परत निघालो. 'तोगेनदाई' ला पोहोचलो आणि परत ship ने  तासभर प्रवास करुन 'हाकोना माची' इथे आलो. मधल्या वेळेत पाऊस पूर्ण थांबला होता. हलकं उन पडायला लागलं होतं. बोटीतून उतरुन आम्ही तिथं असलेल्या 'Onsen' किंवा Ashi-yu इथं गेलो. Ashi म्हणजे पाय आणि Yu म्हणजे गरम पाणी. गरम पाण्यात पाय सोडून बसण्याचं स्थान. आम्हीही थोडावेळ त्या गरम पाण्यात पाय सोडून बसलो. तिथल्या पाण्यात सल्फरचं प्रमाण अधिक असल्यानं त्वचेसाठी ते औषधी आहे. चांगलीच थंडी होती त्यामुळे तर खूपच छान वाटत होतं  गरम पाण्यात पाय ठेवून बसायला. अर्थात तिथं जास्त वेळ बसणंही अशक्य असतं. 

        ‌         आम्ही कारजवळ येईपर्यंत लख्ख उन पडलं आणि मला अत्यानंद झाला कारण माझी इच्छा पूर्ण झाली होती. लख्ख उन्हात हिमाच्छादित 'माऊंट फुजी' अतिशय सुरेख दिसत होता. अगदी मंत्रमुग्ध होऊन पहात रहावं असंच नयनरम्य दृश्य होतं. ज्यासाठी खास हाकोने ला आम्ही आलो होतो ते इप्सित साध्य झालं आणि मनाला अतिशय समाधान वाटलं. खूप वेळ तिथं थांबून माऊंट फुजी नजरेत आणि छायाचित्रात साठवून आम्ही घरी परत निघालो.

                अकरावा दिवस आमचा जपानमधला अखेरचा दिवस. सकाळी सामानाचं बरचसं पॅकिंग केलं. दुपारी जेवून थोडा आराम करुन अखेरच्या स्थलदर्शनासाठी निघालो. आम्ही आधी 'Yokohama Stedium' इथं गेलो.  त्यावेळी बेसबॉल ची मॅच सुरु असल्यानं खूपच गर्दी होती. तिथला परिसरही रंगीबेरंगी ट्युलिप्स नी' खुलला होता. खूप मोठ्या प्रमाणात इथं ट्युलिप्स आहेत. थोडावेळ तिथे फिरुन ट्युलिप्स पाहिली आणि मग Yamashita Park' इथं गेलो. हे पार्कही खूप मोठं आणि सुंदर आहे.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'Yokohama Bay' आणि हे पार्क असा एकच परिसर आहे. पार्क मध्ये थोडं फिरुन आम्ही समुद्र पहायला गेलो. जे दृश्य आम्ही 'Landmark Tower' वरुन पाहिलं होतं तेच आता जवळून पहायला आलो होतो. इथं किनारा बंदिस्त आहे. पाण्यात जाता येत नाही. समुद्र किनारी एक मोठं जहाज संग्रहालय म्हणून ठेवलंय. हे संग्रहालय पर्यटकांना पहाता येतं. हळूहळू सांजावलं आणि सारा परिसर विद्युत दिव्यांनी उजळला. सुंदर नजारा पहात परत आम्ही थोडं फिरलो आणि मग परत निघालो. 

                  बारावा दिवस प्रवासाचा दिवस होता. भल्या पहाटे आवरुन जावई आणि छोट्या नातवाचा निरोप घेऊन पुतणीबरोबर 'टोकियो' मधल्या 'नरिता' विमानतळावर निघालो. तिथं पोहोचल्यावर पुतणीचा निरोप घेऊन पुढले सोपस्कार करायला गेलो. सारे सोपस्कार पूर्ण करुन गेटवर जाऊन बसलो. तिथून सकाळी निघालो ते इथल्या सायंकाळी विमानतळावर उतरलो. कॅबने घरी यायला निघालो. मात्र रविवार आणि आंबेडकर जयंतीच्या मिरवणूका यामुळे खूपच वाहनकोंडी झाली होती. अर्थातच घरी पोहोचायला उशीरच झाला.

                   जपानी भाषेत जपानला 'निहोन' किंवा 'निप्पोन' असं म्हणतात. 'उगवत्या सूर्याचा देश' असा याचा अर्थ. प्राचीन इतिहास असलेल्या, औद्योगिकदृष्ट्या अतिप्रगत असलेल्या या देशात लोकांचं आयुर्मानही जास्त आहे. वयाची शंभरी पार केलेली लक्षावधी लोकं जपानमध्ये आहेत. वयाच्या ८०-८५ वर्षांपर्यंत इथली लोकं कार्यरत असतात. या वयातही छोटी मोठी नोकरी करणं, एकटं रहाणं, फिरणं हे कौतुकास्पद. जपानी लोकांचे शिस्तप्रिय, शांतताप्रिय, प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीचा आदर करणं आणि प्रामाणिकपणा हे गुण अगदी वाखाणण्याजोगेच. या गुणांमुळंच तिथं दैनंदिन व्यवहारात आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करणं सहज शक्य आहे. तिथली शांतता, स्वच्छता, शिस्त ही तिथल्या निसर्ग सौंदर्याइतकीच पहाण्यासारखी आहे. विदेश भ्रमंती करताना 'जपान' नक्की अनुभवावं असंच आहे.

