Pages

Thursday, March 31, 2022

नर्मदा परिक्रमा - अंतिम भाग

                 पंधराव्या दिवसाची सकाळ. आज परिक्रमेचा अखेरचा दिवस. मन अक्षरशः सैरभैर झालं होतं. ओंकारेश्वरचा कालचा मुक्काम हा परिक्रमेमधला अखेरचा मुक्काम होता. रात्री निद्राधीन होण्याआधी सगळ्यांच्या मनाची चलबिचल नक्कीच झाली होती. मला तर झोप येणं शक्यच नव्हतं. सारी परिक्रमा, साऱ्या घटना, जाणवलेल्या अनुभूती सारं सारं डोळ्यासमोर येत होतं. एकूण सतरा दिवस कधी संपले कळलही नव्हतं. 

                इतके दिवस घडणारं मैयाचं रोजचं दर्शन, मैयास्नान, सर्वानी रोज सकाळ सायंकाळ एकत्रितपणे केलेली आपापल्या मैयाजलकुपीची साग्रसंगीत पूजा आरती हे सारं आजच्या पूजेनंतर संपणार होतं.  

                कुठलंही विघ्न येऊ न देता, किंचितही त्रास होऊ न देता मैयाने आम्हा सर्वांना परिक्रमा घडवली. परिक्रमावासींकडून ऐकलेले अनुभव अगदी खरे ठरले. मैयाने आम्हालाही अतिशय सुंदर अनुभूती दिली. वाहनाद्वारे केलेली ही परिक्रमाही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.

                अखेर संकल्पपूर्तीच्या पूजेसाठी परत ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर गेलो. पून्हा स्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरुन खाली गेलो. पण मी मात्र पायरीवरच थबकले. स्नानासाठी जळात उतरायला मन तयारच होईना. मैयाजवळ नुसतं पायरीवरच बसून रहावंसं वाटत होतं. डोळ्यात येणारं पाणी निग्रहाने थांबवून पाच मिनिटं तशीच शांत उभी राहिले. पण वेळेअभावी जास्त थांबणं शक्य नव्हतं. मग मैयाला साश्रुनयनांनीत मनःपूर्वक प्रार्थना केली आणि स्नान करुन वर आले.

                 सर्वांनी घाटावर पूजेची सारी तयारी केली. तिथल्या गुरुजींनी संकल्प पूर्तीची पूजा सांगितली. पूजा पूर्ण झाली आणि आम्ही परत ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो. तिथे प्रथेप्रमाणे आमच्या जलकुपीतलं अर्धं पाणी ओंकारेश्वरला वाहिलं. तिथून पुढे ममलेश्वराच्या मंदिरात जाऊन उरलेलं अर्धं जल ममलेश्वराला वाहिलं आणि परिक्रमेची सांगता केली. 

                 नंतर जवळच असलेल्या श्री गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतलं. अतिशय प्रशस्त आणि सुंदर असा हा मठ आहे. या मठाकडून परिक्रमावासींच्या रहाण्याची, भोजनाची व्यवस्था केली जाते.  श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही जिथं मुक्काम केला होता तिथं परत आलो. भोजन प्रसाद घेऊन सर्वांचा निरोप घेऊन भरल्या डोळ्यानी, साऱ्या आठवणी मनाच्या कुपीत साठवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.

नर्मदे हर    नर्मदे हर    नर्मदे हर


                आता मात्र आस लागली होती ती दत्तगुरुंच्या दर्शनाची, गिरनारची. ओंकारेश्वरहून  इंदोरला आलो. तिथून सायंकाळी ५ वाजता रेल्वेने निघालो. रात्री १२.३० वाजता वडोदराला उतरलो. तिथून आधीच ठरवून ठेवलेल्या गाडीने जुनागढला  निघालो. सकाळी ८.१५ वाजता जूनागढ तलेटीला पोहोचलो.

                 मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन भरभर आवरुन दर्शनाला निघालो. पौर्णिमा दुपारी संपणार होती. त्यामुळे वेळ कमी होता. नेहमीप्रमाणे लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना केली. आणि रोपवे जवळ गेलो. रोपवेची तिकींटं आधीच काढलेली होती. आम्ही रोपवेला पोहोचलो तर भलीमोठी रांग लागलेली होती. एवढी मोठी रांग पहिल्यांदाच पहात होतो. चौकशी केल्यावर कळलं की वर खूपच जोराचा वारा आहे त्यामुळे रोपवे बंद आहे. कधी सुरु होईल काहीच सांगता येत नव्हतं. किमान ४-५ तास लागतील असं तिथले लोक सांगत होते. मग मात्र दत्तगुरुंना प्रार्थना केली, तुम्हीच आम्हाला इथवर आणलंय आता दर्शन कसं घडवायचं ते तुम्हीच ठरवा. दर्शन झाल्याशिवाय इथून जाणार नाही हे नक्की. कारण पायऱ्या चढून जायचं ठरवलं तरी पोहोचेपर्यंत पौर्णिमा संपली असती. आणि उन्हात चढून जाणं सहज शक्यही नव्हतं. पण जर रोपवे सुरु झालाच नाही तर मात्र लगेच पायऱ्या न चढता रात्री चढायला सुरुवात करायची असंही ठरवलं.

                  मनोमन नामस्मरण करत असतानाच साधारण अर्ध्या पाऊण तासानी रोपवे सुरु झाला. आधी तिकिट काढलेल्या लोकांची वेगळी रांग केली आणि आम्हाला रोपवेने जायला मिळालं. रोपवेतून उतरल्यावर 'दर्शन घेऊन लवकर परत या, रोपवे कधीही बंद होऊ शकतो' असं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. 

                  रोपवेतून उतरुन आम्ही लगेच पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. होळी पौर्णिमा असल्याने खूप गर्दी होतीच. पण आम्हाला नेहमीप्रमाणे अतिशय छान दर्शन झालं. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक होताना मात्र अश्रू अनावर झाले होते. खूप साऱ्या भावना मनात दाटल्या होत्या. दत्तगुरुंना केलेली प्रार्थना त्यांनी ऐकली आणि लगेच दर्शन घडवलं, त्यांचं हे दर्शन आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं कारण हे आमचं अकराव्या वेळचं गिरनार शिखरदर्शन होतं. त्याचबरोबर त्यांच्या आणि मैयाच्या कृपेने नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली होती. हे सारे विचार मनात गर्दी करत असताना डोळे मात्र आपलं काम चोख बजावत होते. मीही डोळ्यात येणारं पाणी न पुसता नतमस्तक झाले होते.

                   पादुकांचं दर्शन घेऊन परत पायऱ्या उतरुन अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. आधी गुरुचरित्राचं वाचन करुन मग दर्शन घेतलं. भोजन प्रसाद घेऊन परत निघालो. रोपवेजवळ पून्हा रांग होतीच. पण थोड्याच वेळात आम्ही रोपवेने पायथ्याशी पोहोचलो. नर्मदा परिक्रमा आणि गिरनार दर्शन दोन्हीही घडल्याचा आनंद अवर्णनीय होता. 

                सायंकाळी सोरटी सोमनाथ ला गेलो. जाताना वाटेत भालका तीर्थाचं दर्शन घेतलं.  सोमनाथलाही खूपच गर्दी होती. पण अतिशय छान दर्शन झालं. दर्शन घेऊन तलेटीला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.

           सकाळी घरी पोहोचल्यावर मुलींनी फुलांची रांगोळी काढून औक्षण करुन मैयाचं सुंदर स्वागत केलं आणि आमच्या नर्मदा परिक्रमेची आणि गिरनार दर्शनाची खरी सांगता झाली.

               आमच्या या परिक्रमेत चालत परिक्रमा करणारे काही परिक्रमावासी भेटले. त्यांचे काही अनुभवही प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. त्यामुळे आता वेध लागले आहेत पुनश्च नर्मदा परिक्रमेचे, पण पायी चालत जाण्याचे. मैया नक्की पायी परिक्रमा घडवेल, आमची इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे.

