Pages

Tuesday, April 30, 2024

प्रसाद

              चैत्र पौर्णिमा - हनुमान जन्मोत्सव. नेहमीप्रमाणे या पौर्णिमेला आम्ही गिरनारला निघालो. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी प्रवास सुरु केला. आमच्यासह सारे प्रवासी स्थानापन्न झाले आणि थोड्याच वेळात गप्पा सुरु झाल्या. काही वेळातच त्या दिवशी रोपवे बंद असल्याची बातमी कळली. वाईट हवामानामुळे रोपवे बंद ठेवण्यात आला आहे, उद्या पौर्णिमा आहे पण रोपवे सुरु राहिल की नाही अशी साशंकता भाविकांमध्ये निर्माण झाली. कारण हवामान खात्यानं वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यावेळी आमच्या बरोबर २१ जणं होते. मग रोपवे बंद असल्यास पूर्ण चढून उतरावं लागेल आणि रात्रीच्या पुढील ट्रेनच्या वेळेआधी परत यावं लागेल, अशी आमची चर्चा सुरु झाली. सगळ्यांच्या मनात किंचित काळजी निर्माण झाली पण मी मात्र एकदम शांत होते. 

                दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही जुनागढला उतरुन रिक्षाने तलेटीला मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. भरभर सारी आन्हिकं आवरुन दर्शनासाठी निघालो. हनुमान जन्मोत्सव असल्यानं लंबे हनुमानजीच्या मंदिरात गडबड सुरु होती. मारुतीरायाचं दर्शन घेऊन, प्रार्थना करुन पहिल्या पायरीशी गेलो. तिथं दर्शन घेऊन प्रार्थना करुन रोपवे जवळ गेलो. रोपवे नुकताच सुरु झाला होता. मात्र तो कधीही बंद होऊ शकतो त्यामुळे शक्य तितक्या लवकर दर्शन घेऊन परत या अशी सूचना तिथले अधिकारी देतच होते. वारा थोडा जास्तच असल्यानं रोपवे थोडा हळू सुरु होता. अंबाजी टुकवरही खूप जोराचा वारा होता. यावेळी दर्शनासाठी फार गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही लवकरच गुरुशिखरावर पोहोचलो. मंदिरात प्रवेश करुन नतमस्तक झालो. अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. मन प्रसन्न तृप्त झालं. अखंड धुनीचं दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि पुन्हा रोपवे जवळ आलो. मधल्या वेळेत वाऱ्याचं प्रमाण कमी झालं होतं. छान उन्हं यायला सुरुवात झाली होती. साहजिकच त्यामुळे रोपवे व्यवस्थित सुरु होता. कुठलाही त्रास न होता सर्वांना अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. खूपच लवकर आम्ही पायथ्याशी परतलो होतो. 

                 थोडा आराम करुन आम्ही २५ सीटर बसने सोमनाथला दर्शनासाठी निघालो. तासभर छान प्रवास झाला. अचानक बसच्या इंजिन मधून विचित्र आवाज यायला लागला. ड्रायव्हरने बस बाजूला थांबवली. नक्की काय झालंय याचा शोध सुरु झाला. थोडा अंदाज बांधत, काहीतरी करुन गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तर ती सुरुच होईना. मग फोनाफोनी सुरु झाली. जवळपास गॅरेजही नव्हतं. तलेटीहून दुसरी गाडी किंवा मेकॅनिक मागवण्याशिवाय पर्याय नव्हता. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी हळूहळू आमची काळजी वाढली. सोमनाथ दर्शन घेऊन रात्रीच्या ट्रेनने आम्हाला निघायचं होतं. या परिस्थितीत ते अशक्य होणार होतं अखेर सोमनाथ ला जाऊन परत जुनागढला न येता वेरावळ ते जुनागढ तिकिटं काढून वेरावळलाच ट्रेनमध्ये चढायचं असं ठरवलं. 

