Pages

Thursday, March 21, 2024

जागतिक कविता दिन

        आज जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं ही खूपच आधी सुचलेली कविता. आपल्याला निसर्गात रममाण व्हायला नेहमीच आवडतं. खरंतर सृष्टीचं हे निसर्गचक्र अव्याहत फिरत असतं. पण प्रत्येक दिवसाचं चित्र वेगळं असतं. त्यामुळेच ते नित्य हवंहवंसं असतं. मुग्धपणे पहात रहावं असंच असतं.

.

सृष्टी

आवडतं मला पहायला

पहाट अलवार उमलताना

     आवडतं मला पहायला

     सृष्टी कण कण जागताना

आवडतं मला पहायला

शांत नीरव रात्र सरताना

     आवडतं मला पहायला

     तारका अलगद विझताना

आवडतं मला पहायला

उषप्रभा सोनवर्खी होताना

     आवडतं मला पहायला

  ‌   सहस्त्ररश्मी अवतरताना

आवडतं मला पहायला

शुभ्र धुकं विरघळताना

 ‌    आवडतं मला पहायला

     सृष्टी सप्तरंग उधळताना

आवडतं मला पहायला

विहग नभी झेपावताना

     आवडतं मला पहायला

     कोमल कलिका फुलताना

आवडतं मला पहायला

पहाट अलवार उमलताना

.

- स्नेहल मोडक

Saturday, March 16, 2024

भ्रमंती -४

                  दहाव्या दिवशी सकाळी आम्ही पुढील स्थलदर्शनासाठी निघालो. पण आज आम्हाला फक्त दोन दिवसांसाठी लागणारं जरुरी सामानच बरोबर न्यायचं होतं. आमचं बाकी सारं सामान आमच्या बसमध्येच रहाणार होतं. त्याप्रमाणे तयारी करुन आम्ही सारे सिलिगुडीहून पुन्हा जीपनेच पुढे निघालो. हा प्रवासही घाट रस्त्यानेच होता. आम्ही अजून उंचावर चाललो होतो. इथंही एकीकडे उंच उंच पर्वत आणि दुसरीकडे त्यांना बिलगून वाहणारी तीस्ता नदी असं छान दृश्य होतं. 

                 साधारण तीन तासांचा प्रवास करुन आम्ही नामची इथल्या चारधाम मंदिरात पोहोचलो. हे मंदिर ' सिध्देश्वर मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. जेव्हा आपण चारधाम म्हणतो तेव्हा उत्तराखंडमधल्या हिमालयातील शिखरांवरच्या यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यांची आठवण होते. किंवा ओडिशाचं जगन्नाथ पुरी, उत्तराखंड मधलं बद्रीनाथ, तामिळनाडूचं रामेश्वरम् आणि गुजरातमधलं द्वारका या चारधामची आठवण येते. तर याच चारधामांची एकत्रित प्रतिकृती सिक्किममधल्या नामची इथं सोलफोक टेकडीवर भव्य अशा परिसरात बांधण्यात आली आहे. या चार मंदिरांबरोबरच बारा ज्योतिर्लिंग मंदिरांच्याही प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या ज्योतिर्लिंग मंदिराच्या मध्यभागी भगवान शिवाची १०८ फूट उंचीची मूर्ती आहे. २०११ मध्ये या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलंय. इथून कांचनजंगा शिखर आणि समद्रुत्से येथील गुरु पद्मसंभव यांचा पुतळा दिसतो. खूप मोठ्या परिसरात पसरलेलं हे मंदिर संकुल अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. आम्ही या मंदिरात चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचं‌ दर्शन घेतलं. आसपास चा परिसर पहात असताना थोडीशी पोटपूजा करावी असं वाटू लागलं. मग तिथल्याच एका इमारतीत असलेल्या उपहारगृहात जाऊन गरमागरम मोमोज चा आस्वाद घेतला. तिथून फिरत फिरत वाहनतळावर उभ्या असलेल्या आमच्या जीपजवळ येऊन थांबलो. बाकीचे सहयात्री आल्यावर आम्ही पुढे निघालो. स्थलदर्शनं होईपर्यंत दुपार उलटून गेली होती. त्यामुळे बाकी कुठेही न जाता थेट मुक्कामी जायचं होतं. त्यानुसार अगदी सांजावतान आम्ही गंगटोकला हाॅटेलमध्ये पोहोचलो. आता मात्र थंडी फारच वाढली होती. त्यामुळे हाॅटेलमधून परत बाहेर लांब कुठे फिरायला  जायची इच्छा नव्हती. 

                  सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोक. हिमालयातलं हे मोठं शहर ५४०० फुटांवर वसलंय. हे शहर तीस्ता नदीकाठावर वसलंय. इथून कांचनजंगा हे जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं शिखर दृष्टीस पडतं. सिक्कीम आणि तिबेट यांना जोडणारी 'नथुला' ही खिंड इथून ४० किमी वर आहे. गंगटोकचं हवामान सौम्य व शीतल आहे पण इथं फारसा हिमवर्षाव होत नाही. इथली अर्थव्यवस्था प्रामुख्यानं पर्यटनावर आधारित आहे.

                  अकराव्या दिवशी सकाळी आम्ही गंगटोकहून स्थलदर्शनासाठी निघालो. मुळातच आम्ही खूप उंचावर होतो त्यामुळे खूपच थंडी होती. पण जीपमध्ये बसल्यावर जरा उबदार वाटत होतं. थोडं पुढे गेलो आणि गारठा वाढला. हळूहळू सगळी सृष्टी दाट धुक्याची दुलई पांघरुन बसलेली दिसू लागली. अतिशय आल्हाददायक अशी हवा आणि आजूबाजूचा नजारा होता. असाच प्रवास सुरु असतानाच थोड्या वेळातच आमच्या साऱ्या जीप्स अचानक एका ठिकाणी थांबल्या. कुठलातरी पाॅईंट पहायचाय एवढच लक्षात आलं. खाली उतरलो आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर खिळूनच उभं राहिलो. दुरवरचं कांचनजंगा शिखर समोर दिसत होतं. वातावरण तर इतकं सुंदर होतं की कांचनजंगा शिखर आमच्याशी जणू लपाछपी खेळत होतं. शिखर काही क्षण स्पष्ट दर्शन देत होतं तर काही क्षणात शुभ्र मेघांआड लपत होतं. अक्षरशः भान हरपून हे सारं पहात होते मी. थोड्या वेळानं भानावर आल्यावर आजूबाजूचंही सुंदर दृश्य नजरेला जाणवलं. ते सारं पाहून थोडं बाजूला गेलो. तिथंही लहान लहान दुकानं होतीच. खरंतर स्वेटर घातला असूनही थंडीनं बऱ्यापैकी कुडकुडायला होत होतं, पण त्याची जाणीव मात्र उशिरा झाली होती. आमचे काही सहयात्री चहा पित होते मग मात्र आम्हालाही गरमागरम चहा प्यावासा वाटू लागला. एवढ्या थंडीत वाफाळता चहा प्यायला मिळाल्याचं सुख वेगळच होतं. 