जय गिरनारी    जय गिरनारी    जय गिरनारी


- स्नेहल मोडक

Wednesday, March 30, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ६

               बाराव्या दिवशी सकाळी दिड किमी अंतर चालून माई का बगिया येथे गेलो. ही बाग नर्मदा मैयाला समर्पित केलेली आहे. अतिशय सुंदर घनदाट अशी ही बाग आहे. या बागेत आंबा, जांभूळ यासारखी फळझाडं, औषधी वृक्ष आणि वनस्पती, आणि विविध फुलझाडं आहेत.  

              यातलं सगळ्यात महत्त्वाचं फुलं म्हणजे गुलबकावली. याची निर्मिती इथं झाली असं म्हणतात. हे डोळ्यांच्या आजारांवर तसंच इतर रोगांवर अतिशय औषधी म्हणून उपयुक्त आहे. हे हळद, आलं या वनस्पती कुळातलं झाड आहे. याला आपल्याकडे सोनटक्का या नावानं ओळखलं जातं. अतिशय सुगंधी आणि विविध रंगातली ही फुलं सायंकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजून जातात. औषधीद्रव्यांबरोबरच या फुलांपासून सुगंधी द्रव्यंही बनवतात.

              या बागेतच तिथल्या गुरुजींकडुन आम्ही मैयाची पूजा आरती केली. कन्यापूजन केलं आणि तटपरिवर्तनही केलं. 

               तटपरिवर्तन करुन सिध्द शोणाक्षी दर्शन घेतलं. सिध्द शोणाक्षी हे एक शक्तिपीठ आहे. प्रजापती दक्ष यांची कन्या सती हिचा विवाह भगवान शंकरांबरोबर झाला. राजा दक्ष यानी आरंभलेल्या एका यज्ञात त्यानी शिवांना आमंत्रित न करुन अपमानित केलं. हा अपमान सतीमातेला  सहन झाला नाही आणि तिने प्रज्वलित यज्ञात उडी घेतली.भगवान शंकराना हे कळताच त्यांनी वीरभद्र  गणांना पाठवून यज्ञ स्थान नष्ट केलं आणि राजा दक्षांचा शिरच्छेद केला. आणि भगवान शिव सतीचा यज्ञात जळालेला देह हातावर घेऊन शोकातिरेकाने सैरावैरा फिरु लागले. त्यावेळी सतीमातेच्या देहाचे अवयव आणि अंगावरील आभुषणे ज्या ज्या स्थानी पडली त्या त्या स्थानी सतीमातेचं एकेक शक्तिपीठ निर्माण झालं. अमरकंटकमधील नर्मदेच्या उगम स्थानी शोणदेश या स्थळी सतीमातेचं उजवं नितंब पडलं आणि तिथे तिचं शक्तिपीठ निर्माण झालं, अशी पुराणकथा आहे. या शक्तिपीठाजवळच शोण नदीचं तीर्थस्थान आहे.

               या शक्तिपीठाजवळ एक हनुमान मंदिरही आहे. या त्रिलोचन संकटमोचन हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही दक्षिण तटावरुन परिक्रमा सुरु केली. 

               परत एकदा नर्मदा उगम मंदिरात जाऊन दक्षिण बाजूने दर्शन घेतलं. आदल्या दिवशी सायंकाळी या मंदिराच्या अर्ध्या भागातील मंदिरात गेलो होतो. आता उरलेल्या अर्ध्या भागातील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि पुढे निघालो.

              मंडला शहरातील महाराजपूरम इथे बंजारा, नर्मदा आणि गुप्त सरस्वती या नद्यांचा संगम आहे. या त्रिवेणी संगमावरही सुंदर घाट आहे. नर्मदेच्या पलिकडच्या तीरावर मंडला किल्ला आहे. मात्र त्याची आता पडझड झाली आहे. घाटाच्या जवळच बुढी माता मंदिर आहे. घाटापासून थोड्या अंतरावर एक छानसं कृष्ण मंदिर आहे. हे सारं पाहिलं. मैयाची नित्यपूजा आरती केली. आणि पुढील प्रवासाला लागलो.

                रात्रभर प्रवास करुन तेराव्या दिवशी सकाळी नर्मदापूरम (होशंगाबाद) इथं पोहोचलो. नर्मदा नदीच्या दक्षिण तटावर हे शहर वसलंय. १५ व्या शतकांपूर्वी हे शहर नर्मदापुरम याच नावानं ओळखलं जात होतं. पण १५ शतकात मांडू या शहरातून इथे आलेल्या मुघल शासक होशंगशाह याच्या नावावरुन हे शहर होशंगाबाद या नावानं ओळखलं जातं होतं. मात्र मार्च २०२१ मध्ये भारत सरकारनं या शहराचं नर्मदापुरम असं पून्हा नामांतर केलं. 

                नर्मदेवर बांधलेल्या सुंदर घाटांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. सेठानी घाट हा त्यातील प्रसिद्ध घाट आहे. नर्मदा जयंतीला इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. भारतीय चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद प्रामुख्यानं इथं बनवला जातो. इथे जवळच छोटी पर्वतराजी आहे. त्या पर्वतांमधल्या गुहांमध्ये शैलचित्रांची निर्मिती केलेली आहे. 

                नर्मदापुरमला मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन सारं आवरुन आम्ही शहरात फिरुन आलो. सायंकाळी सेठानी घाटावर नर्मदा आरतीसाठी गेलो. या घाटावरही रोज सायंकाळी नर्मदा मैयाची आरती केली जाते. तिथं पूजा आरती करुन परत आलो, मुक्काम केला.

                चौदाव्या दिवशी सकाळी सारं आवरुन ओंकारेश्वर ला निघालो. वाटेत खांडवा येथे दादाजी धुनीवाले यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. 

                दादाजी (केशवानंदजी महाराज) यांचा मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील साईखेडा या छोट्याशा गावात एका वृक्षातून जन्म झाला असं सांगतात. त्यांनी नुसत्या हाताने पवित्र अग्नी ( धुनी ) प्रज्वलित केला होता असं सांगतात. नंतर ते साईखेडाहून खांडवा येथे आले. तिथेही त्यांनी धुनी प्रज्वलित केली होती. देशासाठी धर्मजागृती करणं हे त्यांचं जिवीत कार्य होतं. ते सदैव अखंड धुनीसमोरच बसलेले असत. त्यावरुनच त्यांना धुनीवाले दादाजी हे नांव मिळालं. समाधीचं दर्शन घेऊन पुढे आम्ही ओंकारेश्वर ला पोहोचलो.

                मैयाची पूजा आरती करायला वेळ असल्याने आम्ही ओंकारेश्वर शहरात थोडसं फिरुन आलो. ओंकारेश्वरलाच मुक्काम केला.




- स्नेहल मोडक

Tuesday, March 29, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ५

                   दहाव्या दिवशी सायंकाळी आम्ही जबलपूरला पोहोचलो. नर्मदा तटावर वसलेल्या जबलपूरला संस्कारधानी असंही म्हणतात. जबलपूरचं पूर्वीचं नांव जाबालीपुरम होत. महर्षी जाबाली यांच्यावरुन हे नांव मिळालं होतं. इथला नर्मदातटावरचा गौरीघाट ( ग्वारीघाट) खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहे. याच घाटावर मैयाची नित्यनेमाने सायंआरती केली जाते. आम्हीही खास त्या आरतीसाठी थांबलो होतो. 

                 सायंकाळी ६ वाजताच आम्ही घाटावर गेलो होतो. घाटावर अतिशय उत्साहाचं , पावित्र्याचं वातावरण होतं. जसजशी सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती तसतसा घाट अजूनच सुंदर दिसत होता. सूर्यास्त झाला तरी जरावेळ मंद उजेड असतो पण ते काही क्षण आपल्या मनाची अवस्था फारच तरल असते. इथे तर आमच्या नजरेसमोर मैया होती पण अंधारल्यावर मात्र ती वेगळीच भासू लागली. नेहमीचं तिचं दर्शन मन प्रसन्न करणारं पण आता मात्र ती मला थोडी गूढ गंभीर आणि जरा भीतीदायक वाटू लागली होती. 

