Pages

Thursday, October 1, 2026

आदि कैलास आणि ओम पर्वत -१

         हिंदू धर्मामध्ये  अत्यंत पवित्र मानले गेलेले, भगवान शिव शंकराचे वास्तव्य असलेले पाच पर्वत हिमालयात आहेत. हे सारे  पर्वत भारत आणि तिबेट यांच्या सीमेवर असून या पंच कैलासांची यात्रा करणे हे शिवभक्तांसाठी परम मोक्षाचं साधन मानलं जातं.

          'कैलास मानसरोवर', 'आदि कैलास',  'श्रीखंड कैलास', 'किन्नोर कैलास' आणि 'मणीमहेश कैलास' या नावानं  हे पंच कैलास ओळखले जातात.  यातल्या 'आदि कैलास' आणि 'ओम पर्वत' या स्थानांची यात्रा करायची असं आम्ही ठरवलं. या स्थानांची सारी माहिती घेऊन एका यात्रा कंपनीबरोबर जायचं नक्की केलं. कारण ते स्वतः संपूर्ण यात्रेत आमच्या बरोबर असणार होते. 

          गणेश चतुर्थीनंतर ठरल्याप्रमाणं आम्ही २० सप्टेंबर रोजी सायंकाळी आदि कैलास यात्रेसाठी प्रस्थान केलं. यावेळी पहिल्यांदा रेल्वेने दिल्लीला जायचं ठरवलं होतं. साहजिकच दिल्ली ला पोचायला दुसरा दिवस उजाडला. २१ तारखेला सकाळ ८.३१ वाजता आम्ही दिल्लीला पोहोचलो. इथून पुढचा प्रवास आम्हाला ट्रॅव्हलर ने करायचा होता. दिल्ली ते हल्दवानी असा आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास सुरु झाला. मार्गात चहा, नाश्ता आणि भोजनासाठी थांबत थांबत आम्ही सायंकाळी ४.४५ वाजता हल्दवानीला आमच्या मुक्कामी पोहोचलो. दिवसभर प्रवास झाला असल्यानं सायंकाळी कुठलंही स्थल दर्शन नव्हतं. म्हणून सारी आन्हिकं आवरुन जवळच फिरून आलो.

          २२ तारखेला सकाळी ७ वाजता आम्ही मुक्काम सोडून पुढे निघालो. या दिवशी आम्ही काही मंदिरात दर्शनासाठी जाणार होतो. यात सर्वात आधी आम्ही एका आश्रमात गेलो.

'कैची धाम' - उत्तराखंड मधील नैनीताल जवळ कुमाऊँ पर्वतरांगांमध्ये हा आश्रम वसलेला आहे. इथं 'बाबा नीम करोली' यांचा आश्रम आणि 'हनुमान मंदिर' आहे. इथं दोन पर्वतरांगा कात्रीसारख्या एकत्र येतात म्हणून या आश्रमाला 'कैची धाम' हे नांव मिळालं. 'नीम करोली' बाबांचं मूळ नांव 'लक्ष्मण नारायण शर्मा' असं असून १९६४ साली त्यांनी या आश्रमाची आणि हनुमान मंदीराची स्थापना केली. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा भाविकांची प्रचंड गर्दी होती. गाड्या रस्त्यावर दिड दोन किमी अंतरापर्यंत उभ्या होत्या. आम्हीही गाडीतून वाटेत उतरुन मधल्या रस्त्यानं आश्रमाजवळ पोहोचलो. मात्र रांगेत उभं राहिल्यावर तासाभरात आम्हाला छान दर्शन घडलं. इथं नीम करोली बाबांचा पूर्णाकृती पुतळा, हनुमान मंदिर, वैष्णोदेवी मंदिर असं हे मंदिर संकुल आहे. ही सारी दर्शनं घेऊन आम्ही पुढे निघालो.

          'गोलु देवता मंदिर' - उत्तराखंड मधील अल्मोडा शहरात ८-१० किमी. अंतरावरील चितई गावात हे मंदिर आहे. 'गोलु देवता' ही 'न्यायाची देवता' म्हणून ओळखली जाते. अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे. इथं आपली मनोकामना लिखित स्वरुपात सांगितली जाते. आपली कामना लिहिलेला कागद इथं बांधला जातो. आणि इच्छापूर्ती झाल्यावर पितळी किंवा तांब्याची घंटा बाधली जाते. इथं त्वरित न्याय मिळतो, इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. या कारणानं या मंदिरात आपल्याला असंख्य घंटा बांधलेल्या पहायला मिळतात. गोलु देवतेला भगवान शिवांचा अंश म्हणून ओळखलं जातं. 'राजा झालु राय' आणि 'राणी कलिंगा' याचा पुत्र म्हणजे 'गोलु' देवता. हा न्यायदानासाठी प्रसिद्ध होता. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा गर्दी होतीच. पण आम्हाला छान दर्शन मिळालं. मंदिराच्या आवारात बांधलेल्या असंख्य घंटा आणि मनोकामना लिहून बांधलेले असंख्य कागद पहाणं हा एक वेगळाच अनुभव होता. 

