पाचव्या दिवशी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आम्हाला नेपाळची सीमा ओलांडायची परवानगी मिळाली आणि आम्ही पुढील प्रवासाला लागलो. मात्र या गोंधळामुळे काठमांडू ला पोहोचायला जवळजवळ रात्र झाली. त्यामुळे त्यादिवशी कुठेही फिरायला किंवा दर्शनाला जाता आलं नाही. पण हा दिवसाचा प्रवास खूपच चांगला ठरला. सीमा ओलांडून आमची बस पुढे निघाली आणि काही वेळातच नेपाळच्या रस्त्यांनी आपलं सध्याचं रंगरुप दाखवायला सुरुवात केली. संपूर्ण नेपाळ मध्ये सगळीकडे रस्त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे पुढला प्रवास अतिशय त्रासदायक होता. बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु होती. पूर्ण घाटरस्ता आणि तोही अतिशय खराब म्हणजे जवळजवळ नुसती पिवळसर पांढरी वस्त्रगाळ मातीच असलेला होता त्यामुळे हा प्रवास दिवसा करावा लागला हे बरंच झालं. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता खराब असला तरी दिवसाच्या प्रवासामुळे पहायला मिळालेलं नेपाळचं सृष्टी सौंदर्य. जवळपास पूर्ण प्रवासात घाटरस्ता असल्यानं एका बाजूला डोंगर आणि दुसरीकडे त्या डोगरांना बिलगून घाटदार वळणं घेत कधी संथ तर कधी खळखळत वहाणारी नेपाळची प्रसिद्ध गंडकी नदी आम्हाला साथ देत होती. तसंच सगळीकडे अतिशय सुंदर अशी रंगबिरंगी फुलांची उधळण अनुभवायला मिळत होती. प्रवासभर खूप छान लोभसवाणं दृश्य पहायला मिळत होतं. हे सारं सृष्टी सौंदर्य पहात तिन्हीसांजेला आम्ही काठमांडू ला पोहोचलो.
सहाव्या दिवशी सकाळी आम्ही पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही ज्या हाॅटेलमध्ये राहिलो होतो तिथून अगदी जवळच पशुपतीनाथ मंदिर असल्याने आम्ही चालतच मंदिरात पोहोचलो.
पांडवांनी कौरवांचा संहार करुन युद्ध जिंकलं आणि राज्य स्थापन केलं. त्यावेळी झालेली प्रचंड जीवितहानी आणि काही प्रिय भक्तांचा विनाश पाहून भगवान शिव अत्यंत दु:खी झाले आणि ते गुप्त रुपात केदारनाथ येथे राहू लागले. जेव्हा पांडवांची
स्वर्गारोहणाची वेळ जवळ आली तेव्हा पांडवांना निष्कलंक सदेह स्वर्गात जाता यावं म्हणून श्रीकृष्णाने त्यांना भगवान शिवांचं दर्शन घेण्याचा सल्ला दिला. म्हणून शिवाला शोधत शोधत पांडव केदारनाथला आले. शिवजी एका म्हशीच्या कळपात रेडा बनून लपले होते. पण भिमानं त्यांना ओळखलंच. त्यामुळे शिवजी तिथेच जमिनीत घुसले पण भिमाने त्यांच्या शेपटीला धरुन ठेवलं. तोच शेपटीवाला पार्श्वभाग केदारनाथमध्ये आणि जमिनीतून दूर नेपाळमध्ये बाहेर पडलेला मुखाचा भाग पशुपतीनाथ म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पशुपतीनाथाचंही दर्शन घ्यावं लागतं तेव्हाच हे दर्शन पूर्ण होतं अशी मान्यता आहे. नेपाळ माहात्म्य आणि हिमावतखंडा यांच्या मते इसवीसन चारशे पूर्वीचं हे बागमती नदी तीरावर वसलेलं पशुपतीनाथ मंदिर आहे. चांदीच्या सर्पानं वेढलेलं एक मीटर उंचीचं चार दिशांना चार मुखं असलेलं हे दगडी मुखलिंग आहे. प्रत्येक मुखावर पसरलेले हात आहेत. एका हातात रुद्राक्ष माला आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. दर्शनासाठी चार दिशांना चार प्रवेशद्वारं आहेत.