                 मनात विचारांची आवर्तनं सुरु असतानाच पूजा आरतीची वेळ झाली. या घाटावर अतिशय सुंदर अशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा आरती केली जाते. मंत्रोच्चारात पूजा सुरु झाली आणि माझं मन त्यात गुंतलं. पूजा संपून छान तालासुरात आरती सुरु झाली. मी थोडंसं छायाचित्रण करत होते खरी पण आरती सुरु झाल्यावर मात्र माझी नजर फक्त मैयाकडेच होती. 

                 आणि अचानक आरतीच्या घंटानादात शुभ्रवसनधारी मैया जळातून सगुण साकार झालीय असं मला दिसलं. ते काही क्षण मी अक्षरशः भान हरपून तिच्याकडे पहात होते. अचानक आरतीचा आवाज वाढला आणि मी भानावर आले. माझं मलाच कळत नव्हतं जे दिसलं तो निव्वळ भास होता की खरचं मैयानं दर्शन दिलं होतं. कदाचित पूजेआधी माझ्या मनात आलेली भीती किती अवास्तव आहे हे सांगून मला आश्वस्त करण्यासाठीही मला हा भास किंवा दर्शन घडलं असू शकतं. काहीही असलं तर आता हे लिहितानाही माझ्या नजरेसमोर ते सारं जसच्या तसं तरळतय.

                आरती संपल्यावर आम्ही तिथे पूजेसाठी ठेवण्यात आलेल्या नर्मदा मैयाच्या रेखीव मूर्ती स्वरुपाचंही दर्शन घेतलं. प्रसाद घेतला आणि पूजा आरतीचं सारं दृश्य डोळ्यात आणि मनात साठवून मुक्कामाच्या ठिकाणी परत गेलो.

                अकराव्या दिवशी आम्ही दिंडोरी गांवात पोहोचलो. दिडोरी हे मध्य प्रदेशच्या पूर्वभागातील आणि छत्तीसगडच्या सीमेवरचं गांव. मैकल पर्वतश्रेणीतील नर्मदा किनारी वसलेलं हे ऐतिहासिक गांव.

                इथे नित्याप्रमाणे नर्मदा स्नान करुन मैयासमोर असलेल्या आश्रमात मैयाची पूजा आरती करायची होती. आम्ही घाटाच्या पायऱ्या चढून वर गेलो तर तिथे एकजण ४-५ मोठ्या पपया विकायला घेऊन बसला होता. मला एकदम पपई  खायची तीव्र इच्छा झाली. पण पूजेची वेळ झाली होती म्हणून तशीच पुढे गेले. आम्ही ३-४ जणींनी आश्रमात आधी प्रवेश केला. तर तिथे एक वयोवृद्ध बाबाजी आराम करत होते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला बाबाजी आणि स्त्रीला माताजी या नावांनं पुकारलं जातं. बाबाजींना बघून आम्ही थबकलो पण ते लगेच म्हणाले 'आइये माताजी आप बैठिये' असं म्हणून ते उठून बाहेर गेले. तोपर्यंत सगळेच आश्रमात आले. आम्ही पूजेसाठी आसन लावलं. कुणीतरी त्या बाबाजींना आत बोलावलं. पूजेची तयारी बघून ते आणि त्यांच्याबरोबर असलेले एकजण असे दोघंही आत येऊन बसले.

                आमची पूजा झाली, आरती सुरु झाल्यावर ते स्वताचं आरतीचं साहित्य घेऊन आमच्यात सामिल झाले. माझ्यापुढे जरी काहीजणं असली तरी मला ते बाबाजी समोर स्पष्ट दिसत होते. निरांजनाच्या उजेडात त्यांचा शांत गंभीर चेहरा वेगळाच भासत होता मला. काही कारण नसताना नकळत डोळ्यात पाणी तरळलं माझ्या. आरती संपली , आणि आम्ही तिथेच भोजनासाठी थांबलो.

                  आमचं भोजन तयार होत होतं तोपर्यंत त्या दोन्ही बाबाजींबरोबर थोडं बोललो तेव्हा कळलं की ते पाचव्यांदा चालत परिक्रमा करतायत. आणि दुसरे बाबाजी दुसऱ्यांदा. क्षणात मनापासून हात जोडले गेले आमचे. आणि त्या बाबाजींबद्दल काही माहिती नसताना आरतीच्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी का तरळलं ते चटकन लक्षात आलं. किती शांत तृप्त होते ते, माहिती सुद्धा दुसऱ्या बाबाजींनी दिली होती.

                   भोजन करुन निघालो, बसमधे बसलो आणि १० मिनिटांतच माझ्यासमोर मस्त केशरी रंगाची, नीट फोडी केलेली पपई आली. मी काही क्षण नुसती बघतच राहिले. आमच्यापैकीच एकानी ती विकत घेतली होती पण मला ते माहितही नव्हतं.  माझी पपई खायची इच्छा मात्र मी काहीही बोलले नसतानांही मैयाने सहज पूर्ण केली होती.

                    दिंडोरीहून भोजन करुन निघालो आणि अमरकंटक ला पोहोचलो. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील एक पवित्र स्थान अमरकंटक. हे विंध्य आणि सातपुडा यांना जोडणाऱ्या मैकल पर्वतराजीच्या पूर्वभागात आहे.अमरकंटक या तीर्थस्थानी नर्मदा आणि शोण या नद्यांचा उगम झाला आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात प्राचीन नदी आहे. तिचा उगम पाच लाख वर्षांपूर्वी झाला असं संशोधकांचं मत आहे. नर्मदा नदी मैकल पर्वतात उगम पावते आणि पूढे काही कि.मी.वर असलेल्या उंच कड्यावरुन खाली येते.  इथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली, आणि इथेच संख्याशास्त्राची रचना केली. म्हणूनच या धारेला कपिलधारा हे नांव मिळालं. इथे कपिलमुनींचा आश्रम आहे.

                कपिलधारा आणि त्यापुढे असलेल्या दुग्धधारा पाहण्यासाठी जंगलातून चालत जावं लागतं. आम्ही लहान वाहनाने थोडं अंतर आत जाऊन पुढे ४ किमी जंगलातील पायवेटेने चालत जाऊन कपिलधारा, दुग्धधारा बघितलं. अतिशय सुंदर धारा आहेत. 

              उंचावरुन शुभ्र फेसाळ पाण्याच्या मोठ्या धारा पडतात. त्यांनाच दुग्धधारा म्हणतात. आम्ही त्या पाण्यात उतरलो आणि त्या शीतल जलस्पर्शाने मस्त सुखावलो. पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं.

                पौराणिक कथेनूसार दुर्वास ऋषींनी या स्थानी तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन नर्मदेने त्यांना साक्षात दर्शन दिलं होतं. यावरुन नर्मदेच्या या जलधारांना दुर्वासधारा असं नावं मिळालं होतं. त्याचा अपभ्रंश होऊन पुढे ते नाऔव दुग्धधारा असं झालं. दुर्वास ऋषी दुधासारख्या शुभ्रधवल अशा नर्मदा जलाने शिवशंकराला अभिषेक करत असत. या दुग्धधारेजवळच दुर्वास ऋषींची गुंफा आहे, जिथे त्यांनी तपस्या केली होती. तसंच तिथं शिवलिंग आहे. आणि त्या शिवलिंगावर सातत्याने नैसर्गिकरित्या जलधारा पडत असते. पूर्ण वाकूनच या गुहेत जावं लागतं. अतिशय थंड पण थोडी अंधारी अशी ही गुहा आहे.

