Pages

Monday, October 30, 2023

जय माता दी - २

           तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवरुन कटराहून आम्ही स्थलदर्शनासाठी धरमशाला इथे निघालो. मार्गात असणारी मंदिरं आणि इतर ठिकाणं पहात धरमशाला ला पोहोचायचं ठरवलं होतं. 

           त्यानुसार आम्ही एका मंदिरात दर्शनासाठी थांबलो. देवीमातेच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक नाभा माता मंदिर. अतिशय वेगळं आणि सुंदर असं हे मंदिर मिलीटरीच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे अतिशय स्वच्छ, सुरक्षित आणि कमी गर्दी असणारं हे मंदिर आहे. प्राचीन काळी राजा दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ केला होता. त्यावेळी त्याने आपली कन्या सती आणि जावई भगवान श्री शंकर महादेव यांना आमंत्रित केलं नाही. तरीही सती यज्ञस्थानी गेली असता राजा दक्षाने श्री शंकर महादेवांचा उचित सन्मान न केल्याने अपमानित होऊन सतीने त्याच यज्ञात उडी घेतली. महादेवानी क्रोधित होऊन सतीचा जळता देह उचलला आणि ते सैरावैरा पळू लागले. श्री विष्णूनी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी सुदर्शनचक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. हे अवयव जिथं जिथं पडले ती सारी स्थानं मातेची शक्तीपीठं  म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी मातेची नाभी पडल्याने या स्थानाला नाभा माता मंदिर ओळखलं जातं. हे मंदिर गुहेत असून इथे १२ ही महिने अखंड जलधारा स्त्रवत असतात. हे जलप्राशन केल्यास अनेक व्याधी दूर होतात अशी मान्यता आहे. इथे मातेच्या दर्शनाआधी शेषनागाचं स्थान आहे. हे दर्शन घेऊन मग चार पायऱ्या चढून वर मातेचं दर्शन घेतात. इथे वारंवार प्रत्यक्ष नागराजाचं दर्शन होतच असतं. इथे पडणाऱ्या जलधारेचं जल शेषनाग, शिवपिंडी आणि नाभा माता यांना चढवलं जातं. आम्हीही दर्शन घेऊन जल चढवून बाहेर आलो. हे जल आपल्याला तीर्थ स्वरूपात बरोबर नेता येतं. आम्हीही ते जल तिथेच विकत मिळणाऱ्या कॅनमध्ये भरुन घेतलं. तिथे कर्तव्य बजावत असेलल्या सैनिकांशी थोडा संवाद साधला आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. आमच्या गाडीच्या  पूर्वपरिचित ड्रायव्हरने आम्हाला या मंदिराची माहिती दिली आणि त्यामुळेच आम्हाला हे नाभा मातेच दर्शन घडलं होतं.

           आमच्या मार्गातलं दुसरं ठिकाण होतं ते म्हणजे अटल सेतु. पठाणकोट जवळ रावी नदीवर बांधण्यात आलेला ५९२ मीटर लांबीचा हा पुल आहे. हा पुल बशोली (कठुआ) ते दुनेरा (पठाणकोट) या मार्गावर आहे. या पुलामुळे पंजाब, जम्म-कश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य जोडली गेली आहेत. २४ डिसेंबर २०१५ रोजी माजी संरक्षणमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलाय. केबल स्टेड पध्दतीचा हा पुल पहाण्यासाठी आम्ही गाडी थांबवली आणि पायी चालत पुलावरून फिरुन छायाचित्रं काढली आणि मग पुलावरूनच पलीकडे पठाणकोटवरुन पुढे निघालो. 

           इथून पुढे जाईपर्यंत सूर्यास्ताची वेळ होत आली होती म्हणून आम्ही आधी गेलो ते नड्डी सनसेट पाॅईंटला. आम्ही पोहोचलो आणि पुढच्या १५-२० मिनिटांतच सुंदर असा सूर्यास्त पहायला मिळाला. नड्डी पाॅईंटला जाण्याआधी जवळच दल लेक आहे. साधारण आयताकृती आकाराचा हा सुंदरसा तलाव आहे. सूर्यास्ताची वेळ होत आल्याने तलाव गाडीतून बघितला आणि पुढे नड्डी पाॅईंटला गेलो. 

            हे सगळं पहात, थांबत, फिरत गेल्यामुळे धरमशाला ला पोहोचेपर्यंत तिन्हीसांज होऊन गेली. मग मात्र मुक्कामाच्या ठिकाणीच गेलो.

           चौथ्या दिवशीही सकाळी लवकरच आवरुन आम्ही फिरायला बाहेर पडलो. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळचंच स्थलदर्शन करायचं असल्याने चालत निघालो. 

           जेमतेम ५-७ मिनीटात आम्ही पोहोचलो ते भागसूनाग मंदिरात. हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. याची एक कथा सांगितली जाते ती अशी - द्वापारयुगात मध्य काळात असुरांचा राजा भागसू याची अजमेर ही राजधानी होती. एकदा राज्यात प्रचंड दुष्काळ पडला. पिण्यासाठीही पाणी मिळेनासं झालं तेव्हा प्रजेनं राजाला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही हे गांव सोडून इतरत्र निघून जाऊ असं सांगितलं. राजानं त्याना पाण्याची व्यवस्था करतो असं सांगून तो पाण्याच्या शोधात निघाला असता इथल्या नागदेवांच्या प्रदेशात पोहोचला. या भागसूनाग पासून साधारण १८,००० फूट उंचावर धौलाधार पर्वत शिखरावर एक सरोवर त्या राजाला दिसलं. त्या  'नागडल' नावाच्या एकांत सरोवराचं जल मायावी भागसूने आपल्या कमंडलूमध्ये भरलं आणि तो परत निघाला. चालता चालता अंधार झाला म्हणून या स्थानी तो विश्रांतीसाठी थांबला. इकडे आपलं सरोवर कोरडं पडल्याचं नागांच्या ध्यानी आलं आणि ते शोध घेत भागसूजवळ आले. याठिकाणी नाग आणि भागसू यांच्यात तुबळ युद्ध झालं. त्यात कमंडलु मधील जल खाली पडलं आणि तेव्हापासून या ठिकाणी निरंतर जलधारा वहात आहेत. नागानी भागसूला पराजित केलं. नागही शिवभक्तच आहेत हे भागसूच्या ध्यानात आलं. त्याने पराजय स्वीकारुन शिवाला प्रार्थना केली की माझा मृत्यू निश्चित आहे पण मी हे माझ्या प्रजेसाठी केलंय तेव्हा शिव शांत झाले. भागसूने हे जल प्रजेपर्यंत पोहोचून त्यांचं रक्षण व्हावं आणि शिवाच्या हातून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करुन आपलं आयुष्य संपवलं. मग नागराजांनी जलवर्षा करुन प्रजेचं रक्षण केलं आणि आपल्या नावाआधी भागसूचं नावं जोडून त्याला अमरत्व प्रदान केलं.  अशा या सुंदर प्रशस्त मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. जलधारेजवळच असलेल्या शिवपिंडीवर जल चढवलं. 