- स्नेहल मोडक





  

  

  

  




  



Friday, April 19, 2024

साकुरा - २

                चौथ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन दुपारच्या भोजनासाठी डबा करुन घेऊन आम्ही स्थलदर्शनासाठी निघालो. ट्रेन ने आम्ही पोहोचलो 'Shibuya' स्थानकावर. 'Shibuya Scramble Crossing' हे जगातलं सर्वात व्यस्त पादचारी क्राॅसिंग आहे. जिथे एकाचवेळी ३,००० लोकं रस्ता ओलांडतात. याची तुलना न्युयॉर्कच्या Time Square बरोबर केली जाते. Shibuya स्टेशनच्या बाहेरच हे‌ सर्वात मोठं क्राॅसिंग आहे. याच स्टेशनच्या समोर 'Hachiko' नावाच्या इमानी श्वानाचा पुतळा उभारण्यात आलाय. ह्या श्वानाचं त्याच्या मालकावर इतकं  प्रेम होतं की रोज तो मालकाची स्टेशन बाहेर वाट पहायचा आणि मालकाबरोबरच घरी परतायचा. मालकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतरही Shibuya स्टेशनवर तो सातत्यानं मालकाची वाट पहात असे अगदी तो मृत्युमुखी पडेपर्यत. या इमानदार श्वानाच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा उभारलाय. पर्यटक 'हाचिको' चा हा पुतळा पहाण्यासाठी आवर्जून येतात. हे सारं पाहून आम्ही पुढे गेलो.

                   'Yoyogi park'  हे टोकियो मधलं सर्वात लोकप्रिय पार्क आहे. आम्ही या उद्यानात पाऊल टाकलं आणि मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिलो. ज्या गोष्टीसाठी मला जपानला जायची आस लागली होती ती गोष्ट इथे भरभरून माझ्या समोर आली होती. जपानचा अतिशय प्रसिद्ध असा साकुरा महोत्सव (Chery Blossom) नुकताच सुरु झाला होता. आणि या उद्यानात या साकुराची अनेक झाडं होती. पर्णहिन मोठे वृक्ष आणि त्यावर फक्त नाजुक पांढऱ्या, गुलाबी रंगाची गुच्छानी लगडलेली साकुराची फुलं आणि वर निळंशार आकाश, अतिशय अप्रतिम मनोरम दृश्य होतं. 

                   Cherry Blossom म्हणजेच साकुरा महोत्सवासाठी जपान जगभरात प्रसिद्ध आहे. साकुरा साधारण मार्च महिन्याच्या मध्यापासून फुलायला सुरुवात होते आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याचा बहर असतो. मात्र इथलं हवामान सतत  बदलत असतं. त्यामुळे जर पाऊस पडला तर मात्र ही बहरलेली साकुराची नाजूक फुलं वाऱ्यापावसाने लगेच गळून पडतात. पण साधारणपणे महिनाभर कुठे न कुठे साकुरा पहायला मिळतोच. साकुरा पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक जपानमध्ये येतात. जपानमध्ये या काळात 'हानामी'चं आयोजन केलं जातं. जपानच्या हवामान खात्याकडून चेरीच्या फुलांच्या बहराचा अंदाज वर्तविण्यात येतो. चेरीच्या फुलांचा बहर अल्पजीवी अगदी १-२ आठवडे टिकतो त्यामुळे त्या काळातच 'हानामी' पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. 'हानामी' ही जपानमध्ये फुलांचा बहर पहाण्याचा आनंद घेण्याची एक परंपरा आहे. जपानी भाषेत 'हाना' म्हणजे फुलं आणि 'मी' म्हणजे पाहणे. साकुराच्या बहरलेल्या वृक्षाखाली दिवसा किंवा रात्री पार्टी करुन 'हानामी' साजरी‌ करतात.

                 आम्ही उद्यानात प्रवेश करताच बहरलेला साकुरा पाहून मन मोहोरलंच. याआधी दोन दिवस साकुराचा बहर आम्ही पहातच होतो. पण इथे साकुराशिवाय दुसरं काही नव्हतंच. जिथं पहावं तिथं नाजूक पुष्पसंभारानी खुललेली झाडंच दिसत होती. वाऱ्याच्या झुळूकीनं फुलांच्या पाकळ्यांचा हलका वर्षावही सुरु होता. मन अगदी प्रसन्न, उल्हसित झालं होतं. पर्यटकांची इथं गर्दी असूनही परिसर खूप मोठा असल्यानं मोकळं फिरता येत होतं. थोडं फिरुन आम्हीही एका ठिकाणी चटई घालून बैठक मारुन बसलो. आणि घरुन करुन नेलेल्या पदार्थांचा गप्पा मारत, साकुराचं सुंदर दृश्य पहात आस्वाद घेतला. कितीही पाहिलं, छायाचित्रं काढली तरी मन भरतच नव्हतं. त्या सुंदर वातावरणात, साकुराच्या संगतीत किती वेळ गेला कळलंच नाही. अखेर सायंकाळ होत आली आणि आम्ही परत निघालो.

