Pages

Sunday, November 16, 2025

दर्शनयोग

        खूप आधीपासून मनात असलेली एक इच्छा गुरुवारी १३ तारखेला अचानक पूर्ण झाली, आणि दत्तगुरूंच्या कृपेची पुन्हा एकदा अनुभूती आली. 'अलिबाग'-'चौल'च्या 'दत्त मंदिरात' जाण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती पण जवळच आहे कधीही जाता येईल असं म्हणून त्याला मुहूर्त मिळत नव्हता. तीन चार दिवसांपूर्वीच माझ्या मनानं परत उचल खाल्ली मी माझ्या सहचराला दत्त मंदिरात जाण्याबद्दल सांगितलं. पण तो त्याच्या गिरनार यात्रेच्या उरलेल्या कामातच व्यस्त होता, त्यामुळे सहाजिक त्यानं माझ्या सांगण्याकडं दुर्लक्ष केलं. पण बुधवारी रात्री मात्र माझ्या मनात दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर दर्शनाला जायचच असंच आलं आणि मी त्याला लगेच आमच्या गाडीच्या चक्रधराला संपर्क करायला सांगितलं.  सुदैवानं चालकाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मोकळा वेळ होता खरंतर त्याचं काही काम सुरू होतं पण ते गुरुवारी पूर्ण होणार नव्हतं त्यामुळे तो येऊ शकत होता. त्यामुळं चालकाचा होकार येताचं जायचं नक्की केलं. 

          पहाटे लवकरच सारं आवरुन आम्ही 'चौल'च्या 'दत्त' मंदिराकडे निघालो. नुकतीच थंडीला सुरुवात झाल्यानं हवेत छान गारवा होता. अशा छान वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला. वडखळला पोहोचल्यावर नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. अलिबाग पासून १६ किमी अंतरावर असलेल्या चौल नाक्यापासून २ किमी आत 'भोवाळे' या निसर्गरम्य गावातील एका टेकडीवर हे 'दत्त मंदिर' आहे. या टेकडीच्या पायथ्यापर्यंत गाडीनं जाता येतं. इथून पुढं मात्र पायऱ्या चढूनच मंदिरापर्यंत पोहोचता येतं. अतिशय शांत, हिरव्यागार वनराईनं नटलेल्या या टेकडीवरच्या मंदिरात जाण्यासाठी ७००/७५० पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र आता 'भोवाळे' गावाच्या पुढील 'सराई' या गावातून गाडीने अजून वरपर्यंत जाता येतं. 

          आम्ही 'सराई' गावातून या टेकडीजवळ पोहोचलो. गाडीतून उतरुन काही पावलं पुढे गेलो आणि श्री स्वामी समर्थांच्या मठाजवळ पोहोचलो. पायथ्यापासून पायऱ्या चढून आल्यास हा मठ पाचशे पायऱ्यांवर डाव्या बाजूला आहे. आम्ही गाडीने तिथं पोहोचलो होतो. इथं  बाहेरुनच दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. साधारण ५० पायऱ्या चढून गेल्यावर 'श्री दत्तात्रेयांचं' विश्रांती स्थान आहे. इथं सद्गुरू 'श्री बुरांडे' महाराजांचं समाधी स्थान आहे. त्यानंतर जवळपास १५० पेक्षा जास्त पायऱ्या चढल्यावर 'सत्चित आनंद साधना कुटी' आहे. नंतर काही पायऱ्या चढल्यावर 'हरे राम विश्राम धाम', 'धुनी मंदिर' आहे. ही सारी दर्शन घेत आम्ही पुढे पायऱ्या चढत होतो. यानंतर आणखी काही पायऱ्या चढल्यावर 'श्री दत्तात्रेयांच्या' मुख्य मंदिराजवळ आम्ही पोहोचलो. अतिशय पुरातन अशा १८ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिराचं बाह्य दर्शनही खूप सुंदर आहे. 

