Pages

Friday, July 31, 2026

गुरुपौर्णिमा

      

    

   दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं होतं. मात्र गुरुपौर्णिमेच्या आधी ६-७ दिवस महाराष्ट्रासह गुजरातमध्येही पावसानं थैमान घातलं, सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळं दोन दिवस गुजरातकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द कराव्या लागल्या होत्या.आणि त्यामुळं आमच्या जाण्याची साशंकता निर्माण झाली. दरवर्षी गुरुपौर्णिमेला असंख्य भाविक गिरनारला जातात. त्यामुळं त्या सगळ्यांच्या आणि आमच्या प्रार्थनेला यश आलं आणि पौर्णिमेच्या दोन दिवस आधी पावसाचा जोर अतिशय कमी झाला. सारं काही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं. आणि आम्ही ठरल्याप्रमाणं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गिरनारला प्रस्थान केलं.

               घरुन निघाल्यापासून ट्रेन मध्ये बसेपर्यंत पावसाचा अडथळा आला नाही. प्रवास वेळेत सुरु झाला. मात्र याच मार्गावर सकाळीच एक ट्रेन घसरल्याने आमच्या आणि त्या मार्गावरच्या सगळ्याच ट्रेनचा वेग मंदावला होता. त्याचा परिणाम म्हणून आमची ट्रेन जूनागडला एक तास उशिरा पोहोचली. मग स्टेशनवर उतरुन रिक्षाने मुक्कामी पोहोचलो. आन्हिकं आवरुन दर्शनला निघालो. नेहमीसारखं चहा पिऊन लंबे हनुमानजी आणि पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायला निघालो. रोपवे जवळपास आठवडाभर बंदच होता. पण पौर्णिमेच्या दिवशी तरी सुरु करतील अशी आशा जवळजवळ प्रत्येक भाविकाच्या मनात होती. पण पायथ्याशी आणि वर अंबा मातेच्या मंदिराजवळ एकूणच वातावरण खूप बिघडलेलंच होतं.  त्यामुळं रोपवे सुरु होण्याची सुतराम शक्यता नाही याची आम्हीही खात्री करुन घेतली. यानंतर मात्र दहा पायऱ्या चढून उतरुन दर्शनासाठी जायला मी नकार दिला. मुळातच माझी तब्येत ठीक नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय रात्री प्रवासात अचानक माझं पोट बिघडलं होतं. खूप जोरदार कळा येत होत्या. आणि अक्षरशः माझी धावपळ सुरु झाली,शेवटी मी ती थांबण्यासाठी औषध घेतलं. औषधानं धावपळ थांबली पण पोटदुखी सुरुच होती.  आणि त्याचमुळं मला थोडा अशक्तपणा आला होता. अशा परिस्थितीत दहा हजार पायऱ्या चढणं कठीणच होतं. दर्शनाची तीव्र इच्छा असूनही हिंमत होत नव्हती. आणि माझ्या हळूहळू चढण्यामुळं बरोबरच्या सगळ्यांना त्रास, उशीर होऊ नये अशीही इच्छा होती. कारण यावेळी आम्ही ९-१० जणं दर्शनासाठी चाललो होतो. पण त्या सगळ्यांनीच मला दर्शनाला यायचा आग्रह केला आणि तोच श्री दत्तगुरुंचा आदेश समजून मी होकार दिला. श्री दत्तगुरुंना आताही माझी परिक्षा घ्यायची असल्याची जाणीव झाली आणि मी दर्शनासाठी जायचं ठरवलं. 