                त्या नंतर एक मोठं सुंदर जैन मंदिर पाहीलं. भगवान महावीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ निर्माणाधीन असलेलं हे जैन मंदिर. भारतातील अष्टधातू मंदिरांपैकी एक मोठं मंदिर. भगवान आदिनाथांची  अष्टधातूंची २४ फूट उंचीची पद्मासनतील मूर्ती आहे. अजूनही या मंदिराचं काम सुरु आहे.

              यानंतर आम्ही गेलो नर्मदा मंदिरात. नर्मदेचा जिथे उगम झाला तिथे एक सुंदर दगडी मंदिर बांधलंय आणि भोवती दगडी तटबंदी आहे. आत गेल्यावर आजूबाजूला इतर बरीच मंदिरं आहेत. मधोमध दोन मंदिरं असून पुढे मोठं सरोवर आहे. एक मंदिर श्रीरामसीतेचं आणि दुसरं पार्वतीमातेचं आहे. समोर काळ्या पाषाणातील नर्मदेची अडिच तीन फूट उंचीची मूर्ती आहे. नर्मदादेवी हे देवीचं ३९ वं शक्तीपीठ आहे. त्याला चंद्रिकापीठ म्हणतात. 

               इथं नर्मदेचा प्रवाह भूमीगत आहे तो परिक्रमा करताना ओलांडून जायचं नसतं म्हणून या मंदिरात केवळ अर्ध्या भागातील मंदिरात जाऊन दर्शन घेता येत. हे सारं पाहून, दर्शन घेऊन आम्ही अमरकंटकलाच मुक्काम केला.




    

    



- स्नेहल मोडक

Monday, March 28, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ४

                 आठव्या दिवशी दुपारी आम्ही उज्जैन ला पोहोचलो. मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर उज्जैन (उज्जयिनी). क्षिप्रा नदीतीरावर वसलेलं हे ऐतिहासिक शहर पूर्वी विक्रमादित्य राजाची राजधानी म्हणून ओळखलं जात होतं. तसंच महाकवी कालिदासांची ही नगरी. सम्राट विक्रमादित्य राजाच्या नवरत्नांपैक एक कालिदास. त्यांना उज्जयिनी नगरी अतिशय प्रिय होती. मेघदूतामध्ये कालिदासांनी उज्जैनचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. 

                 मंदिरांचं शहर म्हणूनही उज्जैन ओळखलं जातं. कारण इथे अनेक प्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर मंदिरं आहेत. दर १२ वर्षांनी इथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यासाठी जगभरातून लोक येतात. इथलं सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वराचं मंदिर. हे मंदिर रुद्रसागर सरोवराच्या किनारी आहे. असं म्हटलं जातं की अधिष्ठ देवता भगवान शिव स्वत: या लिंगात स्वयंभू रुपात स्थापित आहेत.म्हणून या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवपुराणानुसार एकदा ब्रम्हा, विष्णू आणि महेश याच्याच चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकरांच्या मनात ब्रम्हा आणि विष्णूची परिक्षा घ्यावी असा विचार आला. त्यांनी दोघांना प्रकाशाचा अंत कुठे ते शोधण्यास सांगितलं. त्यासाठी शंकरानी एक स्तंभ उभा केला व त्याचं टोक शोधण्यास सांगितलं. दोघांनी खूप प्रयत्न केला. अखेर विष्णूंनी हार मान्य केली. पण ब्रम्हा खोटं बोलले. शंकरानी त्यांना तुझी कुणीही पूजा करणार नाही असा शाप दिला. ब्रम्हानी क्षमायाचना केल्यावर शिव स्वत: त्या स्तंभात विराजमान झाले. हा स्तंभ म्हणजेच ज्योतिर्लिंग.या स्तंभाचं शिवलिंगात रुपांतर झालं आणि त्यास विशेष महत्व प्राप्त झाल.

                याशिवाय इथे असलेलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे मंगळ ग्रहाचं मंगळनाथ मंदिर. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले सारे दोष नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे. अजून एक महत्त्वाचं स्थान म्हणजे सांदिपनी आश्रम. कृष्ण आणि बलराम मथुरेहून सांदिपनी ऋषींच्या या आश्रमात अध्ययनासाठी आले होते. ६४ कला आणि १६ विद्या यांचं ज्ञान कृष्णाने ६४ दिवसांत घेतलं असं मानतात. गुरु सांदिपनी स्नानासाठी रोज त्यावेळच्या लखनौ येथे गोमती नदीवर जात असत. म्हणून कृष्णाने बाण मारुन कुंड निर्माण केलं आणि मग त्यात गोमती नदी अवतीर्ण झाली. हे पवित्र कुंड आजही आश्रमात आहे.  

              याशिवाय इथलं अजून एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे कालभैरव मंदिर. पौराणिक कथेनूसार ब्रम्हदेवाने शिवशंकरांचा अपमान केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शिवाच्या क्रोधातून काळ्या रंगाच्या भैरवाची उत्पत्ती झाली. भैरवानं शिवनिंदा करणारं ब्रम्हाचं पाचवं मस्तक छाटलं. त्यामुळे ब्रम्हहत्येचं पातक घडलं. त्यातून मुक्ती मिळण्यासाठी भैरव ते शीर तळहातावर घेऊन सर्व तीर्थक्षेत्र फिरले. अखेर काशीला गेल्यावर त्यांच्या हातून ते शीर गळून पडलं आणि त्यांना ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. जिथं ते शीर गळून पडलं ते स्थान कपालमोचनतीर्थ म्हणून ओळखलं जातं. काशीला गेल्यावर आधी कालभैरवाचं दर्शन घेऊन मग महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि परत कालभैरवाचं दर्शन घ्यायचं अशी प्रथा आहे. त्याच कालभैरवाचं मंदिर उज्जैनला आहे. तसचं बऱ्याच ठिकाणी कालभैरव मंदिर आहे. 

               याचबरोबर क्षिप्रा नदीघाट, सिध्दवट मंदिर, गढ कालिकामाता मंदिर, हरसिध्दी मंदिर अशी बरीच मंदिरं उज्जैन मध्ये आहेत त्या सर्वांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

               परिक्रमा सुरु होऊन आठ दिवस झाले. खरंच कधी संपले हे आठ दिवस कळलंही नाही. रोज नवं स्थलदर्शन, तिथलं स्थानमहात्म्य, प्रत्येक ठिकाणी मैयाचं बदलतं तरीही हवंहवंसं वाटणारं रुप, सगळेजणं परिक्रमेत इतके दंग झालो होतो की वाढत्या उन्हातही सगळीकडे उत्साहाने फिरत होतो. सुरुवातीचे ५-६ दिवस उन सुसह्य होतं. आता मात्र उन्हाचा तडाखा फारच वाढायला लागला होता. गाडीतून उतरलं की सगळ्यांच्या नजरा जणू अगदी काकदृष्टीने दुकानं शोधत असत. फळं, ताक, लस्सी, सरबत, उसाचा रस जे मिळेल ते घेऊन उन्हाची तलखी कमी करण्याचा सतत प्रयत्न करत होतो. अजून जवळपास अर्धी परिक्रमा बाकी असल्याने कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत होतो. वाढत्या उन्हाचा आम्हाला जरी त्रास होत असला तरी सृष्टीला मात्र वसंताची चाहूल लागली होती. रखरखत्या उन्हात आजूबाजूला खूप सारे पलाशवृक्ष बहरलेले दिसत होते. पेटत्या ज्वालेसारखी केशररंगी फुलं उन्हातही अतिशय सुंदर दिसत होती.  बोगनवेलीही रंगिबेरंगी फुलांनी बहरल्या होत्या. आम्रमोहोराचा मंद गंध दरवळत होता. पहाटसमयी कोकळकुजनही ऐकू येत होतं.रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेली गव्हाची कापणीला आलेली सोनेरी शेती होती. वाऱ्यावर डोवणारं ते सोनसळी पिक नजरेलाही सुखावत होतं. अर्थातच आमचा उत्साहही त्यामुळे वाढत होता.