                  गाडी सुरु होईपर्यंत आम्ही साऱ्याजणी रस्ता दुभाजकामध्ये फिरु लागलो. छान गडद गुलाबी, केशरी अशा बोगनवेली फुलल्या होत्या. मधेमधे मोठी झाडंही होती. तळपत्या उन्हात तिथे सुखद गारवा आणि सावली होती. साहजिकच आम्ही सगळेच तिथेच फिरत, छायाचित्रं काढत होतो. असंच फिरत फिरत आम्ही चौघीजणी थोडं पुढे गेलो. तिथं एका झाडाचं खोड आडवं पसरत वर गेलं होतं. तिथं छान फोटो काढले आणि अचानक मला खजिना सापडला. एक नाजूकसं छोटंसं मोरपिस मला मिळालं. मी मोरपिस उचललं आणि माझ्या मुखातून 'दत्तगुरु' असे शब्द उमटले. अक्षरशः शब्दांपलिकडला आनंद झाला मला.

                   जानेवारी महिन्यात पौर्णिमेला गिरनारला जाण्याच्या ३-४ दिवस आधी मला 'मोरपिस घेऊन ये' असा संकेत मिळाला होता. माझं एक मन लगेच हो म्हणालं पण दुसरं मन म्हणत होतं भास झालाय तुला दत्तगुरुंना मोरपीस कशासाठी? माझी द्विधा मनस्थिती मी माझ्या सहचराला सांगितली तर तोही तसंच म्हणाला. मग आम्ही मोरपिस न घेताच गिरनारला गेलो. दर्शनासाठी मंदिरात पाऊल टाकलं आणि मी तिथंच खिळून उभी राहिले. श्री दत्तात्रेयांच्या दोन्ही बाजूला खूप सारी मोरपिसं ठेवली होतीच आणि अतिशय सुंदर असा भलामोठा मोरपिसांचा हार त्यांच्या गळ्यात घातलेला होता. काही क्षणांनी भानावर आल्यावर मला मोरपिस आणण्याचा संकेत का मिळाला होता त्याचं उत्तर मिळाल्याची जाणीव झाली. मी मोरपिस नेलं नाही म्हणून क्षमा मागून आणि पुढल्या पौर्णिमेला नक्की ते अर्पण करण्याची प्रार्थना करुन, दर्शन घेऊन मी मंदिरातून बाहेर आले.

                  फेब्रुवारी महिन्यातील पौर्णिमेलाच आम्ही नेपाळ यात्रेसाठी प्रस्थान केल्यानं गिरनार ला जाता आलं नाही. मग मार्च महिन्यात होळी पौर्णिमेला आम्ही गिरनार ला गेलो. तेव्हा मी आठवणीनौ मोरपिसं घेऊन गेले. मंदिरात गेल्यावर ती मोरपिसं तिथल्या पंडितजींच्या हातात दिली. त्यांनी किंचितसं स्मित करत त्या मोरपिसांनी पादुकांना स्पर्श केला, नंतर श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीला स्पर्श करुन अलवारपणे श्री दत्तात्रेयांच्या उजव्या बाजूला उभी करुन ठेवली. हे सारं पाहून मी श्री दत्तगुरुंकडे पाहिलं तर त्यांच्या मुखावरही स्मितहास्य विलसत असल्याचं मला जाणवलं आणि माझी सेवा रुजू झाल्यानं मला अतिशय आनंद तृप्तता वाटली. म्हणूनच हनुमान जन्मोत्सवादिवशी गिरनार दर्शन करुन सोमनाथला जाताना मला अवचित मिळालेलं हे छोटंसं मोरपिस म्हणजे माझ्यासाठी श्री दत्तगुरुंनी दिलेला विशेष प्रसाद होता. 

                  आम्ही नंतर जवळचंच एक पांढऱ्या तीळाचं सुंदर शेत बघून आलो. तिथे रहाणाऱ्या कुटुंबानं राखणीसाठी सांभाळलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाशीही खेळायला मिळालं. तासाभराने मेकॅनिक आला, गाडी दुरुस्त करुन आम्ही पुढे भालका तीर्थ, सोमनाथ दर्शन करुन वेरावळला पोहोचलो. तिथून ट्रेन ने पुढील प्रवासाला सुरुवात केली. 