               मात्र दोन अडीचशे पायऱ्या चढे पर्यंत माझा निर्धार ढासळायला लागला. पण माझा सहचर आणि त्यांचे मित्र यांच्या बोलण्याने धीर‌ आला आणि परत हळूहळू पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर ORS मिळालं. आणि ते पित पित स्वतःला सावरत मी पुढे निघाले. अगदी थोड्या थोड्या वेळानं काही क्षण थांबून थांबून माझं चढणं सुरु होतं. खरंतर अतिशय सुंदर सुखद वातावरण होतं. पण मला त्रास होत असल्यानं चढणं माझ्यासाठी कठीणच होत होतं. नामस्मरण करीत, दत्तगुरुंवर विश्वास ठेवून हळूहळू पायऱ्या चढत होते. मधेमधे पाणी, लिंबुसरबत थोडं थोडं पित होते. खरतर एरवी दर्शन घेऊन होईपर्यंत आम्ही पाणीही पित नाही. पण आताची परिस्थिती वेगळी होती.  सुदैवानं पाऊस नव्हता. पण वारा ही नव्हता. त्यामुळंही जास्त दमछाक होत होती. साधारण अडीच हजार पायऱ्यांनंतर मात्र वातावरण अजूनच बदललं. वरती सगळीकडं जोरदार पाऊस पडून गेला होता. पायऱ्यावरुन जरा जरा पाणी वहात होतं. सन्नाट वारा सुटला होता. आणि अतिशय दाट धुकं पसरलं होतं. १०-१५ फुटांच्या पलिकडं काहीच दिसत नव्हतं. त्यापूढे फक्त शुभ्र धुकं दिसत होतं. अतिशय मनोहारी दृश्य होतं. अखेर हे सारं अनुभवत हळूहळू का होईना आम्ही जवळपास चार तासांनी अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो.

               अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचेपर्यंत माझी अवस्था तर फारच वाईट झाली होती. पण माझ्या सहचरालाही थोडा जास्त त्रास होऊ लागला. मग माझ्या मनातली चिंता जास्तच वाढली. पण तरीही दत्तगुरुंवर विश्वास ठेवून याच्या मित्राबरोबर आम्ही पुढे जायला निघालो. का कुणास ठाऊक पण जसं आम्ही अंबा मातेच्या मंदिरापासून पुढे निघालो तसं पावलांना बहुतेक नेहमीच्या, सवयीच्या पायऱ्या कळल्या आणि पावलं आपोआप नेहमीसारखी सहज पडू लागली. कमानी पर्यंत गेल्यावर एक ठरवलं या परिस्थितीत अखंड धुनीचं दर्शन लांबूनच घ्यायचं आणि गुरुशिखराचं दर्शन घेऊन परत गोरक्षनाथ मंदिरापर्यंत येऊन सरळ डोली करायची. मग याच्या मित्राला दर्शनासाठी पुढे जायला सांगितलं. खरंतर केवळ आम्हा दोघांमुळे त्यांना एवढा वेळ सावकाश चढावं लागलं होतं. एरवी ते केव्हाच दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला लागले असते. कमानी पासून पुढे आम्हीही नेहमीसारखं सहज चढलो. रोपवे बंद असूनही दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. पण प्रत्येकाच्या चालण्याच्या कमीजास्त वेगामुळं प्रत्यक्ष मंदिरात रांग नव्हती. सर्वांना सहज आणि सुंदर दर्शन घडत होतं. आम्हीही मंदिरात प्रवेश केला. नैवैद्य आणि अष्टगंध अर्पण करुन मी नतमस्तक झाले आणि आसू ओघळलेच. त्याक्षणी डोळ्यातलं पाणी थांबवणं अशक्य होतं. मला तब्येतीमुळं दहा हजार पायऱ्या चढून येणं शक्य नसतानाही स्वयं श्री दत्तात्रेयांनी मला अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. सारे श्रम एका क्षणात नाहीसे झाले आणि मन अगदी प्रसन्न तृप्त झालं. पंडितजीनी कुठलीही घाईगडबड केली नाही .शांतपणे सुंदर दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. 

