Pages

Thursday, March 14, 2024

भ्रमंती -३

               आठव्या दिवशी सकाळी सिलिगुडीला आम्ही फक्त नऊजणंच पोहोचलो होतो. आमच्या बरोबर आमची फक्त एक सॅकच होती. बाकी सगळं सामान आमच्या दुसऱ्या बसमध्ये होतं. हाॅटेलमध्ये पोहोचल्यावर सारं आवरुन, नाश्ता करुन आम्ही आठजणं खरेदीसाठी निघालो. सिलिगुडीचं मार्केट खूपच मोठं आहे. इथलं हाॅंगकाॅंग मार्केट शाॅपिंगसाठी प्रसिद्ध आहे. सध्या थंडीचा मौसम असल्यानं इथं लोकरीच्या कपड्यांच्या विविध प्रकारांनी दुकानं सजली होती. तसंच इतरही अनेक गोष्टी खरेदीसाठी उपलब्ध होत्या. थोडीफार खरेदी करुन, फिरुन आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो. 

                परत जरावेळाने बंगाल सफारी पहाण्यासाठी निघालो. २०१६ साली उद्घाटन करण्यात आलेली ही सफारी ७०० एकर जमिनीवर वसलेली आहे. बंगाली वाघांबरोबरच इथे इतरही सारे प्राणी पहायला मिळतात. सफारी साठी बसेस आणि जीप्स आहेत. सफारी साठी जायचं नसेल तर ठराविक भागात पायीही फिरता येतं. अतिशय सुंदर निसर्गरम्य अशी ही सफारी आहे. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला फक्त प्रवेश-फी देऊन आत पायी फिरायला मिळालं. सफारीची तिकिटं संपली होती. सफारीला जायला मिळणार नाही म्हणून मन जरा नाराज झालंच. पण दुसरा पर्याय नव्हता. आम्ही पायीच आत फिरायला सुरुवात करणार एवढ्यातच तिथलाच एक सुरक्षासैनिक आमच्याजवळ आला आणि त्याने सफारीची तिकिटं काढलीत का विचारलं पण आम्हाला ती मिळाली नाही असं सांगताच तो म्हणाला ' तुम्हाला जायचंच असेल एका ग्रुपने रद्द केलेली तिकिटं आहेत , तुम्हाला जायचं असल्यास सांगा नाहीतरी मी ती तिकिटं काउंटरवरच देणार आहे, दुसरी लोकं जाऊ शकतील यासाठी.' ती तिकिटं फक्त एका भागापर्यंतच मर्यादित होती. पण आम्ही लगेच होकार देऊन ती तिकिटं विकत घेतली आणि सफारीसाठी निघालो. बसने सफारी सुरु झाली आणि पाऊण एक तासाच्या या सफारीत बंगाली वाघ, सांबर, हरिण या प्राण्यांना अगदी छान मुक्त वावरताना पहायला मिळालं. सफारी संपवून आम्ही परत निघालो.

              आम्ही हाॅटेलमध्ये परत येईपर्यंत तिन्हीसांज झाली होती. नुकतीच आमची बसही तिथे येऊन पोहोचली होती. मग त्या बसमधल्या आमच्या बॅगा घेऊन आम्ही रुममध्ये गेलो. रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यात गेलेला वेळ आणि अत्यंत खराब रस्ता यामुळे त्या बसमधल्या सहयात्रींना जवळपास २६-२७ तासांचा प्रवास घडला होता. आम्हीच फक्त जे खाजगी बसने पुढे आलो होतो ते लवकर  म्हणजे १९ तास प्रवास करुन पोहोचलो होतो. 

              नवव्या दिवशी सकाळी लवकर आम्ही सारे तिथल्या जीपने स्थलदर्शनासाठी निघालो. 

              जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवलेलं दार्जिलिंग. सिमला, कुलू, मनाली याबरोबरच पर्यटनासाठी अग्रक्रमानं निवडलं जाणारं शहर म्हणजे दार्जिलिंग. सात हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या दार्जिलिंग मध्ये उन्हाळ्यातही हवा सुखद आणि थंड असते. यामुळेच ब्रिटिशांनी दार्जिलिंग ला उन्हाळी राजधानी बनवली होती. त्यांनी तिथल्या हवामान ,पाणी याचा अभ्यास करुन चहाची लागवड करुन चहाचे मळे विकसित केले. या चहाच्या मळ्यांनी दार्जिलिंगच्या सृष्टी सौंदर्यात अधिकच भर टाकलीय. सारे डोंगरउतार सदैव हिरवा शालू ल्यायलेले असतात. हिरव्या रंगाच्या साऱ्या छटांमुळे निसर्गानं जणू पाचूची मुक्त उधळण केलीय असा नेत्रसुखद भास होतो. मोठमोठे चहाचे मळे, आल्हाददायक हवामान आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असणारी टाॅय ट्रेन यामुळं दार्जिलिंग सतत पर्यटकांनी गजबजलेलंच असतं. दार्जिलिंग 'क्विन ऑफ हिल्स' म्हणून ओळखलं जातं.

             'दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे' ही भारतातील सर्वात उंचावरुन धावणारी, न्यु जलपाईगुडी ते दार्जिलिंग अशी ऐतिहासिक रेल्वे आहे. १८८१ साली बांधून पूर्ण झालेला हा ७८ किमी लांबीचा नॅरो गेज मार्ग आहे. १९९९ साली दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात समाविष्ट करण्यात आलंय. जगातील ही अशी दुसरी रेल्वे आहे जिला हा सन्मान प्राप्त झालाय.  या टाॅय ट्रेन मधून प्रवास करण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. 

                       अशा या नितांतसुंदर दार्जिलिंगला स्थलदर्शनासाठी आम्ही  निघालो होतो. सर्वात आधी आम्ही 'घूम मठ' पहायला गेलो. गेलोक्पा आणि यलो हॅट या पंथाशी संबंधित असलेल्या या मठाची स्थापना १८५० साली मंगोलियन ज्योतिषी आणि भिक्षू सोक्पो शेराब ग्यात्सो यांनी केली. हा घूम मठ किंवा योग चोलिंग मठ १५ फूट उंचीच्या मैत्रेय बुध्दाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. मठाचा आतील भाग भिंतीवरील थांगका, पारंपरिक घंटा, ड्रम यांनी सुशोभित केलाय. तसंच दुर्मिळ बौद्ध हस्तलिखितं, शिलालेख यांचं संग्रहालय इथं आहे. बौद्ध आणि तिबेटियन कलावस्तूंची इथं दुकानं आहेत. 

                        घूम मठ पाहून आम्ही गेलो बतासिया लूप आणि गोरखा वाॅर मेमोरियल पहायला. दार्जिलिंगमधल्या टाॅय ट्रेन चा प्रवास या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा बतासिया लूपमधून होतो. हे स्थानक घूम आणि दार्जिलिंग यामध्ये आहे. इथे रेल्वेचा अभियांत्रिकी चमत्कार असलेला जवळजवळ वर्तुळाकार मार्ग आहे. या वर्तुळाकार मार्गावरुन ही रेल्वे हजार फूट उंचीवर उतरते.  या बतासिया लूप स्थानकामध्येच गोरखा युद्ध स्मारक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून राष्ट्राच्या संरक्षणार्थ बलिदान देणाऱ्या  शूर गोरखांच्या स्मरणार्थ हे स्मारक 'जिल्हा सैनिक मंडळ दार्जिलिंग' यांनी १९९५ सालात बांधलय. या बतासिया लूप मधून प्रसिद्ध कांचनजंगा शिखर आणि इतर हिमाच्छादीत हिमालयीन शिखरं पहाता येतात, त्यामुळे  हे पर्यटकांचं अतिशय आवडतं स्थान आहे. पारंपरिक हस्तकलेच्या आणि लोकरीच्या वस्तूंची इथं दुकानं आहेत. अतिशय नयनरम्य अशा या स्थानी आम्ही गेलो तेव्हाही पर्यटकांची गर्दी होतीच. युद्ध स्मारक पाहून आम्ही जरा पुढे गेलो तेवढ्यातच टाॅय ट्रेन तिथे आली. तिथे आधीपासूनच ट्रेनची वाट पहात‌ असलेले बरेच लोकं ट्रेनमध्ये चढले. प्रशस्त काचेच्या खिडक्या असलेली ही सुंदर ट्रेन आम्हाला अगदी जवळून पहायला मिळाली. पुढल्या दहा मिनिटांतच ती ट्रेन तिथून पुढे गेली. बतासिया लूपमध्येच तिबेटियन पारंपरिक पेहराव घालून छायाचित्रं काढण्याची सुविधा होती. मग आम्हीही ते पोषाख घालून छायाचित्रं काढली. अतिशय रमणीय अशा स्थानावर मन जरा जास्तच रमलं होतं. तिथून दिसणारं कांचनजंगा आणि इतर बर्फाच्छादित शिखरं पहातच रहावीशी वाटत होती. 