               नवव्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो नेमावरला. पुराणकाळात नेमावर नाभीपूर या नावानं ओळखलं जात होतं. नर्मदेचं हे नाभिस्थान मानलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं सिध्दनाथ मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना सत्ययुगात  ऋषी सनक, सनन्दन, सनातन आणि सनतकुमार या ऋषींनी केली होती, त्यावरुनच सिध्दनाथ हे नांव मिळालं. पापनाशन करणारं सिध्दनाथ तीर्थस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूला ओंकारेश्वर आणि खालच्या बाजूला महाकालेश्वर हि मंदिरं येतात. आजुबाजुच्या पर्वतातील गुहा, कपारी मध्ये साधना करणारे साधक इथे नर्मदा स्नानासाठी येतात. इथे नर्मदेचं अतिशय विशाल, शांत सुंदर पात्र आहे. इथून पुढे सलकनपूरला देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. रोपवेने किंवा जीपने किंवा पायऱ्या चढून इथं जाता येतं. माॅं विजयासन देवीचं हे सुंदर मंदिर आहे. आम्ही रोपवेने जाऊन या देवीचं दर्शन घेऊन परत आलो.

  

  

  

  

- स्नेहल मोडक

Sunday, March 27, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ३

                 पाचव्या दिवशी मिठीतलाईला पोहचून सारं आवरुन मैयाची रोजची पूजा आरती केली. आणि भोजन करुन पुढे नारेश्वरला गेलो. हा श्रीरंग अवधुत महाराजांचा आश्रम. दत्तबावन्नीचे रचयिते. हे दर्शन घेऊन करणाली येथे मुक्कामास पोहोचलो.

                 कुबेर भंडारी हे करणाली मधील प्रमुख मंदिर. कुबेर हा देवांचा खजिनदार. ब्रम्हदेवांनी देवतांचा धनरक्षक म्हणून कुबेराची नियुक्ती केली होती. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊ. एकदा माता पार्वतीचा देवी लक्षमी कडून अपमान होतो. तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांकडून सुखसंपन्न सोन्याची नगरी मागते. भगवान शिव सोन्याच्या नगरीची निर्मिती करुन धार्मिक विधींसाठी विश्रवस ऋषींना पाचारण करतात. पूजा संपन्न झाल्यावर विश्रवस ऋषींना दक्षिणा मागण्यास शिव सांगतात. ते दक्षिणेत आपल्या मुलांसाठी ती सोन्याची नगरी म्हणजेच सोन्याची लंका मागतात. शिव ती नगरी दान करतात. पार्वती माता चिडून 'तुझ्या मुलांच्या अहंकारात लंकेची राख होईल' असा शाप देते. पुढे विश्रवस ऋषी त्यातली अर्धी नगरी रावणाने कुबेराला द्यावी असं सांगतात. रावण अहंकाराने ते मान्य करत नाही. तेव्हा नारदमुनी कुबेराला नर्मदा तीरी शिव शंकराची घोर तपश्चर्या करायला सांगतात. त्यानुसार कुबेराने जिथे तपश्चर्या केली तेच हे कुबेर भंडारी मंदिर. याच बरोबर गायत्री मंदिर, गीतामाता मंदिर, सोमेश्वर मंदिर यांचं दर्शन घेतलं.

                 सहाव्या दिवशी सकाळी गरुडेश्वरला पोहोचलो. या स्थानी पूर्वी अति बलशाली असा गजासूर नांवाचा राक्षस रहात होता. त्याने गजाचे रुप घेऊन गरुडाशी युद्ध केलं. त्यात गरुडांनी त्याला मारलं. त्याची हाडं पर्वतावरच पडून राहिली. कालांतराने ती नर्मदेत वाहून आली. गजासुराने नर्मदेत राहून १०० वर्षं तप केलं. भगवान शिव प्रसन्न झाले. हवा तो वर माग म्हणाले. तेव्हा गजासूराने हे स्थान कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध व्हावं, इथं स्नान, पूजा करणाऱ्यांना पुण्य लाभावं असा वर मागितला. तसंच आपलं कातडं शिवाने धारण करावं आणि गरुडाच्या हातून मृत्यू झाला म्हणून आपलं नांव गरुडाबरोबर जोडून इथे वास करावा असं मागणं मागितलं. भगवान शंकरानी गजासूराला तसा आशीर्वाद देऊन लिंग स्थापन करण्यास सांगितलं. तेच हे गरुडेश्वर.

                 श्री दत्तात्रेयांचे उपासक प.पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे गरुडेश्वरी उतरले होते. ते इथं असल्याचं कळताच त्यांचे भक्तगण इथं येऊ लागले. नंतर इथं दत्तमंदिर स्थापन करण्यात आलं. या मंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभु त्यांच्या उजवीकडे प.पू. आद्य शंकराचार्य आणि डावीकडे विद्यादायिनी सरस्वती देवी आहे. या तीनही मुर्तींची प्रतिष्ठापना पू. ब्रम्हानंद स्वामींनी केली आहे. १९१४ मध्ये प.पू. स्वामीजींनी गरुडेश्वर मुक्कामी नर्मदा मैयाच्या कुशीत समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतली तिथे समाधी मंदिर बांधण्यात आलं आहे. आणि त्यासमोरच त्यांच्या निर्गुण पादुकांचं मंदिर आहे. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत अशी श्रद्धा आहे त्यामुळे गरुडेश्वर हे दत्तभक्तांचं श्रध्दास्थान आहे.

                 सातव्या दिवशी सकाळी रात्रभराचा प्रवास करुन महेश्वर येथे पोहोचलो. महेश्वर हे पुराणकाळापासून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुराणातील कार्तवीर्य अर्जुन या सोमवंशीय क्षत्रिय राजाची राजधानी म्हणून महेश्वरचे उल्लेख आढळतात. कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन या नावानेही रामायण आणि महाभारतात ओळखला जातो. एका पुराणकथेनुसार राजा आपल्या ५०० राण्यांसह नदीतीरी फिरायला गेला. राण्यांना क्रीडा करायची लहर आली. क्रिडेसाठी मोठी जागा हवी म्हणून सहस्रार्जुनाने आपल्या हजार बाहूंनी नर्मदेचा प्रवाह रोखला. त्याचवेळी आकाशमार्गे जाणाऱ्या रावणाने नदीचे कोरडे पात्र पाहिलं आणि शिवभक्त रावणाने तिथे शिवलिंग स्थापून पूजा सुरु केली. तेवढ्यात राण्यांची क्रिडा संपली आणि राजाने नर्मदेचा प्रवाह सोडून दिला. प्रवाहात शिवलिंग वाहून गेलं. संतापलेल्या रावणाने सहस्रार्जुनाशी युध्द आरंभलं. राजाने रावणाचा सहज पराभव केला. रावणाला जमिनीवर लोळवून त्याच्या प्रत्येक डोक्यावर एकेक दिवा ठेवला. त्याची आठवण म्हणून अजूनही महेश्वरच्या सहस्रार्जुन मंदिरात ११ दिवे लावण्याची प्रथा आहे. महेश्वरचं पुरातन नांव माहिष्मती असं होतं.

                अठराव्या शतकाच्या अखेरीस महेश्वर अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आलं. मल्हारराव होळकर यांच्या स्नुषा अहिल्यादेवी कुशल शासक म्हणून ओळखल्या जात असत. अगदी लहान वयात वैधव्य आल्यावर सासरे मल्हारराव यांच्या मार्गदर्शनाखाली महेश्वरच्या राज्यकारभाराची धुरा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सांभाळली. त्यांच निवासस्थान असलेला वाडा साधाच पण मोठा होता. त्या वाड्यातलं त्याचं खाजगी देवघर ही वाड्याची खासियत. या देवघरात अनेक देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्ती होत्या. आजही त्यातली झुल्यावर बसलेली बाळकृष्णाची सोन्याची मोठी मूर्ती आपल्याला पहायला मिळते. राजवाडा आणि राजगादीवरील अहिल्यादेवींची मूर्ती पहाताना तो सगळा काळ अक्षरशः डोळ्यासमोर उभा रहातो. आणि क्षणभर तरी प्रत्येक जण नतमस्तक होतोच. अहिल्यादेवी यांनी महेश्वरमध्ये अनेक मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या. श्री काशी विश्वेश्वर मंदिर बांधलं. महेश्वरसहित अनेक ठिकाणी अतिशय सुंदर नदीघाट बांधले. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट महेश्वरला आहेत. महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा मैया इथून जाते. अहिल्यादेवींनी सुरु केलेली एक धार्मिक परंपरा म्हणजे कोटी लिंगार्चन. त्यांचा असा विश्वास होता की स्ताला जे मिळालंय ते उदंड आहे. त्याहून अधिक मिळवण्याचा आपल्याला अधिकार नाही. 