                पाचव्या दिवशी सकाळी थोडं आरामात आवरलं. नाश्ता करुन खरेदीसाठी बाहेर गेलो. थोडीफार खरेदी करुन परत आलो. जेवून थोडा आराम करुन फिरायला निघालो. आताचं स्थलदर्शन होतं 'Yokohama Landmark Tower'. 

                  योकोहामा हे जपानमधलं दुसरं सर्वात मोठं शहर. 'कनागावा' प्रांताची 'योकोहामा' राजधानी आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेली नगरपालिका. ग्रेटर टोकियोमधलं योकोहामा हे आर्थिक, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक केंद्र आहे. हे संपूर्ण शहर इथल्या 'Landmark Tower' वरुन पहाता येतं. 

                 Landmark Tower ही ७२ मजली इमारत आहे. या इमारतीमधले ४८ मजल्यांवर दुकानं, रेस्टॉरंट, क्लिनिक आणि कार्यालयं आहेत. त्यावर ४९ ते ७० एवढे मजले फाईव्ह स्टार हॉटेल आहे. त्यातल्या ६९ व्या मजल्यावर 'Sky Garden' आहे. इथून ३६० डिग्री मधून संपूर्ण शहराचं दृश्य आणि एकदम निरभ्र आकाश असताना 'माऊंट फुजी' पहाता येतो. आम्ही या Sky Garden मध्ये पोहोचलो. एवढ्या उंचावरुन सारं शहर पहाणं हा एक वेगळाच अनुभव होता. साऱ्या शहराचं अतिशय विहंगम दृश्य दिसत होतं. खाली असलेलं 'Yokohama bay' तर फारच अप्रतिम दिसत होतं. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती. त्यामुळे दिवसाउजेडी आम्हाला योकोहामा शहर पहायला मिळालं. थोड्यावेळाने उन्हं कलली आणि सांजवायला लागलं. हळूहळू शहर विद्युत रोषणाईने झगमगू लागलं. हळूहळू होणारा हा सुंदर दृश्यबदल नजरेत आणि कॅमेरात साठवत आम्ही बराच वेळ तिथे बसलो होतो.  त्या वर्तुळाकार गार्डन मध्ये पर्यटकांसाठी आसनव्यवस्था ही आहे. छोटीमोठी दुकानंही आहेत. हे सारं पहाण्यासाठी पर्यटकांची इथे रोजच गर्दी असते.

                    सहाव्या दिवशी सकाळी आम्ही  'Showa Kinen Park' बघायला गेलो. हे टोकियो मधलं ४०८ एकरमध्ये पसरलेलं सर्वात मोठं पार्क आहे. Tulips, Cherry Blossom, Canola Flowers आणि Ginkgo Tree, यासाठी हे पार्क प्रसिद्ध आहे. मार्च-एप्रिल आणि डिसेंबर महिन्यात पर्यटकांची अतिशय गर्दी असते. या भव्य पार्कमध्ये वेगवेळे भाग आहेत. सर्वात आधी आम्ही गेलो ट्युलिप गार्डनमध्ये. त्या भागात शिरलो आणि अगदी नयनरम्य दृश्य नजरेसमोर आलं. खूप मोठा परिसर ट्युलिपच्या रंगबिरंगी फुलांनी सजला होता. विविध जातींची ट्युलिपची फुलं तिथे उमलली होती. एका ठिकाणी मोठा तलाव होता आणि त्याच्या बाजूनेही ट्युलिप्स फुलले होते. ती फुलं आणि त्यांचं पाण्यातलं प्रतिबिंब खूप सुंदर दिसत होतं. नजर जाईल तिथपर्यंत सारा परिसर रंगबिरंगी दिसत होता. बराचवेळ तिथे थांबून सारं पाहून आम्ही पुढे दुसऱ्या भागात प्रवेश केला आणि थबकलोच. समोर अनेक मोठमोठे वृक्ष साकुरानं अंगोपांगी बहरले होते. इतक्या प्रचंड प्रमाणात ती नाजूक फुलं फुलली होती की साऱ्या वृक्षांवर हिमवर्षाव झाल्यासारखं वाटत होतं. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती इवली पांढरी, गुलाबी फुलं फारच खुलून दिसत होती. अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटावं इतकं अप्रतिम दृश्य होतं. आधी पाहिलेल्या 'Yoyogi Park' पेक्षाही इथल्या साकुरा वृक्षांची संख्या जास्त होती. एका बाजूला ट्युलिप्स आणि दुसऱ्या बाजूला साकुरा, आम्ही अक्षरशः मंत्रमुग्धच. इथंही आम्ही साकुराच्या झाडाखाली बसून भोजनाचा आस्वाद घेतला. माझं तर हा अप्रतिम नजारा पाहूनच पोट भरलं होतं. पण कितीही पाहिलं,फिरलं तरी मन मात्र भरत नव्हतं. सतत तेच पहात रहावंसं वाटत होतं. खूप फिरुन आम्ही पुढे तिथल्याच जापनीज गार्डनमध्ये गेलो. हे गार्डन 'बोन्साय ट्री' साठी प्रसिद्ध आहे. 'बोन्साय' ही जपानी लोकांची पारंपरिक कला आहे. 'बोन' म्हणजे कुंडी आणि 'सई' म्हणजे झाड. कुंडीत लावलेलं मोठ्या वृक्षाचं लघुरुप. सतत छाटणी करुन त्या वृक्षाला लघुरुपातच वाढवणं ही एक कला आहे. या वृक्षाला मोठ्या वृक्षासारखीच फुलं, फळं येतात. इथल्या गार्डन मध्ये अशी बरीच बोन्साय पहायला मिळतात. त्यात अगदी ४०० वर्षाची बोन्साय तिथं आहेत. बरीचशी १५०-२०० वर्षांची बोन्साय आहेत. एवढी वर्षं अशी झाडं जपणं जगवणं हे फारच कठीण काम आहे. मात्र इथली लोकं हे काम अतिशय काळजीपूर्वक आणि प्रेमानं करतात म्हणूनच एवढी वर्षं ही बोन्साय जिवंत आणि आवर्जून पहाण्यासारखी आहेत. हे संपूर्ण पार्क फिरण्यात दिवस कधी सरला कळलही नाही. 