                अतिशय सुंदर असा नजारा पहात घाटरस्त्याने आमचा प्रवास सुरु होता. जेमतेम अर्धा तास प्रवास झाला आणि मन अत्यानंदानं मोहोरलंच. आजूबाजूचे सारे पर्वत हिमाच्छादित दिसू लागले होते. आमच्या रस्त्याच्या कडेनंही सगळीकडे ताजं शुभ्र बर्फ दिसू लागलं. थंडी तर वाढलीच पण आजूबाजूला सतत दिसणारं बर्फ पहाण्यात मन रमलं होतं. खरंतर लगेच गाडी थांबवून बर्फात खेळायचा फारच मोह होत होता. पण इथलं वातावरण सतत बदलत असतं. त्यामुळे आधी पुढे जाऊन स्थलदर्शन करुन मग थांबावं असं ठरवलं. जवळजवळ तासभर हा अप्रतिम नजारा पहात आम्ही आमच्या स्थानावर पोहोचलो. 

                     ' बाबा मंदिर ' तब्बल तेरा हजार फुटांवर असलेलं हे ' शिपाई/मानद कॅप्टन बाबा हरभजन सिंग ' या सैनिकाचं मंदिर आहे. हे एक भारतीय लष्करी सैनिक होते. कथेनुसार हरभजन सिंग दुर्गम चौकीवर रसद पुरवठा घेऊन जात असताना त्यांचा ४ ऑक्टोबर १९६८ रोजी नथुला इथं हिमनदीत बुडून मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर त्यांचे अवशेष सैनिकांना मिळाले. असं सांगितलं जातं की हरभजन सिंगनी स्वतःच एका मित्राच्या स्वप्नात येऊन आपल्या मृत्यूची आणि त्या जागेची माहिती दिली. तसंच आपल्या स्मरणार्थ मंदिर बांधावं आणि त्याची देखभाल करावी अशीही इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधण्यात आलं आहे. त्ंना २६ जानेवारी १९६९ रोजी मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं आहे. पूर्वेकडील दुर्गम उच्च उंचीच्या प्रदेशात त्यांचा आत्मा अजूनही सैनिकांचं रक्षण करतो असा विश्वास अजूनही सैनिकांना आहे. नाथुला इथं दोन्ही बाजूच्या ध्वजबैठकी दरम्यान  हरभजन यांच्या सन्मानार्थ एक रिकामी खुर्ची बाजूला ठेवतात. तसंच दरवर्षी ११ सप्टेंबरला एक जीप त्यांच्या वैयक्तिक सामानासह त्यांच्या गावाला पाठवली जाते. तसच दर महिन्याला काही रक्कम नाथुला इथं त्यावेळी असणाऱ्या सैनिकांबरोबर हरभजन यांच्या मातोश्रींना पाठवली जाते. 

                  आमच्या जीप या मंदिराजवळ पोहोचल्या. आम्ही मंदिरात जाण्यासाठी खाली उतरलो आणि थंडीने अक्षरशः गारठलोच. उणे तापमानात आम्ही साथे स्वेटर  घालून उभे होतो. मंदिर आणि आसपास सगळीकडे थोडं बर्फ पडलेलंच होतं. आजूबाजूचे सारे पर्वतही बर्फमय झाले होते. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. थंडीनं कुडकुडत असूनही तिथे फिरण्याचा मोह आवरत नव्हता. मंदिराच्या बाजूला पडलेल्या बर्फातही थोडं खेळलेच मी. ताजं भुरभुरीत बर्फ होतं तेही त्यामुळे हात बधीर होत असूनही खेळायला मज्जा आली. पण मग मात्र थंडी सहन होईनाशी झाली. आणि आपोआपच पावलं समोरच्या कॅफेकडे वळली. इथंही मस्त गरमागरम मोमोज खायला मिळाले. मोमोज आणि वाफाळत्या चहामुळे थंडीची तीव्रता जरा कमी झाली. परत सारा नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात मनसोक्त साठवला. 

                 खरंतर तिथूनच थोडं पुढे जेमतेम १० किमी वर असलेली भारत तिबेट सीमा बघायची खूप इच्छा होती. पण आमच्या बरोबर असलेल्या बाकी कुणालाही तिथे जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही थोड्या वेळाने बाबा मंदिरातूनच परत निघालो. थोडंस पुढे आल्यावर मात्र गाडी थांबवलीच. सगळीकडे शुभ्र बर्फ पसरलं होतं. गाडीतून उतरुन मी सरळ त्या बर्फात शिरले. इतकं छान ताजं भुरभुरीत बर्फ होतं की त्यात खेळण्याचा मोह आवरणं अशक्यच होतं. थोडावेळ त्या बर्फात खेळून हात फारच बधीर झाले मग मात्र खेळणं थांबवून तिथून पुढे निघालो. 

               इथून पुढे आम्ही गेलो 'त्सोमगो लेक' बघायला. यालाच 'चांगु लेक' असंही म्हणतात. गंगटोक पासून ३८ किमी अंतरावर असलेलं हे हिमनदी सरोवर १२४०० फूट उंचीवर आहे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये या सरोवराचं  सौंदर्य बदलतं. हिवाळ्यात याचं नितळ जल गोठलेलं असतं. तर वसतं ऋतू बहरणाऱ्या रंगबिरंगी फुलांमुळे याचा किनारा रंगबिरंगी होतोच आणि त्यांच्या प्रतिबिंबामुळे सारा जलाशयच रंगात रंगतो. एकूणच कुठल्याही ऋतूत हे सरोवर अत्यंत सुरेख दिसतं. इथं याक वर बसून फोटो काढता येतात. त्यासाठी काहीजणं पाळीव याक ना  सजवून घेऊन उभे असतात. बरेच पर्यटक याक वर बसून छायाचित्र काढून घेतात. तसंच खरेदीसाठी इतरही दुकानं इथं आहेत. या सरोवराच्या काठावरच एक छोटसं शिवमंदिर आहे. बाबा मंदिर आणि हा त्सोमगो लेक लष्कराच्या ताब्यात आहे. त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय इथे येण्यास बंदी आहे. आम्ही या सरोवराजवळ गेलो आणि मुग्धपणे पहातच राहिलो. सरोवराच्या नीलजलाचा बराच भाग बर्फाच्छादित होता. पलिकडचे पर्वतही बर्फमय होते. अगदी एखाद्या सुरेख चित्रासारखं दृश्य होतं. कितीही वेळ पाहिलं तरी मन भरतच नव्हतं. खूप छायाचित्रं काढली पण तरीही प्रत्यक्षातलं दृश्य फारच अप्रतिम होतं. बराच वेळ तिथं थांबून अखेर परत निघालो. स्थलदर्शनं करुन आम्ही तिन्हीसांजेला हाॅटेलमध्ये परत आलो. आजही परत कुठे फिरायला जायची इच्छा नव्हतीच. दिवसभरात फक्त तीन ठिकाणंच आम्ही पाहिली होती. पण एकूण प्रवास, वातावरण आणि प्रत्यक्ष तीन्ही ठिकाणं सारंच अप्रतिम होतं. मन अजूनही तिथेच रममाण झालं होतं. 

                      बाराव्या दिवशी सकाळी आम्ही आवरुन नाश्ता करुन परत  सिलिगुडीसाठी प्रवास सुरु केला. दुपारी उशिरा आम्ही सिलिगुडीला पोहोचलो. हाॅटेलमध्ये जाऊन थोडा आराम केला. तोपर्यंत आमची बस तिथे आली. त्यातून आमचं सामान घेऊन रुममध्ये नेऊन ठेवलं आणि आम्ही पुन्हा मार्केट मध्ये गेलो. थोडीशी खरेदी आणि प्रसिद्ध बंगाली मिठाई घेऊन हाॅटेलमध्ये परत आलो.

