Pages

Thursday, March 31, 2022

नर्मदा परिक्रमा - अंतिम भाग

                 पंधराव्या दिवसाची सकाळ. आज परिक्रमेचा अखेरचा दिवस. मन अक्षरशः सैरभैर झालं होतं. ओंकारेश्वरचा कालचा मुक्काम हा परिक्रमेमधला अखेरचा मुक्काम होता. रात्री निद्राधीन होण्याआधी सगळ्यांच्या मनाची चलबिचल नक्कीच झाली होती. मला तर झोप येणं शक्यच नव्हतं. सारी परिक्रमा, साऱ्या घटना, जाणवलेल्या अनुभूती सारं सारं डोळ्यासमोर येत होतं. एकूण सतरा दिवस कधी संपले कळलही नव्हतं. 

                इतके दिवस घडणारं मैयाचं रोजचं दर्शन, मैयास्नान, सर्वानी रोज सकाळ सायंकाळ एकत्रितपणे केलेली आपापल्या मैयाजलकुपीची साग्रसंगीत पूजा आरती हे सारं आजच्या पूजेनंतर संपणार होतं.  

                कुठलंही विघ्न येऊ न देता, किंचितही त्रास होऊ न देता मैयाने आम्हा सर्वांना परिक्रमा घडवली. परिक्रमावासींकडून ऐकलेले अनुभव अगदी खरे ठरले. मैयाने आम्हालाही अतिशय सुंदर अनुभूती दिली. वाहनाद्वारे केलेली ही परिक्रमाही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.

                अखेर संकल्पपूर्तीच्या पूजेसाठी परत ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर गेलो. पून्हा स्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरुन खाली गेलो. पण मी मात्र पायरीवरच थबकले. स्नानासाठी जळात उतरायला मन तयारच होईना. मैयाजवळ नुसतं पायरीवरच बसून रहावंसं वाटत होतं. डोळ्यात येणारं पाणी निग्रहाने थांबवून पाच मिनिटं तशीच शांत उभी राहिले. पण वेळेअभावी जास्त थांबणं शक्य नव्हतं. मग मैयाला साश्रुनयनांनीत मनःपूर्वक प्रार्थना केली आणि स्नान करुन वर आले.

                 सर्वांनी घाटावर पूजेची सारी तयारी केली. तिथल्या गुरुजींनी संकल्प पूर्तीची पूजा सांगितली. पूजा पूर्ण झाली आणि आम्ही परत ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो. तिथे प्रथेप्रमाणे आमच्या जलकुपीतलं अर्धं पाणी ओंकारेश्वरला वाहिलं. तिथून पुढे ममलेश्वराच्या मंदिरात जाऊन उरलेलं अर्धं जल ममलेश्वराला वाहिलं आणि परिक्रमेची सांगता केली. 

                 नंतर जवळच असलेल्या श्री गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतलं. अतिशय प्रशस्त आणि सुंदर असा हा मठ आहे. या मठाकडून परिक्रमावासींच्या रहाण्याची, भोजनाची व्यवस्था केली जाते.  श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही जिथं मुक्काम केला होता तिथं परत आलो. भोजन प्रसाद घेऊन सर्वांचा निरोप घेऊन भरल्या डोळ्यानी, साऱ्या आठवणी मनाच्या कुपीत साठवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.

नर्मदे हर    नर्मदे हर    नर्मदे हर


                आता मात्र आस लागली होती ती दत्तगुरुंच्या दर्शनाची, गिरनारची. ओंकारेश्वरहून  इंदोरला आलो. तिथून सायंकाळी ५ वाजता रेल्वेने निघालो. रात्री १२.३० वाजता वडोदराला उतरलो. तिथून आधीच ठरवून ठेवलेल्या गाडीने जुनागढला  निघालो. सकाळी ८.१५ वाजता जूनागढ तलेटीला पोहोचलो.

