उगवत्या सूर्याचा देश एवढीच शालेय शिक्षणात झालेली जपानची ओळख. नंतर अवांतर वाचन, सिनेमा, टिव्ही सिरियल्स, आंतरजाल अशा माध्यमातून जपानची ओळख वाढली. कालांतरानं आमची पुतणी विवाहानंतर लगेच जपानला रहायला गेली. जावई नोकरीच्या निमित्तानं आधीपासूनच तिथे रहात होता. मग त्या दोघांमुळे जपान बद्दल अजून माहिती मिळू लागली. ते दोघं तिथं स्थिरस्थावर झाले आणि मग त्यांनी घरच्या सगळ्यांनाच जपान पहायला यायला सांगितलं.
अर्थात सगळ्यांचं एकत्र जाणं जमणं थोडं अवघड होतं. अखेर एकदा सगळ्यांची मोट एकत्र बांधून जायचं ठरवलं. विमानाची तिकिटं खूप आधीच काढली. योग्य वेळी सगळ्यांचा व्हिसा आला. आणि मग प्रवासाची खरी तयारी करायची वेळ झाली. त्याचदरम्यान होळी पौर्णिमा होती म्हणून आम्ही दोघं गिरनारला जाऊन आलो. तिथून आलो आणि लगेचच आम्ही ज्या दिवसाची विमानाची तिकिटं काढली होती त्या दिवसापासूनच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात येणार असल्याचा मेल आला. झालं, आम्हा सगळ्यांचा उत्साह, आनंद क्षणात मावळला. कहर म्हणजे आमची तिकीटं ज्या दिवसाची होती त्याच दिवशी भारतात लाॅकडाऊन सुरु झालं आणि २२ मार्च २०२० ला आमचं एक स्वप्न अधूरं राहिलं. आमचं जाणं तर रहित झालंच पण ते दोघंही इथंच अडकले. अखेर सहा महिन्यांनी भारतानं सुरु केलेल्या विशेष विमानाने त्यांना जपानला घरी परत जायला मिळालं.
त्यानंतर परत आमचा सगळ्यांचा एकत्र जायचा योग येतच नव्हता. अखेर गेल्या गणेश चतुर्थी दरम्यान आम्ही दोघांनीच जपानला जायचं ठरवून विमानाची तिकटं काढली. बाकीच्यांना शक्य झालं तर नंतर तिकीटं काढायची असं ठरवलं. प्रत्यक्ष प्रवासाला काही महिने असल्याने तयारीचा प्रश्नच नव्हता. मग मार्च महिन्याच्या अखेरीस आम्हा दोघांचा व्हिसा आला. त्यानंतर प्रवासाची तयारी केली. व्हिसा प्रवासाच्या जेमतेम ७-८ दिवस आधी आला पण पूर्वानुभवामुळे आम्ही आधी काहीच तयारी केली नव्हती. त्या गडबडीत आमचं इतर फिरणंही सुरुच होतं. एप्रिल महिना सुरु झाला आणि दुसऱ्यादिवशीच दुपारी आम्ही साऱ्या तयारीनीशी जपानसाठी प्रस्थान केलं. फ्लाईट सायंकाळी असल्यानं दुपारीच घरुन निघालो. प्रवासासाठीचे सारे सोपस्कार पूर्ण करुन वेळेत विमान प्रवास सुरु झाला. आम्ही प्रत्यक्ष fly झालो आणि मन आनंदलं. कित्येक दिवसांचं एक अधुरं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं.
जपानचं घड्याळ आपल्यापेक्षा साडेतीन तासांनी पुढे आहे. त्यामुळे तिथल्या वेळेनुसार सकाळी आम्ही टोकियो मधल्या नरिता विमानतळावर उतरलो. जावई आम्हाला घ्यायला आला मग त्याच्याबरोबर दोन अडिच तास ट्रेनचा प्रवास करुन घरी पोहोचलो. आम्ही सकाळी विमानतळावर उतरण्याआधीपासूनच तिथे सगळीकडे पाऊस भुरभुरत होता. आधीच थंडी त्यात पाऊस त्यामुळे गारठा फारच वाढला होता. पण एकूण वातावरण मात्र अतिशय सुंदर होतं. घरी पोहोचून गप्पा, जेवण करुन थोडासा आराम केला. छोट्या नातवाशी खेळता खेळता सायंकाळ उलटली. मग आवरुन तयारी करुन आम्ही प्रवासाला निघालो.