                        तेराव्या दिवशी सकाळी लवकर सारं आवरुन आम्ही दोघं 'बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ' पोहोचलो. तीन तासांचा विमान प्रवास करुन महाशिवरात्रीदिवशीच सायंकाळी घरी परत आलो. अमावस्या संपल्यानंतर दोन दिवसांनी गंगापूजन करुन यात्रेची सांगता केली. 

                  यात्रेच्या  सुरुवातीलाच एका बसला अपघात झाला आणि आमचा तो संपूर्ण एक दिवस वाया गेला. त्यामुळे यात्रेचं ठरलेलं वेळापत्रक कोलमडलं. या कारणामुळे वेळेअभावी काही ठिकाणी जाता आलं नाही. सगळ्यांनाच थोडा शारीरक - मानसिक त्रास झाला. परंतु एकूण यात्रा छानच झाली. 

- स्नेहल मोडक



 



  

  



Thursday, March 14, 2024

भ्रमंती -३

               आठव्या दिवशी सकाळी सिलिगुडीला आम्ही फक्त नऊजणंच पोहोचलो होतो. आमच्या बरोबर आमची फक्त एक सॅकच होती. बाकी सगळं सामान आमच्या दुसऱ्या बसमध्ये होतं. हाॅटेलमध्ये पोहोचल्यावर सारं आवरुन, नाश्ता करुन आम्ही आठजणं खरेदीसाठी निघालो. सिलिगुडीचं मार्केट खूपच मोठं आहे. इथलं हाॅंगकाॅंग मार्केट शाॅपिंगसाठी प्रसिद्ध आहे. सध्या थंडीचा मौसम असल्यानं इथं लोकरीच्या कपड्यांच्या विविध प्रकारांनी दुकानं सजली होती. तसंच इतरही अनेक गोष्टी खरेदीसाठी उपलब्ध होत्या. थोडीफार खरेदी करुन, फिरुन आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो. 

                परत जरावेळाने बंगाल सफारी पहाण्यासाठी निघालो. २०१६ साली उद्घाटन करण्यात आलेली ही सफारी ७०० एकर जमिनीवर वसलेली आहे. बंगाली वाघांबरोबरच इथे इतरही सारे प्राणी पहायला मिळतात. सफारी साठी बसेस आणि जीप्स आहेत. सफारी साठी जायचं नसेल तर ठराविक भागात पायीही फिरता येतं. अतिशय सुंदर निसर्गरम्य अशी ही सफारी आहे. आम्ही गेलो तेव्हा आम्हाला फक्त प्रवेश-फी देऊन आत पायी फिरायला मिळालं. सफारीची तिकिटं संपली होती. सफारीला जायला मिळणार नाही म्हणून मन जरा नाराज झालंच. पण दुसरा पर्याय नव्हता. आम्ही पायीच आत फिरायला सुरुवात करणार एवढ्यातच तिथलाच एक सुरक्षासैनिक आमच्याजवळ आला आणि त्याने सफारीची तिकिटं काढलीत का विचारलं पण आम्हाला ती मिळाली नाही असं सांगताच तो म्हणाला ' तुम्हाला जायचंच असेल एका ग्रुपने रद्द केलेली तिकिटं आहेत , तुम्हाला जायचं असल्यास सांगा नाहीतरी मी ती तिकिटं काउंटरवरच देणार आहे, दुसरी लोकं जाऊ शकतील यासाठी.' ती तिकिटं फक्त एका भागापर्यंतच मर्यादित होती. पण आम्ही लगेच होकार देऊन ती तिकिटं विकत घेतली आणि सफारीसाठी निघालो. बसने सफारी सुरु झाली आणि पाऊण एक तासाच्या या सफारीत बंगाली वाघ, सांबर, हरिण या प्राण्यांना अगदी छान मुक्त वावरताना पहायला मिळालं. सफारी संपवून आम्ही परत निघालो.

              आम्ही हाॅटेलमध्ये परत येईपर्यंत तिन्हीसांज झाली होती. नुकतीच आमची बसही तिथे येऊन पोहोचली होती. मग त्या बसमधल्या आमच्या बॅगा घेऊन आम्ही रुममध्ये गेलो. रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यात गेलेला वेळ आणि अत्यंत खराब रस्ता यामुळे त्या बसमधल्या सहयात्रींना जवळपास २६-२७ तासांचा प्रवास घडला होता. आम्हीच फक्त जे खाजगी बसने पुढे आलो होतो ते लवकर  म्हणजे १९ तास प्रवास करुन पोहोचलो होतो. 

              नवव्या दिवशी सकाळी लवकर आम्ही सारे तिथल्या जीपने स्थलदर्शनासाठी निघालो. 

              जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवलेलं दार्जिलिंग. सिमला, कुलू, मनाली याबरोबरच पर्यटनासाठी अग्रक्रमानं निवडलं जाणारं शहर म्हणजे दार्जिलिंग. सात हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या दार्जिलिंग मध्ये उन्हाळ्यातही हवा सुखद आणि थंड असते. यामुळेच ब्रिटिशांनी दार्जिलिंग ला उन्हाळी राजधानी बनवली होती. त्यांनी तिथल्या हवामान ,पाणी याचा अभ्यास करुन चहाची लागवड करुन चहाचे मळे विकसित केले. या चहाच्या मळ्यांनी दार्जिलिंगच्या सृष्टी सौंदर्यात अधिकच भर टाकलीय. सारे डोंगरउतार सदैव हिरवा शालू ल्यायलेले असतात. हिरव्या रंगाच्या साऱ्या छटांमुळे निसर्गानं जणू पाचूची मुक्त उधळण केलीय असा नेत्रसुखद भास होतो. मोठमोठे चहाचे मळे, आल्हाददायक हवामान आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असणारी टाॅय ट्रेन यामुळं दार्जिलिंग सतत पर्यटकांनी गजबजलेलंच असतं. दार्जिलिंग 'क्विन ऑफ हिल्स' म्हणून ओळखलं जातं.

             'दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे' ही भारतातील सर्वात उंचावरुन धावणारी, न्यु जलपाईगुडी ते दार्जिलिंग अशी ऐतिहासिक रेल्वे आहे. १८८१ साली बांधून पूर्ण झालेला हा ७८ किमी लांबीचा नॅरो गेज मार्ग आहे. १९९९ साली दार्जिलिंग हिमालयीन रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानात समाविष्ट करण्यात आलंय. जगातील ही अशी दुसरी रेल्वे आहे जिला हा सन्मान प्राप्त झालाय.  या टाॅय ट्रेन मधून प्रवास करण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. 

                       अशा या नितांतसुंदर दार्जिलिंगला स्थलदर्शनासाठी आम्ही  निघालो होतो. सर्वात आधी आम्ही 'घूम मठ' पहायला गेलो. गेलोक्पा आणि यलो हॅट या पंथाशी संबंधित असलेल्या या मठाची स्थापना १८५० साली मंगोलियन ज्योतिषी आणि भिक्षू सोक्पो शेराब ग्यात्सो यांनी केली. हा घूम मठ किंवा योग चोलिंग मठ १५ फूट उंचीच्या मैत्रेय बुध्दाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. मठाचा आतील भाग भिंतीवरील थांगका, पारंपरिक घंटा, ड्रम यांनी सुशोभित केलाय. तसंच दुर्मिळ बौद्ध हस्तलिखितं, शिलालेख यांचं संग्रहालय इथं आहे. बौद्ध आणि तिबेटियन कलावस्तूंची इथं दुकानं आहेत. 