                   इथून पुढे आम्ही चहाचे मळे पहायला निघालो. मार्गावरच एका ठिकाणी 'तेनसिंग नोर्गे राॅक' आहे. इथे राॅक क्लाईम्बिंगचा थरार अनुभवता येतो. सर एडमंड हिलरी आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारे तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ सालात हिमालयन माऊंटेरियन इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. पर्वतारोहण करण्यासाठी लागणारी उपयुक्त माहिती देणारं संग्रहालय आणि पर्वतारोहण प्रशिक्षण त्यांनी सुरु केलं. हे पाहून आम्ही चहाचे मळे पहायला पुढे गेलो. रस्त्यावरुन थोडंसं खाली उतरुन आम्ही चहाच्या मळ्यात पोहोचलो. समोरचे सारे डोंगरउतार हिरवेगार दिसत होते. खूप छान दृश्य होतं. इथंही लोकं पारंपरिक पेहरावात छायाचित्रं काढत होती. चहाच्या मळ्यांची हिरवाई नजरेत आणि छायाचित्रात साठवून आम्ही वरती परत आलो. इथं रस्त्याच्या कडेला ओळीने चहाची दुकानं आहेत. यातल्याच एका दुकानात ताजा वाफाळता चहा प्यायला. तिथेच घरी नेण्यासाठी चहापूड विकत घेतली. चहाचे मळे पाहून आम्ही पुढे निघालो.

               आमचं पुढचं स्थान होतं 'पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान'. यालाच दार्जिलिंग प्राणिसंग्रहालय असंही म्हणतात. १९५८ मध्ये ६७ एकर एवढ्या परिसरात हे प्राणीसंग्रहालय उभारण्यात आलंय. सात हजार फूट उंचीवर असलेलं हे भारतातील सर्वात उंच प्राणीसंग्रहालय आहे. प्रामुख्यानं हिमालयन प्राण्यांचं प्रजनन आणि संवर्धन यासाठी याची निर्मिती करण्यात आलीय. लुप्तप्राय हिमालयन लांडगा आणि लाल पांडा यांचं संवर्धन इथं करण्यात आलंय. त्याबरोबरच हिम बिबट्या,गोरल (माऊंटन बकरी) सैबेरियन वाघ याही लुप्तप्राय प्राण्यांचं संवर्धन करण्यात आलंय. सरोजिनी नायडू यांच्या कन्या पद्मजा नायडू यांचं नांव या उद्यानाला देण्यात आलं आहे. आम्ही या उद्यानात फिरुन बरेच प्राणी पाहिले. इथे प्राण्यांच्या अधिवासाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना फिरण्यासाठीही व्यवस्थित रुंद मार्ग केले आहेत. प्रत्येक प्राण्याचे माहिती फलक आहेतच. हे सारं पाहून आम्ही बाहेर आलो. इथेही काही दुकानं आहेत. लोकरीच्या वस्तूंबरोबरच खाऊचीही दुकानं आहेत. आम्ही थोडी खरेदी करुन तिथल्या प्रसिद्ध 'झालमुरी' आणि 'पापडी चाट' चा आस्वाद घेतला.

                ही सारी स्थलदर्शनं करुन आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजेच सिलिगुडीला निघालो. जसं नेपाळमध्ये गंडकी नदी प्रवासभर साथ देत होती तसंच इथं तीस्ता नदीचं रमणीय दृश्य पहायला मिळत होतं. इतके दिवस उबदार थंडी जाणवत होती. पण दार्जिलिंगला थंडीचा कडाका वाढला होता. पण दिवसभर अतिशय छान प्रवास झाला होता.

- स्नेहल मोडक

    

   

   



No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...