                 सकाळी लवकर आम्ही गांधीनगरला पोहोचलो. १५-२० मिनिटांतच आमच्या बसेस आल्या आणि आम्ही अडिच तीन तासात आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी कर्नाळीला पोहोचलो. रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन जवळच असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नानाला गेलो. नर्मदा , गुप्त सरस्वती आणि ओरसंग अशा या तीन नद्यांचा इथे संगम आहे. आम्ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणार होतो. त्याआधी त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आलो होतो. स्नान करुन परत येऊन पूजेची सारी तयारी करुन परिक्रमेची संकल्प पूजा केली. नंतर जेवून परत दर्शनासाठी निघालो.‌ गरुडेश्वर, शुलपाणी दर्शन घेऊन भालोदला गेलो. तिथे पोहोचेपर्यंत तिथल्या सायंआरतीची वेळ झाली होती. मग प्रतापे महाहाजांशी थोडा संवाद साधून, आरती करुन, चहा पिऊन आम्ही परत मुक्कामी आलो. मुक्कामी पोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. 

                  जेमतेम २ तास झोपून परत आवरुन पहाटे ३ वाजता बसने तिलकवाडा इथं निघालो. अर्ध्या तासात तिलकवडा मधल्या वासुदेव कुटीर जवळ पोहोचलो. आम्ही इथून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सुरु करणार होतो. तिथल्या मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, कुटीरामध्ये जाऊन वासुदेवानंद सरस्वती यांचं दर्शन घेतलं. त्याचवेळी तिथल्या एका अधिकाऱ्यानी आम्हाला चहा पिऊन जायला सांगितलं. पण नेमका चहा संपला होता आणि परत तयार व्हायला थोडा वेळ लागणार होता म्हणून आम्ही 'राहुदे, चहा पुढे घेऊ' असं सांगून परिक्रमा सुरु केली. पुढं नर्मदा माता मंदिर आणि तिलकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन निघालो. आणि समोरच्या भल्या पहाटे सुरु असलेल्या एकमेव दुकानात माझा सहचर गेला. तिथं माझ्यासाठी अत्यंत गरजेची वस्तू फेविक्विक मिळालं आणि मनोमन मी नर्मदा मैयाला शतशः नमन केलं. आदल्या दिवशी रात्री भोजनासाठी थांबलो असताना माझ्या पायातल्या सॅंडलचा अर्धा तळभाग उकलला असल्याचं लक्षात आलं. मुक्कामी येईपर्यंत मी वाटेत कुठे फेविक्विक मिळत का पहायला याला सांगितलं. पण त्यानं दुर्लक्ष करत कुठही बस थांबवली नव्हती. त्यावेळी मी मैयाला प्रार्थना करुन शांत बसले होते. पण माझी मैयाला किती काळजी होती याची एवढ्या पहाटे मिळालेल्या फेविक्विकमुळे जाणिव झाली. अन्यथा वाटेत केव्हाही सॅंडल तुटल्यावर अनवाणी चालावं लागलं असतं हे नक्की. 

                     परिक्रमा सुरु झाली आणि लगेच एका ठिकाणी चहा मिळाला तो पिऊन आम्ही चालायला सुरुवात केली. थोड्या अंतरापर्यंत विद्युत दिव्यांची यावेळी व्यवस्था केलेली होती. दोन्ही बाजूने दाट केळीच्या बागा आणि मधून रस्त्यावरुन आम्ही चालत होतो. हवेतही छान गारवा होता. अतिशय शांत, प्रसन्न वातावरण होतं. पहाटे सव्वापाच वाजले आणि झुंजुमुंजू झालं. त्याआधीच आम्ही रस्त्यावरुन खाली उतरुन नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरुन चालायला सुरुवात केली होती. त्यामुळे हलक्या प्रकाशात मैयाचं रुप सुंदरच दिसत होतं. हळूहळू मावळतीला निघालेला चांदवा आणि त्याचं जळात दिसणारं प्रतिबिंब मन मोहवत होतं. बघता बघता अजून छान उजाडलं  आणि आमचीही उत्तर तटावरची परिक्रमा पूर्ण होत आली. पलिकडे दक्षिण तटावर जाण्यासाठी जिथून नावा सुटतात त्या ठिकाणाच्या जवळ आलो आणि थबकलोच. गतवर्षी पाहिलेली नंदीची भव्य मूर्ती, आशीर्वादाचा हात सारं तिथून गायब होतं. किनाऱ्यावर उंचावर हे सारं उभारण्यात आलं होतं. पण सप्टेंबर २०२३ मध्ये नर्मदा मैयाला आलेल्या प्रचंड पूरात हे सारं क्षतिग्रस्त होऊन नष्ट झालं होतं. पूराच्या पातळीचा अंदाज आला आणि  मन हळहळलं. 

