मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा या कालावधीत 'अंबाजोगाईच्या' 'श्री योगेश्वरी देवी'चा म्हणजेच आमच्या कुलस्वामिनीचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. यावर्षी या काळात देवीच्या दर्शनासाठी जायचंच असं आम्ही आधीच ठरवलं होतं. सुरुवातीचे दोन - तीन दिवस गर्दी कमी असते. त्यामुळं उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. त्यानुसार २७ तारखेलाच सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली.
सूर्योदयापूर्वीच प्रवास सुरु केला त्यामुळं अर्थातच हवेत छान गारवा होता. साहजिकच समृद्धी महामार्गने प्रवास अगदी उत्साहात सुरु झाला. वाटेत नाश्ता, जेवण, रसपानासाठी थांबत होतोच. पण तरीही सायंकाळी ४ वाजताच आम्ही 'परळी वैजनाथ' ला पोहोचलो. मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. त्यामुळं 'परळी वैजनाथाचं' अतिशय सुंदर दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही तिथून ४ किमी. वरच असलेल्या 'डोगर तुकाई' ला गेलो. इथं 'अंबा आरोग्य भवानी' आणि 'नृसिंह सरस्वती' यांचं मंदिर आहे. 'नृसिंह सरस्वती' या स्थानी एक वर्ष गुप्त स्वरूपात राहिले होते. या मंदिरात गाभाऱ्यात 'अंबा आरोग्य भवानी'ची रेखीव मूर्ती आहे. आणि या गाभाऱ्याखालील तळघरात नृसिंह सरस्वती यांचं स्थान आहे. तळघरात जाण्यासाठी एकावेळी अगदी जेमतेम एक माणूस उतरु शकेल असा प्रवेशमार्ग आहे. नवरात्रात आम्ही इथं गेलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी मुळं हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळं आम्हाला तेव्हा नृसिंह सरस्वतींच दर्शन घडलं नव्हतं. पण यावेळी मात्र मंदिरात पुजारी आणि आम्ही पाच जणंच असल्यानं नेहमीसारखं आम्हाला खाली उतरुन 'नृसिंह सरस्वतीं'चं अगदी शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. हे सगळं फिरुन आम्ही 'अंबाजोगाई' ला निघालो.
अंबाजोगाईला पोहोचल्यावर मुख्य मंदिरा पासून थोड्याच अंतरावर असलेल्या 'रेणुका देवी' आणि 'मूळ जोगाई' देवी यांच्या दर्शनाला गेलो. इथंही मंदिरापर्यंत गाडी जाते. आधी 'रेणुका देवी' चं दर्शन घेऊन काही पायऱ्या खाली उतरुन 'मूळ जोगाई'चं दर्शन घेतलं. इथंही बिलकुल गर्दी नसल्यानं छान दर्शन घडलं. सायंकाळची वेळ असल्यानं मंदिराच्या मागच्या बाजूस नेहमीप्रमाणं यावेळीही दोन मोर मनमुक्त बागडताना पहायला मिळालेच. इथलं दर्शन घेऊन आम्ही तिथूनच पुढे 'बाराखांबी मंदिरा'त गेलो. उत्खननात सापडलेल्या १२ व्या शतकातील, 'यादवकालीन सेनापती खोलेश्वर' यांनी बांधलेल्या या महादेवाच्या मंदिरातही आम्ही जातोच. हे मंदिर ज्यांच्या शेतजमीनीत सापडलं ते स्वतः तिथं सकाळ सायंकाळ पूजाअर्चा करतात. आम्ही गेलो तेव्हा ते सायंआरतीच्या तयारीच होते. मंदिरात बाकी कुणीच नव्हतं. मग आम्ही पाच जणं आणि त्यांनी मिळून छान आरती केली. दर्शन प्रसाद घेऊन त्यांच्याशी थोड्या गप्पा मारुन आम्ही मुक्कामी पोहोचलो.
मुक्कामी पोहोचल्यावर आवरुन, ताजंतवानं होऊन जवळच असलेल्या मंदिरात 'योगेश्वरी मातेच्या' दर्शनाला गेलो. तिन्हीसांज उलटल्यानं मंदिरात गर्दी नव्हती. अगदी शांतपणे अतिशय सुंदर असं 'योगेश्वरी देवी'चं दर्शन घडलं. मातेच्या चरणी नतमस्तक होताना डोळे पाणावलेच पण मन अगदी तृप्त प्रसन्न झालं. मातेच्या कुशीत शिरल्यासारखं मन आश्वस्त झालं. थोडावेळ मंदिरात थांबून मुक्कामी परत आलो.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ तारखेला पहाटे सारी आन्हिकं आवरुन लवकरच परत मंदिरात गेलो. देवीला अभिषेक करुन, ओटी, नैवेद्य अर्पण करुन अतिशय प्रसन्न मनानं परत मुक्कामी गेलो. सारं आवरुन मुक्काम सोडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
परतीच्या प्रवासात एका अतिशय पुरातन, वेगळ्या आणि राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या एका मंदिरात जायचं आधीच ठरवलं होतं. त्यानुसार दिड पावणेदोन तासांतच आम्ही तिथं पोहोचलो.
