चौथ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन दुपारच्या भोजनासाठी डबा करुन घेऊन आम्ही स्थलदर्शनासाठी निघालो. ट्रेन ने आम्ही पोहोचलो 'Shibuya' स्थानकावर. 'Shibuya Scramble Crossing' हे जगातलं सर्वात व्यस्त पादचारी क्राॅसिंग आहे. जिथे एकाचवेळी ३,००० लोकं रस्ता ओलांडतात. याची तुलना न्युयॉर्कच्या Time Square बरोबर केली जाते. Shibuya स्टेशनच्या बाहेरच हे सर्वात मोठं क्राॅसिंग आहे. याच स्टेशनच्या समोर 'Hachiko' नावाच्या इमानी श्वानाचा पुतळा उभारण्यात आलाय. ह्या श्वानाचं त्याच्या मालकावर इतकं प्रेम होतं की रोज तो मालकाची स्टेशन बाहेर वाट पहायचा आणि मालकाबरोबरच घरी परतायचा. मालकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतरही Shibuya स्टेशनवर तो सातत्यानं मालकाची वाट पहात असे अगदी तो मृत्युमुखी पडेपर्यत. या इमानदार श्वानाच्या स्मरणार्थ त्याचा पुतळा उभारलाय. पर्यटक 'हाचिको' चा हा पुतळा पहाण्यासाठी आवर्जून येतात. हे सारं पाहून आम्ही पुढे गेलो.
'Yoyogi park' हे टोकियो मधलं सर्वात लोकप्रिय पार्क आहे. आम्ही या उद्यानात पाऊल टाकलं आणि मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिलो. ज्या गोष्टीसाठी मला जपानला जायची आस लागली होती ती गोष्ट इथे भरभरून माझ्या समोर आली होती. जपानचा अतिशय प्रसिद्ध असा साकुरा महोत्सव (Chery Blossom) नुकताच सुरु झाला होता. आणि या उद्यानात या साकुराची अनेक झाडं होती. पर्णहिन मोठे वृक्ष आणि त्यावर फक्त नाजुक पांढऱ्या, गुलाबी रंगाची गुच्छानी लगडलेली साकुराची फुलं आणि वर निळंशार आकाश, अतिशय अप्रतिम मनोरम दृश्य होतं.
Cherry Blossom म्हणजेच साकुरा महोत्सवासाठी जपान जगभरात प्रसिद्ध आहे. साकुरा साधारण मार्च महिन्याच्या मध्यापासून फुलायला सुरुवात होते आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याचा बहर असतो. मात्र इथलं हवामान सतत बदलत असतं. त्यामुळे जर पाऊस पडला तर मात्र ही बहरलेली साकुराची नाजूक फुलं वाऱ्यापावसाने लगेच गळून पडतात. पण साधारणपणे महिनाभर कुठे न कुठे साकुरा पहायला मिळतोच. साकुरा पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक जपानमध्ये येतात. जपानमध्ये या काळात 'हानामी'चं आयोजन केलं जातं. जपानच्या हवामान खात्याकडून चेरीच्या फुलांच्या बहराचा अंदाज वर्तविण्यात येतो. चेरीच्या फुलांचा बहर अल्पजीवी अगदी १-२ आठवडे टिकतो त्यामुळे त्या काळातच 'हानामी' पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. 'हानामी' ही जपानमध्ये फुलांचा बहर पहाण्याचा आनंद घेण्याची एक परंपरा आहे. जपानी भाषेत 'हाना' म्हणजे फुलं आणि 'मी' म्हणजे पाहणे. साकुराच्या बहरलेल्या वृक्षाखाली दिवसा किंवा रात्री पार्टी करुन 'हानामी' साजरी करतात.