                        घूम मठ पाहून आम्ही गेलो बतासिया लूप आणि गोरखा वाॅर मेमोरियल पहायला. दार्जिलिंगमधल्या टाॅय ट्रेन चा प्रवास या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा बतासिया लूपमधून होतो. हे स्थानक घूम आणि दार्जिलिंग यामध्ये आहे. इथे रेल्वेचा अभियांत्रिकी चमत्कार असलेला जवळजवळ वर्तुळाकार मार्ग आहे. या वर्तुळाकार मार्गावरुन ही रेल्वे हजार फूट उंचीवर उतरते.  या बतासिया लूप स्थानकामध्येच गोरखा युद्ध स्मारक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून राष्ट्राच्या संरक्षणार्थ बलिदान देणाऱ्या  शूर गोरखांच्या स्मरणार्थ हे स्मारक 'जिल्हा सैनिक मंडळ दार्जिलिंग' यांनी १९९५ सालात बांधलय. या बतासिया लूप मधून प्रसिद्ध कांचनजंगा शिखर आणि इतर हिमाच्छादीत हिमालयीन शिखरं पहाता येतात, त्यामुळे  हे पर्यटकांचं अतिशय आवडतं स्थान आहे. पारंपरिक हस्तकलेच्या आणि लोकरीच्या वस्तूंची इथं दुकानं आहेत. अतिशय नयनरम्य अशा या स्थानी आम्ही गेलो तेव्हाही पर्यटकांची गर्दी होतीच. युद्ध स्मारक पाहून आम्ही जरा पुढे गेलो तेवढ्यातच टाॅय ट्रेन तिथे आली. तिथे आधीपासूनच ट्रेनची वाट पहात‌ असलेले बरेच लोकं ट्रेनमध्ये चढले. प्रशस्त काचेच्या खिडक्या असलेली ही सुंदर ट्रेन आम्हाला अगदी जवळून पहायला मिळाली. पुढल्या दहा मिनिटांतच ती ट्रेन तिथून पुढे गेली. बतासिया लूपमध्येच तिबेटियन पारंपरिक पेहराव घालून छायाचित्रं काढण्याची सुविधा होती. मग आम्हीही ते पोषाख घालून छायाचित्रं काढली. अतिशय रमणीय अशा स्थानावर मन जरा जास्तच रमलं होतं. तिथून दिसणारं कांचनजंगा आणि इतर बर्फाच्छादित शिखरं पहातच रहावीशी वाटत होती. 

                   इथून पुढे आम्ही चहाचे मळे पहायला निघालो. मार्गावरच एका ठिकाणी 'तेनसिंग नोर्गे राॅक' आहे. इथे राॅक क्लाईम्बिंगचा थरार अनुभवता येतो. सर एडमंड हिलरी आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारे तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ सालात हिमालयन माऊंटेरियन इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. पर्वतारोहण करण्यासाठी लागणारी उपयुक्त माहिती देणारं संग्रहालय आणि पर्वतारोहण प्रशिक्षण त्यांनी सुरु केलं. हे पाहून आम्ही चहाचे मळे पहायला पुढे गेलो. रस्त्यावरुन थोडंसं खाली उतरुन आम्ही चहाच्या मळ्यात पोहोचलो. समोरचे सारे डोंगरउतार हिरवेगार दिसत होते. खूप छान दृश्य होतं. इथंही लोकं पारंपरिक पेहरावात छायाचित्रं काढत होती. चहाच्या मळ्यांची हिरवाई नजरेत आणि छायाचित्रात साठवून आम्ही वरती परत आलो. इथं रस्त्याच्या कडेला ओळीने चहाची दुकानं आहेत. यातल्याच एका दुकानात ताजा वाफाळता चहा प्यायला. तिथेच घरी नेण्यासाठी चहापूड विकत घेतली. चहाचे मळे पाहून आम्ही पुढे निघालो.

               आमचं पुढचं स्थान होतं 'पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान'. यालाच दार्जिलिंग प्राणिसंग्रहालय असंही म्हणतात. १९५८ मध्ये ६७ एकर एवढ्या परिसरात हे प्राणीसंग्रहालय उभारण्यात आलंय. सात हजार फूट उंचीवर असलेलं हे भारतातील सर्वात उंच प्राणीसंग्रहालय आहे. प्रामुख्यानं हिमालयन प्राण्यांचं प्रजनन आणि संवर्धन यासाठी याची निर्मिती करण्यात आलीय. लुप्तप्राय हिमालयन लांडगा आणि लाल पांडा यांचं संवर्धन इथं करण्यात आलंय. त्याबरोबरच हिम बिबट्या,गोरल (माऊंटन बकरी) सैबेरियन वाघ याही लुप्तप्राय प्राण्यांचं संवर्धन करण्यात आलंय. सरोजिनी नायडू यांच्या कन्या पद्मजा नायडू यांचं नांव या उद्यानाला देण्यात आलं आहे. आम्ही या उद्यानात फिरुन बरेच प्राणी पाहिले. इथे प्राण्यांच्या अधिवासाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना फिरण्यासाठीही व्यवस्थित रुंद मार्ग केले आहेत. प्रत्येक प्राण्याचे माहिती फलक आहेतच. हे सारं पाहून आम्ही बाहेर आलो. इथेही काही दुकानं आहेत. लोकरीच्या वस्तूंबरोबरच खाऊचीही दुकानं आहेत. आम्ही थोडी खरेदी करुन तिथल्या प्रसिद्ध 'झालमुरी' आणि 'पापडी चाट' चा आस्वाद घेतला.

                ही सारी स्थलदर्शनं करुन आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजेच सिलिगुडीला निघालो. जसं नेपाळमध्ये गंडकी नदी प्रवासभर साथ देत होती तसंच इथं तीस्ता नदीचं रमणीय दृश्य पहायला मिळत होतं. इतके दिवस उबदार थंडी जाणवत होती. पण दार्जिलिंगला थंडीचा कडाका वाढला होता. पण दिवसभर अतिशय छान प्रवास झाला होता.