                  नावेतून मैया पार करुन दक्षिण तटावर पोहोचलो. नावेतून जाताना आमच्या बरोबर असलेलं मैयाजल थोडं त्या जळात ओतून तिथलं जल भरुन घेतलं याला तीर्थमिलन असं म्हणतात.‌ पलिकडे पोहोचल्यावर इथं तीर्थेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरात आपली अर्धी परिक्रमा पूर्ण झाली म्हणून आपल्या बरोबरचं मैयाजल तीर्थेश्वराला चढवायचं असतं. मंदिरात जाण्यासाठी १५-२० च पण खड्या पायऱ्या आहेत. त्या चढताना मला जोरदार ठेच लागली. पायाच्या अंगठ्याचं नख पिंजून रक्त आलं. कळ सहन करत मी कशीबशी वर गेले. लगेच सोफ्रामायसिन, बॅण्ड एड मिळालं ते लावून मी दर्शन घ्यायला गेले आणि कळलं की हे तीर्थेश्वराचं मंदिरही पूरात वाहून गेलंय.  तिथे रहाणाऱ्या लोकांनी त्यातली शिवपिंडी वाचवून नुसतीच उघड्या जागी दर्शनासाठी ठेवलीय. मंदिरही पूरात गेल्याचं ऐकून खूप वाईट वाटलं. पण तो पूरच एवढा मोठा होता की त्यात अनेक गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं. पै पै जमवून उभे केलेले अनेक संसार उध्वस्त झाले होते. ज्या नर्मदा मैयाची तिथले लोकं पूजा, सेवा करतात त्याच मैयाच्या पूरात त्यांचे संसार उध्वस्त झाले होते. नंतर असंख्य ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरु झाले आणि सर्वांना सावरण्याचा प्रयत्न केला गेला. सारा संसार क्षणात वाहून गेल्यावर खरंतर सर्वसामान्य व्यक्ती खचून गेली असती, प्रचंड चिडचिड केली असती. मात्र सोशल मीडियावर नर्मदालयाची याबद्दलची एक पोस्ट मी वाचली आणि अक्षरशः निःशब्द झाले. त्यांनी पूरग्रस्तांना मदत करत असताना सहज एका महिलेला विचारलं ज्या मैयाची तुम्ही एवढी पूजा, सेवा करता तिने तुमचं सर्वस्व नष्ट केलं तर त्यावर तिनं अतिशय सुंदर उत्तर दिलं, ' नाही, मैयानं तर आमचा तुटकाफुटका संसार नेला आणि आम्हाला संपूर्ण नवीन संसार दिला '. आपल्यासारख्या अत्यंत सुरक्षित, सुखासीन आयुष्य जगणाऱ्या कुणाच्या तरी मनात एवढा उदात्त विचार आला असता का? यातूनच नर्मदा किनाऱ्यावर पिढ्यानुपिढ्या रहाणाऱ्या लोकांची मैयावरची अपार श्रद्धा, प्रेम सहज जाणवतं. 