           मंदिर दर्शन करुन आम्ही तिथून पुढे असलेला धबधबा पहायला गेलो. पण धबधब्याला पाणी कमी असल्याने फार पुढे न जाता परत निघालो. या संपूर्ण मार्गात अनेक दुकानं आहेत. तिथे थांबून खरेदी केली. खूप सारी खरेदी करुन पुढचं ठिकाण पहाण्यासाठी निघालो. 

           आम्ही चालतच पोहोचलो ते मॅक्लोडगंजला. मॅक्लोडगंज हे धरमशालेचं उपनगर. तिबेटी लोकांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे याला 'लिटिल ल्हासा' म्हणूनही ओळखलं जातं. धरमशालेपासून ९ किमी अंतरावर हे नगर वसलंय. या गावात बौद्ध धर्मातील काही महत्त्वाचे मठ आहेत. नामग्याल, त्सुग्लागखांग हे त्यातलेच मठ. दलाई लामा जेव्हा भारतात आले तेव्हा वास्तव्यासाठी त्यांनी धरमशालेची निवड केली आणि तेव्हापासून हिमालयाच्या धौलाधार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचा संपूर्ण कायापालट झाला. या गावाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. या दलाई लामांचा मठही मॅक्लोडगंज मध्येच आहे. अतिशय प्रशस्त, देखणा आणि एकदम शांत असा हा मठ आम्ही पहायला गेलो. मठात सर्वत्र असते तशीच गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. दलाई लामांचं वास्तव्य त्याच मठात होतं. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पहाणं, भेटणं अशक्यच होतं. तिथून निघून परत मार्केटमध्ये गेलो. मॅक्लोडगंजचं मार्केट खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तिबेटियन हस्तकलेच्या वस्तू तसंच कपडे आणि इतर वस्तू मिळतात. तसंच तिबेटियन लोकांच्या खानावळीही इथं आहेत. त्यात मोमोज, ठुक्का असे पदार्थ विशेषकरून मिळतात.

           हे सारं फिरुन पाहून आम्ही गाडीने पुढे निघालो आणि पोहोचलो ते चहाच्या मळ्यात. अगदी रस्त्याच्या कडेलाच असलेला हा चहाचा मळा खूप मोठ्या परिसरात पसरला होता. चहाची झुडुपं साधारण तीन फुटांवर वाढली की वरच्या पानांची तोडणी केली जाते. मग ही पानं वाळवून त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करुन त्या पानांची पावडर तयार केली जाते. साधारण १०० किलो चहाच्या पानांपासून २० किलो पावडर तयार होते. मग टेस्टर या चहाचा दर्जा ठरवतात. चहाची चव , रंग, वास यावर चहाची प्रत ठरते. आणि किंमत ठरवण्यासाठी चहाचा लिलाव केला जातो. जगभरात एकूण १३ ठिकाणी ही लिलाव केंद्र आहेत. या झुडुपावर पांढऱ्या रंगाची आणि पिवळे केसर असलेली नाजूक छोटी फुलं येतात. आम्ही जो मळा बघायला गेलो होतो त्यातील अर्ध्या भागातील पानांची तोडणी झाली होती. पण फक्त वरच्या भागातीलच पानं तोडली जात असल्याने एकूण मळा अतिशय हिरवागारच दिसतो. मळ्यात थोडं फिरुन समोरच असलेल्या त्यांच्या चहाच्या दुकानात गेलो. त्या फॅक्टरी आउटलेट मध्ये त्यांच्याकडे तयार होणारे चहाचे सर्व प्रकार विक्रीसाठी उपलब्ध होते. तिथे खरेदी करुन आम्ही पुढे निघालो.

           आमचं पुढचं ठिकाण होतं हिमाचल प्रदेशचं राज्य युद्ध स्मारक. १९४७, १९६२, १९६५ आणि १९७१ साली झालेल्या युध्दात ज्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या साऱ्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक बांधण्यात आलंय. इथे प्रत्येक सैनिकाचं नांव आणि त्याची बटालियन कोरण्यात आलंय. तसंच काही तोफा, विमान, लहान रणगाडे, विक्रांत ची प्रतिकृती इ. ठेवण्यात आलंय. हे सारं पाहून आम्ही परत मुक्कामी पोहोचलो. पाचव्या दिवशी सकाळी आरामात आवरुन धरमशालेचा मुक्काम संपवून आम्ही जम्मूला परत निघालो. दुपारीच जम्मूला मुक्कामी पोहोचलो. 

