दहाव्या दिवशी सकाळी आम्ही पुढील स्थलदर्शनासाठी निघालो. पण आज आम्हाला फक्त दोन दिवसांसाठी लागणारं जरुरी सामानच बरोबर न्यायचं होतं. आमचं बाकी सारं सामान आमच्या बसमध्येच रहाणार होतं. त्याप्रमाणे तयारी करुन आम्ही सारे सिलिगुडीहून पुन्हा जीपनेच पुढे निघालो. हा प्रवासही घाट रस्त्यानेच होता. आम्ही अजून उंचावर चाललो होतो. इथंही एकीकडे उंच उंच पर्वत आणि दुसरीकडे त्यांना बिलगून वाहणारी तीस्ता नदी असं छान दृश्य होतं.
साधारण तीन तासांचा प्रवास करुन आम्ही नामची इथल्या चारधाम मंदिरात पोहोचलो. हे मंदिर ' सिध्देश्वर मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हा आपण चारधाम म्हणतो तेव्हा उत्तराखंडमधल्या हिमालयातील शिखरांवरच्या यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांची आठवण होते. किंवा ओडिशाचं जगन्नाथ पुरी, उत्तराखंड मधलं बद्रीनाथ, तामिळनाडूचं रामेश्वरम् आणि गुजरातमधलं द्वारका या चारधामची आठवण येते. तर याच चारधामांची एकत्रित प्रतिकृती सिक्किममधल्या नामची इथं सोलफोक टेकडीवर भव्य अशा परिसरात बांधण्यात आली आहे. या चार मंदिरांबरोबरच बारा ज्योतिर्लिंग मंदिरांच्याही प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या ज्योतिर्लिंग मंदिराच्या मध्यभागी भगवान शिवाची १०८ फूट उंचीची मूर्ती आहे. २०११ मध्ये या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलंय. इथून कांचनजंगा शिखर आणि समद्रुत्से येथील गुरु पद्मसंभव यांचा पुतळा दिसतो. खूप मोठ्या परिसरात पसरलेलं हे मंदिर संकुल अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. आम्ही या मंदिरात चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं. आसपास चा परिसर पहात असताना थोडीशी पोटपूजा करावी असं वाटू लागलं. मग तिथल्याच एका इमारतीत असलेल्या उपहारगृहात जाऊन गरमागरम मोमोज चा आस्वाद घेतला. तिथून फिरत फिरत वाहनतळावर उभ्या असलेल्या आमच्या जीपजवळ येऊन थांबलो. बाकीचे सहयात्री आल्यावर आम्ही पुढे निघालो. स्थलदर्शनं होईपर्यंत दुपार उलटून गेली होती. त्यामुळे बाकी कुठेही न जाता थेट मुक्कामी जायचं होतं. त्यानुसार अगदी सांजावतान आम्ही गंगटोकला हाॅटेलमध्ये पोहोचलो. आता मात्र थंडी फारच वाढली होती. त्यामुळे हाॅटेलमधून परत बाहेर लांब कुठे फिरायला जायची इच्छा नव्हती.
सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोक. हिमालयातलं हे मोठं शहर ५४०० फुटांवर वसलंय. हे शहर तीस्ता नदीकाठावर वसलंय. इथून कांचनजंगा हे जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं शिखर दृष्टीस पडतं. सिक्कीम आणि तिबेट यांना जोडणारी 'नथुला' ही खिंड इथून ४० किमी वर आहे. गंगटोकचं हवामान सौम्य व शीतल आहे पण इथं फारसा हिमवर्षाव होत नाही. इथली अर्थव्यवस्था प्रामुख्यानं पर्यटनावर आधारित आहे.
अकराव्या दिवशी सकाळी आम्ही गंगटोकहून स्थलदर्शनासाठी निघालो. मुळातच आम्ही खूप उंचावर होतो त्यामुळे खूपच थंडी होती. पण जीपमध्ये बसल्यावर जरा उबदार वाटत होतं. थोडं पुढे गेलो आणि गारठा वाढला. हळूहळू सगळी सृष्टी दाट धुक्याची दुलई पांघरुन बसलेली दिसू लागली. अतिशय आल्हाददायक अशी हवा आणि आजूबाजूचा नजारा होता. असाच प्रवास सुरु असतानाच थोड्या वेळातच आमच्या साऱ्या जीप्स अचानक एका ठिकाणी थांबल्या. कुठलातरी पाॅईंट पहायचाय एवढच लक्षात आलं. खाली उतरलो आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर खिळूनच उभं राहिलो. दुरवरचं कांचनजंगा शिखर समोर दिसत होतं. वातावरण तर इतकं सुंदर होतं की कांचनजंगा शिखर आमच्याशी जणू लपाछपी खेळत होतं. शिखर काही क्षण स्पष्ट दर्शन देत होतं तर काही क्षणात शुभ्र मेघांआड लपत होतं. अक्षरशः भान हरपून हे सारं पहात होते मी. थोड्या वेळानं भानावर आल्यावर आजूबाजूचंही सुंदर दृश्य नजरेला जाणवलं. ते सारं पाहून थोडं बाजूला गेलो. तिथंही लहान लहान दुकानं होतीच. खरंतर स्वेटर घातला असूनही थंडीनं बऱ्यापैकी कुडकुडायला होत होतं, पण त्याची जाणीव मात्र उशिरा झाली होती. आमचे काही सहयात्री चहा पित होते मग मात्र आम्हालाही गरमागरम चहा प्यावासा वाटू लागला. एवढ्या थंडीत वाफाळता चहा प्यायला मिळाल्याचं सुख वेगळच होतं.