               पायऱ्या उतरुन कमानीजवळ पोचलो तिथूनच अखंड धुनीचं दर्शन घेतलं आणि गोरक्षनाथ मंदिरापर्यंत आलो. इथून पुढं पायथ्याशी जाण्यासाठी डोली करायची असं आधीच ठरवलं होतं. पण इतका वेळ सतत मागंपुढं करणारे डोलीवाले अचानक नाहीसे झाले होते. मग त्यांची वाट पहाण्यापेक्षा जमेल तेवढं पायऱ्या चढायचं ठरवलं. पण वाटेत अक्षरशः एकही डोलीवाला भेटला नाही. अखेर पायऱ्या चढतच अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो. इथं मात्र थोडं थांबून घासभर काहीतरी चहा नाश्ता करायचं ठरवलं. पोटात अन्नाचा कणही नव्हता. केवळ डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ORS, लिंबू सरबत पिऊन दहा हजार पायऱ्या चढून आणि पाच हजार पायऱ्या उतरुन झाल्या होत्या. मग आधीच पोट बिघडलेलं असल्यानं भीत भीतच दोन घास पोहे आणि घोटभर चहा प्यायलो. आश्चर्य म्हणजे एवढ्या वेळातही एकही डोलीवाला भेटला नाही.  मग हळूहळू पायऱ्या उतरायला सुरुवात केली. आता उरलेल्या पाच हजार पायऱ्या उतरुनच पायथ्याशी जायचं होतं. दोन घास पोटात गेल्यावर थोडं बरं वाटलं आणि आम्ही भरभर पायऱ्या उतरायला सुरुवात केली. पंधराशेच्या आसपास पायऱ्या उतरलो आणि पुन्हा वातावरण बदललं. पाऊस पडून गेला होताच. पण जरा आकाश मोकळं झालं आणि जरा उजेड वाढला. जोराचा  वारा होताच. एवढ्या पायऱ्या उतरल्यानंतर मात्र डोलीनं जायचा विचार मनातून नाहीसा झाला. खरंतर डोलीनं जायचं अत्यंत नाईलाजानं ठरवलं होतं. पण श्री दत्तात्रेयांना बहुधा ते मान्य नव्हतं. त्यामुळं शेवटी डोलीचा पर्याय सोडून दिला. 

              साधारण निम्म्या पायऱ्या उतरल्यावर अचानक एकानं माझ्या हातातली काठी मागितली. मी लगेच दिली. तो काय करतोय म्हणून बघितलं तर एक लहानसं जनावर वळवळत माझ्या समोर आलं. ती विषारी मण्यार आहे हे मी ओळखलं पण त्या मुलांनाही हे माहीत होतं. ती चुकूनही कुणाला दंश करु नये म्हणून त्यांनी काठीच्या सहाय्यानं तिला बाजूच्या रानात सोडलं आणि काठी मला परत दिली. विषारी जनावर आहे माहीत असूनही त्या मुलांनी तिला न मारता तिच्या अधिवासात सुरक्षित परतवून लावलेलं बघून  मलाही खूप समाधान वाटलं. पायऱ्या उतरताना सुरुवातीला आमचा वेग जरा जास्त होता. पण हळूहळू पाय बोलायला लागले आणि उतरण्याचा वेग जरा मंदावला. पण तरीही जेमतेम तीन तासांत दिवसाउजेडी त्या पाच हजार पायऱ्या उतरुन आम्ही पायथ्याशी पोहोचलो. अखेर दहा हजार पायऱ्या चढून उतरुनच श्री दत्तात्रेयांनी आम्हाला आणि इतर असंख्य भाविकांना दर्शन घडवलं होतं. पुन्हा एकवार दत्तगुरुंनी कठीण परिक्षा घेतली होती आणि अतिशय सुंदर दर्शन घडवून यशही दिलं होतं. आम्ही मुक्कामी पोहोचलो आणि रात्री अगदी जेवायलाही बाहेर गेलो नाही. पूर्ण आराम केला. खरंतर दहा हजार पायऱ्या चढून उतरुन आम्ही याआधी काही वेळा गेलो आहोत. पण यावेळी तब्येत खूप बिघडली असल्यानं हिंमत होत नव्हती. 

              दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सारं आवरून बाहेर निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही बऱ्यापैकी ताजेतवाने झालो होतो. बाहेर आल्यावर पाहिलं तर रोपवे सुरु झाला होता. पण पुन्हा दर्शनासाठी जाणं अगदी अशक्य होतं. मग भवनाथ महादेवाचं दर्शन घेतलं. नंतर चहा नाश्ता करुन दामोदर कुंडाचं दर्शन घ्यायला गेलो. तलेटीमध्येच हे पौराणिक कथा असलेलं दामोदर कुंड आहे. जुनागडहून तलेटीला जाता येता ते दिसतं . पण खूप दिवसांनी परत एकदा मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. राधा- दामोदर आणि रेवती-बलराम यांच भव्य मंदिर कुंडाच्या काठावर आहे. मंदिरात देवाला नैवेद्य अर्पण करत असल्यानं दर्शन थोडावेळ बंद होतं. मग तोपर्यंत समोरच असलेल्या मुचकुंद ऋषींची गुहा बघायला गेलो. गुहा बघुन दर्शन घेऊन परत मंदिरात आलो. दर्शन सुरु झाल्यावर दर्शन घेऊन परत मुक्कामी गेलो. सामान घेऊन मुक्काम सोडून दुपारच्या ट्रेननं परतीचा प्रवास सुरु केला. ट्रेन मध्ये असतानाच त्याच दिवशी पहाटे तीन वाजता गिरनारच्या पायऱ्यांवर परत सिंह फिरताना दिसले अशी बातमी कळली. जेमतेम १५ दिवसांपूर्वीच भल्या पहाटेच एका लहान ११ वर्षांच्या मुलावर सिंहाने हल्ला केला होता आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना जिथं घडली तिथं प्रशासनानं भाविकांना सावध करण्यासाठी लगेच एक फलक लावला आहे. आता पुन्हा त्याच ठिकाणी हे सिंह दिसले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीनं भाविकांनी रात्री गिरनार पर्वतावर जाऊ नये, अगदी एकट्या दुकट्यानेही जाणं शक्यतो टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आणि अर्थातच भाविकांनी ते आवाहन पाळणं गरजेचं आहे.