           या मंदिराचा गाभारा थोडा उंचावर आहे. त्यासाठी अजून काही पायऱ्या चढून वर जावं लागतं. आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि काही क्षण भान हरपून पहात राहिलो. 'श्री दत्तात्रेयांची' अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातील चांदीचा  मुखवटा धारण केलेली षड्भुज मूर्ती आणि चांदीच्या पादुका इथं प्रतिष्ठापित केल्या आहेत. इथं आम्हाला स्वहस्ते पूजा करायला मिळाली. हार, श्रीफल, नैवेद्य सारं आम्ही स्वहस्ते अर्पण केलं. पूजा करुन मी प्रत्यक्ष पादुकांवर नतमस्तक झाले आणि त्या मृदू स्पर्शानं एक अत्यंत वेगळी अनुभूती तनमनात शिरशिरली. खूपच वेगळा सुंदर अनुभव होता तो. कितीही प्रयत्न केला तरी डोळे पाणावलेच. नैवेद्य अर्पण केल्यावर आधीपासूनच तिथं असलेल्या ४-६ श्वानांना त्यातला थोडा प्रसाद दिला. आणि आम्ही गाभाऱ्यात अगदी मूर्तीसमोरच आसनस्थ झालो. शांतपणे काही वेळ थोडं नामस्मरण, स्तोत्र पठण करुन अतिशय तृप्त मनानं आम्ही मंदिराबाहेर आलो. कुणीही कुठलीही घाईगडबड न केल्यानं शांतपणे घेता आलेलं दर्शन, स्वहस्ते करायला मिळालेली पूजा, त्यानंतरही जवळपास अर्धा तास करता आलेलं नामस्मरण या सगळ्या गोष्टींमुळे मनाला अतिशय समाधान लाभलं होतं. दर्शन घेऊन आम्ही परत पायऱ्या उतरुन खाली आलो. 'श्री स्वामी समर्थांच्या' मठात आत जाऊन छान दर्शन घेतलं. तिथून जवळच उभ्या केलेल्या गाडीने परत निघालो.

          हे दर्शन कमी वेळात झालं म्हणून आम्ही परत फिरताना अचानक 'श्री कनकेश्वर' मंदिरात जायचं ठरवलं.  

         'अलिबाग' पासून १२ किमी. वर असलेल्या 'मापगाव' या गावात एका डोंगरावर हे 'कनकेश्वर मंदिर' आहे. मापगाव गावातलं हे मंदिर ३८५ मीटर उंच डोंगरावर वसलेलं आहे. अतिशय पुरातन म्हणजे १६ शतकातली 'होयसाळ' शैलीतली अतिशय देखणी, मनोहारी अशी मंदिराची अष्टकोनी वास्तु आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी पायथ्यापासून ७५०/८०० पायऱ्या चढाव्या लागतात. 