आम्ही ट्रेन ने आधी टोकियोला गेलो आणि तिथून ट्रॅव्हल्सच्या बसने ९ तासांचा रात्रप्रवास करुन सकाळी लवकर क्योटोला पोहोचलो. आम्ही जपानला पोहोचलो तेव्हापासून दुसऱ्या दिवशी क्योटोला पोहोचेपर्यंत कमीअधिक पाऊस सुरुच होता. त्यामुळे स्थलदर्शनासाठी छत्री घेऊन फिरावं लागणार असंच वाटत होतं. आम्ही क्योटोला पोहोचून जवळच्या स्टेशन वर जाऊन तिथे लाॅकरमध्ये सामान ठेवून, फ्रेश होऊन लगेच ट्रेन ने स्थलदर्शनासाठी निघालो. आम्ही निघालो तोपर्यंत पाऊस पूर्ण थांबला होता.
क्योटो जपानमधलं एक प्रमुख शहर. हे शहर बरीच वर्षं जपानची राजधानी होतं. अप्रतिम आणि अवर्णनीय निसर्गसौंदर्य लाभलेलं हे प्रमुख शहर आशियाई पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. धर्म, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योग या सर्वांचं हे केंद्रस्थान आहे. रेशीम आणि इतर वस्त्रांवरचं भरतकाम, मातीची भांडी, लाखेचं काम, सोन्याचांदीचे दागिने, बाहुल्या इ. साठी क्योटो प्रसिद्ध आहे. इथं अनेक बुध्दमंदिरं, बुध्दप्रतिमा, राजवाडे,उद्यानं आहेत. राष्ट्रीय संग्रहालयही प्रसिद्ध आहे. आता जरी जपानची राजधानी टोकियो असली तरी राज्यारोहण समारंभ अद्यापही इथेच होतात.
आमचं पहिलं स्थलदर्शन होतं ते म्हणजे 'Fushimi Inari Taisha'. क्योटो मध्ये फुशिमी-कू इथे असलेलं हे कामी इनारीचं प्रमुख shrine म्हणजेच पवित्र अवशेष असलेलं समाधीस्थळ. समुद्र सपाटीपासून ७६४ फूट उंच इनारी पर्वत पायथ्याशी हे मंदिर वसलय. इनारी हे तांदूळ आणि कृषीचे कामी( देवता) होते. तसंच व्यापारी लोकही इनारी यांना व्यवसाय संरक्षक मानतात. या प्रमुख मंदिरासह संपूर्ण जपानमध्ये तब्बल ३२,००० उप-देवस्थानं आहेत. या shrine च्या सुरक्षेचं काम कोल्हे करतात असं इथं मानलं जातं. त्यांचेही पुतळे इथं आहेत. मंदिराच्या सुरवातीलाच एक भव्य प्रवेशद्वार आहे. याला 'दाइची तोरी' असं म्हणतात. इथून आत गेल्यावर प्रत्यक्ष मंदिर आहे. या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे senbon torii.किंवा thousand gates. Senbon म्हणजे एक हजार आणि तोरी म्हणजे द्वार. लालकेशरी रंगाची ही हजार द्वारं म्हणजे जणू मोठा बोगदाच. इथे आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून किंवा पूर्ण झाली म्हणून अशी गेट्स बांधायची पध्दत आहे.
हा सारा परिसर अतिशय सुंदर आहे. Shrine आणि thousand gates हे सारं फिरायला किमान दोन तास लागतात. हे सारं फिरुन बरोबर नेलेला घरी बनवलेला नाश्ता करुन आम्ही पुढे निघालो.