आम्ही उद्यानात प्रवेश करताच बहरलेला साकुरा पाहून मन मोहोरलंच. याआधी दोन दिवस साकुराचा बहर आम्ही पहातच होतो. पण इथे साकुराशिवाय दुसरं काही नव्हतंच. जिथं पहावं तिथं नाजूक पुष्पसंभारानी खुललेली झाडंच दिसत होती. वाऱ्याच्या झुळूकीनं फुलांच्या पाकळ्यांचा हलका वर्षावही सुरु होता. मन अगदी प्रसन्न, उल्हसित झालं होतं. पर्यटकांची इथं गर्दी असूनही परिसर खूप मोठा असल्यानं मोकळं फिरता येत होतं. थोडं फिरुन आम्हीही एका ठिकाणी चटई घालून बैठक मारुन बसलो. आणि घरुन करुन नेलेल्या पदार्थांचा गप्पा मारत, साकुराचं सुंदर दृश्य पहात आस्वाद घेतला. कितीही पाहिलं, छायाचित्रं काढली तरी मन भरतच नव्हतं. त्या सुंदर वातावरणात, साकुराच्या संगतीत किती वेळ गेला कळलंच नाही. अखेर सायंकाळ होत आली आणि आम्ही परत निघालो.
पाचव्या दिवशी सकाळी थोडं आरामात आवरलं. नाश्ता करुन खरेदीसाठी बाहेर गेलो. थोडीफार खरेदी करुन परत आलो. जेवून थोडा आराम करुन फिरायला निघालो. आताचं स्थलदर्शन होतं 'Yokohama Landmark Tower'.
योकोहामा हे जपानमधलं दुसरं सर्वात मोठं शहर. 'कनागावा' प्रांताची 'योकोहामा' राजधानी आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेली नगरपालिका. ग्रेटर टोकियोमधलं योकोहामा हे आर्थिक, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक केंद्र आहे. हे संपूर्ण शहर इथल्या 'Landmark Tower' वरुन पहाता येतं.
Landmark Tower ही ७२ मजली इमारत आहे. या इमारतीमधले ४८ मजल्यांवर दुकानं, रेस्टॉरंट, क्लिनिक आणि कार्यालयं आहेत. त्यावर ४९ ते ७० एवढे मजले फाईव्ह स्टार हॉटेल आहे. त्यातल्या ६९ व्या मजल्यावर 'Sky Garden' आहे. इथून ३६० डिग्री मधून संपूर्ण शहराचं दृश्य आणि एकदम निरभ्र आकाश असताना 'माऊंट फुजी' पहाता येतो. आम्ही या Sky Garden मध्ये पोहोचलो. एवढ्या उंचावरुन सारं शहर पहाणं हा एक वेगळाच अनुभव होता. साऱ्या शहराचं अतिशय विहंगम दृश्य दिसत होतं. खाली असलेलं 'Yokohama bay' तर फारच अप्रतिम दिसत होतं. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती. त्यामुळे दिवसाउजेडी आम्हाला योकोहामा शहर पहायला मिळालं. थोड्यावेळाने उन्हं कलली आणि सांजवायला लागलं. हळूहळू शहर विद्युत रोषणाईने झगमगू लागलं. हळूहळू होणारा हा सुंदर दृश्यबदल नजरेत आणि कॅमेरात साठवत आम्ही बराच वेळ तिथे बसलो होतो. त्या वर्तुळाकार गार्डन मध्ये पर्यटकांसाठी आसनव्यवस्था ही आहे. छोटीमोठी दुकानंही आहेत. हे सारं पहाण्यासाठी पर्यटकांची इथे रोजच गर्दी असते.
