Pages

Monday, December 8, 2025

दत्तावधुत मठ


             यावर्षीही 'दत्तजयंती' सोहळ्यासाठी आम्ही गावाला जाणार होतो. आणि याचवेळी अजून एका मंदिरात दर्शनासाठी जायचंही ठरवलं होतं. त्यानुसार ३ डिसेंबरला भल्या पहाटे सारं आवरुन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आणि सायंकाळी ४ वाजता आमच्या इच्छित स्थानी पोहोचलो. 
           'श्री दत्तावधुत मठ' - 'राजापूर निखरे' एक अतिशय वेगळं, दुर्मिळ असं हे मंदिर. 'राजापूर रेल्वे स्टेशन' पासून तीन किलोमीटर अंतरावर आणि 'मुंबई गोवा महामार्गावर' 'राजापूर' पासून १६/१७ किमी.वर हे मंदिर आहे. 
            'सद्गुरू श्री रामचंद्र महाराज' यांनी 'श्री स्वामीं'करीता साधनेसाठी या मठाची स्थापना केली. त्यावेळी हा मठ म्हणजे एक अगदी साधं कौलारु घरच होतं. पूजाघर आणि साधनास्थळ अशी याची रचना होती. २०१५-१६ मध्ये आलेल्या चक्रीवादळांत या मठाच्या दोन्ही बाजूला असलेले वृक्ष कोसळले. मात्र मठाचं काहीही नुकसान झालं नाही. यानंतर 'सद्गुरुंनी' या मठाचा भाविकांच्या सहाय्यानं जीर्णोद्धार केला. आणि या मठाचा ट्रस्ट नोंदणीकृतही केला. 
              या मठात नुकत्याच 'श्री दत्तात्रेय' आणि 'श्री अनघालक्ष्मी माता' यांच्या कृष्णशिळेत घडवलेल्या सात फुट उंच मूर्ती प्राणप्रतिष्ठित केल्या आहेत. 'श्री दत्तात्रेयांची' मूर्ती एकमुखी द्वीभूज असली तरीही 'ब्रम्हा' 'विष्णू' 'महेशांचं' तेजस्वी,  शांत, करुणामय रुप यात प्रकट झालं आहे. भाविकांना या तिन्ही रुपांची अनुभूती येतेच. 'अनघालक्ष्मी माता' ही 'आदिशक्ती' स्वरुप असून तिच्या मुकुटावर नाग आहे. चंद्र सूर्य कोरलेले आहेत. तराजूसह अनेक शक्तीचिन्हांनी युक्त अत्यंत रेखीव अशी ही मूर्ती आहे. मूर्तींच्या समोरच शिवपिंडीवर चरण पादुका  आहेत . या 'श्री दत्तात्रेय' आणि 'माता अनघालक्ष्मी' यांच्या दर्शनानं अध्यात्मिक स्पंदन जाणवतात. अगदी दुर्मिळ असं हे मंदिर आहे. 'पीठापूर'ला 'श्रीपाद श्रीवल्लभ' आणि 'अनघालक्ष्मी असं मंदिर आहे. पण तिथं त्रिमूर्ती दत्तात्रेय आणि ' माता अनघालक्ष्मी' अशा मूर्ती प्राणप्रतिष्ठित केल्या आहेत. या मंदिरातही दर्शनाचा योग आम्हाला आला आहे. या व्यतिरिक्त कुठेही 'श्री दत्तात्रेय' आणि 'अनघालक्ष्मी माता'  यांचं एकत्रित मंदिर नाही. 
            आम्ही या मंदिरात गेलो तेव्हा 'अनघालक्ष्मी' मातेला वस्त्राभूषणं घालण्याचं काम सुरू होतं. त्यामुळं आम्ही सभागृहातच १५-२० मिनिटं उभं राहून हे सारं पाहत होतो. तन मन एकाग्र करून हे सारं पाहत असताना डोळ्यात आसवांनीही दाटी केलीच. पंधरा-वीस मिनिटांनी मात्र आम्ही दर्शनाला गाभाऱ्यात येऊ का अशी विचारणा केली. कारण आमचा परतीचा प्रवासही लांबचा होता. आम्ही आत गेलो आणि 'श्री दत्तात्रेय' आणि 'अनघालक्ष्मी' यांचं अगदी जवळून दर्शन घेऊन, नतमस्तक होऊन बरोबर नेलेली ओटी, वस्त्रं आणि पेढे सारं काही अर्पण केलं. पून्हा एकवार नतमस्तक होऊन प्रसाद घेऊन तृप्त, प्रसन्न चित्तानं बाहेर आलो. किमान अर्धा तास तरी आम्ही तिथं होतो तेवढा वेळ तिथं सतत एक अध्यात्मिक उर्जा आणि आगळी अनुभूती जाणवत होती. एका साध्याशा पण दुर्मिळ अशा मंदिरात 'श्री दत्तात्रेय' आणि 'अनघालक्ष्मी' यांचं अतिशय सुंदर असं दर्शन आम्हाला घडलं ही आमच्यासाठी  भाग्याची गोष्ट होती                                                                                                                                                                                                                               
- स्नेहल मोडक

    



No comments:

Post a Comment

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...