अतिशय सुंदर असा नजारा पहात घाटरस्त्याने आमचा प्रवास सुरु होता. जेमतेम अर्धा तास प्रवास झाला आणि मन अत्यानंदानं मोहोरलंच. आजूबाजूचे सारे पर्वत हिमाच्छादित दिसू लागले होते. आमच्या रस्त्याच्या कडेनंही सगळीकडे ताजं शुभ्र बर्फ दिसू लागलं. थंडी तर वाढलीच पण आजूबाजूला सतत दिसणारं बर्फ पहाण्यात मन रमलं होतं. खरंतर लगेच गाडी थांबवून बर्फात खेळायचा फारच मोह होत होता. पण इथलं वातावरण सतत बदलत असतं. त्यामुळे आधी पुढे जाऊन स्थलदर्शन करुन मग थांबावं असं ठरवलं. जवळजवळ तासभर हा अप्रतिम नजारा पहात आम्ही आमच्या स्थानावर पोहोचलो.
' बाबा मंदिर ' तब्बल तेरा हजार फुटांवर असलेलं हे ' शिपाई/मानद कॅप्टन बाबा हरभजन सिंग ' या सैनिकाचं मंदिर आहे. हे एक भारतीय लष्करी सैनिक होते. कथेनुसार हरभजन सिंग दुर्गम चौकीवर रसद पुरवठा घेऊन जात असताना त्यांचा ४ ऑक्टोबर १९६८ रोजी नथुला इथं हिमनदीत बुडून मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर त्यांचे अवशेष सैनिकांना मिळाले. असं सांगितलं जातं की हरभजन सिंगनी स्वतःच एका मित्राच्या स्वप्नात येऊन आपल्या मृत्यूची आणि त्या जागेची माहिती दिली. तसंच आपल्या स्मरणार्थ मंदिर बांधावं आणि त्याची देखभाल करावी अशीही इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधण्यात आलं आहे. त्ंना २६ जानेवारी १९६९ रोजी मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं आहे. पूर्वेकडील दुर्गम उच्च उंचीच्या प्रदेशात त्यांचा आत्मा अजूनही सैनिकांचं रक्षण करतो असा विश्वास अजूनही सैनिकांना आहे. नाथुला इथं दोन्ही बाजूच्या ध्वजबैठकी दरम्यान हरभजन यांच्या सन्मानार्थ एक रिकामी खुर्ची बाजूला ठेवतात. तसंच दरवर्षी ११ सप्टेंबरला एक जीप त्यांच्या वैयक्तिक सामानासह त्यांच्या गावाला पाठवली जाते. तसच दर महिन्याला काही रक्कम नाथुला इथं त्यावेळी असणाऱ्या सैनिकांबरोबर हरभजन यांच्या मातोश्रींना पाठवली जाते.
आमच्या जीप या मंदिराजवळ पोहोचल्या. आम्ही मंदिरात जाण्यासाठी खाली उतरलो आणि थंडीने अक्षरशः गारठलोच. उणे तापमानात आम्ही साथे स्वेटर घालून उभे होतो. मंदिर आणि आसपास सगळीकडे थोडं बर्फ पडलेलंच होतं. आजूबाजूचे सारे पर्वतही बर्फमय झाले होते. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. थंडीनं कुडकुडत असूनही तिथे फिरण्याचा मोह आवरत नव्हता. मंदिराच्या बाजूला पडलेल्या बर्फातही थोडं खेळलेच मी. ताजं भुरभुरीत बर्फ होतं तेही त्यामुळे हात बधीर होत असूनही खेळायला मज्जा आली. पण मग मात्र थंडी सहन होईनाशी झाली. आणि आपोआपच पावलं समोरच्या कॅफेकडे वळली. इथंही मस्त गरमागरम मोमोज खायला मिळाले. मोमोज आणि वाफाळत्या चहामुळे थंडीची तीव्रता जरा कमी झाली. परत सारा नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात मनसोक्त साठवला.