पशुपतीनाथ मंदिरात जाऊन आम्ही पंडितजींकडून रुद्राभिषेक केला. मात्र हे अभिषेकादी कुठलेच विधी मुख्य गाभाऱ्यात न करता बाहेर आरक्षित केलेल्या ठिकाणी केले जातात. रुद्राभिषेक झाल्यावर पंडितजींबरोबरच आम्ही प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिरात गेलो. इथेही प्रचंड मोठी रांग होती. पण आम्ही पंडितजींबरोबर गेल्यामुळे वेगळ्या रांगेतून थोडं लवकरच दर्शन घडलं. दर्शन घेऊन नतमस्तक झालो आणि मन तृप्त झालं. केदारनाथाच्या दर्शनानंतर पशुपतीनाथाच्या दर्शनाची जी आस लागली होती ती आज पूर्ण झाली होती. पशुपतीनाथ मंदिराच्या आवारातच एका उघड्या सभामंडपात २५७ लहान लहान शिवलिंग स्थापन केली आहेत. मध्यभागी एक घुमटी वजा मंदिर आहे. तिथेही शिवलिंग स्थापन केलं आहे. यांचंही दर्शन आम्ही घेतलं.
पशुपतीनाथ दर्शन घेऊन आम्ही पुढे गुह्येश्वरी मंदिरात गेलो. हे आदिशक्ती पार्वतीमातेचं एक शक्तीपीठ आहे. या मंदिराबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. गुहेत लपलेली सतीदेवी म्हणून गुह्येश्वर अशी एक आख्यायिका आहे. महाराजा दक्षाने केलेल्या भगवान शिवाच्या अपमानानंतर सतीने यज्ञात उडी घेतली त्यावेळी क्रोधित होऊन शिवजी सतीचा जळता देह घेऊन सैरावैरा पळत असताना भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं त्यात सतीचे नितंब जिथे पडले ते गुह्येश्वरी मंदिर अशी मान्यता आहे. तसंच सतीचे गुडघे जिथे पडले ते हे मंदिर असंही मानतात. अतिशय प्रशस्त असं नेपाळी पध्दतीने बांधलेलं हे मंदिर सुंदरच आहे.
शक्तीपीठाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो. बुढा निलकंठ मंदिरात. शिवपुरी टेकडी प्रदेशात वसलेलं भगवान श्रीविष्णुंचं हे मंदिर. या मंदिरात भगवान महाविष्णूंची शेषशायी म्हणजे शेषनागावर निद्रिस्त अशी भलीमोठी आडवी मूर्ती आहे. बुढानीलकंठाची ही मूर्ती नेपाळमधील सर्वात मोठं दगडी कोरीव काम मानलं जातं. अतिशय सुंदर रेखीव अशी जलाशयातील ही चार मीटर लांबीची मूर्ती तरंगती आहे असं सांगितलं जातं. या चतुर्भुज मूर्तीच्या एकेका हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे. तसंच विशाल कोरीव मुकुटही आहे. नेपाळ माहात्म्य आणि हिमावतखंड या ग्रंथात बुढा नीलकंठच्या दर्शन आणि पूजनानं धनधान्य आणि संपदा प्रापत होते असं सांगितलं आहे. हे मंदिर आणि सारा परिसर सुंदरच आहे. इथे गर्दी फारच कमी असल्यानं आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं थोडं थांबून सारं नीट पहाता आलं.
यानंतर आम्ही 'अमिदेव बुद्ध पार्क' मध्ये गेलो. २००३ साली बांधण्यात आलेलं हे भव्य पार्क आहे. काही पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्या समोर येतात त्या तीन भव्य सुवर्ण बुद्ध मूर्ती. मध्यभागी ६७ फूट उंचीची शाक्यमुनी बुद्धाची सुवर्ण मूर्ती आहे. जी अमिदेव रुप आहे. याचा संबंध दिर्घायुष्याशी आहे. या मूर्तीच्या हातात एक वाडगा आहे ज्यात अमरत्वाचं अमृत आहे. या मूर्तीच्या डावीकडे ६४ फूट उंच चेनरेझिक बुद्ध मूर्ती आहे. ज्याला अवलोकितेश्र्वर या नावानंही ओळखतात. सर्व बोधिसत्त्वांपैकी अचल डोळ्यांनी पहाणारे आणि सर्वात दयाळू असे हे चेनरेझिक आहेत. दलाई लामा हे चेनरेझिक चा अवतार मानले जातात. शाक्यमुनी बुद्धाच्या उजवीकडे ६४ फूट गुरु रिनपोचे उर्फ गुरु पद्मसंभव आहेत. संपूर्ण ज्ञानी म्हणून अवतरलेले गुरु रिनपोचे आदिम ज्ञानाचे रक्षक आहेत. या तीन भव्य बौद्ध मूर्तींबरोबरच थोडा बाजूला एक उंच स्तूपही इथे आहे. तुलनेनं कमी गर्दी असलेलं हे बुद्ध पार्क पहाण्यासारखं आहे. हे सारं पाहून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो. सारं आवरुन पुढे पोखरा ला निघालो. रात्रप्रवासाने पहाटे चार वाजता पोखरा येथे पोहोचलो. जवळपास संपूर्ण नेपाळ मध्ये रस्त्यांची कामं सुरु असल्यानं प्रत्येक प्रवासाला खूप जास्त वेळ लागत होता आणि खूप त्रासही होत होता.