                  सातव्या दिवशी आम्ही जरी जपानमध्ये असलो तरी आपला गुढीपाडवा आणि नववर्षाची सुरुवात होती. या दिवशी बाहेर फिरायला जाणं जरा कठीणच होतं. पहाटेपासूनच कमी अधिक पाऊस सुरु होता. गारठाही फारच वाढला होता. आमच्या तिथल्या वास्तव्यात तापमान अगदी १० ते १७ डिग्री एवढंच होतं. त्यात पावसामुळे थंडी अजूनच वाढत होती. रोज रात्री heater लावत होतोच पण आज दिवसाही त्याची गरज वाटत होती. आमचं दुपारचं जेवण झालं आणि पाऊस कमी होत थोड्या वेळाने पूर्ण थांबला. पण त्यादिवशी उशीर झाला असल्यानं स्थलदर्शन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे राहिलेली बरीचशी  खरेदी त्यादिवशी केली. 

              आठव्या  दिवशी पाऊस बिलकुल नसल्यानं आम्ही सकाळीच स्थलदर्शनासाठी निघालो. आधी 'Kamakura Buddha Temple' पहायला गेलो. इथे जपानमधली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 'अमिदा' बुद्धाची कांस्य प्रतिमा आहे. ११.३ मीटर उंची आणि १२१ किलो वजनाची ही 'अमिदा' बुद्ध मूर्ती आहे. दहा वर्षांच्या अथक परिश्रमातून साकारलेली भव्य लाकडी बुद्ध मूर्ती १२४८ पर्यंत इथे होती. पण त्यावेळच्या वादळात ही मूर्ती आणि ती जिथे स्थापन केली होती तो हाॅल सारच क्षतिग्रस्त झालं. त्यानंतर सध्याची कांस्य मूर्ती बनवण्यात आली. त्यानंतर आलेल्या एका वादळात नंतरचा हाॅलही उध्वस्त झाला. मग मात्र ती मूर्ती नुसतीच तशीच ठेवण्यात आलीय. ही मूर्ती आतून पोकळ असल्यानं आतमध्ये जाऊन अतंर्गत भाग पहाता येतो. आम्हीही हा अंतर्भाग पाहून आलो. हा परिसरही मोठा आणि हिरवाईने फुललेला आहे. अर्थातच साकुराचीही झाडं आहेतच. परिसरही खूप मोठा शांत आहे. इथेच भोजन करुन आम्ही आसपास सगळीकडे फिरलो. 

                 आमचं यानंतरचं स्थलदर्शन होतं 'Hasedera'. हेही एक बुध्द मंदिर आहे. इथं प्रवेश केल्यावर लगेचच समोर एक छोटंसं तळं समोर  येतं. सुंदर अशा तळ्यात आजुबाजुच्या झाडांची प्रतिमा सुंदर दिसतेच. त्याचबरोबर या तळ्यात 'Koi Fish' आहेत. हे विविध रंगी मजबूत जड देहाचे मासे आहेत. जपानी भाषेत 'कोई' चा अर्थ प्रेम आणि मैत्री असा आहे. हे मासे पहाणं हा एक वेगळाच आनंद आहे. 