- स्नेहल मोडक

    

   

   



Wednesday, March 13, 2024

भ्रमंती - २

               पाचव्या दिवशी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आम्हाला नेपाळची सीमा ओलांडायची परवानगी मिळाली आणि आम्ही पुढील प्रवासाला लागलो. मात्र या गोंधळामुळे काठमांडू ला पोहोचायला जवळजवळ रात्र झाली. त्यामुळे त्यादिवशी कुठेही फिरायला किंवा दर्शनाला जाता आलं नाही. पण हा दिवसाचा प्रवास खूपच चांगला ठरला. सीमा ओलांडून आमची बस पुढे निघाली आणि काही वेळातच नेपाळच्या रस्त्यांनी आपलं सध्याचं रंगरुप दाखवायला सुरुवात केली. संपूर्ण नेपाळ मध्ये सगळीकडे रस्त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे पुढला प्रवास अतिशय त्रासदायक होता. बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु होती. पूर्ण घाटरस्ता आणि तोही अतिशय खराब म्हणजे जवळजवळ नुसती पिवळसर पांढरी वस्त्रगाळ मातीच असलेला होता त्यामुळे हा प्रवास दिवसा करावा लागला हे बरंच झालं. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता खराब असला तरी दिवसाच्या प्रवासामुळे पहायला मिळालेलं नेपाळचं सृष्टी सौंदर्य. जवळपास पूर्ण प्रवासात घाटरस्ता असल्यानं एका बाजूला डोंगर आणि दुसरीकडे त्या डोगरांना बिलगून घाटदार वळणं घेत कधी संथ तर कधी खळखळत वहाणारी नेपाळची प्रसिद्ध गंडकी नदी आम्हाला साथ देत होती. तसंच सगळीकडे अतिशय सुंदर अशी रंगबिरंगी फुलांची उधळण अनुभवायला मिळत होती. प्रवासभर  खूप छान लोभसवाणं दृश्य पहायला मिळत होतं. हे सारं सृष्टी सौंदर्य पहात तिन्हीसांजेला आम्ही काठमांडू ला पोहोचलो. 

                सहाव्या दिवशी सकाळी आम्ही पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही ज्या हाॅटेलमध्ये राहिलो होतो तिथून अगदी जवळच पशुपतीनाथ मंदिर असल्याने आम्ही चालतच मंदिरात पोहोचलो. 

                 पांडवांनी कौरवांचा संहार करुन युद्ध जिंकलं आणि राज्य स्थापन केलं. त्यावेळी झालेली प्रचंड जीवितहानी आणि काही प्रिय भक्तांचा विनाश पाहून भगवान शिव अत्यंत दु:खी झाले आणि ते गुप्त रुपात केदारनाथ येथे राहू लागले. जेव्हा पांडवांची 

स्वर्गारोहणाची  वेळ जवळ आली तेव्हा पांडवांना निष्कलंक सदेह स्वर्गात जाता यावं म्हणून श्रीकृष्णाने त्यांना भगवान शिवांचं दर्शन घेण्याचा सल्ला दिला. म्हणून शिवाला शोधत शोधत पांडव केदारनाथला आले. शिवजी एका म्हशीच्या कळपात रेडा बनून लपले होते. पण भिमानं त्यांना ओळखलंच. त्यामुळे शिवजी तिथेच जमिनीत घुसले पण भिमाने त्यांच्या शेपटीला धरुन ठेवलं. तोच शेपटीवाला पार्श्वभाग केदारनाथमध्ये आणि जमिनीतून दूर नेपाळमध्ये बाहेर पडलेला मुखाचा भाग पशुपतीनाथ म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर पशुपतीनाथाचंही दर्शन घ्यावं लागतं तेव्हाच हे दर्शन पूर्ण होतं अशी मान्यता आहे. नेपाळ माहात्म्य आणि हिमावतखंडा यांच्या मते इसवीसन चारशे पूर्वीचं हे बागमती नदी तीरावर वसलेलं पशुपतीनाथ मंदिर आहे. चांदीच्या सर्पानं वेढलेलं एक मीटर उंचीचं चार दिशांना चार मुखं असलेलं हे दगडी मुखलिंग आहे. प्रत्येक मुखावर पसरलेले हात आहेत. एका हातात रुद्राक्ष माला आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. दर्शनासाठी चार दिशांना चार प्रवेशद्वारं आहेत. 

               पशुपतीनाथ मंदिरात जाऊन आम्ही पंडितजींकडून रुद्राभिषेक केला. मात्र हे अभिषेकादी कुठलेच विधी मुख्य गाभाऱ्यात न करता बाहेर आरक्षित केलेल्या ठिकाणी केले जातात. रुद्राभिषेक झाल्यावर पंडितजींबरोबरच आम्ही प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिरात गेलो. इथेही प्रचंड मोठी रांग होती. पण आम्ही पंडितजींबरोबर गेल्यामुळे वेगळ्या रांगेतून थोडं लवकरच दर्शन घडलं. दर्शन घेऊन नतमस्तक झालो आणि मन तृप्त झालं. केदारनाथाच्या दर्शनानंतर पशुपतीनाथाच्या दर्शनाची जी आस लागली होती ती आज पूर्ण झाली होती. पशुपतीनाथ मंदिराच्या आवारातच एका उघड्या सभामंडपात २५७ लहान लहान शिवलिंग स्थापन केली आहेत. मध्यभागी एक घुमटी वजा मंदिर आहे. तिथेही शिवलिंग स्थापन केलं आहे. यांचंही दर्शन आम्ही घेतलं.

                   पशुपतीनाथ दर्शन घेऊन आम्ही पुढे गुह्येश्वरी मंदिरात गेलो. हे आदिशक्ती पार्वतीमातेचं एक शक्तीपीठ आहे. या मंदिराबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. गुहेत लपलेली सतीदेवी म्हणून गुह्येश्वर अशी एक आख्यायिका आहे. महाराजा दक्षाने केलेल्या भगवान शिवाच्या अपमानानंतर सतीने यज्ञात उडी घेतली त्यावेळी क्रोधित होऊन शिवजी सतीचा जळता देह घेऊन सैरावैरा पळत असताना भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं त्यात सतीचे नितंब जिथे पडले ते गुह्येश्वरी मंदिर अशी मान्यता आहे. तसंच सतीचे गुडघे जिथे पडले ते हे मंदिर असंही मानतात. अतिशय प्रशस्त असं नेपाळी पध्दतीने बांधलेलं हे मंदिर सुंदरच आहे. 

                  शक्तीपीठाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो. बुढा निलकंठ मंदिरात. शिवपुरी टेकडी प्रदेशात वसलेलं भगवान श्रीविष्णुंचं हे मंदिर. या मंदिरात भगवान महाविष्णूंची शेषशायी म्हणजे शेषनागावर निद्रिस्त अशी भलीमोठी आडवी मूर्ती आहे. बुढानीलकंठाची ही मूर्ती नेपाळमधील सर्वात मोठं दगडी कोरीव काम मानलं जातं. अतिशय सुंदर रेखीव अशी जलाशयातील ही चार मीटर लांबीची मूर्ती तरंगती आहे असं सांगितलं जातं. या चतुर्भुज मूर्तीच्या एकेका हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे. तसंच विशाल कोरीव मुकुटही आहे. नेपाळ माहात्म्य आणि हिमावतखंड या ग्रंथात बुढा नीलकंठच्या दर्शन आणि पूजनानं धनधान्य आणि संपदा प्रापत होते असं सांगितलं आहे. हे मंदिर आणि सारा परिसर सुंदरच आहे. इथे गर्दी फारच कमी असल्यानं आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं थोडं थांबून सारं नीट पहाता आलं. 