          'जागेश्वर धाम' - अल्मोडा जिल्ह्यातील जागेश्वर धाम हे शिवमंदिर संकुल आहे. आम्ही पुढचं दर्शन घेण्यासाठी इथं पोहोचलो. ८ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत इथल्या मंदिरांचं निर्माण कार्य 'कात्युरी राजांनी' केलं. इथं १२५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत. यात 'मृत्युंजय' आणि 'जागेश्वर' ही दोन मुख्य मंदिरं असून 'कुबेर', 'नवग्रह', 'चंडिका', 'सूर्य' यांसह इतर अनेक मंदिरं आहेत. काळ्या पाषाणातील ही लहान मोठी मंदिरं अतिशय सुरेख आणि पहाण्यासारखी आहेत. यातील 'जागेश्वर मंदिर' हे आठवे ज्योतिर्लिंग 'नागेश ज्योतिर्लिंग' म्हणूनही ओळखलं जातं. तसा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर केलेला आहे. देवदार वृक्षांच्या घनदाट जंगलात आणि 'जटागंगा नदी'तीरावर हे मंदिर संकुल वसलेलं आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न पवित्र असं हे धाम आहे. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती. त्यामुळं आम्हाला सगळ्या मुख्य मंदिरात छान दर्शन मिळालं. सारा परिसर,मंदिरं फिरायला मिळाली. 

          कैची धाम, गोलु देवता मंदिर आणि जागेश्वर धाम या तीन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही रात्री 'पिथौरागढ' या गावात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

          २३ तारखेला सकाळी ७ वाजता आम्ही पिथौरागढचा मुक्काम सोडून पुढे निघालो. पिथौरागढ समुद्र सपाटीपासून ५,३३८ फुट उंचीवर आहे. इथून आम्ही पुढे १०,५०० फुट उंचीवर असलेल्या 'व्यास' खोऱ्यातील 'नापलच्यु' गावात मुक्कामाला जाणार होतो. हे गांव 'भारत', 'नेपाळ' आणि 'तिबेट' यांच्या नियंत्रण रेषेजवळ आहे. त्यामुळं वाटेत 'धारचुला' या गावात इनर लाईन परमिट आणि मेडिकल चेक अप हे दोन्ही करावं लागतं. त्यानुसार धारचुला इथं पोचल्यावर या साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या.

          इथून पुढं 'आदि कैलास' यात्रेची प्रत्यक्ष सुरुवात झाली. 'धारचुला' गावापर्यंत आम्ही ट्रॅव्हलर ने प्रवास केला होता. तिथून पुढं ट्रॅव्हलर ने जाणं शक्य नसतं. त्यामुळं आम्ही तिथं गाडी बदलली. इथून पुढचा प्रवास ४×४ जीपने करावा लागतो.  आम्ही एकुण दहाजणं असल्यानं दोन जीपची व्यवस्था केली होती. 'धारचुला' ते 'आदि कैलास' आणि 'ओम पर्वत' हा संपूर्ण रस्ता अतिशय दुर्गम, कच्चा आणि खड्या चढणीचा असल्यानं तिथं साध्या गाड्या चालत नाहीत. धारचुलाहुन आमचा जीपने प्रवास सुरु झाला. आणि रस्ता पुढे किती दुर्गम असणार याची झलक दिसायला लागली. अतिशय अरुंद, घाटवळणांचा कच्चा रस्ता, एका बाजूला उंच उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्यातून वाहणारी नदी असा एकुण मार्ग आहे. त्यातच रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी सतत दरडी कोसळून भलेमोठ्ठे दगड मार्गात दोन्ही बाजूला पडलेले असतात . अशा परिस्थितीत अगदी जेमतेम एक गाडी तिथून कशीबशी जाऊ शकते. अशा या अत्यंत खडतर रस्त्यावरुन आमचा प्रवास सुरु झाला.  या तीव्र चढ उताराच्या, दगडगोट्यांच्या, चिखलाच्या अरुंद रस्त्यावरून गाडी चालवणं अतिशय कौशल्याचं आणि जोखमीचं काम आहे .                            

          आजूबाजूचा परिसर मात्र अतिशय नयनरम्य होता. बेलाग पर्वत, खोल दरी आणि त्यातून वाहणारी काली नदी एकुणच अप्रतिम नजारा होता. धारचुला गावापासून काली नदी खळाळत, शुभ्र फेसाळत तर मध्येच काही ठिकाणी रौद्र रुप धारण करत आम्हाला साथ संगत करत होती. अशा सुंदर वातावरणात प्रवास करुन आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे 'नापलच्यु' गावात पोहोचलो. हे गाव अतिशय सुंदर आणि दुर्गम आहे. इथं मुक्कामासाठी फक्त होम स्टे ची सुविधा उपलब्ध आहे. आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रेच्या मुख्य मार्गावर हे गाव आहे त्यामुळे हे यात्रेचा बेस कॅम्प म्हणून इथं यात्रेकरु मुक्काम करतात. धारचुला सोडलं की मोबाईलची रेंज कमी होत पुढे पूर्ण नाहीशी होते. बाह्य जगाशी सतत संपर्क, मोबाईलचा अति वापर हे सारं बंद होतं. मनाला एक वेगळीच शांतता लाभते.  तिथल्या निसर्गाशी आपोआप एकरुप होतो आपण. धारचुलाच्या पुढे तापमानही तीव्रतेनं कमी होऊ लागतं. कडाक्याची थंडी सुरु होते. आम्ही 'नापलच्यु'ला पोहोचलो तेव्हा तिथंही तापमान खूपच कमी होतं. 

                                                                 क्रमशः

No comments:

Post a Comment

कविता

आदि कैलास आणि ओम पर्वत -१

           हिंदू धर्मामध्ये  अत्यंत पवित्र मानले गेलेले, भगवान शिव शंकराचे वास्तव्य असलेले पाच पर्वत हिमालयात आहेत. हे सारे  पर्वत भारत आणि ...