           थोडा आराम करुन सायंकाळी बाहु किल्ल्यामधील महाकाली मातेच्या दर्शनासाठी जायचं ठरवलं. त्यादिवशी सप्तमी असल्याने मंदिरात दर्शनासाठी खूपच गर्दी असेल अशी माहिती आम्हाला मिळाली होती. पण तरीही आम्ही जायचं ठरवलं खूपच मोठी रांग असेल तर कळसाचं दर्शन घेऊन परत यायचं असं ठरवून निघालोच. मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर प्रचंड गर्दी जाणवली नाही. मग पुढे जाऊन दर्शनासाठी रांगेत उभं राहिलोच. महाकाली माता ही इथे बावे वाली माता या नावानंही ओळखली जाते. हे वैष्णोदेवीच्या नंतरचं दुसरं तीर्थ स्थल मानलं जातं. त्यामुळे इथे भाविकांची सतत अतिशय गर्दी असते. महाराजा गुलाब सिंह यांनी १८२२ साली या मंदिराची निर्मिती केली. पौराणिक कथेनुसार याआधी ३०० वर्षांपूर्वी महाकाली देवीने पंडित जगत राम शर्मा यांना स्वप्न दर्शन दिलं आणि आपण या पर्वतावर शीळेच्या रुपात उपस्थित असल्याचं सांगितलं.  त्यानंतर काही काळातच अशी शीळा सापडली आणि याठिकाणीच हे मंदिर महाराजा गुलाब सिंह यांनी बांधलं. मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेली महाकाली मातेची मूर्ती आहे. दर रविवारी आणि मंगळवारी देवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रातही खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. खूप मोठ्या संख्येने यावेळी भाविक उपस्थित असतात. दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा तिळमात्रही अंदाज नसताना आम्ही रांगेत उभं राहिलो होतो. मात्र देवीच्या कृपेने अगदी अर्ध्या तासातच आम्हाला मातेचं सुंदर दर्शन घडलं, प्रसादही मिळाला. मनाला अतिशय समाधान लाभलं. दर्शन घेऊन आम्ही बाजूच्या दुसऱ्या मंदिरात गेलो. इथे गर्दी कमी असल्याने दर्शन, प्रसाद घेऊन मातेसमोरच जरावेळ बसलो. मी  मनोमन श्रीसुक्त म्हणत डोळे मिटले आणि एका क्षणी माझ्या डोळ्यांसमोर साक्षात महालक्ष्मी उभी राहिली. लाल रंगाची नऊवारी साडी, सुवर्णाची आभुषणं ल्यायलेली देवी महालक्ष्मी मला मिटल्या नेत्री दिसत होती. मी नमस्कार केला आणि जाणवलं देवीचं निर्गुण रुप माझ्यासमोर सगुण साकार झालं होतं. दिवसभर मनात असलेली रुखरुख क्षणात नाहीशी झाली. आणि डोळ्यात आसू तरळलेच. त्यादिवशी सप्तमी होती. सायंकाळी महालक्ष्मी उभी रहाणार होती आणि आम्ही त्यावेळी जम्मू ला असल्याने आम्हाला महालक्ष्मीचं प्रत्यक्ष दर्शन होणार नव्हतं. हिच रुखरुख दिवसभर मनात होती. पण माझी दर्शनाची इच्छा देवी महालक्ष्मीने अतिशय वेगळ्या रितीने का होईना पूर्ण केली होती. मन अगदी प्रसन्न झालं. दर्शन घेऊन आम्ही रुमवर परत आलो.

           सहाव्या दिवशीही सकाळी लवकर आवरुन परत रघुनाथ मंदिरात जायचं ठरवलं. आम्ही रघुनाथ मंदिराच्या अगदी जवळच राहिलो होतो. त्यामुळे सकाळी लवकर दर्शनासाठी गेलो. मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. अतिशय सुंदर दर्शन घडलं. श्री रामरायाचं दर्शन घेऊन बाजूच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि आरती सुरु झाली. मुख्य मंदिरात आरती सुरु करुन भोवतीच्या सगळ्या मंदिरात ती आरती फिरवतात. झांज आणि घंटेच्या नादात ती आरती पहाण्याचा अनुभव सुंदरच असतो. आरती संपेपर्यंत आमचंही बऱ्याच मंदिरात दर्शन घेऊन झालं होतं. या मंदिरांमध्येच देवीचंही मंदिर आहे. यात देवीची नऊ रुपं साकारली आहेत. त्यादिवशी अष्टमी होती. आणि आम्हाला देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. आरती संपली आणि पंडीतजीनी आम्हाला आरती घ्यायला बोलावलं. आरती घेऊन आम्ही परत मंदिरात दर्शनासाठी गेलो. परत एकदा डोळे आणि मन भरुन श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि पंडितजीनी गरमागरम कढाईप्रसाद हातावर ठेवला. आरतीच्या वेळेस नुकताच नैवेद्य दाखवून झाला होता आणि आम्हाला लगेचच तो प्रसाद मिळाला हा योग आमच्यासाठी खूपच खास होता. अष्टमीच्या दिवशीच सकाळी खूप सुंदर दर्शन घडल्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं होतं. मंदिरातून परत फिरावसंच वाटत नव्हतं. पण परतीच्या प्रवासाची वेळ होत आली होती. त्यामुळे इथेही पून्हा दर्शनाचा योग यावा अशी मनोमन प्रार्थना करुन रुमवर परत आलो. 

           माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी वर्षभरात केव्हाही गेलं तरी मन अगदी तृप्त होतंच पण नवरात्रीत घेतलेल्या दर्शनाने मनाबरोबरच आपले नेत्रही तृप्त होतात. कारण नवरात्रीत वैष्णोदेवीच्या दर्शनमार्गावर केली जाणारी अतिभव्य आणि अप्रतिम अशी पुष्पसजावट इतरत्र कुठे केली जात नाही.

           यात्रा पूर्ण करुन सगळं आवरून सामान घेऊन जम्मू विमानतळावर पोहोचलो. तिथून विमानाने  सायंकाळी घरी पोहोचलो.

- स्नेहल मोडक







Friday, October 27, 2023

जय माता दी - १

             गतवर्षी नवरात्रातही माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा सुंदर योग आला होता आणि माता वैष्णोदेवीचं छान दर्शन घडलं होतं. परत यावर्षीही नवरात्रात असा योग यावा आणि मातेचं दर्शन घडावं अशी तीव्र इच्छा होती. पण काही कारणास्तव हे आधीपासून ठरवता आलं नाही. पण मनापासून असलेली इच्छा आणि प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेची कृपा यामुळे उशिरा का होईना आम्ही तिच्या दर्शनाला जायचं ठरवलंच. 