इथली बुद्ध मूर्ती ही जपानमधल्या सर्वात मोठ्या लाकडी मुर्तीपैंकी एक ही 'कन्नन' बुध्दाची मूर्ती आहे. ९.१८ मीटर उंचीची ही मूर्ती कापराच्या वृक्षापासून बनवण्यात आली असून तिला सुवर्ण मुलामा देण्यात आलाय. हे मंदिर दोन स्तरांवर बांधण्यात आलंय. त्यात एक गुंफाही आहे तिला 'Benten Kutsu' म्हणतात. या वळणदार गुंफेत समुद्री देवता आणि सात भाग्यशाली देवतांची प्रमुख देवी 'Benzaiten' हिच्या विविध स्वरुपात मूर्ती आहेत. 'बेन्ज़ाइटन' देवी म्हणजेच आपल्या 'देवी सरस्वती' चं जपानी रुप. दगडात कोरलेल्या या मूर्ती आहेत. गुंफेच्या एका भागात अनेक छोट्या छोट्या बेन्ज़ाइटन च्या मूर्ती ठेवल्यात. 

                 नवव्या दिवशीही सकाळी थोडं जवळपास फिरलो आणि थोडी खरेदी केली. दुपारी जेवून थोडा आराम करुन फिरायला निघालो. आधी टोकियो मधल्या 'Grandberry Garden' मध्ये गेलो. इथंही थोडी ट्युलिप्स आणि साकुराची खूप सारी झाडं होती. तुलनेनं कमी गर्दीचा शांत प्रसन्न परिसर होता. इथं थोडावेळ फिरुन आम्ही प्रत्यक्ष टोकियो स्टेशन वर गेलो. स्टेशन मधून बाहेर पडून जवळच असलेल्या एका प्रसिद्ध vegan restaurant मध्ये खास जपानी पदार्थ खायला गेलो. 'Ramen' हा जपानमधला नुडल्सचा अतिशय लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. Soup, noodles, toppings असं हे combination असतं. आम्ही Vegan च खात असल्यानं या रामेनमधले सगळे ingredients vegan च होते. पण बहुतांश जपानी लोक nonvegच खात असल्यानं रामेनही nonveg च बनवतात. Ramen, dumplings आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही परत टोकियो स्टेशन जवळ आलो. रात्रीचं टोकियो स्टेशनचं दृश्य फारच सुंदर दिसत होतं. सगळ्या इमारती विद्युत रोषणाईने झगमगत होत्या. स्टेशन आणि आसपासचा थोडा परिसर फिरुन आम्ही परत निघालो.

क्रमशः

  

  

  

  

  


  

  

  




Wednesday, April 17, 2024

साकुरा - १

           उगवत्या सूर्याचा देश एवढीच शालेय शिक्षणात झालेली जपानची ओळख. नंतर अवांतर वाचन, सिनेमा, टिव्ही सिरियल्स, आंतरजाल अशा माध्यमातून जपानची ओळख वाढली. कालांतरानं आमची पुतणी विवाहानंतर लगेच जपानला रहायला गेली. जावई नोकरीच्या निमित्तानं आधीपासूनच तिथे रहात होता. मग त्या दोघांमुळे जपान बद्दल अजून माहिती मिळू लागली. ते दोघं तिथं स्थिरस्थावर झाले आणि मग त्यांनी घरच्या सगळ्यांनाच जपान पहायला यायला सांगितलं.

             अर्थात सगळ्यांचं एकत्र जाणं जमणं थोडं अवघड होतं. अखेर एकदा सगळ्यांची मोट एकत्र बांधून जायचं ठरवलं. विमानाची तिकिटं खूप आधीच काढली. योग्य वेळी सगळ्यांचा व्हिसा आला. आणि मग प्रवासाची खरी तयारी करायची वेळ झाली. त्याचदरम्यान होळी पौर्णिमा होती म्हणून आम्ही दोघं गिरनारला जाऊन आलो. तिथून आलो आणि लगेचच आम्ही ज्या दिवसाची विमानाची तिकिटं काढली होती त्या दिवसापासूनच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात येणार असल्याचा मेल आला. झालं, आम्हा सगळ्यांचा उत्साह, आनंद क्षणात मावळला. कहर म्हणजे आमची तिकीटं ज्या दिवसाची होती त्याच दिवशी भारतात लाॅकडाऊन सुरु झालं आणि २२ मार्च २०२० ला आमचं एक स्वप्न अधूरं राहिलं. आमचं जाणं तर रहित झालंच पण ते दोघंही इथंच अडकले. अखेर सहा महिन्यांनी भारतानं सुरु केलेल्या विशेष विमानाने त्यांना जपानला घरी परत जायला मिळालं. 