                 मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन भरभर आवरुन दर्शनाला निघालो. पौर्णिमा दुपारी संपणार होती. त्यामुळे वेळ कमी होता. नेहमीप्रमाणे लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना केली. आणि रोपवे जवळ गेलो. रोपवेची तिकींटं आधीच काढलेली होती. आम्ही रोपवेला पोहोचलो तर भलीमोठी रांग लागलेली होती. एवढी मोठी रांग पहिल्यांदाच पहात होतो. चौकशी केल्यावर कळलं की वर खूपच जोराचा वारा आहे त्यामुळे रोपवे बंद आहे. कधी सुरु होईल काहीच सांगता येत नव्हतं. किमान ४-५ तास लागतील असं तिथले लोक सांगत होते. मग मात्र दत्तगुरुंना प्रार्थना केली, तुम्हीच आम्हाला इथवर आणलंय आता दर्शन कसं घडवायचं ते तुम्हीच ठरवा. दर्शन झाल्याशिवाय इथून जाणार नाही हे नक्की. कारण पायऱ्या चढून जायचं ठरवलं तरी पोहोचेपर्यंत पौर्णिमा संपली असती. आणि उन्हात चढून जाणं सहज शक्यही नव्हतं. पण जर रोपवे सुरु झालाच नाही तर मात्र लगेच पायऱ्या न चढता रात्री चढायला सुरुवात करायची असंही ठरवलं.

                  मनोमन नामस्मरण करत असतानाच साधारण अर्ध्या पाऊण तासानी रोपवे सुरु झाला. आधी तिकिट काढलेल्या लोकांची वेगळी रांग केली आणि आम्हाला रोपवेने जायला मिळालं. रोपवेतून उतरल्यावर 'दर्शन घेऊन लवकर परत या, रोपवे कधीही बंद होऊ शकतो' असं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. 

                  रोपवेतून उतरुन आम्ही लगेच पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. होळी पौर्णिमा असल्याने खूप गर्दी होतीच. पण आम्हाला नेहमीप्रमाणे अतिशय छान दर्शन झालं. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक होताना मात्र अश्रू अनावर झाले होते. खूप साऱ्या भावना मनात दाटल्या होत्या. दत्तगुरुंना केलेली प्रार्थना त्यांनी ऐकली आणि लगेच दर्शन घडवलं, त्यांचं हे दर्शन आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं कारण हे आमचं अकराव्या वेळचं गिरनार शिखरदर्शन होतं. त्याचबरोबर त्यांच्या आणि मैयाच्या कृपेने नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली होती. हे सारे विचार मनात गर्दी करत असताना डोळे मात्र आपलं काम चोख बजावत होते. मीही डोळ्यात येणारं पाणी न पुसता नतमस्तक झाले होते.

                   पादुकांचं दर्शन घेऊन परत पायऱ्या उतरुन अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. आधी गुरुचरित्राचं वाचन करुन मग दर्शन घेतलं. भोजन प्रसाद घेऊन परत निघालो. रोपवेजवळ पून्हा रांग होतीच. पण थोड्याच वेळात आम्ही रोपवेने पायथ्याशी पोहोचलो. नर्मदा परिक्रमा आणि गिरनार दर्शन दोन्हीही घडल्याचा आनंद अवर्णनीय होता. 

                सायंकाळी सोरटी सोमनाथ ला गेलो. जाताना वाटेत भालका तीर्थाचं दर्शन घेतलं.  सोमनाथलाही खूपच गर्दी होती. पण अतिशय छान दर्शन झालं. दर्शन घेऊन तलेटीला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दुपारच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.

           सकाळी घरी पोहोचल्यावर मुलींनी फुलांची रांगोळी काढून औक्षण करुन मैयाचं सुंदर स्वागत केलं आणि आमच्या नर्मदा परिक्रमेची आणि गिरनार दर्शनाची खरी सांगता झाली.

               आमच्या या परिक्रमेत चालत परिक्रमा करणारे काही परिक्रमावासी भेटले. त्यांचे काही अनुभवही प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. त्यामुळे आता वेध लागले आहेत पुनश्च नर्मदा परिक्रमेचे, पण पायी चालत जाण्याचे. मैया नक्की पायी परिक्रमा घडवेल, आमची इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे.

जय गिरनारी    जय गिरनारी    जय गिरनारी


- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...