               आपली श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा असो नसो, तब्येतीची किंवा इतर कुठलीही अडचण असो, त्यांची इच्छा असेल त्यानुसारच अगदी कठीण परीक्षा घेऊनही आपल्याला सुंदर दर्शन घडतं हे खरचं खुप मोठं भाग्य आहे. असच दर्शन सदैव घडत रहावं, क्षणभरही दत्तगुरुंचं विस्मरण होऊ नये हीच श्री दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना.

        || श्री गुरुदेव दत्त ||

                                      स्नेहल मोडक 

    

 

Thursday, July 2, 2026

वटपौर्णिमा

       यावेळी नेहमीप्रमाणं वटपौर्णिमेला गिरनारला जायचा माझा बिलकुल विचार नव्हता. पण माझ्या सहचरानं आधीच जाण्यायेण्याची रेल्वेची तिकीटं काढली होती. अर्थात ती ऐनवेळी रद्द करावी लागू शकतात याची पूर्ण कल्पना मी दिलीच होती. आणि त्याप्रमाणं जाणं रद्द करायचीच वेळ आली होती पण एक प्रयत्न म्हणून तत्काळ रिझर्व्हेशन मिळतं का बघितलं आणि सुदैवानं ते  मिळालं आणि अखेर गिरनार ला जायचं नक्की झालं. 
 वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे आम्ही जूनागडला पोहोचलो. तिथून रिक्षाने तलेटीला मुक्कामी गेलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनला निघालो. खरंतर पहाटे जेव्हा गिरनार पर्वताचं दर्शन मुक्कामाच्या ठिकाणाहून घेतलं तेव्हाच आकाशात दाटलेले कृष्णमेघ बघून मन साशंक झालं होता. कारण या परिस्थितीत रोपवे सुरु असण्याची शक्यता फारच कमी होती. आम्ही दर्शनासाठी निघालो तेव्हा भरुन आलेल्या आभाळाबरोबरच जोरदार वाराही सुरु होता. मात्र दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. रोपवे साठी खूपच मोठी रांग होती. आमची तिकिटं आधीच काढलेली होती. पण जे तिथे तिकिटं काढत होते त्यांना फक्त एका बाजूचंच तिकिट देत होते कारण खराब वातावरणामुळे रोपवे कोणत्याही क्षणी बंद करावा लागणार होता. 
         आम्ही ट्राॅलीमध्ये बसून निघालो आणि पुढच्या दोन मिनीटांतच आमची ट्राॅली शुभ्र ढगांनी वेढली गेली. आजूबाजूला फक्त आणि फक्त शुभ्र ढगच दिसत होते. अर्थात आम्हाला बरेचदा मिळणारा हा अतिशय सुंदर, सुखद अनुभव घेत आम्ही रोपवेनं अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो. इथेही शुभ्र मेघांबरोबर सन्नाट वाराही होता. कितीही वेळा पाहिलं तरी कधीही मन न भरणारं असं अप्रतिम दृश्य पहातच आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. अतिशय नयनरम्य वातावरणामुळे सगळेच भाविक उत्साहात होते. किंचीतही थकायला होत नव्हतं. आम्ही गोरक्षनाथ मंदिरात पोहोचून दर्शन घेऊन पुढे शिखरावर निघालो.