दुसरं स्थळ होतं "Kiyomizudera". पूर्व क्योटोमधलं हे एक बुध्द मंदिर आहे. याची गणना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात करण्यात आलीय. या मंदिराची स्थापना ७७८ मध्ये 'नारा' काळात 'एनचिन शोनिन' यांनी केली. 'नारा' ही जपानची पूर्वीची राजधानी. 'एनरिक शोनिन' हे इथले पुजारी होते. त्यांना ओटोवा झऱ्याजवळ मंदिर निर्माण करावं असा स्वप्न दृष्टांत झाला. त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. इथल्या इतर इमारती १६३३ मध्ये बांधण्यात आल्यात. मंदिराच्या पूर्ण बांधकामात एकाही खिळ्याचा वापर न करता पूर्ण लाकूडकाम करण्यात आलंय. 'कियोमिजु' चा अर्थ 'शुध्द किंवा पवित्र जल'. इथल्या या झऱ्यांवरुनच या मंदिराला हे नांव मिळालय. ओटोवा पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. हा पर्वत हिगाशियामा पर्वत शृंखलेचा एक भाग आहे.या मंदिरात उंच खांबावर आधारलेलं एक मोठं सभागृह आहे. इथून क्योटो शहराचं सुंदर दृश्य पहाता येतं.
मोठ्या सभागृहाच्या खालीच ओटोवा झरा आहे. इथून तीन स्वतंत्र जलधारा वहातात. या झऱ्याचं पाणी इथली लोकं मनोकामना पूर्ती साठी पितात. इथं 'ताइनाई मेगुरी' म्हणून एक अंधारी सुरंग आहे ज्यात बोधीसत्वाचं प्रतिनिधित्व केलं जातं. सभागृहाच्या समोरच्या बाजूलाही एक मोठं रेलिंग केलंय तिथूनही क्योटो शहर आणि तिथला प्रसिद्ध टाॅवर पहाता येतो. हा सारा परिसरही अतिशय सुंदर, हिरवाईने सजलाय. हे सारं पाहून आम्ही पुढे निघालो.
पुढचं स्थान होतं 'Nijo Jo Castle'. निजो कॅसल हा क्योटो मधला एक भव्य महाल आणि किल्ला आहे. हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात समाविष्ट आहे. ६८ एकर एवढ्या जागेत पसरलेल्या किल्ल्यात 'निनोमारु महाल', 'होनमारु महाल' यासहित काही उद्यानंही इथं आहेत. १६०१ मध्ये या कॅसलच्या निर्माणाचं कार्य सुरु झालं आणि १६२६ मध्ये पूर्ण झालं. या किल्ल्याला बाहेरच्या बाजूला दोन तटबंदी आणि त्याबाहेरुन पाणी असलेला मोठा खंदक आहे. आम्ही कॅसल बघून पुढे उद्यानात गेलो. आधीच्या दोन ठिकाणांप्रमाणेच इथंही साकुरा आणि मेपलची झाडं होती. अतिशय मोठं सुंदर उद्यान होतं. इथं साकुराच्या विविध जाती पहायला मिळतात. छोट्याशा पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी पूर्ण बहरलेले साकुराचे मोठमोठे वृक्ष आणि नुकतीच कोवळी पोपटी पालवी फुटलेले मेपल वृक्ष आणि इतर अनेक छोटीछोटी रंगबिरंगी फुलझाडं नयनरम्य दृश्य होतं. जपानला पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशीच सुंदर साकुरा पहायला मिळाला होता. हे सारं पाहून आम्ही क्योटोमध्येच मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. पारंपरिक एकमजली जपानी घरात आम्ही राहिलो. पारंपरिक पद्धतीचं असूनही अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असं ते घर होतं. रात्री भोजनासाठी आम्ही घरुनच करुन नेलेले पराठे आणि इतर पदार्थ खाल्ले. आणि मग गप्पा मारत, नातवाशी खेळत निद्राधीन झालो.
तिसऱ्या दिवशी सकाळी आवरुन मुक्कामाचं ठिकाण सोडून पुन्हा स्थलदर्शनासाठी निघालो. बसने एका vegan restaurant जवळ पोहोचलो. तिथे नाश्ता करुन पुढे निघालो.
तिसऱ्या दिवसाचं पहिलं ठिकाण होतं 'Kinkakuji Temple' म्हणजे 'Golden Temple'. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात समाविष्ट असलेलं हे तीन मजली मंदिर आहे. प्राचीन क्योटोच्या १७ वारसास्थानापैकी एक हे मंदिर आहे. क्योटो मधलं हे झेन बुद्ध मंदिर आहे. 'किंकाकू-जी' हे सुवर्ण मंदिर क्योको-ची या तलावासमोर स्थित आहे. आजूबाजूला असलेली दाट हिरवाई, त्यात असलेलं सुवर्ण मंदिर आणि याचं तलावातील जळात पडणारं प्रतिबिंब, अप्रतिम दृश्य असतं. हे बौध्द मंदिर कितायामा बुंका या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं जी पारंपरिक खानदानी संस्कृती आणि नवीन सामुराई संस्कृतीचं मिश्रण आहे. मंदिर आणि आसपासचा परिसर अतिशय सुंदर आहे. हे सारं पाहून आम्ही पुढे गेलो.