खरंतर तिथूनच थोडं पुढे जेमतेम १० किमी वर असलेली भारत तिबेट सीमा बघायची खूप इच्छा होती. पण आमच्या बरोबर असलेल्या बाकी कुणालाही तिथे जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही थोड्या वेळाने बाबा मंदिरातूनच परत निघालो. थोडंस पुढे आल्यावर मात्र गाडी थांबवलीच. सगळीकडे शुभ्र बर्फ पसरलं होतं. गाडीतून उतरुन मी सरळ त्या बर्फात शिरले. इतकं छान ताजं भुरभुरीत बर्फ होतं की त्यात खेळण्याचा मोह आवरणं अशक्यच होतं. थोडावेळ त्या बर्फात खेळून हात फारच बधीर झाले मग मात्र खेळणं थांबवून तिथून पुढे निघालो.
इथून पुढे आम्ही गेलो 'त्सोमगो लेक' बघायला. यालाच 'चांगु लेक' असंही म्हणतात. गंगटोक पासून ३८ किमी अंतरावर असलेलं हे हिमनदी सरोवर १२४०० फूट उंचीवर आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये या सरोवराचं सौंदर्य बदलतं. हिवाळ्यात याचं नितळ जल गोठलेलं असतं. तर वसतं ऋतू बहरणाऱ्या रंगबिरंगी फुलांमुळे याचा किनारा रंगबिरंगी होतोच आणि त्यांच्या प्रतिबिंबामुळे सारा जलाशयच रंगात रंगतो. एकूणच कुठल्याही ऋतूत हे सरोवर अत्यंत सुरेख दिसतं. इथं याक वर बसून फोटो काढता येतात. त्यासाठी काहीजणं पाळीव याक ना सजवून घेऊन उभे असतात. बरेच पर्यटक याक वर बसून छायाचित्र काढून घेतात. तसंच खरेदीसाठी इतरही दुकानं इथं आहेत. या सरोवराच्या काठावरच एक छोटसं शिवमंदिर आहे. बाबा मंदिर आणि हा त्सोमगो लेक लष्कराच्या ताब्यात आहे. त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय इथे येण्यास बंदी आहे. आम्ही या सरोवराजवळ गेलो आणि मुग्धपणे पहातच राहिलो. सरोवराच्या नीलजलाचा बराच भाग बर्फाच्छादित होता. पलिकडचे पर्वतही बर्फमय होते. अगदी एखाद्या सुरेख चित्रासारखं दृश्य होतं. कितीही वेळ पाहिलं तरी मन भरतच नव्हतं. खूप छायाचित्रं काढली पण तरीही प्रत्यक्षातलं दृश्य फारच अप्रतिम होतं. बराच वेळ तिथं थांबून अखेर परत निघालो. स्थलदर्शनं करुन आम्ही तिन्हीसांजेला हाॅटेलमध्ये परत आलो. आजही परत कुठे फिरायला जायची इच्छा नव्हतीच. दिवसभरात फक्त तीन ठिकाणंच आम्ही पाहिली होती. पण एकूण प्रवास, वातावरण आणि प्रत्यक्ष तीन्ही ठिकाणं सारंच अप्रतिम होतं. मन अजूनही तिथेच रममाण झालं होतं.
बाराव्या दिवशी सकाळी आम्ही आवरुन नाश्ता करुन परत सिलिगुडीसाठी प्रवास सुरु केला. दुपारी उशिरा आम्ही सिलिगुडीला पोहोचलो. हाॅटेलमध्ये जाऊन थोडा आराम केला. तोपर्यंत आमची बस तिथे आली. त्यातून आमचं सामान घेऊन रुममध्ये नेऊन ठेवलं आणि आम्ही पुन्हा मार्केट मध्ये गेलो. थोडीशी खरेदी आणि प्रसिद्ध बंगाली मिठाई घेऊन हाॅटेलमध्ये परत आलो.
तेराव्या दिवशी सकाळी लवकर सारं आवरुन आम्ही दोघं 'बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ' पोहोचलो. तीन तासांचा विमान प्रवास करुन महाशिवरात्रीदिवशीच सायंकाळी घरी परत आलो. अमावस्या संपल्यानंतर दोन दिवसांनी गंगापूजन करुन यात्रेची सांगता केली.
यात्रेच्या सुरुवातीलाच एका बसला अपघात झाला आणि आमचा तो संपूर्ण एक दिवस वाया गेला. त्यामुळे यात्रेचं ठरलेलं वेळापत्रक कोलमडलं. या कारणामुळे वेळेअभावी काही ठिकाणी जाता आलं नाही. सगळ्यांनाच थोडा शारीरक - मानसिक त्रास झाला. परंतु एकूण यात्रा छानच झाली.
- स्नेहल मोडक











No comments:
Post a Comment