          मंदिरात प्रवेश केला आणि मी श्री दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झाले. ऐन पौर्णिमेच्या दिवशीच चरण पादुकांना अष्टगंध विलेपन केलेलं नव्हतं हे लक्षात आलं आणि क्षणार्धात मनात आपलं काय चुकलं याची जाणीव झाली. प्रवासाच्या दिवशी घरी पहाटे पूजा करताना गिरनारला श्री दत्तात्रेयांना अर्पण करण्यासाठी अष्टगंध आणलं नसल्याचं लक्षात आलं होतं. गिरनारला जायचं नक्की ठरलं नसल्यानं मी आधी काहीच तयारी केली नव्हती. आणि लक्षात आल्यावर अष्टगंध घेऊन येण्याएवढा वेळ नव्हता. त्यामुळं ते न घेताच बाकी अर्पण करायच्या वस्तू नेल्या होत्या . पण जे राहिलं त्याची जाणीव मात्र श्री दत्तगुरुंनी मला करुन दिली होती. त्याबद्दल मनोमन क्षमा मागून, दर्शन घेऊन आम्ही परत अखंड धुनीच्या दर्शनाला निघालो. सोमवार असल्यानं धुनी प्रज्वलित होणार होती. पण आम्हाला तिथे पोचायला जरा वेळ लागला. तोपर्यंत धुनी प्रज्वलित झाली होती. मात्र प्रज्वलित धुनीचं दर्शन आम्हाला घडलं. काही भक्तांना पेटत्या ज्वालांमध्ये श्री दत्तात्रेयांचं प्रतिकात्मक दर्शन घडतं हे माहित आहे. मी धुनीचं दर्शन घेत असताना अचानक माझ्या मनात आलं आणि मी दत्तगुरुंना 'मला मिळेल का अशी काही अनुभूती की आत्ता या क्षणी तुमचं इथलं अस्तित्व मला जाणवेल' असं मनोमन म्हटलं. माझ्या मनात असं काही आलं आणि पुढच्या २-३ क्षणांत धुनीसाठी रचलेल्या उभ्या लाकडांमधली दोन लाकडं धुनीच्या बाहेर पडली. कुणाला ही साधी घटना किंवा योगायोग वाटू शकेल. पण माझ्यासाठी मात्र तो एक अतिशय सुंदर संकेत होता. माझे डोळे पाणावलेच आणि श्री दत्तात्रेयांना स्मर्तृगामी म्हणतात त्याची पुन्हा एकवार प्रचिती आली.
          धुनीचं दर्शन, प्रसाद घेऊन गोरक्षनाथ मंदिरात आलो, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली आणि पावसाला सुरुवात झाली. अर्थात हलकी भुरभुर सुरु झाली होती. पण कुठल्याही क्षणी जोरदार पाऊस येण्याची शक्यता होती. मात्र अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचेपर्यंत हा पाऊस थांबला. रोपवे जवळ आलो पुन्हा सन्नाट वारा सुरुच आहे हे लक्षात आलं. रोपवे कुठल्याही क्षणी बंद करण्यात येईल अशी सूचना सतत दिली जात होती. नेहमीपेक्षा खूप कमी वेगाने रोपवे सुरु होता. त्यामुळं थोडा वेळ थांबावं लागलं पण रोपवेनंच पायथ्याशी यायला मिळालं. पायथ्याशी तलेटीला मात्र वाऱ्यापावसाचा मागमूसही नव्हता. अर्थात तलेटी आणि गिरनार पर्वत या दोन्ही ठिकाणचं वातावरण नेहमीच वेगळं असतं. तलेटीमधून वर पर्वतावर कसं वातावरण असेल याचा बिलकुल अंदाज येत नाही. 
          पायथ्याशी पोचून मुक्कामी परत आलो. थोडी  विश्रांती घेऊन लगेच मुक्काम सोडून भवनाथचं दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घेऊन तिथूनच रिक्षानं जुनागड बस स्थानकावर पोहोचलो. जुनागडहून बसने राजकोटला पोहोचलो. आणि रात्रीच्या ट्रेनने परतीचा प्रवास सुरु केला. माझ्यासाठी अगदी ऐनवेळी आणि अपेक्षा नसतानाही घडलेली गिरनारवारी अतिशय छान झाली होती. दत्तगुरुंनी आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. 

|| जय गिरनारी ||
- स्नेहल मोडक

कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...