                यानंतर आम्ही 'अमिदेव बुद्ध पार्क' मध्ये गेलो. २००३ साली बांधण्यात आलेलं हे भव्य पार्क आहे. काही पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्या समोर येतात त्या तीन भव्य सुवर्ण बुद्ध मूर्ती. मध्यभागी ६७ फूट उंचीची शाक्यमुनी बुद्धाची सुवर्ण मूर्ती आहे. जी अमिदेव रुप आहे. याचा संबंध दिर्घायुष्याशी आहे. या मूर्तीच्या हातात एक वाडगा आहे ज्यात अमरत्वाचं अमृत आहे. या मूर्तीच्या डावीकडे ६४ फूट उंच चेनरेझिक बुद्ध मूर्ती आहे. ज्याला अवलोकितेश्र्वर या नावानंही ओळखतात. सर्व बोधिसत्त्वांपैकी अचल डोळ्यांनी पहाणारे आणि सर्वात दयाळू असे हे चेनरेझिक आहेत. दलाई लामा हे चेनरेझिक चा अवतार मानले जातात. शाक्यमुनी बुद्धाच्या उजवीकडे ६४ फूट गुरु रिनपोचे उर्फ गुरु पद्मसंभव आहेत.  संपूर्ण ज्ञानी म्हणून अवतरलेले गुरु रिनपोचे आदिम ज्ञानाचे रक्षक आहेत. या तीन भव्य बौद्ध मूर्तींबरोबरच थोडा बाजूला एक उंच स्तूपही इथे आहे. तुलनेनं कमी गर्दी असलेलं हे बुद्ध पार्क पहाण्यासारखं आहे. हे सारं पाहून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो. सारं आवरुन पुढे पोखरा ला निघालो. रात्रप्रवासाने पहाटे चार वाजता पोखरा येथे पोहोचलो. जवळपास संपूर्ण नेपाळ मध्ये रस्त्यांची कामं सुरु असल्यानं प्रत्येक प्रवासाला खूप जास्त वेळ लागत होता आणि खूप त्रासही होत होता. 

               सातव्या दिवशी पहाटे पोखरा ला पोहोचून थोडा आराम करुन आम्ही देवदर्शन आणि स्थलदर्शनासाठी निघालो. 

                सर्वात आधी आम्ही गेलो गुप्तेश्वर महादेव गुंफा पहायला. जवळपास दिडशे मीटर खोल असलेली ही गुंफा सोळाव्या शतकात बांधण्यात आली आहे. मात्र ती १९९१ साली खुली करण्यात आली. सुरुवातीला गोलाकार बांधलेल्या पायऱ्या उतरुन प्रत्यक्ष गुहेत प्रवेश करावा लागतो. कमी जास्त उंची आणि रुंदी असलेल्या या सुंदर गुहेतच भगवान शिवाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. त्यापढे अजूनही खाली पायऱ्या उतरल्यावर तिथून वहाणाऱ्या डेविस फाॅल्स चं अप्रतिम दृश्य पहाता येतं. संपूर्ण गुहेत सतत पाणी टपकत असतं. त्यामुळे सारा मार्ग निसरडा आहे. तसंच जरा अवघड आणि अंधारवाट असल्यानं जपूनच उतरावं लागतं. मात्र अतिशय अप्रतिम असा हा अनुभव आहे. 

                   गुप्तेश्वर महादेव गुंफा पाहून आम्ही डेविस फाॅल्स पहायला गेलो. हा एक असाधारण असा धबधबा आहे. जो उंचावरुन कोसळत तळाशी पोहोचल्यावर ५०० फूट लांबीचा भुमीगत बोगदा निर्माण करतो. यावरुनच नेपाळी भाषेत याला 'पाताले छांगो' म्हणतात. याचाच अर्थ भुमिगत धबधबा असा आहे. हा अतिशय सुंदर धबधबा पहाण्यासाठी व्यवस्थित रेलिंग असलेली जागा आहे. नयनरम्य असा हा धबधबा आहे.

                    हा धबधबा पाहून आम्ही विंध्यवासिनी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलो. नेपाळ मधील अतिशय पुरातन असं हे मंदिर भगवती देवीला समर्पित आहे. थोड्या पायऱ्या चढून या मंदिरात जाता येतं. याच आवारात सरस्वती, शिव, गणेश, हनुमान यांचीही मंदिरं आहेत. कास्कीचा राजा सिध्दी नारायण शाह यांनी देवी विंध्यवासिनीचं मंदिर बांधण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्यानं आपल्या माणसांना  देवीची मूर्ती परत आणण्यासाठी विंध्याचल पर्वत (सध्याचा उत्तर प्रदेश, भारत) इथं पाठवलं. मूर्ती घेऊन परत येताना सध्याच्या मंदिराच्या जागी त्या माणसांनी विश्रांतीसाठी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी प्रवास सुरु करत असताना त्यांना जाणवलं की तिथं ठेवलेली मूर्ती जागेवरुन उचलता येत नाही. परिस्थितीची माहिती मिळताच राजानं देवीची इच्छा जाणून त्याच जागी मंदिर उभं करण्याचे निर्देश दिले. अशा रीतीने याठिकाणी हे सुंदर मंदिर स्थापन करण्यात आलं. हे सारं पाहून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो. 

                इथून पुढे आमच्या दोन बसेसपैकी एक बस काही यात्रींना घेऊन सुनौली सीमा ओलांडून गोरखपुरला परत जाणार होती. आणि दुसरी बस आम्हाला घेऊन काकडबीटा सीमा ओलांडून सिलिगुडीला जाणार होती. पण त्यात यात्रेकरुंची संख्या जास्त असल्यानं आम्ही दोघं आणि आमच्या बरोबर अजून सहाजणं आणि एक आयोजक असे नऊजणं पोखराहून तिथल्याच एका खाजगी बसने आणि बाकी सारे आमच्या बसने दुपारी काकडबीटा ला  निघालो. अतिशय खराब आणि घाट रस्त्यामुळे आम्हाला काकडबीटा येथे पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळचे ७ वाजले. सीमेजवळ आल्यावर आमच्या ओळखपत्राची परत एकदा तपासणी झाली. आणि आम्हाला सिलिगुडीला जायची परवानगी मिळाली. आम्ही नऊजणं जीपने पुढे निघालो. अर्ध्या तासातच आम्ही सिलिगुडीला आमच्या हाॅटेलमध्ये पोहोचलो.

- स्नेहल मोडक

   

   


 

     


Monday, March 11, 2024

भ्रमंती - १

          उत्तराखंड मधील चारधाम यात्रेचा योग जून महिन्यात आला. आणि केदारनाथच्या दर्शनानंतर आम्हाला आस लागली ती पशुपतीनाथ च्या दर्शनाची. पण पाऊस, दसरा, दीपावली अशा कारणांमुळे लगेच हा योग येणारच नव्हता. पण नवीन वर्ष सुरु होऊन जानेवारी संपला आणि मग मात्र मला पशुपतीनाथ च्या दर्शनाचे वेध लागले.

         चारधाम ला आमच्या बरोबर असलेल्या बाकी कुणालाही यायला जमणार नसल्याने आम्ही दोघांनीच जायचं ठरवलं. काही यात्रा कंपन्यांकडून माहिती घेऊन एका यात्रा कंपनी बरोबर जायचं नक्की केलं. त्यानुसार विमाचाचं जायचं यायचं तिकीट काढलं आणि तयारीला लागलो. कारण हे सगळं ऐनवेळी ठरवल्यामुळे तयारीला फारच कमी वेळ होता.