               त्यानंतर परत आमचा सगळ्यांचा एकत्र जायचा योग येतच नव्हता. अखेर गेल्या गणेश चतुर्थी दरम्यान आम्ही दोघांनीच जपानला जायचं ठरवून विमानाची तिकटं काढली. बाकीच्यांना शक्य झालं तर नंतर तिकीटं काढायची असं ठरवलं. प्रत्यक्ष प्रवासाला काही महिने असल्याने तयारीचा प्रश्नच नव्हता. मग मार्च महिन्याच्या अखेरीस आम्हा दोघांचा व्हिसा आला. त्यानंतर प्रवासाची तयारी केली. व्हिसा प्रवासाच्या जेमतेम ७-८ दिवस आधी आला पण पूर्वानुभवामुळे आम्ही आधी काहीच तयारी केली नव्हती. त्या गडबडीत आमचं इतर फिरणंही सुरुच होतं. एप्रिल महिना सुरु झाला आणि दुसऱ्यादिवशीच दुपारी आम्ही साऱ्या तयारीनीशी जपानसाठी प्रस्थान केलं. फ्लाईट सायंकाळी असल्यानं दुपारीच घरुन निघालो. प्रवासासाठीचे सारे सोपस्कार पूर्ण करुन वेळेत विमान प्रवास सुरु झाला. आम्ही प्रत्यक्ष fly झालो आणि मन आनंदलं. कित्येक दिवसांचं एक अधुरं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं.

                   जपानचं घड्याळ आपल्यापेक्षा साडेतीन तासांनी पुढे आहे. त्यामुळे तिथल्या वेळेनुसार सकाळी आम्ही टोकियो मधल्या नरिता विमानतळावर उतरलो. जावई आम्हाला घ्यायला आला मग त्याच्याबरोबर दोन अडिच तास ट्रेनचा प्रवास करुन घरी पोहोचलो. आम्ही सकाळी विमानतळावर उतरण्याआधीपासूनच तिथे सगळीकडे पाऊस भुरभुरत होता. आधीच थंडी त्यात पाऊस त्यामुळे गारठा फारच वाढला होता. पण एकूण वातावरण मात्र अतिशय सुंदर होतं. घरी पोहोचून गप्पा, जेवण करुन थोडासा आराम केला. छोट्या नातवाशी खेळता खेळता सायंकाळ उलटली. मग आवरुन तयारी करुन आम्ही प्रवासाला निघालो.

                      आम्ही ट्रेन ने आधी टोकियोला गेलो आणि तिथून ट्रॅव्हल्सच्या बसने ९ तासांचा रात्रप्रवास करुन सकाळी लवकर क्योटोला पोहोचलो. आम्ही जपानला पोहोचलो तेव्हापासून दुसऱ्या दिवशी क्योटोला पोहोचेपर्यंत कमीअधिक पाऊस सुरुच होता. त्यामुळे स्थलदर्शनासाठी छत्री घेऊन फिरावं लागणार असंच वाटत होतं. आम्ही क्योटोला पोहोचून जवळच्या स्टेशन वर जाऊन तिथे लाॅकरमध्ये सामान ठेवून, फ्रेश होऊन लगेच ट्रेन ने स्थलदर्शनासाठी निघालो. आम्ही निघालो तोपर्यंत पाऊस पूर्ण थांबला होता. 

                    क्योटो जपानमधलं एक प्रमुख शहर. हे शहर बरीच वर्षं जपानची राजधानी होतं. अप्रतिम आणि अवर्णनीय निसर्गसौंदर्य लाभलेलं हे प्रमुख शहर आशियाई पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. धर्म, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योग या सर्वांचं हे केंद्रस्थान आहे. रेशीम आणि इतर वस्त्रांवरचं भरतकाम, मातीची भांडी, लाखेचं काम, सोन्याचांदीचे दागिने, बाहुल्या इ. साठी क्योटो प्रसिद्ध आहे. इथं अनेक बुध्दमंदिरं, बुध्दप्रतिमा, राजवाडे,उद्यानं आहेत. राष्ट्रीय संग्रहालयही प्रसिद्ध आहे. आता जरी जपानची राजधानी टोकियो असली तरी राज्यारोहण समारंभ अद्यापही इथेच होतात.

                    आमचं पहिलं स्थलदर्शन होतं ते म्हणजे 'Fushimi Inari Taisha'. क्योटो मध्ये फुशिमी-कू इथे असलेलं हे कामी इनारीचं प्रमुख shrine म्हणजेच पवित्र अवशेष असलेलं समाधीस्थळ.  समुद्र सपाटीपासून ७६४ फूट उंच इनारी पर्वत पायथ्याशी हे मंदिर वसलय.  इनारी हे तांदूळ आणि कृषीचे कामी( देवता) होते. तसंच व्यापारी लोकही इनारी यांना व्यवसाय संरक्षक मानतात. या प्रमुख मंदिरासह संपूर्ण जपानमध्ये तब्बल ३२,००० उप-देवस्थानं आहेत. या shrine च्या सुरक्षेचं काम कोल्हे करतात असं इथं मानलं जातं. त्यांचेही पुतळे इथं आहेत. मंदिराच्या सुरवातीलाच एक भव्य प्रवेशद्वार आहे. याला 'दाइची तोरी' असं म्हणतात. इथून आत गेल्यावर प्रत्यक्ष मंदिर आहे. या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे senbon torii.किंवा thousand gates. Senbon म्हणजे एक हजार आणि तोरी म्हणजे द्वार. लालकेशरी रंगाची ही हजार द्वारं म्हणजे जणू मोठा बोगदाच. इथे आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा पूर्ण झाली म्हणून अशी गेट्स बांधायची पध्दत आहे. 