           ठरल्याप्रमाणे नवरात्र सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनंतर विमानाने जम्मूला पोहोचलो. तिथून पुढे जाण्यासाठी आधीच गाडी ठरवली होती, त्या गाडीने निघालो. 

           जम्मूला आम्ही पोहचण्याआधीच पाऊस सुरु झाला होता. जोरदार पाऊस पडत होता आणि त्यामुळे थंडीही खूप होती पण एकूण वातावरण मात्र  छान आल्हाददायक होतं. घटस्थापनेपासून तिथे रोज पाऊस पडतच होता. वैष्णोदेवीलाही २-३ दिवस जोरदार पाऊस  पडत होता. त्यामुळे सगळीकडेच कडाक्याची थंडी पडली होती. पण एवढ्या थंडी पावसातही भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती.

           आम्ही त्या पावसातच पोहोचलो ते रघुनाथ मंदिरात. जम्मू विमानतळापासून ६-७ किलोमीटरवर असलेलं हे प्राचीन रघुनाथ मंदिर. जम्मू शहराच्या जून्या भागात आणि तावी नदीच्या उत्तरेला वसलेलं हे श्रीराम मंदिरांमधील एक प्रमुख मंदिर. अतिशय भव्य आणि अप्रतिम असं हे मंदिर डोगरा समाजात फार महत्त्वाचं मानलं जातं. हे विशाल मंदिर पूर्ण होण्यास २५ वर्षं लागली. १८३५ मध्ये महाराजा गुलाब सिंह यांनी समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रेरणेने या मंदिराची निर्मिती सुरु केली आणि १८६० मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण झालं. समर्थ श्री रामदास स्वामी अयोध्येहून जम्मूला भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले होते. त्यांनी महाराजा गुलाब सिंह हे राजा होतील अशी केलेली भविष्यवाणीही सत्य झाली होती. वास्तूकलेचा अतिशय सुंदर नमुना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींना सुवर्णाचा मुलामा देण्यात आला आहे. गर्भगृहात श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या रेखीव मूर्ती आहेत. तसंच या मंदिरात सात धार्मिक स्थळं आहेतच त्याशिवाय अनेक देवदेवतांच्या रेखीव मूर्तींनी प्राणप्रतिष्ठित छोटी मंदिरं आहेत. त्याचबरोबर ३३ कोटी देव हे लिंग स्वरूपात इथे प्रतिष्ठित आहेत. मुख्य मंदिराच्या चार बाजूंनी चारधाम म्हणजेच रामेश्वर, द्वारकाधीश, बद्रीनाथ आणि केदारनाथ हेही दर्शन आपल्याला घडतं. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी असतेच. श्रीरामनवमीला इथे खूप मोठा सोहळा होतो. अशा या ऐतिहासिक मंदिरावर २००२ सालच्या मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात आतंकी हल्ला झाला होता. त्यानंतर हे मंदिर बराच काळ भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. २०१३ साली पून्हा हे मंदिर पूर्ण सुरक्षेत भाविकांसाठी उघडण्यात आलं. आम्ही या मंदिरात गेलो तेव्हा दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे लगेच दर्शन घेता आलं. श्रीरामरायासमोर नतमस्तक झालो आणि अतिशय सुंदर दर्शन घडलं. नंतर इतर साऱ्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढे निघालो. 

           महाराजा हरि सिंह यांचा राजवाडा म्हणजेच अमर महाल पहाण्यासाठी आम्ही थांबलो होतो. हा राजवाडा जम्मू काश्मीर चे अखेरचे राजा महाराजा हरि सिंह यांच्यासाठी विसाव्या शतकात बांधण्यात आला होता. फ्रेंच वास्तुविशारदाच्या योजनेनुसार फ्रेंच शैलीत याचं बांधकाम करण्यात आलंय. १९९० साली या अमर महालात संग्रहालय आणि ग्रंथालय सुरु करण्यात आलंय. या संग्रहालयात महाराजा हरि सिंह यांच १२० किलो वजनाचं सुवर्ण सिंहासन आजही आपल्याला पहायला मिळतं.

           राजवाडा बघून आम्ही निघालो देवीच्या मंदिरात. कोल कंडोली माता मंदिर. वैष्णोदेवीच्या यात्रेत ५ मुख्य स्थानं आहेत. बाणगंगा, चरणपादुका, अर्धकुमारी, भवन आणि भैरवनाथ. पण या यात्रेच्या आधी पहिलं दर्शन कोल कंडोली मातेचं घ्यावं अशी मान्यता आहे. जशी भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय वैष्णोदेवीची यात्रा अपूर्ण मानली जाते तशीच सुरुवातही कोल कंडोली मातेच्या दर्शनानेच केली जाते. हे मंदिर जम्मू पासून १५ किमी. अंतरावर नगरोटा या गावात आहे. कोल म्हणजे कटोरा आणि कंडोली म्हणजे कवड्या. कोल कंडोली मातेने एकूण चार वेळा या स्थानी चांदीचे कटोरे उत्पन्न केले होते. तसंच माता इथल्या स्थानिक कुमारिकांबरोबर कवड्या आणि इतर खेळ खेळत असे. यावरुनच या देवीला कोल कंडोली माता हे नाव रुढ झालं. पौराणिक कथेनुसार माता वैष्णोदेवी द्वापारयुगात पाच वर्षीय कन्येच्या स्वरुपात इथे प्रकट झाली होती. याच स्थानी माता वैष्णोदेवीने १२ वर्षं तपस्या केली आणि त्याच स्थानी  पिंडी स्वरुपही धारण केलं. आणि त्याच काळात माता कोल कंडोलीने विश्वशांतीसाठी होमहवन केलं होतं. आणि चांदीचा कटोरा निर्माण करुन त्यात विविध पदार्थ निर्माण करुन ३३ कोटी देवांना भोजन दिलं होतं. आम्ही या मंदिरात दर्शनासाठी गेलो तेव्हा तिथेही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे शांतपणे मातेचं दर्शन घेता आलं सुंदर दर्शन घडलं, पंडीतजींनी सगळ्यांना प्रसादही दिला. हे मंदिरही प्रशस्त आहे आणि परिसरही छान आहे. म्हणूनच जम्मूला गेल्यावर रघुनाथ मंदिर, पॅलेस, कोल कंडोली माता मंदिर या ठिकाणी आम्ही  जातोच.