           ठरल्याप्रमाणे पौर्णिमेच्या भल्या पहाटे आम्ही निघालो. सकाळच्या विमानाने वाराणसीला पोहोचलो. विमानतळावरुन गाडीने आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. हाॅटेलवर पोहोचलो पण रुम मिळायला किमान तासभर लागणार होता. रुम रिकाम्या झाल्या आहेत पण स्वच्छता करायला तासभर लागेल असं तिथल्या मॅनेजरने सांगितलं. एक रुम स्वच्छ करुन लगेच देणं शक्य असतानाही त्यांनं असं उर्मटपणे सांगताच माझ्या मनात साशंकता निर्माण झाली. काही न बोलता सामान तीथे ठेवून आम्ही जेवायला बाहेर गेलो.

               जेवणासाठी हाॅटेल शोधत असतानाच तिथून राजघाट जवळच असल्याचं कळलं. मग आधी सरळ राजघाटावरच गेलो. गंगामैयाचं पहिलं दर्शन घेतलं आणि मग जेवून मुक्कामी परत आलो. थोड्या वेळाने रुम ताब्यात मिळाली. थोडा आराम करुन आम्ही परत बाहेर पडलो. रिक्षाने श्री काशी विश्वेश्वर मंदिरात गेलो. दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. साधारण अर्ध्या तासात आम्हाला श्री काशी विश्वेश्वर चं दर्शन घडलं. मात्र सायंआरतीच्या आधी थोडा वेळ प्रत्यक्ष गाभाऱ्यातून दर्शन बंद होतं. त्यामुळे स्पर्श न करता पण अगदी समोरुन छान दर्शन घडलं. त्यानंतर आम्ही कालभैरव मंदिरात गेलो. तिथेही मोठी रांग होती पण तिथल्या फुलवाल्याने आम्हाला वेगळ्या बाजूने दुसऱ्या रांगेतून जायला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही गेलो आणि अगदी दहा मिनिटांतच कालभैरवाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. ही दोन्ही दर्शन घेऊन आणि थोडीशी खरेदी करुन आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो. 

              आमची यात्रा दुसऱ्या दिवशीपासून सुरु होणार होती. त्यानुसार सकाळी नाश्ता करुन आमच्या यात्रा आयोजकाने ठरवलेल्या रिक्षाने आम्ही आधी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेलो. आज मात्र दर्शनासाठी फारच मोठी रांग होती. किमान दोन तास रांगेत उभं राहिल्यानंतर आम्हाला कालभैरवाचं परत एकदा सुंदर दर्शन घडलं. तिथून आम्ही सारे नंदेश्वर घाटावर गेलो. घाटावरुन खाली उतरुन गंगामैयाचं दर्शन घेऊन गंगास्नान केलं. बरोबर गंगाजल घेऊन घाटावर येऊन पंडितजींकडून गंगापूजन, अभिषेक आणि पिंडदान हे सारे विधी केले. आणि मग नावेने श्री काशी विश्वेश्वर च्या दर्शनासाठी निघालो. गंगामैयाच्या शांत संथ लाटांवर आमची नाव डुलत निघाली तसं माझं मनही गंगालहरींर अलवार तरंगायला लागलं. आपल्यात काशीयात्रा फार महत्त्वाची मानली गेलीय. आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा करावी मान्यता आहे. त्यामुळे अगदी ऐनवेळी ठरवूनही आम्हाला काशी यात्रेचं भाग्य लाभलं, गंगास्नान आणि श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घडतय या विचारानं मन भरुन आलं होतं. गंगेचं विशाल पात्र आणि किनारी बांधलेले प्रशस्त घाट पहात, छायाचित्रं काढत आम्ही प्रसिद्ध अशा मणिकर्णिका घाटाच्या बाजूला असलेल्या ललिता घाटावर उतरलो. तिथून वर चढून आम्ही दर्शनासाठी बांधलेल्या काॅरिडारमधून मंदिराजवळ पोहोचलो. पण दर्शनासाठी इथे प्रचंड मोठी रांग होती. त्यामुळे आम्ही परत बाहेर येऊन सुगम दर्शनाची तिकीटं काढली आणि त्या रांगेत उभं राहिलो. साधारण तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रवेश केला. बरोबर नेलेली हारफुलं, बिल्वदल आणि नैवेद्य प्रत्यक्ष अर्पण करुन, श्री काशी विश्वेश्वरासमोर नतमस्तक झाले. मन अगदी प्रसन्न तृप्त झालं. आदल्या दिवशी सायंकाळी थोडं लांबून दर्शन झालं होतं पण आता मात्र स्वहस्ते सारं अर्पण करता आलं त्यामुळे खूपच समाधान वाटलं. प्रसाद घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आलो. आमचे सारे सहयात्री दर्शन घेऊन येईपर्यंत आम्ही बाहेरच सारं पहात, फिरत होतो. 

             मंदिराच्या आसपासचा परिसर फिरुन, तिथल्याच एका दुकानात कचोरी, पापडी चाट चा आस्वाद घेऊनआम्ही दोघं परत इतरांची वाट पहात घाटावर येऊन बसलो. हवेत छान गारवा होता त्यामुळे थोड्या वेळाने चहा प्यावा असं वाटू लागलं पण त्यासाठी परत घाट चढून वर जाण्यापेक्षा इथेच चहा मिळाला तर बरं‌ होईल असं मी म्हणत असतानाच वरुन आमच्या मागून एक चहावाला पायऱ्या उतरुन आमच्या जवळ आला आणि आम्हाला त्याच्याकडे अतिशय छान चवीचा, वाफाळता लेमन टी मिळाला. एकदम ताजंतवानं वाटलं. 

           आम्ही तिथं बसलो असतानाच बाजूलाच घाटावरती एक पशुपतीनाथाचं पुरातन मंदिर पहात होतो. पण जाण्याचा मार्ग नक्की कुठून आहे ते कळत नव्हतं. मग त्या चहावाल्यालाच सारी माहिती विचारली आणि पुन्हा थोड्या पायऱ्या चढून त्या मंदिरात गेलो. अगदी नेपाळी पध्दतीने बांधलेलं हे पशुपतीनाथ मंदिर सुंदरच आहे. श्री  काशी विश्वेश्वराचं दोनदा अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं, आता पशुपतीनाथाचंही असंच सुंदर दर्शन घडावं आणि माझी सेवा भगवान शिव चरणी रुजू व्हावी, त्याची छान अनुभूती मिळावी अशी प्रार्थना मी नुकतीच चहा पिण्यापूर्वी केली होती. आम्ही पशुपतीनाथ मंदिरात गेलो तर तिथं पंडितजी आणि फक्त आम्ही दोघंच होतो. पशुपतीनाथाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. आणि स्वतः पंडितजीनी आम्हाला शिवपिंडी वर जल अर्पण करायला दिलं, तीर्थ प्रसाद दिला. मन अगदी तृप्त झालं. तिथे थोडा वेळ थांबून परत घाट उतरुन खाली पायऱ्यांवर येऊन बसलो.

              आमचे सहयात्री दर्शन घेऊन परत येईपर्यंत सांजावलं. आणि सारे घाट, गंगामैया विद्युत रोषणाईने उजळून निघाली. दिवसभर गंगामैयाच्या सानिध्यात रहायला मिळालं आणि सायंकाळ नंतरचं गंगामैया आणि साऱ्या घाटांचं चमचमतं रुपही पहायला मिळालं. अखेर काही सहयात्री आल्यावर आम्ही एका नावेतून निघालो. पुढील काही घाट पाहून नावेतूनच गंगाआरतीचा सोहळा अनुभवून आम्ही परत नंदेश्वर घाटावर आलो. सारा दिवस काशीच्या पावन भूमीत, आणि गंगामैयाच्या सानिध्यात छान पार पडला. या रात्रीही आमचा मुक्काम काशी येथेच होता.