सातव्या दिवशी पहाटे पोखरा ला पोहोचून थोडा आराम करुन आम्ही देवदर्शन आणि स्थलदर्शनासाठी निघालो.
सर्वात आधी आम्ही गेलो गुप्तेश्वर महादेव गुंफा पहायला. जवळपास दिडशे मीटर खोल असलेली ही गुंफा सोळाव्या शतकात बांधण्यात आली आहे. मात्र ती १९९१ साली खुली करण्यात आली. सुरुवातीला गोलाकार बांधलेल्या पायऱ्या उतरुन प्रत्यक्ष गुहेत प्रवेश करावा लागतो. कमी जास्त उंची आणि रुंदी असलेल्या या सुंदर गुहेतच भगवान शिवाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. त्यापढे अजूनही खाली पायऱ्या उतरल्यावर तिथून वहाणाऱ्या डेविस फाॅल्स चं अप्रतिम दृश्य पहाता येतं. संपूर्ण गुहेत सतत पाणी टपकत असतं. त्यामुळे सारा मार्ग निसरडा आहे. तसंच जरा अवघड आणि अंधारवाट असल्यानं जपूनच उतरावं लागतं. मात्र अतिशय अप्रतिम असा हा अनुभव आहे.
गुप्तेश्वर महादेव गुंफा पाहून आम्ही डेविस फाॅल्स पहायला गेलो. हा एक असाधारण असा धबधबा आहे. जो उंचावरुन कोसळत तळाशी पोहोचल्यावर ५०० फूट लांबीचा भुमीगत बोगदा निर्माण करतो. यावरुनच नेपाळी भाषेत याला 'पाताले छांगो' म्हणतात. याचाच अर्थ भुमिगत धबधबा असा आहे. हा अतिशय सुंदर धबधबा पहाण्यासाठी व्यवस्थित रेलिंग असलेली जागा आहे. नयनरम्य असा हा धबधबा आहे.
हा धबधबा पाहून आम्ही विंध्यवासिनी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलो. नेपाळ मधील अतिशय पुरातन असं हे मंदिर भगवती देवीला समर्पित आहे. थोड्या पायऱ्या चढून या मंदिरात जाता येतं. याच आवारात सरस्वती, शिव, गणेश, हनुमान यांचीही मंदिरं आहेत. कास्कीचा राजा सिध्दी नारायण शाह यांनी देवी विंध्यवासिनीचं मंदिर बांधण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्यानं आपल्या माणसांना देवीची मूर्ती परत आणण्यासाठी विंध्याचल पर्वत (सध्याचा उत्तर प्रदेश, भारत) इथं पाठवलं. मूर्ती घेऊन परत येताना सध्याच्या मंदिराच्या जागी त्या माणसांनी विश्रांतीसाठी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी प्रवास सुरु करत असताना त्यांना जाणवलं की तिथं ठेवलेली मूर्ती जागेवरुन उचलता येत नाही. परिस्थितीची माहिती मिळताच राजानं देवीची इच्छा जाणून त्याच जागी मंदिर उभं करण्याचे निर्देश दिले. अशा रीतीने याठिकाणी हे सुंदर मंदिर स्थापन करण्यात आलं. हे सारं पाहून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो.
इथून पुढे आमच्या दोन बसेसपैकी एक बस काही यात्रींना घेऊन सुनौली सीमा ओलांडून गोरखपुरला परत जाणार होती. आणि दुसरी बस आम्हाला घेऊन काकडबीटा सीमा ओलांडून सिलिगुडीला जाणार होती. पण त्यात यात्रेकरुंची संख्या जास्त असल्यानं आम्ही दोघं आणि आमच्या बरोबर अजून सहाजणं आणि एक आयोजक असे नऊजणं पोखराहून तिथल्याच एका खाजगी बसने आणि बाकी सारे आमच्या बसने दुपारी काकडबीटा ला निघालो. अतिशय खराब आणि घाट रस्त्यामुळे आम्हाला काकडबीटा येथे पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळचे ७ वाजले. सीमेजवळ आल्यावर आमच्या ओळखपत्राची परत एकदा तपासणी झाली. आणि आम्हाला सिलिगुडीला जायची परवानगी मिळाली. आम्ही नऊजणं जीपने पुढे निघालो. अर्ध्या तासातच आम्ही सिलिगुडीला आमच्या हाॅटेलमध्ये पोहोचलो.
- स्नेहल मोडक









No comments:
Post a Comment