                 त्यामुळे प्रजेच्या सौख्याला त्यांनी जास्त महत्व दिलं. त्याचा एक भाग म्हणजे कोटी लिंगार्चन ही प्रथा. रोज १०८ ब्राह्मणांनी नर्मदेतील माती आणून १०८ पाटांवर प्रत्येकी १३२५ छोटी शिवलिंग शिवमहिम्न पाठ म्हणून स्थापन करायची. त्यांची विधीवत पूजा करायची. नंतर अहिल्यादेवी स्वतः त्या शिवलिंगाची पूजा करुन प्रजेच्या सौख्याची, रक्षणाची प्रार्थना करत. सायंकाळी ती सारी शिवलिंग नर्मदेतच विसर्जित करत असत. अजूनही ही परंपरा सुरु असून ११ पाटांवर ही शिवलिंग स्थापून पूजा, अभिषेक केला जातो. आणि प्रथेप्रमाणे सायंकाळी त्यांचं नर्मदेत विसर्जन केलं जातं.

                 महेश्वरची खासियत म्हणजे महेश्वरी साडी. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रातून कारागिर बोलावून मराठी स्त्रिया परिधान करत असलेल्या साड्या विणण्यासाठी हातमाग उपलब्ध करुन दिले. कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती सर्वदूर पसरली. महेश्वर मधली मंदिरंही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर आणि अहिल्येश्वर ही मंदिरं आवर्जून पाहण्यासारखी आहेत.

  

    

    




- स्नेहल मोडक

Saturday, March 26, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग २

                तिसऱ्या दिवशी आम्ही प्रकाशा ला पोहोचलो. श्री क्षेत्र प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथे पुष्पदंतेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन मैयाची पूजा आरती केली. हे मंदिर तापी नदीच्या काठावर पूर्वाभिमुख असून यात महादेवाची स्वयंभू पिंड आहे. एक राजा या मंदिरात रोज पूजा करायचा. एकदा पूजा करताना त्याच्याकडे पूजेसाठी फुलं नव्हती मात्र पूजेत खंड पडू नये म्हणून त्याने आपला दंत काढून महादेवाला अर्पण केला. तर त्या दंताचं पुष्प झालं. तेव्हापासून या मंदिराला पुष्पदंतेश्वर हे नांव पडलं अशी एक आख्यायिका आहे. इथे तापी, गोमती, पुलिंदा या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. हा संगम, केदारश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर यांच दर्शन घेतलं. तसचं इथं ऋणमुक्तेश्वराचंही मंदिर आहे. आपलं कर्ज फिटावं म्हणून लोक या मंदिरात नवस बोलतात आणि ५,७,११ वेळा अमावस्येला दर्शन घेतल्यानंतर कर्जमुक्ती होते अशी श्रद्धा आहे.

                 त्यानंतर आम्ही पोहोचलो शुलपाणेश्वर मंदिरात. परिक्रमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा. इथं पूर्वी खूप मोठं घनदाट जंगल होतं. त्यात भिल्ल लोकांचं वास्तव्य होतं. पायी परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी हे जंगल पार करणं कष्टदायक आणि जोखमीचं होतं. इथले भिल्ल प्रत्येक भाविकाला लुटत. अगदी अंगावरल्या वस्त्रासहित सारं काही काढून घेत असत. त्याचं कारण इतकं अपरिमीत दारिद्रय तिथं नांदत होतं. नंतर सरदार सरोवर प्रकल्पात हे जंगल बरंचसं धरणाखाली गेलं. भिल्लांचा त्रास बंद झाला तरी त्या मार्गाने चालणं अधिक कष्टदायी झालं. तिथलं मूळ मंदिर आता वरच्या बाजूला बांधण्यात आलं आहे.अतिशय रमणीय असा हा परिसर आहे. आम्ही इथं पोहोचलो तेच सूर्यास्तसमयी. त्यामुळे सूर्यास्ताचं अप्रतिम दृश्य आम्हाला अनुभवायला मिळालं. इथे दर्शन घेऊन राजपिपला इथं आम्ही मुक्कामासाठी पोहोचलो. 

                 खरंतर याच दिवशी कठपोर ते मीठीतलाई या समुद्र तरणासाठी रात्री २ वाजताची वेळ आम्हाला मिळाली होती. पण त्यामुळे शूलपाणेश्वर आणि भालोद ही परिक्रमेतील २ महत्वाची स्थानं करणं आम्हाला अवघड होतं. जसं  हे आम्हाला कळलं तसं आम्ही सारेच नाराज झालो. पण दुसऱ्या क्षणीच मैयाला मनोमन प्रार्थना केली की कसंही करुन तू आम्हाला या दोन्ही स्थानांचं दर्शन घडव. मनापासून प्रार्थना केली तर मैया इच्छा पूर्ण करते असा अनुभव ऐकत आलो होतो. त्यामुळे मैया आपली इच्छा नक्की पूर्ण करणार असा विश्वास होता. अखेर कठपोरला संपर्क साधून बोलणं करुन दुसऱ्या दिवशीच्या रात्री २ वाजताची वेळ ठरवण्यात आली आणि आमची इच्छा पूर्ण झाली. मैयाने खूप छान अनुभूती दिली होती. मन समाधानानं भरुन पावलं होतं.

                चौथ्या दिवशी सकाळी लवकर निघून मार्गातील मंदिरांचं दर्शन घेऊन पोइचा ला पोहोचलो. नर्मदा नदीच्या काठावर १०५ एकरात उभारलेलं निळकंठधाम स्वामी मंदिर. अतिशय देखणं विशाल असं हे मंदिर. या मंदिरात महादेवाची नटराज स्वरुपातील भव्य मूर्ती आहे. मंदिर इमारतीच्या भोवती जलाशय असून अनेक देवदेवतांची लहान मोठी मंदिरे आहेत. हे सारं पाहून दर्शन घेऊन पुढे निघालो. 

                 मनाला ज्याची ओढ लागली होती त्या भालोद या स्थानी पोहोचलो. नर्मदा परिक्रमेत श्री दत्तप्रभुंची मोजकीच मंदिरं आहेत. जबलपूर, नर्मदापुरम (होशंगाबाद), गरुडेश्वर, राजघाट आणि भालोद. त्यातील भालोदच्या दत्तमंदिरात आम्ही पोहोचलो होतो. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी १४००व्या शतकातील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती जी अंधारात किंवा उजेडात कशीही पाहीली तरी पोटावर गोमुख दिसतं. प.पू.वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या कृपेने प.पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोदला वास्तव्य करण्याचा आदेश मिळाला. याचदरम्यान बडोदा येथे काशीताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमूर्ती प.पू.प्रतापे महारांजाकडे आली आणि भालोदला दत्तमंदिर स्थापन झालं. मुळात काशीताईंच्या आजोबांना श्री दत्तगुरुंनी स्वप्नदृष्टांत दिला आणि 'मी नर्मदेच्या जळात आहे, मला तू घेऊन जा' असं सांगितलं. त्याप्रमाणे ही दत्तमूर्ती बडोद्याला आणून तिथे मंदिर स्थापन केलं. नंतर मुलाने आणि त्यानंतर काशीबाईंनी वयाच्या ८५ वर्षांपर्यंत सेवा केली. पण मग  या दत्तमूर्तीचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळीही श्री दत्तगुरुंनी स्वप्नदृष्टांत देऊन 'उद्या सकाळी मंदिरात येणाऱ्या पहिल्या व्यक्तीला मला दे' असं सांगितलं. सकाळी प्रतापे महाराज त्या मंदिरात गेले आणि ती दत्तमूर्ती त्याच्याकडे आली. ही मूर्ती एकमुखी आणि शाळिग्रामाची आहे. अतिशय रेखीव अशी ही मूर्ती आहे.