                 हा सारा परिसर अतिशय सुंदर आहे. Shrine आणि thousand gates हे सारं फिरायला किमान दोन तास लागतात. हे सारं फिरुन बरोबर नेलेला घरी बनवलेला नाश्ता करुन आम्ही पुढे निघालो.

                दुसरं स्थळ होतं "Kiyomizudera". पूर्व क्योटोमधलं हे एक बुध्द मंदिर आहे. याची गणना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात करण्यात आलीय. या मंदिराची स्थापना ७७८ मध्ये 'नारा' काळात 'एनचिन शोनिन' यांनी केली. 'नारा' ही जपानची पूर्वीची राजधानी. 'एनरिक शोनिन' हे इथले पुजारी होते. त्यांना  ओटोवा झऱ्याजवळ मंदिर निर्माण करावं असा स्वप्न दृष्टांत झाला. त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. इथल्या इतर इमारती १६३३ मध्ये बांधण्यात आल्यात. मंदिराच्या पूर्ण बांधकामात एकाही खिळ्याचा वापर न करता पूर्ण लाकूडकाम करण्यात आलंय. 'कियोमिजु' चा अर्थ 'शुध्द किंवा पवित्र जल'. इथल्या या झऱ्यांवरुनच या मंदिराला हे नांव मिळालय. ओटोवा पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. हा पर्वत हिगाशियामा पर्वत शृंखलेचा एक भाग आहे.या मंदिरात उंच खांबावर आधारलेलं एक मोठं सभागृह आहे. इथून क्योटो शहराचं सुंदर दृश्य पहाता येतं. 

                मोठ्या सभागृहाच्या खालीच ओटोवा झरा आहे. इथून तीन स्वतंत्र जलधारा वहातात. या झऱ्याचं पाणी इथली लोकं मनोकामना पूर्ती साठी पितात. इथं 'ताइनाई मेगुरी' म्हणून एक अंधारी सुरंग आहे ज्यात बोधीसत्वाचं प्रतिनिधित्व केलं जातं. सभागृहाच्या समोरच्या बाजूलाही एक मोठं रेलिंग केलंय तिथूनही क्योटो शहर आणि तिथला प्रसिद्ध टाॅवर पहाता येतो. हा सारा परिसरही अतिशय सुंदर, हिरवाईने सजलाय. हे सारं पाहून आम्ही पुढे निघालो.

                  पुढचं स्थान होतं  'Nijo Jo Castle'. निजो कॅसल हा क्योटो मधला एक भव्य महाल आणि किल्ला आहे. हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात समाविष्ट आहे. ६८ एकर एवढ्या जागेत पसरलेल्या किल्ल्यात 'निनोमारु महाल', 'होनमारु महाल' यासहित काही उद्यानंही इथं आहेत. १६०१ मध्ये या कॅसलच्या निर्माणाचं कार्य सुरु झालं आणि १६२६ मध्ये पूर्ण झालं. या किल्ल्याला बाहेरच्या बाजूला दोन तटबंदी आणि त्याबाहेरुन पाणी असलेला मोठा खंदक आहे. आम्ही कॅसल बघून पुढे उद्यानात गेलो. आधीच्या दोन ठिकाणांप्रमाणेच इथंही साकुरा आणि मेपलची झाडं होती. अतिशय मोठं सुंदर उद्यान होतं. इथं साकुराच्या विविध जाती पहायला मिळतात. छोट्याशा पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी पूर्ण बहरलेले साकुराचे मोठमोठे वृक्ष आणि नुकतीच कोवळी पोपटी पालवी फुटलेले मेपल वृक्ष आणि इतर अनेक छोटीछोटी रंगबिरंगी फुलझाडं नयनरम्य दृश्य होतं. जपानला पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशीच सुंदर साकुरा पहायला मिळाला होता. हे सारं पाहून आम्ही क्योटोमध्येच मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. पारंपरिक एकमजली जपानी घरात आम्ही राहिलो. पारंपरिक पद्धतीचं असूनही अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असं ते घर होतं. रात्री भोजनासाठी आम्ही घरुनच करुन नेलेले पराठे आणि इतर पदार्थ खाल्ले. आणि मग गप्पा मारत, नातवाशी खेळत निद्राधीन झालो. 

                तिसऱ्या दिवशी सकाळी आवरुन मुक्कामाचं ठिकाण सोडून पुन्हा स्थलदर्शनासाठी निघालो. बसने  एका vegan restaurant जवळ पोहोचलो. तिथे नाश्ता करुन पुढे निघालो. 