           कोल कंडोली मातेचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या मुक्कामी कटरा ला पोहोचलो. जम्मूला विमानतळावर उतरल्यानंतर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आवश्यक अशा RFID card बद्दल चौकशी केली असता ते रात्री ९ नंतर मिळेल असं सांगितलं होतं. कटराला पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही परत ते कार्ड घेण्यासाठी बाहेर पडलो. RFID card counter वर गेल्यावर मात्र लगेच ते कार्ड मिळालं. 

           दुसऱ्या दिवशी पहाटे आन्हिकं आवरुन माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालो.

           भारतातील हिमालय पर्वतरांगेतील वैष्णोदेवी हे अतिशय पवित्र आणि लोकप्रिय असं श्रध्दास्थान. जम्मूमधल्या कटरा शहरातील त्रिकुट पर्वतावर हे वैष्णोदेवीचं स्थान आहे. दुर्गादेवीचा एक अवतार म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ४५ किलोमीटरवर असलेल्या कटरा शहरापासून १४ किलोमीटरची चढाई करुन वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावं लागतं. ज्यांना हे संपूर्ण अंतर पायी चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी घोडा, पालखी, पिठ्ठू असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कटरा ते सांजीछत अशी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे. जाता - येता दोन्ही वेळा किंवा एकच वेळ अशी हेलिकॉप्टरची सेवा आहे. 

        त्रिकुट पर्वतावर असलेलं हे वैष्णोदेवी मंदिर एका गुहेमध्ये स्थित आहे. भैरवनाथाने वैष्णोदेवीचा आदिशक्तीला वश करण्यासाठी पाठलाग केला. माता वैष्णोदेवी या त्रिकुट पर्वतावर आली आणि एका ठिकाणी थांबून तिने भैरवनाथ मागोमाग येत असल्याची खात्री करुन घेतली. त्या स्थानाला चरणपादुका दर्शन असं नांव आहे.  

         माता ज्या गुहेत जवळपास ९ महिने राहिली त्या गुहेला 'गर्भजून' किंवा अर्धकुमारी गुंफा म्हणून ओळखतात. वैष्णोदेवी मातेबरोबरच हनुमानजी तिच्या रक्षणासाठी उपस्थित होते अशी मान्यता आहे. हनुमानजीना तहान लागली म्हणून वैष्णोदेवीने बाण मारुन पर्वतामध्ये जलधारा उत्पन्न केली आणि या धारेत मातेनं आपले केस धुतले. आता ही जलधारा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. या जळात स्नान केल्याने किंवा हे जल प्राशन केल्याने श्रध्दावानांचा सारा थकवा आणि अडचणी दुर होतात असं म्हणतात.

         ज्याठिकाणी वैष्णोदेवी मातेने भैरवनाथांचा वध केला होता त्या ठिकाणाला भवन म्हणून ओळखलं जातं. भैरवनाथांचा वध केल्यावर त्याचं शिर दूरवर जाऊन पडलं. तिथं भैरवनाथ मंदिर बांधण्यात आलं आहे. त्यालाच भैरोघाटी असंही म्हणतात.

          भैरवनाथांचा वध केल्यानंतर त्याना आपली चूक कळली आणि त्यांनी वैष्णोदेवी मातेची क्षमायाचना केली. तेव्हा मातेने त्यांना क्षमा करुन सांगितलं की माझं दर्शन घेतल्यानंतर तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. भैरवनाथ मंदिर दर्शनासाठी ३ किलोमीटर अंतर चढून जावं लागतं. त्यासाठी पायऱ्या, आणि साधा रस्ता अशी दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे. त्याशिवाय घोडा, पालखीचीही सोय आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून भवन ते भैरवनाथ अशी रोपवे ची ही व्यवस्था करण्यात आली आहे.

          वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायचं खूपच उशिरा ठरल्यामुळे आम्हाला विमानाची तिकिटं मिळाली तरी कटरा ते सांजिछत ही हेलिकॉप्टरची तिकीटं मिळाली नव्हती. त्यामुळे दर्शनासाठी एक तर पायी चढून जाणं किंवा घोड्यावरुन जाणं हेच पर्याय होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी बघता दर्शनाला लागणाऱ्या वेळेचा विचार करुन आम्ही घोड्यावरुन जायचं ठरवलं. २-३ दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घोड्यावरुन जाणं थोडं त्रासदायक वाटत होतं. कारण पावसाने मार्ग निसरडा होतो आणि घोड्यावरुन जाणं किंवा चालणंही त्रासाचं होतं. पण आम्ही वेळेअभावी घोड्यावरुनच जायचं ठरवलं. पहाटे निघालो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हता. असाच दिवस पूर्ण कोरडा असावा आणि मातेचं छान दर्शन घडावं अशी प्रार्थना करुन प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात केली. थोडं थांबत थांबत साधारण ३ तासांनी आम्ही वरती घोडेतळावर पोहोचलो. तिथून चालायला सुरुवात केली आणि एका क्षणी खिळून थांबलोच. कारण आमच्यासमोर होता विविधरंगी ताज्या फुलांच्या सजावटीचा अप्रतिम नजारा. दरवर्षी नवरात्रात भवनच्या दर्शनमार्गावर ही सजावट केली जाते. जागोजागी देवदेवतांच्या मूर्ती आणि ही अप्रतिम पुष्परचना केली जाते. अगदी खरं सांगायचं तर ही देखणी आरास पाहून आपले नेत्र थकतात पण मन काही भरत नाही. ही आरास पहाताना ती करणाऱ्या कलाकारांचं आपण मनोमन कौतुकच करत असतो.