                 श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन प्रतापे महाराजांना भेटलो. खरंतर नर्मदा परिक्रमेविषयी त्यांच्याकडून काही ऐकायची खूप इच्छा होती. पण वेळेअभावी ते शक्य झालं नाही. पण माझं त्यांच्याशी अगदी थोडंसं का होईना गुरुचरित्राबद्दल बोलणं झालं आणि मनाला समाधान लाभलं. आश्रमाचा सारा परिसर सुंदर आहे. समोरच मैयाचं विशाल पात्र आहे. परिक्रमावासींची इथं उत्तम व्यवस्था केली जाते. खरंतर तिथून निघावसंच वाटत नव्हतं. अखेर तिथून निघालो आणि कठपोरला पोहोचलो.

                 कठपोरला पोहोचायला रात्रच झाली होती. तिथल्या विमलेश्वर मंदिराजवळच आमची व्यवस्था केली होती. रात्री २.३० वाजल्यानंतर समुद्र तरणासाठी निघायचं होतं. तोपर्यंत आम्ही त्याठिकाणी थांबलो होतो. सारं आवरुन साधारण  सव्वा तीन वाजता आम्ही तिथून निघालो. विमलेश्वर मंदिराच्या बाजूनेच नावेपर्यंत जायचा लहानसा रस्ता आहे. जवळपास ३ किमी इतकं अंतर चालून जावं लागतं. किंवा छोट्या वाहनानेही जाता येतं. आमच्यापैकी काही जणं वाहनाने तर आमच्यासह काही जण चालत निघालो. 

                 आम्ही सगळ्यांबरोबर चालायला सुरुवात केली. मिट्ट काळोख होता. रस्त्यावर एकही दिवा नव्हता.सारं अंतर अंधारातच चालायचं होतं.  एवढंच काय जिथं नावा थांबल्या होत्या तिथही अंधारच होता. भ्रमणध्वनीच्या आणि छोट्या वाहनांच्या दिव्यांच्या उजेडातच सारी लगबग सुरु होती. 

                 आम्ही चालायला सुरुवात केली आणि पुढच्या पाच मिनिटांतच माझ्या लक्षात आलं की बाजूने कुणीतरी चालतंय कारण अंधारात फक्त डोळे चमकत होते. अर्थात अंदाज आला होताच पण भ्रमणध्वनीच्या उजेडात बघितलं आणि दिसला एक छान काळ्या रंगाचाच एक श्वान. आमच्या बाजूनेच जणू काही आमची काळजी घेतच चालत होता तो. मधेच ७-८ पावलं पुढे जाई आणि थांबे, मधेच मागे पुढे असलेल्या सगळ्या लोकांच्या बाजूने चाले आणि परत आमच्याजवळ येई. जणू त्या मिट्ट काळोखात आमची काळजी घेण्यासाठी स्वयं श्री दत्तगुरुंनीच पाठवलं होतं त्याला. कारण आम्ही अगदी नावेत चढेपर्यत तो आमच्या जवळच उभा होता. आम्हाला नावे पर्यंत पोहोचल्यावर तास दिड तास रस्त्यावरच अंधारात थांबावं लागलं होतं. समुद्राच्या भरतीचं पाणी तिथं येईपर्यंत नावा निघू शकत नाहीत. पण तेवढावेळ आमचं रक्षण तो श्वान करत होता असंच म्हणायला हवं. वाटेत चालताना त्याने माझ्याकडून छान गोंजारुनही घेतलं होतं. आणि छायाचित्रही काढू दिलं होतं. 

                 समुद्र तरण दिवसा होणार कि रात्री ते पौर्णिमा अमावास्या यावर ठरतं. १५ दिवस दिवसा आणि १५ दिवस रात्री समुद्र तरण होतं. आदल्या दिवशी किती लोकं समुद्र तरणासाठी आली आहेत ते नोंद करुन त्याप्रमाणे नावा सोडतात. आधी दलदलीसारख्या जागेतच नावा लागलेल्या असतात. भरतीचं पाणी हळूहळू चढायला सुरुवात झाल्यावर आमच्या नावाड्यांनी हाकारा केला आणि आम्ही नावेजवळ गेलो. जमिनीपासून नावेत जाण्यासाठी आधी थोडी तीव्र उताराची जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढीच वाट आणि पुढे थोडा बांबूच्या पट्ट्यांचा अरुंद साकव अशी स्थिती होती. त्यावरुन तोल सावरत भीतभीतच नावेत जाऊन बसलो. नांवेत अनवाणी पायाने चढावं लागतं. एकतर आपल्या जवळ पिशवीत चपला घ्यायच्या किंवा किनाऱ्यावरच सोडायच्या. आम्ही अर्थातच आधीच पिशवीत चपला काढून ठेवल्या होत्या. सारे नावेत बसल्यावर थोड्याच वेळात नाव निघाली. आणि सुरु झाला आमचा समुद्र प्रवास. अजूनही उजाडलं नव्हतं. त्यामुळे अंधारात समुद्र दिसत नसला तरीही आता आपल्या आजूबाजूला फक्त पाणी आणि अंधार आहे या विचारानेच मन थोडं अस्वस्थ होतं. पण थोड्याच वेळात पूर्वदिशेला सोनकेशर रंगाची पखरण होऊ लागली. आणि सहस्त्ररश्मीची स्वारी दिमाखात आकाशी अवतरु लागली.

                   अतिशय अप्रतिम दृश्य होतं ते. इतकं सुंदर दृश्य छायाचित्रात बध्द करण्यासाठी माझ्यासहित सगळ्यांचीच गडबड उडाली. रवीराजाचं प्रतिबिंब सागरात दिसू लागलं आणि सागराचं पाणीही चमचम करु लागलं. साऱ्या सृष्टीला जाग आली. आमच्या नावेवरुन खूप सारे समुद्रपक्षी उडू लागले. आणि मग सुरु झाला एक छान खेळ.आम्ही त्यांना खाऊ घालत होतो आणि आम्ही हवेत उंच फेकलेला खाऊ ते समुद्र पक्षी वरच्यावर चोचीत पकडत होते. खूपच छान वातावरण होतं. रात्रीचं अंधारातलं चालणं, कसरत करत नावेतलं चढणं, आजूबाजूला पसरलेला अथांग सागर सारं विसरुन सगळे नौकानयनचा छान आनंद घेऊ लागले.

                    मैया जिथे सागराला मिळते तो संगम आला आणि आम्ही आमच्या जवळच्या नर्मदा जलाच्या कुपीतलं थोडं जल संगमात ओतून तिथलं थोडं जल कुपीत घेऊन तीर्थमिलन केलं. संपूर्ण परिक्रमेत हे प्रत्येक ठिकाणी करायचं असतंच.  जवळजवळ ४ तासांचा हा रत्नासागरातला प्रवास कधी संपला ते कळलंही नाही. आम्ही मिठी तलाईला पोहोचलो तिथं मात्र उतरायला व्यस्थित धक्का बांधलेला आहे. नावेतून उतरुन पायऱ्या चढून वर जाता येतं.

  



  

स्नेहल मोडक

Friday, March 25, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग १

! त्वदीय पादपंङ्कजं नमामि देवी नर्मदे !

