अधिवास शिवाचा उत्तुंग गिरीवरी
अन करीती संचार साऱ्या सृष्टीवरी
आदि कैलास एक तयातले भवन
घडता दर्शन त्याचे जन्म होतो पावन
पार करिता थोडी उंच अवघड वाट
दृग्गोचर होतो मग कैलासाचा थाट
प्रथम दर्शने मन मंत्रमुग्धच होते
भानावर येताच नतमस्तक होते
मन डोहातील तरंग जाती विरुन
पुन्हा न छळती मनास वरती येऊन
जाणीव होता कैलासाच्या उत्तुंगतेची
दूर होती आवरणे मनाच्या आसक्तीची
उर्जा असीम अध्यात्माची मनी दाटते
दर्शने कैलासाच्या विरक्तीचा मार्ग शोधते
सन्नीध पहाता उन्नत बेलाग गिरीकंदर
होते शून्य अस्तित्व आपले सहजसुंदर
घडता दर्शन त्या पवित्र आदि कैलासाचे
क्षणात मिलन होते जणु जीवाशिवाचे
क्षणात मिलन होते जणु जीवाशिवाचे
स्नेहल मोडक

No comments:
Post a Comment