           अशी ही अप्रतिम सजावट पहात, छायाचित्रं काढतच आम्ही दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. जेमतेम दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर आम्ही प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेच्या दरबारात पोहोचलो. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे मातेसमोर जेमतेम २ क्षणच उभं रहाता येतं तेवढ्या वेळेतच डोळे भरुन दर्शन घ्यावं लागतं अर्थातच मन काही भरत नाही. पण त्या २ क्षणांच्या दर्शनाने मन प्रसन्न होतंच आणि जाणवतं याचसाठी केला होता अट्टाहास. मनोमन असाच वारंवार दर्शनाचा योग यावा अशी प्रार्थना करत मातेचं दर्शन घेऊन परत फिरलो आणि देणगी अर्पण करुन प्रसाद घेतला. थोडंसं चालत जिथे आमचे घोडे थांबले होते तिथे पोहोचलो. परत घोड्यावर बसून भैरवनाथाच्या दर्शनासाठी निघालो. भवनपासून ३ किमी. अंतरावर भैरवनाथ मंदिर आहे. मंदिरात दर्शनासाठी खडी चढाई चढून जावं लागतं. त्यामुळे आम्ही परत घोड्यावर बसूनच दर्शनाला गेलो. तिथेही २०-२५ मिनिटं रांगेत उभं राहिल्यानंतर भैरवनाथाचं छान दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही घोड्यावरुनच पुन्हा कटरा इथे जायला निघालो. परतीचा मार्ग उताराचा असल्याने यावेळी  वाटेत कुठेही न थांबता २.३० तासात कटरा ला पोहोचलो. तिथून पुढं एक दिड किमी. अंतरावर असलेल्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी चालत गेलो. जाता - येता दोन्ही वेळा घोड्यावरुन जाऊनही खूप थकवा आला होता. एवढा वेळ घोड्यावर बसायची बिलकुल सवय नसल्याने त्रास होत होता पण वैष्णोदेवी मातेचं सुंदर दर्शन घडल्यामुळे मन मात्र प्रसन्न होतं.

- स्नेहल मोडक

   




   



Wednesday, October 11, 2023

आठवणी

सुखद आठवणीच जमा करायच्या

नकोशा आठवणी मात्र विसरायच्या

छानशा आठवणींचा गोफ विणायचा

अन स्मितहास्याचा गोंडा लावायचा

वाईट आठवणी मनी खोल ठेवायच्या

अन मनोबंधनाच्या कड्या लावायच्या

सदैव साथ देणाऱ्याना नित्य जपायचं

बाकी कोण कसं वागलं हे विसरायचं

एकांतात आठवांची कवाडं उघडतात

मिटल्या पापण्यांतून आसू ओघळतात

मनमुक्त बोलायला कुणीच साथ नसतं

मग स्वतःच स्वतःला सावरायचं असतं

क्षणी आनंदाच्याही आठवणी दाटतात

अन भावनांच्या हिंदोळ्यावर झुलतात

मन जणू आठवांचा खोल डोह असतो

हलक्या स्पर्शानेही त्यावरी तरंग उठतो

- स्नेहल मोडक

Thursday, October 5, 2023

गिरनार आणि उपरकोट - सप्टेंबर २०२३

             भाद्रपद पौर्णिमा - ज्या दिवसाची आम्ही दोघं आसुसून वाट पहात होतो ती ही पौर्णिमा. या आधीच्या सलग तीन पौर्णिमांना केवळ माझ्या बिघडलेल्या तब्येतीमुळे आम्हाला गिरनार गुरुशिखर दर्शन घडलं नव्हतं. त्यामुळे ही पौर्णिमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. यावेळीही तब्येतीचा थोडा त्रास होणार हे माहित असूनही जायचंच असं ठरवलं होतं. 

             रेल्वेचं आरक्षण आधीच केलं असल्याने ती चिंता नव्हती. नेहमीसारखं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 'यावेळी निर्विघ्न आणि सहजसुंदर दर्शन घडवा' अशी श्री दत्तगुरुंना प्रार्थना करुन निघालो. जूनागढला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढून स्थानापन्न झालो.  प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ट्रेनमध्ये गिरनारला जाणारे दत्तभक्तच मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे रेल्वेच्या बहुतेक सर्वच डब्यांमध्ये अतिशय छान वातावरण असतं. यावेळीही आमच्या बाजूच्या लोकांशी आमचा संवाद सुरु झाला आणि कळलं ते सगळेजण याच्याच ऑफिसमधील एका सहकारी मित्राबरोबर गिरनारला निघाले आहेत. मात्र ते सहकारी मित्र त्यावेळी इतर लोकांची व्यवस्था बघण्यासाठी दुसरीकडे फिरत होते. 

             साधारण १५-२० मिनिटांनी आमच्या गप्पा सुरु असतानाच सदैव आमच्या समवेत असणारे याचे मित्र आणि ते सहकारी मित्र असे दोघंही अचानक आमच्या समोर आले आणि 'तुम्हाला काहीतरी द्यायचंय' असं म्हणत त्या सहकारी मित्रांनी आमच्या दोघांच्याही हातात एक-एक माळ दिली. आणि या माळा गिरनारचे पीठाधिपती महंत श्री महेश गिरी बापूंनी पूजा करुन, गुरुपादुकांना स्पर्श करुन दिल्या आहेत असं सांगितलं. मला बोलायला शब्दच सुचत नव्हते. डोळ्यांत येणारं पाणी अडवत माळ भाळी लावली.

              हा दिवस होता अनंत चतुर्दशीचा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचं म्हणजेच श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने चौदा विश्वं निर्माण केली होती. या विश्वाच्या देखभाल आणि संरक्षणासाठी तो चौदा रुपात प्रकट झाला म्हणजे अनंत रुपात प्रकट झाला म्हणून अनंत चतुर्दशीला श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. म्हणूनच अनंत चतुर्दशी हा दिवस जसा गणेशोत्सवाचा अखेरचा, बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस तसंच श्री विष्णूंच्या पूजनाचा दिवस.