             नर्मदा मैया ही मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातून वाहणारी प्रमुख नदी. शिवकन्या नर्मदा ही रेवा, अमरजा, मैकलकन्या नावांनेही ओळखली जाते. मध्य प्रदेशातील मैकल पर्वतश्रेणीतील अमरकंटक हे नर्मदा नदीचं उगमस्थान. म्हणूनच नर्मदेला मैकलकन्या या नावानंही ओळखतात. नर्मदेच्या मार्गात अनेक धबधबे, दृतवाह आहेत त्यामुळे 'उड्या मारत, खळखळ करत'  जाणारी या अर्थाने रेवा हे सार्थ नांव. नर्मदेला हे नांव श्री रामांनी दिलं असं मानतात. भारतातील सगळ्या नद्या दक्षिणेकडे वाहतात. नर्मदा ही एकच अशी नदी आहे की जी पश्चिम दिशेकडे जाऊन पुढे सागराला मिळते. आपल्याकडे अठरा पुराणं आहेत. आणि नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असं तिला वरदान आहे.

            नर्मदेच्या पात्रात मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात. तसंच तिच्या पात्रातील काळ्या पाषाणांपासून शिवलिंग बनवतात. याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात भगवान शिव विद्यमान असतात असा पुराणात उल्लेख आहे. भरतखण्डात नर्मदेपेक्षा आकाराने मोठ्या नद्या असल्या तरीही नर्मदेचं प्राचीनत्व आणि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व या वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा फक्त नर्मदा नदीचीच केली जाते.

              या परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्रीमार्कंडेय ऋषी. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त नर्मदा नदीच नाही तर तिला मिळणाऱ्या ९९९ नद्यांचा धारा- प्रवाह न ओलांडता त्यांच्या उगमाला वळसा घालून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी परिक्रमा केली. २७ वर्षं लागली त्यांना या परिक्रमेला. अनेक ऋषी मुनींनी नर्मदा तीरी साधना करुन देह ठेवला आहे.

              ही परिक्रमा पायी चालत किंवा वाहनानेही करतात. साधारण ३००० किमी अंतराच्या या परिक्रमेत असंख्य प्राचीन मंदिरं, ऋषीमुनींचे आश्रम यांचं दर्शन घेता येतं. पायी चालत परिक्रमा करताना अवघड वाटेवरुन, जंगलातूनही जावं लागतं. पण श्रध्देने चालणाऱ्या प्रत्येकाची काळजी स्वतः मैया घेते. अतिशय सुंदर अनुभूती या परिक्रमेत मैया आपल्याला देते. 

               त्यामुळे नर्मदा परिक्रमा असा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी आमचे कान टवकारले जायचे. कारण नर्मदा परिक्रमा करायची, अर्थातच आधी वाहनाने अशी खूप तीव्र इच्छा होती. त्यामुळे याविषयी कुठे काही ऐकलं तरी लगेच त्याबद्दल माहिती घेत होतो. 

              खूप वेगवेगळ्या यात्राकंपन्या नर्मदा परिक्रमा आयोजित करतात. अशाच एका आम्हाला हव्या तशा अध्यात्मिक यात्रेची आम्हाला माहिती मिळाली. पण माझी मात्र द्विधा मनस्थिती झाली होती. २०-२२ दिवस मुलींना सोडून कसं जायचं हा विचार मनात येत होता. पण मुलींनी आलेली संधी सोडू नका, नर्मदा मैय्या बोलवतेय, तुम्ही कुठलीही काळजी न करता जाऊन या अशा दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आश्वस्त होऊन आम्ही परिक्रमेला जायचं नक्की केलं.

              आमची परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरु होणार होती. ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या सायंकाळी सर्वांनी एकत्र जमायचं होतं. त्याआधी एक दिवस आम्ही इंदोरला पोहोचलो. तिथल्या अतिथी निवासात रहाण्याची व्यवस्था आम्ही आधीच केली होती. त्याप्रमाणे इंदोरला पोहोचल्यावर तिथे जाऊन सारं आवरुन आधीच ठरवलेल्या गाडीने उज्जैनला गेलो. तिथे श्री महाकालेश्वरचं दर्शन घेऊन जवळच्या हरसिध्दी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर कालभैरव, बडा गणपती, सांदिपनी आश्रम हे सारं करुन इंदोरला ५६ दुकान येथे जाऊन इंदोरच्या खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. रात्री इंदोरला राहून दुसऱ्या दिवशी परत थोडं इंदोर फिरुन, भेटीगाठी घेऊन ओंकारेश्वरला पोहोचलो. 

                ओंकारेश्वरला ठरल्यानुसार सर्वजणं सायंकाळी एकत्र जमलो. चहापान झालं, परिक्रमेसाठीच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता केली. नंतर फराळ करुन उशिरा श्री ओंकारेश्वरच्या दर्शनाला गेलो. रात्री ११.१५ वाजता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत येऊन निद्राधीन झालो ते दुसऱ्या दिवशीच्या मांधाता परिक्रमेच्या विचारातच.

               मांधाता परिक्रमा म्हणजे नर्मदा आणि कावेरी संगमस्थित मांधाता पर्वतावर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराला केली जाणारी परिक्रमा. ही परिक्रमा साधारण ७ किमी अंतराची आहे. ओंकारेश्वरच्या कोटी तीर्थ या स्थानापासून परिक्रमेची सुरुवात होते. ही पायी चालत किंवा नावेतूनही करता येते. या मार्गात नर्मदा आणि कावेरी यांचा संगम होतो. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. ही परिक्रमा अतिशय रमणीय आनंददायी आहे. या परिक्रमेतच ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरात चणा डाळ अर्पण केली असता सर्व पापातून, ऋणातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. 

                अशी ही सुंदर मांधाता परिक्रमा नावेतून करुन, ऋणमुक्तेश्वराचं दर्शन करुन आणि एक सुंदर अनुभव घेऊन आम्ही दुपारी परत आलो.

                सायंकाळी ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर परिक्रमेच्या संकल्प पूजेसाठी गेलो. 

                मांधाता पर्वतावरील ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. मांधाता पर्वताचा आकार ओम चिन्हासारखा आहे. इथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर अनेक मंदिरं आहेत. परिक्रमेच्या दृष्टीने ओंकारेश्वरचं महत्व अनन्यसाधारण आहे. परिक्रमा आरंभ ओंकारेश्वर, नेमावर किंवा अमरकंटक यापैकी कुठूनही केला तरीही नर्मदा जल ओंकारेश्वरला चढवल्यावरच परिक्रमेची सांगता होते अशी मान्यता आहे.

                संकल्प पूजेपूर्वी नर्मदा स्नान करायचं असतं. स्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरुन खाली गेलो खरं पण मनात गोंधळ होता. पाण्याची भिती, थोडी उत्सुकता, थोडी लज्जा अशा संमिश्र भावना मनात दाटल्या होत्या. अनेक स्त्रिया तिथे मुक्तपणे स्नान करत होत्या. मग मीही नकळत पाण्यात उतरले. पावलांना जलस्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. साऱ्या संमिश्र भावना क्षणात नाहीशा झाल्या आणि उरली ती फक्त मैयाच्या उबदार स्पर्शाची जाणीव. लहान बाळ जसं आईच्या कुशीत शिरल्यावर सुखावतं तशी सुखावले मी. छान स्नान करुन प्रसन्न मनाने संकल्प पूजा केली. 

                संकल्प पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रावेरखेडी येथे पोहोचून मैयाची यथासांग पूजा आरती केली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचं समाधीस्थान. इ.स. १७४० मध्ये उत्तरेच्या मोहिमेवर असतांना वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला. नर्मदा तीरीच त्यांचं समाधी स्थान आहे. 

                 तिथूनच पुढे सियाराम बाबांच्या आश्रमात जाऊन दर्शन घेतलं आणि मुक्कामाला निघालो.

    

 

  


- स्नेहल मोडक

कविता

जय बाबा बर्फानी - १

          '८ जुलै २०२५' आमच्यासाठी अजून एक विशेष दिवस. याच दिवशी आमची अजून एक इच्छा पूर्ण झाली. गतवर्षी काही कारणाने रहित करावी लागल...