                 तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नाश्ता करुन अयोध्येला प्रस्थान केलं. एकूण यात्रेकरु खूप असल्याने दोन बसेस नी आम्ही अयोध्येला निघालो. साधारण दोन तासाचा प्रवास झाला आणि आमची बस थांबली. काय झालं हे कळताच थोडं चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आमच्या थोडसं पुढे असलेल्या आमच्या दुसऱ्या बसचा लहानसा अपघात झाला होता. भरधाव वेगाने अचानक रस्ता बदलणाऱ्या कारला वाचवण्यासाठी ट्रकने अचानक लेन बदलली आणि त्या ट्रकवर ही बस आदळली. बसचं नुकसान झालं पण सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.  यामुळे आमच्या दोन्ही बस दोन अडीच तास तिथेच थांबल्या. मात्र नवीन बस यायला फारच वेळ लागणार हे कळताच अपघातग्रस्त बसमधून स्वयंपाकाचं सारं साहित्य काढून आमच्या बसमध्ये ठेवलं आणि आमचं सामान त्या बसमध्ये. हे सारे सोपस्कार करुन अखेर आमची बस अयोध्येला निघाली. मात्र अयोध्येला पोहोचायला सायंकाळ उलटून गेली त्यामुळे त्यादिवशी श्री रामरायाचं दर्शन राहून गेलं. दुसरी बस रात्री उशिरा आली त्यानंतर आम्हाला आमच्या बॅगा मिळाल्या. 

              चौथ्या दिवशी सकाळी आम्ही दर्शनासाठी रिक्षाने निघालो. सर्वात आधी आम्ही दर्शनासाठी गेलो ते हनुमानगढी येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी. इथेही दर्शनासाठी अतिशय गर्दी होती. पण शिस्तीत रांगेतून दर्शन हा प्रकारच नव्हता. दर्शनासाठी नुसती लोटालोट सुरु होती. जागोजागी सुरक्षा रक्षक असूनही अशी वाईट परिस्थिती होती. अखेर आम्हीही त्या गर्दीचा एक भाग होऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं. प्रत्यक्ष दर्शन मात्र छान झालं. तिथून आम्ही श्री रामरायाच्या दर्शनासाठी गेलो. सुमारे  पाचशे वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अतिशय भव्य अशा मंदिरात नुकतीच बालस्वरुपातील‌ प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली असल्याने श्री रामांच्या दर्शनाची अतीव ओढ लागली होती. मंदिराच्या प्रचंड मोठ्या परिसरात प्रवेश केला आणि मन अतिशय उल्हसित झालं. अतिशय सुंदर व्यवस्था, जागोजागी माहिती फलक, सुरक्षा रक्षक, माहिती आणि मदतीसाठी तत्पर कर्मचारीवर्ग यामुळे दर्शनासाठी एवढी प्रचंड गर्दी असूनही बिलकुल गडबड गोंधळ नव्हता. प्रचंड गर्दी असूनही रांगेत उभं राहिल्यापासून अगदी अर्ध्या तासात श्री रामरायाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. बिलकुल घाईगडबड न करता शांतपणे काही क्षण श्रीरामांसमोर नतमस्तक होता येतं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. अतिशय रेखीव असं शाळिग्रामात घडवलेलं, अत्यंत सुरेख कमलनयन असलेलं असं हे सगुण साकार रुप पाहून मन भारावलं. सभागृहात प्रवेश केल्यापासूनच श्रीरामांचं छान दर्शन आपल्याला घडत असतं. आपल्याला मंदिरात अर्पण करण्यासाठी काहीही न्यायला परवानगी नाही. पण आपण दर्शन घेऊन परतताना आवर्जून प्रसाद दिला जातो. इथून बाहेर पडून मार्गावरच असलेल्या श्रीराम जानकी मंदिरात गेलो. इथेही खूप छान दर्शन झालं. तिथूनच नंतर राम दरबार इथे दर्शनासाठी गेलो. इथेही श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. हा राम दरबाराच्या बाजूचं मोठं सभागृह सीता की रसोई या नावानं ओळखलं जातं. अजूनही याच रसोईमध्ये प्रसाद भोजनाचा स्वयंपाक केला जातो. इथेच एका मंदिरात पूर्ण राम दरबारातील मूर्ती आणि त्याच बरोबर बाबरी मशीद उत्खननात मिळालेली श्रीराम आणि सीतामाईच्या सोन्या- चांदीच्या मूर्ती आहेत. सारी दर्शनं घेऊन हाॅटेलमध्ये परत येऊन सामान घेऊन आमच्या बसेस पुढे गोरखपुरला निघाल्या.‌ गोरखपुरला श्री गोरक्षनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं. त्याप्रमाणे आम्ही गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. मंदिरात पोहोचायला सायंकाळ उलटून गेल्याने संपूर्ण मंदिर आणि प्रांगण विद्युत रोषणाईने उजळून निघालं होतं. हे मंदिरही अतिशय सुंदर आणि भव्य आहे. रंगबिरंगी फुलांची सुंदर बाग, रंगीत कारंजे यांनी मंदिराची शोभा वाढवलीय. हे सारं नयनरम्य दृश्य पहात, छायाचित्रात बध्द करत आम्ही मंदिरात गेलो. गोरक्षनाथांची सुंदर रेखीव मूर्ती इथे प्रतिष्ठापित केलीय. शांतपणे छान दर्शन घडलं, मन प्रसन्न झालं.

                गोरक्षनाथ मंदिरात दर्शन घेऊन आम्हाला पुढे रात्रभर प्रवास करुन सकाळी काठमांडू ला पोहोचायचं होतं. पण त्यासाठी रात्री नऊ वाजण्यापूर्वी भारत नेपाळ सीमारेषा ओलांडण्यासाठी परवानगी मिळणं अत्यावश्यक होतं. पण ही सीमारेषा जिथे आहे त्या सुनौली गावात पोहोचायलाच आम्हाला नऊ वाजले. त्यानंतर प्रत्येक यात्रेकरुचं ओळखपत्र तपासण्यात आलं पण आम्हाला पोहोचायला उशीर झाल्यानं सीमारेषा पार करुन पुढे प्रवास करायला परवानगी मिळाली नाही. अखेर आमच्या बसेस भारताच्या हद्दीतच थांबवाव्या लागल्या. पण आमची ओळखपत्र तपासणी झाल्यानं आम्हाला नेपाळच्या हद्दीत असलेल्या हाॅटेलमध्ये मुक्काम करायची परवानगी मिळाली. त्यामुळे आमच्या सामानाशिवायच आमची तिथल्या दोन हाॅटेलमध्ये एका खोलीत ४-४ जणं अशी व्यवस्था कशीबशी करण्यात आली. बसमध्ये रात्रभर बसून रहाण्यापेक्षा निदान एवढी तरी व्यवस्था झाली हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू.          

- स्नेहल मोडक






     

   




कविता

जय बाबा बर्फानी -२

          ९ तारखेला सकाळी 'बालताल' चा बेस कॅम्प सोडून आम्ही निघालो. बेस कॅम्प पासून साधारण दोन किमी. अंतरावर पार्किंग लॉट होता. तिथप...