आमचं पुढचं स्थान होतं 'Aarasiyama'. क्योटोच्या पश्चिमेला असलेलं हे अराशियामा बांबू वन. अतिशय शांत आणि मनमोहक असं हे बांबू वन पर्यटकांमध्ये प्रिय आहे. हजारो बांबूच्या झाडांनी युक्त असं हे जंगल अनोखी अनुभूती देतं. अतिशय उंच अशा बांबूच्या हिरव्यागार फांद्यांचं सुरेख छत्र निर्माण होतं. वाऱ्याच्या झुळूकीने होणारी सरसराहट कानाला सुखावते. सोनेरी आणि हिरव्या रंगाची उधळण म्हणजे छायाचित्रणासाठी पर्वणीच. विशेष म्हणजे इथे 'मोसा' जातीचे खूप जाड आणि उंच बांबू आहेत. ही एक विशाल बांबूची प्रजाती आहे जी मूळ चीन आणि तैवानची आहे. ही बांबूची जात उंचीसाठी प्रसिद्ध आहे. यांची उंची ९० फुटांपर्यंत असते. अतिशय घनदाट अशा बांबूच्या जंगलात पर्यटकांना फिरण्यासाठी छान पायवाटा ठेवल्या आहेत. आम्ही हे सारं सौंदर्य अनुभवून जंगलाच्या दुसऱ्या भागात गेलो.
बांबू वनाच्या दुसऱ्या भागात सगळीकडे अत्यंत सुंदर साकुरा बहरला होता. सारा परिसर रमणीय दिसत होता. खूप सारी साकुराची झाडं पाहून मन मोहोरलं. साकुराचं अप्रतिम दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून थोडावेळ तिथेच साकुरा अनुभवत बसलो. थोड्या वेळाने पुढे निघालो. खरंतर पाय निघत नव्हता पण पुढेही काही छान पहायला मिळणार होतं म्हणून निघालो. थोडं खाली उतरत गेलो आणि मुग्धपणे पहातच राहिलो. समोर सुंदरशी 'Katsura river' संथपणे वाहत होती. या नदीत नौकानयनाची सुविधा आहे. खूप लोक या नौकानयनाचा आनंद लुटत होते. अगदी एखाद्या चित्रात असावं तसं एका बाजूला चढत जाणारा मनमोहक साकुरा आणि त्याच्या पायथ्याशी वाहणारी कत्सुरा नदी असं सुरेख दृश्य होतं. या नदीवरचा Togetsukyo bridge तिथून पहाता येतो. खूपच सुंदर नजारा आहे इथला.
दिवसभर हे स्थलदर्शन करुन आम्ही परत क्योटो स्टेशन वर पोहोचलो. इथून आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता. हा प्रवासही आमच्यासाठी खास होता. कारण आता आम्ही Shinkansen ने म्हणजेच Bullet Train ने प्रवास करणार होतो. ट्रेन ठरलेल्या वेळेत आली. आम्ही आसनस्थ झालो. ट्रेनचा आतला भाग, आसनव्यवस्था विमानासारखीच होती. फक्त ट्रेनच्या बंद खिडक्या थोड्या मोठ्या होत्या. ट्रेन सुरु झाली आणि अवघ्या काही क्षणातच जवळजवळ ताशी ३०० किमी. वेगाने धावू लागली. बसने आम्ही ९ तास प्रवास करुन क्योटोला पोहोचलो होतो. पण Shinkansen ने फक्त २ तासात आम्ही टोकियो ला पोहोचलो. खूप छान अनुभव होता. टोकियो हून परत दुसऱ्या ट्रेनने आम्ही घरी पोहोचलो. दिवसभर खूप प्रवास, फिरणं झालं होतं त्यामुळे घरी पोहोचल्यावर थोड्याच वेळात निद्राधीन झालो.
क्रमशः
















No comments:
Post a Comment