सहाव्या दिवशी सकाळी आम्ही 'Showa Kinen Park' बघायला गेलो. हे टोकियो मधलं ४०८ एकरमध्ये पसरलेलं सर्वात मोठं पार्क आहे. Tulips, Cherry Blossom, Canola Flowers आणि Ginkgo Tree, यासाठी हे पार्क प्रसिद्ध आहे. मार्च-एप्रिल आणि डिसेंबर महिन्यात पर्यटकांची अतिशय गर्दी असते. या भव्य पार्कमध्ये वेगवेळे भाग आहेत. सर्वात आधी आम्ही गेलो ट्युलिप गार्डनमध्ये. त्या भागात शिरलो आणि अगदी नयनरम्य दृश्य नजरेसमोर आलं. खूप मोठा परिसर ट्युलिपच्या रंगबिरंगी फुलांनी सजला होता. विविध जातींची ट्युलिपची फुलं तिथे उमलली होती. एका ठिकाणी मोठा तलाव होता आणि त्याच्या बाजूनेही ट्युलिप्स फुलले होते. ती फुलं आणि त्यांचं पाण्यातलं प्रतिबिंब खूप सुंदर दिसत होतं. नजर जाईल तिथपर्यंत सारा परिसर रंगबिरंगी दिसत होता. बराचवेळ तिथे थांबून सारं पाहून आम्ही पुढे दुसऱ्या भागात प्रवेश केला आणि थबकलोच. समोर अनेक मोठमोठे वृक्ष साकुरानं अंगोपांगी बहरले होते. इतक्या प्रचंड प्रमाणात ती नाजूक फुलं फुलली होती की साऱ्या वृक्षांवर हिमवर्षाव झाल्यासारखं वाटत होतं. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती इवली पांढरी, गुलाबी फुलं फारच खुलून दिसत होती. अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटावं इतकं अप्रतिम दृश्य होतं. आधी पाहिलेल्या 'Yoyogi Park' पेक्षाही इथल्या साकुरा वृक्षांची संख्या जास्त होती. एका बाजूला ट्युलिप्स आणि दुसऱ्या बाजूला साकुरा, आम्ही अक्षरशः मंत्रमुग्धच. इथंही आम्ही साकुराच्या झाडाखाली बसून भोजनाचा आस्वाद घेतला. माझं तर हा अप्रतिम नजारा पाहूनच पोट भरलं होतं. पण कितीही पाहिलं,फिरलं तरी मन मात्र भरत नव्हतं. सतत तेच पहात रहावंसं वाटत होतं. खूप फिरुन आम्ही पुढे तिथल्याच जापनीज गार्डनमध्ये गेलो. हे गार्डन 'बोन्साय ट्री' साठी प्रसिद्ध आहे. 'बोन्साय' ही जपानी लोकांची पारंपरिक कला आहे. 'बोन' म्हणजे कुंडी आणि 'सई' म्हणजे झाड. कुंडीत लावलेलं मोठ्या वृक्षाचं लघुरुप. सतत छाटणी करुन त्या वृक्षाला लघुरुपातच वाढवणं ही एक कला आहे. या वृक्षाला मोठ्या वृक्षासारखीच फुलं, फळं येतात. इथल्या गार्डन मध्ये अशी बरीच बोन्साय पहायला मिळतात. त्यात अगदी ४०० वर्षाची बोन्साय तिथं आहेत. बरीचशी १५०-२०० वर्षांची बोन्साय आहेत. एवढी वर्षं अशी झाडं जपणं जगवणं हे फारच कठीण काम आहे. मात्र इथली लोकं हे काम अतिशय काळजीपूर्वक आणि प्रेमानं करतात म्हणूनच एवढी वर्षं ही बोन्साय जिवंत आणि आवर्जून पहाण्यासारखी आहेत. हे संपूर्ण पार्क फिरण्यात दिवस कधी सरला कळलही नाही.
सातव्या दिवशी आम्ही जरी जपानमध्ये असलो तरी आपला गुढीपाडवा आणि नववर्षाची सुरुवात होती. या दिवशी बाहेर फिरायला जाणं जरा कठीणच होतं. पहाटेपासूनच कमी अधिक पाऊस सुरु होता. गारठाही फारच वाढला होता. आमच्या तिथल्या वास्तव्यात तापमान अगदी १० ते १७ डिग्री एवढंच होतं. त्यात पावसामुळे थंडी अजूनच वाढत होती. रोज रात्री heater लावत होतोच पण आज दिवसाही त्याची गरज वाटत होती. आमचं दुपारचं जेवण झालं आणि पाऊस कमी होत थोड्या वेळाने पूर्ण थांबला. पण त्यादिवशी उशीर झाला असल्यानं स्थलदर्शन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे राहिलेली बरीचशी खरेदी त्यादिवशी केली.