'त्रिविक्रम मंदिर' - 'धाराशिव' मधल्या 'तेर' गावात असलेलं चौथ्या शतकातलं 'भगवान श्री विष्णुं' च्या 'वामन' अवतारातील हे मंदिर. हे मंदिर अतिशय वेगळं म्हणजे 'चैत्य' शैलीतलं आहे. प्रशस्त असा सभामंडप आणि ५-६ पायऱ्या खाली उतरुन प्रशस्त गर्भगृह अशी याची रचना आहे. संपूर्ण सभामंडपात लाकडी खांब आणि अतिशय सुंदर असं नक्षीदार लाकडी कोरीव काम आहे. मंदिरात 'त्रिविक्रमांची' काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या डोक्यावर मोत्यांच्या झुमक्यांनी सुशोभित मुकुट, कानात मोठे कर्णालंकार, गळ्यात विविध हार, हातात नक्षीदार कंकणं, दंडावर बाजूबंद आणि दोन्ही कर कटीवर असं सुरेख रुप आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचा डावा पाय वर उंचावलेला आहे. मूर्तीच्या उजव्या पायाशी 'बळीराजा', 'दैत्य गुरु शुक्राचार्य', 'बळीराजाची' पत्नी 'विद्यावली' यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. बाजूलाच 'भगवान श्री विष्णूंची' पत्नी 'रमादेवी' यांची मूर्ती आहे. इथल्या सभामंडपात 'संत गोरोबाकाका' आणि तत्कालीन संतांचा संत मेळा भरत होता. 'संत नामदेव महाराजांनी' इथं किर्तन केल्याचे पुरावे आहेत.
आम्ही या मंदिराजवळ पोहोचलो, गाडी बाजूला लावली आणि गाडीतून उतरण्याआधीच बाजूला असलेल्या घराच्या जवळून एकामागोमाग एक असे पूर्ण वाढ झालेले गुबगुबीत तीन मुंगुस बाहेर येऊन आमच्या गाडीच्या समोरुन पलिकडे निघून गेले. अचानक इतके सुंदर मुंगुस पहायला मिळणं हा खूपच छान अनुभव होता. असं अचानक मुंगुसाचं दर्शन होणं हा एक शुभ संकेत मानला जातो. नंतर आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तिथं आमच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. त्यामुळं अतिशय शांतपणे मंदिर पहाता आलं. प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश केला समोरची त्रिविक्रमांची भव्य मूर्ती बघून भारावून गेलो. घाईगडबड करायला तिथं कुणीच नसल्यानं अगदी छान दर्शन घेता आलं. दर्शन घेऊन थोडावेळ गर्भगृहातच बसून नामस्मरण केलं. आणि प्रसन्न चित्तानं मंदिराबाहेर आलो. नेमकं त्याचवेळी तिथले एक स्थानिक गृहस्थ तिथे आले आणि मंदिराविषयी छान माहिती त्यांनी आम्हाला दिली.
'मासानां मार्गशीर्षोहम्' असं 'भगवान श्रीकृष्णांनी' 'भगवद्गीतेत' म्हटलय. अर्थातच 'भगवान श्रीकृष्णांचा' म्हणजेच 'भगवान विष्णूंचा' हा अत्यंत आवडता महिना. 'मोक्षदा एकादशी', 'श्री दत्त जयंती', 'देवी महालक्ष्मीचं' गुरवार व्रत अशा महत्त्वाच्या आध्यात्मिक दिवसांचा हा मार्गशीर्ष महिना. या महिन्यात केलेलं नामस्मरण, पुजाअर्चा, देवदर्शन हे अधिक शुभ फलदायी असतं. अशा या विशेष महिन्यात आम्हाला कुलस्वामिनीचं, परळी वैजनाथाचं, नृसिंह सरस्वतींचं आणि त्रिविक्रमांचं म्हणजेच श्री विष्णूंचं घडलेलं दर्शन ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट होती.
- स्नेहल मोडक