                तिसऱ्या दिवसाचं पहिलं ठिकाण होतं 'Kinkakuji Temple' म्हणजे 'Golden Temple'. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात समाविष्ट असलेलं हे तीन मजली मंदिर आहे. प्राचीन क्योटोच्या १७ वारसास्थानापैकी एक हे मंदिर आहे. क्योटो मधलं हे झेन बुद्ध मंदिर आहे. 'किंकाकू-जी' हे सुवर्ण मंदिर क्योको-ची या तलावासमोर स्थित आहे. आजूबाजूला असलेली दाट हिरवाई, त्यात असलेलं सुवर्ण मंदिर आणि याचं तलावातील जळात पडणारं प्रतिबिंब, अप्रतिम दृश्य असतं. हे बौध्द मंदिर कितायामा बुंका या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं जी पारंपरिक खानदानी संस्कृती आणि नवीन सामुराई संस्कृतीचं मिश्रण आहे. मंदिर आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर आहे. हे सारं पाहून आम्ही पुढे गेलो.

                आमचं पुढचं स्थान होतं 'Aarasiyama'. क्योटोच्या पश्चिमेला असलेलं हे अराशियामा बांबू वन. अतिशय शांत आणि मनमोहक असं हे बांबू वन पर्यटकांमध्ये प्रिय आहे. हजारो बांबूच्या झाडांनी युक्त असं हे जंगल अनोखी अनुभूती देतं. अतिशय उंच अशा बांबूच्या हिरव्यागार फांद्यांचं सुरेख छत्र निर्माण होतं. वाऱ्याच्या झुळूकीने होणारी सरसराहट कानाला सुखावते. सोनेरी आणि हिरव्या रंगाची उधळण म्हणजे छायाचित्रणासाठी पर्वणीच. विशेष म्हणजे इथे 'मोसा' जातीचे खूप जाड आणि उंच बांबू आहेत. ही एक विशाल बांबूची प्रजाती आहे जी मूळ चीन आणि तैवानची आहे. ही बांबूची जात उंचीसाठी प्रसिद्ध आहे. यांची उंची ९० फुटांपर्यंत असते. अतिशय घनदाट अशा बांबूच्या जंगलात पर्यटकांना फिरण्यासाठी छान पायवाटा ठेवल्या आहेत. आम्ही हे सारं सौंदर्य अनुभवून जंगलाच्या दुसऱ्या भागात गेलो.

               बांबू वनाच्या दुसऱ्या भागात सगळीकडे अत्यंत सुंदर साकुरा बहरला होता. सारा परिसर रमणीय दिसत होता. खूप सारी साकुराची झाडं पाहून मन मोहोरलं. साकुराचं अप्रतिम दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून थोडावेळ तिथेच साकुरा अनुभवत बसलो. थोड्या वेळाने पुढे निघालो. खरंतर पाय निघत नव्हता पण पुढेही काही छान पहायला मिळणार होतं म्हणून निघालो. थोडं खाली उतरत गेलो आणि मुग्धपणे पहातच राहिलो. समोर सुंदरशी 'Katsura river' संथपणे वाहत होती. या नदीत नौकानयनाची सुविधा आहे. खूप लोक या नौकानयनाचा आनंद लुटत होते. अगदी एखाद्या चित्रात असावं तसं एका बाजूला चढत जाणारा मनमोहक साकुरा आणि त्याच्या पायथ्याशी वाहणारी कत्सुरा नदी असं सुरेख दृश्य होतं. या नदीवरचा Togetsukyo bridge तिथून पहाता येतो. खूपच सुंदर नजारा आहे इथला.

                 दिवसभर हे स्थलदर्शन करुन आम्ही परत क्योटो स्टेशन वर पोहोचलो. इथून आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. हा प्रवासही आमच्यासाठी खास होता. कारण आता आम्ही Shinkansen ने म्हणजेच Bullet Train ने प्रवास करणार होतो. ट्रेन ठरलेल्या वेळेत आली. आम्ही आसनस्थ झालो. ट्रेनचा आतला भाग, आसनव्यवस्था विमानासारखीच होती. फक्त ट्रेनच्या बंद खिडक्या थोड्या मोठ्या होत्या. ट्रेन सुरु झाली आणि अवघ्या काही क्षणातच जवळजवळ ताशी ३०० किमी. वेगाने धावू लागली. बसने आम्ही ९ तास प्रवास करुन क्योटोला पोहोचलो होतो. पण Shinkansen ने फक्त २ तासात आम्ही टोकियो ला पोहोचलो. खूप छान अनुभव होता. टोकियो हून परत दुसऱ्या ट्रेनने आम्ही घरी पोहोचलो. दिवसभर खूप प्रवास, फिरणं झालं होतं त्यामुळे घरी पोहोचल्यावर थोड्याच वेळात निद्राधीन झालो.

क्रमशः

  

  

  


  



  

  




कविता

जय बाबा बर्फानी - १

          '८ जुलै २०२५' आमच्यासाठी अजून एक विशेष दिवस. याच दिवशी आमची अजून एक इच्छा पूर्ण झाली. गतवर्षी काही कारणाने रहित करावी लागल...