              भगवान श्री विष्णू -देवी श्री लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांना अतिशय प्रिय असलेली एक वस्तू म्हणजे वैजयंती माळ. भगवान श्रीकृष्ण नेहमीच ही माळ धारण करीत. वैजयंती  म्हणजे विजय मिळवून देणारी, यश संपादन करुन देणारी माळ. वैजयंती ही एक वनस्पती आहे. यावर लाल आणि पिवळ्या रंगाची सुंदर आणि सुंगधी फुलं येतात. याच्या बियांपासून ही माळ तयार करण्यात येते. चकचकीत अशा या बिया कधीही सडत किंवा तुटत नाहीत. काही विद्वानांच्या मते या माळेत पाच प्रकारचे मणी गुंफले जातात, जे पंचमहाभूतांचे प्रतिक असतात. ही माळ धारण करणं अतिशय शुभ फलदायी असतं. आणि आम्हाला प्रसाद म्हणून अशी वैजयंती माळच मिळाली होती. भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली ही वैजयंती माला अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी आम्हाला प्रसाद स्वरूपात मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे .स्वप्नातही न येता, न मागता स्वयं श्री दत्तात्रेयांनी आम्हाला एवढी मोठी प्रसाद भेट दिली होती. गिरनार प्रवासाची सुरुवातच शुभ संकेताने झाली होती.

              पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला गेलो. मुक्काम स्थानी जाऊन सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. पहिल्या पायरीचं, लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोप वे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. तिथून पुढे पायऱ्या चढून गुरुशिखरावर गेलो. मंदिरात प्रवेश करुन गुरुपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि डोळ्यात पाणी आलंच. सलग तीन पौर्णिमेनंतर श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे दर्शन घडल्यावरही मन शांत व्हायला काही क्षण लागलेच. दर्शन घेऊन परत खाली कमंडलू कुंडाजवळ गेलो. पोथीचं वाचन, दर्शन, प्रसाद घेऊन परत खाली निघालो. गोरक्षनाथ, अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोप वे जवळ पोहोचलो. आमच्या बरोबर असलेले काही जणं थोडं मागे राहिले होते. त्यामुळे त्यांची वाट पहात थांबलो. कारण रोप वे ने एकत्रच जायचं होतं. 

              १५-२० मिनिटं झाली आणि रोपवे चे अधिकारी येऊन सांगू लागले की ज्यांना रोपवेने पायथ्याशी जायचं आहे त्यांनी लगेच चला. वातावरण बिघडलं आहे , त्यामुळे रोपवे कुठल्याही क्षणी बंद करावा लागेल. झालं, आमची काळजी वाढली.  मागे राहिलेल्यांना लवकर बोलावण्यासाठी सतत फोन करु लागलो. अखेर ते रोप वे जवळ आले आणि आम्ही निघालो. ट्राॅलीमध्ये बसलो आणि जेमतेम २-३ मिनिटं ट्राॅली नेहमीच्या वेगाने पुढे गेली आणि अचानक वेग एकदम कमी झाला. इतका की नक्की आपली ट्रॉली पुढे जातेय कि नाही असं वाटत होतं. ट्राॅली ५-७ मिनिटं अशीच हळूहळू सुरु असतानाच एका क्षणी पूर्ण थांबली. आणि बाहेरच्या वाऱ्यामुळे हेलकावे घेऊ लागली. आम्हाला याचा पूर्वानुभव असल्याने फारशी काळजी वाटली नाही. काही मिनिटांतच ट्राॅली पून्हा हळूहळू सुरु झाली. आणि परत एकदा पूर्णपणे थांबली. परत आधीसारखे हेलकावे घेऊ लागली. आता मात्र आमच्या बरोबर असलेल्यांना किंचित काळजी वाटली. काही मिनिटांतच पून्हा ट्राॅली सुरु झाली. आणि आता मात्र नेहमीच्या वेगाने पायथ्याशी निघाली. जेमतेम १० मिनिटांत पायथ्याशी पोहोचणारी ट्राॅली यावेळी २५-३० मिनिटांनी पोहोचली होती.

              मुक्कामी येऊन थोडी विश्रांती घेऊन सोमनाथला निघालो. नेहमीसारखंच आधी भालका तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. यावेळीही मंदिराच्या आवारात खूपच गर्दी होती. नुकताच कुठलातरी कार्यक्रम संपला तरी होता किंवा पावसामुळे थांबवावा लागला होता. त्यामुळे गर्दी होती पण मंदिरात दर्शनासाठी मात्र फार लोकं नव्हती. त्यामुळे सुंदर दर्शन घडलं. या मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे. खूप सुंदर दर्शन झालं पण माझं मन तृप्त झालं नव्हतं. इथून पुढे आम्ही गीता मंदिरात दर्शनासाठी गेलो.

              हिरण्या नदीतीरी वसलेलं हे गीता मंदिर. इथे काही मंदिरांचं संकुल आहे. मुख्य मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि भिंतींवर गीतेतील अध्याय श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगासह चितारले आहेत. बाजूला श्रीराम -सीता , लक्ष्मी- नारायण अशी मंदिरं आहेत. मुख्य मंदिरात दर्शन घेऊन लक्ष्मी - नारायण मंदिरात प्रवेश केला आणि काही क्षण भान हरपून उभीच राहिले. काही क्षणांनी नतमस्तक झाले आणि मन एकदम तृप्त, शांत झालं. गिरनारला येण्याआधी काही दिवसांपूर्वी मला राधाकृष्णाचं सुंदर असं स्वप्नदर्शन घडलं होतं. तेव्हापासून प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि ती माझी इच्छा इथे पूर्ण झाली होती. गिरनारला गेल्यावर भालका तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोमनाथ या साऱ्या स्थानी दर्शनासाठी आम्ही जातोच. पण तरीही स्वप्नदर्शन झाल्यापासून प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली होती ती अखेर पूर्ण झाली. तिथून पुढे सोमनाथांचं दर्शन घेऊन परत मुक्कामी आलो.

              दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सारं आवरुन भवनाथ मंदिरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. लवकर गेल्यामुळे मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. शांतपणे अतिशय सुंदर असं दर्शन घेता आलं. तरी इथेही मन थोडं बेचैन होतं. दर्शन घेऊन मृगी कुंडाजवळ गेलो. गर्दी नसल्याने मृगी कुंडाभोवती प्रदक्षिणा घालता आली. आणि त्या मार्गात असलेल्या मोठ्या शिवपिंडीचं दर्शन स्पर्श करुन घेता आलं. त्यावेळी मात्र अर्पण करण्यासाठी बिल्वदल नसल्याची मला फारच रुखरुख लागली. शिवपिंडीवर जल चढवून नमस्कार करुन मंदिराबाहेर आलो. बाहेर आलो आणि मी अक्षरशः थक्क झाले. मंदिराबाहेर फुलवाला नुकताच येऊन फुलं विक्रीसाठी लावत होता. बिल्वदलंही अजून पिशवीतच होती. मी लगेच खूपशी बिल्वदलं विकत घेतली आणि आम्ही पून्हा मंदिरात गेलो. मृगी कुंडाच्या बाजूला असलेल्या शिवपिंडीवर बिल्वदलं अर्पण करुन नतमस्तक झाले आणि पुन्हा माझे डोळे ओलावले. तिथून परत मुख्य मंदिरात आलो तोपर्यंत तिथे आरती सुरु झाली होती. हाही सुंदर योग होता. इतक्या सुंदर रितीने माझी दुसरी इच्छाही पूर्ण झाली होती.

               राधाकृष्णाचं स्वप्नदर्शन होण्याआधी दोन दिवस २४ तासांच्या आत मला शंभू महादेवांनी तीन वेळा अतिशय सुंदर स्वप्नदर्शन दिलं होतं. त्यातील एका स्वप्नात मी खूप सारी बिल्वदलं अर्पण केल्याचं मला दिसलं होतं. म्हणूनच प्रत्यक्षात जेव्हा मला बिल्वदलं अर्पण करता आली तेव्हा डोळे पाणावलेच. त्या स्वप्नांमुळेच शंभू महादेवांनाही प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि इथे माझी तीही इच्छा पूर्ण झाली होती. खरंतर स्वप्नात घडलेल्या दर्शनानेच मन खूप सुखावलं होतं आणि नंतर प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडलं हे फारच भाग्याचं, मन अगदी प्रसन्न झालं होतं.

              भवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन नाश्ता करुन आम्ही, गेली ४ वर्षं ज्याची प्रतिक्षा केली होती तो जुनागढचा उपरकोट किल्ला बघायला गेलो. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच या किल्ल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि त्या दिवसापासून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेली ४ वर्ष हा किल्ला दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. 

             मौर्य साम्राज्याच्या काळात गिरनार पर्वताच्या पायथ्याशी एक किल्ला आणि शहर वसवले गेले. गुप्त काळापर्यंत याचा वापर केला जात होता. नंतर जूनागढहून राजधानी वल्लभी येथे हलविण्यात आल्यावर या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. नंतर १० व्या शतकातील चुडासामा राजा ग्रहरिपु यानी हा किल्ला जंगलापासून मुक्त केला. त्यानंतर १८९३-९४ मध्ये जुनागढ राज्याचे दिवाण हरिदास विहिरीदास यांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.

             उपरकोट किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. शहराच्या पलीकडे पूर्वेकडील भिंतींमध्ये या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. एकात एक असे तीन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या भिंती ६०-७० फुट उंचीच्या आहेत. याच्या आतील बाजूस खोल खंदक सुरक्षेसाठी खणलेले होते. तर या उंच भिंतीवर टेहळणी बुरूज आहेत. या किल्ल्यात 'अडी वाव' आणि 'कडी वाव' अशा दोन मोठ्या आयताकृती विहिरी आहेत. जवळपास ७०-७५ पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर या विहिरी पहाता येतात. तसंच गोलाकार पायऱ्या उतरुन खाली एक 'नवघन कुवा' आहे. दुसऱ्या - तिसऱ्या शतकातील बौद्ध लेणीही या किल्ल्यात आहेत. ही दुमजली गुंफा आहे, प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंनी या गुंफांचा उपयोग केला होता. या गुंफा पहाण्यासाठी नाममात्र प्रवेशफी आहे. 

             राणी राणक देवीचा प्रशस्त महालही सुंदर आहे. खूप मोठा बगीचाही इथे आहे. नवाबी तलावही मोठा आणि पहाण्यासारखा आहे. खूप जून्या काळातील काही तोफा इथे ठेवल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या तोफा नीलम आणि माणेक या नावाने ओळखल्या जातात. किल्ल्यात लेझर शो आणि वस्तुसंग्रहालयही सुरु करण्यात येणार आहे. तसंच हा भव्य किल्ला पहाण्यासाठी बॅटरी कार ही सुरु करण्यात येणार आहे. 

             ४ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेल्या या किल्ल्यात आता जागोजागी पिण्याचे पाणी, उपहारगृह, स्वच्छतागृहं, या साऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण किल्ला पायी फिरून पहाण्यासाठी किमान ३ तासांचा अवधी आवश्यक आहे. 

             जुनागढ आणि आसपासच्या इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये आता या उपरकोट किल्ल्याचा समावेश नक्कीच करावा लागेल. आवर्जून एकदा तरी पहावा असा हा किल्ला आहे. इथे पूर्ण एक दिवसही थांबता फिरता येईल एवढा हा किल्ला भव्य आणि प्रेक्षणीय आहे. जागोजागी सविस्तर माहिती फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे सारा किल्ल्याचा इतिहास आपल्याला सहज जाणून घेता येतो. 

             किल्ला बघून रुमवर परत येऊन आवरुन पुन्हा ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागलो.

- स्नेहल मोडक

     

    
    






        


कविता

जय बाबा बर्फानी - १

          '८ जुलै २०२५' आमच्यासाठी अजून एक विशेष दिवस. याच दिवशी आमची अजून एक इच्छा पूर्ण झाली. गतवर्षी काही कारणाने रहित करावी लागल...