           आम्ही इथं पायथ्याशी पोहोचलो तेच तळपत्या उन्हात. पण दर्शनाला जायचंच असं ठरवलंच होतं. कारण या मंदिरात यायची माझी खरंतर खूप वर्षांपासून इच्छा होती. आता ती अगदी अनपेक्षितपणे पूर्ण होणार होती. त्यामुळं अगदी भर दुपारी आम्ही दर्शनाला जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. संपूर्ण डोंगरावर दाट वनराजी आहे. त्यामुळं पायऱ्यांवर मध्ये मध्ये छान सावली असते. आणि आपल्याला अवतीभवती खूप विविधरंगी फुलपाखरं भिरभिरत असतात. मात्र पहिला चढ खडा आणि तीव्र आहे. आणि महत्वाचं म्हणजे पायऱ्या सलग नसून दोन पायऱ्यांमध्ये काही पावलांचं अंतर आहे. याच कारणामुळं हा पहिला चढ चढतानाच खूप दमायला होतं. आम्हालाही हा चढ चढताना मधेमधे काही क्षण थांबावं लागत होतं. मात्र पायऱ्या कमी उंचीच्या आणि रुंद आहेत. तसंच बऱ्याच भागात सावली आहे. पण तरीही ही एकूण चढाई चांगलीच थकवणारी आहे हे नक्की. साधारण अर्ध्या अंतरावर 'देवाची पायरी' लागते. अशी मान्यता आहे की या पायऱ्या बांधल्यावर स्वयं देवानी इथं पहिलं पाऊल ठेवलं होतं. या स्थानी पायरीवरच एका अगदी छोट्याशा घुमटीत छोटसं शिवलिंग आहे. इथं दर्शन घेऊन जरा विश्रांती घेउन आम्ही पुढे निघालो. पुढे थोड्या भागापर्यंत सरळच पायऱ्या आहेत. तिथंच थोड्या अंतरावर 'नागोबाचा टप्पा' आहे. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा आमचा चालक तिथं थबकून काहीतरी पहात आणि छायाचित्रण करत होता. तिथं काहीतरी असल्याचं आम्हाला त्याचक्षणी लक्षात आलं आणि हलक्या पावलांनी जवळ गेलो आणि एका भल्यामोठ्या पिवळ्याधमक नागानं आम्हाला दर्शन दिलं. अतिशय देखणा नागोबा पहाताच मीही छायाचित्रण केलं पण तोपर्यंत तो आपला मार्ग बदलून हलकेच जंगलात निघून गेला. 'कनकेश्वर महादेवाच्या' दर्शनाआधीच हे सुंदर दर्शन घडल्यानं मन अगदी प्रसन्न झालं. खरंतर पहिल्या पायऱ्या चढतानाच आत्यंतिक थकवा आला होता. पण नागोबाच्या दर्शनानं आम्हाला एकदम उत्साह आला. 

          इथून थोडं पुढं गेल्यावर एक 'पालेश्वर महादेव मंदिर' आहे. यानंतर थोड्या सरळ पायऱ्या चढल्यावर परत खडी चढण असलेल्या पायऱ्या आहेत. जिथं खडी चढण आहे तिथं मधेमधे आधारासाठी रेलिंग लावलं आहे. ही चढाई पार केली आणि परत अगदी थोडं सपाट रस्त्यावर चालत असतानाच एका मोठ्या कमानीनं आमचं स्वागत केलं. कमानीतून आत गेल्यावर लगेचच उजव्या बाजूला 'ब्रम्हकुंड' आहे. अतिशय सुंदर रित्या बांधलेला हा प्रशस्त तलाव आहे. पाणीही एकदम स्वच्छ आहे. बाजूलाच एक लहानसं मारुती मंदिर आहे. इथं थोडं थांबून आम्ही पुढं गेलो. थोडं अंतर गेलो आणि मंत्रमुग्ध होऊन थबकलोच. 'होयसळ'  शैलीतलं अत्यंत देखणं वास्तुशिल्प असलेलं 'कनकेश्वर मंदिर' आणि बाजूला असलेली अष्टकोनी सुरेख अशी 'पुष्करणी' हे दृश्य अगदी पावलं खिळवून ठेवणारंच आहे. 

          प्रतयक्ष मंदिरात प्रवेश केला आणि आधीपेक्षा अत्यंत सुंदर दृश्य पाहून भान हरपून पहातच राहिलो. मंदिर अगदी प्रशस्त आहे. भला मोठा गाभारा आणि अंतर्गृह अशी रचना आहे. गाभाऱ्यात भला मोठा चांदीचा नंदी उभा आहे. गर्भगृहात जाण्यासाठी ५-६ पायऱ्या उतरुन जावं लागतं. तिथं रेखीव अशी ४ फुट लांबीची चांदीची 'शिवपिंडी' आहे. आणि मागंच चांदीची 'माता पार्वती' ची मूर्ती आहे. सोमवार किंवा इतर कुठलाही महत्वाचा दिवस नसुनही ताज्या फुलांची अतिशय सुंदर अशी सजावट पिंडीवर आणि नंदी भोवती केलेली होती. अप्रतिम असं दृश्य होतं. इथंही आम्हाला अगदी शांतपणे दर्शन घ्यायला, जलाभिषेक करायला मिळाला. अगदी मनासारखं असं स्पर्श दर्शन घेता आलं. दर्शन घेऊन पाणावल्या डोळ्यांनी तिथंच थोडावेळ बसून नामस्मरण करुन अतिशय तृप्त मनानं बाहेर गाभाऱ्यात येऊन पुन्हा थोडावेळ बसलो. 