आठव्या दिवशी पाऊस बिलकुल नसल्यानं आम्ही सकाळीच स्थलदर्शनासाठी निघालो. आधी 'Kamakura Buddha Temple' पहायला गेलो. इथे जपानमधली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 'अमिदा' बुद्धाची कांस्य प्रतिमा आहे. ११.३ मीटर उंची आणि १२१ किलो वजनाची ही 'अमिदा' बुद्ध मूर्ती आहे. दहा वर्षांच्या अथक परिश्रमातून साकारलेली भव्य लाकडी बुद्ध मूर्ती १२४८ पर्यंत इथे होती. पण त्यावेळच्या वादळात ही मूर्ती आणि ती जिथे स्थापन केली होती तो हाॅल सारच क्षतिग्रस्त झालं. त्यानंतर सध्याची कांस्य मूर्ती बनवण्यात आली. त्यानंतर आलेल्या एका वादळात नंतरचा हाॅलही उध्वस्त झाला. मग मात्र ती मूर्ती नुसतीच तशीच ठेवण्यात आलीय. ही मूर्ती आतून पोकळ असल्यानं आतमध्ये जाऊन अतंर्गत भाग पहाता येतो. आम्हीही हा अंतर्भाग पाहून आलो. हा परिसरही मोठा आणि हिरवाईने फुललेला आहे. अर्थातच साकुराचीही झाडं आहेतच. परिसरही खूप मोठा शांत आहे. इथेच भोजन करुन आम्ही आसपास सगळीकडे फिरलो.
आमचं यानंतरचं स्थलदर्शन होतं 'Hasedera'. हेही एक बुध्द मंदिर आहे. इथं प्रवेश केल्यावर लगेचच समोर एक छोटंसं तळं समोर येतं. सुंदर अशा तळ्यात आजुबाजुच्या झाडांची प्रतिमा सुंदर दिसतेच. त्याचबरोबर या तळ्यात 'Koi Fish' आहेत. हे विविध रंगी मजबूत जड देहाचे मासे आहेत. जपानी भाषेत 'कोई' चा अर्थ प्रेम आणि मैत्री असा आहे. हे मासे पहाणं हा एक वेगळाच आनंद आहे.
इथली बुद्ध मूर्ती ही जपानमधल्या सर्वात मोठ्या लाकडी मुर्तीपैंकी एक ही 'कन्नन' बुध्दाची मूर्ती आहे. ९.१८ मीटर उंचीची ही मूर्ती कापराच्या वृक्षापासून बनवण्यात आली असून तिला सुवर्ण मुलामा देण्यात आलाय. हे मंदिर दोन स्तरांवर बांधण्यात आलंय. त्यात एक गुंफाही आहे तिला 'Benten Kutsu' म्हणतात. या वळणदार गुंफेत समुद्री देवता आणि सात भाग्यशाली देवतांची प्रमुख देवी 'Benzaiten' हिच्या विविध स्वरुपात मूर्ती आहेत. 'बेन्ज़ाइटन' देवी म्हणजेच आपल्या 'देवी सरस्वती' चं जपानी रुप. दगडात कोरलेल्या या मूर्ती आहेत. गुंफेच्या एका भागात अनेक छोट्या छोट्या बेन्ज़ाइटन च्या मूर्ती ठेवल्यात.
नवव्या दिवशीही सकाळी थोडं जवळपास फिरलो आणि थोडी खरेदी केली. दुपारी जेवून थोडा आराम करुन फिरायला निघालो. आधी टोकियो मधल्या 'Grandberry Garden' मध्ये गेलो. इथंही थोडी ट्युलिप्स आणि साकुराची खूप सारी झाडं होती. तुलनेनं कमी गर्दीचा शांत प्रसन्न परिसर होता. इथं थोडावेळ फिरुन आम्ही प्रत्यक्ष टोकियो स्टेशन वर गेलो. स्टेशन मधून बाहेर पडून जवळच असलेल्या एका प्रसिद्ध vegan restaurant मध्ये खास जपानी पदार्थ खायला गेलो. 'Ramen' हा जपानमधला नुडल्सचा अतिशय लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. Soup, noodles, toppings असं हे combination असतं. आम्ही Vegan च खात असल्यानं या रामेनमधले सगळे ingredients vegan च होते. पण बहुतांश जपानी लोक nonvegच खात असल्यानं रामेनही nonveg च बनवतात. Ramen, dumplings आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही परत टोकियो स्टेशन जवळ आलो. रात्रीचं टोकियो स्टेशनचं दृश्य फारच सुंदर दिसत होतं. सगळ्या इमारती विद्युत रोषणाईने झगमगत होत्या. स्टेशन आणि आसपासचा थोडा परिसर फिरुन आम्ही परत निघालो.
क्रमशः


















No comments:
Post a Comment