Pages

Thursday, July 2, 2026

वटपौर्णिमा

       यावेळी नेहमीप्रमाणं वटपौर्णिमेला गिरनारला जायचा माझा बिलकुल विचार नव्हता. पण माझ्या सहचरानं आधीच जाण्यायेण्याची रेल्वेची तिकीटं काढली होती. अर्थात ती ऐनवेळी रद्द करावी लागू शकतात याची पूर्ण कल्पना मी दिलीच होती. आणि त्याप्रमाणं जाणं रद्द करायचीच वेळ आली होती पण एक प्रयत्न म्हणून तत्काळ रिझर्व्हेशन मिळतं का बघितलं आणि सुदैवानं ते  मिळालं आणि अखेर गिरनार ला जायचं नक्की झालं. 
 वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे आम्ही जूनागडला पोहोचलो. तिथून रिक्षाने तलेटीला मुक्कामी गेलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनला निघालो. खरंतर पहाटे जेव्हा गिरनार पर्वताचं दर्शन मुक्कामाच्या ठिकाणाहून घेतलं तेव्हाच आकाशात दाटलेले कृष्णमेघ बघून मन साशंक झालं होता. कारण या परिस्थितीत रोपवे सुरु असण्याची शक्यता फारच कमी होती. आम्ही दर्शनासाठी निघालो तेव्हा भरुन आलेल्या आभाळाबरोबरच जोरदार वाराही सुरु होता. मात्र दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. रोपवे साठी खूपच मोठी रांग होती. आमची तिकिटं आधीच काढलेली होती. पण जे तिथे तिकिटं काढत होते त्यांना फक्त एका बाजूचंच तिकिट देत होते कारण खराब वातावरणामुळे रोपवे कोणत्याही क्षणी बंद करावा लागणार होता. 
         आम्ही ट्राॅलीमध्ये बसून निघालो आणि पुढच्या दोन मिनीटांतच आमची ट्राॅली शुभ्र ढगांनी वेढली गेली. आजूबाजूला फक्त आणि फक्त शुभ्र ढगच दिसत होते. अर्थात आम्हाला बरेचदा मिळणारा हा अतिशय सुंदर, सुखद अनुभव घेत आम्ही रोपवेनं अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो. इथेही शुभ्र मेघांबरोबर सन्नाट वाराही होता. कितीही वेळा पाहिलं तरी कधीही मन न भरणारं असं अप्रतिम दृश्य पहातच आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. अतिशय नयनरम्य वातावरणामुळे सगळेच भाविक उत्साहात होते. किंचीतही थकायला होत नव्हतं. आम्ही गोरक्षनाथ मंदिरात पोहोचून दर्शन घेऊन पुढे शिखरावर निघालो.
          मंदिरात प्रवेश केला आणि मी श्री दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झाले. ऐन पौर्णिमेच्या दिवशीच चरण पादुकांना अष्टगंध विलेपन केलेलं नव्हतं हे लक्षात आलं आणि क्षणार्धात मनात आपलं काय चुकलं याची जाणीव झाली. प्रवासाच्या दिवशी घरी पहाटे पूजा करताना गिरनारला श्री दत्तात्रेयांना अर्पण करण्यासाठी अष्टगंध आणलं नसल्याचं लक्षात आलं होतं. गिरनारला जायचं नक्की ठरलं नसल्यानं मी आधी काहीच तयारी केली नव्हती. आणि लक्षात आल्यावर अष्टगंध घेऊन येण्याएवढा वेळ नव्हता. त्यामुळं ते न घेताच बाकी अर्पण करायच्या वस्तू नेल्या होत्या . पण जे राहिलं त्याची जाणीव मात्र श्री दत्तगुरुंनी मला करुन दिली होती. त्याबद्दल मनोमन क्षमा मागून, दर्शन घेऊन आम्ही परत अखंड धुनीच्या दर्शनाला निघालो. सोमवार असल्यानं धुनी प्रज्वलित होणार होती. पण आम्हाला तिथे पोचायला जरा वेळ लागला. तोपर्यंत धुनी प्रज्वलित झाली होती. मात्र प्रज्वलित धुनीचं दर्शन आम्हाला घडलं. काही भक्तांना पेटत्या ज्वालांमध्ये श्री दत्तात्रेयांचं प्रतिकात्मक दर्शन घडतं हे माहित आहे. मी धुनीचं दर्शन घेत असताना अचानक माझ्या मनात आलं आणि मी दत्तगुरुंना 'मला मिळेल का अशी काही अनुभूती की आत्ता या क्षणी तुमचं इथलं अस्तित्व मला जाणवेल' असं मनोमन म्हटलं. माझ्या मनात असं काही आलं आणि पुढच्या २-३ क्षणांत धुनीसाठी रचलेल्या उभ्या लाकडांमधली दोन लाकडं धुनीच्या बाहेर पडली. कुणाला ही साधी घटना किंवा योगायोग वाटू शकेल. पण माझ्यासाठी मात्र तो एक अतिशय सुंदर संकेत होता. माझे डोळे पाणावलेच आणि श्री दत्तात्रेयांना स्मर्तृगामी म्हणतात त्याची पुन्हा एकवार प्रचिती आली.
          धुनीचं दर्शन, प्रसाद घेऊन गोरक्षनाथ मंदिरात आलो, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली आणि पावसाला सुरुवात झाली. अर्थात हलकी भुरभुर सुरु झाली होती. पण कुठल्याही क्षणी जोरदार पाऊस येण्याची शक्यता होती. मात्र अंबा मातेच्या मंदिराजवळ पोहोचेपर्यंत हा पाऊस थांबला. रोपवे जवळ आलो पुन्हा सन्नाट वारा सुरुच आहे हे लक्षात आलं. रोपवे कुठल्याही क्षणी बंद करण्यात येईल अशी सूचना सतत दिली जात होती. नेहमीपेक्षा खूप कमी वेगाने रोपवे सुरु होता. त्यामुळं थोडा वेळ थांबावं लागलं पण रोपवेनंच पायथ्याशी यायला मिळालं. पायथ्याशी तलेटीला मात्र वाऱ्यापावसाचा मागमूसही नव्हता. अर्थात तलेटी आणि गिरनार पर्वत या दोन्ही ठिकाणचं वातावरण नेहमीच वेगळं असतं. तलेटीमधून वर पर्वतावर कसं वातावरण असेल याचा बिलकुल अंदाज येत नाही. 
          पायथ्याशी पोचून मुक्कामी परत आलो. थोडी  विश्रांती घेऊन लगेच मुक्काम सोडून भवनाथचं दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घेऊन तिथूनच रिक्षानं जुनागड बस स्थानकावर पोहोचलो. जुनागडहून बसने राजकोटला पोहोचलो. आणि रात्रीच्या ट्रेनने परतीचा प्रवास सुरु केला. माझ्यासाठी अगदी ऐनवेळी आणि अपेक्षा नसतानाही घडलेली गिरनारवारी अतिशय छान झाली होती. दत्तगुरुंनी आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. 

|| जय गिरनारी ||
- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वटपौर्णिमा

        यावेळी नेहमीप्रमाणं वटपौर्णिमेला गिरनारला जायचा माझा बिलकुल विचार नव्हता. पण माझ्या सहचरानं आधीच जाण्यायेण्याची रेल्वेची तिकीटं काढल...