        'कनकासुर' नावाच्या दैत्यानं भगवान महादेवाना प्रसन्न करुन घेण्यासाठी या ठिकाणी तपस्या केली होती. भगवान शिव प्रसन्न झाल्यावर त्यांनी आपल्याबरोबर द्वंद्व करावं अशी प्रार्थना केली. हे द्वंद्व अनिर्णित राहिल्यावर दैत्यानं याच डोंगरावर भगवान शंकरानी वास्तव्य करावं आणि इथंच कनकासुराचंही स्थान असावं अशी इच्छा व्यक्त केली. त्याला शंकरानी होकार दिला. आणि कनकासुराच्या पाठीवर मोठा यज्ञ केला. त्यात कनकासुराला मुक्ती मिळाली. आणि तेव्हापासून हे मंदिर 'कनकेश्वर' नावानं ओळखलं जातं. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलं अशीही आख्यायिका आहे. तसंच श्री रामरायांनी एकदा भगवान विष्णूंना सहस्त्र कमलपुष्प अर्पण केली,मात्र ती अर्पण करताना त्यातलं एक कमल कमी झालं म्हणून त्यांनी कमलपुष्पासमान असलेला आपला एक नयन काढून श्री विष्णूंना अर्पण केला तेच हे स्थान अशीही आख्यायिका आहे. या मुख्य मंदिराच्या आवारात 'श्रीराम सिद्धिविनायक मंदिर', 'विष्णू मंदिर', 'कालभैरव मंदिर' अशी मंदिरं आहेत. आम्ही तिथून बाहेर येऊन मंदिराजवळच असलेल्या उपहारगृहात नाश्ता केला आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. 

          खरंतर आम्हाला गिरनार चढाउतरायची बऱ्यापैकी सवय असूनही 'कनकेश्वर' ला जाताना टळटळीत उन, खडी चढाई, पायऱ्या मधलं अंतर यामुळं अतिशय थकायला झालं होतं. पण कितीही त्रास झाला तरी चढून जाऊन दर्शन घ्यायचंच हा अट्टाहासच होता. आणि इथं पायऱ्या चढूनच जावं लागतं. दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळं थांबत थांबत का होईना आम्ही दर्शनाला गेलोच. मात्र मंदिरात प्रवेश करताच सारा थकवा क्षणात नाहीसा झाला होता. पायऱ्या उतरतानाही तीव्र उतार असल्यानं खरंतर त्रास होतो पण आम्हाला उतरताना सवयीमुळं त्रास झाला नाही. खाली उतरुन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

         खूप आधीपासून असलेली 'श्री दत्तात्रेयांच्या' आणि 'कनकेश्वराच्या' दर्शनाची इच्छा अगदी अनपेक्षितपणे श्री दत्तगुरुंनी पूर्ण केली आणि पून्हा एकवार त्यांच्या कृपादृष्टीची साक्ष पटली. दोन्ही मंदिरात दर्शनासाठी घाईगडबड करणारं कुणीही नव्हतं. दोन्ही ठिकाणी पुजारी असूनही शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. अर्थात दोन्ही मंदिरात भाविकांची अगदीच तुरळक गर्दी होती. त्यामुळं श्री दत्तात्रेयांचं आणि भगवान शिवाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि मन तृप्त झालं.

- स्नेहल मोडक




No comments:

Post a Comment

कविता

स्वप्न

पहाटसमयी नभांगणी दाटती मेघ सावळे सुखावते हे मन जणू होते बावळे दिसेल वीजेची रेघ क्षणभर लखलखेल जणू ताशा वाजेल अन कडाडतील मेघ बरसतील जलधारा  चि...