                      तीर्थेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही परत चालायला सुरुवात केली. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत मार्गात कुठेही कुणालाही विश्रांतीसाठी किंचितही थांबावं लागलं नाही. खरंतर यावेळी आमच्या बरोबर काही ज्येष्ठ मंडळीही होती. पण सर्वांची मैयावरची श्रध्दा, उत्साह आणि क्षमता कौतुकास्पद होती. मार्गात ठिकठिकाणी सेवा म्हणून देण्यात येणारा प्रसाद थोडासा घेत आम्ही चालतच होतो. चहा, सरबत, ताक, शेव गाठी, पुरी भाजी, खिचडी असे अनेक पदार्थ सेवा म्हणून परिक्रमावासींना इथले रहिवासी आवर्जून देतात. तिलकवाडा ते रामपुरा हा परिक्रमा मार्ग थोडा रस्त्याने आणि थोडा किनाऱ्याने आहे. पण  पुढचा रामपुरा ते तिलकवाडा हा मार्ग रस्त्यानेच आहे. मार्ग संपताना अखेरच्या सीताराम बापूंच्या आश्रमातून खाली उतरुन किनारी जावं लागतं. त्या आश्रमात पोहोचल्यावर ५-१० मिनिटं बसून आम्ही पुढे निघालो. खाली उतरुन मैयाच्या कोरड्या पात्रातून दगडगोट्यांमधून चालायला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर अचानक तिथल्या शांततेची जाणिव झाली. आणि लक्षात आलं की पलिकडल्या तीरावर जाणाऱ्या नावांचा बिलकुल आवाज येत नाहीय , कुठे दिसतही नाहीयेत. मग दिसला तो पुलसदृश्य भाग. जसजसे पुढे गेलो तसं दिसलं की खरच तिथं तात्पुरता पुल बांधलाय. गतवर्षी होडीतून पलिकडे जाताना पुलाचं काम सुरु असल्याचं दिसलच होतं. पण अजून हा पुल पक्का नाहीय. पुलावरुन चालत मैया पार करुन परत तिलकवाड्याला पोहोचलो. 

                स्नानासाठी थोडं बाजूला मैयाच्या पात्रात उतरणार इतक्यात तिथे असलेल्या पोलिसांनी अडवलं आणि स्नानासाठी नर्मदेत उतरायला प्रतिबंध केला. मग फक्त प्रोक्षण करुन  बाटलीत जल भरुन घेतो असं पोलिसांना सांगून आम्ही पाण्याजवळ गेलो. प्रोक्षण करुन जल भरुन घेऊन परत वरती वासुदेव कुटीरजवळ पोहोचलो. मारुती मंदिरात दर्शन घेऊन बाजूच्या महादेव मंदिरात जल चढवलं आणि परिक्रमा पूर्ण करुन बाहेर आलो. लगेच तिथेच कन्यापूजन केलं. पुन्हा बसने मुक्कामी आलो संकल्प पूर्तीची पूजा केली आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची सांगता केली. नंतर कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन भोजन प्रसाद घेतला. थोडा आराम करुन परत फिरायला निघालो. नाग मंदिर, नानी मोटी पनौती आणि शनैश्वर मंदिर पाहून स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेलो. स्टॅच्यू आणि सारा परिसर, बागा आणि नंतर थोडा लेझर शो पाहून रात्री मुक्कामी गेलो. 

                       चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून चंपानेरला पोहोचलो. तिथून पावगडच्या पायथ्याशी गेलो. इथंही देवी सतीमातेचं शक्तीपीठ आहे.गतवर्षी प्रमाणेच यावेळीही खराब हवामानामुळे रोपवे सुरु रहाण्याची शक्यता कमी होती. मंदिरात जाताना रोपवे ने वर पोहोचलो. थोड्या पायऱ्या चढल्या आणि पावसाला सुरुवात झाली. बऱ्यापैकी मोठा पाऊस होता त्यामुळे थोडं  भिजलोच. वारा आणि पाऊस यामुळे आता आपण परत जाईपर्यंत रोपवे बंद होणार असं सगळ्यांना वाटत होतं. का कुणास ठाऊक पण इथंही मी शांत होते रोपवे सुरु रहाणार याची मला अगदी खात्री वाटत होती. महाकाली मातेचं आम्ही दर्शन घेऊन पावसातच थोडं फिरुन पायऱ्या उतरायला सुरुवात केली. पायऱ्या उतरुन येईपर्यंत पाऊस थांबून उन्ह पडायला सुरुवात झाली. साहजिकच रोपवे व्यवस्थित सुरु होता. या गडबडीत यावेळीही आम्हाला दुपारच्या ट्रेन साठी अहमदाबाद ला जायला जमणार नसल्यानं आमचा बोर्डिंग पाॅईंट आम्ही बदलला होता. त्यानुसार वडोदराला पोहोचून आम्ही वंदे भारत ने आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

             'श्री दत्तात्रेय' आणि 'नर्मदा मैया' यांच्या कृपेने आमचं गिरनार दर्शन आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अतिशय सुरेख रित्या पूर्ण झाली होती. 

|| जय गिरनारी ||         || नमामि देवी नर्मदे ||


- स्नेहल मोडक


  





No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...